॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय एकोणिसावा ॥
[अध्याय १९ ते २३ - सुंदरकांड]


श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अद्‌भुत रामकथेचा महिमा ॥ देऊं गोदावरीची उपमा ॥
स्नान करितां कर्मा अकर्मा ॥ पासोनि मुक्त होइजे ॥१॥
उभयलोकीं इच्छा अधिक ॥ हींचि तटाकें सुरेख ॥
मनोरम प्रवाह देख ॥ उचंबळेल ब्रह्मानंदें ॥२॥
रामकथामृतजीवन ॥ प्रेमळ तेथें जळचरें पूर्ण ॥
देव गंधर्व मुनिजन ॥ तटीं सघन तरु हेचि ॥३॥
अनेक चरित्रें तत्वतां ॥ त्याचि येथें मिळाल्या सरिता ॥
भक्ति ज्ञान वैराग्य पाहतां ॥ ऊर्मी येथें विलसती ॥४॥
ओघ चालिला अद्‌भुत ॥ फोडोनियां पापपर्वत ॥
सप्तकांड सप्तमुखें मिळत ॥ भक्तहृदयसागरीं ॥५॥
जे त्रिविधतापें तापले ॥ जे तीर्थव्रतें करितां भागले ॥
ते येथें स्नान करितां निवाले ॥ नाहीं परतले संसारा ॥६॥
या गंगेत करिता स्नान ॥ अंगीं संचरे भक्तिज्ञान ॥
सकळ चातुर्ये एकवटोन ॥ पायां लागती अपार ॥७॥
सुंदरकांड इंद्रभुवन ॥ प्रेमरस तो सहस्रनयन ॥
वाग्देवी हे रंभा पूर्ण ॥ नृत्य करी कुशलत्वें ॥८॥
अंतरीं उघडोनि श्रवण ॥ श्रवण करोत पंडितजन ॥
सप्तकांडोत्तर संपूर्ण ॥ सुंदरकांड रसभरित ॥९॥
अठरावे अध्यायीं कथा अद्‌भुत ॥ समुद्रतीरीं उभा हनुमंत ॥
लंकेसी जावया उद्युक्त ॥ वानर समस्त पाहती ॥१०॥
लोकप्राणेशसुत ते वेळां ॥ महेंद्राचळीं उभा ठाकला ॥
परम भुभुःकारें गर्जिन्नला ॥ तेणें डळमळिला भूगोल ॥११॥
सुटला जातां अंगवात ॥ म्हणोनि वानर भयभीत ॥
पोटासीं धरोनि पर्वत ॥ अगोदर बैसले ॥१२॥
यशस्वी रघुवीर म्हणोन ॥ समीरात्मजें केलें उड्डाण ॥
त्याचे अंगवातेंकरून ॥ प्रळय वर्तला सर्वांसी ॥१३॥
महातरुवर उन्मळोनि ॥ द्विजांऐसे फिरती गगनीं ॥
अचळ चळती ठायींहूनि ॥ भुभुःकारध्वनीसरसेचि ॥१४॥
नक्षत्रें रिचवती भूमंडळी ॥ बैसली मेघांची दांतखिळी ॥
कृतांतासंही ते वेळीं ॥ भय अत्यंत वाटलें ॥१५॥
उचंबळलें समुद्रजळ ॥ डळमळलें उर्वीमंडळ ॥
हेलावती सप्तपाताळ ॥ अंगवातेंकरूनियां ॥१६॥
भोगींद्र दचकला अंतरीं ॥ कूर्म निजपृष्ठी सांवरी ॥
यज्ञवराह धरित्री ॥ उचलोनि देत दाढेसी ॥१७॥
दिग्गज चळचळां कांपती ॥ मेरुमांदार डळमळिती ॥
सुधापानी परम चित्तीं ॥ भय पावले तेधवां ॥१८॥
शचीवर मनीं दचकला ॥ अपर्णा पडे शिवाचे गळां ॥
भयभीत जाहली कमळा ॥ विष्णु तीतें सांवरी ॥१९॥
विरिंचि सांगे सकळांप्रती ॥ सीताशुद्धीस जातो मारुती ॥
सुर विमानी बैसोनि येती ॥ अद्‌भुत कौतुक पहावया ॥२०॥
कौतुक विलोकिती सुर सकळ ॥ प्रतापरुद्र अंजनीबाळ ॥
कीं तो वासरमणि निर्मळ ॥ वानरवेषें जातसे ॥२१॥
कल्पांविजूचे उमाळे भडकती ॥ तैशी कुंडलें कर्णीं तळपती ॥
वज्रकौपीन निश्चितीं ॥ कटिप्रदेशीं मुंजी झळके ॥२२॥
त्रिगुणरूप कल्पांतचपळा ॥ तेवीं यज्ञोपवीत रुळे गळां ॥
उणें आणिलें दिव्य प्रवाळा ॥ मुखीं पृच्छाग्नीं रंगा तैसा ॥२३॥
अंगींच्या रोमावळी पिंजारत ॥ भुभुःकारें नभ गर्जत ॥
दिग्गजांची टोळीं बैसत ॥ आंदोळत ब्रह्मांड ॥२४॥
गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ प्रतिशब्द देत अंबर ॥
दणाणित लंकानगर ॥ दशवदन हडबडला ॥२५॥
चपळ पदद्वय आणि पाणी ॥ झेंपावत धांवे गगनीं ॥
उड्डाणावरी उड्डाण घेऊनि ॥ रुद्रावतार जातसे ॥२६॥
अंतरिक्षीं जाय सपक्ष पर्वत ॥ कीं क्षीराब्धीशायीप्रति द्विजेंद्र धांवत ॥
कीं मानस लक्षोनियां जात ॥ राजहंस ज्यापरी ॥२७॥
कीं चिंतामणिवारु सवेग ॥ चपळत्वें क्रमी नभमार्ग ॥
अंजनीहृदयारविंदभृंग ॥ जात चपळ तैसाचि ॥२८॥
पितयाचें बहुत गमन ॥ तयाहूनि सवेग कपीचें उड्डाण ॥
किंवा रघुनाथाचा बाण ॥ चापापासून सुटला ॥२९॥
कीं मनाचें चंचळपण ॥ पावे जैसें चिंतिलें स्थान ॥
तैसा लोकप्राणेशनंदन ॥ यमदिशा लक्षोनि जातसे ॥३०॥
ऐसा अंतरिक्ष जातां हनुमंत ॥ आश्चर्य करिती देव समस्त ॥
म्हणती पाहों याचें सामर्थ्य ॥ रंभा त्वरित पाठविली ॥३१॥
साधितां परमार्थज्ञान ॥ आडवें येत मायाविघ्न ॥
कीं साधूं जातां निधान ॥ विवशी येत आडवी ॥३२॥
तैशी रंभा देवीं धाडली ॥ मुख पसरोनि उभी ठाकली ॥
तिच्या वदनांत उडी पडली ॥ हनुमंताची अकस्मात ॥३३॥
तिच्या कर्णद्वारें मारुति ॥ सवेंचि निघाला त्वरितगती ॥
तिणें हनुमंत स्तविला प्रीतीं ॥ स्वर्गाप्रति गेली मग ॥३४॥
समुद्रें पाठविला पर्वत ॥ मैनाकनामें अद्‌भुत ॥
तो ऊर्ध्वपंथें आडवा येत ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३५॥
जों जों वाढे पर्वत ॥ तों तों उंच जाय हनुमंत ॥
मग तो अचळ प्रार्थित ॥ हनुमंतासी ते काळीं ॥३६॥
म्हणे महापुरुषा मजवरी ॥ विश्रांति घेईं क्षणभरी ॥
मग एकाच हस्तें भारी ॥ नग पाताळीं घातला ॥३७॥
जो शांतिसुखें डोलत ॥ त्यास देखोन क्रोध पळत ॥
तैसा हस्तभारें पर्वत ॥ सागरांत दडपिला ॥३८॥
तेथोन उड्डाण पुढें चालिलें ॥ तों सिंहिकेनें वदन पसरिलें ॥
छायासूत्र साधिलें ॥ कापट्य केलें अद्‌भुत ॥३९॥
राहूकेतूंची जे माता ॥ तेचि सिंहिका जाण तत्वतां ॥
ती ग्रासावया हनुमंता ॥ पूर्वींच तेथें जपत होती ॥४०॥
उताणी समुद्रांत निजोन ॥ बारा योजनें पसरिलें वदन ॥
छाया पडतांचि वायुनंदन ॥ तिच्या वदनांत कोसळला ॥४१॥
स्वर्गीचा हुडा अकस्मात ॥ उर्वीवरी जेवीं पडत ॥
सिंहिकेच्या वदनी हनुमंत ॥ पडिला सत्य त्यापरी ॥४२॥
ते दांतांसि दांत मेळवित ॥ तों उदरांत गेला हनुमंत ॥
पोट फाडून त्वरित ॥ आला बाहेर ते काळीं ॥४३॥
विषयपाश तोडोनि समस्त ॥ परमार्था निघे जेवीं विरक्त ॥
तैसा बाहेर आला हनुमंत ॥ सिंहिका तेथेंच निमाली ॥४४॥
पुढें चालिलें उड्डाण ॥ तों लंकादेवी आली धांवोन ॥
तिनं आडवा पाय घालून ॥ हनुमंतासी पाडिलें ॥४५॥
करितां श्रीरामभजन ॥ नसतीं विघ्नें येति धांवोन ॥
परी साधक तितकीं लोटून ॥ सावधान स्मरण करी ॥४६॥
असो लंकादेवीस मुष्टिप्रहार ॥ वज्रप्राय देत वायुकुमर ॥
तिणें स्तवन केलें अपार ॥ म्हणे मज न मारावें ॥४७॥
तूं विजयी होशील साचार ॥ तंव पुढें उडी जात अपार ॥
पडलंकेसी सत्वर ॥ उडी जावोन पडियेली ॥४८॥
उडी सरसी त वेळीं ॥ पडलंका ते दणाणिली ॥
क्रौंचा असे तये स्थळीं ॥ कनिष्ठ भगिनी रावणाची ॥४९॥
तिचा घर्घरनामें भ्रतार ॥ इंद्रें मारिला तो असुर ॥
यालागीं क्रौंचेसी दशकंधर ॥ पडलंकेसी स्थापित ॥५०॥
असो तें दणाणिलें लंकानगर ॥ म्हणोनि क्रौंचा घेत समाचार ॥
असुरी पाठविल्या अपार ॥ धरिला वानर ते काळीं ॥५१॥
तो हनुमंतें ते वेळे ॥ संकीर्ण रूप धरिलें कोवळें ॥
क्रौंचेनें डोळां देखिलें ॥ हातीं धरिलें दृढ तेव्हां ॥५२॥
म्हणे हा चिरा गे वानर ॥ पाक करोनि आणा सत्वर ॥
हनुमंत म्हणे माझें शरीर ॥ उदकमय सर्वही ॥५३॥
पाक करितां नुरेचि कांहीं ॥ यालागीं तूं सगळाचि खाईं ॥
असुरीनें उचलोन लवलाहीं ॥ मुखांत घातला हनुमंत ॥५४॥
दांतांसि दांत मिळवी येरी ॥ तंव तो प्रवेशला अंतरीं ॥
काळिज धरोनि उभय करीं ॥ झोळकंबा घेत मारुति ॥५५॥
तंव ते चडफडे ते वेळे ॥ भोवंडी तेव्हां नेत्रबुबुळें ॥
गडबडां भूमीवरी लोळे ॥ वांचवा म्हणे मज आतां ॥५६॥
सूकरविष्ठा आणोन बहुत ॥ असुरी क्रौंचेसी पाजित ॥
हनुमंत आंत कंटाळत ॥ निघो पाहत बाहेरी ॥५७॥
तिच्या नासिकद्वारे हनुमंत ॥ पुच्छाग्र बाहेर दावीत ॥
असुरी धरोनि वोढित ॥ रोगबीज म्हणोनियां ॥५८॥
ओढी ओढितां अपार ॥ पुच्छरोगाचे पडिले ढिगार ॥
मग हनुमंतें असुरी समग्र ॥ बांधोनियां आसुडिल्या ॥५९॥
हनुमंताचें अद्‌भुत बळ ॥ क्रौंचेचीं आंतडीं तोडिलीं सकळ ॥
उदर फोडोन तात्काळ ॥ बाहेर आला गर्जोनियां ॥६०॥
असंख्यात राक्षिसिणी ॥ भारा बांधोनि आपटिल्या धरणीं ॥
भिरकावित समुद्रजीवनीं ॥ जाहलीं पारणीं जळचरांचीं ॥६१॥
जैशा मनाच्या अनंत वृत्ती ॥ मनोजयें योगी आकर्षिती ॥
तैशा असुरी संहारूनि मारुति ॥ विजयी जाहला पडलंके ॥६२॥
अत्यंत वृद्धा असुरी ॥ उरल्या होत्या नगरांतरीं ॥
तयांसीं म्हणे रुद्रावतारी ॥ लंका कोणती दावा गे ॥६३॥
नाहीं तरी तुम्हांस भक्षीन ॥ म्हणेन पसरिलें तेव्हां वदन ॥
वृद्धा बोलती भिऊन ॥ पैल ते लंका दिसतसे ॥६४॥
तों अस्ता गेला दिनकर ॥ निकुंभिलेंत प्रवेशला वायुकुमर ॥
शोधित चालिला सीता सुंदर ॥ धांडोळित सर्वही ॥६५॥
केरामाजी पडले मुक्त ॥ तें झारा युक्तीनें निवडित ॥
कीं सारासारविचार शोधित ॥ साधक आत्मप्राप्तीतें ॥६६॥
कीं यात्रेंत चुकली जननी ॥ सत्पुत्र काढी शाधूनि ॥
कीं महावैद्य काननीं ॥ संजीविनी शोधूं निघे ॥६७॥
समुद्रांत नेले वेद ॥ ते मत्स्यरूपी शोधी मुकुंद ॥
तैसा राघवचरणब्जमिलिंद ॥ निकुंभिलेंत सीता शोधी ॥६८॥
तों देखिलें शक्रजिताचें मंदिर ॥ हेमरत्‍नअति सुंदर ॥
त्यांत प्रवेशला वानर ॥ राघवप्रिया पहावया ॥६९॥
शक्रजित सुलोचना उभयंता ॥ शेजे पहुडलीं होय देखता ॥
मग म्हणे हेच होईल सीता ॥ रत जाहली परपुरुषीं ॥७०॥
आतां घालोनि पाषाण ॥ घेईन दोघांचाही प्राण ॥
मग म्हणे ऐकावें भाषण ॥ बोलती काय परस्परें ॥७१॥
तंव ते शेषकन्या स्वभावें तेथ ॥ इंद्रजितासी बोलत ॥
तुमचा पिता लंकानाथ ॥ अनुचित वर्तत असे ॥७२॥
अणुमात्रही वैर नसतां ॥ व्यर्थ आणली जनकदुहिता ॥
कुळक्षयास तत्वतां ॥ कारण केलें गमताहे ॥७३॥
परसतीचा अभिलाष करी ॥ साधुसंतांचा द्वेष धरी ॥
गुरुद्रोह ज्यामाझारी ॥ अल्पयुषी तो साच ॥७४॥
मातापित्यांचा करी तिरस्कार ॥ ब्राह्मणांसी निंदी निरंतर ॥
जो हिंसक दुष्ट दुराचार ॥ अल्पायुषी तोचि पैं ॥७५॥
हरिचरित्रें उच्छेदित ॥ निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥
नसतेंच काढी पाखंड मत ॥ अल्पायुषी तो साच ॥७६॥
म्हणोनी श्रावणारितनयवनिता ॥ आणोनि अनर्थ केला वृथा ॥
आतां लंकेची गति तत्वतां ॥ न दिसे पाहतां बरी कांहीं ॥७७॥
ऐकतां ऐशी मात ॥ लंकेंत प्रवेशे हनुमंत ॥
बिभीषणाचे मंदिरांत ॥ वायुसुत संचरला ॥७८॥
सत्वशील बिभीषण ॥ करीत विष्णूचें उपासन ॥
सदा होत हरिकीर्तन ॥ तेणें सदन दुमदुमिलें ॥७९॥
नाहीं रजतमांची वार्ता ॥ न दिसे द्वेष हिंसा तत्वतां ॥
पुराणश्रवण हरिकथा ॥ याविण चर्चा नसेचि ॥८०॥
दया क्षमा आणि शांती ॥ बिभीषणाचे हृदयीं नांदती ॥
असो तेथें कीर्तनीं मारुति ॥ ब्रह्मानंदें नाचतसे ॥८१॥
कीर्तनकल्लोळ रंगांत ॥ गडबडां लोळे हनुमंत ॥
कंठ होऊनि सद्‌गदित ॥ ब्रह्मानंदें डुल्लतसे ॥८२॥
घेऊन भक्तांचें चरणरज ॥ कपाळीं लावी वायुतनुज ॥
म्हणे होय राक्षसवंशज ॥ परी भक्तराज सात्त्विक हा ॥८३॥
वायासांत कोकिळा वसत ॥ कीं दैत्यकुळी प्रल्हाद भक्त ॥
कीं कागविष्ठेंत अश्वत्थ ॥ तें वास्तव्य स्थळ विष्णूचें ॥८४॥
कीं परिस जैसा पाषाणांत ॥ कीं शुक्तीमाजीं दिव्य मुक्त ॥
तैसा राक्षसकुळीं हा भक्त ॥ अलंकृत उत्तम गुणीं ॥८५॥
लंकेस आलिया रघुनंदन ॥ सहपरिवारें मारूनि रावण ॥
मग रघुपतीस प्रार्थोन ॥ राज्य संपूर्ण देईन यासी ॥८६॥
जैसे दवडोन काम क्रोध ॥ साधु करिती निजबोध ॥
तैसा बिभीषण भक्त प्रसिद्ध ॥ अक्षय स्थापीन लंकेसी ॥८७॥
बिभीषणाचे मंदिरांत ॥ परम संतोषला हनुमंत ॥
जैसें तृषेनें पीडितां बहुत ॥ गंगा अकस्मात देखिली ॥८८॥
चकोरा पावे रोहिणीवर ॥ कीं चातकां वोळला अंबुधर ॥
तैसें देखोनि बिभीषणाचें मंदिर ॥ वायुपुत्र आनंदला ॥८९॥
मग चालिला पुढारां ॥ देखें कुंभकर्णाचे मंदिरा ॥
तों दुर्गंधि आली एकसरां ॥ कंटाळे मन मारुतीचें ॥९०॥
जैसा मेघ गडगडित ॥ तैसा कुंभकर्ण घोरत ॥
कुंजर म्हैसे खर बहुत ॥ नासिकाबिळांत गुंतले ॥९१॥
श्वासासरसे बाहेरी ॥ आरडत पडती एकसरी ॥
कीं तो मंदराचळ पृथ्वीवरी ॥ निद्रिस्त हावोन पडियेला ॥९२॥
मातेचिया उदरांतून ॥ जेव्हां पडला कुंभकर्ण ॥
तेव्हां पसरोनि विशाळ वदन ॥ तीस सहस्र स्त्रिया गिळियेल्या ॥९३॥
असो देखोन कुंभकर्ण ॥ आश्चर्य करी वायुनंदन ॥
म्हणे हा वृथा पुष्ट जन्मोन ॥ व्यर्थ येथें पडियेला ॥९४॥
देखोन अंत्यजाचें घर ॥ पळे जैसा श्रोत्रीय पवित्र ॥
तैसा अंजनीचा पुत्र ॥ सांडोन चालिला पुढारा ॥९५॥
जो कल्पद्रुमीं द्विज राहणार ॥ तो बाभुळेवरी न बैसे साचार ॥
तैसें अव्हेरूनि घटश्रोत्राचें घर ॥ रामकिंकर पुढें जाय ॥९६॥
कोठें नुमगे मंगळभगिनी ॥ मारुति विचार करी मनीं ॥
कोणतें स्वरूप धरूनि ॥ लंकेमाजीं हिंडावें ॥९७॥
वानररूपेंकरूनि ॥ जरी विचरावें लंकाभुवनीं ॥
तरी राक्षस विनोदें धरूनि ॥ नाना चेष्टा करितील ॥९८॥
राक्षसरूप धरावें क्रूर ॥ तरी करवितील मांसाहार ॥
द्विजमांस भक्षितां साचार ॥ पुण्य समग्र भस्म होय ॥९९॥
कीं करूं जाऊं शिष्टाई ॥ तरी रावण न मानी काळत्रयीं ॥
राक्षसांसी भेद करितां पाहीं ॥ विनोद माझा करितील ॥१००॥
असो वानररूप पालटोनी ॥ अणुप्रमाण वेष धरूनि ॥
न खुपे मुंगीचे नयनीं ॥ घरोघरीं हिंडतसे ॥१॥
जैसा जनीं असोनि जनार्दन ॥ जीवासि नव्हे दृश्यमान ॥
तैसा निरालोद्‌भवनंदन ॥ व्यक्त न दिसे कोणासी ॥२॥
घरोघरीं चर्या पहात ॥ तों अवघे देखिले अधर्मरत ॥
वरिवरि आचार दावित ॥ जैसा मैंद शांति धरी ॥३॥
घरोघरीं अग्निहोत्रें पूर्ण ॥ मुखीं सदा वेदाध्ययन ॥
परी दृष्टी देखतां गोब्राह्मण ॥ मुखीं घालोनि रगडिती ॥४॥
जारकर्मरत नारीनर ॥ रुद्राक्षमाळा घेऊन थोर ॥
जपती सदा कौटिल्यमंत्र ॥ जारण मारण मोहनादि ॥५॥
लटिकेचि डोळे झांकून ॥ दाविती शांति अवलंबून ॥
मांस रक्त मद्यपान ॥ घूर्णितनयन डुल्लती ॥६॥
हृदयीं मद मत्सर दुमदुमिती ॥ वाचाबळें जनांसी गोंविती ॥
आम्ही कर्मातीत जाहलों म्हणती ॥ सदाचारभ्रष्ट क्रिया ॥७॥
आम्ही ज्ञानी सदा मुक्त ॥ झालों लोककर्मविरहित ॥
मना आवडे तो भाग भोगित ॥ महा उन्मत्त विषयांध ॥८॥
व्यर्थ राक्षसांचा आचार ॥ जैसें स्नान करून आले कुंजर ॥
कीं भस्मांत लोळती खर ॥ त्यांसी योगीश्वर कोण म्हणे ॥९॥
एक राक्षस संन्यास घेऊन ॥ करिती गोमांसभक्षण ॥
सवेंच संपादोनी आचमन ॥ कर्ता कोण म्हणती पैं ॥११०॥
विरजाहोम करून ॥ तीळ तूप गेलें जळोन ॥
कामक्रोधादि साहीजण ॥ अधिकाधिक माजले ॥११॥
नाना जीवाजाती भक्षोनी ॥ म्हणती आम्हांतें शिवूं नका कोणी ॥
एक गोचर्म पांघरोनी ॥ जटाधारी बैसला ॥१२॥
वनांत हिंडती वानप्रस्थ ॥ गोहननालागीं बैसती गुप्त ॥
ब्राह्मणांसी मारून भक्षित ॥ कर्ता येथें कोण म्हणती ॥१३॥
आम्ही ब्रह्मचारी विरक्त ॥ म्हणोन इंद्रियें ठेविलीं मुक्त ॥
गृहस्थ पडले गृहागतींत ॥ पापें अमित जोडिती ॥१४॥
क्षत्रिय अधर्म तेथें सर्व वसती ॥ समरीं पाठी देऊन पळती ॥
वाढिवेच्या गोष्टी बोलती ॥ घाय घालिती अधर्मे ॥१५॥
वैश्यांचें अधर्मी चित्त ॥ जोखोन दुसऱ्यासी नाडित ॥
शुद्ध धर्मवाट पाडित ॥ विप्रसेवा सांडोनियां ॥१६॥
वाण्यांनी उदीम तळासी आणिला ॥ सर्वत्रांचा गुंडाळा केला ॥
सोनारीं वरकोल घातला ॥ सर्व जिरविले अलंकार ॥१७॥
सोनार ठकठक करिती ॥ तेथें नाहीं सीता सती ॥
नाळी झांकणी कांसार विकती ॥ चिच्छक्ती तेथें कैंची ॥१८॥
व्यवहारें कालांतरीं प्राप्ति ॥ लक्षूनि परहस्तीं समर्पिती ॥
खत हातीं लिहून घेती ॥ पाहोन रडती जन्मवरी ॥१९॥
तेली भोंवे घाण्याभोंवता ॥ तेथें कैची सती सीता ॥
साळी कोष्टी पांजणी करितां ॥ जन्म वृथा पैं गेला ॥१२०॥
गारींत निघाले जीवें जीत ॥ तांबोळी शायशीं पंचायशीं ॥
करित ॥ शिंपी अखंड ते खंडित ॥ सीता निश्चित तेथें कैंची ॥२१॥
रंगारी जें वस्त्र श्वेत ॥ तें काळें करिती निश्चित ॥
नसतेचि ठसे लावित ॥ शुद्धावरी मूर्ख पैं ॥२२॥
भुसाऱ्यांनीं धान्यसंग्रह केला ॥ मोजितां व्यर्थ जन्म गेला ॥
तेथें नाहीं जनकबाळा ॥ ते चित्कळा अवतरली ॥२३॥
वेद पढती वेदपाठक ॥ तेथें निष्ठा न धरिती अभाविक ॥
प्रतिग्रहाखालीं जन्म देख ॥ गेला निश्चित तयांचा ॥२४॥
इदं भवति इदं न भवति ॥ पंडित हेंचि खटपटती ॥
सदा परनिंदा जल्पती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२५॥
ताठले सदा गायक ॥ अभिमानानें हुंबती अधिक ॥
प्रेम सांडोनि गाती शृंगारिक ॥ सीता सती तेथें कैंची ॥२६॥
ज्यातिषी गोंविले ग्रहगतीं ॥ गृहांत पडिले ते न निघती ॥
आपण कोण हे नेणती ॥ सीता सती तेथें कैंची ॥२७॥
प्रहस्तादि प्रधान घरें ॥ शोधिलीं सर्व अंतःपुरें ॥
पद्मिणीसम स्वरूपें सुंदरें ॥ पदनखा भृंग रुणझुणती ॥२८॥
हनुमंत नाना तर्क करी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥
म्हणे योगगतीनें निर्धारीं ॥ प्राण दिधला जानकीनें ॥२९॥
कीं सरितापतिमाजीं बुडाली ॥ कीं रावणें सक्रोधें भक्षिली ॥
अंतररिक्षांहून खालीं पडली ॥ गेली चूर होऊनियां ॥१३०॥
कीं रावणें दृढ धरिली ॥ कळ लागोन सुकुमार मेली ॥
कीं रावणपत्‍न्यांनीं मारिली ॥ सवतीमत्सर करोनियां ॥३१॥
हनुमंत दुःखें गडबडां लोळे ॥ आंसुवें पूर्ण भरले डोळे ॥
म्हणे वृथा समुद्रलंघन केलें ॥ शून्य पडिलें सर्व कार्य ॥३२॥
अहा सीते सीते करून ॥ वृथा आलिंगी राजीवनयन ॥
सीतेचें रूप म्हणोन ॥ हृदयीं पाषाण धरीतसे ॥३३॥
मी गेलिया रघुनाथ ॥ प्राण त्यागील यथार्थ ॥
सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ सुमित्रासुत न वांचती ॥३४॥
जाईल अयोध्येसी समाचार ॥ भक्त शिरोमणी भरत वीर ॥
शत्रुघ्न आणि माता समग्र ॥ प्राण देतील निर्धारें ॥३५॥
वृथा कष्ट गेले मुळींहूनि ॥ ठायी न पडे जनकनंदिनी ॥
नवजाय मी परतोनि ॥ चापपाणी वाट पाहील ॥३६॥
करितां रघुपतीचें स्मरण ॥ विघ्नें पळती मुळींहून ॥
जैसा सुटतां अद्‌भुत प्रभंजन ॥ जलदजाळ क्षणीं वितळे ॥३७॥
पडतां किंचित अग्न ॥ तृण पर्वतींचें जाय जळोन ॥
कीं गृहस्वामी जागा देखोन ॥ तस्कर जेवीं पळती पैं ॥३८॥
कीं उगवतां दिनपति ॥ भगणें सर्व लोपती ॥
मृगेंद्र देखितां निश्चितीं ॥ अचेतन होती वारण ॥३९॥
तैसें रघुपतीचें करितां स्मरण ॥ विघ्नें सर्व पळती उठोन ॥
करोनि लंकेचें कंदन ॥ पालथी घालीन सागरीं ॥१४०॥
ऐसें बोलोन हनुमंत ॥ कलह माजविला लंकेत ॥
घरोघरीं लोकांत आकांत ॥ ओढविला वायुसुतें ॥४१॥
रत्‍नजडित गोपुरें देखा ॥ विद्युत्प्राय झळकती पताका ॥
कनक कळसां नाहीं संख्या ॥ दिव्य लंका नगर तें ॥४२॥
अंजनीसुत मत्त वारण ॥ पुच्छ हें वज्रशुंडा जाण ॥
सकळ गापुरें ओढून ॥ अकस्मात पाडित ॥४३॥
मध्यरात्र जाहली पूर्ण ॥ निद्रार्णवीं लोक निमग्न ॥
तों अकस्मात घरें कोसळून ॥ पडोनि जन दडपती ॥४४॥
जैसे पर्वताचे कडे खचती ॥ तैशीं गोपुरें खालीं पडती ॥
महाद्वारें ओढून मारुति ॥ झुगारित गगनपंथें ॥४५॥
गवाक्षद्वारें पुच्छ घालून ॥ गृहस्तंभ पाडी आकर्षून ॥
लत्ताप्रहारें करून ॥ कपाटें फोडोन टाकित ॥४६॥
नगरतळ दणाणत ॥ भयंकर घोषें किंकाटत ॥
वृक्ष उन्मळी अकस्मात ॥ भयभीत लोक जाहले ॥४७॥
एकचि नगरीं कोल्हाळ झाला ॥ एक म्हणती पळा रे पळा ॥
ऐसें बोलतां अकस्मात शिळा ॥ येऊन पडती मस्तकीं ॥४८॥
राक्षसिणींची बाळें धरुनि ॥ भिरकावून देत गगनीं ॥
राक्षसी वक्षःस्थळें बडवूनि हांका फोडिती आक्रोशें ॥४९॥
स्त्रीपुरुष दोघें नग्न ॥ एकांतीं केलें शयन ॥
तीं जागीं न होतां उचलून ॥ बिदीस शेज ठेवित ॥१५०॥
भांडारगृह फोडून ॥ नाना वस्तूंच्या मांदुसा आणून ॥
राजबिदीस टाकी पूर्ण ॥ एकेच ठायीं सर्वांच्या ॥५१॥
पुच्छाचे चपेटे थोर ॥ रात्रीं वाजवी वारंवार ॥
भयभीत जाहले अवघे असुर ॥ बोलों उत्तर न शकती ॥५२॥
ऐसें नगर गांजोनि पूर्ण ॥ मग राजद्वारावरी जाऊन ॥
बैसला अंजनीनंदन ॥ कलह पूर्ण माजवावया ॥५३॥
हृदयीं पुच्छ धरोनि हनुमंत ॥ वारंवार तया चुंबित ॥
डोळे मोडोन वांकुल्या दावित ॥ घुलकावीत मान पैं ॥५४॥
तों नरनारी असंख्यात ॥ कलश घेऊन उदक आणित ॥
पुच्छ गोंवून अकस्मात ॥ कपी फोडितो एकदांचि ॥५५॥
नारी दचकल्या समस्त ॥ कोण गे येथें घागरी फोडीत ॥
त्यांचे कर्णनासिकीं हनुमंत ॥ पुच्छ घालित हळूचि ॥५६॥
तेणें दुश्चिंत नारी दचकती ॥ एक फडांफडां शिंकती ॥
भरला घट मारुती ॥ जाऊं नेदी नगरांत ॥५७॥
घटस्फोट जाहले राजद्वारीं ॥ शिव्या देती नगरींच्या असुरी ॥
दशमुखा तुझी न उरे उरी ॥ जनककुमारी क्षोभली ॥५८॥
सीतेनें चेतविलें भूत ॥ तें नगरांत हिंडे गुप्त ॥
हें लंकेचा करील निःपात ॥ दशकंठ यथार्थ निमेल ॥५९॥
तों राजदर्शनासी महावीर ॥ तुरंग जाती सत्वर ॥
ऐसें देखोनि कपिवर ॥ काय करिता जाहला ॥ १६० ॥
मागिले पायीं तुरंग धरूनी ॥ गरगरां भोवंडोनि आपटी मेदिनीं ॥
एकावरी एक उचलोनी ॥ अश्वासहित स्वार टाकी ॥६१॥
तों गजभार आले उन्मत्त ॥ त्यांचे पुच्छें उपडोनियां दांत ॥
वरी बैसले असुर समस्त ॥ दंतघायें झोडिले ॥६२॥
गुढारांसहित गज उचलोनी ॥ भिरकावित समुद्रजीवनीं ॥
तों रथारूढ होऊनि ॥ राजकुमार पातल ॥६३॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ वाजवीत वाद्यांचे गजर ॥
देखतां क्षोभला वानर ॥ पुच्छ सत्वर सोडिलें ॥६४॥
शतांचे शत रथ ओढोनी ॥ कुमार पालथे पाडिले मेदिनी ॥
सारथी भिरकाविले गगनीं ॥ घोडे मारून टाकिले ॥६५॥
पुच्छघायेंकरूनीं ॥ वाजंत्री झोडिले ते क्षणीं ॥
वाद्यें गेली सकळ गळोनी ॥ शंख करित पळती ते ॥६६॥
तों पालखील बैसोन प्रधान ॥ आले देखोनि वायुनंदन ॥
सूक्ष्म पुच्छ करून ॥ भोयांचे कानीं सूदिलें ॥६७॥
भोई दचकले एकाएकीं ॥ खालती आपटिली पालखी ॥
त्यांतें प्रधान धरोनि जवळिकीं ॥ ताडण करिती बहुसाल ॥६८॥
ते म्हणती कां मारितां व्यर्थ ॥ श्रावणारिस्नुषेनें चेतविलें भूत ॥
तें तुमचा अपमान करित ॥ शिबिका बहुत मोडिल्या ॥६९॥
पालख्या रथ गज घोडे ॥ झोडून पाडिले एकीकडे ॥
कोणी न ये राजद्वाराकडे ॥ जो तो दडे सांधीकोनीं ॥१७०॥
सवेंच उठोनि मारुति ॥ घरोघरीं घेत पाळती ॥
सीतेची गोष्टि कोणे रीती ॥ कैसें बोलती म्हणोनियां ॥७१॥
असो अस्ता गेला चंडकिरण ॥ सभामंडपीं बैसला रावण ॥
तये सभेंत अंजनीनंदन ॥ प्रवेशता पैं जाहला ॥७२॥
सिंहासनीं बैसला लंकानाथ ॥ पाठीसी उभा रामदूत ॥
तों सभेस घरटीकार सांगत ॥ रावणासन्मुख वर्तलें तें ॥७३॥
म्हणती शक्ररिजनका अवधारीं ॥ दुष्ट विघ्नें उदेलीं नगरीं ॥
लक्षांचे लक्ष फुटल्या घागरी ॥ नगरद्वारीं लंकेशा ॥७४॥
उगीच पडती गोपुरें ॥ बहुसाल रिचवती मंदिरें ॥
गगनमार्गीं टाकिलीं लेंकुरें ॥ कपाटें समग्र मोडिलीं ॥७५॥
वीर पडले म्हणताती ॥ निद्रिस्त जन वोसणती ॥
दुश्चिन्हें बहुत लंकापती ॥ शंका वाटे सांगतां ॥७६॥
ताटिकांतकाची कांता झडकरी ॥ नेऊन सोडावी कांतारीं ॥
इतुकेन स्वस्थ लंकापुरी ॥ चिरकाळ नांदेल ॥७७॥
ऐसें बोलतां धरटीकार ॥ क्रोधावला द्विपंचवक्र ॥
म्हणे याची जिव्हा आणि श्रोत्र ॥ छोदोनियां टाका ॥७८॥
नसतें कल्पित दुश्चिन्ह ॥ सांगतो मूर्ख आम्हांलागून ॥
ऐसें ऐकतां वचन राघवप्रियकर क्षोभला ॥७९॥
म्हणे लटिकें दुश्चिन्ह ॥ यासीच दावूं खरें करून ॥
माझे पुच्छासी होवो बहु कल्याण ॥ करीन कंदन सभेचें ॥१८०॥
तों रावणापुढें नापिक येत ॥ शस्त्रें श्मश्रु नीट करित ॥
तों नापिकाचे कर्णीं हनुमंत ॥ पुच्छ घाली हळूचि ॥८१॥
तों नापिक भयें दचकला ॥ तेणें हात चांचरी गेला ॥
मिशी भादरली ते वेळां ॥ एकीकडील अवघीच ॥८२॥
तेणें क्षोभला लंकानाथ ॥ हस्तें ताडिला नापिक ॥
रावणाचे पृष्ठीवरी देख ॥ हनुमंतें मुष्टि ओपिली ॥८३॥
वामहस्तचपेटेंकरूनी ॥ दाही छत्रें पाडिलीं धरणीं ॥
सवेंच दाही मुकुट हाणोनी ॥ सव्यहस्तें पाडिले ॥८४॥
छत्रदंड घेवोनि करीं ॥ घाली रावणाचे अपानद्वारीं ॥
येरू मागें पाहे ते अवसरीं ॥ तों दंड माझारी खंडिला ॥८५॥
चौदा गांवें मंडप विस्तीर्ण ॥ सुगंधस्नेहें दीप शोभायमान ॥
चौदा सहस्र लाविले पूर्ण ॥ ठायींठायीं सुरेख ॥८६॥
कर्पूरदीप सतेज थोर ॥ आठ लक्ष सभेसमोर ॥
पाजळोन उभे असती असुर ॥ विशाळ शरीरें जयांचीं ॥८७॥
पुच्छघातें वायुकुमरें ॥ दीपिका विझविल्या एकसरें ॥
दीप तेथें एकही न उरे ॥ जाहले घाबरे सभालोक ॥८८॥
अंधार पडतांचि तेथ ॥ नागवूं लागला हनुमंत ॥
शस्त्रवस्त्रादि समस्त ॥ अलंकार घेत हिरोनि ॥८९॥
मुकुट घेऊन सत्वर ॥ मस्तकीं हाणी मुष्टिप्रहार ॥
जैसा सपक्ष नगावरी पुरंदर ॥ वज्र बळें प्रेरी पैं ॥१९०॥
बोटें तोडोनि मुद्रिका सकळ ॥ काढून घेत अंजनीबाळ ॥
कंठ पिळोन काढी माळ ॥ करिती कल्होळ असुर तेव्हां ॥९१॥
मुष्टिघातें हृदय फोडूनि ॥ मग घेत पदक काढूनि ॥
पादप्रहारें माज मोडूनि ॥ मग ओढीत कडदोरा ॥९२॥
नेसलीं वस्त्रें घेत हिरोनि ॥ सवेंच लिंग टाकी तोडोनि ॥
एक वस्त्रें फेडोनि ॥ अगोदर टाकिती ॥९३॥
एक म्हणती आयुष्य जाहलें जरी ॥ वस्त्रालंकार देखों संसारी ॥
परी लिंगाविण जन्मवरी ॥ काय म्हणोनि कंठावें ॥९४॥
राक्षसांचे चरण मोडूनि ॥ मग ब्रीदें घेतलीं काढूनि ॥
एक हांक फोडिती ते क्षणीं ॥ घ्राण छेदोनि टाकित ॥९५॥
एकासी एक दाविती खूण ॥ बोलूं नका रे वांचवा प्राण ॥
एक म्हणती निर्मूळ करावया पूर्ण ॥ महद्‌भुत उदेलें ॥९६॥
आणिली श्रीरामाची कांता ॥ सतियां शिरोमणि पतिव्रता ॥
तिणेंच हें भूत चेतवितां ॥ प्रळय जाहला लंकेसी ॥९७॥
अंधार पडला दारुण ॥ सुटला अद्‌भुत प्रभंजन ॥
दीपिका आणितां जाती विझोन ॥ अनर्थ पूर्ण ओढवला ॥९८॥
एक म्हणती कोठें लंकानाथ ॥ एक म्हणती मेला कीं जित ॥
जवळ असतां न कळे मात ॥ थोर प्राणांत ओढवला ॥९९॥
देवांतक नरांतक राजसुत ॥ अतिकाय इंद्रजित ॥
मत्त महामत्त युद्धोन्मत्त ॥ प्रहस्तादि नागविले ॥२००॥
उघडोनियां सभाद्वार ॥ कोणी जाऊं न शके बाहेर ॥
होत पुच्छाचा घोर मार ॥ दडती असुर ठायीं ठायीं ॥१॥
भयभीत दशकंधर ॥ म्हणे सत्य बोलिला घरटीकार ॥
प्रचंड हें विघ्न दुस्तर ॥ आलें साचार प्रत्यया ॥२॥
रावणाचे पृष्ठीवरी मार ॥ वज्रप्राय होत थोर ॥
बोलूं न शके अणुमात्र ॥ घ्राण छेदील म्हणोनी ॥३॥
रावणाचे कानीं हनुमंत ॥ हळूच जावोनि सांगे मात ॥
जनकजापतीचा मी दूत ॥ त्रासीन नगर समस्त हें ॥४॥
तुझी छेदोनी दाही शिरें ॥ किष्किंधेसीं नेईन क्षणमात्रें ॥
परी त्या अयोध्याधीशें उदारें ॥ आज्ञा नाहीं दीधली ॥५॥
ऐसें सांगतां वायुनंदन ॥ मनीं भ्रमित झाला द्विपंचवदन ॥
कर्णी सांगितलें वर्तमान ॥ कळलें नाहीं रावणा ॥६॥
ऐसा प्रळय करूनि थोर ॥ निघोन गेला वायुपुत्र ॥
नागविले प्रतापें वीर ॥ दशवक्रादिकरोनियां ॥७॥
दीपिका आणिल्या तात्काळ ॥ तों नागवेचि असुर सकळ ॥
कित्येक मूर्च्छा येऊनि विकळ ॥ बहुत पडले धरणीये ॥८॥
कित्येकांचे मोडले करचरण ॥ बहुतांचे तोडिले कर्णघ्राण ॥
एक लिंग तोडिलें म्हणोन ॥ रावणासी दाखविती ॥९॥
दुःखें व्याप्त पिशिताशन ॥ स्वसदना गेला उठोन ॥
चिंताक्रांत दशवदन ॥ राणिवसांत प्रवेशला ॥२१०॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ हें विश्रांतीचें दिव्य मंदिर ॥
येथें पहुडले सज्ञान नर ॥ जे रघुवीरउपासक ॥११॥
जे मतिमंद अज्ञानी जन ॥ सेविताती अविद्यारण्य ॥
त्यांसी हें रामविजयसदन ॥ प्राप्त नोहे सहसाही ॥१२॥
विषकंठहृदया रघुनंदना ॥ श्रीरामा दशकंठदर्पहरणा ॥
श्रीधरवरदा जगद्‌भूषणा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धि ॥१३॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकोनविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२१४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP