श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टात्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण जनम युधाजित् प्रभृतीनां भूपानां स्वदेशे प्रस्थापनम् -
श्रीरामांच्या द्वारा राजा जनक, युधाजित्‌, प्रतर्दन तसेच अन्य नरेशांना निरोप -
एवमास्ते महाबाहुः अहन्यहनि राघवः ।
प्रशासत् सर्वकार्याणि पौरजानपदेषु च ॥ १ ॥
महाबाहु राघव याप्रकारे प्रतिदिन राजसभेत बसून पुरवासी आणि जनपदवासी लोकांच्या सार्‍या कार्यांवर देखरेख करीत शासनाचे कार्य चालवीत होते. ॥१॥
ततः कतिपयाहःसु वैदेहं मिथिलाधिपम् ।
राघवः प्राञ्जलिर्भूत्वा वाक्यमेतदुवाच ह ॥ २ ॥
त्यानंतर काही दिवस गेल्यावर राघवांनी मिथिलानरेश विदेहराज जनकांना हात जोडून याप्रमाणे म्हटले - ॥२॥
भवान्हि गतिरव्यग्रा भवता पालिता वयम् ।
भवतस्तेजसोग्रेण रावणो निहतो मया ॥ ३ ॥
महाराज ! आपणच आमचा सुस्थिर आश्रय आहात. आपण सदा आम्हा लोकांचे लालन-पालन केले आहे. आपल्याच वाढलेल्या तेजामुळे मी रावणाचा वध केला आहे. ॥३॥
इक्ष्वाकूणां च सर्वेषां मैथिलानां च सर्वशः ।
अतुलाः प्रीतयो राजन् संबंधकपुरोगमाः ॥ ४ ॥
राजन्‌ ! समस्त इक्ष्वाकुवंशी आणि मैथिल नरेशांमध्ये आपसातील संबंधामुळे सर्व प्रकारे जे प्रेम वाढलेले आहे, त्याची कोठे तुलना होऊ शकत नाही. ॥४॥
तद् भवान् स्वपुरं यातु रत्‍नामन्यादाय पार्थिव ।
भरतश्च सहायार्थं पृष्ठतस्तेऽनुयास्यति ॥ ५ ॥
पृथ्वीनाथ ! आता आपण आमच्या द्वारे भेट केली गेलेली रत्‍ने (आदि) घेऊन आपल्या राजधानीला चलावे. भरत (तसेच त्याच्या बरोबरच शत्रुघ्नही) आपल्या सहायतेसाठी आपल्या मागोमाग जातील. ॥५॥
स तथेति ततः कृत्वा राघवं वाक्यमब्रवीत् ।
प्रीतोऽस्मि भवतो राजन् दर्शनेन नयेन च ॥ ६ ॥
तेव्हा जनकांनी ’फार चांगले’ म्हणून राघवांना म्हटले -राजन्‌ ! मी आपले दर्शन आणि न्यायानुसार व्यवहाराने फार प्रसन्न आहे. ॥६॥
यान्येतानि तु रत्‍नाानि मदर्थं सञ्चितानि वै ।
दुहित्रे तानि वै राजन् सर्वाण्येव ददामि च ॥ ७ ॥
आपण माझ्यासाठी जी रत्‍न एकत्रित केली आहेत ती सर्व मी सीता आदि मुलींना देत आहे. ॥७॥
एवमुक्त्वा तु काकुत्स्थं जनको हृष्टमानसः ।
प्रययौ मिथिलां श्रीमान् तमनुज्ञाय राघवम् ॥ ८ ॥
राघवांना असे म्हणून श्रीमान्‌ राजा जनक प्रसन्नचित्त होऊन काकुत्स्थ रामांची अनुमति घेऊन मिथिलापुरीला निघून गेले. ॥८॥
ततः प्रयाते जनके केकयं मातुलं प्रभुः ।
राघवः प्राञ्जलिर्भूत्वा विनयात् वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥
जनक निघून गेल्यावर राघवांनी हात जोडून आपले मामा केकय-नरेश युधाजितांना - जे अत्यंत सामर्थ्यशाली होते, विनयपूर्वक म्हटले - ॥९॥
इदं राज्यमहं चैव भरतश्च सलक्ष्मणः ।
आयत्तास्त्वं हि नो राजन् गतिश्च पुरुषर्षभ ॥ १० ॥
राजन्‌ ! पुरुषप्रवर ! हे राज्य, मी, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न - सर्व आपल्या अधीन आहोत. आपणच आमचे आश्रय आहात. ॥१०॥
राजा हि वृद्धः सन्तापं त्वदर्थमुपयास्यति ।
तस्माद्‌ गमनमद्यैव रोचते तव पार्थिव ॥ ११ ॥
महाराज केकयराज वृद्ध आहेत. ते आपल्यासाठी फार चिंतित झाले असतील. म्हणून पृथ्वीनाथ ! आपले आजच जाणे मला ठीक वाटत आहे. ॥११॥
लक्ष्मणेनानुयात्रेण पृष्ठतोऽनुगमिष्यते ।
धनमादाय बहुलं रत्‍नाौनि विविधानि च ॥ १२ ॥
आपण बरेचसे धन तसेच नाना प्रकारची रत्‍ने घेऊन चलावे. मार्गात सहायतेसाठी लक्ष्मण आपल्या बरोबर जातील. ॥१२॥
युधाजित् तु तथेत्याह गमनं प्रति राघव ।
रत्‍नातनि च धनं चैव त्वय्येवाक्षय्यमस्त्विति ॥ १३ ॥
तेव्हा युधाजिताने तथास्तु म्हणून राघवांचे म्हणणे मान्य केले आणि म्हटले -राघवा ! ही रत्‍ने आणि धन सर्व तुमच्याच जवळ अक्षय रूपाने राहो. ॥१३॥
प्रदक्षिणं च राजानं कृत्वा केकयवर्धनः ।
रामेण हि कृतः पूर्वं अभिवाद्य प्रदक्षिणम् ॥ १४ ॥
नंतर प्रथम रामांनी प्रणामपूर्वक आपल्या मामांची परिक्रमा केली आणि त्यानंतर केकयकुलाची वृद्धि करणार्‍या राजकुमार युधाजितानीही राजा रामांची प्रदक्षिणा केली. ॥१४॥
लक्ष्मणेन सहायेन प्रयातः केकयेश्वरः ।
हतेऽसुरे यथा वृत्रे विष्णुना सह वासवः ॥ १५ ॥
तानंतर केकयराजाने जशी वृत्रासुर मारला गेल्यावर इंद्रांनी भगवान्‌ विष्णुंच्या बरोबर अमरावतीची यात्रा केली होती त्याच प्रकारे लक्ष्मणासह आपल्या देशाला प्रस्थान केले. ॥१५॥
तं विसृज्य ततो रामो वयस्यमकुतोभयम् ।
प्रतर्दनं काशिपतिं परिष्वज्येदमब्रवीत् ॥ १६ ॥
मामांना निरोप दिल्यावर रामांनी, कुणाचेही भय न बाळगणारा आपला मित्र काशिराज प्रतर्दन यास हृदयाशी धरून म्हटले - ॥१६॥
दर्शिता भवता प्रीतिः दर्शितं सौहृदं परम् ।
उद्योगश्च त्वया राजन् भरतेन कृतः सह ॥ १७ ॥
राजन्‌ ! आपण राज्याभिषेकाच्या कार्यात भरतासह पूर्ण उद्योग केला आहे आणि असे करून आपल्या महान्‌ प्रेमाचा तसेच परम सौहार्दाचा परिचय करून दिला आहे. ॥१७॥
तद् भवानद्य काशेय पुरीं वाराणसीं व्रज ।
रमणीयां त्वया गुप्तां सुप्रकाशां सुतोरणाम् ॥ १८ ॥
काशिराज ! आता आपण सुंदर तटबंदी तसेच मनोहर तोरणांनी सुशोभित आणि आपल्याच द्वारा सुरक्षित रमणीय पुरी वाराणसीला चलावे. ॥१८॥
एतावदुक्त्वा चोत्थाय काकुत्स्थः परमासनात् ।
पर्यष्वजत धर्मात्मा निरन्तरमुरोगतम् ॥ १९ ॥
असे म्हणून धर्मात्मा श्रीरामांनी पुन्हा आपल्या उत्तम आसनावरून उठून प्रतर्दनाला हृदयाशी धरून त्याला गाढ आलिंगन दिले. ॥१९॥
विसर्जयामास तदा कौसल्यानन्दवर्धनः ।
राघवेण कृतानुज्ञः काशेयो ह्यकुतोभयः ॥ २० ॥

वाराणसीं ययौ तूर्णं राघवेण विसर्जितः ।
याप्रकारे कौसल्येचा आनंद वाढविणार्‍या राघवांनी त्या समयी काशिराजाला निरोप दिला. राघवांची अनुमति घेऊन त्यांचा निरोप घेऊन निर्भय काशिराज तात्काळ वाराणसीपुरीकडे निघून गेले. ॥२० १/२॥
विसृज्य तं काशिपतिं त्रिशतं पृथिवीपतीन् ॥ २१ ॥

प्रहसन् राघवो वाक्यं उवाच मधुराक्षरम् ।
काशिराजांना निरोप देऊन राघवांनी हसत हसत अन्य तीनशे भूपालांना मधुर वाणीने म्हटले - ॥२१ १/२॥
भवतां प्रीतिरव्यग्रा तेजसा परिरक्षिता ॥ २२ ॥

धर्मश्च नियतो नित्यं सत्यं च भवतां सदा ।
माझ्यावर आपणा सर्वांचे अविचल प्रेम आहे ज्याचे रक्षण आपण आपल्याच तेजाने केले आहे. आपल्या ठिकाणी सत्य आणि धर्म नियतरूपाने नित्य-निरंतर निवास करीत आहेत. ॥२२ १/२॥
युष्माकं चानुभावेन तेजसा च महात्मनाम् ॥ २३ ॥

हतो दुरात्मा दुर्बुद्धी रावणो राक्षसाधमः ।
आपणा महापुरूषांच्या प्रभाव आणि तेजानेच माझ्या द्वारे दुर्बुद्धि दुरात्मा राक्षसाधम रावण मारला गेला आहे. ॥२३ १/२॥
हेतुमात्रमहं तत्र भवतां तेजसा हतः ॥ २४ ॥

रावणः सगणो युद्धे सपुत्रामात्यबान्धवः ।
मी तर त्याच्या वधामध्ये निमित्तमात्र बनलो आहे. वास्तविक तर आपणा लोकांच्या तेजानेच पुत्र, मंत्री, बंधु-बांधव तसेच सेवकगणांसहित रावण युद्धात मारला गेला आहे. ॥२४ १/२॥
भवन्तश्च समानीता भरतेन महात्मना ॥ २५ ॥

श्रुत्वा जनकराजस्य काननात्तनयां हृताम् ।
वनातून जनकराजनंदिनी सीतेच्या अपहरणाचा समाचार ऐकून महात्मा भरतांनी आपणा सर्वांना येथे बोलावले होते. ॥२५ १/२॥
उद्युक्तानां च सर्वेषां पार्थिवानां महात्मनाम् ॥ २६ ॥

कालो व्यतीतः सुमहान् गमनं रोचयाम्यतः ।
आपण सर्व महामना भूपाल राक्षसांवर आक्रमण करण्यासाठी उद्योगशील होतात. तेव्हापासून आजपर्यंत येथे आपला बराच समय व्यतीत झाला आहे. म्हणून आता मला आपले सर्वांचे आपल्या नगराला परत जाणेच उचित वाटत आहे. ॥२६ १/२।
प्रत्यूचुस्तं च राजानो हर्षेण महता वृताः ॥ २७ ॥

दिष्ट्यां त्वं विजयी राम स्वराज्येऽपि प्रतिष्ठितः ।
यावर राजांनी अत्यंत हर्षाने भरून म्हटले -रामा ! आपण विजयी झालात आणि आपल्या राज्यावर प्रतिष्ठित झाला आहात, ही अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२७ १/२॥
दिष्ट्या प्रत्याहृता सीता दिष्ट्या शत्रुः पराजितः ॥ २८ ॥

एष नः परमः काम एषा नः पीतिरुत्तमा ।
यत् त्वां विजयिनं राम पश्यामो हतशात्रवम् ॥ २९ ॥
आमच्या सौभाग्यानेच आपण सीतेला परत आणलेत आणि त्या प्रबल शत्रुला परास्त केलेत. रामा ! हाच आमचा सर्वात मोठा मनोरथ आहे आणि हीच आमच्यासाठी सर्वात वरचढ प्रसन्नतेची गोष्ट आहे की आज आम्ही लोक आपल्याला विजयी झालेले पहात आहो तसेच आपली शत्रु-मंडळी मारली गेलेली आहेत. ॥२८-२९॥
एतत् त्वय्युपपन्नं च यदस्मांस्त्वं प्रशंससे ।
प्रशंसार्ह न जानीमः प्रशंसां वक्तुमीदृशीम् ॥ ३० ॥
प्रशंसनीय श्रीरामा ! आपण जी आम्हा लोकांची प्रशंसा करत आहात ही आपल्या योग्यच आहे. आम्ही अशी प्रशंसा करण्याची कला जाणत नाही. ॥३०॥
आपृच्छामो गमिष्यामो हृदिस्थो नः सदा भवान् ।
वर्तामहे महाबाहो प्रीत्यात्र महता वृताः ॥ ३१ ॥

भवेच्च ते महाराज प्रीतिरस्मासु नित्यदा ।
बाढमित्येव राजानो हर्षेण परमान्विताः ॥ ३२ ॥
आता आम्ही सर्व आपली आज्ञा इच्छित आहो, आपल्या पुरीला जाऊ. ज्याप्रकारे आपण सदा आमच्या हृदयात विराजमान राहाता त्याचप्रकारे हे महाबाहो ! ज्यायोगे आम्ही आपल्या प्रति प्रेमाने युक्त राहून आपल्या हृदयात निवास करू अशी प्रीति आपली आम्हांवर सदा टिकून राहावयास पाहिजे. तेव्हा श्रीरघुनाथांनी हर्षाने भरलेल्या त्या राजांना म्हटले -अवश्य असेच होईल. ॥३१-३२॥
उचुः प्राञ्जलयः सर्वे राघवं गमनोत्सुकाः ।
पूजिताश्चैव रामेण जग्मुर्देशान् स्वकान् स्वकान् ॥ ३३ ॥
त्यानंतर जाण्यासाठी उत्सुक होऊन सर्वांनी हात जोडून राघवांना म्हटले -भगवन्‌ ! आता आम्ही निघत आहो. याप्रकारे श्रीरामांकडून सन्मानित होऊन ते सर्वच्या सर्व राजे आपापल्या देशास निघून गेले. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP