॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ नवमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



भगवान राम व भरत यांची भेट. अयोध्या नगरीला भरताचे प्रत्यागमन आणि श्रीरामचंद्रांचे अत्रिमुनींच्या आश्रमाकडे गमन -


श्रीमहादेव उवाच -
अथ गत्वाऽऽश्रमपद समीपं भरतो मुदा ।
सीतारामपदैर्युक्तं पवित्रमतिशोभनम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, त्यानंतर सीता व राम यांच्या चरण-चिन्हांनी युक्त, अतिशय सुंदर आणि पवित्र, अशा श्रीरामांच्या आश्रमरथानाच्या सन्निध भरत आनंदाने गेला. (१)

स तत्र वज्राङ्‌कुशवारिजाञ्चित-
     ध्वजादिचिह्नानि पदानि सर्वतः ।
ददर्श रामस्य भुवोऽतिमङ्‌गला-
     न्यचेष्टयत्पादरजःसु सानुजः ॥ २ ॥
तेथे वज्र, अंकुश, कमल, ध्वज इत्यादींनी युक्त आणि पृथ्वीसाठी अतिशय मंगल, अशा श्रीरामांच्या चरणांची चिन्हे भरताने सर्वत्र पाहिली. तेव्हा शत्रुघ्नानासह भरत त्या चरण-रजामध्ये लोळू लागला. (२)

अहो सुधन्योऽहममूनि राम-
     पादारविन्दाङ्‌कितभूतलानि ।
पश्यामि यत्पादरजो विमृग्यं
     ब्रह्मादिदेवैः श्रुतिभिश्च नित्यम् ॥ ३ ॥
तो मनात म्हणू लागला, 'श्रीरामांच्या चरणकमलांच्या चिन्हांनी अंकित झालेली भूमी मी पाहात आहे. अहो ! मी खरोखरच अतिशय धन्य आहे. ब्रह्मा इत्यादी देवसमूह आणि सर्व वेद या चरणरजाचा शोध सतत घेत असतात.' (३)

इत्यद्‌भुतप्रेमरसाप्लुताशयो
     विगाढचेता रघुनाथभावने ।
आनन्दजाश्रुस्नपितस्तनान्तरः
     शनैरवापाश्रमसन्निधिं हरेः ॥ ४ ॥
अशा प्रकारे अत्यंत अद्‌भुत प्रेमरसाने ज्याचे मन भरले होते, ज्याचे चित्त रघुनाथांच्या चिंतनात गढून गेले होते व ज्याचे वक्षःस्थळ आनंदाश्रूंनी भिजून गेले होते, असा भरत हळूहळू श्रीरामांच्या आश्रमाजवळ पोचला. (४)

स तत्र दृष्ट्‍वा रघुनाथमास्थितं
     दूर्वादलश्यामलमायतेक्षणम् ।
जटाकिरीटं नववल्कलाम्बरं
     प्रसन्नवक्त्रं तरुणारुणद्युतिम् ॥ ५ ॥
विलोकयन्तं जनकात्मजां शुभां
     सौमित्रिणा सेवितपादपङ्‌कजम् ।
तदाभिदुद्राव रघूत्तमं शुचा
     हर्षाच्च तत्पादयुगं त्वराग्रहीत् ॥ ६ ॥
दूर्वादलाप्रमाणे श्यामल शरीर असणारे, दीर्घ नयन असणारे, जटारूपी मुकुट धारण करणारे, नवीन वल्कले परिधान केलेले, प्रसन्नमुख असणारे, तरुण अरुणाप्रमाणे तेज असणारे, शुभलक्षणी जनक-कन्येकडे पाहात असणारे आणि ज्यांच्या चरण कमलांची सेवा लक्ष्मण करीत होता, असे श्रीरघुनाथ तेथे बसलेले जेव्हा भरताने पाहिले, तेव्हा हर्षाने तसेच शोकाने तो त्यांचेकडे त्वरेने धावत गेला आणि त्याने त्यांचे चरणयुगुल पकडले. (५-६)

रामस्तमाकृष्य सुदीर्घबाहु-
     र्दोर्भ्यां परिष्वज्य सिषिञ्च नेत्रजैः ।
जलैरथाङ्‌कोपरि संन्यवेशयत्
     पुनः पुनः संपरिषस्वजे विभुः ॥ ७ ॥
दीर्घबाहू असणार्‍या श्रीरामांनी त्याला आपल्या दोन हातांनी उठविले, आलिंगन दिले व आपल्या नेत्रांतील अश्रूंचा त्याच्यावर वर्षाव केला; नंतर त्याला आपल्याजवळ बसवून त्याला पुनः पुनः आलिंगन दिले. (७)

अथ ता मातरः सर्वाः समाजग्मुस्त्वरान्विताः ।
राघवं द्रष्टुकामास्तास्तृषार्ता गौर्यथा जलम् ॥ ८ ॥
त्यानंतर तहानेने व्याकुळ झालेली गाय ज्याप्रमाणे पाण्याकडे धावत जाते, त्या प्रमाणे रामांना पाहण्याची इच्छा असणार्‍या त्या सर्व कौसल्या इत्यादी माता त्वरेने पुढे झाल्या. (८)

रामः स्वमातरं वीक्ष्य द्रुतमुत्थाय पादयोः ।
ववन्दे साश्रु सा पुत्रमालिङ्‌ग्यातीव दुःखिता ॥ ९ ॥
आपल्या आईला पाहून श्रीराम चटदिशी उठले आणि त्यांनी मातेच्या पायांना वंदन केले. तेव्हा तिने दुःखाने डोळ्यांत अश्रू आणून पुत्राला मिठी मारली. (९)

इतराश्च तथा नत्वा जननी रघुनन्दनः ।
ततः समागतं दृष्ट्‍वा वसिष्ठं मुनिपुङ्‌गवम् ॥ १० ॥
साष्टाङ्‌गं प्रणिपत्याह धन्योऽस्मीति पुनः पुनः ।
यथार्हमुपवेश्याह सर्वानेव रघूद्वहः ॥ ११ ॥
त्यानंतर इतर मातांनासुद्धा रघुनंदन श्रीरामांनी नमस्कार केला. मुनिश्रेष्ठ वसिष्ठ आलेले आहेत हे पाहिल्यावर त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात घातला आणि 'मी धन्य आहे' असे ते वारंवार म्हणू लागले. योग्यतेप्रमाणे सर्वांनाच बसण्यास सांगून रघुश्रेष्ठ राम बोलले. (१०-११)

पिता मे कुशली किं वा मां किमाहातिदुःखितः ।
वसिष्ठस्तमुवाचेदं पिता ते रघुनन्दन ॥ १२ ॥
त्वद्वियोगाभितप्तात्मा त्वामेव परिचिन्तयन् ।
रामरामेति सीतेति लक्ष्मणेति ममार ह ॥ १३ ॥
" सांगा, माझे पिताजी कुशल आहेत ना ? माझ्या वियोगाने अतिशय दुःखी झालेल्या पिताजींनी मला काय आज्ञा केली आहे ?" तेव्हा वसिष्ठ त्यांना म्हणाले " हे रघुनन्दना, तु मच्या वियोगाने दशरथ महाराजांचे मन अतिशय उद्विग्न झाले होते. तुमचे चिंतन करीत आणि 'हे रामा ! हे रामा ! हे सीते ! हे लक्ष्मणा !' असे म्हणत त्यांनी आपले प्राण सोडले." (१२-१३)

श्रुत्वा तत्कर्णशूलाभं गुरोर्वचनमञ्जसा ।
हा हतोऽस्मीति पतितो रुदन् रामः सलक्ष्मणः ॥ १४ ॥
कानाला शूलाप्रमाणे वाटणारे ते गुरूंचे शब्द ऐकल्यावर, 'हाय ! मी मेलो,' असा विलाप करीत, श्रीराम लक्ष्मणासह एकदम जमिनीवर कोसळले. (१४)

ततोऽनुरुरुदुः सर्वा मातरश्च तथापरे ।
हा तात मां परित्यज्य क्व गतोऽसि घृणाकर ॥ १५ ॥
त्यावेळी सर्व माता आणि इतर उपस्थित असणारे लोकही रडू लागले. मग श्रीरामचंद्र म्हणू लागले, "हाय बाबा ! हे दयाळू पिताजी ! मला टाकून देऊन तुम्ही कोठे गेलात ? (१५)

अनाथोऽस्मि महाबाहो मां को वा लालयेदितः ।
सीता च लक्ष्मणश्चैव विलेपतुरता भृशम् ॥ १६ ॥
हे महाबाहो, मी आता अनाथ झालो आहे. यापुढे माझे लाड कोण करील ?" नंतर सीता आणि लक्ष्मण यांनी त्यापेक्षाही खूपच विलाप केला. (१६)

वसिष्ठः शान्तवचनैः शमयामास तां शुचम् ।
ततो मन्दाकिनीं गत्वा स्नात्वा ते वीतकल्मषाः ॥ १७ ॥
तेव्हा शांतिपूर्ण वचनांनी वसिष्ठांनी त्यांचा तो शोक निवारण केला. मंदाकिनीवर जाऊन आणि तेथे स्नान करून ते सर्वजण शूचिर्भूत झाले. (१७)

राज्ञे ददुर्जलं तत्र सर्वे ते जलकाङ्‌क्षिणे ।
पिण्डान्निर्वापयामास रामो लक्ष्मणसंयुतः ॥ १८ ॥
तेथे त्या सर्वांनी महाराज दशरथांना जलांजली दिली. नंतर लक्ष्मणासह श्रीरामांनी पिंडदान केले. (१८)

इङ्‌गुदीफलपिण्याकरचितान्मधुसम्प्लुतान् ।
वयं यदन्नाः पितरस्तदन्नाः स्मृतिनोदिताः ॥ १९ ॥
'आमचे जे अन्न आहे तेच अन्न पितरांना चालेल असे स्मृतींनी सांगितले आहे,' असे म्हणून इंगुदी फळाचे पिंड बनवून व त्यावर मध घालून रामांनी पिंडदान केले. (१९)

इति दुखाश्रुपूर्णाक्षः पुनः स्नात्वा गृहं ययौ ।
सर्वे रुदित्वा सुचिरं स्नात्वा जग्मुस्तदाश्रमम् ॥ २० ॥
त्यानंतर डोळे दुःखाश्रूंनी भरलेले श्रीराम पुनः स्नान करून आश्रमाकडे परतले. इतर सर्व जणही पुष्कळ वेळ रडले आणि नंतर स्नान करून श्रीरामांच्या आश्रमाकडे परत गेले. (२०)

तस्मिंस्तु दिवसे सर्वे उपवासं प्रचक्रिरे ।
ततः परेद्युर्विमले स्नात्वा मन्दाकिनीजले ॥ २१ ॥
उपविष्टं समागम्य भरतो राममब्रवीत् ।
राम राम महाभाग स्वात्मानमभिषेचय ॥ २२ ॥
त्या दिवशी सर्वांनी उपवास केला. नंतर दुसरे दिवशी मंदाकिनीच्या निर्मळ जळात स्नान करून, भरताने आश्रमात बसलेल्या श्रीरामांजवळ जाऊन त्यांना म्हटले "अहो राम, अहो महाभाग, तुम्ही स्वतः आपल्यावर राज्याभिषेक करून घ्या. (२१-२२)

राज्यं पालय पित्र्यं ते ज्येष्ठस्त्वं मे पिता तथा ।
क्षत्रियाणामयं धर्मो यत्प्रजापरिपालनम् ॥ २३ ॥
हे पैतृक राज्य तुमचेच आहे. तुम्ही त्याचे पालन करा. तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहात. म्हणून तुम्ही मला पित्याप्रमाणे आहात. प्रजेचे पालन करणे हाच क्षत्रियाचा धर्म आहे. (२३)

इष्ट्‍वा यज्ञैर्बहुविधैः पुत्रानुत्पाद्य तन्तवे ।
राज्ये पुत्रं समारोप्य गमिष्यसि ततो वनम् ॥ २४ ॥
तेव्हा नाना प्रकारच्या यज्ञांनी यजन करून, वंशाचा तंतू सुरक्षित ठेवण्यासाठी पुत्रांना जन्म दिल्यानंतर ज्येष्ठ पुत्राला राजसिंहासनावर बसवून, मग तुम्ही वनात जा. (२४)

इदानीं वनवासस्य कालो नैव प्रसीद मे ।
मातुर्मे दुष्कृतं किञ्चित्स्मर्तुं नार्हसि पाहि नः ॥ २५ ॥
हा काही तुमचा वनवासाचा काळ नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. माझ्या मातेने जे काही वाईट कर्म केले आहे, ते तुम्ही लक्षात घेऊनका. आमचे रक्षण करा." (२५)

इत्युक्त्वा चरणौ भ्रातुः शिरस्याधाय भक्तितः ।
रामस्य पुरतः साक्षाद्दण्डवत्पतितो भुवि ॥ २६ ॥
असे बोलून त्याने भक्तिपूर्वक प्रभू रामचंद्रांचे चरण आपल्या मस्तकावर घेतले आणि जमिनीवर दंडवत घातले. (२६)

उत्थाप्य राघवः शीघ्रमारोप्याङ्‌केऽतिभक्तितः ।
उवाच भरतं रामः स्नेहार्द्रनयनः शनैः ॥ २७ ॥
त्याला झटदिशी उठवून श्रीरामांनी अतिशय प्रेमाने आपल्याजवळ बसविले आणि प्रेमाने डोळे ओले झालेले श्रीराम हळूहळू भरताशी बोलू लागले. (२७)

शृणु वत्स प्रवक्ष्यामि त्वयोक्तं यत्तथैव तत् ।
किन्तु मामब्रवीत्तातो नव वर्षाणि पञ्च च ॥ २८ ॥
उषित्वा दण्डकारण्ये पुरं पश्चात्समाविश ।
इदानीं भरतायेदं राज्यं दत्तं मयाखिलम् ॥ २९ ॥
ततः पित्रैव सुव्यक्तं राज्यं दत्तं तवैव हि ।
दण्डकारण्यराज्यं मे दत्तं पित्रा तथैव च ॥ ३० ॥
"वत्सा, मी आता जे सांगणार आहे ते तू ऐक. तू आत्ता जे सांगितलेस ते खरे आहे. तथापि पिताजी मला म्हणाले आहेत की 'चौदा वर्षे तू दंडकारण्यात राहून त्यानंतर अयोध्या नगरात प्रवेश कर. या वेळी हे संपूर्ण राज्य मी भरताला दिले आहे.' याचा अर्थ असा की त्या वेळी पिताचींनीच हे राज्य तुलाच दिले आहे, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तसेच त्यांनी मला दंडकारण्याचे राज्य दिले आहे, हीसुद्धा गोष्ट अगदी स्पष्ट आहे. (२८-३०)

अतः पितुर्वचः कार्यमावाभ्यामतियत्‍नतः ।
पितुर्वचनमुल्लङ्‌घ्य स्वतन्त्रो यस्तु वर्तते ॥ ३१ ॥
स जीवन्नेव मृतको देहान्ते निरयं व्रजेत् ।
तस्माद्‌राज्यं प्रशाधि त्वं वयं दण्डकपालकाः ॥ ३२ ॥
म्हणून आपण दोघांनी अतिशय प्रयत्‍नपूर्वक पित्याचे वचन पूर्ण करावयास हवे. या उलट पित्याच्या वचनाचे उल्लंघन करून जो स्वेच्छेने वागतो, तो जिवंत असतानाच मेल्यासारखा होतो आणि तो शरीर पडल्यावर नरकात जातो. म्हणून तू राज्य सांभाळ व मी दंडकारण्याचे रक्षण करतो." (३१-३२)

भरतस्त्वब्रवीद्‍रामं कामुको मूढधीः पिता ।
स्त्रीजितो भ्रान्तहृदय उन्मत्तो यदि वक्ष्यति ।
तत्सत्यमिति न ग्राह्यं भ्रान्तवाक्यं यथा सुधीः ॥ ३३ ॥
तेव्हा भरत रामांना बोलला, "कामुक, मूढबुद्धीच्या, स्त्रीने वश केलेल्या, श्रांत चित्त आणि उन्मत्त अशा पित्याने जर काही सांगितले असेल तर ते सत्य आहे, असे समजून ते ग्राह्य मानावयाचे नसते. बुद्धिमान मनुष्य भ्रांत माणसाचे वचन खरे मानीत नाही." (३३)

श्रीराम उवाच
न स्त्रीजितः पिता ब्रूयान्न कामी नैव मूढधिः ।
पूर्वं प्रतिश्रुतं तस्य सत्यवादी ददौ भयात् ॥ ३४ ॥
श्रीराम म्हणाले- "स्त्रीवश झालेल्या, कामुक तसेच मूढबुद्धी अशा राजांनी तसे म्हटलेले नाही. सत्यवादी पिताजी कैकेयी मातेला पूर्वी कबूल केलेले वर देण्यासाठी वचनबद्ध होते. जर त्यांनी तसे केले नसते, तर वचन-भंग झाला असता. या भीतीमुळे ते वर दिले होते. (३४)

असत्याद्‌भीतिरधिका महतां नरकादपि ।
करोमीत्यहमप्येतत्सत्यं तस्यै प्रतिश्रुतम् ॥ ३५ ॥
महान पुरुषांना नरकापेक्षासुद्धा असत्याची भीती अधिक वाटते. 'माता कैकेयीला दिलेल्या वचनानुसार पित्याने सांगितले हे सर्व मी करीन' असे सांगून मीसुद्धा त्यांना खरेखुरे आश्वासन दिले आहे. (३५)

कथं वाक्यमहं कुर्यामसत्यं राघवो हि सन् ।
इत्युदीरितमाकर्ण्य रामस्य भरतोऽब्रवीत् ॥ ३६ ॥
रघुकुळात जन्मलो असताना मी माझे वचन असत्य कसे बरे करू ?" अशा प्रकारे रामांनी उच्चारलेले वचन ऐकल्यावर भरत त्यांना म्हणाला. (३६)

भरत उवाच
तथैव चीरवसनो वने वत्स्यामि सुव्रते ।
चतुर्दश समास्त्वं तु राज्यं कुरु यथासुखम् ॥ ३७ ॥
"हे सुव्रता, तुमच्याप्रमाणेच वल्कल वस्त्र धारण करून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून चौदा वर्षे वनात राहीन. तुम्ही सुखाने राज्य करा." (३७)

श्रीराम उवाच
पित्रा दत्तं तवैवैतद्‌राज्यं मह्यं वनं ददौ ।
व्यत्ययं यद्यहं कुर्यामसत्यं पूर्ववत्स्थितम् ॥ ३८ ॥
श्रीराम म्हणाले-"पित्याने हे राज्य तुलाच दिले आहे आणि मला वनवास दिला आहे. जर मी त्याच्या विपरीत करीन तर असत्य हे पूर्वीप्रमाणे जसेच्या तसे राहील." (३८)

भरत उवाच
अहमप्यागमिष्यामि सेवे त्वां लक्ष्मणो यथा ।
नोचेत्प्रायोपवेशेन त्यजाम्येतत्कलेवरम् ॥ ३९ ॥
भरत म्हणाला- "ठीक आहे. तुम्ही वनातून परत येणार नसाल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर वनात येतो. आणि लक्ष्मणाप्रमाणे तुमची सेवा करतो. असे न झाल्यास मी प्रायोपवेशन करून या माझ्या शरीराचा त्याग करीन." (३९)

इत्येवं निश्चयं कृत्वा दर्भानास्तीर्य चातपे ।
मनसापि विनिश्चित्य प्राङ्‌मुखोपविवेश सः ॥ ४० ॥
अशा प्रकारे मनात दृढनिश्चय करून, त्याने उन्हामध्ये दर्भ पसरले व पूर्वेकडे तोंड करून तो भरत खाली बसला. (४०)

भरतस्यापि निर्बन्धं दृष्ट्‍वा रामोऽतिविस्मितः ।
नेत्रान्तसंज्ञां गुरवे चकार रघुनन्दनः ॥ ४१ ॥
भरताचा तो हट्ट पाहून श्रीराम अतिशय विस्मय चकित झाले. मग रघुनंदन श्रीरामांनी गुरू वसिष्ठांना डोळ्यांनी खूण केली. (४१)

एकान्ते भरतं प्राह वसिष्ठो ज्ञानिनां वरः ।
वत्स गुह्यं शृणुष्वेदं मम वाक्यात्सुनिश्चितम् ॥ ४२ ॥
तेव्हा ज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ अशा वसिष्ठांनी भरताला एकांतात म्हटले, "वत्सा, मी सांगतो ते निश्चित असे गुह्य आहे, ते तू ऐक. (४२)

रामो नारायणः साक्षाद्‌ब्रह्मणा याचितः पुरा ।
रावणस्य वधार्थाय जातो दशरथात्मजः ॥ ४३ ॥
राम हे प्रत्यक्ष भगवान् नारायण आहेत. पूर्व ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे प्रार्थना केली होती. त्यानुसार रावणाचा वध करण्यासाठी विष्णू नारायण हे दशरथ पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत. (४३)

योगमायापि सीतेति जाता जनकनन्दिनी ।
शेषोऽपि लक्ष्मणो जातो राममन्वेति सर्वदा ॥ ४४ ॥
नारायणाची योगमाया हीसुद्धा जनकाची कन्या म्हणून जन्माला आली आहे. आणि शेष नाग हासुद्धा लक्ष्मण म्हणू न जन्माला आला आहे. तो नेहमी रामांच्याबरोबर मागे जात अरातो. (४४)

रावणं हन्तुकामास्ते गमिष्यन्ति न संशयः ।
कैकेय्या वरदानादि यद्यन्निष्ठुरभाषणम् ॥ ४५ ॥
सर्वं देवकृतं नोचेदेवं सा भाषयेत्कथम् ।
तस्मात्त्यजाग्रहं तात रामस्य विनिवर्तने ॥ ४६ ॥
रावणाला ठार करण्याची इच्छा असल्यामुळे ते अरण्यात जातील, यात काहीही शंका नाही. कैकेयीने जे वरदान मागितले आणि जे काही निष्ठुर भाषण केले ते सर्व तिने देवांच्या प्रेरणेनुसार केले आहे. असे जर नसते तर ती असे कसे बोलली असती ? म्हणून हे वत्सा, श्रीरामांनी परत यावे हा तुझा हट्ट तू सोडून दे. (४५-४६)

निवर्तस्व महासैन्यैर्मातृभिः सहितः पुरम् ।
रावणं सकुलं हत्वा शीघ्रमेवागमिष्यति ॥ ४७ ॥
तेव्हा या मोठ्या सैन्यासह, मातांना बरोबर घेऊन, तू अयोध्या नगरीला परत जा. कुळासकट रावणाचा वध करून राम लौकरच परत येतील." (४७)

इति श्रुत्वा गुरोर्वाक्यं भरतो विस्मयान्वितः ।
गत्वा समीपं रामस्य विस्मयोत्फुल्ललोचनः ॥ ४८ ॥
पादुके देहि राजेन्द्र राज्याय तव पूजिते ।
तयोः सेवां करोम्येव यावदागमनं तव ॥ ४९ ॥
गुरूचे हे शब्द ऐकून भरत विस्मित होऊन गेला. आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. तो श्रीरामांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाला, " हे राघवेंद्रा, जगाला पूज्य असणार्‍या तुमच्या पादुका राज्य करण्यासाठी मला द्या. तुमचे आगमन होईपर्यंत मी त्या पादुकांचीच सेवा करीत राहीन." (४८-४९)

इत्युक्त्वा पादुके दिव्ये योजयामास पादयोः ।
रामस्य ते ददौ रामो भरतायातिभक्तितः ॥ ५०
असे बोलून दोन दिव्य पादुका भरताने श्रीरामांच्या दोन चरणांमध्ये घातल्या. भरताची ती अतिशय भक्ती पाहून रामांनी भरताला त्या दोन पादुका मोठ्या प्रेमाने दिल्या. (५०)

गृहीत्वा पादुके दिव्ये भरतो रत्‍नभूषिते ।
रामं पुनः परिक्रम्य प्रणनाम पुनः पुनः ॥ ५१ ॥
रत्‍नांनी भूषित अशा त्या दिव्य पादुका घेऊन भरताने श्रीरामांना पुनः प्रदक्षिणा घातली आणि पुनः पुनः प्रणाम केला. (५१)

भरतः पुनराहेदं भक्त्या गद्‍गदया गिरा ।
नवपञ्चसमान्ते तु प्रथमे दिवसे यदि ॥ ५२ ॥
नागमिष्यसि चेद्‍राम प्रविश्यामि महानलम् ।
बाढमित्येव तं रामो भरतं संन्यवर्तयत् ॥ ५३ ॥
भक्तीने गद्‌गद झालेल्या वाणीने भरत पुनः असे म्हणाला, "चौदा वर्षे संपल्यानंतर, अगदी पहिल्याच दिवशी हे रामा, तुम्ही जर परत आला नाहीत, तर मी अग्नीत प्रवेश करीन." 'ठीक आहे' असे म्हणून श्रीरामांनी त्याला जाण्यास निरोप दिला. (५२-५३)

ससैन्यः सवसिष्ठश्च शत्रुघ्नसहितः सुधीः ।
मातृभिर्मंत्रिभिः सार्धं गमनायोपचक्रमे ॥ ५४ ॥
तेव्हा सर्व सैन्य, वसिष्ठ, शत्रुघ्न, सर्व माता आणि मंत्री यांच्यासह, बुद्धिमान भरताने परत जाण्याची तयारी केली. (५४)

कैकेयी राममेकान्ते स्रवन्नेत्रजलाकुला ।
प्राञ्जलिः प्राह हे राम तव राज्यविघातनम् ॥ ५५ ॥
कृतं मया दुष्टधिया मायामोहितचेतसा ।
क्षमस्व मम दौरात्म्यं क्षमासारा हि साधवः ॥ ५६ ॥
त्यावेळी, डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी व्याकूळ झालेली कैकेयी एकांत स्थानी हात जोडून श्रीरामांना म्हणाली, "अरे रामा, माझे मन मायेमुळे मोहित झाल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून मी तुझ्या राज्याभिषेकात विघ्न निर्माण केले. माझ्या या दुष्टपणाची तू क्षमा कर. कारण क्षमा करणे हेच साधूंचे वैशिष्ट्य असते. (५५-५६)

त्वं साक्षाद्विष्णुरव्यक्तः परमात्मा सनातनः ।
मायामानुषरूपेण मोहयस्यखिलं जगत् ।
त्वयैव प्रेरितो लोकः कुरुते साध्वसाधु वा ॥ ५७ ॥
तू साक्षात विष्णू आहेस, अव्यक्त आणि सनातन परमात्मा आहेस. माया-मानुष रूपाने तू सर्व जगाला मोहित करीत आहेस. तुझ्याच प्रेरणेने लोक शुभ किंवा अशुभ कर्म करीत असतात. (५७)

त्वदधीनमिदं विश्वं अस्वतंत्रं करोति किम् ।
यथा कृत्रिमनर्तक्यो नृत्यन्ति कुहकेच्छया ॥ ५८ ॥
त्वदधीना तथा माया नर्तकी बहुरूपिणी ।
त्वयैव प्रेरिताहं च देवकार्यं करिष्यता ॥ ५९ ॥
पापिष्ठं पापमनसा कर्माचरमरिन्दम ।
अद्य प्रतीतोऽसि मम देवानामप्यगोचरः ॥ ६० ॥
हे संपूर्ण विश्व तुझ्या अधीन आहे. साहजिकच स्वतंत्र नसणारे हे जग स्वतः काय करू शकेल ? ज्या प्र माणे कठपुतळ्या सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत राहातात, त्याप्रमाणे अनेक रूपे धारण करणारी ही मायारूपी नर्तकी तुझ्या अधीन आहे आणि हे शत्रुदमना, देवांचे कार्य करू इच्छिणार्‍या तुझ्याकडूनच प्रेरित होऊन मी आपल्या दुष्ट बुद्धीने हे अतिशय पापी कर्म केले. देवांना सुद्धा अगोचर असणारा तू आज मला कळून आला आहेस. (५८-६०)

पाहि विश्वेश्वरानन्त जगन्नाथ नमोऽस्तु ते ।
छिन्धि स्नेहमयं पाशं पुत्रवित्तादिगोचरम् ॥ ६१ ॥
त्वज्ज्ञानानलखड्‍गेन त्वामहं शरणं गता ।
कैकेय्या वचनं श्रुत्वा रामः सस्मितमब्रवीत् ॥ ६२ ॥
हे विश्वेश्वरा, हे अनंता, माझे रक्षण कर. हे जगन्नाथा, तुला नमरकार असो. मी तुला शरण आले आहे. तुझ्याविषयीच्या ज्ञानरूपी तलवारीने तू पुत्र, वित्त इत्यादींचे बाबतीत असणारा माझा स्नेहरूपी पाश तोडून टाक." कैकेयीचे हे वचन ऐकल्यावर स्मित करून श्रीरामचंद्र म्हणाले. (६१-६२)

यदाह मां महाभागे नानृतं सत्यमेव तत् ।
मयैव प्रेरिता वाणी तव वक्त्राद्विनिर्गता ॥ ६३ ॥
देवकार्यार्थसिद्ध्यर्थं अत्र दोषः कुतस्तव ।
गच्छ त्वं हृदि मां नित्यं भावयन्ती दिवानिशम् ॥ ६४ ॥
सर्वत्र विगतस्नेहा मद्‌भक्त्या मोक्ष्यसेऽचिरात् ।
अहं सर्वत्र समदृग् द्वेष्यो वा प्रिय एव वा ॥ ६५ ॥
"हे महाभागे, तू जे आत्ता बोललीस ते खोटे नाही, ते खरेच आहे. देवांच्या कार्यसिद्धीसाठी, मीच प्रेरणा दिलेली तुझी वाणी तुझ्या मुखातून बाहेर पडली. या बाबतीत तुझा दोष कसला ? आता तू परत जा. हृदयात रात्रंदिवस माझेच चिंतन करीत तू सर्व बाबतीत स्नेहरहित हो, माझ्या भक्तीमुळे लौकरच मुक्त होऊन जाशील. सर्व ठिकाणी माझी समदृष्टी आहे. त्यामुळे मला कोणीही अप्रिय किंवा प्रिय नाही. (६३-६५)

नास्ति मे कल्पकस्येव भजतोऽनुभजाम्यहम् ।
मन्मायामोहितधियो मामम्ब मनुजाकृतिम् ॥ ६६ ॥
सुखदुःखाद्यनुगतं जानन्ति न तु तत्त्वतः ।
दिष्ट्या मद्‍गोचरं ज्ञानमुत्पन्नं ते भवापहम् ॥ ६७ ॥
आपणच निर्माण केलेल्या पदार्थाचे ठिकाणी ज्याप्रमाणे जादुगार हा राग अथवा द्वेष ठेवीत नाही, त्याप्रमाणे कुणाचेही ठिकाणी माझा राग आणि द्वेष नाही. जो पुरुष ज्या प्रकाराने मला भजतो, त्याला अनुसरून मी त्याच्याकडे लक्ष देतो. अग आई, माझ्याच मायेने ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे, असे लोक सुख-दुःख इत्यादींनी युक्त असे मनुष्य रूप धारण केलेला मी आहे, असे समजतात; ते लोक मला माझ्या खर्‍या स्वरूपात जाणत नाहीत. संसाराच्या भयाला दूर करणारे असे माझ्या विषयीचे ज्ञान हे तुझ्या ठिकाणी उत्पन्न झाले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. (६६-६७)

स्मरन्ती तिष्ठ भवने लिप्यसे न च कर्मभिः ।
इत्युक्त्वा सा परिक्रम्य रामं सानन्दविस्मया ॥ ६८ ॥
प्रणम्य शतशो भूमौ ययौ गेहं मुदान्विता ।
भरतस्तु सहामात्यैर्मातृभिर्गुरुणा सह ॥ ६९ ॥
अयोध्यामगमच्छ्रीघ्रं राममेवानुचिन्तयन् ।
पौरजानपदान् सर्वानयोध्यायामुदारधीः ॥ ७० ॥
स्थापयित्वा यथान्यायं नन्दिग्रामं ययौ स्वयम् ।
तत्र सिंहासने नित्यं पादुके स्थाप्य भक्तितः ॥ ७१ ॥
पूजयित्वा यथा रामं गन्धपुष्पाक्षतादिभिः ।
राजोपचारैरखिलैः प्रत्यहं नियतव्रतः ॥ ७२ ॥
फलमूलाशनो दान्तो जटावल्कलधारकः ।
अधःशायी ब्रह्मचारी शत्रुघ्न सहितस्तदा ॥ ७३ ॥
माझे स्मरण करीत तू घरातच राहा. तू कर्मांनी लिप्त होणार नाहीस," श्रीरामांनी असे सांगितल्यावर, कैकेयीला आनंद आणि विस्मय वाटला. रामांना प्रदक्षिणा घालून आणि जमिनीवर मस्तक टेकवून व शेकडो वेळा प्रणाम करून कैकेयी आनंदाने घरी निघाली. इकडे अमात्य, सर्व माता आणि गुरू वसिष्ठ यांच्यासह भरत हासुद्धा रामाचेच चिंतन करीत तातडीने अयोध्या नगरीस गेला. सर्व नगरवासी आणि ग्रामवासी लोकांना अयोध्येमध्ये यथायोग्यपणे राहण्यास सांगून उदार बुद्धी असणारा भरत स्वतः मात्र नंदिग्रामात गेला. तेथे एका सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका भक्तीने कायमच्या स्थापन करून, भरत गंध, फुले, अक्षता इत्यादी राजोचित सर्व सामग्रीने रामांची पूजा करण्याचे व्रत दररोज पाळू लागला. इंद्रियांचे दमन करून, फळे आणि मुळे यांचे भोजन करीत, जटा व वल्कले धारण करून व ब्रह्मचर्य पाळून, तो शत्रुघ्नासह खाली जमिनीवर झोपू लागला. (६८-७३)

राजकार्याणि सर्वाणि यावन्ति पृथिवीतले ।
तानि पादुकयोः सम्यङ्निवेदयति राघवः ॥ ७४ ॥
पृथ्वीवरील जितकी म्हणून राजकार्ये येत ती सर्व तो रघुश्रेष्ठ भरत योग्य प्रकारे पादुकांना निवेदन करीत असे. (७४)

गणयन् दिवसानेव रामागमनकाङ्‌क्षया ।
स्थितो रामार्पितमनाः साक्षाद्‌ब्रह्ममुनिर्यथा ॥ ७५ ॥
रामस्तु चित्रकूटाद्रौ वसन्मुनिभिरावृतः ।
सीतया लक्ष्मणेनापि किञ्चित्कालमुपावसत् ॥ ७६ ॥
अशा प्रकारे श्रीरामांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत आणि दिवस मोजीत, रामांच्या ठिकाणी मन अर्पण करून, भरत एखाद्या साक्षात ब्रह्मर्षीप्रमाणे राहू लागला. इकडे मुनींच्या समवेत श्रीराम, सीता व लक्ष्मण याचेसह चित्रकूट पर्वतावर काही काळ राहिले. (७५-७६)

नागराश्च सदा यान्ति रामदर्शनलालसाः ।
चित्रकूटस्थितं ज्ञात्वा सीतया लक्ष्मणेन च ॥ ७७ ॥
सीता आणि लक्ष्मण यांच्यासह श्रीराम चित्रकूट पर्वतावर राहात आहेत हे कळल्यावर, त्यांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने जवळपासच्या नगरांत राहाणारे लोक नेहमी तेथे येऊ लागले. (७७)

दृष्ट्‍वा तज्जनसम्बाधं रामस्तत्याज तं गिरिम् ।
दण्डकारण्यगमने कार्यमप्यनुचिन्तयन् ॥ ७८ ॥
त्या लोकांचा सततचा संपर्क पाहून आणि दंडकारण्यात येण्याच्या आपल्या कार्याचा विचार करून श्रीरामांनी तो पर्वत सोडला. (७८)

अन्वगात्सीतया भ्रात्रा ह्यत्रेराश्रममुत्तमम् ।
सर्वत्र सुखसंवासं जनसम्बाधवर्जितम् ॥ ७९ ॥
त्यानंतर सीता आणि लक्ष्मण यांच्यासह राम अत्रि-ऋषीच्या अतिशय उत्तम असलेल्या आणि जनसंपर्काने रहित असलेल्या आश्रमात गेले. तो आश्रम सर्व प्रकारे सुखाने राहाण्यास योग्य होता. (७९)

गत्वा मुनिमुपासीनं भासयन्तं तपोवनम् ।
दण्डवत्प्रणिपत्याह रामोऽहमभिवादये ॥ ८० ॥
संपूर्ण तपोवनाला प्रकाशित करीत, आश्रमात वसलेल्या त्या मुनीजवळ जाऊन आणि त्यांना दंडवत प्रणाम करून श्रीराम म्हणाले, "अहो मुनीश्वर, मी राम तुम्हांला अभिवादन करीत आहे. (८०)

पितुराज्ञां पुरस्कृत्य दण्डकाननमागतः ।
वनवासमिषेणापि धन्योऽहं दर्शनात्तव ॥ ८१ ॥
पित्याची आज्ञा शिरोधार्थ मानून मी दंडकारण्यात आलो आहे. या वेळी वनवासाच्या निमित्ताने का होईना आपले दर्शन झाल्याने मी कृतार्थ झालो आहे." (८१)

श्रुत्वा रामस्य वचनं रामं ज्ञात्वा हरिं परम् ।
पूजयामास विधिवद्‌भक्त्या परमया मुनिः ॥ ८२ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकल्यावर आणि श्रीराम हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, असे जाणून मुनिवरांनी अतिशय भक्तीने त्यांची विधिवत पूजा केली. (८२)

वन्यैः फलैः कृतातिथ्यमुपविष्टं रघूत्तमम् ।
सीतां च लक्ष्मणं चैव संतुष्टो वाक्यमब्रवीत् ॥ ८३ ॥
वनातील फळांनी ज्यांचा आदर-सत्कार केलेला आहे वे जे आसनावर बसले आहेत, अशा रघूत्तमाला, सीतेला आणि लक्ष्मणाला ते मुनी प्रसन्न होऊन असे बोलले. (८३)

भार्या मेऽतीव संवृद्धा ह्यनसूयेति विश्रुता ।
तपश्चरन्ती सुचिरं धर्मज्ञा धर्मवत्सला ॥ ८४ ॥
"माझी पत्‍नी अनसूया या नावाने विख्यात आहे. ती अतिशय वृद्ध आहे. तिने पुष्कळ काळ तपश्चर्या केली आहे. ती धर्म जाणणारी आणि धर्मावर प्रेम करणारी आहे. (८४)

अन्तस्तिष्ठति तां सीता पश्यत्वरिनिषूदन ।
तथेति जानकीं प्राह रामो राजीवलोचनः ॥ ८५ ॥
ती आत आहे. हे शत्रुदमन रामा, सीतेला तिची भेट घेऊ दे." तेव्हा 'ठीक आहे' असे म्हणून कमलनयन रामचंद्रांनी जानकीला सांगितले. (८५)

गच्छ देवीं नमस्कृत्य शीघ्रमेहि पुनः शुभे ।
तथेति रामवचनं सीता चापि तथाकरोत् ॥ ८६ ॥
"हे कल्याणी, जा, देवी अनसूयेला नमरकार करून लौकर ये." 'ठीक आहे ' असे म्हणून सीतेने श्रीरामांच्या वचनाप्रमाणे केले. (८६)

दण्डवत्पतितामग्रे सीतां दृष्ट्‍वातिहृष्टधीः ।
अनसूया समालिङ्‌ग्य वत्से सीतेति सादरम् ॥ ८७ ॥
दिव्ये ददौ कुण्डले द्वे निर्मिते विश्वकर्मणा ।
दुकूले द्वे ददौ तस्यै निर्मले भक्तिसंयुता ॥ ८८ ॥
आपल्या पुढे दंडवत घातलेल्या सीतेला पाहून अनसूयेचे मन अतिशय आनंदित झाले. आदरपूर्वक तिला आलिंगन देऊन, 'मुली सीते' असे म्हणून आणि भक्तीने युक्त होऊन, विश्वकर्म्याने निर्माण केलेली दोन दिव्य कुंडले आणि दोन निर्मळ रेशमी वस्त्रे अनसूयेने तिला दिली. (८७-८८)

अङ्‌गरागं च सीतायै ददौ दिव्यं शुभानना ।
न त्यक्ष्यतेऽङ्‌गरागेण शोभा त्वां कमलानने ॥ ८९ ॥
तसेच सुंदर अनसूयेने सीतेला दिव्य अंगराग दिला आणि ती म्हणाली, "हे कमलमुखी सीते, हा अंगराग लावल्यामुळे तुझ्या शरीराची शोभा कधी क्षीण होणार नाही. (८९)

पातिव्रत्यं पुरस्कृत्य राममन्वेहि जानकि ।
कुशली राघवो यातु त्वया सह पुनर्गृहम् ॥ ९० ॥
हे जानकी, पातिव्रत्याचे पालन करीत तू नेहमी श्रीरामांच्या मागोमाग जा. तुझ्यासह श्रीराम सुखरूप स्थितीत पुनः घरी परत जावोत." (९०)

भोजयित्वा यथान्यायं रामं सीतासमन्वितम् ।
लक्ष्मणं च तदा रामं पुनः प्राह कृताञ्जलिः ॥ ९१ ॥
त्यानंतर यथायोग्यरीतीने सीतेसहित श्रीरामांना तिने भोजन घातले. पुनःहात जोडून ती श्रीराम व लक्ष्मण यांना म्हणाली. (९१)

राम त्वमेव भुवनानि विधाय तेषां
     संरक्षणाय सुरमानुषतिर्यगादीन् ।
देहान्बिभर्षि न च देहगुणैर्विलिप्त-
     स्त्वत्तो बिभेत्यखिलमोहकरी च माया ॥ ९३ ॥
"हे रामा, ही सर्व भुवने निर्माण करून, त्यांच्या रक्षणासाठी देव, मनुष्य, तिर्यक प्राणी यांचे देह तुम्ही धारण करता. तथापि तुम्ही त्या देहांच्या गुणांनी लिप्त होत नाही. सर्व विश्वाला मोहात टाकणारी तुमची माया हीसुद्धा तुम्हांला भीत असते." (९२)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
॥ समाप्तमिदं अयोध्याकाण्डम् ॥
अयोध्याकांडातील नववा सर्गः समाप्त ॥ ९
अयोध्याकाण्ड समाप्त


GO TOP