॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चौर्‍याहत्तरावा ॥
भरताकडूण गंधर्वाचा पराजय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


आकाशवाणीचें उत्तर । ऐकोनियां श्रीरघुवीर ।
करी धरोनियां कुमर । यज्ञशाळॆ प्रवेशला ॥१॥
क्रमोनियां तेथे शर्वरी । प्रातःकाळीं दूषणारी ।
स्नानसंध्या करोनि ते अव्सारी । ऋषींसहित बैसला ॥२॥
सभामंडळीं थोर थोर । मिळाले राक्षस वानर ।
प्रधान सेनानायक ऋषिष्वर । नगरींचें नागरिक लोक ॥३॥
आज्ञा देवोनि लहुकुशांतें । श्रीरामें आरंभिलें रामकथेंतें ।
ऐकतां सुख व वाटे चित्तें । परम व्याकुळ पैं झाला ॥४॥
पाहूं लागला चहूंकडे । न देखे जानकीचें रूपडें ।
म्हणे दिशा दृष्टी उद्वस पडे । अंधकार दाटूनी ॥५॥
माझिये जानकीवीण । उद्वस अवघे विरंचिभुवन ।
मज राज्याची चाड कोण । सभा विसर्जून ऊठिला ॥६॥
नावडे राज्यभोगोपचार । नावडे छत्रचामर ।
नावडे गायन सुस्वर । अवस्था थोर सीतेची ॥७॥
नावडेशास्त्रव्याख्यान । नावडे ध्रुवपदश्रवण ।
नावडे हरिकथाकीर्तन । चिंता गहन सीतेची ॥८॥
नावडे पारधी वनविहार । नावडे राज्यपदींचा दळभार ।
नावडे इष्ट बंधु सहोदर । नावडती प्रकार वाद्यांचे ॥९॥
सीतेची गौरवर्ण तन । निंबलोणा ओंवाळिजे कोटि मदन ।
जीतें देखोनि कनकहरण । पक्षिगण भूलले ॥१०॥
जानकीचेनि सुंदरपणें । उदरा येईजे मदनें ।
ते रुपें श्रीरघुनंदनें । ध्यानमुद्रेस आणिलें ॥११॥
ध्यानीं आणोनियां सीता । हृदयीं धरोनि झाला ध्याता ।
पुढें काय वर्तली कथा । ते सावधान श्रोतें अवधारा ॥१२॥


यज्ञे यज्ञे प्रकुरुते सीता यत्र हिरण्यमयी ।
दशवर्षसहस्त्राणि वाजपेयमुपागतम् ॥१॥
वाजपेया दशशता बहुसौवर्णदक्षिणाः ।
अग्निष्टोमातिरात्राभ्यां गोसवश्च ग्रहासवैः ॥२॥
ईजे क्रतुशतैरन्यैः स श्रीरामः सदक्षिणैः ।
एवं स कालः सुमहान् राघवस्य महात्मनः ॥३॥


यज्ञ करी श्रीररघुनाथ । दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ।
सीता सुवर्णाची केली होती तीसहित । यागादि कर्मे संपादी ॥१३॥
दहा सहस्त्र वर्षेवरी । याग करितां पैलस्त्यारी ।
सुवर्णदक्षिणा भारी । ऋषींलागीं देतसे ॥१४॥
तरी ते याग कोण कोण । सांगेन तयांचें नामाभिधान ।
यज्ञामागें जो जो यज्ञ । अनुक्रमें परियेसा ॥१५॥
वाजपेया ज्योतिष्टोम । तिजा अतिरात्र ।
गोसव ऐसा चतुर्थ परम । ग्रहासव पंचम अवधारा ॥१६॥
अश्वमेध नाम सहाव्याचें । चैत्य सप्तम जाणा साचें ।
आणिकही नानापरींचे । साचे याग बहुविध केले ॥१७॥
ऐसिये प्रकारें सकळ यज्ञ । करी श्रीराम रविकुळ भूषण ।
द्विजां देवोनि बहु सुवर्ण । काळ क्रमी यापरी ॥१८॥
राज्य करितां श्रीरघुनाथ । त्रैलोक्यींचे भूप वंदिती माथां ।
ऋक्षां आणि कपीतें समस्तां । श्रीरामाज्ञा प्रमाण ॥१९॥


काले वर्षतु पर्जन्यः सुमिक्षं विमला दिशः ।
हृष्टपुष्टजनाकीर्णं पुरंदरपदं यथा ॥४॥
न बालो प्रियते कश्चिद्रामे राज्यं प्रशासति ।
नाधर्मो विद्यते कश्चिन्न व्याधिः प्रणिनां क्वचित् ॥५॥

रामराज्याची थोरवी :

श्रीरामाज्ञा काळाचे शिरीं । यथाकाळीं मेघ वृष्टि करी ।
तेणें धान्यें महीवरी । उत्पन्न होती बहुसाल ॥२०॥
सदाकाळ सुभिक्ष । पातकाचें परम दुर्भिक्ष ।
चंद्र आणि दिनेश । सौम्यतेजें तपताती ॥२१॥
दिशा विमला प्रकाशकरा । नाहीं अभ्र धुई वारा ।
धष्ट पुष्ट जन नगरा । माजी वास करिताती ॥२२॥
जैसी पुरंदराची नगरी । तीहूनि विशेष साकेतपुरी ।
मृत्युचें भय स्वप्नजागरीं । बाळकांते नाहीं कल्पातीं ॥२३॥
श्रीरामाचे आज्ञेकरून । काळ बंदीं श्रीरामचरण ।
श्रीरामराज्याचा धाक गहन । दूत लोटांगण यमाचे करिती ॥२४॥
अधर्माची नाहीं वार्ता । घरोघरीं श्रीरामकथा ।
व्याधि रोग जरा व्यथा । रामराज्यीं पैं नाहीं ॥२५॥
ऐसें बहुकाळवरी श्रीरामें । पुत्रपैत्रांसहित नेमें ।
राज्य केलें परम धर्मे । बंधुसुहृदांसहित पैं ॥२६॥
पुढील कथा कौतुकालहरी । वाल्मीकमुखिंची वागीश्वरीं ।
कवित्व तारूं भवसागरीं । उत्तरावया जना घातलें ॥२७॥
या तारुवाचे जो स्मरण करी । तया भय नाहीं संसारीं ।
याचें जो श्रवण करी । तया श्रीहरि सन्निध ॥२८॥
या तारुवाचा जो भक्त । कैलासनाथचि तत्वतां ।
पार्वतीसहित एकांता । माजी कथा श्रीरामाच्या ॥२९॥
कथेसि झाली आडकथा । पैस न म्हणावें श्रोतां ।
रंगीं नृत्य करितकरितां । त्याग येवोनियां पडे ॥३०॥
अध्ययनाचेनि प्रसंगे । अनध्याय तो पडे मार्गे ।
तैसें कथेचेनि रंगे दृष्टांत पुढे येऊ ठाके ॥३१॥
तंव श्रोते म्हणती वक्तव्या । पुढील कथा सांगावया ।
सद्गुरु स्मरोनि लवलाह्या । कथामार्ग चालवीं ॥३२॥
ऐकोनि श्रोतयांचें वचन । आनंदें निवाला एका जनार्दन ।
म्हणे स्वामी तुमचे मनोदेवतेचें प्रसन्नपण । मजलागीं पैं व्हावें ॥३३॥
तुमची कृपाकटाक्षनदी । तेथें मी तरेन पदोपदीं ।
आतां पुढील निरूपणासिद्धी । सावकाशीं अवधारा ॥३४॥

राममातांचें निधन :

रामें राज्य करितां अयोध्येसीं । बहुकाळ क्रमिला स्वधर्मेसीं ।
पुढें माता वार्धक्यतेसीं देहांतसमयो पावल्या ॥३५॥
जैसें घटींचें जीवन आटतां । प्रतिबिंबी न भासे सविता ।
तेंवी वार्हक्यें तिघी माता । देहांता पावल्या ॥३६॥
चवघां बंधूंसमवेत । उत्तरक्रिया विधानोक्त ।
दानें देवोनि द्विज तृप्त । द्वादशविधि पैं केला ॥३७॥
चवघांजणीं पिंडदाना । करोनियां गयावर्जना ।
माता उद्वरोनि स्वर्गुभुवना । दशरथापासीं पाठविल्या ॥३८॥
स्वर्गीं स्थापोनियां माता । स्वधर्मे असतां श्रीरघुनाथा ।
तंव भरतमातुलाच्या पुरोहिता । आगमन अयोध्यें पैं झालें ॥३९॥

गर्गमुनींचे अयोध्येत आगमन :

राजहेरीं श्रीरामासी । वार्ता जाणविली स्वामी परियेसी ।
पुरोहित भरतमातुलाचा गर्गऋषी । तुमचे भेटीस पैं आला ॥४०॥
अनुजांसहित रगुनंदन । सामोरा येवोनि स्वयें जाण ।
मातामहपुरोहिता देवोनि मान । राजसदना आणिला ॥४१॥
दीर्घ उपचारें करोनि पूजन । स्वपंक्तीसीं सारोनि भोजन ।
दिव्य वस्त्रें अलंकारभूषणें । गर्गऋषीसी अर्पिलीं ॥४२॥
श्रीराम म्हणे जी गर्गऋषी । वृद्धपरंपरा राजगुरु कैकेयभूपासी ।
जैसा वसिष्ठ सूर्यवंशीं । तैसे तयासी निजपूज्य ॥४३॥
ऐसे तुम्ही पूज्य थोर । विवेकवैराग्यें चतुर ।
करावया आमचा उद्धार । कृपेनें आलेति येथवरी ॥४४॥
भाग्य थोर आजि आमुचें । म्हणोनि येणें झाले तुमचें ।
कुशलत्व यजमानस्वामीचें । परिवारें क्षेम असती कीं ॥४५॥
गर्ग म्हणे श्रीरघुअराजा । क्षेमवंत तुझिया भुजा ।
प्रतापाची उभवोनि ध्वजा । दशदिशा तेजें झळकत ॥४६॥
आरिराया तोडरीं । काळ आज्ञा वंदी शिरीं ।
जयाची काठी तपे अंबरीं । तो सद्गुरु गृहामाजी ॥४७॥
कल्पवृक्ष गृहीं ज्याचे । चिंतामणी पाषाण नानापरींचे ।
नित्य दुभतें कामधेनूंचें । त्या पुरुषाचें भाग्य काय वानूं ॥४८॥
चारी वेद बंदिजन । सहाही शास्त्रें गुणवर्णन ।
अठरा पुराणें करिती स्तवन । निरंतर जयांचें ॥४९॥
तो तूं पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ द्विजांचें वाढविसी महत्व ।
देवी अकळ तुझे शरित्र । महापुरुषा श्रीरामा ॥५०॥

श्रीरामांना भेट समर्पण :

परी काहींएक किंचित तुम्हांकारणें । कैकेयाधिपें पाठविले तें अंगीकारणें ।
जैसें कल्पतरूसी पूगीफ़ल ठेवणें । आपुलिया यथानुशक्ती ॥५१॥
म्हणोनि भेटीस उत्तम वारू । जे श्यामकर्णाहूणि सुंदर ।
हां हा म्हणतांचि सत्वरू । पूर्वेचे पश्चिमे येती ॥५२॥
हकारातील अकार । वाचे करिता उच्चर ।
तंव पूर्वीच अक्षरोत्तर । चिंतिले ठायासी जातसे ॥५३॥
हकार अकारा होतां भेटी । तंव पूर्वीच दिषांचे शेवटी ।
मनोवेगचपळते उठाउठीं । उणीव होय वारूंपुढें ॥५४॥
ऐसे वारू दहा सहस्त्र । पृथ्वीस न लाविती खुर ।
रत्नाभरणीं सालंकार । श्रीरामापुढें उभे केले ॥५५॥
तदुपरी कुंजरभार । जैसे चौचरणींचे गिरिवर ।
चौदंतमंडित सालंकार । शुंडा सुंदर जयांची ॥५६॥
दोहीं कर्णी भूषणें विचित्रें । जैसी शोभती रंभापत्रें ।
तयांवरी श्वेतचामरें । दोहीं कर्णी बांधिली ॥५७॥
गुढारिले नाना अंबरीं । तैसें मेघडंबर गिरिवरीं ।
तैसेचि रथ अयुतवरी । शृंगारोनि आणिले ॥५८॥
अनेक वस्त्रें दिव्यांवरें । नाना रंगांची रुचिरें ।
मुक्ताफ़ळें पाच वैडूर्य हिरे । श्रीरामासी समर्पिले ॥५९॥
दिव्य रत्नांचिया माळा । समर्पिल्या घननीळा ।
अनेक जातींचिया पक्षिकुळा । भेटी श्रीरामासी दिधली ॥६०॥
हे भेटी समर्पोनि श्रीरामासी । आसनीं बैसलासे ऋषी ।
श्रीराम म्हणे गर्गासी । अपूर्व आम्हांसी पाठविलें ॥६१॥
आम्हीं पुवीं नाही आयकिलें । तें मातुळें प्रीतीनें पाठविले ।
विशेष तुमची पाउले । दृष्टी देखिलीं गर्गमुनें ॥६२॥


रामस्य भाषितं श्रुत्वा महर्षिः कार्यविस्तरम् ।
वक्तुमुद्भूतांतरात्मा राघवायोपचक्रमे ॥६॥
सुधाजित्प्रीतिसंयुक्तः श्रीयतां यदि रोचते ।
अथ गंधर्वरचितः फ़लमूलोपशोभितः ॥७॥
सिंधोरुभयतः पार्श्वै देशः परमशोभनः ।
तं तु रक्षंति गंधर्वाः सायुधा युद्धकांक्षिणः ॥८॥
शैलूषस्य सुता वीरस्तिस्राः कोट्या महाबलाः ।
तांस्तु निर्जित्य काकुत्स्थ गंधर्वनगरं शुभम् ॥९॥
निवेशय महाराज पुरे द्वे सुसमाहितः ।
अन्यस्थ न गतिस्तस्त्र देशश्चायं सुशोभनः ॥१०॥
रोचतां ते महाबाहो न हि वः सदृशं भवेत् ॥११॥


दाशरथींचें ऐकोनि वचन । ह्र्दरीं निवाला ब्राह्मण ।
जैसें वसंतीं कोकिळालापन । निववी मन पांथकांचें ॥६३॥
ऐस्यापरी गर्गऋषी । सविस्तर सांगे श्रीरामासी।
म्हणे तुमच्या मातुळॆ महत्कार्यासीं । पाठविलें राजेंद्रा ॥६४॥

गंधर्वनगरी जिंकूण घेण्याचा भरताच्या मामाचा संदेश :

ते कोण काय किंलक्षण । युधाजित कैकेयनंदन ।
जो कां तुम्हां मातुल जाण । प्रिय बहु भरतासी ॥६५॥
तुमच्या ठायीं त्याची प्रीती । बहुत आर्त जी रघुपती ।
जैसी धेनु वत्सा चिंती । चकोर चीती चंद्रातें ॥६६॥
युधाजितें तुम्हालागून । रुचे ऐसें माझ्या मुखें कथन ।
करविलें तें सावधान । बंधूसमवेत अवधारा ॥६७॥
सिंधिनदीचे उभय तीरीं । पुष्पीं फ़ळीं अति साजिरी ।
गंधर्वीं वर्सविली नगरी । जे सुरासुरीं अतर्क्य ॥६८॥
तेथील राजे गंधर्व जाण । सिंधुदेशाचें करिती पाळण ।
तयांचें तीस कोटी सैन्य । युद्धीं आंगवण बहुसाल तयां ॥६९॥
श्रीराम जिंतोनि त्यातें । नगरें दोन वसवावीं तेथें ।
ऐसें सांगोनि युधाजितें । मजलागीं पाठविलें ॥७०॥
काळासी प्रवेश नाहीं तेथ अन्यत्र साधारणाची कोण मात ।
तूं काळाचा काळात्मा श्रीरघुनाथ । युद्धीं गंधर्व विभांडीं ॥७१।
जरी येईल तुझिया मना । तरी विलंब न करीं श्रीरघुनंदना ।
जसे वृद्धाविवाहीं लग्ना । अति त्वरा करावीं ॥७२॥


तच्छ्रुत्वा राघवः प्रीतो कहर्षेरतुलं वचः ।
उवाच वाढमित्येव भरतं चान्ववैक्षत ॥१२॥
सोऽब्रवीद्राघवो हृष्टः प्रांजलिप्रग्रहो द्विजम् ।
इमौ कुमारौ विप्रर्षे तंदेशं विजयिष्यतः ॥१३॥
भरतस्यात्मजौ वीरौ तक्षः पुष्कर एव च ।
मातुलेन च गुप्तौ वै धर्मेण सुसमाहितौ ॥१४॥
भरतस्त्वग्रतः कृत्वा कुमारौ च पदानुगौ ।
निहत्य गंधर्वसुतान्पुरे द्वे तु करिश्यति ॥१५॥
निवेश्यते पुरे रम्ये स्वात्मजौ विनिवेश्य च ।
आगमिष्यति मे ब्रह्मन्समीपे स तु धार्मिकः ॥१६॥
एवमुक्त्वा तु ब्रह्मर्षि भरतं सबलानुगम् ।
आज्ञापयामास ततः कुमारावभ्यर्षिंचयत् ॥१७॥
नक्षत्रेण च सौम्येन पुरस्कृत्यांगिरस्तुतम् ।
भरतः सेनया सार्धं कुमारौ च विसर्जितौ ॥१८॥

भरतपुत्रांना राज्याभिषेक व भरताचे युद्धार्थ गमन :

युधाजित पुरोहिताचें वचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
संतोषें न माये गगन । ऐसा उल्हास पैं झाला ॥७३॥
तें वचन तरी विचारितां कैसें । वैराग्यसिंधूचें भरितें जैसें ।
कीं आनंदवनींछें हंस । कीं मानसें योगियांची ॥७४॥
कीं चिदाकाशीं बोधदिनकरू । कीं धैर्यगगनींचा अढळ धुरू ।
कीं नवविधभक्तीचा शृंगारू ।शब्दरूपें प्रकटला ॥७५॥
ऐसें वचन गर्गमुनीचें । परिसोनि हृदय श्रीरामाचें ।
निवालें मग म्हणे सुवाचे । बरवें वदलेति ऋषिराजा ॥७६॥
आजि संतोष माझिया चित्त । झाला जी मातुलपुरोहिता ।
हे भरतात्मज दोघे तत्वतां गंधर्वदेशीं राज्य करोत ॥७७॥
हे दोघे भरत नंदन । तक्ष पुष्पक यांचे अभिधान ।
मातामहाचे प्रिय पूर्ण । पढियंते जाण मातुलासी ॥७८॥
या दोघां पुत्रांसहित । पुढें करोनियां भरत ।
पायदळसेना अमित । युद्धालागीं नेईजे ॥७९॥
सेनेसहित राजा भरत । युद्धीं जिंतील गंधर्व समस्त ।
पुरें दोनी वसवोनि तेथ । पुत्रां राज्य देईल ॥८०॥
नूतन वसवोनि पुरद्वयासी । राज्यीं स्थापील निजपुत्रांसी ।
विजयी होवोनि भेटीसी । माझिये येईल मुनिराया ॥८१॥
ऐसें बोलोनि पुरोहिताप्रती । भरतासि आज्ञा देवोनि श्रीरघुपती ।
म्हणे निजपुत्रां हर्षें अती । पट्टाभिषेक करावा ॥८२॥
माझिये दृष्टीपुढें । राज्याभिषेक करीं वाडेंकोडें ।
निवेल हृदय सुख गाढें । मजलागीं होईल ॥८३॥
ऐसी आज्ञा श्रीरघुपतीची । होतांच माता कैकेयी ज्याची ।
तेणॆं भरतें सामग्री पट्टाभिषेकाची । तत्काळ जाण आणविली ॥८४॥
अभिषेकोनि दोघां पुत्रांतें । श्रीरामें दिधलीं दोनी छत्रें ।
चामरें शिबिका तयांतें । दोघांलागीं दीधली ॥८५॥
श्रीरामाज्ञा लाहून । निजपुत्रेंसीं कैकेयीनंदन ।
सेनासमवेत बळ वाहन । नगराबाहेर निघाला ॥८६॥
पालाणिले भद्रजाती । वारू कोट्यनुकोटी नेणॊं किती ।
रथ घडघडातें हें क्षिती । उलथीं पाहती ते समयीं ॥८७॥
पायदळ आलंगाइत । सोळी सांबळी बाणाइत ।
तुबक तिरताज अगणित । श्रीरामनामें गर्जती ॥८८॥
छपन्न कोटि चामुंडा । पत्रें घेवोनि धांवती पुढां ।
गंधर्वांच्या अशुद्धें सडा । भरत गाढा घालीळ ॥८९॥
श्रीरामबळें वीर गाढे । एक गर्जती एकांपुढें ।
भूतें प्रेंतें राक्षसें मूढें । मांसभक्षणा निघालीं ॥९०।
भूतगणेंसीं वेताळ । आनंदाचा गोंधळ ।
टाकोनि मागें भरतदळा । नवदुर्गाही निघाल्या ॥९१॥
जैसे समर्थाचे विवाहीं । व‍-हाडी व-हाडिणी लवलाहीं ।
तसे भूतगण पाहीं । अवघियांपुढें निघाले ॥९२॥
ऐस्या प्रकारें श्रीरामनुजू । चालिला गंधर्वनगरा उजू ।
मार्ग क्रमोनि सेनासमाजू । मातामहदेशा पैं आला ॥९३॥
तद्दिनी तेथें करोनि वस्ती । सौन्यासहित दाशरथी ।
कैकेयाधिपें पूजोनि प्रीतीं । पुत्रास संगें दीधलें ॥९४॥

भरताचे सिधुदेशाला आगमन :

मातुलपुत्रासहित भरत । प्रतापें प्रयाणा करित ।
प्रहर दोनी न भ्अरतां तेथ । सिंधुदेशा पावला ॥९५॥
सिंधुनदीच्या उभयतीरीं । गंधर्वीं वसविली नगरी ।
शोभा तिची अति साजिरी । अमरपुरीहूनि अधिक ॥९६॥
तेथें वसती गंधर्व जाण । तिहीं ऐकिलें सेना दारूण ।
घेवोनि आला कैकेयीनंदन । युद्धालागीं करावया ॥९७॥


श्रुत्वा तु भरतं प्राप्तं गंधर्वास्ते समागताः ।
योद्धुकामास्ततः सर्वे गर्जंति स्म समंततः ॥१९॥
तेषां समभवद्युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ।
सत्परात्रं तदासीद्धि न च प्राप्तस्तयोर्जयः ॥२०॥
ततो रामानुजः क्रुद्धः कालचक्रं सुदारुणम् ।
संवर्तं नाम तच्छस्त्रं गंधर्वेषु प्रयुक्तवान् ॥२१॥
ते विद्धाः कालचक्रेण संवर्तन विदारिताः ।
क्षणमात्रेण हि हतास्तिस्त्रः कोट्या महाबलः ॥२२॥
हतेषु तेशु वीरेषु भरतः कैकेयीसुतः ।
निवेषयामास ततः समृद्धे द्वे पुरे तदा ॥२३॥
पुष्करं पुष्करवत्यां तक्षं तक्षशिलां प्रति ।
स्थापयामास तौ पुत्रौं भरतस्य महात्मनः ॥२४॥

गंधर्व भरताचे युद्ध व गंधर्वांचा पराभव :

आला ऐकोनि भरत । गंधर्व होवोनि एकीभूत ।
विचार करोनि समस्त । समरांगणा पैं आले ॥९८॥
युद्धेच्छा धरोनि मनीं । गर्जते झाले रणमेदिनीं ।
तेणें नादे फ़ुटे अवनी । दिग्गजां कर्णीं बधिरत्व आलें ॥९९॥
समस्त एकवट मिळोन । उल्हासें वीरां येतसे स्फ़ुरण ।
युद्धीं जयाशा धरोन । रणमंडळा पातले ॥१००॥
कवचें खड्गें गदापाणी । परिघ मुसळ तरुपाषाणीं ।
परस्परें भिडते झाले रणीं । उभयदळींचें वीरनायक ॥१॥
एक वर्षते झाले शर । एकीं टाकिले गिरीवर ।
एकीं गदाघातें मार । शस्त्रसंभार वर्षती ॥२॥
दोहीं दळीं वीर निधडे । कृतांताहूनि बळ गाढें ।
कोणी कोणाचेनि पुढें । न लोटती माघारें ॥३॥
वर्षाकाळीं जीमूतधारा । तसे वर्षती पाषाणतरवरां ।
झोंटधरणीं होय वीरां । दोन्हीम् दळें एक झालीं ॥४॥
जैसीम् दोनी एकवतती सरोवरें । तैसे दोन्हीं दळींचे भेसळले वीर ।
परस्परें करिते झाले मार । हार जीत पैं नाहीं ॥५॥
ऐसें गंधर्वी देखिलें । मग गंधर्वजाळ प्रेरिते झाले ।
आकाश अवनीमध्ये भरिले । चहूंकडे गंधर्व ॥६॥
भुली पडली भरतदळाचे वीरां । भयभीत झाले सैरावैरा ।
तंव गंधर्व एकसरां । युद्धीं लाग बहु केला ॥७॥
सोडोनियां अमित बाण । एकीं टाकिले पाषाण ।
एकीं गदामुद्रलीं जाण । असंख्य सैन्य मारिलें ॥८॥
भरतदळींचे थोर वीर । कित्येक झाले रणीं चूर ।
कित्येक घायवाट भग्नशिर । अशुद्धें डवरिलें पैं असती ॥९॥
एक म्हणती राया भरता । गंधर्वीं दाविली अधिकता ।
तंव कोप आला कैकेयीसुता । झाला ताडिता गंधर्वा ॥११०॥
रामानुज वीर बळी । गंधर्वांची फ़ोडोनि फ़ळीं ।
सीत चडवोनि ते काळीं । धनुष्य धरी वामकरें ॥११॥
तूणीरांतून काढोनि शर तेजाळ । सुवर्णपुंखांर्ही सोज्ज्वळ ।
जयांचें भाळांमाजीं बिंबले । हें सगळें ब्रह्मांड ॥१२॥
गुणीं चडवोनियां बाण । काळद्ंडाहूनि छेदिली शिरें ।
सप्तरात्र युद्ध वीरें । रामनुजें पैं केलें ॥१४॥
सात दिवसवरी । युद्ध राजा भरत करी ।
परी न ये जयहारीं । क्रोधा भारीं पैं चढला ॥१५॥
काळशस्त्र सुदारुण । बीजाक्षरें जपोनि पूर्ण ।
गंधर्व संवर्त लक्षोन । भरतवीरें सोडिलें ॥१६॥
संवर्त गंधर्वामाजी श्रेष्ठ । तयाचा काळाशस्त्रें छेदोनि कंठ ।
उडविला आकाशा उजू स्पष्ट । कविठफ़ळ जैसें कां ॥१७॥
तदनंतरे कैकेयीसुतें । तीस कोटी गंधर्वांतें ।
मारोनि टाकिली प्रेतें । रणसागरामाझारीं ॥१८॥
तंव मिळालिया वनदेवता । मांस भक्षोनि पिती शोणिता ।
आनंदे म्हणती भरता । विजयी होय पुत्रांसहित ॥१९॥

तक्षशिला व पुष्करनगराची स्थापनाः

तदनंतरे रायां भरतें । पुरें दोनीं वसविलीं तेथें ।
तयां नामें ऐका श्रोते । सावधान होऊनी ॥१२०॥
पुषकरावती नाम एकाचें । तक्षशिला दुसरियाचें ।
दोघां पुत्रा दो नगराचें । राज्य दिधलें ते काळीं ॥२१॥
तक्षकातें तक्षकावती । पुष्करा पुष्कर नगराप्रती ।
स्थापोनियां भरत सुमती । निजसैन्येंसीं ठेविलें ॥२२॥
राज्यां स्थापोनि दोघे कुमर । गंधर्वाचें पद पदार्थ अपार ।
रत्नमणिमुक्ताफ़ळें मनोहर । निजपुत्रांसी दिधलीं ॥२३॥
रथ अश्व भद्रजाती । रहंवरांसी नाहीं मिती ।
आणिकही राज्यसंपत्ती । पुत्रालागीं दीधली ॥२४॥
ते देशींचे जे लोक । ते केले आपुले आज्ञाधारक ।
पुढे भरत रघुनायक । भेटी निघाला ते काळीं ॥२५॥
एका जनार्दना शरण । भरतें गंधर्वदेश जिंतोन ।
श्रीरामभेटीस आगमन । करिता झाला ते काळीं ॥२६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
भरतगंधर्व विजयो नाम चतुःसप्ततितमो॓ऽध्यायः ॥७४॥
ओव्यां ॥१२६॥ श्लोक ॥२४॥ एवं ॥१५०॥

GO TOP