॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]राजा दशरथांनी कैकेयीला वर दिला -


श्रीमहादेव उवाच -
ततो दशरथो राजा रामाभ्युदयकारणात् ।
आदिश्य मंत्रिप्रकृतीः सानन्दो गृहमाविशत् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-त्यानंतर श्रीरामचंद्रांच्या अभ्युदयासाठी मंत्री आणि प्रजावर्ग यांना मंगल कार्य करण्याची आज्ञा करून दशरथ राजा आनंदाने आपल्या महालात शिरले. (१)

तत्रादृष्ट्‍वा प्रियां राजा किमेतदिति विह्वलः ।
या पुरा मन्दिरं तस्याः प्रविष्टे मयि शोभना ॥ २ ॥
हसन्ती मामुपायाति सा किं नैवाद्य दृश्यते ।
इत्यात्मन्येव संचिन्त्य मनसातिविदूयता ॥ ३ ॥
पप्रच्छ दासीनिकरं कुतो वः स्वामिनी शुभा ।
नायाति मां यथापूर्वं मत्प्रिया प्रियदर्शना ॥ ४ ॥
तेथे आपली लाडकी कैकेयी न दिसल्यामुळे अतिशय व्याकूळ होऊन ते मनात विचार करू लागले- "हे काय ? मी महालात शिरताच पूर्वी जी सुंदरी हसत हसत माझ्यापुढे येत असे, ती आज का बरे येथे दिसत नाही ?" मग मनात अतिशय दुःखी झालेल्या त्या राजांनी दासींना विचारले "तुमची शुभलक्षणा स्वामिनी कुठे आहे ? ती माझी प्रियदर्शना प्रिया आज पूर्वीप्रमाणे माझ्यासमोर का बरे येत नाही ?" (२-४)

ता ऊचुः क्रोधभवनं प्रविष्टा नैव विद्महे ।
कारणं तत्र देव त्वं गच्छ निश्चेतुमर्हसि ॥ ५ ॥
दासींनी सांगितले, "महाराज, ती आमची स्वामिनी क्रोधभवनात शिरली आहे. त्याचे कारण आम्हांस माहीत नाही. आपण स्वतःच तेथे जाऊन सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात." (५)

इत्युक्तो भयसंत्रस्तो राजा तस्याः समीपगः ।
उपविश्य शनैर्देहं स्पृशन्वै पाणिनाब्रवीत् ॥ ६ ॥
दासींनी असे सांगितल्यावर भीतीने त्रस्त होऊन राजा कैकेयीजवळ गेले. तेथे बसून ते हळूवारपणे तिचा देह हाताने हळूहळू कुरवाळत म्हणाले. (६)

किं शेषे वसुधापृष्ठे पर्यङ्‌कादीन् विहाय च ।
मां त्वं खेदयसे भीरु यतो मां नावभाषसे ॥ ७ ॥
"अग प्रिये, पलंग इत्यादी सोडून देऊन तू आज जमिनीवर का झोपली आहेस ? तूं माझ्याशी काही बोलत नाहीस ? त्यामुळे मला फार खेद होत आहे. (७)

अलङ्‌कारं परित्यज्य भूमौ मलिनवाससा ।
किमर्थं ब्रूहि सकलं विधास्ये तव वाञ्छितम् ॥ ८ ॥
सर्व अलंकार टाकून देऊन, मलिन वस्त्र परिधान करून, तू का बरे जमिनीवर पडली आहेस ? तुझी जी इच्छा असेल ती तू मला सांग. मी ती पूर्ण करीन. (८)

को वा तव अहितं कर्ता नारी वा पुरुषोऽपि वा ।
स मे दण्ड्यश्च वध्यश्च भविष्यति न संशयः ॥ ९ ॥
तुझे अनिष्ट करणारा कोण आहे ? तो स्त्री असो या पुरुष असो, तो माझ्या शिक्षेला पात्र ठरेल. इतकेच नव्हे तर त्याला मृत्युदंडही देईन, यात काहीही संशय नाही. (९)

ब्रूहि देवि यथा प्रीतिस्तदवश्यं ममाग्रतः ।
तदिदानीं साधयिष्ये सुदुर्लभमपि क्षणात् ॥ १० ॥
हे देवी, ज्यामुळे तुला आनंद होईल ती गोष्ट तू मला अवश्य सांग. ते कार्य अत्यंत अवघड असले तरीसुद्धा मी ते एका क्षणातच करून टाकीन. (१०)

जानासि त्वं मम स्वान्तं प्रियं मां स्ववशे स्थितम् ।
तथापि मां खेदयसे वृथा तव परिश्रमः ॥ ११ ॥
तू माझे हृदय जाणतेसच. मी तुला अत्यंत प्रिय आहे, आणि तुला वश आहे. तरीसुद्धा तू मला खिन्न करीत आहेस. तुझा हा व्यर्थ खटाटोप आहे. (११)

ब्रूहि किं धनिनं कुर्यां दरिद्रं ते प्रियङ्‌करम् ।
धनिनं क्षणमात्रेण निर्धनं च तवाहितम् ॥ १२ ॥
मला सांग. तुला आवडणारी गोष्ट करणार्‍या कोणत्या दरिद्री माणसाला एका क्षणात मी श्रीमंत करू ? किंवा तुला अप्रिय वाटणारी गोष्ट करणार्‍या कोणत्या श्रीमंत माणसाला मी एका क्षणात निर्धन करू ? (१२)

ब्रूहि किं वा वधिष्यामि वधार्हो वा विमोक्ष्यसे ।
किमत्र बहुनोक्तेन प्राणान्दास्यामि ते प्रिये ॥ १३ ॥
मला सांग, कोणाला मी ठार मारू अथवा वधाला योग्य असणार्‍या कोणत्या माणसाला सोडून देऊ ? जास्त काय सांगू ? हे प्रिये, मी तुझ्यासाठी माझे प्राणसुद्धा देईन. (१३)

मम प्राणात्प्रियतरो रामो राजीवलोचनः ।
तस्योपरि शपे ब्रूहि त्वद्धितं तत्करोम्यहम् ॥ १४ ॥
कमलनयन राम मला माझ्या प्राणांपेक्षासुद्धा अधिक प्रिय आहे. त्याची शपथ घेऊन मी तुला सांगतो. तुला जे आवडते ते तू मला सांग. मी तेच करीन. " (१४)

इति ब्रुवाणं राजानं शपन्तं राघवोपरि ।
शनैर्विमृज्य नेत्रे सा राजानं प्रत्यभाषत ॥ १५ ॥
रामांची शपथ घेऊन महाराज दशरथांनी असे सांगितल्यावर, कैकेयीने हळूहळू आपले अश्रू पुसले आणि ती राजांना म्हणाली. (१५)

यदि सत्यप्रतिज्ञोऽसि शपथं कुरुषे यदि ।
याञ्चां मे सफलां कर्तुं शीघ्रमेव त्वमर्हसि ॥ १६ ॥
"हे महाराज, जर तुम्ही सत्यप्रतिज्ञ असाल आणि जर तुम्ही शपथसुद्धा घेत आहात, तर मी जी मागणी करीन ती तुम्ही ताबडतोब पूर्ण केली पाहिजे. (१६)

पूर्वं देवासुरे युद्धे मया त्वं परिरक्षितः ।
तदा वरद्वयं दत्तं त्वया मे तुष्टचेतसा ॥ १७ ॥
पूर्वी देव आणि असुर यांच्या युद्धात मी तुमचे सर्व प्रकारे रक्षण केले होते. त्या वेळी तुम्ही संतुष्ट होऊन मला दोन वर दिले होते. (१७)

तद्‌द्वयं न्यासभूतं मे स्थापितं त्वयि सुव्रत ।
तत्रैकेन वरेणाशु भरतं मे प्रियं सुतम् ॥ १८ ॥
एभिः संभृतसंभारैर्यौवराज्येऽभिषेचय ।
अपरेण वरेणाशु रामो गच्छतु दण्डकान् ॥ १९ ॥
हे सुव्रता, त्या वेळी ते दोन वर मी तुमच्याजवळ ठेव म्हणून ठेवले होते. त्यातील एका वराने तुम्ही त्वरित माझ्या लाडक्या पुत्राला, भरताला, या जमविलेल्या राज्याभिषेकाच्या साहित्याने, युवराजपदावर अभिषेक करा आणि दुसर्‍या वराने राम ताबडतोब दंडक अरण्यात जाऊ दे. (१८-१९)

मुनिवेषधरः श्रीमान् जटावल्कलभूषणः ।
चतुर्दश समास्तत्र कन्दमूलफलाशनः ॥ २० ॥
तेथे राम हा मुनीचा वेष धारण करून, जटा आणि वल्कले ही भूषणे बाळगून, कंद, मुळे व फळे भक्षण करीत चौदा वर्षे तेथे राहू दे. (२०)

पुनरायातु तस्यान्ते वने वा तिष्ठतु स्वयम् ।
प्रभाते गच्छतु वनं रामो राजीवलोचनः ॥ २१ ॥
त्यानंतर तो स्वतः आपल्या इच्छेनुसार अयोध्येला परत येऊ दे अथवा वनातच राहू दे. काही झाले तरी उद्या सकाळी कमलनयन राम हा वनात गेला पाहिजे. (२१)

यदि किञ्चिद् विलम्बेत प्राणांस्त्यक्ष्ये तवाग्रतः ।
भव सत्यप्रतिज्ञस्त्वमेतदेव मम प्रियम् ॥ २२ ॥
जर या बाबतीत थोडा विलंब झाला तर मी तुमच्या समोरच आपल्या प्राणांचा त्याग करीन. आता तुम्ही आपली प्रतिज्ञा खरी करा. बस, मला आवडणारी हीच गोष्ट आहे." (२२)

श्रुत्वैतद्दारुणं वाक्यं कैकेय्या रोमहर्षणम् ।
निपपात महीपालो वज्राहत इवाचलः ॥ २३ ॥
अंगावर शहारे आणणारे हे कैकेयीचे कठोर वचन ऐकल्यावर वज्राचा तडाखा बसलेल्या पर्वताप्रमाणे महाराज दशरथ खाली कोसळले. (२३)

शनैरुन्मील्य नयने विमृज्य परया भिया ।
दुःस्वप्नो वा मया दृष्टो ह्यथवा चित्तविभ्रमः ॥ २४ ॥
त्यानंतर हळूहळू डोळे उघडून आणि अतिशय भयाने डोळे पुसून ते मनातल्या मनात विचार करू लागले, "हे काय, मी एखादे वाईट स्वप्न पाहिले की माझ्या चित्ताला भ्रम झाला आहे ?" (२४)

इत्यालोक्य पुरः पत्‍नीं व्याघ्रीमिव पुरः स्थितम् ।
किमिदं भाषसे भद्रे मम प्राणहरं वचः ॥ २५ ॥
नंतर त्या वेळी एखाद्या वाघिणीप्रमाणे आपल्यासमोर बसलेल्या कैकेयीकडे पाहून दशरथ राजा म्हणू लागले, 'अग प्रिये, माझे प्राण हरण करणारे हे वचन तू काय बोलत आहेस ? (२५)

रामः कमपराधं ते कृतवान्कमलेक्षणः ।
ममाग्रे राघवगुणान्वर्णयस्यनिशं शुभान् ॥ २६ ॥
कमलनयन रामाने तुझा असा कोणता अपराध केला आहे ? यापूर्वी तू रात्रंदिवस माझ्यासमोर त्याचे उत्तम गुण वर्णन करीत होतीस. (२६)

कौसल्यां मां समं पश्यन् शुश्रूषां कुरुते सदा ।
इति ब्रुवन्ती त्वं पूर्वमिदानीं भाषसेऽन्यथा ॥ २७ ॥
पूर्वी तर तू असे म्हणत होतीस की मला व कौसल्येला समान मानून राम माझी सदा सेवा करतो. आता तर तू काही तरी वेगळेच बोलत आहेस. (२७)

राज्यं गृहाण पुत्राय रामस्तिष्ठतु मन्दिरे ।
अनुगृह्णीष्व मां वामे रामान्नास्ति भयं तव ॥ २८ ॥
पुत्रासाठी राज्य घे. पण रामाला मात्र घरातच राहू दे. हे सुंदरी, माझ्यावर अनुग्रह कर. तुला रामापासून कोणतेही भय नाही." (२८)

इत्युक्त्वाश्रुपरीताक्षः पादयोर्निपपात ह ।
कैकेयी प्रत्युवाचेदं सापि रक्तान्तलोचना ॥ २९ ॥
असे बोलून, रडत रडत महाराज दशरथ कैकेयीच्या पाया पडले. तेव्हा रागाने डोळे लाल करून कैकेयीसुद्धा असे प्रतिवचन बोलली. (२९)

राजेन्द्र किं त्वं भ्रान्तोऽसि उक्तं तद्‌भाषसेऽन्यथा ।
मिथ्या करोषि चेत्स्वीयं भाषितं नरको भवेत् ॥ ३० ॥
"हे राजेंद्रा, तुमचा बुद्धिभ्रंश झाला आहे का ? स्वतःदिले ल्या वचनांपासून तुम्ही माघार घेत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा मोडाल, तर तुम्हाला नरक प्राप्त होईल. (३०)

वनं न गच्छेद्यदि रामचन्द्रः
     प्रभातकालेऽजिनचीरयुक्तः ।
उद्‌बन्धनं वा विषभक्षणं वा
     कृत्वा मरिष्ये पुरतस्तवाहम् ॥ ३१ ॥
मृगचर्म आणि वल्कले धारण करून रामचंद्र जर उद्या सकाळी वनामध्ये गेला नाही, तर मी तुमच्या पुढेच फास लावून अगर विष खाऊन मरून जाईन. (३१)

सत्यप्रतिज्ञोऽहमितीह लोके
     विडम्बसे सर्वसभान्तरेषु ।
रामोपरि त्वं शपथं च कृत्वा
     मिथ्याप्रतिज्ञो नरकं प्रयाहि ॥ ३२ ॥
लोकांत सर्व सभांमध्ये 'मी सत्यप्रतिज्ञ आहे' असे सांगून तुम्ही आत्मस्तुती करीत आलात. आत्ता रामाची शपथ घेऊन तुम्ही आपली प्रतिज्ञासुद्धा खोटी करीत आहात. म्हणून तुम्ही नरकात जाल." (३२)

इत्युक्तः प्रियया दीनो मग्नो दुःखार्णवे नृपः ।
मूर्च्छितः पतितो भूमौ विसंज्ञो मृतको यथा ॥ ३३ ॥
आपल्या प्रियेने असे सांगितल्यावर महाराज दशरथ हा व्याकूळ होऊन दुःखरूपी सागरात बुडून गेले आणि एकाद्या मृत प्रेताप्रमाणे ते मूर्च्छित आणि चेतनाहीन होऊन जमिनीवर पडले. (३३)

एवं रात्रिगता तस्य दुःखात्संवत्सरोपमा ।
अरुणोदयकाले तु वन्दिनो गायका जगुः ॥ ३४ ॥
अशा प्रकारे अतिशय दुःखामुळे त्याची ती रात्र एखाद्या वर्षाप्रमाणे व्यतीत झाली. इकडे अरुणोदयाच्या वेळी गायक आणि बंदिजन रतुतिगान करू लागले. (३४)

निवारयित्वा तान् सर्वान्कैकेयी रोषमास्थिता ।
ततः प्रभातसमये मध्यकक्षमुपस्थिताः ॥ ३५ ॥
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्या ऋषयः कन्यकास्तथा ।
छत्रं च चामरं दिव्यं गजो वाजी तथैव च ॥ ३६ ॥
परंतु त्या सर्वांना थांबवून, कैकयी राग धरून बसून राहिली होती. त्यानंतर प्रातःकाळ झाल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ऋषिगण, कन्या, दिव्य छत्र आणि दिव्य चामर तसेच हत्ती, घोडे इत्यादी अभिषेकाला उपयोगी पडणार्‍या वस्तू मधल्या चौकात जमा झाल्या. (३५-३६)

अन्याश्च वारमुख्या याः पौरजानपदास्तथा ।
वसिष्ठेन यथाज्ञप्तं तत्सर्वं तत्र संस्थितम् ॥ ३७ ॥
त्या प्रमाणेच इतर मुख्य वारांगना तसेच नगरवासी आणि जनपदवासी लोक हेही तेथे आले. वसिष्ठांनी आज्ञा केल्याप्रमाणे अभिषेकाला आवश्यक ते सर्व साहित्य तेथे आणले होते. (३७)

स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च रात्रौ निद्रां न लेभिरे ।
कदा द्रक्ष्यामहे रामं पीतकौशेयवाससम् ॥ ३८ ॥
त्या रात्री स्त्रिया, बालक आणि वृद्ध यांपैकी कुणालाही झोप आली नाही. रेशमी पीतांबर परिधान केलेल्या भगवान श्रीरामांना आपण केव्हा एकदा पाहू ? अशा उत्सुकतेने सर्वजण वाट पाहात होते. (३८)

सर्वाभरणसम्पन्नं किरीटकटकोज्ज्वलम् ।
कौस्तुभाभरणं श्यामं कन्दर्पशतसुन्दरम् ॥ ३९ ॥
अभिषिक्तं समायातं गजारूढं स्मिताननम् ।
श्वेतच्छत्रधरं तत्र लक्ष्मणं लक्षणान्वितम् ॥ ४० ॥
रामं कदा वा द्रक्ष्यामः प्रभातं वा कदा भवेत् ।
इत्युत्सुकधियः सर्वे बभूवुः पुरवासिनः ॥ ४१ ॥
सर्व अलंकारांनी विभूषित, उज्वल किरीट आणि कटक (कडे) घातलेले, कौस्तुभ मणी धारण केलेले, सावळ्या वर्णाचे, शेकडो कामदेवांप्रमाणे सुंदर, सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशा लक्ष्मणाने ज्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र धरले आहे अशा हास्ययुक्त मुखाने राज्याभिषेकानंतर, हत्तीवर आरूढ होऊन येणार्‍या रामांना आम्ही केव्हा बरे पाहू ? ती मंगल प्रभात केव्हा बरे येईल ? अशा प्रकारे सर्व नगरवासी लोकांची मने उत्कंठित झालेली होती. (३९-४१)

नेदानीमुत्थितो राजा किमर्थं चेति चिन्तयन् ।
सुमंत्रः शनकैः प्रायाद्यत्र राजाऽवतिष्ठते ॥ ४२ ॥
त्या वेळी "महाराज अद्यापि का बरे उठले नाहीत," असा विचार करीत सुमंत दशरथ महाराजांकडे गेला. (४२)

वर्धयन् जयशब्देन प्रणमञ्शिरसा नृपम् ।
अतिखिन्नं नृपं दृष्ट्‍वा कैकेयीं समपृच्छत ॥ ४३ ॥
तेथे गेल्यावर, 'महाराजांचा विजय असो', असे म्हणून त्याने राजाचे अभिनंदन केले आणि मस्तक नमवून राजाला प्रणाम केला. परंतु राजा अतिशय खिन्न आहे हे पाहून त्याने कैकेयीला प्रश्न केला. (४३)

देवि कैकेयि वर्धस्व किं राजा दृश्यतेऽन्यथा ।
तमाह कैकेयी राजा रात्रौ निद्रां न लब्धवान् ॥ ४४ ॥
"कैकेयी राणीसाहेब, तुमचा विजय असो. महाराज असे दुःखी का बरे दिसत आहेत ?" तेव्हा कैकयीने त्याला सांगितले, "आज महाराजांना रात्री अजिबात झोप लागली नाही. (४४)

राम रामेति रामेति राममेवानुचिन्तयन् ।
प्रजागरेण वै राजा ह्यस्वस्थ इव लक्ष्यते ।
राममानय शीघ्रं त्वं राजा द्रष्टुमिहेच्छति ॥ ४५ ॥
रात्रभर रामाचेच चिंतन करीत, 'राम, राम, राम' असे ते पुटपुटत राहिले. अशा प्रकारे रात्री संपूर्ण जागरण झाल्यानेच महाराज अस्वस्थ असल्याप्रमाणे दिसत आहेत. रामाला इथे पाहण्याची राजांची इच्छा आहे. म्हणून तू रामाला त्वरित इकडे घेऊन ये." (४५)

अश्रुत्वा राजवचनं कथं गच्छामि भामिनि ।
तच्छ्रुत्वा मंत्रिणो वाक्यं राजा मंत्रिणमब्रवीत् ॥ ४६ ॥
"हे महाराणी, राजाची आशा त्यांचेकडून ऐकल्याशिवाय मी कसा बरे जाऊ ?" मंत्र्याचे ते वाक्य ऐकल्यावर महाराज दशरथ त्याला म्हणाले. (४६)

सुमंत्र रामं द्रक्ष्यामि शीघ्रमानय सुन्दरम् ।
इत्युक्त्वस्त्वरितं गत्वा सुमंत्रो राममन्दिरम् ॥ ४७ ॥
'सुमंत्रा, सुंदर रामाला भेटण्याची मला इच्छा आहे. त्याला तू लौकरच इकडे घे ऊन ये." राजाने असे सांगितल्यावरच सुमंत्र त्वरित रामाच्या महालाकडे गेला. (४७)

अवारितः प्रविष्टोऽयं त्वरितं राममब्रवीत् ।
शीघ्रमागच्छ भद्रं ते राम राजीवलोचन ॥ ४८ ॥
पितुर्गेहं मया सार्धं राजा त्वां द्रष्टुमिच्छति ।
इत्युक्तो रथमारुह्य सम्भ्रमात्त्वरितो ययौ ॥ ४९ ॥
कुणाचाही अडथळ न येता सुमंत्र त्वरित प्रभू रामांच्या महालात शिस्त म्हणाला,'हे कमलनयन रामा, तुमचे कल्याण असो. माझ्याबरोबर तुम्ही चटकन तुमच्या पिताजींच्या महालात चला. तुम्हांला भेटण्याची महाराजांना इच्छा आहे,' असे त्याने रामांना सांगितल्यावर, चकित होऊन, रथावर आरोहण करून, राम त्वरित निघाले. (४८-४९)

रामः सारथिना सार्धं लक्ष्मणेन समन्वितः ।
मध्यकक्षे वसिष्ठादीन् पश्यन्नेव त्वरान्वितः ॥ ५० ॥
पितुः समीपं सङ्‌गम्य ननाम चरणौ पितुः ।
राममालिङ्‌गितुं राजा समुत्थाय ससम्भ्रमः ॥ ५१ ॥
बाहू प्रसार्य रामेति दुःखान्मध्ये पपात ह ।
हाहेति रामस्तं शीघ्रमालिङ्‌ग्याङ्‌के न्यवेशयत् ॥५२
सारथी आणि लक्ष्मण यांना बरोबर घेऊन, रामांनी मध्य कक्षात विराजमान असणार्‍या वसिष्ठ इत्यादींना पाहून, पित्याच्या दर्शनाची घाई अशाल्यामुळे नेत्रांनी अभिवादनाचा शिष्टाचार करीत, त्वसेने पित्याजवळ जाऊन, त्यांनी पित्याच्या पायी प्रणाम खॆळाआ. त्या वेळी रामांना आलिंगन देण्यासाठी, लगबगीने उठून महाराज दशरथांनी आवेगाने आपले हात पसरले, पण मध्येच दुःखाने 'अरे रामा, अरे रामा' असे म्हणत ते खाली पडले. तेव्हा 'हे काय झाले ?' असे म्हणत हाहाकार करीत श्रीरामांनी झटपट दशरथांना आलिंगन देऊन, त्यांना आपल्याजवळ बसविले. (५०-५२)

राजानं मूर्च्छितं दृष्ट्‍वा चुक्रुशुः सर्वयोषितः ।
किमर्थं रोदनमिति वसिष्ठोऽपि समाविशत् ॥ ५३ ॥
महाराज मूर्च्छित पडले आआहेत हे पाहून राणीवशातील सर्व स्त्रिया रडू लागल्या. तेव्हा हे रुदन कशासाठी चालले आहे, असा विचार करीत वसिष्ठसुद्धा तेथे येऊन पोचले. (५३)

रामः पप्रच्छ किमिदं राज्ञो दुःखस्य कारणम् ।
एवं पृच्छति रामे सा कैकेयी राममब्रवीत् ॥ ५४ ॥
भगवान श्रीरामांनी कैकेयीला असे विचारले, "महाराजांच्या दुःखाचे कारण काय बरे ?" श्रीरामांनी असा प्रश्न केल्यावर कैकेयी त्यांना म्हणाली. (५४)

त्वमेव कारणं ह्यत्र राज्ञो दुःखोपशान्तये ।
किञ्चित्कार्यं त्वया राम कर्तव्यं नृपतेर्हितम् ॥ ५५
"अरे रामा, महाराजांचे हे दुःख दूर करणे तुझ्या हाती आहे. त्यांच्या दुःखाच्या शमनासाठी त्यांना हितकारक होईल, असे एखादे कार्य तुला करावयास हवे. (५५)

कुरु सत्यप्रतिज्ञस्त्वं राजानं सत्यवादिनम् ।
राज्ञा वरद्वयं दत्तं मम सन्तुष्टचेतसा ॥ ५६ ॥
तू स्वतः सत्यप्रतिज्ञ आहेस. म्हणून दशरथ महाराजांनाही सत्यवादी सिद्ध कर. संतुष्ट चित्ताने राजांनी मला दोन वर दिले आहेत. (५६)

त्वदधीनं तु तत्सर्वं वक्तुं त्वां लज्जते नृपः ।
सत्यपाशेन सम्बद्धं पितरं त्रातुमर्हसि ॥ ५७ ॥
ते पूर्ण करणे हे तुझ्या स्वाधीन आहे. प्रत्यक्ष तुला सांगण्यास महाराजांना लाज वाटत आहे. सत्याच्या पाशाने बद्ध झालेल्या आपल्या पित्याचे रक्षण तूच करावयास हवे. (५७)

पुत्रशब्देन चैतद्धि नरकात्त्रायते पिता ।
रामस्तयोदितं श्रुत्वा शूलेनाभिहतो यथा ॥ ५८ ॥
व्यथितः कैकेयीं प्राह किं मामेवं प्रभाषसे ।
पित्रार्थे जीवितं दास्ये पिबेयं विषमुल्बणम् ॥ ५९ ॥
नरकात पडण्यापासून जो आपल्या पित्याचे रक्षण करतो, तोच पुत्र, असाच 'पुत्र' या शब्दाचा अर्थ आहे." कैकेयीने उच्चारलेले हे वचन ऐकून, शूलाने विद्ध झालेल्या माणसाप्रमाणे व्यथित होऊन श्रीराम कैकेयीला म्हणाले, "मातोश्री, आज तुम्ही मला असे का बोलत आहात ? पित्यासाठी मी माझे जीवन देईन; भयंकर विषसुद्धा पिऊन टाकीन. (५८-५९)

सीतां त्यक्ष्येऽथ कौसल्यां राज्यं चापि त्यजाम्यहम् ।
अनाज्ञप्तोऽपि कुरुते पितुः कार्यं स उत्तमः ॥ ६० ॥
तसेच पत्‍नी सीता, माता कौसल्या आणि राज्य यांचासुद्धा मी त्याग करीन. पित्याची आज्ञा नसतानासुद्धा जो पुत्र अभीष्ट कार्य करतो तो पुत्र उत्तम होय. (६०)

उक्तः करोति यः पुत्रः स मध्यम उदाहृतः ।
उक्तोऽपि कुरुते नैव स पुत्रो मल उच्यते ॥ ६१ ॥
पित्याने सांगितल्यावर जो पुत्र कार्य करतो तो पुत्र मध्यम असे म्हटले जाते आणि पित्याने सांगितल्यावर सुद्धा जो त्याचे कार्य करीत नाही तो पुत्र अधम होय, असे म्हटले जाते. (६१)

अतः करोमि तत्सर्वं यन्मामाह पिता मम ।
सत्यं सत्यं करोम्येव रामो द्विर्नाभिभाषते ॥ ६२ ॥
म्हणून पित्याची जी आज्ञा असेल ती सर्व मी अवश्य पूर्ण करीन. हे निश्चितपणे खरे आहे. राम कधी दुतोंडी बोलत नाही." (६२)

इति रामप्रतिज्ञां सा श्रुत्वा वक्तुं प्रचक्रमे ।
राम त्वदभिषेकार्थं संभाराः संभृताश्च ये ॥ ६३ ॥
तैरेव भरतोऽवश्यमभिषेच्यः प्रियो मम ।
अपरेण वरेणाशु चीरवासा जटाधरः ॥ ६४ ॥
वनं प्रयाहि शीघ्रं त्वमद्यैव पितुराज्ञया ।
चतुर्दश समास्तत्र वस मुन्यन्नभोजनः ॥ ६५ ॥
श्रीरामांची अशी प्रतिज्ञा ऐकल्यावर कैकेयी असे बोलू लागली "अरे रामा, तुझ्या अभिषेकासाठी जी काही सामग्री एकत्रित केली गेली आहे, त्या सामग्रीनेच माझ्या प्रिय भरताचा अभिषेक अवश्य झाला पाहिजे, हा माझा पहिला वर आहे. दुसर्‍या वराने पित्याच्या आज्ञेने तू वल्कल-वस्त्रे परिधान करून आणि जटा धारण करून आजच त्वरित वनाप्रत जा आणि तेथे मुनिजनांना उचित कंदमूळ, फळे असे भोजन करीत चौदा वर्षे तेथेच राहा. (६३-६५)

एतदेव पितुस्तेऽद्य कार्यं त्वं कर्तुमर्हसि ।
राजा तु लज्जते वक्तुं त्वामेवं रघुनन्दन ॥ ६६ ॥
बस. तुझ्या पित्याचे हेच काम आहे. ते तू केले पाहिजेस. परंतु हे रघुनंदना, तुला असे सांगण्यास राजांना लाज वाटत आहे." (६६)

श्रीराम उवाच
भरतस्यैव राज्यं स्यादहं गच्छामि दण्डकान् ।
किन्तु राजा न वक्तीह मां न जानेऽत्र कारणम् ॥ ६७ ॥
श्रीराम म्हणाला - "मातोश्री, भरतालाच राज्य प्राप्त होवो. मीसुद्धा लगेच दंडकारण्यात जाईन. परंतु महाराज मला हे स्वतः का सांगत नाहीत, याचे कारण मात्र मला कळत नाही. " (६७)

श्रुत्वैतद्‍रामवचनं दृष्ट्‍वा रामं पुरः स्थितम् ।
प्राह राजा दशरथो दुःखितो दुःखितं वचः ॥ ६८ ॥
रामांचे वचन ऐकल्यावर आणि राम आपल्या समोर बसला आहे हे पाहून दुःखातुर होऊन राजा अतिशय दुःखाने बोलला. (६८)

स्त्रीजितं भ्रान्तहृदयमुन्मार्गपरिवर्तिनम् ।
निगृह्य मां गृहाणेदं राज्यं पापं न तद्‌भवेत् ॥ ६९ ॥
"रामा, स्त्रीने जिंकलेल्या, चित गोंधळून गेलेल्या, चुकीच्या मार्गाने जाणार्‍या, पापी अशा मला बंधनात टाकून हे राज्य तू घे. त्यात तुला कोणतेही पाप लागणार नाही. (६९)

एवं चेदनृतं नैव मां स्पृशेद्‌रघुनन्दन ।
इत्युक्त्वा दुःखसन्तप्तो विललाप नृपस्तदा ॥ ७० ॥
हे रधुनंदना, असे जर झाले तर असत्य मला मुळीच स्पर्श करणार नाही." असे बोलून त्या वेळी राजा दुःखाने तळमळत विलाप करू लागले. (७०)

हा रामा हा जगन्नाथ हा मम प्राणवल्लभ ।
मां विसृज्य कथं घोरं विपिनं गन्तुमर्हसि ॥ ७१ ॥
"हे रामा, हे जगन्नाथा, हे माझ्या प्राणप्रिया, अरे मला सोडून देऊन, घोर वनात तू कसा जाऊ शकशील ? " (७१)

इति रामं समालिङ्‌ग्य मुक्तकण्ठो रुरोद ह ।
विसृज्य नयने रामः पितुः सजलपाणिना ॥ ७२ ॥
असे बोलून रामाला दृढ आलिंगन देऊन, जोरजोराने ते रडू लागले. तेव्हा हातात पाणी घेऊन रामांनी आपल्या पित्याचे डोळे पुसले. (७२)

आश्वासयामास नृपं शनैः स नयकोविदः ।
किमत्र दुःखेन विभो राज्यं शासतु मेऽनुजः ॥ ७३ ॥
आणि मग नीती जाणणार्‍या रामांनी सावकाशपणे राजांना धीर दिला. ते म्हणू लागले, "महाराज, या बाबतीत दुःख करण्याचे कारण काय ? माझा धाकटा भाऊ भरत खुशाल राज्य करो. (७३)

अहं प्रतिज्ञां निस्तीर्य पुनर्यास्यामि ते पुरम् ।
राज्यात्कोटिगुणं सौख्यं मम राजन्वने सतः ॥ ७४ ॥
मी तुमची प्रतिज्ञा तडीला नेऊन, तुमच्याजवळ अयोध्या नगरीला परत येईन. हे राजा, राज्य करण्यापेक्षा कोटिपट अधिक सौख्य वनात राहताना मला होईल. (७४)

त्वत्सत्यपालनं देवकार्यं चापि भविष्यति ।
कैकेय्याश्च प्रियो राजन्वनवासो महागुणः ॥ ७५ ॥
तुमच्या सत्याचे पालन होईल, देवांचे इष्ट कार्य होईल आणि कैकेयी मातेची इच्छा पूर्ण होईल. महाराज, वनवासात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत. (७५)

इदानीं गन्तुमिच्छामि व्येतु मातुश्च हृज्ज्वरः ।
सम्भारश्चोपह्रीयन्तामभिषेकार्थमाहृताः ॥ ७६ ॥
आता मी वनात जाऊ इच्छितो. कैकयी मातेच्या मनातील व्यथा दूर होवो. आणि माझ्या अभिषेकासाठी एकत्रित केलेली ही सामग्री बाजूला ठेवा. (७६)

मातरं च समाश्वास्य अनुनीय च जानकीम् ।
आगत्य पादौ वन्दित्वा तव यास्ये सुखं वनम् ॥ ७७
कौसल्या मातेचे सांत्वन करून, जानकीची समजूत घालून, मी लगेच परत येतो आणि तुमच्या चरणांना वंदन करून, मी सुखाने वनात जातो." (७७)

इत्युक्त्वा तु परिक्रम्य मातरं द्रष्टुमाययौ ।
कौसल्यापि हरेः पूजां कुरुते रामकारणात् ॥ ७८ ॥
असे सांगून, पित्याला प्रदक्षिणा करून, श्रीराम मातेला भेटण्यास गेले. त्या वेळी कौसल्यासुद्धा श्रीरामांचे कल्याण होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करीत होती. (७८)

होमं च कारयामास ब्राह्मणेभो ददौ धनम् ।
ध्यायते विष्णुमेकाग्रमनसा मौनमास्थिता ॥ ७९ ॥
तिने होम करवून घेतला होता. ब्राह्मणांना पुष्कळसे धन दान दिले होते आणि त्या वेळी ती मौन धारण करून एकाग्र मनाने भगवान श्रीविष्णूंचे ध्यान करीत होती. (७९)

अन्तःस्थमेकं घनचित्प्रकाशं
     निरस्तसर्वातिशयस्वरूपम् ।
विष्णुं सदानन्दमयं हृदब्जे
     सा भावयन्ती न ददर्श रामम् ॥ ८० ॥
अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयात वास करणार्‍या, अद्वितीय, चिद्‌घनस्वरूप, आपल्या तेजाने सर्वाच्यावर मात करणार्‍या, सदानंदमय, असे जे विष्णू त्यांचे आपल्या हृदयकमळात ध्यान करीत असल्यामुळे तिचे श्रीरामचंद्रांकडे लक्ष गेले नाही. (८०)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
अयोध्याकाण्डातील तिसरा सर्गः समाप्त ॥ ३ ॥


GO TOP