श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीताकर्तृकं शपथग्रहणं रसातले प्रवेशनं च -
सीतेचे शपथ ग्रहण आणि पृथ्वीच्या उदरात प्रवेश -
वाल्मीकिनैवमुक्तस्तु राघवः प्रत्यभाषत ।
प्राञ्जलिर्जगतो मध्ये दृष्ट्‍वा तां वरवर्णिनीम् ॥ १ ॥
महर्षि वाल्मीकिनी असे म्हटल्यावर राघव वरवर्णिनी सीतेकडे एकवेळ पाहून त्या जनसमुदायामध्ये हात जोडून बोलले - ॥१॥
एवमेतन्महाभाग यथा वदसि धर्मवित् ।
प्रत्ययस्तु मम ब्रह्मन् तव वाक्यैरकल्मषैः ॥ २ ॥

प्रत्ययस्तु पुरा वृत्तो वैदेह्याः सुरसन्निधौ ।
शपथस्तु कृतस्तत्र तेन वेश्म प्रवेशिता ॥ ३ ॥
महाभाग ! आपण धर्माचे ज्ञाते आहात. सीतेच्या संबंधी आपण जे सांगत आहात, ते सर्व ठीक आहे. ब्रह्मन्‌ ! आपल्या या निर्दोष वचनांमुळे मला जनकनंदिनीच्या शुद्धतेविषयी विश्वास प्राप्त झाला आहे. मागेही सीतेने आपल्या शुद्धतेविषयी शपथ घेतली होती, ज्यामुळे मी तिला आपल्या भवनात स्थान दिले. ॥२-३॥
लोकापवादो बलवान् येन त्यक्ता हि मैथिली ।
सेयं लोकभयाद्ब्रह्मन् नपापेत्यभिजानता ।
परित्यक्ता मया सीता तद्‌भावन्क्षन्तुमर्हति ॥ ४ ॥
परंतु पुढे काळ गेल्यावर परत अत्यंत जोराचा लोकापवाद उठला, ज्यामुळे विवश होऊन मला मैथिलीचा त्याग करावा लागला. ब्रह्मन्‌ ! हे जाणत असून की सीता सर्वथा निष्पाप आहे मी केवळ समाजाच्या भयाने तिला सोडून दिले होते, म्हणून आपण माझ्या या अपराधाची क्षमा करावी. ॥४॥
जानामि चेमौ पुत्रौ मे यमजातौ कुशीलवौ ।
शुद्धायां जगतो मध्ये मैथिल्यां प्रीतिरस्तु मे ॥ ५ ॥
मी हेही जाणतो की हे जुळे उत्पन्न झालेले कुमार कुश आणि लव माझेच पुत्र आहेत, तथापि जनसमुदायात शुद्ध प्रमाणित झाल्यावरच मैथिलीमध्ये माझे प्रेम होऊ शकते. ॥५॥
अभिप्रायं तु विज्ञाय रामस्य सुरसत्तमाः ।
सीतायाः शपथे तस्मिन् महेन्द्राद्या महौजसः ॥ ६ ॥

पितामहं पुरस्कृत्य सर्व एव समागताः ।
श्रीरामांचा अभिप्राय जाणून सीतेच्या शपथेच्या समयी महेंद्र आदि सर्व मुख्य मुख्य महातेजस्वी देवता पितामह ब्रह्मदेवांना पुढे करून तेथे आल्या. ॥६ १/२॥
आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवा मरुद्‌गणाः ॥ ७ ॥

गन्धर्वाप्सरसश्चैव सर्व एव समागताः ।
नागाः सुपर्णाः सिद्धाश्च ते सर्वे हृष्टमानसाः ॥ ८ ॥

सीताशपथसम्भ्रान्ताः सर्व एव समागताः ।
आदित्य, वसु, रूद्र, विश्वदेव, मरूद्‍गण, समस्त साध्यदेव, सर्व महर्षि, नाग, गरूड आणि संपूर्ण सिद्धगण प्रसन्नचित्त होऊन सीतेचे शपथ-ग्रहण पहाण्यासाठी जणु भीतभीत तेथे येऊन पोहोंचले. ॥७-८ १/२॥
दृष्ट्‍वा देवान् ऋषींश्चैव राघवः पुनरब्रवीत् ॥ ९ ॥

प्रत्ययो मे सुरश्रेष्ठा ऋषिवाक्यैरकल्मषैः ।
शुद्धायां जगतो मध्ये वैदेह्यां प्रीतिरस्तु मे ॥ १० ॥
देवतांना आणि ऋषिंना उपस्थित पाहून राघव परत बोलले - सुरश्रेष्ठगण ! जरी मला महर्षि वाल्मीकिंच्या निर्दोष वचनांनीच पूरा विश्वास झाला आहे, तथापि जन समाजामध्ये वैदेहीची विशुद्धता प्रमाणित झाल्यावर मला अधिक प्रसन्नता होईल. ॥९-१०॥
ततो वायुः शुभः पुण्यो दिव्यगन्धो मनोरमः ।
तज्जनौघं सुरश्रेष्ठो ह्लादयामास सर्वतः ॥ ११ ॥
त्यानंतर दिव्य सुगंधाने परिपूर्ण, मनाला आनंद देणारा परम पवित्र एवं शुभकारक सुरश्रेष्ठ वायुदेव मंद गतिने प्रवाहित होऊन सर्व बाजूनी तेथील जनसमुदायाला आल्हाद प्रदान करू लागले. ॥११॥
तदद्‌भुतमिवाचिन्त्यं निरैक्षन्त समाहिताः ।
मानवाः सर्वराष्ट्रेभ्यः पूर्वं कृतयुगे यथा ॥ १२ ॥
समस्त राष्ट्रातून आलेल्या मनुष्यांनी एकाग्रचित्त होऊन प्राचीन काळच्या सत्ययुगाप्रमाणे ही अद्‍भुत अचिंत्यशी घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. ॥१२॥
सर्वान् समागतान् दृष्ट्‍वा सीता काषायवासिनी ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं अधोदृष्टिरवाङ्‌मुखी ॥ १३ ॥
त्या समयी सीतेने तपस्विनीना अनुरूप भगवी वस्त्रे धारण केली होती. सर्वांना उपस्थित जाणून ती हात जोडून, दृष्टि आणि मुख खाली करून बोलली - ॥१३॥
यथाऽहं राघवादन्यं मनसापि न चिन्तये ।
तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति ॥ १४ ॥
मी राघवांशिवाय अन्य कुठल्या पुरूषाचे (स्पर्श तर दूर राहिला) मनानेही चिंतन करत नाही, जर हे सत्य असेल तर भगवती पृथ्वीदेवी मला आपल्या मांडीवर स्थान देईल. ॥१४॥
मनसा कर्मणा वाचा यथा रामं समर्चये ।
तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति ॥ १५ ॥
जर मी मन, वाणी आणि क्रियेच्या द्वारा केवळ श्रीरामाचीच आराधना करीत आहे तर भगवती पृथ्वीदेवी मला आपल्या अंकांवर स्थान देईल. ॥१५॥
यथैतत् सत्यमुक्तं मे वेद्मि रामात्परं न च ।
तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति ॥ १६ ॥
भगवान्‌ श्रीरामांना सोडून मी दुसर्‍या कुठल्या पुरुषाला जाणत नाही, मी बोललेली ही गोष्ट जर सत्य असेल तर भगवती पृथ्वीदेवी मला आपल्या मांडीवर स्थान देईल. ॥१६॥
तथा शपन्त्यां वैदेह्यां प्रादुरासीत् तदद्‌भुतम् ।
भूतलाद् उत्थितं दिव्यं सिंहासनं अनुत्तमम् ॥ १७ ॥
वैदेही सीतेने याप्रकारे शपथ करतांच भूतलांतून एक दिव्य सिंहासन प्रकट झाले जे फारच सुंदर आणि दिव्य होते. ॥१७॥
ध्रियमाणं शिरोभिस्तु नागैरमितविक्रमैः ।
दिव्यं दिव्येन वपुषा दिव्यरत्‍नेविभूषितैः ॥ १८ ॥
दिव्य रत्‍नांनी विभूषित महापराक्रमी नागांनी दिव्यरूप धारण करून त्या दिव्य सिंहासनाला आपल्या शिरावर धारण केले होते. ॥१८॥
तस्मिंस्तु धरणी देवी बाहुभ्यां गृह्य मैथिलीम् ।
स्वागतेनाभिनन्द्यैनां आसने चोपवेशयत् ॥ १९ ॥
सिंहासनाबरोबरच पृथ्वीची अधिष्ठात्री देवीही दिव्य रूपाने प्रकट झाली. तिने मैथिली सीतेला आपल्या दोन्ही भुजांनी उचलून मांडीवर घेतले आणि स्वागतपूर्वक तिचे अभिनंदन करून तिला त्या सिंहासनावर बसविले. ॥१९॥
तामासनगतां दृष्ट्‍वा प्रविशन्तीं रसातलम् ।
पुष्पवृष्टिरविच्छिन्ना दिव्या सीतामवाकिरत् ॥ २० ॥
सिंहासनावर बसून जेव्हा सीतादेवी रसातलात प्रवेश करू लागली तेव्हा त्या समयी देवतांनी तिच्याकडे पाहिले. नंतर तर आकाशांतून तिच्यावर दिव्य पुष्पांची अखंड वृष्टि होऊ लागली. ॥२०॥
साधुकारश्च सुमहान् देवानां सहसोत्थितः ।
साधु साध्विति वै सीते यस्यास्ते शीलमीदृशम् ॥ २१ ॥
देवतांच्या मुखांतून एकाएकी धन्य-धन्य चा महान्‌ शब्द प्रकट झाला. त्या म्हणू लागल्या - सीते ! तू धन्य आहेस; धन्य आहेस. तुझे शील आणि स्वभाव इतके सुंदर आणि असे पवित्र आहे. ॥२१॥
एवं बहुविधा वाचो ह्यन्तरिक्षगताः सुराः ।
व्याजह्रुर्हृष्टमनसो दृष्ट्‍वा सीताप्रवेशनम् ॥ २२ ॥
सीतेच्या रसातलात प्रवेश झालेला पाहून आकाशात उभ्या असलेल्या देवता प्रसन्नचित्त होऊन या प्रकारच्या बर्‍याचशा गोष्टी करू लागल्या. ॥२२॥
यज्ञवाटगताश्चापि मुनयः सर्व एव ते ।
राजानश्च नरव्याघ्रा विस्मयान्नोपरेमिरे ॥ २३ ॥
यज्ञ मण्डपात आलेले सर्व मुनि आणि नरश्रेष्ठ नरेशही आश्चर्याने भरून गेले. ॥२३॥
अन्तरिक्षे च भूमौ च सर्वे स्थावरजङ्‌गमाः ।
दानवाश्च महाकायाः पाताले पन्नगाधिपाः ॥ २४ ॥
अंतरिक्षात आणि भूतलावर सर्व चराचरप्राणी तसेच पाताळात विशालकाय दानव आणि नागराजही आश्चर्यचकित झाले. ॥२४॥
केचिद् विनेदुः संहृष्टाः केचिद् ध्यानपरायणाः ।
केचिद् रामं निरीक्षन्ते केचित् सीतामचेतसः ॥ २५ ॥
कोणी हर्षनाद करू लागले, कुणी ध्यानमग्न झाले, कोणी श्रीरामांकडे बघू लागले आणि कोणी अचेत झाल्यासारखे होऊन सीतेकडे निरखून पाहू लागले. ॥२५॥
सीताप्रवेशनं दृष्ट्‍वा तेषामासीत् समागमः ।
तन्मुहूर्तमिवात्यर्थं समं सम्मोहितं जगत् ॥ २६ ॥
सीतेचा भूतलात प्रवेश झालेला पाहून तेथे आलेले सर्व लोक हर्ष, शोक आदि मध्ये बुडून गेले. एक मुहूर्तपर्यंत तेथील सारा जनसमुदाय अत्यंत मोहाच्छन्नसा झाला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तनवतितमः सर्गः ॥ ९७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा सत्त्याण्णवावा सर्ग पूरा झाला. ॥९७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP