[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । षट्चत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतालक्ष्मणाभ्यां सह श्रीरामस्य रात्रौ तमसातटे निवासस्तत्र मातुः पितुरयोध्यायाश्च कृते तदीया चिन्ता, सुप्तान् पौरजनान् विहाय तस्य वनं प्रति गमनम् - सीता आणि लक्ष्मणासहित श्रीरामांचा रात्री तमसा-तटावर निवास, माता-पिता आणि अयोध्या यासाठी चिंता करणे आणि पुरवासी लोकांना झोपलेले असता सोडून वनाकडे जाणे -
ततस्तु तमसातीरं रम्यमाश्रित्य राघवः ।
सीतामुद्वीक्ष्य सौमित्रिमिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
त्यानंतर तमसा नदीच्या रमणीय तटाचा आश्रय घेऊन राघवाने सीतेकडे पाहून सौमित्रास याप्रकारे म्हटले - ॥१॥
इयमद्य निशा पूर्वा सौमित्रे प्रहिता वनम् ।
वनवासस्य भद्रं ते न चोत्कण्ठितुमर्हसि ॥ २ ॥
'सौमित्र ! तुझे कल्याण होवो ! आपण जे वनाकडे प्रस्थित झालो आहोत त्या आपल्या (सर्वांची) वनवासातील ही पहिली रात्र प्राप्त झालेली आहे म्हणून आता तुम्ही नगरासाठी उत्कंठित होता उपयोगी नाही. ॥२॥
पश्य शून्यान्यरण्यानि रुदन्तीव समन्ततः ।
यथा निलयमायद्‌भिर्निलीनानि मृगद्विजैः ॥ ३ ॥
'या शून्य वनाकडे तर पहा. यात वन्य पशु पक्षी आपापल्या स्थानावर येऊन आपली बोली बोलत आहेत. त्यांच्या आवाजाने सारी वनस्थली व्याप्त झाली आहे. जणु हे सारे वन आपल्याला या अवस्थेत पाहून खिन्न होऊन सर्व तर्‍हेने रोदन करीत आहे. ॥३॥
अद्यायोध्या तु नगरी राजधानी पितुर्मम ।
सस्त्रीपुंसा गतानस्माञ्शोचिष्यति न संशयः ॥ ४ ॥
'आज माझ्या पित्याची राजधानी अयोध्यानगरी वनात आलेल्या आपणा सर्वांसाठी समस्त नरनारींच्या सहित शोक करेल यात संशय नाही. ॥४॥
अनुरक्ता हि मनुजा राजानं बहुभिर्गुणैः ।
त्वां च मां च नरव्याघ्र शत्रुघ्नभरतौ तथा ॥ ५ ॥
'पुरुषसिंह ! अयोध्यातील माणसे अनेक सद्‌गुणांमुळे महाराजांच्यात, तुझ्यात, माझ्यात तसेच भरत आणि शत्रुघ्नांत ही अनुरक्त आहेत. ॥५॥
पितरं चानुशोचामि मातरं च यशस्विनीम् ।
अप नान्धौ भवेतां तु रुदन्तौ तावभीक्ष्णशः ॥ ६ ॥
'या समयी मला पिता आणि यशस्विनी माता यांच्यासाठी खूप शोक होत आहे. कधी असे न होवो की निरंतर रडत राहण्यामुळे ते अंध होऊन जावेत. ॥६॥
भरतः खलु धर्मात्मा पितरं मातरं च मे ।
धर्मार्थकामसहितैर्वाक्यैराश्वासयिष्यति ॥ ७ ॥
'परंतु भरत धर्मात्मा आहेत. अवश्य ते धर्म,अर्थ आणि काम - तिन्हीच्या अनुकूल वचनांच्या द्वारा पिता आणि माता यांना सांत्वना देतील. ॥७॥
भरतस्यानृशंसत्वं संचिन्त्याहं पुनः पुनः ।
नानुशोचामि पितरं मातरं च महाभुज ॥ ८ ॥
'महाबाहो ! ज्यावेळी मी भरताच्या कोमल स्वभावाचे वारंवार स्मरण करतो तेव्हा मला मातापित्यांविषयी अधिक चिंता वाटत नाही. ॥८॥
त्वया कार्यं नरव्याघ्र मामनुव्रजता कृतम् ।
अन्वेष्टव्या हि वैदेह्या रक्षणार्थं सहायता ॥ ९ ॥
'नरश्रेष्ठ लक्ष्मणा ! तू माझ्या बरोबर फारच महत्वपूर्ण कार्य केले आहेस. कारण तू जर आला नसतास तर मला वैदेहीच्या रक्षणार्थ कुणी सहाय्यक शोधून काढावा लागला असता. ॥९॥
अद्‌भिरेव हि सौमित्रे वत्स्याम्यद्य निशामिमाम् ।
एतद्धि रोचते मह्यं वन्येऽपि विविधे सति ॥ १० ॥
'सौमित्र ! जरी येथे नाना प्रकारची जंगली फळे- मुळे मिळू शकतात तथापि आजची ही रात्र मी केवळ जल पिऊनच घालवीन. मला हेच चांगले वाटत आहे. ॥१०॥
एवमुक्त्वा तु सौमित्रिं सुमन्त्रमपि राघवः ।
अप्रमत्तस्त्वमश्वेषु भव सौम्येत्युवाच ह ॥ ११ ॥
सौमित्रीला असे सांगून राघव सुमंत्रास म्हणाले- सौ‍म्य ! आता आपण घोड्यांच्या रक्षणाकडे लक्ष द्या, त्यांच्या संबंधी बेसावध राहू नका. ॥११॥
सोऽश्वान् सुमन्त्रः संयम्य सूर्येऽस्तं समुपागते ।
प्रभूतयवसान् कृत्वा बभूव प्रत्यनन्तरः ॥ १२ ॥
सुमंत्रांनी सूर्यास्त झाल्यावर घोड्यांना आणून बांधले आणि त्यांच्या समोर भरपूर चारा टाकून ते रामांजवळ आले. ॥१२॥
उपास्य तु शिवां संध्यां दृष्ट्‍वा रात्रिमुपागताम् ।
रामस्य शयनं चक्रे सूतः सौमित्रिणा सह ॥ १३ ॥
नंतर (वर्णानुकूल) कल्याणमय संध्योपासना करून रात्र होत आहे हे पाहून लक्ष्मणासहित सुमंत्रांनी श्रीरामासाठी शयन करण्यायोग्य स्थान आणि आसन तयार केले. ॥१३॥
तां शय्यां तमसातीरे वीक्ष्य वृक्षदलैर्वृताम् ।
रामः सौमित्रिणा सार्धं सभार्यः संविवेश ह ॥ १४ ॥
तमसेच्या तटावर वृक्षांच्या पानांनी बनविलेली शय्या पाहून राम, सौमित्र आणि सीता यांच्यासह तिच्यावर जाऊन बसले. ॥१४॥
सभार्यं सम्प्रसुप्तं तु श्रान्तं संप्रेक्ष्य लक्ष्मणः ।
कथयामास सूताय रामस्य विविधान् गुणान् ॥ १५ ॥
थोड्या वेळाने भार्या सीतेसह श्रीराम थकून झोपी गेलेले पाहून लक्ष्मण सुमंत्राजवळ त्यांच्या नानाप्रकारच्या गुणांचे वर्णन करू लागले. ॥१५॥
जाग्रतोरेव तां रात्रिं सौमित्रेरुदितो रविः ।
सूतस्य तमसातीरे रामस्य ब्रुवतो गुणान् ॥ १६ ॥
सुमंत्र आणि लक्ष्मण तमसेच्या तीरावर श्रीरामांच्या गुणांची चर्चा करीत रात्रभर जागत राहिले. इतक्यातच सूर्योदयाचा समय निकट येऊन पोहोंचला. ॥१६॥
गोकुलाकुलतीरायास्तमसाया विदूरतः ।
अवसत् तत्र तां रात्रिं रामः प्रकृतिभिः सह ॥ १७ ॥
तमसेचा तो तट गायींच्या समुदायांनी भरलेला होता. श्रीरामांनी प्रजाजनांसह तेथेच रात्री निवास केला. ते प्रजाजनांपासून थोड्या दूर अंतरावर झोपले होते. ॥१७॥
उत्थाय तु महातेजाः प्रकृतीस्ता निशाम्य च ।
अब्रवीद् भ्रातरं रामो लक्ष्मणं पुण्यलक्षणम् ॥ १८ ॥
महातेजस्वी श्रीराम ताडकन उठले आणि प्रजाजनांना झोपलेले पाहून पवित्र लक्षणे असणारा आपला भाऊ लक्ष्मण यांस याप्रकारे म्हणाले- ॥१८॥
अस्मद्व्यपेक्षान् सौमित्रे निर्व्यपेक्षान् गृहेष्वपि ।
वृक्षमूलेषु संसक्तान् पश्य लक्ष्मण सांप्रतम् ॥ १९ ॥
'हे सौमित्र ! या पुरवासी लोकांच्या कडे पहा, हे या समयी झाडांच्या बुंध्याला टेकून झोपी गेले आहेत. यांना केवळ आमची इच्छा आहे. ते आपल्या घरांसंबंधी पुर्ण निरपेक्ष झालेले आहेत. ॥१९॥
यथैते नियमं पौराः कुर्वन्त्यस्मन्निवर्तने ।
अपि प्राणान् न्यसिष्यन्ति न तु त्यक्ष्यन्ति निश्चयम् ॥ २० ॥
'आम्हाला परत घेऊन जाण्यासाठी हे ज्याप्रमाणे प्रयत्‍न करीत आहेत त्यावरून असे कळून येत आहे की हे आपल्या प्राणांचा त्याग करतील पण आपला निश्चय सोडणार नाहीत. ॥२०॥
यावदेव तु संसुप्तास्तावदेव वयं लघु ।
रथमारुह्य गच्छामः पन्थानमकुतोभयम् ॥ २१ ॥
'म्हणून जोपर्यंत हे सर्व झोपलेले आहेत तोपर्यंतच आपण रथावर आरूढ होऊन शीघ्रतापूर्वक येथून निघून जावे. नंतर मग या मार्गावर आणखी कुणी येईल असे भय राहाणार नाही. ॥२१॥
अतो भूयोऽपि नेदानीमिक्ष्वाकुपुरवासिनः ।
स्वपेयुरनुरक्ता मा वृक्षमूलेषु संश्रिताः ॥ २२ ॥
'अयोध्यावासी आपले अनुरागी आहेत. ज्यावेळी आपण येथून निघून जाऊ त्यावेळी त्यांना परत या प्रमाणे वृक्षांच्या बुध्यांना टेकून झोपावे लागणार नाही. ॥२२॥
पौरा ह्यात्मकृताद् दुःखाद् विप्रमोक्ष्या नृपात्मजैः ।
न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः ॥ २३ ॥
'राजकुमारांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी पुरवासी लोकांना आपल्या द्वारे होणार्‍या दुःखातून मुक्त करावे; त्यांना आपले दुःख देऊन अधिक दुःखी करता कामा नये.' ॥२३॥
अब्रवील्लक्ष्मणो रामं साक्षाद् धर्ममिव स्थितम् ।
रोचते मे तथा प्राज्ञ क्षिप्रमारुह्यतामिति ॥ २४ ॥
हे ऐकून लक्ष्मणांनी साक्षात धर्माप्रमाणे विराजमान भगवान श्रीरामांना म्हटले -' परम बुद्धिमान आर्य ! आपला हा विचार मला पसंत आहे. तरी शीघ्रच रथावर स्वार व्हावे.' ॥२४॥
अथ रामोऽब्रवीत् सूतं शीघ्रं संयुज्यतां रथः ।
गमिष्यामि ततोऽरण्यं गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २५ ॥
तेव्हा श्रीरामांनी सुमंत्रांस म्हटले - 'प्रभो ! आपण जावे आणि शीघ्रच रथ जोडून तयार करावा. नंतर मी त्वरेने येथून वनाकडे जाईन.' ॥२५॥
सूतस्ततः संत्वरितः स्यन्दनं तैर्हयोत्तमैः ।
योजयित्वा तु रामस्य प्राञ्जलिः प्रत्यवेदयत् ॥ २६ ॥
आज्ञा मिळतांच सुमंत्रांनी त्या उत्तम घोड्यांना तात्काळ रथास जुंपले आणि श्रीरामांजवळ हात जोडून निवेदन केले- ॥२६॥
अयं युक्तो महाबाहो रथस्ते रथिनां वर ।
त्वरयाऽऽरोह भद्रं ते ससीतः सहलक्ष्मणः ॥ २७ ॥
'हे महाबाहो ! रथिंच्या मध्ये श्रेष्ठ वीरा ! आपले कल्याण होवो ! आपला हा रथ जोडून तयार आहे. आता सीता आणि लक्ष्मणासह आपण शीघ्र यावर स्वार व्हावे.' ॥२७॥
तं स्यन्दनमधिष्ठाय राघवः सपरिच्छदः ।
शीघ्रगामाकुलावर्तां तमसामतरन्नदीम् ॥ २८ ॥
सर्वांसह रथावर आरूढ होऊन राघव तीव्रगतीने वहाणार्‍या आणि भोवर्‍यांनी भरलेल्या तमसा नदीच्या दुसर्‍या तीरास जाऊन पोहोंचले. ॥२८॥
स संतीर्य महाबाहुः श्रीमाञ्शिवमकण्टकम् ।
प्रापद्यत महामार्गमभयं भयदर्शिनाम् ॥ २९ ॥
नदीला पार करून महाबाहु श्रीमान राम अशा महान मार्गावर पोहोंचले जो कल्याणप्रद, कण्टकरहित आणि सर्वत्र भय पहाणार्‌यासाठीही भयरहित होता. ॥२९॥
मोहनार्थं तु पौराणां सूतं रामोऽब्रवीद् वचः ।
उदङ्‌‍मुखः प्रयाहि त्वं रथमारुह्य सारथे ॥ ३० ॥

मुहूर्तं त्वरितं गत्वा निवर्तय रथं पुनः ।
यथा न विद्युः पौरा मां तथा कुरु समाहितः ॥ ३१ ॥
त्या समयी श्रीरामांनी पुरवासीयांना मोहात पाडण्यासाठी (भुलविण्यासाठी ) सुमंत्रास याप्रमाणे सांगितले - 'सारथे ! आम्ही तर येथे उतरून जातो परंतु आपण रथावर आरूढ होऊन प्रथम उत्तर दिशेकडे जावे. (दोन घटिका पर्यंत) एक मुहूर्तपर्यंत तीव्र गतिने उत्तरेस जाऊन नंतर दुसर्‍या मार्गाने परत रथास येथे घेऊन यावे. कुठल्याही प्रकारे पुरवासी लोकांना माझा पत्ता लागणार नाही असा एकाग्रतापूर्वक प्रयत्‍न करावा.' ॥३०-३१॥
रामस्य तु वचः श्रुत्वा तथा चक्रे स सारथिः ।
प्रत्यागम्य च रामस्य स्यन्दनं प्रत्यवेदयत् ॥ ३२ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून सारथ्याने तसेच केले आणि परत येऊन श्रीरामांच्या सेवेत रथ उपस्थित केला. ॥३२॥
तौ संप्रयुक्तं तु रथं समास्थितौ
     तदा ससीतौ रघुवंशवर्धनौ ।
प्रचोदयामास ततस्तुरङ्‌‍गमान्
     स सारथिर्येन पथा तपोवनम् ॥ ३३ ॥
त्यानंतर रघुवंशाची वृद्धि करणारे राम- लक्ष्मण सीतेसहित त्या परत आणलेल्या रथावर चढले आणि मग सारथ्याने ज्या मार्गाने गेले असता तपोवनात पोहोचणे शक्य होईल अशामार्गावर घोड्यांना पुढे घालविले. ॥३३॥
ततः समास्थाय रथं महारथः
     ससारथिर्दाशरथिर्वनं ययौ ।
उदङ्‌‍मुखं तं तु रथं चकार
     प्रयाणमाङ्‌‍गल्यनिमित्तदर्शनात् ॥ ३४ ॥
तत्पश्चात सारथ्यासह दाशरथी रामांनी यात्राकालिक मंगलसूचक शकुन पहाण्यासाठी प्रथम तर तो रथ उत्तराभिमुख उभा केला आणि नंतर ते त्या रथावर आरूढ होऊन वनाकडे चालू लागले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सेहेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP