श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकोनषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
संपातिना स्वपुत्रस्य सुपार्श्वस्य मुखतः श्रुतायाः सीतारावण दर्शनसंबंधि घटनाया वर्णनम् - संपातिने आपला पुत्र सुपार्श्वाच्या मुखाने ऐकलेली सीता आणि रावणास पाहिल्याच्या घटनेचा वृत्तांत सांगणे -
ततस्तदमृतास्वादं गृध्रराजेन भाषितम् ।
निशम्य मुदिता हृष्टाः ते वचः प्लवगर्षभाः ॥ १ ॥
त्या समयी वार्तालाप करणार्‍या गृध्रराजाच्या द्वारे सांगितलेले ते अमृतासमान स्वादिष्ट मधुर वचन ऐकून सर्व वानरश्रेष्ठ हर्षाने प्रफुल्लित झाले. ॥१॥
जांबवान् वानरश्रेष्ठः सह सर्वैः प्लवंगमैः ।
भूतलात् सहसोत्थाय गृध्रराजमथाब्रवीत् ॥ २ ॥
वानर आणि अस्वले यांत श्रेष्ठ जाम्बवान् सर्व वानरांसहित एकाएकी भूतलावरून उठून उभे राहिले आणि गृध्रराजांना याप्रकारे विचारू लागले- ॥२॥
क्व सीता केन वा दृष्टा को वा हरति मैथिलीम् ।
तदाख्यातु भवान् सर्वं गतिर्भव वनौकसाम् ॥ ३ ॥
’पक्षीराज ! सीता कोठे आहे ? तिला कोणी पाहिले आहे ? आणि कोण त्या मैथिलीला हरण करून घेऊन गेला आहे ? या सर्व गोष्टी सांगाव्या आणि आम्हा सर्व वनवासी वानरांचे आश्रयदाते व्हावे. ॥३॥
को दाशरथिबाणानां वज्रवेगनिपातिनाम् ।
स्वयं लक्ष्मणमुक्तानां न चिंतयति विक्रमम् ॥ ४ ॥
’कोण असा धृष्ट आहे की जो वज्रासमान वेगपूर्वक आघात करणार्‍या दशरथनंदन श्रीरामांच्या बाणांना तसेच स्वतः लक्ष्मणांनी सोडलेल्या सायकांच्या पराक्रमाला काहीच गणत नाही ? ॥४॥
स हरीन् प्रीतिसम्मुक्तान् सीताश्रुतिसमाहितान् ।
पुनराश्वासयन् प्रीत इदं वचनमब्रवीत् ॥ ५ ॥
त्यासमयी उपवास सोडून बसलेल्या आणि सीतेचा वृत्तांत ऐकण्यासाठी एकाग्र झालेल्या वानरांना प्रसन्नतापूर्वक पुन्हा आश्वासन देत संपातिंनी त्यांना ही गोष्ट सांगितली- ॥५॥
श्रूयतामिह वैदेह्या यथा मे हरणं श्रुतम् ।
येन चापि ममाख्यातं यत्र चायतलोचना ॥ ६ ॥
’वानरांनो ! वैदेही सीतेचे ज्या प्रकारे अपहरण झाले आहे, विशाल लोचना या समयी जेथे आहे आणि ज्याने मला हा सर्व वृत्तांत सांगितला आहे तसेच ज्या प्रकारे मी तो ऐकला आहे ते सर्व सांगतो, ऐका- ॥६॥
अहमस्मिन् गिरौ दुर्गे बहुयोजनमायते ।
चिरान्निपतितो वृद्धः क्षीणप्राणपराक्रमः ॥ ७ ॥
’हा दुर्गम पर्वत कित्येक योजनांपर्यंत पसरलेला आहे. जेव्हा मी या पर्वतावर कोसळलो होतो त्या घटने नंतर आता दीर्घ काळ उलटला आहे. माझी प्राणशक्ती क्षीण झालेली होती आणि मी वृद्ध झालो होतो. ॥७॥
तं मामेवं गतं पुत्रः सुपार्श्वो नाम नामतः ।
आहारेण यथाकालं बिभर्ति पततां वरः ॥ ८ ॥
’या अवस्थेत माझा पुत्र पक्षीप्रवर सुपार्श्व यथासमय आहार देऊन प्रतिदिन माझे भरण-पोषण करत आहे. ॥८॥
तीक्ष्णकामास्तु गंधर्वाः तीक्ष्णकोपा भुजङ्‌गणमाः ।
मृगाणां तु भयं तीक्ष्णं ततस्तीक्ष्णक्षुधा वयम् ॥ ९ ॥
’ज्याप्रमाणे गंधर्वाचा कामभाव तीव्र असतो, सर्पांचा क्रोध तेज असतो आणि मृगांना भय अधिक वाटते, त्या प्रकारेच आमच्या जातीच्या लोकांची भूक फार तीव्र असते. ॥९॥
स कदाचित् क्षुधार्तस्य ममाहाराभिकाङ्‌क्षिणः ।
गतसूर्येऽहनि प्राप्तो मम पुत्रो ह्यनामिषः ॥ १० ॥
’एका दिवसाची गोष्ट आहे, मी भुकेने पीडित होऊन आहार प्राप्त करू इच्छित होतो. माझा पुत्र माझ्यासाठी भोजनाच्या शोधात गेला होता, परंतु सूर्यास्त झाल्यानंतर तो रिक्याम्या हाताने परत आला, त्याला कोठेही मांस मिळाले नाही. ॥१०॥
स मयाऽऽहारसंरोधात् पीडितं प्रीतिवर्धनः ।
अनुमान्य यथातत्त्वं इदं वचनमब्रवीत् ॥ ११ ॥
’भोजन न मिळाल्याने मी कठोर वचने बोलून आपली प्रीति वाढविणार्‍या त्या पुत्राला खूप पीडा दिली, परंतु त्याने नम्रतापूर्वक मला आदर देत ही यथार्थ गोष्ट सांगितली- ॥११॥
अहं तात यथाकालं आमिषार्थी खमाप्लुतः ।
महेंद्रस्य गिरेर्द्वारं आवृत्य च समाश्रितः ॥ १२ ॥
’तात ! मी यथासमय मांस प्राप्त करण्याचा इच्छेने आकाशांत उडालो आणि महेंद्र पर्वताचे द्वार अडवून उभा राहिलो. ॥१२॥
तत्र सत्त्वसहस्राणां सागरांतरचारिणाम् ।
पंथानमेकोऽध्यवसं संनिरोद्धुमवाङ्‌मुंखः ॥ १३ ॥
’तेथे आपली चोच खाली करून मी समुद्रात विचरणार्‍या हजारो जंतुंचा मार्ग रोखण्यासाठी एकटाच उभा राहिलो. ॥१३॥
तत्र कश्चिन्मया दृष्टः सूर्योदयसमप्रभाम् ।
स्त्रियमादाय गच्छन् वै भिन्नाञ्जनचयोपमः ॥ १४ ॥
’त्या समयी मी पाहिले की खाणीतून (कापून) खोदून काढलेल्या कोळशाच्या राशीसमान कोणी काळा पुरुष एका स्त्रीला घेऊन जात आहे. त्या स्त्रीची कांति सूर्योदय कालच्या प्रभेसमान प्रकाशित होत होती. ॥१४॥
सोऽहमभ्यवहारार्थं तौ दृष्ट्‍वा कृतनिश्चयः ।
तेन साम्ना विनीतेन पंथानमनुयाचितः ॥ १५ ॥
’ती स्त्री आणि त्या पुरुषाला पाहून मी त्यांना आपल्या आहारासाठी आणण्याचा निश्चय केला, परंतु त्या पुरुषाने नम्रतापूर्वक मधुर वाणीमध्ये माझ्याकडे मार्गाची याचना केली. ॥१५॥
न हि सामोपपन्नानां प्रहर्ता विद्यते भुवि ।
नीचेष्वपि जनः कश्चित् किमङ्‌गच बत मद्विधः ॥ १६ ॥
’पिताजी ! भूतलावर नीच पुरुषांमध्येही असा कोणी नाही आहे, जो विनयपूर्वक गोड वचन बोलण्यावर प्रहार करील, मग माझ्या सारखा कुलीन पुरुष कसा करू शकेल ? ॥१६॥
स यातस्तेजसा व्योम सङ्‌क्षिपन्निव वेगतः ।
अथाहं खचरैर्भूतैः अभिगम्य सभाजितः ॥ १७ ॥
’मग तो तेजाने आकाशाला जणु व्याप्त करीत वेगाने निघून गेला. तो निघून गेल्यावर आकाशचारी प्राणी सिद्ध - चारण आदिनी येऊन माझा मोठा सन्मान केला. ॥१७॥
दिष्ट्या जीवति सीतेति ह्यब्रुवन् मां महर्षय ।
कथञ्चित् सकलत्रोऽसौ गतस्ते स्वस्त्यसंशयम् ॥ १८ ॥
’ते महर्षि मला म्हणाले- सौभाग्याची गोष्ट आहे की सीता जिवंत आहे. तुमची दृष्टि पडूनही स्त्रीसह आलेला तो पुरुष कुठल्याही प्रकारे सकुशल वाचला; म्हणून अवश्यच तुमचे कल्याण होवो.’ ॥१८॥
एवमुक्तस्ततोऽहं तैः सिद्धैः परमशौभनैः ।
स च मे रावणो राजा रक्षसां प्रतिवेदितः ॥ १९ ॥
’त्या परम शोभायमान सिद्ध पुरुषांनी मला असे म्हटले. तत्पश्चात् त्यांनी सांगितले की ’ तो काळा पुरुष राक्षसांचा राजा रावण होता.’ ॥१९॥
पश्यन् दाशरथेर्भार्यां रामस्य जनकात्मजाम् ।
भ्रष्टाभरणकौशेयां शोकवेगपराजिताम् ॥ २० ॥

रामलक्ष्मणयोर्नाम क्रोशंतीं मुक्तमूर्धजाम् ।
एष कालात्ययस्तात इति कालविदां वरः ॥ २१ ॥

एतमर्थं समग्रं मे सुपार्श्वः प्रत्यवेदयत् ।
तच्छ्रुत्वा हि मे बुद्धिः नासीत् काचित् पराक्रमे ॥ २२ ॥
’तात ! दशरथनंदन श्रीरामांची पत्‍नी जनककिशोरी सीता शोकाच्या आवेगाने पराजित झालेली होती. तिची आभूषणे गळून पडत होती आणि रेशमी वस्त्रही मस्तकावरून ढळून गेले होते. तिचे केस मोकळे झाले होते आणि ती श्रीराम तसेच लक्ष्मणाचे नाव घेऊन त्यांना हाका मारीत होती. मी तिची ही दयनीय दशा बघतच राहिलो. हेच माझ्या विलंबाने येण्याचे कारण आहे. याप्रकारे वाक्य विशारद श्रेष्ठ सुपार्श्वाने माझ्या समोर सर्व गोष्टींचे वर्णन केले. हे सर्व ऐकूनही माझ्या हृदयात पराक्रम करुन दाखविण्याचा कुठलाही विचार आला नाही. ॥२०-२२॥
अपक्षो हि कथं पक्षी कर्म किञ्चित् समारभेत् ।
यत् तु शक्यं मया कर्तुं वाग्बुद्धिगुणवर्तिना ॥ २३ ॥

श्रूयतां तत्र वक्ष्यामि भवतां पौरुषाश्रयम् ।
’विना पंखाचा पक्षी कसा काही पराक्रम करू शकतो ? आपली वाणी आणि बुद्धिच्या द्वारा साध्य जो उपकाररूप गुण आहे तो करणे माझा स्वभाव बनला आहे. अशा स्वभावामुळे मी जे काही करू शकतो, ते कार्य तुम्हाला सांगतो, ऐका ! ते कार्य तुम्हा लोकांच्या पुरुषार्थानेच सिद्ध होणारे आहे. ॥२३ १/२॥
वाङ्‌मततिभ्यां तु सर्वेषां करिष्यामि प्रियं हि वः ॥ २४ ॥

यद्धि दाशरथेः कार्यं मम तन्नात्र संशयः ।
’मी वाणी आणि बुद्धि द्वारा तुम्हा सर्व लोकांचे प्रिय कार्य अवश्य करीन, कारण की दशरथनंदन श्रीरामांचे जे कार्य आहे ते माझे ही आहे, यात संशय नाही आहे. ॥२४ १/२॥
तद् भवंतो मतिश्रेष्ठा बलवंतो मनस्विनः ॥ २५ ॥

प्रहिताः कपिराजेन देवैरपि दुरासदाः ।
’तुम्ही लोकही उत्तम बुद्धिने युक्त, बलवान्, मनस्वी तसेच देवतांनाही दुर्जय आहात. म्हणून वानरराज सुग्रीवांनी तुम्हांला या कार्यासाठी धाडलेले आहे. ॥२५ १/२॥
रामलक्ष्मणबाणाश्च विहिताः कङ्‌कदपत्रिणः ॥ २६ ॥

त्रयाणामपि लोकानां पर्याप्तास्त्राणनिग्रहे ।
’श्रीराम आणि लक्ष्मणांचे कंकपत्रांनी युक्त जे बाण आहेत, ते साक्षात् विधात्याने बनविलेले आहेत. ते तीन्ही लोकांचे संरक्षण आणि दमन करण्यासाठी पर्याप्त शक्ति बाळगून आहेत. ॥२६ १/२॥
कामं खलु दशग्रीवः तेजोबलसमन्वितः ।
भवतां तु समर्थानां न किञ्चिदपि दुष्करम् ॥ २७ ॥
’तुमचा विपक्षी दशग्रीव रावण भलेही तेजस्वी आणि बलवान् आहे, परंतु तुमच्या सारख्या सामर्थ्यशाली वीरांसाठी त्याला परास्त करणे आदि कुठलेही कार्य दुष्कर नाही आहे. ॥२७॥
तदलं कालसंगेन क्रियतां बुद्धिनिश्चयः ।
न हि कर्मसु सज्जंते बुद्धिमंतो भवद्विधाः ॥ २८ ॥
’म्हणून आता अधिक समय घालविण्याची आवश्यकता नाही. आपल्या बुद्धिच्या द्वारा दृढ निश्चय करून सीतेच्या दर्शनासाठी उद्योग करा, कारण तुमच्या सारखेच बुद्धिमान् लोक कार्याच्या सिद्धिमध्ये विलंब करीत नाहीत.’ ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणसाठावा सर्ग पूरा झाला. ॥५९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP