॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय चवदावा ॥
अहल्योद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

एवमुक्ते तयोर्वाक्य सर्व एव महर्षय: ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य राघवं वाक्यमब्रुवन् ॥१॥
मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य भविष्यति ।
यज्ञः परमधर्मिष्ठो यास्यामस्तत्र वै वयम् ॥२॥
त्वं चापि नरशार्दूल सहास्माभिर्गामिष्यासि ।
अद्भुतं च धनूरत्नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥३॥

जनकराजाकडून स्वयंवराचे आमंत्रण :

ऋषिसभे प्रसन्नोन्मुख । बैसले वर्णिती रघुकुळ टिळक ।
तंव जनकाचे दोघे सेवक । पत्र कुंकुमांकित घेवोनि आले ॥१॥
विश्वामित्रें निजगायार्थ । ऋषी मेळविले समस्त ।
स्वामीनें त्यांसमवेत । यावें यथार्थ स्वयंवरा ॥२॥
तंव रामलक्ष्मणांलागुनी । कौशिक बोलावी सन्मानोनी ।
दोघीं साष्टांग नमूनी । कर जोडोनी बोलत ॥३॥
आम्ही तुझे नित्यांकित । निजसेवक निश्चित ।
सिद्धी पावला यज्ञार्थ्स् । पुढील कार्यार्थ सांगावा ॥४॥
स्वामी जे तूं आज्ञा देसी । तें कार्य करूं क्षणार्धेंसीं ।
गुरुकृपेची महिमा ऐसी । सर्व कार्यासी निजसिद्धी ॥५॥
बाळपणीं धीर शूर । मारिले उद्‌भट निशाचर ।
परी गर्व न धरी रघुवीर । तेणें विश्वामित्र सुखी झाला ॥६॥
वीरधैर्येंसी ज्ञान प्रांजळे । ऐसा निगर्वीं शिष्य मिळें ।
तेणें गुरुसी सुखसोहळे । त्या सुखासी कांटाळें असेचिना ॥७॥

विश्वामित्रांची श्रीरामांना मिथिलेला येण्याविषयी विनंती :

ऐसा सुखावोनि विश्वामित्र । आलिंगिले श्रीरामसौमित्र ।
सांगे जनकाचे आलें मूळपत्र । जाणें सत्वर मिथिलेसी ॥८॥
जनक मिथिलेचा नृपवर । धनुर्याग सीतास्वयंवर ।
तेथें मिनलें सुरनर । तेणें ऋषीश्वर बोलाविले ॥९॥
देशोदेशींच्या भूपाळां । मूळ पाठविलें सकळां ।
दशरथासी धाडिले मूळा । तो नयेचि विव्हळा श्रीरामविरहें ॥१०॥
आम्ही ऋषिवर्य समस्त । अवश्य जाऊं गा तेथ ।
तुम्हींही यावें आम्हांसमवेत । आज्ञा समर्थ म्हणे श्रीराम ॥११॥

श्रीरामांची अनुमती :

गुरुआज्ञापरिपाळण । हें सकळ भाग्या निजभूषण ।
सकळ कल्याणाचें कल्याण । गुरुवचन शिष्यासी ॥१२॥
तुझेनि शिष्यत्वें माझी थोरी । तुवां अवश्य यावें तेथवरी ।
सकळ राजे सभेमाझारीं । तूं मुख्य मुखरण होसील ॥१३॥

सर्वांचे मिथिलेला प्रयाण :

ऐसें ऐकोनि गुरुवचन । सद्‌गुरुसमवेत आपण ।
रथारुढ रामलक्ष्मण । मिथिलेसी प्रयाण महोत्साहें ॥१४॥
रथारूढ रामचंद्र । अवघे करिती जयजयकार ।
ऋषीसमवेत रघुवीर । अति सत्वर निघाला ॥१५॥
मिथिलें आरते पंचयोजनीं । मुनि राहिले कुशोपवनीं ।
बैसल्या ऋषींचिया श्रेणी । राम सुखासनीं उपविष्ट ॥१६॥

मार्गातून जाताना एक ओसाड आश्रम लागतो :

तेचि उपवनीं अके कोनी । श्रीराम आश्रम देखे नयनीं ।
वृक्ष खांकरले फळीं पानीं । आश्रमी कोणी असेना ॥१७॥
ऐसें देखोनि रघुनाथ । पुसे ऋषींस वृत्तांत ।
म्हणे हें कां दिसे वन उपहत । हा वृत्तांत सांगा मज ॥१८॥
येथें वस्ती नाहीं मनुष्यासी । पक्षीं वाळीलें वृक्षांसी ।
आश्रमीं अहल्येसीं । आश्रमवासी गौतम ॥२०॥
इंद्रें छळिलें अहल्येसी । गौतमें शापिलें दोहींसी ।
तैंपासोनिया आश्रमासी । वस्ती कोणासी असेना ॥२१॥

अहल्येविषयी श्रीरामाची जिज्ञासा :

राम पुसे अहल्या ती कोण । इंद्रें छळावया काय कारण ।
हें समूळ मूळींचें कथन । कृपा करून सांगावें ॥२२॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । विश्वामित्र म्हणे आपण ।
अहल्येंचें उद्धरण । प्रसंगे पूर्ण ओढवलें ॥२३॥

तिचे सौंदर्यवर्णन -

त्रैलोक्याचें बरवेपण । ब्रह्मयाने एकवटीने आपण ।
स्वयें कन्या केली निर्माण । अहल्या जाण तीस नांव ॥२४॥
शरीर अत्यंत सुकुमार । खुपों शकती चंद्रकर ।
पन्नगपद्मिणी तीपुढें निबर । निजांगे अरुवार नभापरिस ॥२५॥
तिचें होतांचि स्पर्शन । मनाआदि इंद्रियां गुदगुल्या पूर्ण ।
फिकें अमृताचें गोडपण । तिचे बरवेपण देखोनि ॥२६॥
देखोनि तिचिया मुखासी । अत्यंत सुख डोळ्यांसी ।
ते मुखीं जाले क्षेत्रसंन्यासी । आन पहावयासी नावडे ॥२७॥
अत्यंत सौंदर्याची शोभा । चंद्र लोपे अंगप्रभा ।
देखोनि लावण्याचा गाभा । विवेकाचा उभा प्राण जाय ॥२८॥
तिसीं होतां डोळेभेटी । धैर्याची विरे गांठी ।
बरवेपणें अत्यंत लाठी । देखिल्या दृष्टी उपडेना ॥२९॥
ऐसी अत्यंत सुंदर । दिवसेंदिवस जाली थोर ।
कन्या देखोनि उपवर । वरविचार ब्रह्मयासी ॥३०॥

अहल्येसाठी इंद्रिदिकांची स्पर्धा :

इंद्र साक्षेपी करावया राणी । चंद्र साक्षेपी करावया पत्नी ।
सूर्य स्वयें तिच्या वरणी । अनुदिनीं उपाजी ॥३१॥
वरुण वायु यम कुबेर । स्कंदादि सकळ सुरवर ।
अहल्यावरणीं अति सादर । पडला विचार ब्रह्मयासी ॥३२॥
विधाता करी विचार । अहल्यावरणीं सर्व सादर ।
मा कोणाचा करूं निर्धार । प्रकारांतर उपपादी ॥३३॥

ब्रह्मदेवाचा पण :

ब्रह्मयाने योजिले विंदान । दों प्रहरीं पृथ्वीप्रदक्षिण ।
जो करून येईल आपण । त्यासी कन्यादान अहल्या ॥३४॥
ऐकोनि ब्रह्मयाचें वचन । इंद्र ऐरावतीसी करी गमन ।
चंद्र मृगेसीं निघे आपण । मेषारोहणें निघे अग्नि ॥३५॥
यम नियंता सकळ जगा । तोही कामाच्या लगबगां ।
पालाणूनिया टोणगा । लागवेगां निघाला ॥३६॥
स्कंदे पालाणिला मयूर । कामें पालाणिला मकर ।
एवं अवधेचि सुरवर । निघाले सत्वर प्रदक्षिणे ॥३७॥
ऋषीश्वर धाकटे मोठे । धांवती मेरुतळवटें ।
आम्ही आपुलिये तपोनिष्ठें । करूं निजनेटें प्रदक्षिणा ॥३८॥

गौतमांनी प्रसूतीसमयी गाईला प्रदक्षिना करून पण जिंकला :

गौतम करिंतां अनुष्ठान । गोप्रसूतिकाळ जाण ।
उभयतोमुखी देखोनि पूर्ण । त्रिवार प्रदक्षिणा तेणें केली ॥३९॥
उभयतोमुखीप्रदक्षिण । पृथ्वीप्रदक्षिणेंसमान ।
हें ब्रह्मयानें जाणोनि ज्ञान । करी कन्यादान गौतमासी ॥४०॥

त्यामुळे इंद्र कपटाचरणास प्रवृत्त :

इंद्र आला प्रथमप्रहरा । तंव अहल्येसी गौतम नोवरा ।
बोहलीं देखोनि वधूवरां । अभ्यंतरी संतप्त ॥४१॥
जे जे प्रदक्षिणा करूनि येती । ते तेही श्वास टाकिती ।
गौतमासी अहल्याप्राप्ती । कैशा रीती जाली पां ॥४२॥
इंद्र पुसे ब्र्हमयासी । अहल्या देणें होती गौतमासी ।
तरी कां छळिलें आम्हांसी । प्रदक्षिणेसी धाडुनी ॥४३॥
ब्रह्मा बोलिला आपण । त्रिवार पृथ्वीप्रदक्षिण ।
गौतमासी घडली संपूर्ण । मग कन्यादान मीं केलें ॥४४॥
इंद्र म्हणे आम्हांहूनि गौतमासी । अधिक शक्ति चालावयासी ।
त्रिवार प्रदक्षिणा यासी । घडली कैसी नेणवे ॥४५॥
ब्रह्मा म्हणे न करीं छळण । उभयतोमुखींचे प्रदक्षिण ।
पृथ्वीप्रदक्षिणेसमान । हें जाणोनि कन्यादान म्यां केलें ॥४६॥
वचन पाहिलें वेदोल्तीं । परि अति संताप वाढला चित्तीं ।
म्हणे मी नाना छळणोक्तीं । अहल्या ऐपती स्वयें करीन ॥४७॥
चंद्र भोगिले गुरुपत्नीसी । तेवीं मी भोगीन अहल्येसी ।
यापरी इंद्रे निजमानसी । निश्चयासीं दृढ धरिलें ॥४८॥

इंद्रापासून सावध राहण्याची सूचना :

ब्रह्मा सांगे गौतमासी । इंद्र अभिलाषी अहल्येसी ।
तरी तुम्हीं अहर्निशीं । अति यत्नेंसी राखावी ॥४९॥
गौतम तपें तेजोराशी । अहल्या आणिली आश्रमासी ।
इंद्र कष्टतां वर्षानुवर्षीं । अहल्या त्यासी अप्राप्त ॥५०॥
पूर्ण खग्रास सूर्यग्रहण । अहल्येसहित गंगास्नान ।
करावया जाय गौतम आपण । अति सावधान इंद्रार्थीं ॥५१॥
जालें ग्रहण विधिविधान । अहल्या करोनि मुक्तिस्नान ।
आश्रमासी आली आपण । द्विजभोजनपाकार्थ ॥५२॥
गौतम स्वधर्में संपन्न । करावया राहिला दानतर्पण ।
तेचि संधि साधोनि पूर्ण । इंद्र आपण संचरला ॥५३॥

गौतमरूपाने इंद्राचे अहल्येकडे आगमन :

गौतमाच्या स्वरूपस्थिती । इंद्र आला अहल्येप्रती ।
तिसी नेवोनि एकांती । सवेग रति स्वयें मागे ॥ ५४ ॥
ते म्हण नवलगती । दिवसा केवीं मागा रती ।
आजि पर्वकाळ पितृतिथी । काम सर्वार्थी निशिद्ध ॥ ५५ ॥
भलतसें पतीचें वचन । पाळिती पतिव्रता पूर्ण ।
पतिवचनालागीं दूषण । अधःपतन तें स्त्रियेसी ॥ ५६ ॥
पतिचिया वचनार्था । अनुचरावे सर्वथा ।
हे मर्यादा वेदशास्त्रार्था । दोष सर्वथा देखों नये ॥ ५७ ॥
पतिवाक्या दोषदर्शन । देखे तिसी आकल्प अधःपतन ।
आतां तू जाहलीस सज्ञान । पतिवचन न मानिसी ॥ ५८ ॥
जें जें माझें विरुद्धाचरण । तें तें आपुलेनि तपें मी आपण ।
तत्काळ करीन निर्दळण । येथें तुज कोण संदेह ॥ ५९ ॥
संकोचली स्वधर्मता । कांही न बोलवे सर्वथा ।
मग जावोनियां एकांता । त्यासी रत्यर्थ अनुसरली ॥ ६० ॥
इंद्र अहल्या सेजेवरी । तंव गौतम आला बाहेरी ।
परपुरुषा रतली नारी । जाणोनी द्वारीं गुप्त राहे ॥ ६१ ॥

कपटाचरण लक्षात आणल्यामुळे अहल्येचा संताप :

अहल्या म्हणे एकांतवासीं । घेवोनि भ्रताररूपासी ।
तूं कोण येथें आलासी । कपटें भोगिसी परदारा ॥ ६२ ॥
अहल्यें इंद्र धरिला हातीं घेवोनि भ्रताररूपाची बुंथी ।
तूं कोण पापमूर्तीं । छळोनि रती मागितली ॥ ६३ ॥
तो म्हणे मी अमरपती । येरी म्हणे पूर्ण झाली रती ।
आतां तूं जाई शीघ्रगतीं । दोघांची उपहती ऋषी करील ॥ ६४ ॥
मर मर पापिष्ठ चांडाळा । नाहीं पापाचा कंटाळा ।
विटाळविलें दोहीं कुळां । दुष्टा दुःशीळा नीघ वेगीं ॥ ६५ ॥
जळो तुझे महिमान । निंद्य कर्म काळें वदन ।
येथोनि शीघ्र करीं गमन । देखिल्या दहन ऋषि करील ॥ ६६ ॥
तो तूं देवाचा देवाधिपती । तो तूं परदारकामासक्तीं ।
अचुक गेलासी अधोगती । नीघ मागुती मुख न दाखवीं ॥ ६७ ॥

गौतमाकडून अहल्या व इंद्रास शाप :

लाजा इंद्र निघे बाहेरी । तंव गौतम देखिला द्वारीं ।
भयें कांपोनि जिव्हारीं । इंद्रगोपाकारीं पळोनि गेला ॥ ६८ ॥
तंव गौतमें खुंटविली गती । जावों न शके निजशक्तीं ।
अद्यापि इंद्रगोपांप्रती । शीघ्रगती असेना ॥ ६९ ॥
जेणें करिसी परदाररमण । ते झडती तुझे वृषण ।
परभगीं आसक्त मन । भगें सर्वांगीं संपूर्ण होती ॥ ७० ॥
इंद्र शापिला यापरी । इंद्र पाहे भीतरीं ।
तंव अहल्या वस्त्रें सांवरी । म्हणे दुराचारी रमलीस केवीं ॥ ७१ ॥

क्षणो नास्ति रहो नास्ति नास्ति प्रार्थयिता नरः ।
तेन नारद नारीणां पातिव्रत्य हि जायते ॥ ४ ॥

अहल्येची प्रार्थना :

स्मृतिवेदान्तवेदोक्ती । धीर धरूण् न शके सती ।
परपुरुषें प्रार्थिल्या एकांती । पतिरूपोक्तीं छळिले मज ॥ ७२ ॥
तुमचिया स्वरूपस्थिती । तेणें म्मज मागितली रती ।
मी रमलें तुम्हांप्रती । कपट निश्चितीं मी नेणें ॥ ७३ ॥
तुमचिया वचनार्था । ना न म्हणवे तत्वतां ।
याच्या कपटाची वार्ता । मी सर्वथा जाणेंना ॥ ७४ ॥
स्वामींच्या वचना उल्लंघन । तेंचि मज अधःपतन ।
येणे भयें मी आपण । स्वधर्माचरण विचरलें ॥ ७५ ॥
इंद्रअहल्याएकांतवार्ता । गौतमें ऐकिल्या निजगुप्ता ।
तेंचि सांगतसे तत्वतां । तूं निजकामार्था रमलीसी ॥ ७६ ॥

शापवाणी :

संभोगीं परपुरुष जाणतां । जरी तूं उठलीस हाणोनि लाथा ।
तरी मी मानितों पतिव्रता । तूं पूर्णकामता रमलीसी ॥ ७७ ॥
ओळखोनि परपुरुषता । तूं बोललीसी भोग भोगितां ।
तुझी जाली पूर्णकामता । ऋषि न येतां तू जाय ॥ ७८ ॥
जाणोनि परपुरुषाचें ज्ञान । भोगीं कंटाळेना तुझें मन ।
ते तूं होसी पाषाण । शिळा जाण जडत्वें ॥ ७९ ॥
परपुरुषीं कामाचा मोहळा । ते तूं होसी महाशिळा ।
तुज कोणी न देखें डोळां । भूतें विटाळा मानिती तुझ्या ॥ ८० ॥
वृक्ष फुलां फळा न येती । छायेसी नव्हे विश्व्रांती ।
आश्रमीं प्राणी न वसती । पापोपहती भोगिसी ॥ ८१ ॥
येरी बोलली आपण । पतिभ्रमें लागलें दूषण ।
स्वामीनें कृपा करावी । पूर्ण शापमोचन वदावें ॥ ८२ ॥

गौतमाकडून उःशाप :

ऐकोनि तिचें दीन वचन । कृपेनें कळवळला संपूर्ण ।
म्हणे लागल्या श्रीरामचरण । तैं तूं जाण उद्धरसी ॥ ८२ ॥
तुज जंव भेटती रामचरण । तंववरी करावें रामस्मरण ।
रामनामापरतें आन । प्रायश्चित जाण असेना ॥ ८४ ॥
रामनामाच्या आवृत्तीं । जळती पापांचिया पंक्ती ।
शिळारूपें तुझी लोपेल मती । तरी राम चित्तीं न विसंबें ॥ ८५ ॥
ऋषि पाठिमोरा जाला तंव अहल्या जाली शिळा ।
आश्रम पावला अवकळा । प्राणी तत्काळ पळाले ॥ ८६ ॥
कैसें शापाचें अति बळ । मुंगी माशी सांडी स्थळ ।
पक्षी पळाले सकळ । श्वापदांचे मेळे सवेग गेले ॥ ८७ ॥

शाप दिल्याबद्दल गौतमांना पश्चात्ताप :

शाप देवोनि कोपदृष्टीं । गौतमें सांडिली पर्णकुटी ।
सवेंचि अनुताप जाला पोटीं । म्हणे क्रोधें उठा‍उठी जिंकिलें मज ॥ ८८ ॥
अहल्या इंद्रा अतिप्रीतीं । सुखभोग भोगितां एकांतीं ।
तेव्हा कां मज नुपजे शांती । स्त्रीकामासक्तीं नाडिलों क्रोधें ॥ ८९ ॥
रतिभोगएकांतवासी । इंद्र असतां अहल्येपासीं ।
अनुद्वेगें त्यागोनि त्यांसी । मी कां तपासी न वचेंचि ॥ ९० ॥
सर्वांतरात्मा भोक्ता एक । ऐसा जाणता तो मी देख ।
त्या मज इंद्रभोगाचें दुःख । ज्ञानेसीं विवेक गिळिला क्रोधें ॥ ९१ ॥
माझी स्त्री माझे घर । हें कामक्रोधांचें निजमंदिर ।
येथे ठकले थोर थोर । मजही साचार नाडिलें क्रोधें ॥ ९२ ॥
माझी स्त्री हा जो अभिमान । हें सकळ दुःखाचें भाजन ।
हेंचि क्रोधाचें जन्मस्थान । तेणें मी संपूर्ण नाडलों ॥ ९३ ॥
गौतम पावन त्रिजगतीं । ऐसी पुराणीं प्रसिद्ध वदम्ती ।
तो मी स्त्रीलोभानुवृत्तीं । विवेकसंपत्ती नाडिलों क्रोधं ॥ ९४ ॥
म्यां गौतमें माध्यान्हकाळीं । नित्य पिकवोनियां साळी ।
ऋषी वांचविले दुष्काळीं । तो मी तात्काळां नाडिलों क्रोधें ॥ ९५ ॥
मुख्यत्वें स्त्री-कामापासीं । क्रोध सर्वदा मुसमुसी ।
तेणें नाडिलें मज गौतमासी । म्यां कोणापासीं सांगावें ॥ ९६ ॥

कामक्रोधाचा प्रभाव :

मातेवरी गालिप्रदान । भलता साहे करोनि हेळण ।
स्त्रीवरोनि शिवी देतां जाण । तत्काळ मरण शस्त्रें का शापें ॥ ९७ ॥
वाप क्रोधाची निजख्याती । त्या दोघांची केली उपहती ।
मज नाडिलें ज्ञानविरक्तीं । क्रोध परमार्थीं घातक ॥ ९८ ॥
क्रोध केवळ महामांग । जिवें मारिलें वैराग्य ।
सकळ योगा होय भंग । क्रोधें सर्वांग अति पवित्र ॥ ९९ ॥
मातगविटाळा जळें निवृत्ती । क्रोधाची चित्तामाजी वस्ती ।
त्याचे क्षाळणीं न चले युक्ती । क्रोध सर्वार्थें घातक ॥ १०० ॥
का ते कांता कस्ते पुत्रः । ऐसें म्यां वाचिलें शास्त्रा ।
तें वृथा गेलें पुराणपत्रा । क्रोधें अपवित्र मज केलें ॥ १ ॥
कामासी जे वश होती । ते कांहीं तरी भोगभोगिती ।
जे आतुडले क्रोधाहातीं । ते वृथा नागवती भोगमोक्शां ॥ २ ॥
क्रोधाऐसा वैरी । बैसला असतां जिव्हारीं ।
जो तयाची मानी थोरी । तोचि चराचरीं अतिमूर्ख ॥ ३ ॥

अपकारिणी कोपश्चेत् कोपे कोपः कथं न ते ।
धर्मार्थकाममोक्षाणां प्रसह्य परिपंथिनि ॥ ५ ॥

अपकारियावरी कोप करिती । परी कोपावरी कोप न करिती ।
क्रोध वाटपाडा निश्चतीं । चहूं पुरुषार्थ नागवी ॥ ४ ॥
त्या क्रोधाची होय शांती । तैसें आचरेन तपस्थितें ।
ऐसा निश्चय करोनि चित्तीं । ऋषि त्पार्थी निघाला ॥ ५ ॥

एवमुक्त्वा महातेजा गौतमो ऋषिसत्तमः ।
पुण्यदेशं समासाद्य सिद्धचारणसेवितम् ॥ ६ ॥

सिद्धचारणलोकावरी । मेरुगिरीच्या पाथारीं ।
हिमाचळाच्या शिखरीं तपातें आदरी गौतम ॥ ६ ॥
गौतम बैसोनि निर्विकारी । अगाध निष्ठतें आदरी ।
कामक्रोधांचा नुरे उरी । त्या तपाची थोरी थोरावे ॥ ७ ॥

शापामुळे इंद्राची अवस्था :

ब्रह्मशाप अति दारुण । इंद्राचे झडले वृषण ।
भगें बिंबली संपूर्ण । तेंही लक्षण अवधारा ॥ ८ ॥
परदारनिरीक्षण । भगांकित जाले नयन ।
परदारमुखचुंबन । भगांकित वदन तेणें झालें ॥ ९ ॥
परदारा आलिंगन । हृदयीं भगें पडलीं जाण ।
बाहु भगांकित जाले जाण । अंगुल्या संपूर्ण भगांकित ॥ ११० ॥
परदारप्रतिगमन । भगांकित जाले चरण ।
खालें तळवांही जाण । भगें संपूर्ण बिंबली ॥ १२ ॥
परदारेंसी कामगोष्टी । भगांकित जाला दोहीं होटीं ।
भगें पडलीं लल्लाटीं । भगीं पाठी पुरविली ॥ १३ ॥
ईंड्र पावला उपहती । सर्वांगें भगें स्रवती ।
निजकर्माची मानोनि खंती । अधोगती विलपत ॥ १४ ॥
इंद्र सर्वांगीं भगांकित । तो पक्षियांमाजी राहिला गुप्त ।
पाहतां देव ऋषी समस्त । तें अभिव्यक्त लक्षेना ॥ १५ ॥

शापाचे परिणाम :

इंद्रे सांडिले अमरमंडळ । मेघ झाले उच्छृंखळ ।
पृथ्वी झाली मंदफळ । स्वधर्म सकळ खुंटले ॥ १६ ॥
यालागीं साक्षेपें इंद्रासी । शोधिते जाले देव ऋषी ।
बृहस्पति सांगे तयांपासी । गौतमासी उःशाप मागा ॥ १७ ॥
मग मिळोनि देवऋषी । अवघे आले गौतमापासीं ।
उद्धरण करावया इंद्रासी । समस्तीं त्यासी प्रार्थिलें ॥ १८ ॥
गौतमें अनुतापें जाअण । केलें क्रोधाचें निर्दळण ।
देव प्रार्थितांचि जाण । कृपेनें संपूर्ण कळवळिला ॥ १९ ॥
इंद्र पावला उपहती । त्याची पुरविल्यापरिस महंती ।
अतिशयें करीन वाढती । स्वयें वरदोक्ति वदता झाला ॥ १२० ॥
इंद्र होता मयूरवेषें । उःशाप होतांचि डोळसें ।
सर्वांगीं उभारोनि पिसें । अति उल्लासें नाचत ॥ २१ ॥
इंद्र होता भगांकित पूर्ण । ती भगें होतील लोचन ।
तैंपासोनि सहस्रनयन । इंद्र अभिधान पावला ॥ २२ ॥

इंद्राकडून गौतमस्तुती, इंद्राला उःशापप्राप्ती :

इंद्र म्हणे जय जयजी गौतमा । पुरुषांमाजी उत्तमोत्तमा ।
न कळे तुझा महिमा । अगाध महिमा पैं तुझा ॥ २३ ॥
त्वां शाप नाहीं दिधला । माझा कर्मभोग म्यां भोगिला ।
जो दुराचारी तो सरता केला । हे महद् लीला पैं तुझी ॥ २४ ॥
ऐसी इंद्रे केली स्तुती । तेथें देवहि गौतमातें स्तविती ।
अलोलिक तुझी ख्याती । अपराधी निश्चित त्वां उद्धरिली ॥ २५ ॥
इंद्रपणाची ते खूण । मयूरीं आभासे पूर्ण ।
तैं त्यासी नव्हते वृषण । मयूरासी स्त्रीरमण असेना ॥ २६ ॥
मयूर आनंदें नृत्य करी । वीर्य स्रवे नेत्रद्वारीं ।
तें झेलोनि ने मयूरी । तेणेंचि उदरीं गर्भ तिसी ॥ २७ ॥
पूर्ण महत्त्व आलें इंद्रासी । परी ठाव नाहीं पुरुषत्वासी ।
तेव्हां गजाचे वृषण देवोनि त्यासी । पुरुषत्वासी पूर्ण केलें ॥ २८ ॥
गजदेही नाहीं वृषण । तेणें तो जाला वीर्यक्षीण ।
त्यासी दिधले इंद्रें वृषण । तेणें मस्तकीं संपूर्ण वंदिलें ॥ २९ ॥

इंद्रशापामुळें मोर आणि हत्तीवर परिणाम :

यालागी गजाचे देहीं । अद्यापि लिंगीं वृषण नाहीं ।
ते भासती मस्तकाचे ठायीं । कुंभेभ पाहीं यालागीं म्हणती ॥ १३० ॥
रतिकाळीं आपण । लिंगापासीं येती वृषण ।
येर्हळवीं ते मस्तकीं जाण । कुंभेभ पूर्ण यापरी भासे ॥ ३१ ॥
गजाचिया वृषणस्थितीं । इंद्रासी जाली ऐश्वर्यप्राप्ती ।
यालागीं त्यासी ऐरावती । देवींसमस्तीं ठेविलें नांव ॥ ३२ ॥
इंद्रापासी गजाचे वृषण । तेणें त्यासी बळ संपूर्ण ।
गजापासीं इंद्रवृषण । शक्रसमान गळ त्यासी ॥ ३३ ॥
गजास बळ शक्रासमान । शक्रें वाढविलें गजमहिमान ।
गजदळें दळ शोभायमान । येरवीं तें जाण रुंडमुंड ॥ ३४ ॥
गजेंद्रासी राज्यप्राप्ती । यालागीं गजांतलक्ष्मी म्हणती ।
समस्त प्रजा नमस्कारिती । ते पूर्णस्थिती लक्ष्मीची ॥ ३५ ॥
एवं ऋषिवाक्यकृपास्थितीं । इंद्र पावला उपहती ।
त्यासी वाहून ऐरावतीं । नेला स्वर्गाप्रती जयजयाकारें ॥ ३६ ॥
इंद्रअरहल्याआखान । ऋषीनें सांगितलें संपूर्ण ।
अहल्येचे पाषाणपण । करीं उद्धरण श्रीरामा ॥ ३७ ॥

अहेल्येचा उद्धार :

ऐकोनि सद्‌गुरूचें वचन । वेगीं उठला रघुनण्दन ।
करावया अहल्योद्धरण । आश्रमीं आपण प्रवेशला ॥ ३८ ॥
हातीं धरोनि ऋषिवर्यासी । आश्रमीं पाहे अहल्येसी ।
ते लक्षेना सकळां ऋषींसी । पाहतां चौंपासीं दिसेना ॥ ३९ ॥
आश्रमीं करितां परिभ्रमण । अवचट लागला रामचरण ।
जालें अहल्योद्धरण । साष्टांग नमन त्या केलें ॥ १४० ॥
मस्तकीं धरिलें श्रीरामचरण । आनंदाश्रू चालिले पूर्ण ।
जाले श्रीरामचरणप्रक्षाळण । प्रेम संपूर्ण अहल्येसी ॥ ४१ ॥

श्रीरामस्तुती :

म्हणे जय जय रामचंद्रा । शिळा तारिली पदमुद्रा ।
तुझा चरण जगदुद्धारा । भवसागरा लागतां ॥ ४२ ॥
तुझा लागतांचि श्रीचरण । शिळा उद्धरें हें नवल कोण ।
कर्माकर्माची बोळवण । प्रपंच तो पूर्ण परमार्थ होय ॥ ४३ ॥
न होतां तुझी चरणभेटी । प्रपंचाची सबळ गोष्टी ।
तुझे चरण देखतां दृष्टीं । प्रपंच उठी ब्रह्मत्वें ॥ ४४ ॥
तुझा लागतांची श्रीचरण । स्थूळ लिंग आणि कारण ।
महाकारणेंसीं जाण । होय परिपूर्ण परब्रह्म ॥ ४५ ॥
तुझे लागतांचि पाय । देह तो होय विदेह ।
संदेह होती निःसंदेह । जीव तो होय शिवसाक्षी ॥ ४६ ॥
अगाध चरनांची ख्याती । वानितां मौनावल्या श्रुती ।
चरणां शरण चारी मुक्ती । कथानुवृत्तिअनुवादें ॥ ४७ ॥
अनुवादतां रामकथा । कळिकाळ वोढवी माथा ।
तीर्थें वंदिती चरणतीर्था । कथा ऐकतां देव निवती ॥ ४८ ॥
आवडीं गाता रामायण । श्रीराम सुखावें आपण ।
वक्त्यांचे निरसे जन्ममरण । श्रोते संपूर्ण ब्रह्म होती ॥ ४९ ॥
ऐसी हे तुझी निजकथा । पावन करी लोकां समस्तां ।
असो कथानुवादवार्ता । नाम स्मरतां निजमुक्ति ॥ १५० ॥
नित्य स्मरतां रामनाम । सकळ पातकां करी भस्म ।
चहूं पुरुषार्थाचें काम । होय सुगम हरिनामें ॥ ५१ ॥
करितां रामनामस्मरण । जन्ममरणासी ये मरण ।
समूळ विरे मीतूंपण । भवबंधन बाधेना ॥ ५२ ॥
बाधेना मायामोहन । बाधेना कर्मबंधन ।
बाधेना त्रिविधविंदान । रामस्मरण करितांचि ॥ ५३ ॥
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान करतां रामस्मरण । त्रिपुटीचें भान असेना ॥ ५४ ॥
असेना देहीं अहंभाव । असेना जीवीं जीवभाव ।
मीतूंपणा नाहीं ठाव । नामनिर्वाह श्रीरामें ॥ ५५ ॥
रामनामाच्या गदारोळें स्मरत्या शरण रिघिजे काळें ।
भवभय समूळ पळे । सुखसोहळे श्रीरामें ॥ ५६ ॥
श्रीरामनामगजरें । ब्रह्म स्वानंदें हुंवरे ।
जेवीं धेनु वत्सा अनुसरे । तेवीं नामोच्चारें श्रीराम ॥ ५७ ॥

नाममाहात्म्य :

श्रीराम हें नामाक्षर । क्षराक्षरातीत पर ।
नाम परब्रह्म परात्पर । नाममंत्र शिवसेव्य ॥ ५८ ॥
नामापासीं सद्यःमुक्ती । पंडित बोलती पुराणोक्तीं ।
मी बोलिलों ते माझी प्रतीती । नाम निश्चितीं तारक ॥ ५९ ॥
नामें भुक्ती नामें मुक्ती । नामापासीं ब्रह्मप्राप्ती ।
रामनाम जे जपती । वंद्य त्रिजगतीं तेचि पैं ॥ १६० ॥
रामनाम परम तप । रामनाम परम तप ।
रामनाम निरसी पुण्यपाप । नाम निर्विकल्प समाधि ॥ ६१ ॥
नामीं नाहीं अनध्यान । नामीं सर्वदा स्वाध्याय ।
नाम प्रत्यक्ष परब्रह्म पाहें । अभाग्या भाव उमजेना ॥ ६२ ॥
नामीं नाहीं अनध्ययन । नामीं नाहीं विधिविधान ।
नामीं नाहीं कर्मबंधन । नामें पावन महापापी ॥ ६३ ॥
जरी जाला दुराचारी । तो जैं भरे अनुतापभरीं ।
रामनामें जपे जिव्हारी । तो साधु संसारी भगवद्‌वाक्यें ॥ ६४ ॥

अहल्येने केलेली स्तुती :

श्रीरामकृपानिजदीप । आहल्येचें गेलें आकल्पपाप ।
तिच्या तपाचा प्रताप । पात तें निष्पात करूनि दावी ॥ ६५ ॥
इंद्र न करितां व्यभिचार । शाप न देतां ऋषीश्वर ।
तैं मी कैंचा पावतें रामचंद्र । भाग्य माझें थोर ऋषिशापें ॥ ६६ ॥
गौतमाचा निजशाप । तो मज जाला अमृतरूप ।
माझें जावोनि पुण्यपाप । शुद्ध स्वरूप पावलें ॥ ६७ ॥
इंद्र केला नाहीं व्यभिचार । केला माझा जन्मोद्धार ।
गौतमास्जाप नव्हे तो वर ।तेणें रघुवीर भेटविला ॥ ६८ ॥
गौतम माझा निजभ्रतारू । गौतम माझा निजसद्‌गुरू ।
गौतम माझा निजनिर्धारू । तेणें रघुवीरू भेटविला ॥ ६९ ॥
जगीं उदंड आहेत वीर । परी छेदूं न शकती अहंकार ।
परम योद्धा श्रीरामचंद्र । मारिला सहपरिवार अहंभाव माझा ॥ १७० ॥
ऐसी अहल्यां करितां स्तुती । गौतम कळलें ज्ञानशक्तीं ।
तेणें येवोनि शीघ्रगतीं । स्वयें रघुपति पूजिला ॥ ७१ ॥
कामक्रोधां निर्दाळी गौतम । अहल्या श्रीरामें निष्काम ।
दोहांची वृत्ति सहजें सम । रामें परब्रह्म पावलीं ॥ ७२ ॥

गौतम अहल्या पुनर्मीलन :

श्रीरामें देवोनि भेटी । दोहींची सोडिली लिंगगांठी ।
सच्चिदानंदें आली पुष्टी । दोघां समदृष्टी समत्वें ॥ ७३ ॥
दोहींचें एक देखणेपण । दोहींचे एक सावध श्रवण ।
दोहींचे एक मन उन्मन । दोन्हीं चैतन्यघन श्रीरामें ॥ ७४ ॥
दोहींचा एक आत्मा एक प्राण । दोहींचें एक अंतःकरण ।
दोहींचें एक निजज्ञान । दोघे सुखसंपन्न एकात्मता ॥ ७५ ॥
दोहींची एक शब्दसिद्धी । दोहींची एक इंद्रियविधी ।
प्रपंचीं परमार्थीं समान बुद्धी । दोघां समाधी एकचि ॥ ७६ ॥
ऐसीं एकात्मतानिष्ठ । दोघां भरिला शेंसपात ।
गौतम ऋषिवर्य वरिष्ठ । अहल्या श्रेष्ट पतिव्रता ॥ ७७ ॥
ऐसीं एकात्मता पूर्ण । स्वयें श्रीराम आपण ।
केलें अहल्योद्धरण । गौतम संपूर्ण सुखी केला ॥ ७८ ॥
सुखी संपन्न ऋषीश्वर । हर्षें निर्भर सुरवर ।
वर्षती सुमनांचे संभार । जयजयकार प्रवर्तला ॥ ७९ ॥
एकात्मा तरलों म्हणती । शेखीं भेददृष्तीं विषयासक्ती ।
ऐसी ऐकोनियां मुक्ती । श्रोते हांसती सज्ञान ॥ १८० ॥
कवित्व करिताती धीटपाठ । मेळविती कर्मकचाट ।
तेंवि कवित्वाची कटकट । श्रोते वीट मानिती ॥ ८१ ॥
जे कवित्वीं शब्दचातुर्यशोभा । ते शाब्दिकासी अतिवल्लभा ।
जे कथा परमार्थज्ञानगाभा । ते कथाजगदंबा जग निववी ॥ ८२ ॥
ज्ञानी निवती परमार्थबोधें । पंडित निवती पदबंधें ।
लोक निवती कथाविनोदें । ग्रंथसंबंधें जग निवे ॥ ८३ ॥
मुख्यत्वें ग्रंथींचें राखावे प्रेम । प्रतिपदीं प्रतिपादावें परब्रह्म ।
हाचि कवित्वाचा कवित्वधर्म । श्रोते सप्रेम होती सुखी ॥ ८४ ॥
कथा रम्य रामायण । एका जनार्दना शरण ।
जालें अहोल्य्द्धरण । जानकीवरण तें ऐका ॥ ८५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थ रामायणे बालकांडें एकाकारटीकायां
अहल्योद्धरणं नाम चतुर्दशोऽध्याय ॥ १४ ॥
॥ श्लोक - ६ ॥ ओंव्या १८५ ॥ एवं १९१ ॥



GO TOP