[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणाभ्यां सीताया अन्वेषणं तस्या अनधिगमे श्रीरामस्य विलापश्च -
श्रीराम आणि लक्ष्मणांच्या द्वारा सीतेचा शोध आणि ती न मिळाल्याने श्रीरामांची व्याकुळता -
दृष्ट्‍वाऽऽश्रमपदं शून्यं रामो दशरथात्मजः ।
रहितां पर्णशालां च प्रविद्धान्यासनानि च ॥ १ ॥

अदृष्ट्‍वा तत्र वैदेहीं संनिरीक्ष्य च सर्वशः ।
उवाच रामः प्राक्रुश्य प्रगृह्य रुचिरौ भुजौ ॥ २ ॥
दशरथनंदन श्रीरामांनी पाहिले की आश्रमांतील सर्व स्थाने सीतेशिवाय शून्य दिसत आहेत तसेच पर्णशाळेतही सीता नाही आणि बसण्याची आसने इकडे तिकडे फेकली गेलेली आहेत. तेव्हा त्यांनी पुन्हा तेथील सर्व स्थानांचे निरीक्षण केले आणि चोहोंबाजूस शोधून जेव्हा वैदेहीचा कोठे पत्ता लागला नाही, तेव्हा श्रीराम आपल्या दोन्ही सुंदर भुजा वर उचलून सीतेचे नाव घेऊन तिला जोरजोराने हाका मारून लक्ष्मणास म्हणाले- ॥१-२॥
क्व नु लक्ष्मण वैदेही कं वा देशमितो गता ।
केनाहृता वा सौमित्रे भक्षिता केन वा प्रिया ॥ ३ ॥
लक्ष्मणा ! वैदेही कोठे आहे ? येथून कुठल्या देशात निघून गेली आहे ? सौमित्रा ! माझी प्रिया सीता हिला कुणी हरण करून नेले आहे ? अथवा कुणा राक्षसाने खाऊन टाकले आहे ? ॥३॥
वृक्षेणावार्य यदि मां सीते हसितुमिच्छसि ।
अलं ते हसितेनाद्य मां भजस्व सुदुःखितम् ॥ ४ ॥
(नंतर ते सीतेला संबोधून म्हणाले-) सीते ! जर तू वृक्षांच्या आड आपल्याला लपवून माझी चेष्टा करू इच्छित असशील तर या समयी ही चेष्टा ठीक नाही आहे. मी फार दुःखी होत आहे, तू माझ्याजवळ ये बरे. ॥४॥
यैः परिक्रीडसे सीते विश्वस्तैर्मृगपोतकैः ।
एते हीनास्त्वया सौम्ये ध्यायन्त्यस्राविलेक्षणाः ॥ ५ ॥
हे सौम्ये ! सीते ! ज्या विश्वस्त मृगशावकांच्या बरोबर तू क्रीडा करीत होतीस ती आज तुझ्याशिवाय दुःखी होऊन डोळ्यात अश्रू आणून चिन्तामग्न झाली आहेत. ॥५॥
सीतया रहितोऽहं वै नहि जीवामि लक्ष्मण ।
वृतं शोकेन महता सीताहरणजेन माम् ॥ ६ ॥

परलोके महाराजो नूनं द्रक्ष्यति मे पिता ।
लक्ष्मणा ! सीते शिवाय मी जिवंत राहू शकत नाही. सीताहरणजनित महान्‌ शोकाने मला चारी बाजुनी घेरून टाकले आहे. निश्चितच आता परलोकात माझे पिता महाराज दशरथ मला पहातील. ॥६ १/२॥
कथं प्रतिज्ञां संश्रुत्य मया त्वमभियोजितः ॥ ७ ॥

अपूरयित्वा तं कालं मत्सकाशमिहागतः ।
ते मला टोमणे देत म्हणतील - मी तर तुला वनवासासाठी आज्ञा दिली होती आणि तू तेथे राहाण्याची प्रतिज्ञा केली होतीस. मग तितका समय तेथे राहून त्या प्रतिज्ञेला पूर्ण न करताच तू येथे माझ्याजवळ कसा निघून आलास ? ॥७ १/२॥
कामवृत्तमनार्यं वा मृषावादिनमेव च ॥ ८ ॥

धिक् त्वामिति परे लोके व्यक्तं वक्ष्यति मे पिता ।
तुझ्या सारख्या स्वेच्छाचारी, अनार्य आणि मिथ्यावादीचा धिक्कार आहे. अशा प्रकारे परलोकात पिता दशरथ मला अवश्यच बोलतील. ॥८ १/२॥
व िवशं शोकसन्तप्तं दीनं भग्नमनोरथम् ॥ ९ ॥

मामिहोत्सृज्य करुणं कीर्तिर्नरमिवानृजुम् ।
क्व गच्छसि वरारोहे मां नोत्सृज सुमध्यमे ॥ १० ॥
वरारोहे ! सुमध्यमे ! सीते ! मी विवश, शोकसंतप्त, दीन, भग्नमनोरथ होऊन करूणाजनक अवस्थेत पडलो आहे. ज्याप्रमाणे कीर्ति कुटिल मनुष्याचा त्याग करते त्याप्रकारे तू मला सोडून कोठे निघून गेली आहेस ? मला सोडू नको, सोडू नको. ॥९-१०॥
त्वया विरहितश्चाहं त्यक्ष्ये जीवितमात्मनः ।
इतीव विलपन् रामः सीतादर्शनलालसः ॥ ११ ॥

न ददर्श सुदुःखार्तो राघवो जनकात्मजाम् ।
तुझ्या वियोगात मी आपल्या प्राणांचा त्याग करीन. या प्रकारे अत्यंत दुःखाने आतुर होऊन विलाप करीत श्रीराम सीतेच्या दर्शनासाठी अत्यंत उत्कंठित झाले; परंतु ती जनकनंदिनी सीता त्यांच्या दृष्टीस पडली नाही. ॥११ १/२॥
अनासादयमानं तं सीतां शोकपरायणम् ॥ १२ ॥

पङ्‌कमासाद्य विपुलं सीदन्तमिव कुञ्जरम् ।
लक्ष्मणो राममत्यर्थमुवाच हितकाम्यया ॥ १३ ॥
ज्याप्रमाणे एखादा ह्त्ती फार मोठ्‍या दलदलीत फसून कष्टी होतो, त्याप्रकारे सीता न मिळाल्याने अत्यंत शोकात बुडून गेलेल्या श्रीरामांना त्यांच्या हितासाठी लक्ष्मण याप्रमाणे बोलले- ॥१२-१३॥
मा विषादं महाबुद्धे कुरु यत्‍नं मया सह ।
इदं गिरिवरं वीर बहुकन्दरशोभितम् ॥ १४ ॥

प्रियकाननसञ्चारा वनोन्मत्ता च मैथिली ।
सा वनं वा प्रविष्टा स्यान्नलिनीं वा सुपुष्पिताम् ॥ १५ ॥

सरितं वापि सम्प्राप्ता मीनवञ्जुलसेविताम् ।
वित्रासयितुकामा वा लीना स्यात् कानने क्वचित् ॥ १६ ॥

जिज्ञासमाना वैदेही त्वां मां च पुरुषर्षभ ।
महामते ! आपण विषाद करू नये. माझ्यासह जानकीला शोधून काढण्याचा प्रयत्‍न करावा. वीरवर ! हा समोर जो उंच पहाड दिसून येत आहे, तो अनेक गुफांनी सुशोभित आहे. मैथिलीला वनात हिंडणे फार प्रिय वाटते. ती वनाची शोभा पाहून हर्षाने उन्मत्त होऊन जाते. म्हणून वनात गेली असेल, अथवा सुंदर कमलाच्या फुलांनी भरलेल्या सरोवराच्या अथवा मत्स्य तसेच वेतसलतांनी सुशोभित सरितेच्या तटावर जाऊन पोहोचली असेल अथवा पुरुषप्रवर ! आपल्याला घाबरविण्याच्या इच्छेने आपण तिला शोधून काढू शकतो की नाही या जिज्ञासेने कुठे वनातच लपून राहिली असेल. ॥१४-१६ १/२॥
तस्या ह्यन्वेषणे श्रीमन् क्षिप्रमेव यतावहै ॥ १७ ॥

वनं सर्वं विचिनुवो यत्र सा जनकात्मजा ।
म्हणून श्रीमन्‌ ! वनात जेथे जेथे जानकी असण्याची संभावना असेल त्या सर्व स्थानावर आपण दोघे लवकरच तिला शोधण्याचा प्रयत्‍न करू. ॥१७ १/२॥
मन्यसे यदि काकुत्स्थ मा स्म शोके मनः कृथाः ॥ १८ ॥

एवमुक्तस्तु सौहार्दाल्लक्ष्मणेन समाहितः ।
सह सौमित्रिणा रामो विचेतुमुपचक्रमे ॥ १९ ॥
रघुनंदन (काकुत्स्थ) ! जर आपल्याला माझे हे बोलणे योग्य वाटत असेल तर आपण शोक सोडून द्यावा. लक्ष्मण द्वारा याप्रकारे सौहार्दपूर्वक समजाविले गेल्यावर श्रीराम सावध झाले आणि त्यांनी सौमित्रा बरोबर सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला. ॥१८-१९॥
तौ वनानि गिरींश्चैव सरितश्च सरांसि च ।
निखिलेन विचिन्वन्तौ सीतां दशरथात्मजौ ॥ २० ॥

तस्य शैलस्य सानूनि शिलाश्च शिखराणि च ।
निखिलेन विचिन्वन्तौ नैव तामभिजग्मतुः ॥ २१ ॥
दशरथांचे हे दोन्ही पुत्र सीतेचा शोध करीत वनांतून, पर्वतांवरून, सरिता आणि सरोवरांच्या किनार्‍यावरून हिंडत फिरत पूर्ण प्रयत्‍न करीत अनुसंधानात लागून राहिले. त्या पर्वतांची शिखरे, शिला इत्यादिवर त्यांनी चांगल्या प्रकारे सीतेचा शोध घेतला. ॥२०-२१॥
विचित्य सर्वतः शैलं रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
नेह पश्यामि सौमित्रे वैदेहीं पर्वते शुभाम् ॥ २२ ॥
पर्वताच्या चारी बाजूस शोधल्यावर श्रीराम लक्ष्मणास म्हणाले- सौमित्र ! या पर्वतावर तर मला सुंदर वैदेही कोठे दिसून येत नाही आहे. ॥२२॥
ततो दुःखाभिसन्तप्तो लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
विचरन् दण्डकारण्यं भ्रातरं दीप्ततेजसम् ॥ २३ ॥
तेव्हा दुःखाने संतप्त झालेल्या लक्ष्मणाने दण्डकारण्यात हिंडता हिंडता आपल्या उद्दीप्त तेजस्वी भावास याप्रकारे म्हटले- ॥२३॥
प्राप्स्यसे त्वं महाप्राज्ञ मैथिलीं जनकात्मजाम् ।
यथा विष्णुर्महाबाहुर्बलिं बध्वा महीमिमाम् ॥ २४ ॥
महामते ! जसे महाबाहु भगवान्‌ विष्णुनी राजा बळिला बांधून ही पृथ्वी प्राप्त केली होती त्याप्रकारे आपण ही मैथिली जानकीस प्राप्त करून घ्याल. ॥२४॥
एवमुक्तस्तु वीरेण लक्ष्मणेन स राघवः ।
उवाच दीनया वाचा दुःखाभिहतचेतनः ॥ २५ ॥
वीर लक्ष्मणानी असे म्हटल्यावर दुःखाने व्याकुलचित्त झालेल्या श्रीरघुनाथांनी दीन वाणीने म्हटले- ॥२५॥
वनं सुविचितं सर्वं पद्मिन्यः फुल्लपङ्‌कजाः ।
गिरिश्चायं महाप्राज्ञ बहुकन्दरनिर्झरः ।
नहि पश्यामि वैदेहीं प्राणेभ्योऽपि गरीयसीम् ॥ २६ ॥
महाप्राज्ञ लक्ष्मणा ! मी सारे वन शोधले. विकसित कमळांनी भरलेली सरोवरे ही पाहिली तसेच अनेक गुहांनी आणि निर्झरांनी सुशोभित या पर्वतावर ही सर्व बाजूनी शोध घेतला, परंतु मला आपल्या प्राणांहून प्रिय वैदेही कोठेही दृष्टीस पडली नाही. ॥२६॥
एवं स विलपन् रामः सीताहरणकर्षितः ।
दीनशोकसमाविष्टो मुहूर्तं विह्वलोऽभवत् ॥ २७ ॥
याप्रकारे सीता हरणाच्या कष्टाने पीडित होऊन विलाप करीत श्रीराम दीन आणि शोकमग्न होऊन एक मुहूर्तपर्यंत अत्यंत व्याकुळ होऊन पडून राहिले होते. ॥२७॥
स विह्वलितसर्वाङ्‌गो गतबुद्धिर्विचेतनः ।
निषसादातुरो दीनो निःश्वस्याशीतमायतम् ॥ २८ ॥
त्यांचे सर्व अंग विव्हळ (शिथिल) होऊन गेले, बुद्धि काम करीत नाहींशी झाली होती, चेतना जणु लुप्त होत होती. ते उष्ण दीर्घ श्वास घेत आणि आतुर होऊन विषादात बुडून गेले होते. ॥२८॥
बहुशः स तु निःश्वस्य रामो राजीवलोचनः ।
हा प्रियेति विचुक्रोश बहुशो बाष्पगद्‌गदः ॥ २९ ॥
वारंवार उच्छवास घेऊन कमलनयन श्रीराम अश्रूनी गद्‍गद्‍लेल्या वाणीमध्ये, हा प्रिये ! असे म्हणून खूप रडू आणि तळमळू लागले. ॥२९॥
तं सान्त्वयामास ततो लक्ष्मणः प्रियबान्धवम् ।
बहुप्रकारं शोकार्तः प्रश्रितं प्रश्रिताञ्जलिः ॥ ३० ॥
तेव्हा शोकाने पीडित झालेल्या लक्ष्मणाने विनीत भावाने हार जोडून आपल्या प्रिय भावाचे अनेक प्रकारे सांत्वन केले. ॥३०॥
अनादृत्य तु तद् वाक्यं लक्ष्मणोष्ठपुटच्युतम् ।
अपश्यंस्तां प्रियां सीतां प्राक्रोशत् स पुनः पुनः ॥ ३१ ॥
लक्ष्मणाच्या ओष्ठपुटांतून निघालेल्या गोष्टींचा आदर न करता श्रीरामचंद्र आपली प्रिय पत्‍नी सीता न दिसल्याने तिला वारंवार हाका मारू लागले आणि रडू लागले. ॥३१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP