॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ बालकाण्ड ॥

॥ सप्तमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]परशुरामांची भेट -


श्रीमहादेव उवाच -
अथ गच्छति श्रीरामे मैथिलाद्योजनत्रयम् ।
निमित्तान्यतिघोराणि ददर्श नृपसत्तमः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-श्रीरामचंद्र मिथिला नगरीपासून तीन योजने दूर गेले असता, नृपश्रेष्ठ दशरथांना अतिशय घोर असे अपशकुन दिसू लागले. (१)

नत्वा वसिष्ठं पप्रच्छ किमिदं मुनिपुङ्‌गव ।
निमित्तानीह दृश्यन्ते विषमाणि समन्ततः ॥ २ ॥
तेव्हा वसिष्ठांना प्रणाम करून त्यांनी विचारले, "अहो मुनिश्रेष्ठ, काय आहे हे ? येथे चारी बाजूंना भयंकर अपशकुन दिसून येत आहेत." (२)

वसिष्टस्तमथ प्राह भयमागामि सूच्यते ।
पुनरप्यभयं तेऽद्य शीघ्रमेव भविष्यति ॥ ३ ॥
तेव्हा वसिष्ठ म्हणाले, "या अपशकुनांनी कोणते तरी आगामी भय दर्शविले जात आहे. तरीपण लौकरच तुम्हांला पुनःअभय प्राप्त होईल. (३)

मृगाः प्रदक्षिणं यान्ति पश्य त्वां शुभसूचकाः ।
इत्येवं वदतस्तथा ववौ घोरतरोऽनिलः ॥ ४ ॥
कारण शुभ सुचविणारे मृग हे तुमच्या उजव्या बाजूने जात आहेत." वसिष्ठ असे बोलत आहेत तोच फार भयंकर असा वारा वाहू लागला. (४)

मुष्णंश्चक्षूंषि सर्वेषां पांसुवृष्टिभिरर्दयन् ।
ततो व्रजन्ददर्शाग्रे तेजोराशिमुपस्थितम् ॥ ५ ॥
त्या वार्‍याने सर्वांना त्रस्त केले. धुळीचा वर्षाव करीत त्या वार्‍याने सर्वांचे डोळे मिटावयास लावले. त्यानंतर दशरथ पुढे जात असतानाच एक तेजोगोल समोरून येत असलेला त्यांना दिसला. (५)

कोटिसूर्यप्रतीकाशं विद्युत्पुञ्जसमप्रभम् ।
तेजोराशिं ददर्शाथ जमदग्न्यं प्रतापवान् ॥ ६ ॥
नीलमेघनिभं प्रांशुं जटामण्डलमण्डितम् ।
धनुःपरशुपाणिं च साक्षात् कालं इवान्तकम् ॥ ७ ॥
कार्तवीर्यान्तकं रामं दृप्तक्षत्रियमर्दनम् ।
प्राप्तं दशरथस्याग्रे कालमृत्युमिवापरम् ॥ ८ ॥
त्यानंतर कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी, विजेच्या पुंजाप्रमाणे कांतिमय, तेजाने संपन्न, निळ्या मेघाप्रमाणे तेज असणारे, उंच, जटाजूटाने विभूषित, हातामध्ये धनुष्य आणि परशू धारण करणारे, प्राण्यांचा नाश करणार्‍या साक्षात् काळाप्रमाणे भासणारे, असे जमदग्निपुत्र परशुराम येत आहेत, असे त्या प्रतापी दशरथ राजांना समोर दिसले. कार्तवीर्य अर्जुनाचा वध करणारे, गर्विष्ठ क्षत्रियांच्या अभिमानाचे मर्दन करणारे, जणू दुसर्‍या यमराजाप्रमाणे असणारे, अशा जमदग्निनंदन परशुरामांना पराक्रमी दशरथांनी पाहिले. (६-८)

तं दृष्ट्‍वा भयसंत्रस्तो राजा दशरथस्तदा ।
अर्घ्यादिपूजां विस्मृत्य त्राहि त्राहीति चाब्रवीत् ॥९ ॥
दण्डवत्प्रणिपत्याह पुत्रप्राणं प्रयच्छ मे ।
इति ब्रुवन्तं राजानमनादृत्य रघूत्तमम् ॥ १० ॥
उवाच निष्ठुरं वाक्यं क्रोधात्प्रचलितेन्द्रियः ।
त्वं राम इति नाम्ना मे चरसि क्षत्रियाधम ॥ ११ ॥
त्यांना पाहताच महाराज दशरथ भयभीत झाले. आणि अर्घ्य इत्यादींनी त्याची पूजा करण्याचे विसरून जाऊन, 'रक्षण करा, रक्षण करा,' असे म्हणू लागले. दंडवत प्रणाम करून ते म्हणाले, "माझ्या पुत्राचे रक्षण करा." अशी प्रार्थना करणार्‍या त्या राजाकडे मुळीच लक्ष न देता, क्रोधाने ज्यांचे अंग थरथरत आहे असे परशूराम रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांना निष्ठुरपणे म्हणाले, "अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्याच नावाने व्यवहार करीत आहेस. (९-११)

द्वन्द्वयुद्धं प्रयच्छाशु यदि त्वं क्षत्रियोऽसि वै ।
पुराणं जर्जरं चापं भङ्‌क्त्वा त्वं कथ्यसे मुधा ॥१२
अस्मिंस्तु वैष्णवे चापे आरोपयसि चेद्‍गुणम् ।
तदा युद्धं त्वया सार्धं करोमि रघुवंशज ॥ १३ ॥
नो चेत्सर्वान्हनिष्यामि क्षत्रियान्तकरो ह्यहम् ।
इति ब्रुवति वै तस्मिंश्चचाल वसुधा भृशम् ॥ १४ ॥
अन्धकारो बभूवाथ सर्वेषामपि चक्षुषाम् ।
रामो दाशरथिर्वीरो वीक्ष्य तं भार्गवं रुषा ॥ १५ ॥
धनुराच्छिद्य तद्धास्तादारोप्य गुणमञ्जसा ।
तूणीराद्‌बाणमादाय संधायाकृष्य वीर्यवान् ॥ १६ ॥
उवाच भार्गवं रामं शृणु ब्रह्मन् वचो मम ।
लक्ष्यं दर्शय बाणस्य ह्यमोघो मम सायकः ॥ १७ ॥
तेव्हा जर तू खरा क्षत्रिय असशील तर चट्दिशी माझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध कर. एक जुने-पुराणे, जीर्ण-शीर्ण धनुष्य तोडून तू उगाच प्रौढी मिरवत आहेस. हे राघवा, जर या वैष्णव धनुष्याला तू दोरी लावलीस, तर मी तुझ्याबरोबर युद्ध करीन नाहीतर मी आताच तुम्हां सर्वांना ठार करीन. कारण मी क्षत्रियांचा अंत करणारा आहे. " परशुराम असे बोलत असता, पृथ्वी चळचळा कापू लागली आणि सर्वांच्या डोळ्यापुढे अंधकार पसरला. तेव्हा दशरथनंदन, वीरश्रेष्ठ, रामांनी परशूरामांकडे रागाने पाहिले आणि त्यांच्या हातातून धनुष्य हिसकावून घेतले, सहजपणे त्याच्यावर दोरी चढविली, भात्यांतून एक बाण घेतला, तो धनुष्याला जोडला, आणि मग दोरी खेचून पराक्रमी श्रीराम भृगुनदन परशूरामाला म्हणाले, "अरे ब्राह्मणा, माझे वचन ऐका. माझा बाण हा अमोघ आहे; त्या बाणाचे लक्ष्य दाखवा. (१२-१७)

लोकान्पादयुगं वापि वद शीघ्रं ममाज्ञया ।
अयं लोकः परो वाथ त्वया गन्तुं न शक्यते ॥ १८ ॥
आपल्या पुण्याने जिंकलेले लोक अथवा तुमचे दोन चरण यांपैकी एक, बाणाचे लक्ष्य म्हणून माझ्या आज्ञेने ताबडतोब सांगा. त्याचा वेध मी या बाणाने करीन. त्यामुळे तुम्ही इहलोकी व परलोकी कोठेही जाऊ शकणार नाही. (१८)

एवं त्वं हि प्रकर्तव्यं वद शीघ्रं ममाज्ञया ।
एवं वदति श्रीरामे भार्गवो विकृताननः ॥ १९ ॥
मी तुमच्याबरोबर कसे वागावे हे आता तुम्ही चट्‌कन माझ्या आज्ञेने मला सांगा." रामचंद्र असे बोलत असतानाच भृगुनदन परशुरामाचे मुख निस्तेज झाले. (१९)

संस्मरन्पूर्ववृत्तान्तमिदं वचनमब्रवीत् ।
राम राम महाबाहो जाने त्वां परमेश्वरम् ॥ २० ॥
मग पूर्वीच्या वृत्तांताचे स्मरण करीत ते बोलले, "अहो रामा, अहो महाबाहो, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आता कळले आहे. (२०)

पुराणपुरुषं विष्णुं जगत्सर्गलयोद्‌भवम् ।
बाल्येऽयं तपसा विष्णुमाराधयितुमञ्जसा ॥ २१ ॥
चक्रतीर्थं शुभं गत्वा तपसा विष्णुमन्वहम् ।
अतोषयं महात्मानं नारायणमनन्यधीः ॥ २२ ॥
विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय यांचे कारण असणारे पुराण पुरुष भगवान विष्णू तुम्ही आहात. बालपणी मी भगवान विष्णूंची तापाने आराधना करण्यासाठी पवित्र अशा चक्रतीर्थावर गेलो होतो. तेथे दररोज अनन्य बुद्धीने मी तप करीत असता परमात्म्या नारायणांना मी संतुष्ट केले. (२१-२२)

ततः प्रसन्नो देवेशः शङ्‌खचक्रगदाधरः ।
उवाच मां रघुश्रेष्ठ प्रसन्नमुखपङ्‌कजः ॥ २३ ॥
त्या वेळी हे रघुश्रेष्ठा, शंख, चक्र व गदा धारण करणार्‍या आणि प्रसन्न मुखकमल असणार्‍या देवेश्वर विष्णूंनी प्रसन्न होऊन मला सांगितले. (२३)

श्रीभगवानुवाच
उत्तिष्ठ तपसो ब्रह्मन्फलितं ते तपो महत् ।
मच्चिदंशेन युक्तस्त्वं जहि हैहयपुङ्‌गवम् ॥ २४ ॥
कार्तवीर्यं पितृहणं यदर्थं तपसः श्रमः ।
ततस्त्रिःसप्तकृत्वस्त्वं हत्वा क्षत्रियमण्डलम् ॥ २५ ॥
कृत्स्नां भूमिं कश्यपाय दत्त्वा शान्तिमुपावह ।
त्रेतामुखे दाशरथिर्भूत्वा रामोऽहमव्ययः ॥ २६ ॥
उत्पत्स्ये परया शक्त्या तदा द्रक्ष्यसि मां ततः ।
मत्तेजः पुनरादास्ये त्वयि दत्तं मया पुरा ॥ २७ ॥
तदा तपश्चरँल्लोके तिष्ठ त्वं ब्रह्मणो दिनम् ।
इत्युक्त्वान्तर्दधे देवः तथा सर्वं कृतं मया ॥ २८ ॥
श्रीभगवान् म्हणाले-"हे ब्राहाणा, तपस्या सोडून तू आता ऊठ. तुझे महान तप सफल झाले आहे. माझ्या चैतन्याच्या अंशाने तू युक्त झालास. ज्याच्यासाठी हे तप करण्याचे श्रम तू घेतले आहेस, त्या तुझ्या पित्याचा घात करणार्‍या हैहयश्रेष्ठ कार्तवीर्याचा वध कर; त्यानंतर एकवीस वेळा सर्व क्षत्रियांना ठार करून, संपूर्ण पृथ्वीकडे कश्यपाला दान देऊन, शांती धारण कर. अविनाशी परमात्मा असा मी त्रेतायुगाच्या प्रारंभी दशरथाचा पुत्र होऊन राम या नावाने जन्मास येईन. त्या वेळी सीता या माझ्या शक्तीसह मला तू पाहाशील. त्यानंतर पूर्वी तुला दिलेले माझे तेज मी पुनः तुझ्याकडून परत घेईन. नंतर तू तपस्या करीत ब्रह्मदेवाच्या एका दिवसापर्यंत - कल्पांतापर्यंत या पृथ्वीवर राहा," असे सांगून ते भगवान विष्णू अंतर्धान पावले आणि मग त्यांनी जसे सांगितले होते, तसेच मी केले. (२४-२८)

स एव विष्णुस्त्वं राम जातोऽसि ब्रह्मणार्थितः ।
मयि स्थितं तु त्वत्तेजस्त्वयैव पुनराहृतम् ॥ २९ ॥
हे रामा, ते विष्णू तुम्ही आहात. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेला अनुसरून, तुम्ही जन्माला आलेले आहात. तुमचे जे तेज माझ्या ठिकाणी होते ते तुम्हीच आज परत घेतले आहे. (२९)

अद्य मे सफलं जन्म प्रतीतोऽसि मम प्रभो ।
ब्रह्मादिभिरलभ्यस्त्वं प्रकृतेः पारगो मतः ॥ ३० ॥
हे प्रभू तुम्हांला विष्णूच्या रूपात मी ओळखले आहे. म्हणून आज माझा जन्म सफल झाला आहे. ब्रह्मदेव इत्यादींना तुम्ही अप्राप्य आहात आणि प्रकृतीच्या पलीकडे आहात, असे मानले जाते. (३०)

त्ययि जन्मादिषड्भावा न सन्त्यज्ञानसंभवाः ।
निर्विकारोऽसि पूर्णस्त्वं गमनादिविवर्जितः ॥ ३१ ॥
अज्ञानामुळे निर्माण होणारे जन्म इत्यादी सहा विकार तुमच्या ठिकाणी नाहीत. तुम्ही गमन इत्यादींनी रहित, विकारांनी रहित आणि पूर्ण आहात. (३१)

यथा जले फेनजालं धूमो वह्नौ तथा त्वयि ।
त्वदाधारा त्वद्विषया माया कार्यं सृजत्यहो ॥ ३२ ॥
यावन्मायावृता लोकास्तावत्त्वां न विजानते ।
अविचारितसिद्धैषाऽविद्या विद्याविरोधिनी ॥ ३३ ॥
अहो आश्चर्य ! पाण्यापासून पाण्यावर जसा फेसाचा समूह, अग्नीपासून अग्नीवर जसा धूर उत्पन्न होतो आणि त्यालाच झाकून टाकतो, त्याप्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हांला विषय करून, नाना प्रकारची विचित्र कार्य निर्माण करते आणि तुमच्या खर्‍या स्वरूपाला झाकते. जोपर्यंत माणसे मायेने झाकलेली असतात, तोपर्यत ती तुम्हांला जाणत नाहीत. अविवेकामुळे उत्पन्न झालेली ही अविद्या विद्येला विरोधी आहे. जोपर्यंत विचार केला जात नाही तोपर्यत ती अविद्या टिकून राहाते. (३२-३३)

अविद्याकृतदेहादिसङ्‌घाते प्रतिबिम्बिता ।
चिच्छक्तिर्जीवलोकेऽस्मिन् जीव इत्यभिधीयते ॥ ३४ ॥
अविद्येने निर्माण झालेल्या देह इत्यादींच्या संघातामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चित्-शक्तीला या जीवलोकात जीव असे म्हटले जाते. (३४)

यावद्देहमनःप्राणबुद्ध्यादिष्वभिमानवान् ।
तावत्कर्तृत्वभोक्तृत्व सुखदुःखादिभाग्भवेत् ॥ ३५ ॥
जोपर्यंत हा जीव, मन, प्राण, बुद्धी इत्यादींच्याबद्दल अभिमान धारण करतो, तोपर्यंत तो कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी भोगतो. (३५)

आत्मनःसंसृतिर्नास्ति बुद्धेर्ज्ञानं न जात्विति ।
अविवेकाद्‌द्वयं युङ्‌क्त्वा संसारीति प्रवर्तते ॥३६ ॥
वास्तविक पाहता आत्म्याला जन्म, मरण इत्यादी संसार कोणत्याही अवस्थेत असत नाही आणि बुद्धी ही अविद्येचे कार्य असल्यामुळे तिच्या ठिकाणीसुद्धा ज्ञानशक्ती असत नाही. अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून, 'मी संसारी आहे', असे मानून जीव क्ये करण्यास प्रवृत्त होतो. (३६)

जडस्य चित्समायोगाच्चित्त्वं भूयाच्चितेस्तथा ।
जडसङ्‌गाज्जडत्वं हि जलाग्न्योर्मेलनं यथा ॥ ३७ ॥
पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता ज्या प्रमाणे पाण्यात उष्णता येते आणि अग्नी शांत होतो, त्या प्रमाणे जडबुद्धीचा चेतन आत्म्याशी संयोग झाला असताना, बुद्धीमध्ये चेतना येते आणि चेतन आत्म्याचा जड बुद्धीशी संयोग झाला असताना त्या चेतन आत्म्याचे ठिकाणी (कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी) जडत्व प्रकट होते. (३७)

यावत्त्वत्पादभक्तानां सङ्‌गसौख्यं न विन्दति ।
तावत्संसारदुःखौघान्न निवर्तेन्नरः सदा ॥ ३८ ॥
हे रामा, जोपर्यंत मनुष्य तुमच्या चरणकमळी स्थित भक्तांच्या संगतीचे सौख्य निरंतर प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत तो संसारातील दुःखसमूहातून सुटत नाही. (३८)

तत्सङ्‌गलब्धया भक्त्या यदा त्वां समुपासते ।
तदा माया शनैर्याति तानवं प्रतिपद्यते ॥ ३९ ॥
जेव्हा तुमच्या भक्तांच्या संगतीने प्राप्त झालेल्या भक्तीमुळे मनुष्य तुमची उपासना करतो, तेव्हा तुमची माया हळूहळू निघून जाऊन ती क्षीण होऊन जाते. (३९)

ततस्त्वज्ज्ञानसम्पन्नः सद्‍गुरुस्तेन लभ्यते ।
वाक्यज्ञानं गुरोर्लब्ध्वा त्वत्प्रसादाद्विमुच्यते ॥ ४० ॥
मग त्या साधकाला तुमच्या ज्ञानाने संपन्न अशा सद्‌गुरूची प्राप्ती होते आणि त्या सद्‌गुरुदेवाकडून महावाक्याचे ज्ञान मिळाल्यावर, तो तुमच्या कृपेने मुक्त होतो. (४०)

तस्मात्त्वद्‌भक्तिहीनानां कल्पकोटिशतैरपि ।
न मुक्तिशङ्‌का विज्ञानशङ्‌का नैव सुखं तथा ॥ ४१ ॥
म्हणून तुमच्या भक्तीने रहित अशा पुरुषांना शेकडो कोटी कल्पांमध्येसुद्धा मुक्ती मिळणे अथवा ब्रह्मज्ञान प्राप्त होणे हे संभवनीय नाही आणि म्हणून त्यांना वास्तविक सुख प्राप्त होणे हेसुद्धा संभवनीय नाही. (४१)

अतस्त्वत्पादयुगले भक्तिर्मे जन्म जन्मनि ।
स्यात्त्वद्‌भक्तिमतां सङ्‌गोऽविद्या याभ्यां विनश्यति ॥ ४२ ॥
म्हणून तुमच्या चरणयुगलांवर माझी जन्मोजन्मी भक्ती असू दे. तसेच तुमच्या भक्तांची संगती मला मिळू दे. कारण या दोन्ही साधनांनी अविद्या नष्ट होते. (४२)

लोके त्वद्‌भक्तिनिरतास्त्वद्धर्मामृतवर्षिणः ।
पुनन्ति लोकमखिलं किं पुनः स्वकुलोद्‌भवान् ॥४३ ॥
जगात तुमच्या भक्तीमध्ये तत्पर आणि भगवद् धर्मरूपी अमृताचा वर्षाव करणारे तुमचे भक्त हे संपूर्ण जगाला पवित्र करतात; मग त्यांच्या स्वतःच्या कुळात उत्पन्न झालेल्या माणसांविषयी काय सांगावे ? (४३)

नमोऽस्तु जगतां नाथ नमस्ते भक्तिभावन ।
नमः कारुणिकानन्त रामचन्द्र नमोऽस्तु ते ॥ ४४ ॥
हे जगन्नाथा, तुम्हांला नमरकार असो. हे भक्ति-भावना, तुम्हांला नमरकार असो. हे करुणामया, हे अनंता, तुम्हांला नमरकार असो. हे रामचंद्रा, तुम्हांला नमरकार असो. (४४)

देव यद्यत्कृतं पुण्यं मया लोकजिगीषया ।
तत्सर्वं तव बाणाय भूयाद्‌राम नमोऽस्तु ते ॥ ४५ ॥
हे देवा, पुण्यलोकांच्या प्राप्तीसाठी जे काही पुण्यकर्म मी केले आहे, ते सर्व तुमच्या बाणाचे लक्ष्य होऊ दे. हे रामा, तुम्हांला नमरकार असो." (४५)

ततः प्रसन्नो भगवान् श्रीरामः करुणामयः ।
प्रसन्नोऽस्मि तव ब्रह्मन्यत्ते मनसि वर्तते ॥ ४६ ॥
दास्ये तदखिलं कामं मा कुरुष्वात्र संशयम् ।
ततः प्रीतेन मनसा भार्गवो राममब्रवीत् ॥ ४७ ॥
तेव्हा करुणामय भगवान श्रीरामचंद्रांनी प्रसन्न होऊन म्हटले, "अरे ब्राह्मणा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. या बाबतीत तुम्ही मुळीच संशय धरू नका." तेव्हा आनंदित मनाने परशुराम श्रीरामांना म्हणाले. (४६-४७)

यदि मेऽनुग्रहो राम तवास्ति मधुसूदन ।
त्वद्‌भक्तसङ्‌गस्त्वत्पादे दृढा भक्तिः सदास्तु मे ॥ ४८ ॥
"हे मधुसूदना, रामा, जर तुमची माझ्यावर कृपा असेल, तर मला सदा तुमच्या भक्तांची संगती प्राप्त होवो आणि तुमच्या चरणकमळांवर माझी सुदृढ भक्ती असू दे. (४८)

स्तोत्रमेतत्पठेद्यस्तु भक्तिहीनोऽपि सर्वदा ।
त्वद्‌भक्तिस्तस्य विज्ञानं भूयादन्ते स्मृतिस्तव ॥४९ ॥
तसेच एखादा पुरुष भक्ति-रहित असूनसुद्धा तो जर या स्तोत्राचे पठन करील, तर त्याला सर्वदा तुमची भक्ती प्राप्त होवो, तसेच त्याला ज्ञान प्राप्त होवो आणि त्याला अंतकाळी तुमची स्मृती राहो." (४९)

तथेति राघवेणोक्तः परिक्रम्य प्रणम्य तम् ।
पूजितस्तदनुज्ञातो महेन्द्राचलमन्वगात् ॥ ५० ॥
त्यानंतर "असेच होऊ दे" असे रघुनाथांनी म्हटल्यावर, परशूरामांनी श्रीरामांना प्रदक्षिणा घालून त्यांना नमरकार केला आणि त्यांच्याकडून सन्मानित झाल्यावर, त्यांच्याच आज्ञेने ते महेंद्र पर्वताकडे निघून गेले. (५०)

राजा दशरथो हृष्टो रामं मृतमिवागतम् ।
आलिङ्‌ग्यालिङ्‌ग्य हर्षेण नेत्राभ्यां जलमुत्सृजत् ॥ ५१ ॥
श्रीराम जणू मृत्यु-मुखातून परत आले असे समजून राजा दशरथांनी अत्यंत हर्षाने रामांना वारंवार आलिंगन दिले. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. (५१)

ततः प्रीतेन मनसा स्वस्थचित्तः पुरं ययौ ।
रामलक्ष्मणशत्रुघ्नभरता देवसंमिताः ।
स्वां स्वां भार्यां उपादाय रेमिरे स्वस्वमन्दिरे ॥ ५२ ॥
त्यानंतर स्वस्थ चित्त झालेले दशरथ आनंदित मनाने अयोध्या नगरीला गेले. तेथे पोचल्यावर राम, लक्ष्मण, भरत व शत्रघ्न हे आपापल्या भार्यासह आपापल्या महालात देवांप्रमाणे रमू लागले. (५२)

मातापितृभ्यां संहृष्टो रामः सीतासमन्वितः ।
रेमे वैकुण्ठभवने श्रिया सह यथा हरिः ॥ ५३ ॥
ज्या प्रमाणे वैकुंठ लोकात भगवान विष्णू लक्ष्मीसह रमतात, त्या प्रमाणेच आपल्या माता-पित्यांचा आनंद वाढवीत श्रीरामचंद्र सीतेसह रमू लागले. (५३)

युधाजिन्नाम कैकेयीभ्राता भरतमातुलः ।
भरतं नेतुमागच्छत्स्वराज्यं प्रीतिसंयुतः ॥ ५४ ॥
काही काळानंतर युधाजित नावाचा कैकेयीचा भाऊ, भरताचा मामा- हा प्रेमाने भरताला आपल्या राज्यात नेण्यासाठी आला. (५४)

प्रेषयामास भरतं राजा स्नेहसमन्वितः ।
शत्रुघ्नं चापि संपूज्य युधाजितमरिन्दमः ॥ ५५ ॥
शत्रूचे दमन करणार्‍या महाराज दशरथांनी प्रेमपूर्वक युधाजिताचा सत्कार करून भरत आणि शत्रुघ्न या दोघांना त्याच्याबरोबर पाठवून दिले. (५५)

कौसल्या शुशुभे देवी रामेण सह सीतया ।
देवमातेव पौलोम्या शच्या शक्रेण शोभना ॥ ५६ ॥
इकडे ज्या प्रमाणे देवांची माता अदिती ही पुलोम-पुत्री शची आणि इंद्र यांसह शोभते त्याप्रमाणे राम व सीता यांच्यासह देवी कौसल्या शोभत होती. (५६)

साकेते लोकनाथप्रथितगुणगणो
    लोकसङ्‌गीतकीर्तिः
श्रीरामः सीतयास्तेऽखिलजननिकरा
    नन्दसन्दोहमूर्तिः ।
नित्यश्रीर्निर्विकारो निरवधिविभवो
    नित्यमायानिरासो
मायाकार्यानुसारी मनुज इव सदा
    भाति देवोऽखिलेशः ॥ ५७ ॥
ज्यांच्या गुणांचे समूह (ब्रह्मदेव इत्यादी) सर्व लोकपालांमध्ये प्रसिद्ध आहेत, ज्यांची कीर्ती सर्व लोकांमध्ये गाईली जात आहे, जे सर्व माणसांच्या आनंद-समूहाची मूर्ती आहेत, जे नित्य शोभाधाम आहेत, जे निर्विकार, आणि अनंत वैभवाने युक्त आहेत आणि जे सदा मायातीत असूनसुद्धा मायेच्या कार्याचे अनुसरण करीत असल्यामुळे नेहमी सामान्य माणसाप्रमाणे प्रतीत होतात, असे ते सर्वांचे स्वामी देव, भगवान राम हे सीतेसह अयोध्या नगरीत राहू लागले. (५७)


इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
बालकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥ ॥ समाप्तमिदं बालकाण्डम् ॥
सप्तम सर्गः समाप्त ॥ ७ ॥
बालकाण्ड समाप्तGO TOP