श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण हनुमते मुद्रिकां प्रदाय तस्य दक्षिणदिशि प्रेषणम् - श्रीरामांनी हनुमानाला अंगठी देऊन धाडणे -
विशेषेण तु सुग्रीवो हनुमत्यर्थमुक्तवान् ।
स हि तस्मिन् हरिश्रेष्ठे निश्चितार्थोऽर्थसाधने ॥ १ ॥
सुग्रीवांनी हनुमानांच्या समक्ष विशेषरूपाने सीतेच्या अन्वेषणरूप प्रयोजन उपस्थित केले, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की वानरश्रेष्ठ हनुमान या कार्यास सिद्ध करू शकेल. ॥१॥
अब्रवीच्च हनूमंतं विक्रांतमनिलात्मजम् ।
सुग्रीवः परमप्रीतः प्रभुः सर्ववनौकसाम् ॥ २ ॥
समस्त वानरांचे स्वामी सुग्रीवांनी अत्यंत प्रसन्न होऊन परम पराक्रमी वायुपुत्र हनुमानास म्हटले- ॥२॥
न भूमौ नांतरिक्षे वा नांबरे नामरालये ।
नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरिपुंगव ॥ ३ ॥
’कपिश्रेष्ठ ! पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, देवलोक अथवा जलातही तुमच्या गतीचा अवरोध मी कधी पहात नाही. ॥३॥
सासुराः सहगंधर्वाः सनागनरदेवताः ।
विदिताः सर्वलोकास्ते ससागरधराधराः ॥ ४ ॥
’असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, देवता, समुद्र तसेच पर्वतांसहित संपूर्ण लोकांचे तुम्हाला ज्ञान आहे. ॥४॥
गतिर्वेगश्च तेजश्च लाघवं च महाकपे ।
पितुस्ते सदृशं वीर मारुतस्य महौजसः ॥ ५ ॥
’वीर ! महाकपे ! सर्वत्र अबाधित गति, वेग, तेज आणि उत्साह - हे सर्व सद्‌गुण तुमच्यात, आपल्या महापराक्रमी पिता वायुच्या समान आहेत. ॥५॥
तेजसा वापि ते भूतं समं भुवि न विद्यते ।
तद्यथा लभ्यते सीता तत् त्वमेवानुचिंतय ॥ ६ ॥
’या भूमण्डलात कोणीही प्राणी तुमच्या तेजाची बरोबरी करणारा नाही आहे. म्हणून ज्याप्रकारे सीतेची उपलब्धी होऊ शकेल, ह्या उपायाचा तुम्हीच विचार करा. ॥६॥
त्वय्येव हनुमान् अस्ति बलं बुद्धिः पराक्रमः ।
देशकालानुवृत्तिश्च नयश्च नयपण्डित ॥ ७ ॥
’हनुमान् ! तुम्ही नीतिशास्त्राचे पंडित आहात. एकमात्र तुमच्या ठिकाणीच बल, बुद्धि, पराक्रम, देश-कालाचे अनुसरण तसेच नीतिपूर्ण वर्तन एकत्रितपणे दिसून येत आहे.’ ॥७॥
ततः कार्यसमासंगं अवगम्य हनूमति ।
विदित्वा हनुमंतं च चिंतयामास राघवः ॥ ८ ॥
सुग्रीवाचे बोलणे ऐकून राघवांना हे ज्ञात झाले की या कार्याच्या सिद्धीचा संबंध - या पूर्ण कार्याचा सर्व भार हनुमानावरच आहे. त्यांनी स्वतःच हे अनुभवले की हनुमान् या कार्यास सफल करण्यास समर्थ आहेत. मग ते या प्रकारे मनातल्या मनात विचार करू लागले- ॥८॥
सर्वथा निश्चितार्थोऽयं हनूमति हरीश्वरः ।
निश्चितार्थकरश्चापि हनुमान् कार्यसाधने ॥ ९ ॥
’वानरराज सुग्रीवास सर्वथा हाच विश्वास आहे की हनुमानच निश्चितरूपाने आमचे हे प्रयोजन सिद्ध करू शकतात. स्वतः हनुमान् ही अत्यंत निश्चितरूपाने या कार्यास सिद्ध करण्याचा विश्वास राखून आहेत. ॥९॥
तदेवं प्रस्थितस्यास्य परिज्ञातस्य कर्मभिः ।
भर्त्रा परिगृहीतस्य ध्रुवः कार्यफलोदयः ॥ १० ॥
याप्रकारे कार्यांच्या द्वारा ज्यांची परीक्षा केली गेलेली आहे तसेच जे सर्वश्रेष्ठ समजले गेलेले आहेत, ते हनुमान् आपले स्वामी सुग्रीव द्वारा सीतेच्या शोधासाठी धाडले जात आहेत. यांच्या द्वारा या कार्याच्या फलाचा उदय (सीतेचे दर्शन) होणे निश्चित आहे. ॥१०॥
तं समीक्ष्य महातेजा व्यवसायोत्तरं हरिम् ।
कृतार्थ इव सःऋष्टः प्रहृष्टेंद्रियमानसः ॥ ११ ॥
असा विचार करून महातेजस्वी श्रीरामांनी कार्य साधण्याच्या उद्योगात सर्वश्रेष्ठ हनुमानाकडे दृष्टिपात करून आपल्याला कृतार्थसे मानले आणि ते प्रसन्न झाले. त्यांची सर्व इंद्रिये आणि मन हर्षाने प्रफुल्लित झाली. ॥११॥
ददौ तस्य ततः प्रीतः स्वनामाङ्‌कोःपशोभितम् ।
अङ्‌गु्लीयमभिज्ञानं राजपुत्र्याः परंतपः ॥ १२ ॥
तदनंतर परंतप श्रीरामांनी प्रसन्नतापूर्वक आपल्या नामाच्या अक्षरांनी सुशोभित एक अंगठी हनुमानांच्या हातात दिली, जी राजकुमारी सीतेला ओळखरूपाने अर्पण करण्यास दिली होती. ॥१२॥
अनेन त्वां हरिश्रेष्ठ चिह्नेन जनकात्मजा ।
मत्सकाशादनुप्राप्तं अनुद्विग्नानुपश्यति ॥ १३ ॥
अंगठी देऊन ते म्हणाले- ’कपिश्रेष्ठ ! या चिन्हाच्या द्वारा जानकी सीतेला हा विश्वास वाटेल की तुम्ही माझ्याकडून आलेले आहात. यामुळे ती भय त्यागून तुमच्याकडे पाहू शकेल. ॥१३॥
व्यवसायश्च ते वीर सत्त्वयुक्तश्च विक्रमः ।
सुग्रीवस्य च संदेशः सिद्धिं कथयतीव मे ॥ १४ ॥
’वीरवर ! तुमचा उद्योग, धैर्य, पराक्रम आणि सुग्रीवांचा संदेश - ही सर्व मला या गोष्टीची सूचना देत आहेत की तुमच्या हातून कार्याची सिद्धी अवश्य होईल.’ ॥१४॥
स तं गृह्य हरिश्रेष्ठः स्थाप्य मूर्ध्नि कृताञ्जलिः ।
वंदित्वा चरणौ चैव प्रस्थितः प्लवगर्षभः ॥ १५ ॥
वानरश्रेष्ठ हनुमानांनी ती अंगठी घेऊन तिला मस्तकावर ठेवले आणि नंतर हात जोडून श्रीरामांच्या चरणी प्रणाम करून ते वानरश्रेष्ठ तेथून प्रस्थित झाले. ॥१५॥
स तत् प्रकर्षन् हरिणां महद् बलं
बभूव वीरः पवनात्मजः कपिः ।
गतांबुदे व्योम्नि विशुद्धमण्डलः
शशीव नक्षत्रगणोपशोभितः ॥ १६ ॥
या समयी वीर वानर पवनकुमार हनुमान् आपल्या बरोबर वानरांची विशाल सेना घेऊन जात असता मेघरहित आकाशात विशुद्ध, निर्मल मण्डलाने उपलक्षित चंद्रमा नक्षत्र समूहांसह जसा सुशोभित होतो तसे शोभू लागले. ॥१६॥
अतिबल बलमाश्रितस्तवाहं
हरिवरविक्रम विक्रमैरनल्पैः ।
पवनसुत यथाधिगम्यते सा
जनकसुता हनुमंस्तथा कुरुष्व ॥ १७ ॥
’जात असलेल्या हनुमनास संबोधित करून श्रीरामांनी परत म्हटले - ’अत्यंत बलशाली कपिश्रेष्ठ ! मी तुमच्या बलाव विसंबून आहे. पवनकुमार हनुमान् ! ज्याप्रकारे जनकसुता सीता प्राप्त होऊ शकेल, तुम्ही आपल्या महान् बलविक्रमाने तसाच प्रयत्‍न करा. ठीक आहे. आता जा.’ ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौवेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP