॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय चोविसावा ॥
वानरांकडून मधुवनाचा विध्वंस

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे

हनुमंत सांगे वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।
तिनें राक्षसांची वीर्यशक्ती । नेली भस्मांतीं कोपाग्नीं ॥ १ ॥
रावणाची शक्ति तेजोराशी । सीतेनें भस्म केले त्यासी ।
राम निमित्त मारावयासी । रावणासी रणरंगीं ॥ २ ॥
सीताक्षोभे दशानन । जळोन भस्म जाहला जाण ।
पतीस यश दिधलें पूर्ण । रामें रावण मारिला ॥ ३ ॥
सीता जाळी श्रीराम मारी । ऐसेनि राक्षसांची बोहरी ।
क्षणें होईल लंकेमाझारी । सांगे वानरीं हनुमंत ॥ ४ ॥

ते ऐकून अंगदास स्फुरण चढले व स्वतःच
सर्वांचा संहार करून यावे असे तो सुचवितो

एकोनि हनुमंताचें वचन । अंगदा आलें अति स्फुरण ।
सीतेने जाळिला दशानन । मारितां आपण भय काय ॥ ५ ॥
एकला एक मी अंगदु । छेदोनि रावणाचा कंदु ।
स्वजन सुह्रद सखे बंधू । करीन वधू ससैन्येंसी ॥ ६ ॥
सखा सुह्रद वीर जगजेठी । तुम्हीं राखिल्या माझी पाठी ।
ते मी लंकेच्या त्रिकूटीं । राक्षसकोटी मारीन ॥ ७ ॥
कुंभकर्णेसीं दशवक्त्र । इंद्रजितासहित राजपुत्र ।
प्रधान मारीन सर्वत्र । सैन्यसमुद्र मंथीन मी ॥ ८ ॥
हनुमंतें मारिले वीर समर्थ । इंद्रजित केला मेला ना जित ।
रावणा केलें हताहत । असे धुकधुकित वांचला ॥ ९ ॥
हनुमंतासमवेत । आम्हीं गेलिया पैं तेथ ।
धाकेंचि मरतील समस्त । लंकानाथ तो किती ॥ १० ॥
रणीं मारोनि रावण । सीता घेवोनि आपण ।
यावें विजयेंसीं गर्जोन । गुढीं उभवून स्वानंदें ॥ ११ ॥
पुढें ठेवोनियां सीता । श्रेष्ठ भेटी श्रीरघुनाथा ।
तेणें उल्लास समस्तां । कपिनाथा सुग्रीवा ॥ १२ ॥
सीतेवीण रामापासीं । जावोनि काय सांगावें त्यांसी ।
बहुत दिवस लागले शुद्धीसीं । लाज आम्हांसी भेटता ॥ १३ ॥
भेटी घेतां रितें हातीं । पहिले रिते जाले जुत्पत्ती ।
तेचि आम्हां हुरो लाविती । कपिपति क्षोभेल ॥ १४ ॥
राम आणि लक्ष्मण म्हणती । करंटी वानरांची शक्ती ।
ऐसी पावों उपहती । माझी विनंती नायकतां ॥ १५ ॥
जाहले मर्यादोल्लंघन । त्यावरी रितें जाऊन ।
तेव्हां सुग्रीव क्षोभोन जाण । करील अपमान तो ऐका ॥ १६ ॥
काळें वदन खरारोहण । उपानहमाळांचें भूषण ।
गोमयसुमनीं अभिषिंचन । स्तुतिस्तवन फाल्गुनाचें ॥ १७ ॥

आपला कालतिक्रम झालेला आहे, तेव्हा अपमान
करून घेण्यापेक्षा कार्यपूर्ती करून जाणे केव्हाही चांगले

तुम्हां वानरांसमस्तां । माझें लोटांगण आतां ।
सीतेवांचोनि सर्वथा । भेटी रघुनाथा न जावें ॥ १८ ॥
तेथें सहावा अपमान । याहूनि लंकेसी जाऊन ।
ससैन्य रावण निर्दाळून । सीता घेऊन शीघ्र यावें ॥ १९ ॥
ऐसें बोलतां अंगदासीं । अतिस्फुरण आलें त्यांसी ।
रोमांच थरकती सर्वांगासीं । पुच्छ आकाशीं तळपत ॥ २० ॥
रणआवेश अंगदातें । देखता आलिंगिलें हनुमंतें ।
वीर शूर पुरूषार्थे । जांबुवंतें वंदिला ॥ २१ ॥
वानर लागोनि पायांसी । शांत करिती युवरायासी ।
जांबुवंते अति युक्तीसीं । अंगदासी समजाविलें ॥ २२ ॥

त्यावर जांबवंताचे म्हणणे पडले की, श्रीराम व
सुग्रीवांच्या आज्ञेचा भंग करता येत नाही

अंगदाचें प्रतापवचन । जांबुवंतें आयकोन ।
त्यासी द्यावया समाधान । पूर्वप्रस्थान अनुवादें ॥ २३ ॥
आम्हांसी धाडितां दक्षिणेसीं । श्रीराम सुग्रीवाज्ञा ऐसी ।
तुम्ही आणावें सीताशुद्धीसी । मर्यादेंसीं मासांतीं ॥ २४ ॥
मारोनियां रावणासीं । शीघ्र आणावें सीतेसी ।
श्रीरामाज्ञा नाहीं ऐसी । नाहीं नेमेंसी राजाज्ञा ॥ २५ ॥
रावण मारितां आज्ञेवीर । श्रीराम क्षोभेल आपण ।
सुग्रीव कोपेल दारूण । तेंही कारण अवधारीं ॥ २६ ॥
श्रीरामें वाहिलीसे आण । स्वहस्तें विंधोनियां बाण ।
रणीं मारोनि रावण । सीता आपण सोडवूं ॥ २७ ॥
तो आम्हीं मारोनि रावण । सीता आणितां आपण ।
आम्हीं भंगितां रामपण । तिघे जण क्षोभती ॥ २८ ॥
मिथ्या करितां श्रीरामपण । सुग्रीव कोपेल दारूण ।
कोपा चढेल लक्ष्मण । श्रीराम पूर्ण क्षोभेल ॥ २९ ॥
रावण जरीं मारूं येता । तरी कां हनुमंत सोडिता ।
निर्दळोनि लंकानाथा । सीता आणितां निमेषार्धे ॥ ३० ॥
धन्य हनुमंताचें ज्ञान । श्रीराममर्यादा पाळून ।
यालागीं न मारीच रावण । आला घेऊन शुद्धीसी ॥ ३१ ॥
ऐसा निश्चयो ऐकतां । अंगदें वंदिलें जांबुवंता ।
वीर शूर विवेकी ज्ञाता । तुजपरता असेना ॥ ३२ ॥

जांबवंताचे सूचनेप्रमाणे सर्व वानर परत जाण्यास निघाले

जांबुवंताचे वचनमेळीं । शुद्धि सांगावया जनकबाळी ।
शीघ्र जावया रामाजवळी । पिटिली टाळी वानरीं ॥ ३३ ॥
पुढें करोनि हनुमंत । अंगदादि वीर समस्त ।
रामनाम स्वयें गर्जत । भुभुःकारत उठावले ॥ ३४ ॥
आधीं वंदोनि श्रीरामासी । सवेंच वंदोनि लक्ष्मणासी ।
लोटांगण सुग्रीवासी । सीताशुद्धीसी सांगावया ॥ ३५ ॥
त्यजोनियां महेंद्रगिरी । उड्डाण केलें पैं वानरीं ।
एकाहूनि एकवरी । वीर अंबरीं दाटले ॥ ३६ ॥
हस्तचित्रांचे आभाळ । जेंवी आच्छादी रविमंडळ ।
तैसे वानर सकळ । उतावीळ चालिले ॥ ३७ ॥
उड्डाण करितां वानरीं । पर्वत खचती धरणीवरी ।
समूळ उपडोनि तरूवरीं । गगनांतरीं परिभ्रमतीं ॥ ३८ ॥

मार्गात मधुवनाचा सुगंध आल्यावर वानरांची मधुपान करण्यासी इच्छा

करीत उल्लासें आल्हाद । कपिकुळें चाललीं विविध ।
पुढें मधुवनाचा गंध । आला सुगंध वानरां ॥ ३९ ॥
गंध येतां नासापुटीं । एक वानर लाळ घोटी ।
एक मटमटा देती मिठी । वानरकोटी तळमळिती ॥ ४० ॥
हें तंव सुग्रीवाचें वन । यासीं दधिमुख नित्य रक्षण ।
येथें रिघों शके कोण । काय आपण करावें ॥ ४१ ॥
सीताशुद्धीहोनि देख । आम्हां मधुवन अधिक ।
कृपा करीं रघुकुळटिळक । एकमेक तळमळिती ॥ ४२ ॥
राम सर्वात्मा सर्वज्ञ । ऐसीं वदती पुराणें ।
आम्हां दिधलिया मधुपान । आम्ही सर्वज्ञ सत्य मानूं ॥ ४३ ॥
जिभेनें घेतली लोळणी । थाया घेतला होठीं दोन्ही ।
मुख करताहे ग्लानी । मधुपानीं श्रीरामा ॥ ४४ ॥
सुग्रीवाचे मधुवन । सुरां असुरां अगम्य स्थान ।
ये वनीचें मधुपान । केंवी आपण पाविजे ॥ ४५ ॥
मनासीं मधुपानीं वणवण । चित्तासीं मधुपानीं चिंतन ।
केल्यावीण मधुपान । पुढें मन ढळेना ॥ ४६ ॥
ऐसे वानर समस्त । मधुपानीं अति आसक्त ।
कृपा करील रघुनाथ । तैंचि प्राप्त होय आम्हां ॥ ४७ ॥
राम सर्वांचे ह्रदयवासीं । वानरां बुद्धि दिधली कैसी ।
प्रार्थोनियां हनुमंतासी । अंगदापासीं मागाव ॥ ४८ ॥
सुग्रीव कपिराजा प्रसिद्ध । तैसाचि युवराजा अंगद ।
हनुमंते मागतां मद्य । देईल आल्हादेंकरोनी ॥ ४९ ॥

त्याप्रमाणे जांबवंतादि वानरमंडळींची हनुमंताकडून अंगदास विनंती

जांबवंतादि वानरांसीं । अवघे आले हनुमंतापासी ।
आम्हांसी मधु भक्षावयासी । अंगदापासीं वन मागें ॥ ५० ॥
हनुमंत म्हणे अंगदासी । कांहीं एक मागणें तुजपासीं ।
तूं तंव युवराज आम्हांसी । अति कृपेसीं मज देई ॥ ५१ ॥
अंगद म्हणे हनुमंता । तुझेनि बोल देईन जीविता ।
इतर अर्थाची कोण कथा । सांग पां आतां काय देऊं ॥ ५२ ॥
वानर पीडले परदेशीं । श्रमले येतां अति वेगेंसीं ।
मागताती मधुपानासी । तुजपासीं महाराजा ॥ ५३ ॥

विनंती ऐकताच अंगदाची तत्काळ संमती

माझ्या पित्याचे हें वन । सत्ता आहे मजअधीन ।
वनीं रिघोनि वानरगण । करोत मधुपान यथेष्ट ॥ ५४ ॥
बाळवृद्धादि अकर्मवंत । त्यांसीं न मागतां राय देत ।
दीनदयाळबिरूदें पढत । तुम्हीं समस्त कृतकार्य ॥ ५५ ॥
तुम्हांसही न मागतां । म्यां अर्पावें निजजीविता ।
कायसी मधुवनाची कथा । हनुमंताचे निजबोलें ॥ ५६ ॥
ऐक हनुमंता सावधान । वाहतों श्रीरामाची आण ।
वानरीं ओलोडोनि वन । मधुपान करावें ॥ ५७ ॥
जांबवंतादि वीर प्रसिद्ध । आलिंगी कनकांगदी अंगद ।
हनुमंताचें वंदोनि पद । करावें विविध मधुपान ॥ ५८ ॥

अनुज्ञा मिळताच वानरांना हर्षोन्माद व अंगदास धन्यवाद

ऐकोनि अंगदाचें वचन । उल्लासले वानरगण ।
आक्रमोनियां तें वन । मधुपान मांडिलें ॥ ५९ ॥
अंगद वीर धीर महाशूर । राजकुमर अति उदार ।
जुत्पत्ती श्रेष्ठ सेनाधर । सहित वानर वानिती ॥ ६० ॥
धन्य अंगदाची मती । धन्य अंगदाची स्थिती ।
अंगदाची उदार कीर्ती । स्वयें वानिती वानर ॥ ६१ ॥
लाहोनि अंगदाआज्ञापन । वनीं रिघोनि वानरगण ।
केलें वनकरांसी ताडण । जानुअपानमहामारू ॥ ६२ ॥

वनरक्षकांना घालवून मनसोक्त मधुपान

नाहीं घेतलें तोंडावरी । नाहीं मारिले बुक्यावरी ।
गांडगुडघ्याचे महामारीं । वनकर बाहेरी घातले ॥ ६३ ॥
जानुअपानमारासाठीं । राखणे पळती बारा वाटीं ।
पळतां धाप लागली पोटीं । सांगती गोष्टी दधिमुखा ॥ ६४ ॥
पळवोनियां वनकर । वन आलोडिती वानर ।
मधु प्राशिती अति मधुर । देती वारंवार महामिटक्या ॥ ६५ ॥
प्रत्येक एक एक वानर । मधु प्राशिती द्रोणमात्र ।
मदें डुल्लती कपींद्र । वन समग्र व्यापोनी ॥ ६६ ॥
किराणें करिती करूवरीं । एक उडती एकाचे शिरीं ।
एक लपती शाखांतरीं । एक वृक्षाग्रीं नाचती ॥ ६७ ॥
एक निजती वृक्षमूळीं । एक त्यांच्या पुच्छातळीं ।
घालिती मद्याची गुरळी । मदविव्हळीं उन्मत्त ॥ ६८ ॥
वानर तृप्त मद्यपानीं । उर्वरित मद्य घेउनी ।
खेळती मद्याचीं शिंपणीं । आक्रमूनीं येरयेरां ॥ ६९ ॥
येरयेरां पुच्छ हाणिती । येरयेरां पाठीं लागती ।
एक पडती अडखळती । एक लोळती उन्मादें ॥ ७० ॥

नंतर यथेच्छ क्रीडाविहार :

एक ते मधुपाना करिती । एक ते कोशिंबीरींसीं मद्य खाती ।
एक एकाचें मद्य हरिती । पात्र घेती हिसडोनी ॥ ७१ ॥
एक रडती एक पडती । एक तें ठायीं ठायीं अडखळती ।
एक ते मद्यानंदे नाचती । एक ते गाती रामकथा ॥ ७२ ॥
एक ते रागें रुसती । एक त्यांतें बुझाविती ।
एक मद्यसुखें सुखावती । एक डुल्लती मदोन्मादें ॥ ७३ ॥
एक उन्मादका वृत्ती । अति दीर्घ हांका देती ।
एक ते गोड गोष्टी सांगती । विध्वंसिती वन एक ॥ ७४ ॥
वृक्ष मोडिती वानरें । उलंडिती मद्यमात्रें ।
फोडिती मद्यसाधकयंत्रें । वनचरें उन्मादें ॥ ७५ ॥

वनाधिपती दधिमुखाकडे वनरक्षकांचे गार्‍हाणे :

वानरीं त्रासिले वनपाळ । दुःखें पळालें ते सकळ ।
दधिमुखापासीं केवळ । आले विव्हळ अति दुःखी ॥ ७६ ॥
आमचे वानरवीर समस्त । मधुवनातें विध्वंसित ।
आम्हांसी निवारितां तेथ । दुःखाभिभूत आम्हां केलें ॥ ७७ ॥
लाता बुक्या सुबद्ध धाये । त्या घायांचें भय कापे ।
शिळा शाळ ताळ येतां पाहें । झेलिलें जाय तळपोनी ॥ ७८ ॥
हाणितां नेटें जानु अपान । गुदें आलीं गा सुजोन ।
जळो तुझें मधुवन । गुदकंदन कोण सोसी ॥ ७९ ॥
गांडगुडघ्याचा आघात । पुच्छें रिघालीं ढुंगांत ।
दधिमुखासी दुःख सांगत । सुजलीं दावित निजगुदे ॥ ८० ॥
तूं तंव आमचा गा नाथ । दुःख सांगितलें समस्त ।
यावरी जो कार्यार्थ । कर्तव्यार्थ विचारीं ॥ ८१ ॥

दधिमुखाचा संताप व सैन्यासह आक्रमण :

ऐकोनि वानरांचें वचन । दधिमुख क्रोधायमान ।
वानरसैन्य आश्वासून । आले परतोन मधुवना ॥ ८२ ॥
अंगद हो कां राजसुत । हनुमंत हो कां अति आप्त ।
राजाज्ञा जे उल्लंघित । तेही समस्त दंडीन ॥ ८३ ॥
वालिसुग्रीवांचा पिता । ऋक्ष राजादारभ्यता ।
मी या वनाचा रक्षिता । कपी समस्तां कळलेसें ॥ ८४ ॥
त्याही मज न पुसतां । राजाज्ञाही न घेतां ।
केली मधुवनासीं उद्धतता । त्यां समस्तां दंडीन ॥ ८५ ॥
ऐसें सांगोनि वनकरांसी । क्रोध आला दधिमुखासी ।
दंडिलें माझ्या सेवकांसी । मीही त्यांसी दंडीन ॥ ८६ ॥
ऐकोनि दधिमुखाचे बोल । वानरवीर वनपाळ ।
घेवोनि शिळा शाळ ताळ । सन्नद्ध सकळ चालिले ॥ ८७ ॥
गांडी सुजल्या गांडगुडघ्यांसीं । तो राग वनकरांचे मानसी ।
घेवोनि आले दधिमुखासीं । वानरांसी त्राहाटिले ॥ ८८ ॥
जळस्थ स्थळस्थ वनस्थ । वानर सुग्रीवांसी भयभीत ।
अंगदापासीं आलें धांवत । दुरोनि दावित दधिमुखा ॥ ८९ ॥
मध्यें दधिमुख वीर । हाती प्रचंड शाळ तरूवर ।
भोंवता वानरांचा भार । अति दुर्धर लोटला ॥ ९० ॥
जांबवंतासी समानबळी । दधिमुख जो आतुर्बळी ।
वृक्ष घेवोनि करतळीं । करीं रवंदळी वानरां ॥ ९१ ॥

दधिमुखाने फ़ेकलेल्या साल वृक्षाचाचा प्रत्याघात करून त्याचा पाडाव

सुग्रीव आज्ञाअति समर्थ । मधुवन केलें हताहत ।
दधिमुख धाडिला दंडार्थ । कपि सांगत अंगदा ॥ ९२ ॥
दधिमुख अविचार । अंगद हनुमंतादि बळी वीर ।
याचा न घेतां विचार । कोपें तरूवर सोडिला ॥ ९३ ॥
तमालवृक्ष येतां वरी । अंगद उडोनि ते अवसरीं ।
वृक्ष झेलिला वरिचे वरी । सवेंच मारी दधिमुखा ॥ ९४ ॥
अंगद कोपला महावीरू । मदोन्मत्त अति दुर्धरू ।
पित्याचा मातुळ नये मारूं । हाही विचारू विसरला ॥ ९५ ॥
दधिमुख कपि वृद्धता । परम पूज्य अति श्रेष्ठता ।
हेंही नाठवे अंगदाचे चित्ता । क्रोधोन्मत्तत्ता मारिला ॥ ९६ ॥

सावध झाल्यावर सुग्रीवाकडे जाऊन गार्‍हाणे :

दधिमुखें हाणितां तरूवरीं । अंगदे झेलिला वामकरीं ।
दधिमुख हाणोनि सव्यकरीं । धरणीवरी पाडिला ॥ ९७ ॥
हात पाय अव्यवस्थ विकळ । भग्न मस्तक नेत्र विक्राळ ।
अशुद्धें जाला बंबाळ । मुख विक्राळ विचकिलें ॥ ९८ ॥
दधिमुख उचलोनि वानरीं । टाकिला मधुवनाबाहेरी ।
उदक सिंपिजे वानरीं । वारा वनकरीं घालिजे ॥ ९९ ॥
दधिमुख झाला सावध । सांगे वनकरां सकळां ।
सुग्रीवापासीं सांगों चला । आम्हांसी केला अपमान ॥ १०० ॥
ऐसें सांगोनि वनकरांसी । दधिमुख उडाला आकाशीं ।
निमिषें आला सुग्रीवापासीं । वनकरांसीं समवेत ॥ १०१ ॥
श्रीराम स्वामी आणि सौमित्र । उभे वानर जोडोनि कर ।
सुग्रीव बैसला कपिराजेंद्र । आज्ञा दुर्धर जयाची ॥ १०२ ॥
आज्ञा उल्लंघिल्या अणुप्रमाण । दंड करी अति कठीण ।
नाक कान सरकडून । खरारोहण तत्काळ ॥ १०३ ॥
दधिमुख रडत उकसाबुकसी । आडवा पडला सुग्रीवापासीं ।
वानरें दिधलें अपमानासी । पारपत्यासी करीं तया ॥ १०४ ॥
सुग्रीव बोलिला वचन । तुज दिधलें अभयदान ।
कोणें वानरें कैसा अपमान । विशद करून मज सांगे ॥ १०५ ॥

ते ऐकून सुग्रीव सर्व वृत्तांत विचारतो :

दधिमुख दुःख सांगत । अंगदादि हनुमंत ।
मधुवनातें विध्वंसित । मधु भक्षित राजपेय ॥ १०६ ॥
ऋक्षराजा तुजा पिता । तैंपासोनि वन रक्षिता ।
वनावरी माझी सत्ता । तुजही मागतां मी न देई ॥ १०७ ॥
तुझी राजाज्ञा न घेतां । आणि मजही न पुसातां ।
केलें मधुवनविघाता । मद्यपानीं उन्मत्त ॥ १०८ ॥
स्वादु सुगंध राजपान । वानरीं करीं करितां भक्षण ।
राजाज्ञा करावया दंडण । कोपें धांवोन मी गेलों ॥ १०९ ॥
अंगदें मज उपमर्दोन । वनीं सांडिलें मूर्च्छापन्न ।
वनकरां आघात जानुअपानें । गुदें सुजवान सोडिलें ॥ ११० ॥
वनकर वीर असंख्यात । सघृत तेलें गुद शेकित ।
निंदापमाने अति गांजित । शरणागत तुज आलों ॥ १११ ॥
तूं स्वामी असतां शिरीं । आम्हीं गांजिलों ऐसियापरी ।
आमचा होवोनि कैवारी । स्वयें उद्धरीं राजाज्ञा ॥ ११२ ॥
राजाज्ञेचें राहे बिक । आमचें निरसे निजदुःख ।
ऐसी उद्धतां लावीं शीक । दधिमुख विनविता ॥ ११३ ॥

ते वृत्त ऐकून वानरांनी सीतेचा शोध केला
असावा असे लक्ष्मण व सुग्रीव यांनी ताडले

ऐकोनि दधिमुखाचें वचन । सुग्रीव आणि लक्ष्मण ।
दोघे वीर विचक्षण । कार्यकारणलक्षक ॥ ११४ ॥
क्षुधित तृषित परदेशीं । वानर पीडिले उपवासीं ।
साधिलें सीताशुद्धीसी । वन भक्षासी तरी दिधलें ॥ ११५ ॥
अंगद वीर विचारी वीरश्रेष्ठ । राजपुत्र अति वरिष्ठ ।
जाणोनि सीताशुद्धीचे कष्ट । मधु यथेष्ट पाजिलें ॥ ११६ ॥
साधिली सीताशुद्धि इत्यर्थ । तेणें वानरां अतिसामर्थ्य ।
मधुवनासी विध्वंसित । ऐसा निश्चितार्थ मानिला ॥ ११७ ॥
ज्याचें कार्य न साधे जाण । तो सदाचा हीनदीन ।
मुखींहूनि न निघे वचन । काळें वदन तयाचें ॥ ११८ ॥
कार्य न साधे जयासी । मुख दाखिवितां लाज तयासी ।
मुखीं उतरे तया मसी । सामर्थ्य त्यासीं असेना ॥ ११९ ॥
सीताशुद्धि लाधली खरी । म्हणोनि मधुवनामाझारी ।
वानरीं केली आपांपरी । मारामारी वनकरां ॥ १२० ॥

त्याशिवाय जांबवंतासारख्या विचारी
मंत्र्याकडून असा अत्याचार होणे नाही

जांबवंत मंत्री जेथें । अंगद वीर अत्यद्‌भुत ।
सीताशुद्धी केली हनुमंत । मज निश्चितें मानलें ॥ १२१ ॥
हनुमंतें सिद्धी नेलें सकळ । निश्चयें शोधिली जनकबाळ ।
तेणें विजयी वानर सकळ । बळें प्रबळ हनुमंत ॥ १२२ ॥
हनुमंतावांचून । आणिका न साधे सीता चिद्रत्‍न ।
सीताशुद्धि साधोनि पूर्ण । मधुवन भक्षिलें ॥ १२३ ॥
सीताशुद्धि जाली पूर्ण । सुग्रीव आणि लक्ष्मण ।
निश्चय करोनि आपण । कृतकल्याण पावले ॥ १२४ ॥

हनुमंताला न विचारता आघात केल्याबद्दल त्यालाच दोष दिला

सुग्रीव म्हणे दधिमुखासीं । तूं तंव परम मूर्ख होसी ।
न पुसतां हनुमंतासी । त्वां कां त्यासीं युद्ध केलें ॥ १२५ ॥
मद्यपानी नव्हे हनुमंत । आणि तो तुझा परम आप्त ।
त्यासी न पुसतां वृत्तांत । युद्धकंदनार्थ कां केला ॥ १२६ ॥
सीताशुद्धि स्वयें साधून । वना आले वानरगण ।
तिहीं केलें मधुपान । सुखसंपन्न आम्ही तेणें ॥ १२७ ॥

दधिमुख व अंगद यांचे परस्पर समाधान व श्रीरामदर्शनास प्रयाण

तुज जो दिधला अपमान । तो क्षमा करावा मजलागून ।
अंगदासीं तूं भेटोन । समाधान साधावें ॥ १२८ ॥
सीताशुद्धि स्वयें साधून । वना आले वानरगण ।
तेणें दधिमुख हरिखेजोन । केलें नमन सुग्रीवा ॥ १२९ ॥
दधिमुख वानर येऊन । अंगदासी घाली लोटांगण ।
माझा अपराध संपूर्ण । क्षमा आपण करावा ॥ १३० ॥
अंगद म्हणे उन्मादता । तेव्हा केली अपमानता ।
तें मज नाठवे गा आतां । क्षमा तत्वतां करावी ॥ १३१ ॥
येरयेरां अभिवंदन । येरयेरां आलिंगन ।
अंगदें दधिमुखासी जाण । समाधान स्वानंदें ॥ १३२ ॥
तुम्ही आलेति सीताशुद्धीसीं । परम सुख सुग्रीवासीं ।
शीघ्र बोलाविलें तुम्हांसी । श्रीरामासी भेटावया ॥ १३३ ॥
श्रीरामप्रेम वानरांत । जरी जाले मदोन्मत्त ।
तरी रामनाम स्मरत । विव्हळित मदभरें ॥ १३४ ॥
एक मद्याचे उन्मत्तीं । रामनामें हांका देती ।
एक ते रामनामें डुल्लती । एक म्हणती रामनाम ॥ १३५ ॥
एक मदमोहें अडखळती । एक रामनामे लडबडिती ।
एक अडखळोनि रामनाम स्मरती । एक उपरमती हरिनामें ॥ १३६ ॥
एक मदमोहें नाचती । एक उन्मादें गीत गाती ।
गातां नाचतां राम स्मरती । विटाविती रामनामें ॥ १३७ ॥
वानर देखोनि मदोन्मत्त । हनुमान रामकार्यी उद्यत ।
वंदावया श्रीरघुनाथ । शीघ्रवत निघाला ॥ १३८ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतासी रामदर्शन ।
पुढें अति गोड निरूपण । सावधान अवधारा ॥ १३९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
वानरमधुवनविध्वंसो नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥ २४ ॥
॥ ओव्यां १३९ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १७६ ॥



GO TOP