श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षट्षष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रं रामलक्ष्मणौ च सत्कृत्य जनकेन तान् प्रति स्वगृहे स्थापितस्य दिव्यधनुषः परिचयदानं श्रीरामश्चेद् धनुरारोपयेत्तदेतस्मै सीतां दद्यामिति स्वनिश्चयस्य प्रकटनं च - राजा जनकांनी विश्वामित्र आणि राम लक्षमणांचा सत्कार करून त्यांना आपल्या येथे ठेवलेल्या धनुष्याचा परिचय करून देणे, आणि धनुष्य चढविले गेल्यावर श्रीरामांबरोबर सीतेच्या विवाहाचा निश्चय प्रकट करणे -
ततः प्रभाते विमले कृतकर्मा नराधिपः ।
विश्वामित्रं महात्मानमाजुहाव सराघवम् ॥ १ ॥

तमर्चयित्वा धर्मात्मा शास्त्रदृष्टेन कर्मणा ।
राघवौ च महात्मानौ तदा वाक्यमुवाच ह ॥ २ ॥
त्यानंतर दुसर्‍या दिवशी निर्मल प्रभातकाल आल्यावर धर्मात्मा राजा जनकांनी आपला नित्य-नियम पूरा करून राघव आणि लक्ष्मणासहित महात्मा विश्वामित्रांना बोलावले आणि शास्त्रीय विधिस अनुसरून मुनि तसेच त्या दोघा महामनस्वी राजकुमारांचे पूजन करून या प्रकारे म्हटले - ॥ १-२ ॥
भगवन् स्वागतं तेऽस्तु किं करोमि तवानघ ।
भवान् आज्ञापयतु मामाज्ञाप्यो भवता ह्यहम् ॥ ३ ॥
'भगवन् ! आपले स्वागत असो. निष्पाप महर्षे ! आपण मला आज्ञा द्यावी. मी आपली काय सेवा करूं ? कारण मी आपला आज्ञापालक सेवक आहे.' ॥ ३ ॥
एवमुक्तः स धर्मात्मा जनकेन महात्मना ।
प्रत्युवाच मुनिश्रेष्ठो वाक्यं वाक्यविशारदः ॥ ४ ॥
महात्मा जनकाने असे म्हटल्यावर बोलण्यात कुशल धर्मात्मा मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी त्यांना असे म्हटले - ॥ ४ ॥
पुत्रौ दशरथस्येमौ क्षत्रियौ लोकविश्रुतौ ।
द्रष्टुकामौ धनुःश्रेष्ठं यदेतत्त्वयि तिष्ठति ॥ ५ ॥
'महाराज् ! राजा दशरथांचे हे दोन्ही पुत्र विश्वविख्यात क्षत्रिय वीर आहेत; आणि आपल्या येथे जे श्रेष्ठ धनुष्य ठेवलेले आहे त्यास पाहण्याची इच्छा बाळगून आहेत. ॥ ५ ॥
एतद् दर्शय भद्रं ते कृतकामौ नृपात्मजौ ।
दर्शनादस्य धनुषो यथेष्टं प्रतियास्यतः ॥ ६ ॥
'आपले कल्याण होवो ! ते धनुष्य यांना दाखवावे. त्यायोगे यांची इच्छा पूर्ण होईल. नंतर हे दोन्ही राजकुमार त्या धनुष्याच्या दर्शनमात्रें संतुष्ठ होऊन इच्छेनुसार आपल्या राजधानीस परत जातील. ॥ ६ ॥
एवमुक्तस्तु जनकः प्रत्युवाच महामुनिम् ।
श्रूयतामस्य धनुषो यदर्थमिह तिष्ठति ॥ ७ ॥
मुनिंनी असे म्हटल्यावर राजा जनक महामुनि विश्वामित्रांना म्हणाले - 'मुनिवर ! या धनुष्याचा वृत्तांत ऐकावा. ज्या उद्देशाने हे धनुष्य येथे ठेवले गेले आहे, ते सर्व सांगतो. ॥ ७ ॥
देवरात इति ख्यातो निमेर्ज्येष्ठो महीपतिः ।
न्यासोऽयं तस्य भगवन् हस्ते दत्तो महात्मनः ॥ ८ ॥
'भगवन् ! निमिचे ज्येष्ठ पुत्र राजा देवरात या नावाने विख्यात होते. त्या महात्म्याकडे हे धनुष्य ठेव म्हणून त्यांच्याकडे दिले गेले होते. ॥ ८ ॥
दक्षयज्ञवधे पूर्वं धनुरायम्य वीर्यवान् ।
विध्वंस्य त्रिदशान् रोषात् सलीलमिदमब्रवीत् ॥ ९ ॥

यस्माद् भागार्थिनो भागं नाकल्पयत मे सुराः ।
वराङ्‍गानि महार्हाणि धनुषा शातयामि वः ॥ १० ॥
असे म्हणतात की पूर्वकाली दक्षयज्ञ विध्वंसाच्या वेळी परम पराक्रमी भगवान् शंकरांनी सहज क्रीडा म्हणून रोषपूर्वक हे धनुष्य उचलून यज्ञ विध्वंसानंतर देवतांना सांगितले - "देवगणांनो ! मी यज्ञात भाग प्राप्त करू इच्छित होतो, परंतु तुम्ही लोकांनी तो दिला नाही. म्हणून या धनुष्याने मी तुमचे सर्वांचे पूजनीय श्रेष्ठ अंग, मस्तक छाटून टाकीन.' ॥ ९-१० ॥
ततो विमनसः सर्वे देवा वै मुनिपुङ्‍गव ।
प्रसादयन्त देवेशं तेषां प्रीतोऽभवद् भवः ॥ ११ ॥
'मुनिश्रेष्ठ ! हे ऐकून सर्व देवता उदास झाल्या आणि स्तुतिच्या द्वारे देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करू लागला. शेवटी त्यांच्यावर भगवान् शिव प्रसन्न झाले. ॥ ११ ॥
प्रीतियुक्तस्तु सर्वेषां ददौ तेषां महात्मनाम् ।
तदेतद् देवदेवस्य धनूरत्‍नं महात्मनः ॥ १२ ॥

न्यासभूतं तदा न्यस्तमस्माकं पूर्वजे विभौ ।
प्रसन्न होऊन त्यांनी त्या सर्व महामनस्वी देवातांना हे धनुष्य अर्पण करून टाकले. तेच हे देवाधिदेव महात्मा भगवान् शंकरांचे धनुष्य रत्‍न आहे जे माझे पूर्वज महाराज देवरात यांच्याजवळ ठेवीच्या स्वरूपात ठेवले गेले होते. ॥ १२ १/२ ॥
अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्‍गलादुत्थिता ततः ॥ १३ ॥

क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता ।
भूतलादुत्थिता सा तु व्यवर्धत ममात्मजा ॥ १४ ॥
एकदा मी यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालवत होतो. त्याच समयी नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले. पृथ्वीतून प्रकट झाल्यामुळे ती माझी कन्या क्रमशः मोठी होऊन शहाणी झाली. ॥ १३-१४ ॥
वीर्यशुल्केति मे कन्या स्थापितेयमयोनिजा ।
भूतलादुत्थितां तां तु वर्धमानां ममात्मजाम् ॥ १५ ॥

वरयामासुरागम्य राजानो मुनिपुङ्‍गव ।
आपल्या या अयोनिजा कन्येविषयी मी असा निश्चय केला की जो आपल्या पराक्रमाने हे धनुष्य चढवील, त्याच्याशी मी तिचा विवाह करीन. या प्रमाणे हिला वीर्यशुक्ला (पराक्रम रूपी शुक्ल असणारी) बनवून आपल्या घरात ठेवली आहे. मुनिश्रेष्ठा ! भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या माझ्या कन्येला - सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली. ॥ १५ १/२ ॥
तेषां वरयतां कन्यां सर्वेषां पृथिवीक्षिताम् ॥ १६ ॥

वीर्यशुल्केति भगवन् न ददामि सुतामहम् ।
परंतु भगवन् ! कन्येचे वरण करणार्‍या सर्व राजांना मी असे सांगितले की माझी कन्या वीर्यशुक्ला आहे. (अर्थात् उचित पराक्रम प्रकट केल्यावरच कोणी पुरुष हिच्याबरोबर विवाह करण्यास अधिकारी होऊ शकतो.) याच कारणामुळे मी आजपर्यंत कुणाला आपली कन्या दिली नाही. ॥ १६ १/२ ॥
ततः सर्वे नृपतयः समेत्य मुनिपुङ्‍गव ॥ १७ ॥

मिथिलामप्युपागम्य वीर्यं जिज्ञासवस्तदा ।
मुनिपुङ्‍गव ! तेव्हां सर्व राजे मिळून मिथिलेत आले आणि विचारू लागले की राजकुमारी सीतेला प्राप्त करणासाठी कोणता पराक्रम निश्चित केला गेला आहे. ॥ १७ १/२ ॥
तेषां जिज्ञासमानानां शैवं धनुरुपाहृतम् ॥ १८ ॥

न शेकुर्ग्रहणे तस्य धनुषस्तोलनेऽपि वा ।
'मी पराक्रमाची जिज्ञासा असलेल्या त्या राजांच्या समोर हे शिवाचे धनुष्य ठेवले. परंतु ते लोक याला उचलण्यास अथवा हलविण्यासही समर्थ झाले नाहीत. ॥ १८ १/२ ॥
तेषां वीर्यवतां वीर्यमल्पं ज्ञात्वा महामुने ॥ १९ ॥

प्रत्याख्याता नृपतयस्तन्निबोध तपोधन ।
'महामुने ! त्या पराक्रमी नरेशांची शक्ति अगदी अल्प आहे हे जाणून मी त्यांना माझी कन्या देण्याचे नाकारले. तपोधन ! त्यानंतर जी घटना घडली तीही आपण ऐकावी. ॥ १९ १/२ ॥
ततः परमकोपेन राजानो मुनिपुङ्‍गव ॥ २० ॥

अरुन्धन् मिथिलां सर्वे वीर्यसन्देहमागताः ।
'मुनिप्रवर ! मी नकार दिल्यावर ते सर्व राजे अत्यंत कुपित झाले आणि आपल्या पराक्रमाविषयी संशयापन्न होऊन मिथिलेला चारी बाजूनी वेढा देऊन उभे राहिले. ॥ २० १/२ ॥
आत्मानमवधूतं ते विज्ञाय नृपपुङ्‍गवाः ॥ २१ ॥

रोषेण महताविष्टाः पीडयन् मिथिलां पुरीम् ।
'माझ्याद्वारे आपला अपमान झाला असे समजून त्या श्रेष्ठ नरेशांनी अत्यंत रुष्ट होऊन मिथिला पुरीला सर्व बाजूनी पीडा देण्यास आरंभ केला. ॥ २१ १/२ ॥
ततः संवत्सरे पूर्णे क्षयं यातानि सर्वशः ॥ २२ ॥

साधनानि मुनिश्रेष्ठ ततोऽहं भृशदुःखितः ।
'मुनिश्रेष्ठ ! पूरे एक वर्षपर्यंत ते वेढा घलून बसले होते. या अवधित युद्धाची सारी साधने क्षीण झाली. त्यामुळे मला फार दुःख झाले. ॥ २२ १/२ ॥
ततो देवगणान् सर्वांस्तपसाहं प्रसादयम् ॥ २३ ॥

ददुश्च परमप्रीताश्चतुरङ्‍गबलं सुराः ।
तेव्हां मी तपस्येच्या द्वारे समस्त देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न केला. देवता खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी मला चतुरंगिणी सेना प्रदान केली. ॥ २३ १/२ ॥
ततो भग्ना नृपतयो हन्यमाना दिशो ययुः ॥ २४ ॥

अवीर्या वीर्यसंदिग्धाः सामात्याः पापकारिणः ।
मग तर आमच्या सैनिकांकडून मार खाऊन ते सर्व पापाचारी राजे जे बलहीन होते अथवा ज्यांच्या बलवान होण्यासंबंधी संदेह होता, आपल्या मंत्र्यांसहित विभिन्न दिशांमध्ये पळून गेले. ॥ २४ १/२ ॥
तदेतन्मुनिशार्दूल धनुः परमभास्वरम् ॥ २५ ॥

रामलक्ष्मणयोश्चापि दर्शयिष्यामि सुव्रत ।
मुनिश्रेष्ठ ! हेच ते परम प्रकाशमान धनुष्य आहे. उत्तम व्रताचे पालन करणार्‍या महर्षे ! मी ते श्रीराम आणि लक्ष्मणासही दाखवीन. ॥ २५ १/२ ॥
यद्यस्य धनुषो रामः कुर्यादारोपणं मुने ।
सुतामयोनिजां सीतां दद्यां दाशरथेरहम् ॥ २६ ॥
'मुने ! जर रामाने या धनुष्याची प्रत्यंचा चढविली तर मी आपली अयोनिजा कन्या सीतेला या दशरथकुमाराच्या हाती देईन. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्षष्टितमः सर्गः ॥ ६६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सहासष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP