[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्विषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दुःखितेन राज्ञा साञ्जलिबन्धं कौसल्यायाः प्रसादनं कौसल्याया तस्य पादयोः प्रणिपत्य क्षमाप्रार्थनम् -
दुःखी झालेल्या राजा दशरथांनी कौसल्येची हात जोडून मनधरणी करणे आणि कौसल्येने त्यांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागणे -
एवं तु क्रुद्धया राजा राममात्रा सशोकया ।
श्रावितः परुषं वाक्यं चिन्तयामास दुःखितः ॥ १ ॥
शोकमग्न होऊन कुपित झालेल्या राममाता कौसल्येने जेव्हा दशरथ राजांना या प्रकारे कठोर वचन ऐकविले, तेव्हां ते दुःखी होऊन फार चिंतेत पडले. ॥१॥
चिंतयित्वा स च नृपो मोह व्याकुलितेन्द्रियः ।
अथ दीर्घेण कालेन संज्ञामाप परंतपः ॥ २ ॥
चिंतित झाल्याने राजांची सर्व इंद्रिये मोहाने व्याप्त झाली. त्यानंतर दीर्घ काळानंतर, शत्रूंना संताप देणार्‍या दशरथ राजांना शुद्ध आली. ॥२॥
स संज्ञामुपलभ्यैव दीर्घमुष्णं च निःश्वसन् ।
कौसल्यां पार्श्वतो दृष्ट्‍वा ततश्चिन्तामुपागमत् ॥ ३ ॥
शुद्धिवर आल्यावर त्यांनी उष्ण दीर्घ श्वास घेतला आणि कौसल्येला शेजारीच बसलेली पाहून ते परत चिंतेत पडले. ॥३॥
तस्य चिन्तयमानस्य प्रत्यभात् कर्म दुष्कृतम् ।
यदनेन कृतं पूर्वमज्ञानाच्छब्दवेधिना ॥ ४ ॥
चिंतेत पडल्या पडल्याच त्यांना पूर्वी अजाणता घडलेल्या या शब्दवेधी नरेशाकडून घडलेल्या आपल्या एका दुष्कर्माचे स्मरण झाले. ॥४॥
अमनास्तेन शोकेन रामशोकेन च प्रभुः ।
द्वाभ्यामपि महाराजः शोकाभ्यामभितप्यते ॥ ५ ॥
त्या शोकाने आणि रामाच्या शोकाने राजांच्या मनात अत्यंत वेदना झाली. त्या दोन्ही शोकांमुळे महाराज संतप्त होऊ लागले. ॥५॥
दह्यमानस्तु शोकाभ्यां कौसल्यामाह दुःखितः ।
वेपमानोऽञ्जलिं कृत्वा प्रसादार्थमवाङ्‌मुखः ॥ ६ ॥
या दोन्ही शोकांनी दग्ध झाल्याने दुःखी दशरथ राजे खाली तोंड करून (खाली मान घालून) थरथर कापू लागले आणि कौसल्येला प्रसन्न करण्यासाठी हात जोडून म्हणाले- ॥६॥
प्रसादये त्वां कौसल्ये रचितोऽयं मयाञ्जलिः ।
वत्सला चानृशंसा च त्वं हि नित्यं परेष्वपि ॥ ७ ॥
’कौसल्ये ! मी तुला विनंति करीत आहे की तू प्रसन्न हो. हे पहा, मी हे दोन्ही हात जोडले आहेत. तू तर सदा दुसर्‍यांच्या प्रति वात्सल्य आणि दया दाखविणारी आहेस (मग माझ्याप्रति का बरे कठोर झाली आहेस ?) ॥७॥
भर्त्ता तु खलु नारीणां गुणवान् निर्गुणोपि वा ।
धर्मं विमृशमानानां प्रत्यक्षं देवि दैवतम् ॥ ८ ॥
’देवी ! पति गुणवान असो अथवा गुणहीन, धर्माचा विकार करणार्‍या सती स्त्रियांसाठी तो प्रत्यक्ष देवच आहे. ॥८॥
सा त्वं धर्मपरा नित्यं दृष्टलोकपरावरा ।
नार्हसे विप्रियं वक्तुं दुःखितापि सुदुःखितम् ॥ ९ ॥
’तू तर सदा धर्मात तत्पर राहाणारी आणि लोकात चांगल्या वाईटची जाण असणारी आहेस. जरी तूही दुःखी आहेस तरी मीही महान दुःखात पडालेलो आहे, म्हणून तू मला कठोर वचन बोलून माझे दुःख आणखी वाढवू नको.’ ॥९॥
तद् वाक्यं करुणं राज्ञः श्रुत्वा दीनस्य भाषितम् ।
कौसल्या व्यसृजद् बाष्पं प्रणालीव नवोदकम् ॥ १० ॥
’दुःखी झालेल्या दशरथ राजांच्या मुखाने बोलली गेलेली ही करुणाजनक वचने ऐकून कौसल्या आपल्या डोळ्यातून अश्रु ढाळू लागली. जणु काही छताच्या पागोळीतून नवीन (पाऊसाचे) पाणि गळत असावे त्याप्रमाणे. ॥१०॥
सा मूर्ध्नि बध्वा रुदती राज्ञः पद्ममिवाञ्जलिम् ।
संभ्रमादब्रवीत् त्रस्ता त्वरमाणाक्षरं वचः ॥ ११ ॥
ती अधर्माच्या भयाने रडू लागली आणि राजांचे जोडलेले कमलसदृश हातांना आपल्या मस्तकास भिडवून घाबरून अत्यंत त्वरेने एक - एक अक्षर उच्चारत म्हणाली- ॥११॥
प्रसीद शिरसा याचे भूमौ निपतितास्मि ते ।
याचितास्मि हता देव क्षन्तव्याहं नहि त्वया ॥ १२ ॥
’देव ! मी आपल्या समोर पृथ्वीवर पडलेली आहे, आपल्या चरणांवर मस्तक ठेवून मी याचना करीत आहे की आपण प्रसन्न व्हा. जर आपणच उलट माझ्याकडे याचना केलीत तर मी मारलीच गेले. माझ्याकडून अपराध झाला असेल तरीही मी आपल्याकडून क्षमा मिळण्यासच पात्र आहे, प्रहार (आघात) मिळण्यास योग्य नाही. ॥१२॥
नैषा हि सा स्त्री भवति श्लाघनीयेन धीमता ।
उभयोर्लोकयोर्लोके पत्या या सम्प्रसाद्यते ॥ १३ ॥
’पती आपल्या स्त्री साठी इहलोक आणि परलोकातही स्पृहणीय आहे. या जगात ज्या स्त्रीची आपल्या बुद्धिमान पतीकडून मनधरणी केली जाते ती कुलस्त्री म्हणवून घेण्यास पात्र नाही. ॥१३॥
जानामि धर्मं धर्मज्ञ त्वां जाने सत्यवादिनम् ।
पुत्रशोकार्तया तत्तु मया किमपि भाषितम् ॥ १४ ॥
’धर्मज्ञ महाराज ! मी स्त्री-धर्म जाणते आणि हे ही जाणते की आपण सत्यवादी आहात. या समयी मी जे काही बोलू नये ते बोलले ते पुत्रशोकाने पीडित होण्यामुळे माझ्या मुखांतून निघून गेले आहे. ॥१४॥
शोको नाशयते धैर्यं शोको नाशयते श्रुतम् ।
शोको नाशयते सर्वं नास्ति शोकसमो रिपुः ॥ १५ ॥
’शोक धैर्याचा नाश करून टाकतो. शोक शास्त्रज्ञानाला ही नाहीसे करून टाकतो तसेच शोक सर्व काही नष्ट करून टाकतो म्हणून शोकासारखा दुसरा शत्रू कोणी नाही. ॥१५॥
शक्यमापतितः सोढुं प्रहारो रिपुहस्ततः ।
सोढुमापतितः शोकः सुसूक्ष्मोऽपि न शक्यते ॥ १६ ॥
’शत्रूच्या हातांनी आपल्यावर झालेला शस्त्राचा प्रहार सहन करणे शक्य असते परंतु दैववश प्राप्त झालेला थोडासा ही शोक सहन होत नाही. ॥१६॥
वनवासाय रामस्य पञ्चरात्रोऽत्र गण्यते ।
यः शोकहतहर्षायाः पञ्चवर्षोपमो मम ॥ १७ ॥
’श्रीरामाला वनात जाऊन आज पाच रात्री गेल्या. मी त्याच मोजत राहिले आहे. शोकाने माझ्या आनंदास नष्ट केले आहे म्हणून या पाच रात्री माझ्यासाठी पाच वर्षाप्रमाणे प्रतीत झाल्या आहेत. ॥१७॥
तं हि चिन्तयमानायाः शोकोऽयं हृदि वर्धते ।
नदीनामिव वेगेन समुद्रसलिलं महत् ॥ १८ ॥
’ज्याप्रमाणे नद्यांच्या वेगाने समुद्राचे पाणी फार वाढते त्याप्रमाणे श्रीरामाचेच चिंतन करण्यामुळे माझ्या हृदयांतील शोक वाढत आहे.’ ॥१८॥
एवं हि कथयन्त्यास्तु कौसल्यायाः शुभं वचः ।
मन्दरश्मिरभूत् सूर्यो रजनी चाभ्यवर्तत ॥ १९ ॥

तथा प्रह्लादितो वाक्यैर्देव्या कौसल्यया नृपः ।
शोकेन च समाक्रान्तो निद्राया वशमेयिवान् ॥ २० ॥
कौसल्या या प्रमाणे शुभ वचन बोलतच होती की तोच सूर्याचे किरण मंदावले आणि रात्रिचा समय येऊन ठेपला. देवी कौसल्येच्या या बोलण्याने राजांना खूप प्रसन्नता वाटली. त्याच बरोबर श्रीरामांच्या शोकानेही ते पीडित होते. अशा हर्ष आणि शोकाच्या अवस्थेतच त्यांना झोप लागली. ॥१९-२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा बासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP