[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। शततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य भरतं प्रति कुशलप्रश्नव्याजेन राजनीतेरुपदेशः -
श्रीरामांनी भरतास कुशल प्रश्नांच्या निमित्ताने राजनीतिचा उपदेश करणे -
जटिलं चीरवसनं प्राञ्जलिं पतितं भुवि ।
ददर्श रामो दुर्दर्शं युगान्ते भास्करं यथा ॥ १ ॥

कथञ्चिदभिविज्ञाय विवर्णवदनं कृशम् ।
भ्रातरं भरतं रामः परिजग्राह पाणिना ॥ २ ॥

आघ्राय रामस्तं मूर्ध्नि परिष्वज्य च राघवम् ।
अङ्‌के भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरम् ॥ ३ ॥
जटा आणि चीर वस्त्र धारण केलेले भरत हात जोडून पृथ्वीवर पडले होते. जणु प्रलयकाली सूर्यच पृथ्वीवर पडला आहे ! त्यांच्या त्या अवस्थेला पाहणे कुठल्याही स्नेही सुहृदासाठी अत्यंत कठीण होते. श्रीरामांनी त्यांना पाहिले आणि कसे तरी एकदा ओळखले. त्यांचे मुख उदास झाले होते आणि ते फार दुर्बल झाले होते. श्रीरामांनी आपला भाऊ भरत यास हातांनी धरून उठविले आणि त्यांचे मस्तक हुंगून आपल्या हृदयाशी धरले. त्यानंतर भरताला मांडीवर बसवून श्रीरामांनी मोठ्या आदराने त्यांना विचारले - ॥ १-३ ॥
क्व नु तेऽभूत् पिता तात यदरण्यं त्वमागतः ।
न हि त्वं जीवतस्तस्य वनमागन्तुमर्हसि ॥ ४ ॥
"तात ! पिताजी कोठे होते की तू या वनात निघून आला आहेस ? ते जर जिवंत असते तर मग तू वनात येऊ शकला नसतास. ॥ ४ ॥ "
चिरस्य बत पश्यामि दूराद् भरतमागतम् ।
दुष्प्रतीकमरण्येऽस्मिन् किं तात वनमागतः ॥ ५ ॥
’मी दीर्घ काळानंतर दुरून (आजोबांच्या घरून) आलेल्या भरताला आज या वनात पहात आहे, परंतु याचे शरीर फारच दुर्बल झाले आहे. तात ! तू कां बरे वनात आला आहेस ? ॥ ५ ॥
कच्चिन्नु धरते तात राजा यत् त्वमिहागतः ।
कच्चिन्न दीनः सहसा राजा लोकान्तरं गतः ॥ ६ ॥
’बंधु ! महाराज जीवित आहेत ना ? असे तर झाले नाही ना की ते अत्यंत दुःखी होऊन एकाएकी परलोकवासी झाले आहेत आणि म्हणून तुम्हाला स्वयं इथे यावे लागले आहे ? ॥ ६ ॥
कच्चित् सौम्य न ते राज्यं भ्रष्टं बालस्य शाश्वतम् ।
कच्चिच्छ्रुश्रूषसे तात पितुः सत्यपराक्रम ॥ ७ ॥
’सौम्य ! तू अजून बालक आहेस. म्हणून परंपरेने चालत आलेले तुझे राज्य नष्ट तर झाले नाही ना ? सत्यपराक्रमी तात भरत ! तुम्ही पित्यांची सेवा सुश्रुषा तर करीत आहात ना ? ॥ ७ ॥
कच्चिद् दशरथो राजा कुशली सत्यसङ्‌गरः ।
राजसूयाश्वमेधानामाहर्त्ता धर्मनिश्चितः ॥ ८ ॥
’जे धर्मावर अढळ राहणारे आहेत तसेच ज्ञानी राजसूय आणि अश्वमेध यज्ञांचे अनुष्ठान केलेले आहे, ते सत्यप्रतिज्ञा महाराज दशरथ सकुशल तर आहेत ना ? ॥ ८ ॥
स कच्चिद् ब्राह्मणो विद्वान् धर्मनित्यो महाद्युतिः ।
इक्ष्वाकूणामुपाध्यायो यथावत् तात पूज्यते ॥ ९ ॥
तात ! तू सदा धर्मामध्ये तत्पर राहणार्‍या विद्वान , ब्रह्मवेत्ते आणि इक्ष्वाकु कुलाचे आचार्य महातेजस्वी वसिष्ठांची यथावत् पूजा करतोस ना ? ॥ ९ ॥
तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती ।
सुखिनी कच्चिदार्या च देवी नंदति कैकयी ॥ १० ॥
’बंधो ! काय माता कौसल्या सुखात आहे ना ? उत्तम संतान असणारी सुमित्रा प्रसन्न आहे ना ? आणि आर्या कैकेयी देवीही आनंदित आहे ना ? ॥ १० ॥
कच्चिद् विनयसंपन्नः कुलपुत्रो बहुश्रुतः ।
अनसूयुरनुद्रष्टा सत्कृतस्ते पुरोहितः ॥ ११ ॥
’जे उत्तम कुळात उत्पन्न झालेले, विनयसंपन्न, बहुश्रुत, कुणाचे दोष न बघणारे तसेच शास्त्रोक्त धर्मावर निरंतर दृष्टी ठेवणारे आहेत त्या पुरोहितांचा तुम्ही पूर्णतः सत्कार केला आहे ना ? ॥ ११ ॥
कच्चिदग्निषु ते युक्तो विधिज्ञो मतिमानृजुः ।
हुतं च होष्यमाणं च काले वेदयते सदा ॥ १२ ॥
’हवनविधिचे ज्ञाते, बुद्धिमान् आणि सरळ स्वभावाच्या ज्या ब्राह्मण देवतांना तुम्ही अग्निहोत्र कार्यासाठी नियुक्त केले आहे, ते सदा योग्य समयी येऊन काय तुम्हाला हे सुचित करतात का की या समयी अग्निमध्ये आहुति दिली गेली आहे, आता अमुक समयी हवन करावयाचे आहे ? ॥ १२ ॥
कच्चिद् देवान् पितॄन् भृत्यान् गुरून् पितृसमानपि ।
वृद्धांश्च तात वैद्यांश्च ब्राह्मणांश्चाभिमन्यसे ॥ १३ ॥
’तात ! काय तुम्ही देवता, पितर, भृत्य, गुरुजन, पित्यासमान आदरणीय वृद्ध, वैद्य आणि ब्राह्मणांचा सन्मान करता ना ? ॥ १३ ॥
इष्वस्त्रवरसंपन्नमर्थशास्त्रविशारदम् ।
सुधन्वानमुपाध्यायं कच्चित् त्वं तात मन्यसे ॥ १४ ॥
’बंधु ! जे मंत्ररहित श्रेष्ठ बाणांचे प्रयोग तसेच मंत्रसहित उत्तम अस्त्रांचे प्रयोग यांच्या ज्ञानाने संपन्न अर्थ शास्त्राचे (राजनीतिचे) उत्तम पंडित आहेत त्या आचार्य सुधन्वा यांचा तू समादर करीत असतोस ना ? ॥ १४ ॥
कच्चिदात्मसमाः शूराः श्रुतवन्तो जितेन्द्रियाः ।
कुलीनाश्चेङ्‌गितज्ञाश्च कृतास्ते तात मन्त्रिणः ॥ १५ ॥
’तात ! काय तू आपल्याच समान शूरवीर, शास्त्रज्ञ, जितेंद्रिय, कुलीन तसेच बाहेरील हालचालीवरून मनातील गोष्ट जाणून घेणार्‍या सुयोग्य व्यक्तिंनाच मंत्री बनविले आहेस ना ? ॥ १५ ॥
मन्त्रो विजयमूलं हि राज्ञां भवति राघव ।
सुसंवृतो मन्त्रिधुरैरमात्यैः शास्त्रकोविदैः ॥ १६ ॥
’राघव (भरत्) ! चांगली मंत्रणा हीच राजेलोकांच्या विजयाचे मूळ कारण आहे. तीही जेव्हा नीतिशास्त्र निपुण मंत्री शिरोमणि अमात्य, तिला सर्वथा गुप्त ठेवतो तेव्हांच सफल होत असते. ॥ १६ ॥
कच्चिन्निद्रावशं नैषि कच्चित् कालेऽवबुध्यसे ।
कच्चिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थनैपुणम् ॥ १७ ॥
’भरत ! तुम्ही असमयीच निद्रेला वश तर होत नाही ना ? योग्य वेळी जागे होता ना ? रात्रीच्या नंतरच्या प्रहरात अर्थसिद्धिच्या उपायावर विचार करता ना ? ॥ १७ ॥
कच्चिन्मन्त्रयसे नैकः कच्चिन्न बहुभिः सह ।
कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्रं न परिधावति ॥ १८ ॥
(कुठलीही गुप्त यंत्रणा दोनापासून चार कानापर्यंत गुप्त राहते, षट्कर्णी जाताच ती फुटून जाते, उघड होते, म्हणून मी विचारतो आहे -) तुम्ही एखाद्या गूढ विषयावर एकटेच विचार तर करीत नाही ना ? अथवा अनेक लोकांबरोबर बसून तर मंत्रणा करीत नाही ना ? कधी असे तर होत नाही ना, की तुम्ही निश्चित केलेली गुप्त मंत्रणा फुटून शत्रुच्या राज्यापर्यंत तर पसरत नाही ना ? ॥ १८ ॥
कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम् ।
क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयसि राघव ॥ १९ ॥
भरत ! ज्याचे साधन फार लहान आणि फळ फार मोठे अशा कार्याचा निश्चय केल्यानंतर तुम्ही त्या कार्याचा शीघ्र आरंभ करता ना ? त्यात विलंब तर करीत नाही ना ? ॥ १९ ॥
कच्चिन्नु सुकृतान्येव कृतरूपाणि वा पुनः ।
विदुस्ते सर्वकार्याणि न कर्तव्यानि पार्थिवाः ॥ २० ॥
’तुमची सर्व कार्ये पूर्ण झाल्यानंतर अथवा पूर्ण होण्यासमीप पोहोंचल्यावरच दुसर्‍या राजांना ज्ञात होतात ना ? कधी असे तर होत नाही ना की तुमच्या भावी कार्यक्रमाला ते पहिल्यापासूनच जाणून घेतात ? ॥ २० ॥
कच्चिन्न तर्कैर्युक्त्या वा ये चाप्यपरिकीर्तिताः ।
त्वया वातव वामात्यैर्बुध्यते तात मन्त्रितम् ॥ २१ ॥
तात ! तुम्ही निश्चित केलेल्या विचारांना तुम्ही अथवा मंत्र्यांनी प्रकटन न करताही दुसरे लोक तर्क आणि युक्ति यांच्या द्वारा जाणून तर घेत नाहीत ना ? (तसेच तुम्हाला आणि तुमच्या अमात्यांना दुसर्‍यांच्या गुप्त विचारांचा पत्ता लागत राहतो ना ? ॥ २१ ॥
कच्चित् सहस्रैर्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं महत् ॥ २२ ॥
’काय तुम्ही हजारो मूर्खांच्या बदल्यात एका पण्डितालाच आपल्याजवळ बाळगण्याची इच्छा ठेवता ना ? कारण विद्वान पुरुषच अर्थसंकटाच्या समयी महान् कल्याण करू शकतो. ॥ २२ ॥
सहस्राण्यपि मूर्खाणां यद्युपास्ते महीपतिः ।
अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ॥ २३ ॥
’राजाने जरी हजार अथवा दहा हजार मूर्खांना आपल्याजवळ ठेवून घेतले तरीही प्रसंग आल्यावर त्यांच्याकडून काहीही चांगली मदत मिळत नाही. ॥ २३ ॥
एकोप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः ।
राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ॥ २४ ॥
’जर मंत्री मेधावी शूरवीर, चतुर आणि नीतिज्ञ असेल तर तो राजा अथवा राजकुमारास फार मोठ्या संपत्तीची प्राप्ती करून देऊ शकतो. ॥ २४ ॥
कच्चिन्मुख्या महत्स्वेव मध्यमेषु च मध्यमाः ।
जघन्याश्च जघन्येषु भृत्यास्ते तात योजिताः ॥ २५ ॥
’तात ! तुम्ही प्रधान व्यक्तिंना प्रधान, मध्यम व्यक्तिंना मध्यम आणि कनिष्ठ श्रेणीच्या लोकांना लहान, कामात नियुक्त केले आहे ना ? ॥ २५ ॥
अमात्यानुपधातीतान् पितृपैतामहाञ्छुचीन् ।
श्रेष्ठाच्छ्रेष्ठेषु कच्चित् त्वं नियोजयसि कर्मसु ॥ २६ ॥
’जे लांच घेत नाहीत अथवा निश्छल असतील, बापजाद्यांच्या वेळेपासूनच काम करीत आलेले असतील, तसेच उत्तम अंतर्बाह्य पवित्र व श्रेष्ठ असतील अशा अमत्यांनाच तुम्ही कार्यात नियुक्त करता ना ? ॥ २६ ॥
कच्चिन्नोग्रेण दण्डेन भृशमुद्वेजिताः प्रजाः ।
राष्ट्रे तवावजानन्ति मन्त्रिणः कैकयीसुत ॥ २७ ॥
’कैकेयीकुमार ! तुमच्या राज्यातील प्रजा कठोर दण्डामुळे अत्यंत उद्विग्न होऊन तुमच्या मंत्र्यांचा तिरस्कार तर करीत नाहीत ना ? ॥ २७ ॥
कच्चित् त्वां नावजानन्ति याजकाः पतितं यथा ।
उग्रप्रतिग्रहीतारं कामयानमिव स्त्रियः ॥ २८ ॥
’ज्याप्रमाणे पवित्र याजक पतित यजमानाचा, तसेच स्त्रिया कामाचारी पुरुषाचा तिरस्कार करतात, त्याप्रमाणे कठोरतापूर्वक अधिक कर घेण्यामुळे प्रजा तुमचा अनादर तर करीत नाहीत ना ? ॥ २८ ॥
उपायकुशलं वैद्यं भृत्यसंदूषणे रतम् ।
शूरमैश्वर्यकामं च यो न हन्ति न स हन्यते ॥ २९ ॥
’जो साम दाम आदि उपायांच्या प्रयोगात कुशल, राजनीतिशास्त्राचा विद्वान, विश्वासी भृत्यांना फोडण्यात गुंतलेला, शूर (मरणाला न घाबरणारा) तसेच, राजाचे राज्य हडप करण्याची इच्छा ठेवणारा आहे, अशा पुरुषाला जो राजा मारत नाही तो स्वतःच त्याच्या हातून मारला जातो. ॥ २९ ॥
कच्चिद् धृष्टश्च शूरश्च धृतिमान् मतिमाञ्छुचिः ।
कुलीनश्चानुरक्तश्च दक्षः सेनापतिः कृतः ॥ ३० ॥
’काय तुम्ही सदा संतुष्ट राहणार्‍या शूर वीर, धैर्यवान, बुद्धिमान, पवित्र, कुलीन तसेच आपल्या ठिकाणी अनुराग ठेवणार्‍या रणकर्मदक्ष पुरुषालाच सेनापति बनविले आहे ना ? ॥ ३० ॥
बलवन्तश्च कच्चित् ते मुख्या युद्धविशारदाः ।
दृष्टापदाना विक्रान्तास्त्वया सत्कृत्य मानिताः ॥ ३१ ॥
’तुमचे प्रधानप्रधान योद्धे (सेनापति) बलवान, युद्धकुशल आणि पराक्रमी तर आहेत ना ? तुम्ही त्यांच्या शौर्याची परीक्षा कधी घेतली की नाही ? तसेच काय ते तुमच्या द्वारा सत्कारपूर्वक सन्मान मिळवीत राहतात की नाही ? ॥ ३१ ॥
कच्चिद् बलस्य भक्तं च वेतनं च यथोचितम् ।
सम्प्राप्तकालं दातव्यं ददासि न विलम्बसे ॥ ३२ ॥
’सैनिकांना देण्याचे नियत केलेले समुचित वेतन आणि भत्ता तुम्ही योग्य समयी देत असता ना ? देण्यात विलंब तर करीत नाही ना ? ॥ ३२ ॥
कालातिक्रमणे ह्येव भक्तवेतनयोर्भृताः ।
भर्तुरप्यतिकुप्यन्ति सोऽनर्थः सुमहान् कृतः ॥ ३३ ॥
’जर वेळ निघून गेल्यावर भत्ता आणि वेतन दिले गेले नाही तर सैनिक आपल्या स्वामीवरही अत्यंत कुपित होऊन जातात, आणि या कारणामुळे फार मोठा अनर्थ घडून येतो. ॥ ३३ ॥
कच्चित् सर्वेऽनुरक्तास्त्वां कुलपुत्राः प्रधानतः ।
कच्चित्प्राणांस्तवार्थेषु संत्यजन्ति समाहिताः ॥ ३४ ॥
काय उत्तम कुळात उत्पन्न झालेले मंत्री आदि समस्त प्रधान अधिकारी तुमच्यावर प्रेम करतात ना ? काय ते तुमच्यासाठी एकाग्र चित्त होऊन आपल्या प्राणांचा त्याग करण्यासाठी उद्यत राहतात का ? ॥ ३४ ॥
कच्चिज्जानपदो विद्वान् दक्षिणः प्रतिभानवान् ।
यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डितः ॥ ३५ ॥
’भरत ! तुम्ही ज्याला राजदूताच्या पदावर नियुक्त केला आहे तो पुरुष आपल्याच देशाचा निवासी, विद्वान, कुशल, प्रतिभाशाली आणि जसे सांगितले जाईल ती गोष्ट तशीच दुसर्‍याच्या समोर सांगणारा आणि सद्‌सद्‌विवेक युक्त आहे ना ? ॥ ३५ ॥
कच्चिदष्टादशान्येषु स्वपक्षे दश पञ्च च ।
त्रिभिस्त्रिभिरविज्ञातैर्वेत्सि तीर्थानि चारकैः ॥ ३६ ॥
’काय तुम्ही शत्रुपक्षाचे अठरा** आणि आपल्या पक्षाच्या पंधरा%% तीर्थांची तीन तीन अज्ञात गुप्तचरांच्या द्वारा देखभाल अथवा तपासणी करीत आहात ना ? ॥ ३६ ॥
[** - शत्रुपक्षाचे मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापति, द्वारपाल, अंतर्वेशिक (अंतःपुराचा अध्यक्ष), कारागाराध्यक्ष, कोषाध्यक्ष, यथायोग्य धनाचा व्यय करणारा सचिव, प्रदेष्टा (पहारेकर्‍यांचे काम सांगणारा), नगराध्यक्ष (कोतवाल), कार्यनिर्माण कर्ता ( शिल्पी लोकांचा परिचालक), धर्माध्यक्ष, सभाध्यक्ष, दण्डपाल, दुर्गपाल, राष्ट्रसीमापाल, तसे वनरक्षक - ही अठरा तीर्थे आहेत ज्यांच्यावर राजाने दृष्टी ठेवायला हवी. मतांतराने ही अठरा तीर्थे याप्रकारे आहेत - मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापति, द्वारपाल, अंतःपुराध्यक्ष, कारागाराध्यक्ष, धनाध्यक्ष, राजाच्या आज्ञेने सेवकांना कामे सांगणारा, वादी-प्रतिवादींकडून अझगड्यासंबंधी चवकशी करणा प्राङ्‌‍विवाक (वकील), धर्मासनाधिकारी (न्यायाधीश), ग्य्ववहार निर्णेता, सभ्य, सेनेला जिविका-निर्वाहासाठी धनवाटप करणारा अधिकारी (सेनानायक), कर्मचार्‍यांना काम पुरे झाल्यानंतर वेतन देण्यासाठी राजाकडून धन घेणारा, नगराध्यक्ष, राष्ट्रसीमापाल, वनरक्षकदुष्टांना दण्ड देणारा अधिकारी, जल पर्वत वन दुर्गम व भूमिचे रक्षण करणारा - या सर्वांवर राजाने लक्ष ठेवले पाहिजे.
%%. - उपर्युक अठरा तीर्थांपैकी पहिले तीन सोडून शेष पंधरा तीर्थे आपल्या पक्षाचीही सदा परीक्षणीय आहेत. ]
कच्चिद् व्यपास्तानहितान् प्रतियातांश्च सर्वदा ।
दुर्बलाननवज्ञाय वर्तसे रिपुसूदन ॥ ३७ ॥
’शत्रुसूदन ! ज्या शत्रुना तुम्ही राज्यातून हाकलून दिले आहे ते जर परत आले तर तुम्ही त्यांना दुर्बल समजून त्यांची उपेक्षा तर करीत नाही ना ? ॥ ३७ ॥
कच्चिन्न लोकायतिकान् ब्राह्मणांस्तात सेवसे ।
अनर्थकुशला ह्येते बालाः पण्डितमानिनः ॥ ३८ ॥
’तात ! तुम्ही कधी नास्तिक ब्राह्मणांचा संग तर करीत नाही ना ? कारण की ते बुद्धिला परमार्थाकडून विचलित करण्यात कुशल असतात. तसेच वास्तविक अज्ञानी असूनही आपल्याला फार मोठे पंडित मानत असतात. ॥ ३८ ॥
धर्मशास्त्रेषु मुख्येषु विद्यमानेषु दुर्बुधाः ।
बुद्धिमान्वीक्षिकीं प्राप्य निरर्थं प्रवदन्ति ते ॥ ३९ ॥
’त्यांचे ज्ञान वेदाच्या विरुद्ध असल्याकारणाने दूषित असते आणि ते प्रमाणभूत प्रधान प्रधान धर्मशास्त्रांचे असूनही तार्किक बुद्धीचा आश्रय घेऊन व्यर्थ आणि निश्फळ वाद करीत असतात. ॥ ३९ ॥
वीरैरध्युषितां पूर्वमस्माकं तात पूर्वकैः ।
सत्यनामां दृढद्वारां हस्त्यश्वरथसङ्‌कुलाम् ॥ ४० ॥

ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैः स्वकर्मनिरतैः सदा ।
जितेन्द्रियैर्महोत्साहैर्वृतामार्यैः सहस्रशः ॥ ४१ ॥

प्रासादैर्विविधाकारैर्वृतां वैद्यजनाकुलाम् ।
कच्चित् समुदितां स्फीतामयोध्यां परिरक्षसे ॥ ४२ ॥
’तात ! आयोध्या आपल्या वीर पूर्वजांची निवासभूमि आहे. तिचे जसे नाम आहे, तसेच गुण आहेत. तिचे दरवाजे सर्व बाजूंनी सुदृढ आहेत. ती हत्ती, घोडे आणि रथांनी परिपूर्ण आहे. आपापल्या कामात तत्पर राहणारे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हजारोंच्या संख्येमध्ये तेथे सदा निवास करतात. ते सर्वच्या सर्व महान उत्साही, जितेंद्रिय आणि श्रेष्ठ आहेत. नाना प्रकारची राजभवने आणि मंदिरे अयोध्येची शोभा वाढवित असतात. ही नगरी बहुसंख्य विद्वानांनी भरलेली आहे. अशा अभ्युदयशील आणि समृद्ध शालिनी अयोध्या नगरीचे तुम्ही उत्तम प्रकारे रक्षण तर करीत आहात ना ? ॥ ४०-४२ ॥
कच्चिच्चैत्यशतैर्जुष्टः सुनिविष्टजनाकुलः ।
देवस्थानैः प्रपाभिश्च तटाकैश्चोपशोभितः ॥ ४३ ॥

प्रहृष्टनरनारीकः समाजोत्सवशोभितः ।
सुकृष्टसीमा-पशुमान् हिंसाभिरभिवर्जितः ॥ ४४ ॥

अदेवमातृको रम्यः श्वापदैः परिवर्जितः ।
परित्यक्तो भयैः सर्वैः खनिभिश्चोपशोभितः ॥ ४५ ॥

विवर्जितो नरैः पापैर्मम पूर्वैः सुरक्षितः ।
कच्चिज्जनपदः स्फीतः सुखं वसति राघव ॥ ४६ ॥
भरतराघव ! जेथे नाना प्रकारचे अश्वमेध आदि महायज्ञांचे बरेचसे चयन प्रदेश (अनुष्ठानामुळे) शोभत आहेत; ज्यात प्रतिष्टित माणसे मोठ्या संख्येमध्ये निवास करीत आहेत; अनेकानेक देवस्थाने, पाणपोया आणि तलाव शोभा वाढवित आहेत; जेथील स्त्री-पुरुष सदा प्रसन्न राहात असतात; जो सामाजिक उत्सवांमुळे सदा शोभायमान दिसून येतो; जेथे शेत नांगरण्यास समर्थ अशा पशूची विपुलता आहे; जेथे कोठल्याही प्रकारची हिंसा होत नाही; जेथे शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही (नद्यांच्या जलांनीच शेतीला पाणी पुरवठा होतो); जो फार सुंदर आणि हिंस्र पशूंनी रहित आहे; जेथे कुठल्याही प्रकारचे भय नाही; नाना प्रकारच्या खाणी ज्याची शोभा वाढवित आहेत; जेथे पापी मनुष्यांचा सर्वथा अभाव आहे; तसेच आपल्या पूर्वजांनी ज्याचे उत्तम प्रकारे रक्षण केले आहे तो आपला कोसल देश धनधान्याने संपन्न आणि सुखपूर्वक वसलेला आहे ना ? ॥ ४३-४६ ॥
कच्चित् ते दयिताः सर्वे कृषिगोरक्षजीविनः ।
वार्तायां संश्रितस्तात लोकोऽयं सुखमेधते ॥ ४७ ॥
तात ! कृषी आणि गोरक्षणाद्वारे जीवन निर्वाह करणारे सर्व वैश्य तुमचे प्रीतिपात्र आहेत ना ? कारण की कृषि आणि व्यापार यात संलग्न राहिल्यानेच हा लोक सुखी एवं उन्नतीशील होत असतो. ॥ ४७ ॥
तेषां गुप्तिपरीहारैः कच्चित् ते भरणं कृतम् ।
रक्ष्या हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः ॥ ४८ ॥
’त्या वैश्यांना इष्टाची प्राप्ती करवून आणि त्यांच्या अनिष्टाचे निवारण करून तुम्ही त्या सर्व लोकांचे भरण पोषण तर करीत आहात ना ? कारण की राजाने आपल्या राज्यात निवास करणार्‍या सर्व लोकांचे धर्मानुसार पालन करणे आवश्यक आहे. ॥ ४८ ॥
कच्चित् स्त्रियः सान्त्वयसे कच्चित् तास्ते सुरक्षिताः ।
कच्चिन्न श्रद्दधास्यासां कच्चिद् गुह्यं न भाषसे ॥ ४९ ॥
’काय तुम्ही आपल्या स्त्रियांना संतुष्ट ठेवता ना ? काय त्या तुमच्याद्वारे उत्तम प्रकारे सुरक्षित राहात आहेत ना ? तुम्ही त्यांच्यावर अधिक विश्वास तर ठेवीत नाही ना ? त्यांना आपली गुप्त गोष्ट तर सांगून टाकत नाही ना ? ॥ ४९ ॥
कच्चिन्नागवनं गुप्तं कच्चित् ते सन्ति धेनुकाः ।
कच्चिन्न गणिकाश्वानां कुञ्जराणां च तृप्यसि ॥ ५० ॥
’जेथे हत्ती उत्पन्न होतात ते जंगल तुमच्या द्वारा सुरक्षित आहे ना ? (अथवा हत्तींना फसविणार्‍या हत्तीणींची तर तुमच्यापाशी कमतरता नाही ना ? तुमच्यापाशी दूध देणार्‍या गाई तर अधिक संख्येने आहेत ना ? तुम्हाला हत्तीणी, घोडे आणि हत्तींच्या संग्रहाने कधी तृप्ति तर होत नाही ना ? ॥ ५० ॥
कच्चिद् दर्शयसे नित्यं मनुष्याणां विभूषितम् ।
उत्थायोत्थाय पूर्वाह्णे राजपुत्र महापथे ॥ ५१ ॥
’राजकुमार ! तुम्ही प्रतिदिन पूर्वाह्नकाळात वस्त्रभूषणांनी विभूषित होऊन प्रधान मार्गावर जाऊन नगरवासी मनुष्यांना दर्शन देता की नाही ? ॥ ५१ ॥
कच्चिन्न सर्वे कर्मान्ताः प्रत्यक्षास्तेऽविशङ्‌कया ।
सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम् ॥ ५२ ॥
कामकाजात लागलेली सर्व माणसे निडर होऊन तुमच्या समोर तर येत नाहीत ना ? अथवा ती सदा सर्वदा तुमच्यापासून दूर तर राहात नाहीत ना ? कारण कर्मचार्‍यांच्या विषयी मध्यम स्थितीचे अवलंबन करणेच अर्थसिद्धीला कारण होते. ॥ ५२ ॥
कच्चित् दुर्गाणि सर्वाणि धनधान्यायुधोदकैः ।
यन्त्रैश्च परिपूर्णानि तथा शिल्पिधनुर्धरै ॥ ५३ ॥
’काय तुमचे सर्व दुर्ग (किल्ले) धन-धान्य, अस्त्र-शस्त्र, जल, यंत्रे, शिल्पी तसेच धनुर्धर सैनिकांनी परिपूर्ण राहतात ना ? ॥ ५३ ॥
आयस्ते विपुलः कच्चित् कच्चिदल्पतरो व्ययः ।
अपात्रेषु न ते कच्चित् कोषो गच्छति राघव ॥ ५४ ॥
’रघुनंदन भरत ! काय तुमची आय अधिक आणि व्यय फारच कमी आहे का ? तुमच्या खजिन्यातील धन अपात्र व्यक्तिंच्या हातात तर निघून जात नाही ना ? ॥ ५४ ॥
देवतार्थे च पित्रर्थे ब्राह्मणाभ्यागतेषु च ।
योधेषु मित्रवर्गेषु कच्चिद् गच्छति ते व्ययः ॥ ५५ ॥
’देवता, पितर, ब्राह्मण, अभ्यागत, योद्धे आणि मित्रासाठीच तर तुमचे धन खर्च होत आहे ना ? ॥ ५५ ॥
कच्चिदार्योऽपि शुद्धात्मा क्षारितश्चापकर्मणा ।
अदृष्टः शास्त्रकुशलैर्न लोभाद् बध्यते शुचिः ॥ ५६ ॥
’कधी असे तर घडत नाही ना की, कोणी मनुष्य कुणा श्रेष्ठ, निर्दोष आणि शुद्धात्मा पुरुषावरही दोषारोप करतो आणि शास्त्रज्ञानात कुशल विद्वानांच्या द्वारे त्याच्या विषयी विचार न केला जाताच लोभवश त्याला आर्थिक दण्ड दिला जात असावा ? ॥ ५६ ॥
गृहीतश्चैव पृष्टश्च काले दृष्टः सकारणः ।
कच्चिन्न मुच्यते चोरो धनलोभान्नरर्षभ ॥ ५७ ॥
’नरश्रेष्ठ ! जो चोरीत पकडला गेला असेल, ज्याला कोणी चोरी करते समयी पाहिलेले असेल, चौकशी केल्यावर तो चोर असल्याचे प्रमाणही मिळाले असेल, तसेच ज्याच्या विरुद्ध (चोरीचा माल हस्तगत होणे आदि) आणि इतरही बर्‍याचशा कारणामुळे (पुरावा आदि) आरोप सिद्ध झाला आहे; अशा चोराला तुमच्या राज्यात धनाच्या लालचीने सोडले तर जात नाही ना ? ॥ ५७ ॥
व्यसने कच्चिदाढ्यस्य दुर्गतस्य च राघव ।
अर्थं विरागाः पश्यन्ति तवामात्या बहुश्रुताः ॥ ५८ ॥
’भरतराघव ! जरी श्रीमंत आणि गरीब यांच्यात काही विवाद निर्माण झाला आणि राज्याच्या न्यायालयात तो निर्णयासाठी आला असेल तर तुमचे बहुश्रुत मंत्री धन आदिचा लोभ सोडून त्या बाबत विचार करतात कां ? ॥ ५८ ॥
यानि मिथ्याभिशस्तानां पतन्त्यश्रूणि राघव ।
तानि पुत्रपशून् घ्नन्ति प्रीत्यर्थमनुशासतः ॥ ५९ ॥
’भरतराघव ! निरपराध असूनही ज्यांना मिथ्या दोष लावून दण्ड दिला जातो, त्या मनुष्यांच्या डोळ्यांतून जे अश्रु गळतात, ते पक्षपात पूर्वक शासन करणार्‍या राजाच्या पुत्र आणि पशूंचाही नाश करून टाकतात. ॥ ५९ ॥
कच्चिद् वृद्धांश्च बालांश्च वैद्यमुख्यांश्च राघव ।
दानेन मनसा वाचा त्रिभिरेतैर्बुभूषसे ॥ ६० ॥
’राघव ! काय तुम्ही वृद्ध पुरुष, बालके आणि प्रधान प्रधान वैद्य यांचा आंतरिक अनुराग, मधुर वचने आणि धनदान - या तिन्हीच्या द्वारा सन्मान करता ना ? ॥ ६० ॥
कच्चिद् गुरूंश्च वृद्धांश्च तापसान् देवतातिथीन् ।
चैत्यांश्च सर्वान् सिद्धार्थान् ब्राह्मणांश्च नमस्यसि ॥ ६१ ॥
’तुम्ही गुरुजन, वृद्ध, तपस्वी, देवता, अतिथी, चैत्य वृक्ष आणि समस्त पूर्णकाम ब्राह्मणांना नमस्कार करता ना ? ॥ ६१ ॥
कच्चिदर्थेन वा धर्ममर्थं धर्मेण वा पुनः ।
उभौ वा प्रीतिलोभेन कामेन न विबाधसे ॥ ६२ ॥
’तुम्ही अर्थाच्या द्वारा धर्माला अथवा धर्माच्या द्वारा अर्थाला हानि तर पोहोचवित नाही ना ? अथवा आसक्ति आणि लोभरूपी कामाच्या द्वारे धर्म आणि अर्थ दोन्हीमध्ये बाधा तर येऊ देत नाही ना ? ॥ ६२ ॥
कच्चिदर्थं च कामं च धर्मं च जयतां वर ।
विभज्य काले कालज्ञ सर्वान् वरद सेवसे ॥ ६३ ॥
’विजयी, वीरात श्रेष्ठ, समयोचित कर्तव्याचे ज्ञाता, तसेच दुसर्‍यांना वर देण्यात समर्थ भरता ! काय तुम्ही समयाचे विभाग करून धर्म, अर्थ आणि कामाचे योग्य समयी सेवन करता ना ? ॥ ६३ ॥
कच्चित् ते ब्राह्मणाः शर्म सर्वशास्त्रार्थकोविदाः ।
आशंसन्ते महाप्राज्ञ पौरजानपदैः सह ॥ ६४ ॥
’महाप्राज्ञ ! संपूर्ण शास्त्रांच्या अर्थाला जाणणारे ब्राह्मण, पुरवासी आणि जनपदवासी मनुष्यांसह तुमच्या कल्याणाची कामना करतात ना ? ॥ ६४ ॥
नास्तिक्यमनृतं क्रोधं प्रमादं दीर्घसूत्रताम् ।
अदर्शनं ज्ञानवतामालस्यं पञ्चवृत्तिताम् ॥ ६५ ॥

एकचिन्तनमर्थानामनर्थज्ञैश्च मन्त्रणम् ।
निश्चितानामनारम्भं मन्त्रस्यापरिरक्षणम् ॥ ६६ ॥

मङ्‌गलाद्यप्रयोगं च प्रत्युत्थानं च सर्वतः ।
कच्चित् त्वं वर्जयस्येतान् राजदोषांश्चतुर्दश ॥ ६७ ॥
नास्तिकता, असत्य भाषण, क्रोध, प्रमाद, दीर्घसूचीपणा, ज्ञानी पुरुषांचा संग न करणे, आलस्य, नेत्रादि पंच इंद्रियांच्या वशीभूत होणे, राजकार्याच्या विषयात एकट्यानेच विचार करणे, प्रयोजन न जाणणार्‍या विपरीतदर्शी मूर्खांकडून सल्ला घेणे, निश्चय केलेल्या कामाचा शीघ्र प्रारंभ न करणे, गुप्त मंत्रणेला सुरक्षित न राखता प्रकट करणे, मांगलिक आदि कार्यांचे अनुष्ठान न करणे, तसेच सर्व शत्रूंच्यावर एकाच वेळी चढाई करणे - हे राजाचे चौदा दोष आहेत. तुम्ही या दोषांचा सदा परित्याग करीत असता ना ? ॥ ६५-६७ ॥
दशपञ्चचतुर्वर्गान् सप्तवर्गं च तत्त्वतः ।
अष्टवर्गं त्रिवर्गं च विद्यास्तिस्रश्च राघव ॥ ६८ ॥

इंद्रियाणां जयं बुद्ध्वा षाड्गुण्यं दैवमानुषम् ।
कृत्यं विंशतिवर्गं च तथा प्रकृतिमण्डलम् ॥ ६९ ॥

यात्रादण्डविधानं च द्वियोनी संधिविग्रहौ ।
कच्चिदेतान् महाप्राज्ञ यथावदनुमन्यसे ॥ ७० ॥
’महाप्राज्ञ भरत ! दशवर्ग१, पंचवर्ग२, चतुवर्ग३, सप्तवर्ग४, अष्टवर्ग५, त्रिवर्ग६, तीन विद्या७, बुद्धिच्या द्वारा इंद्रियांना जिंकणे, सहा गुण८, दैवी९ आणि मानुषी बाधा, राजाची नीतिपूर्ण कार्ये१०, विंशतिवर्ग११, प्रकृतिमण्डल१२, यात्रा (शत्रुवर आक्रमण), दण्डविधान (व्यूहरचना) - तसेच दोन दोन१३ गुणांची योनिभूत संधि आणि विग्रह - या सर्वांकडे तुम्ही यथार्थ रूपाने ध्यान देत आहात ना ? यांपैकी त्यागण्यायोग्य दोषांना त्यागून ग्रहण करण्यायोग्य गुणांचे ग्रहण करता आहात ना ? ॥ ६८-७० ॥
-----------------------------------------------------------------
१. - कामापासून उत्पन्न होणार्‍या दोषांना दशवर्ग म्हणतात. हे राजासाठी त्याज्य आहेत. मनुने त्यांची नावे याप्रकारे गणली आहेत - शिकार, जुगार, दिवसा झोपणे, दुसर्‍याची निंदा करणे, स्त्रीमध्ये आसक्त होणे, मद्यपान, नाचणे, गाणे, वाद्य वाजविणे, आणि व्यर्थ भटकणे.
२. - जलदुर्ग, पर्वतदुर्ग, वृक्षदुर्ग, ईरिणदुर्ग आणि धन्वदुर्ग - या पाच प्रकारच्या दुर्गांना पंचवर्ग म्हणतात. यातील पहिले तीन प्रसिद्ध आहेत. जेथे कोणत्याही प्रकारची शेती होत नाही त्या प्रदेशाला ईरिण म्हणतात. वाळूनी भरलेल्या मरुभूमीस धन्व म्हणतात. उन्हाळ्यात ही शत्रूसाठी दुर्गम होत असतात. या सर्व दुर्गांचा यथासमय उपयोग करून राजाने आत्मरक्षण केले पाहिजे.
३. - साम, दान, भेद आणि दण्ड या प्रकारच्या नीतिला चतुर्वर्ग म्हणतात.
४. - राजा, मंत्री, राष्ट्र, किल्ला, खजिना, सेना आणि मित्रवर्ग - ही परस्पर उपकार करणारी राजाची सात अंगे आहेत. यांनाच सप्तवर्ग म्हटले आहे.
५. - चहाडी, साहस, द्रोह, ईर्ष्या, दोषदर्शन, अर्थ दूषण, वाणीची कठोरता, आणि दण्डाची कठोरता - हे क्रोधामुळे उत्पन्न होणारे आठ दोष अष्टवर्ग मानले गेले आहेत. काहींच्या मते - शेतीची उन्नती करणे, व्यापार वाढविणे, दुर्ग बनविणे, पूल निर्माण करणे, जंगलांतून हत्ती पकडवून मागविणे, खाणींच्यावर अधिकार प्राप्त, अधीन राजांकडून कर घेणे आणि निर्जन प्रदेशास वसविणे-सुखी करणे - हे राजासाठी उपादेय आठ गुणच अष्टवर्ग मानले आहेत.
६. - धर्म, अर्थ आणि कामाला अथवा उत्साहीशक्ति, प्रभुशक्ति आणि मंत्रशक्तिला त्रिवर्ग म्हटले आहे.
७. - त्रयी, वार्ता आणि दण्डनीति - या तीन विद्या आहेत. तीन वेदांना त्रयी म्हणतात. कृषि आणि गोरक्षण आदि वार्ताच्या अंतर्गत आहेत तसेच नीतिशास्त्राचे नाम दण्डनीति आहे.
८. - संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय - हे सहा गुण आहेत. यात शत्रुशी मैत्री करणे संधि, त्याच्याशी लढाईला आरंभ करणे विग्रह, आक्रमण करणे यान, योग्य समयाची प्रतीक्षा करीत बसून रहणे आसन, दुरंगी नीति आचरणे द्वैधीभाव आणि आपल्यापेक्षा बलवान् राजाला शरण जाणे समाश्रय म्हटले आहे.
९. - आग लागणे, पूर येणे, रोग फैलावणे, दुष्काळ पडणे आणि महामारीचा प्रकोप होणे या पाच दैवी बाधा आहेत. राज्याचे अधिकारी, चोर, शत्रु, राज्याच्या प्रिय व्यक्ति तसेच राजापासून लोभाने जे भय प्रप्त होते त्यास मानवी बाधा म्हणतात.
१०. - शत्रु राजाच्या सेवकांपैकी ज्यांना वेतन मिळाले नसेल, जे अपमानित केले गेले असतील, जे आपल्या मालकाच्या कुठल्यातरी वर्तनाने रागावलेले असतील, तसेच ज्यांना भय दाखवून घाबरविले गेले असेल अशा लोकांना त्यांना हवी असेल ती वस्तु देऊन फोडणे राजाचे कृत्य (नीतिपूर्ण कार्य) मानले गेले आहे.
११. - बालक, वृद्ध, दीर्घकाळचा रोगी, जातिच्युत, भित्रा, घाबरट मनुष्याला बरोबर बाळगणारा, लोभी-लालची लोकांना आश्रय देणारा, मंत्री, सेनापति आणि प्रकृति यांना असंतुष्ट ठेवणारा, विषयात आसक्त, चंचलचित्त मनुष्यांकडून सल्ला घेणारा, देवता आणि ब्राह्मण यांची निंदा करणारा, दुर्भिक्षाने पीडित, कष्टी सैनिक युक्त (सेनारहित), स्वदेशात न राहणारा, अधिक शत्रु असणारा, अकाल (क्रूर ग्रहदशा आदिने युक्त) आणि सत्यधर्मरहित - हे वीस प्रकारचे राजे संधि करण्यास योग्य मानले गेलेले नाहीत. यांनाच विंशति वर्गाच्या नामाने ओळखतात.
१२. - राज्यांचे स्वामी, अमात्य, सुहृद, कोष, राष्ट्र, दुर्ग आणि सेना - राज्याच्या या सात अंगानाच प्रकृतिमण्डल म्हणतात. काहींच्या मते मंत्री, राष्ट्र, किल्ला, खजिना आणि दण्ड - या पाच प्रकृति अलग आहेत आणि बारा राजांच्या समूहाला मण्डल म्हटले आहे.
१३. - द्वैधीभाव आणि समाश्रय - ही यांची योनिसंधि आहे आणि यान तसेच आसन यांचा योनिविग्रह आहे. अर्थात् पहिली दोन संधिमूलक आणि अंतिम दोन विग्रहमूलक आहेत. ]
मन्त्रिभिस्त्वं यथोद्दिष्टं चतुर्भिस्त्रिभिरेव वा ।
कच्चित् समस्तैर्व्यस्तैश्च मन्त्रं मन्त्रयसे बुध ॥ ७१ ॥
’विद्वन् ! काय तुम्ही नीतिशास्त्राच्या आज्ञेनुसार चार किंवा तीन मंत्र्यांच्या बरोबर - सर्वांना एकत्र करून अथवा सर्वांना वेगवेगळे भेटून सल्ला मसलत करता ना ? ॥ ७१ ॥
कच्चित् ते सफला वेदाः कच्चित् ते सफलाः क्रियाः ।
कच्चित् ते सफला दाराः कच्चित् ते सफलं श्रुतम् ॥ ७२ ॥
’काय तुम्ही वेदांच्या आज्ञेनुसार काम करून त्यांना सफल करता ना ? काय तुमच्या क्रिया सफल उद्देशाची सिद्धी करणार्‍या आहेत ना ? काय तुमच्या स्त्रियाही सफल (संतानवती) आहेत ना ? आणि काय तुमचे शास्त्रज्ञान विनय आदि गुणांचे उत्पादक होऊन सफल झाले आहे ना ? ॥ ७२ ॥
कच्चिदेषैव ते बुद्धिर्यथोक्ता मम राघव ।
आयुष्या च यशस्या च धर्मकामार्थसंहिता ॥ ७३ ॥
राघव भरत ! मी जे काही सांगितले आहे, तुमच्या बुद्धिचाही असाच निश्चय आहे ना ? कारण की हा विचार आयुष्य आणि यश यांना वाढविणारा आणि धर्म, काम आणि अर्थाची सिद्धी करणारा आहे. ॥ ७३ ॥
यां वृत्तिं वर्तते तातो यां च नः प्रपितामहाः ।
तां वृत्तिं वर्तसे कच्चिद् या च सत्पथगा शुभा ॥ ७४ ॥
’आपले वडिल ज्या वृत्तिचा आश्रय घेत असत, आपल्याला प्रपितामहांनी ज्या आचरणाचे पालन केले आहे, सत्पुरुषही ज्याचे सेवन करतात आणि जे कल्याणाचे मूळ आहे, त्याचेच तुम्ही पालन करता आहात ना ? ॥ ७४ ॥
कच्चित् स्वादुकृतं भोज्यमेको नाश्नासि राघव ।
कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यः सम्प्रयच्छसि ॥ ७५ ॥
’राघव भरत ! स्वादिष्ट अन्न तुम्ही एकटेच खात नाही ना ? त्याची आशा ठेवणार्‍या मित्रांनाही देत असता ना ? ॥ ७५ ॥
राजा तु धर्मेण हि पालयित्वा
     महामतिर्दण्डधरः प्रजानाम् ।
अवाप्य कृत्स्नां वसुधां यथाव-
     दितश्च्युतः स्वर्गमुपैति विद्वान् ॥ ७६ ॥
’या प्रकारे धर्मानुसार दण्ड धारण करणारा विद्वान राजा प्रजांचे पालन करून संपूर्ण पृथ्वीला यथावत् रूपाने आपल्या अधिकारात करून घेतो; तसेच देहत्याग केल्यानंतर स्वर्गात जातो. ॥ ७६ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे शततमः सर्गः ॥ १०० ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा शंभरावा सर्ग पूरा झाला ॥ १०० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP