॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ षष्ठः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



रावण मारीचाकडे जातो -


श्रीमहादेव उवाच
विचिन्त्यैवं निशायां स प्रभाते रथमास्थितः ।
रावणो मनसा कार्यंऎकं निश्चित्य बुद्धिमान् ॥ १ ॥
ययौ मारीचसदनं परं पारमुदन्वतः ।
मारीचस्तत्र मुनिवझ्जटावल्कलधारकः ॥ २ ॥
ध्यायन् हृदि परात्मानं निर्गुणं गुणभासकम् ।
समाधिविरमेऽपश्यद्‌रावणं गृहमागतम् ॥ ३ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, रात्री असा विचार करून आणि प्रभात काळी उठून बुद्धिमान रावण रथावर आरूढ झाला आणि मनातल्या मनात एक निश्चय करून, सागराच्या दुसर्‍या तीरावर असणार्‍या मारीचाच्या घरी गेला. तेथे मुनीप्रमाणे जटा व वल्कल धारण करणारा मारीच आपल्या हृदयात प्रकृत्तीच्या गुणांना प्रकाशित करणार्‍या पण स्वतः निर्गुण असणार्‍या परमात्म्याचे ध्यान करीत होता. समाधी संपल्यावर, रावण आपल्या घरी आलेला त्याला दिसला. (१-३)

द्रुतंऊत्थाय चालिङ्‌ग्य पूजयित्वा यथाविधि ।
कृतातिथ्यं सुखासीनं मारीचो वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥
चटकन उठून व रावणाला आलिंगन देऊन आणि त्याची विधिवत पूजा करून मारीचाने त्याचे आतिथ्य केले. नंतर स्वस्थ बसलेल्या रावणाला मारीच म्हणाला. (४)

समागमनमेतत्ते रथेनैकेन रावण ।
चिन्तापर इवाभासि हृदि कार्यं विचिन्तयन् ॥ ५ ॥
"हे रावणा, या वेळी फक्त एकटा रथात बसून तू येथे आला आहेस. मनात कोणत्यातरी कार्याचा विचार करीत असल्याने, तू चिंताग्रस्त असल्याप्रमाणे दिसत आहेस. (५)

ब्रूहि मे न हि गोप्यं चेत्करवाणि तव प्रियम् ।
न्याय्यं चेत् ब्रूहि राजेन्द्र वृजिनं मां स्पृशेन्न हि ॥ ६ ॥
हे राजेंद्रा, जर काही गुप्त गोष्ट नसेल तर ते कार्य तू मला सांग. मी तुझे प्रिय कार्य करीन. जर ते न्याय्य असेल व ते करण्याने मला पाप लागणार नसेल, तर ते तू मला सांग." (६)

रावण उवाच
अस्ति राजा दशरथः साकेताधिपतिः किल ।
रामनामा सुतस्तस्य ज्येष्ठं सत्यपराक्रमः ॥ ७ ॥
रावण म्हणाला- "लोक असे म्हणतात की अयोध्या नगरीचा अधिपती दशरथ राजा आहे. त्याचा राम नावाचा ज्येष्ठ पुत्र सत्य-पराक्रमी आहे. (७)

विवासयामास सुतं वनं वनजनप्रियम् ।
भार्यया सहितं भ्रात्रा लक्ष्मणेन समन्वितम् ॥ ८ ॥
वनातील लोकांना प्रिय असणार्‍या रामाला दशरथाने पत्‍नीसह आणि लक्ष्मण या भावासह वनात पाठविले आहे. (८)

स आस्ते विपिने घोरे पञ्चवट्याश्रमे शुभे ।
तस्य भार्या विशालाक्षी सीता लोकविमोहिनी ॥ ९ ॥
आता तो राम भयंकर अरण्यातील पवित्र अशा पंचवटीत एका आश्रमात राहात आहे. मी असे ऐकले आहे की विशाल नयन असणारी त्याची पत्‍नी सीता ही तिन्ही लोकांना मोहित करणारी आहे. (९)

रामो निरपराधान्मे राक्षसान् भीमविक्रमान् ।
खरं च हत्वा विपिने सुखमास्तेऽतिनिर्भयः ॥ १० ॥
भयंकर पराक्रम करणार्‍या अशा माझ्या निरपराध राक्षसांना तसेच खराला ठार करून राम आता अतिशय निर्भयपणे अरण्यात सुखाने राहात आहे. (१०)

भगिन्याः शूर्पणखाया निर्दोषायाश्च नासिकाम् ।
कर्णौ चिच्छेद दुष्टात्मा वने तिष्ठति निर्भयः ॥ ११ ॥
शूर्पणखा या माझ्या निर्दोष बहिणीचे नाक आणि दोन कान त्या दुष्टात्म्याने तोडून टाकले. आणि आता तो अरण्यात निर्भयपणे राहात आहे. (११)

अतस्त्वया सहायेन गत्वा तत्प्राणवल्लभाम् ।
आनयिष्यामि विपिने रहिते राघवेण ताम् ॥ १२ ॥
म्हणून राम तपोवनात नसताना, तेथे जाऊन, त्याची ती प्राणापेक्षा प्रिय असणारी सीता मी तुझ्या सहाय्याने आणू इच्छितो. (१२)

त्वं तु मायामृगो भूत्वा ह्याश्रमादपनेष्यसि ।
रामं च लक्ष्मणं चैव तदा सीतां हराम्यहम् ॥ १३ ॥
आता तू इतकेच करायचे की माया-मृग होऊन राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या आश्रमापासून दूर ने. त्या वेळी मी सीतेचे हरण करीन. (१३)

त्वं तु तावत्सहायं मे कृत्वा स्थास्यसि पूर्ववत् ।
इत्येवं भाषमाणं तं रावणं वीक्ष्य विस्मितः ॥ १४ ॥
इतके सहाय्य मला करून नंतर तू पूर्वीप्रमाणेच आपल्या आश्रमात राहा." अशा प्रकारे बोलणार्‍या त्या रावणाकडे पाहून मारीच विस्मयचकित झाला आणि म्हणू लागला. (१४)

केनेदमुपदिष्टं ते मूलघातकरं वचः ।
स एव शत्रुर्वध्यश्च यस्त्वन्नाशं प्रतीक्षते ॥ १५ ॥
"तुझा सर्वनाश करणारी ही गोष्ट तुला कुणी सांगितली ? असा उपदेश करणारा तो प्राणी तुझा नाश करण्याची प्रतीक्षा करीत आहे, तोच तुझा शत्रू आहे आणि तोच वध करण्यास योग्य आहे. (१५)

रामस्य पौरुषं स्मृत्वा चित्तं अद्यापि रावण ।
बालोऽपि मां कौशिकस्य यज्ञसंरक्षणाय सः ॥ १६ ॥
आगतस्त्विषुणैकेन पातयामास सागरे ।
योजनानां शतं रामस्तदादि भयविह्वलः ॥ १७ ॥
स्मृत्वा स्मृत्वा तदेवाहं रामं पश्यामि सर्वतः ॥ १८ ॥
हे रावणा, तो राम लहान असून सुद्धा विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणासाठी वनात आला होता. त्या वेळी त्याने केवळ एकाच बाणाने मला शंभर योजने दूर समुद्रात फेकून दिले होते. तेव्हापासून मी भयाने व्याकूळ आहे. रामाचे ते सामर्थ्य आजसुद्धा मला रमरते आणि त्याचे वारंवार स्मरण झाल्यावर मला सगळीकडे रामच राम दिसू लागतो. (१६-१८)

दण्डकेऽपि पुनरप्यहं वने
     पूर्ववैरमनुचिन्तयन् हृदि ।
तीक्ष्ण शृङ्‌गमृगरूपमेकदा
     मादृशैर्बहुभिरावृतोऽभ्ययाम् ॥ १९ ॥
पूर्वीच्या वराचे स्मरण करीत तीक्ष्ण शींगे असणार्‍या मृगाचे रूप धारण करून आणि माझ्यासारख्या अनेक मृगांना बरोबर घे ऊ ्न मी पुनः एकदा त्या दंडकारण्यातसुद्धा गेलो होतो. (१९)

राघवं जनकजासमन्वितं
     लक्ष्मणेन सहितं त्वरान्वितः ।
आगतोऽहमथ हन्तुमुद्यतो
     मां विलोक्य शरमेकमक्षिपत् ॥ २० ॥
नंतर जनककन्या सीता आणि लक्ष्मणासहित असणार्‍या रामाजवळ मी एकदा त्वरेने गेलो आणि नंतर त्याला ठार करण्यास उद्युक्त झालो. तेव्हा मला पाहून त्या रामाने एक बाण माझ्यावर सोडला. (२०)

तेन विद्धहृदयोऽहमुद्‌भ्रमन्
     राक्षसेन्द्र पतितोऽस्मि सागरे ।
तत्प्रभृत्यहमिदं समाश्रितः
     स्थानमूर्जितमिदं भयार्दितः ॥ २१ ॥
हे राक्षसेंद्रा, त्या बाणाने माझे हृदय विद्ध झाले. आणि वर आकाशात कोलांट्या खात मी समुद्रात जाऊन पडलो. तेव्हापासून फारच भयभीत होऊन मी या निर्भय स्थानाचा आश्रय घेऊन राहात आहे. (२१)

राममेव सततं विभावये
     भीतभीत इव भोगराशितः ।
राजरत्‍नरमणीरथादिकं
     श्रोत्रयोर्यदि गतं भयं भवेत् ॥ २२ ॥
तेव्हापासून मला सगळीकडे रामाचाच भास होत आहे. इतका की मी भोग्य वस्तूंच्या राशींना अतिशय भितो. राजा, रत्‍न, रमणी, रथ (या भोग्य वस्तू असूनही त्यांचे पहिले अक्षर 'र' असल्यामुळे) हे शब्द कानावर पडले तरी मला भय वाटते. (२२)

राम आगत इहेति शङ्‌कया
     बाह्यकार्यमपि सर्वमत्यजम् ।
निद्रया परिवृतो यदा स्वपे
     राममेव मनसानुचिन्तयन् ॥ २३ ॥
'राम येथे आला असेल' या शंकेने मी बाहेरील सर्व कामेसुद्धा सोडली आहेत. निद्रेने घेरल्यावर मी जेव्हा झोपतो, तेव्हासुद्धा मनाने रामाची काळजी करीतच मी झोपतो. (२३)

स्वप्नदृष्टिगतराघवं तदा
     बोधितो विगतनिद्र आस्थितः ।
तद्‌भवापि विमुच्य चाग्रहं
     राघवं प्रति गृहं प्रयाहि भोः ॥ २४ ॥
त्या वेळी स्वप्नात दृष्टीस पडलेल्या राघवाला पाहून मी जागा होतो. त्यानंतर मी निद्रारहित स्थितीत पडूनच राहातो. तेव्हा अरे रावणा, राघवांसंबंधी तुझा हट्ट सोडून देऊन तू घरी परत जा. (२४)

रक्ष राक्षसकुलं चिरागतं
     तत्स्मृतौ सकलमेव नश्यति ।
तव हितं वदतो मम भाषितं
     परिगृहाण परात्मनि राघवे ॥ २५ ॥
त्यज विरोधमतिं भज भक्तितः
     परमकारुणिको रघुनन्दनः ।
अहमशेषमिदं मुनिवाक्यतो-
     ऽशृणवमादियुगे परमेश्वरः ॥ २६ ॥
ब्रह्मणार्थित उवाच तं हरिः
     किं तवेप्सितमहं करवाणि तत् ।
ब्रह्मणोक्तमरविन्दलोचन
     त्वं प्रयाहि भुवि मानुषं वपुः ।
दशरथात्मजभावमञ्जसा
     जहि रिपुं दशकन्धरं हरे ॥ २७ ॥
(घरी परत जाऊन) चिरकाळ चालत आलेल्या राक्षस-कुळाचे रक्षण कर. नुसती त्या रामाची स्मृती आली तरी तुझे सर्वस्व नष्ट होऊन जाईल. तुझ्या हितासाठी मी आता जे सांगतो ते ऐक. परमात्मा असणार्‍या राघवाच्या बाबतीतील तुझी विरोधी बुद्धी सोडून दे. भक्तीने त्याला शरण जा. रघुनंदन राम अतिशय करुणा-संपन्न आहे. मुनीश्वरांच्या मुखातून येणार्‍या वाक्यांवरून मी हे सर्व काही ऐकले आहे की सत्ययुगात परमात्म्याला ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. तेव्हा हरी परमात्मा त्याला म्हणाला, 'हे ब्रह्मदेवा, तू तुझे मनोरथ मला सांग. मी ते पूर्ण करीन.' तेव्हा ब्रह्मदेव हरींना म्हणाला ' अहो कमलनयन श्रीहरी, तुम्ही मनुष्यरूप धारण करून पृथ्वीवर जा आणि दशरथाचा पुत्र श्रीराम होऊन, देवांचा शत्रू जो दशानन रावण त्याला शीघ ठार करा. ' (२५-२७)

अतो न मानुषो रामः साक्षान्नारायणोऽव्ययः ।
मायामानुषवेषेण वनं यातोऽतिनिर्भयः ॥ २८ ॥
भूभारहरणार्थाय गच्छ तात गृहं सुखम् ।
श्रुत्वा मारीचवचनं रावणः प्रत्यभाषत ॥ २९ ॥
म्हणून हे रावणा, तू हे पक्के लक्षात घे की राम हा साधा मानव नाही. तो साक्षात अविनाशी नारायण आहे. भूमीचा भार हरण करण्यासाठी, मायेने मनुष्यवेष धारण करून तो अतिशय निर्भयपणे वनात आलेला आहे. तेव्हा बाबा रे, तू सुखाने घरी जा." मारीचाचे हे वचन ऐकल्यावर रावणाने त्याला प्रत्युत्तर दिले. (२८-२९)

परमात्मा यदा रामः प्रार्थितो ब्रह्मणा किल ।
मां हन्तुं मानुषो भूत्वा यत्‍नादिह समागतः ॥ ३० ॥
करिष्यत्यचिरादेव सत्यसङ्‌कल्प ईश्वरः ।
अतोऽहं यत्‍नतः सीतामानेष्याम्येव राघवात् ॥ ३१ ॥
"ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे परमात्या राम हा माणूस होऊन प्रयत्‍नपूर्वक मला मारण्यास जर नक्की येथे आला असेल तर तो सत्य-संकल्प असा ईश्वर लौकरच तसे करील. मग मी कशाला घाबरू ? म्हणून सीतेला मी राघवाजवळून हरण करून प्रयत्‍नपूर्वक घेऊन जाईन. (३०-३१)

वधे प्राप्ते रणे वीर प्राप्स्यामि परमं पदम् ।
यद्वा रामं रणे हत्वा सीतां प्राप्स्यामि निर्भयः ॥ ३२ ॥
हे वीर मारीचा, जर युद्धात मला मरण आले तर मला परमपद प्राप्त होईल. या उलट युद्धात रामाला ठार मारून मी निर्भयपणाने सीतेला प्राप्त करून घेईन. (३२)

तदुत्तिष्ठ महाभाग विचित्रमृगरूपधृक् ।
रामं सलक्ष्मणं शीघ्रमाश्रमादतिदूरतः ॥ ३३ ॥
आक्रम्य गच्छ त्वं शीघ्रं सुखं तिष्ठ यथा पुरा ।
अतः परं चेद्यत्किञ्चिद्‌भाषसे मद्विभीषणम् ॥ ३४ ॥
हनिष्याम्यसिनानेन त्वामत्रैव न संशयः ।
मारीचस्तद्वचः श्रुत्वा स्वात्मन्येवान्वचिन्तयत् ॥ ३५ ॥
तेव्हा, हे महाभागा, ऊठ. विचित्र मृगरूप धारण करून, तू राम आणि लक्ष्मण यांना झट्दिशी त्यांच्या आश्रमापासून खूप दूर घेऊन जा आणि मग तू त्वरित स्वतःच्या आश्रमात येऊन पूर्वीप्रमाणे सुखाने राहा. आता यापुढे मला भयभीत करण्यास जर तू आणखी काही बोललास तर या माझ्या खड्‌गाने मी तुला येथेच ठार करीन, यात संशय नाही." रावणाचे ते वचन ऐकून मारीच स्वतःच्या मनात विचार करू लागला. (३३-३५)

यदि मां राघवो हन्यात्तदा मुक्तो भवार्णवात् ।
मां हन्याद्यदि चेद्दुष्टस्तदा मे निरयो ध्रुवम् ॥ ३६ ॥
'जर राघवाने मला ठार केले तर मी भवसागरातून पलीकडे जाऊन मुक्त होईन. या उलट जर या दुष्टाने मला ठार मारले तर मला निश्चितपणे नरक प्राप्त होईल. (३६)

इति निश्चित्य मरणं रामादुत्थाय वेगतः ।
अब्रवीद्‌रावणं राजन्करोम्याज्ञां तव प्रभो ॥ ३७ ॥
तेव्हा रामाकडून मरण येणे हे अधिक चांगले ' असा विचार करून तो मारीच चटदिशी उठला आणि रावणाला म्हणाला, "हे राजन, हे प्रभो, मी तुझी आज्ञा पाळीन." (३७)

इत्युक्त्वा रथमास्थाय गतो रामाश्रमं प्रति ।
शुद्धजाम्बूनदप्रख्यो मृगोऽभूद्‌रौप्यबिन्दुकः ॥ ३८ ॥
असे बोलून आणि रथावर आरूढ होऊन मारीच रामांच्या आश्रमात गेला. तेथे तो शुद्ध सुवर्ण वर्णाचा आणि त्यावर चांदीचे पांढरे ठिपके असणारा असा मृग बनला. (३८)

रत्‍नशृङ्‌गो मणिखुरो नीलरत्‍नविलोचनः ।
विद्युत्प्रभो विमुग्धास्यो विचचार वनान्तरे ॥ ३९ ॥
रत्‍नांची शिंगे, रत्‍नमय खूर, निळ्या रत्‍नाप्रमाणे डोळे, विजेप्रमाणे प्रभा आणि सुंदर तोंड असणारा तो मृग वनावनात हिंडू लागला. (३९)

रामाश्रमपदस्यान्ते सीतादृष्टिपथे चरन् ॥ ४० ॥
नंतर रामाच्या आश्रमस्थानाजवळ यऊन सीतेच्या दृष्टिपथात येईल, असा तो फिरू लागला. (४०)

क्षणं च धावत्यवतिष्ठते क्षणं
     समीपमागत्य पुनर्भयावृतः ।
एवं स मायामृगवेषरूपधृक्
     चचार सीतां परिमोहयन्खलः ॥ ४१ ॥
तो मृग क्षणभर पळे, क्षणभर सीतेजवळ येऊन थांबे, नंतर पुनः भयभीत होऊन दूर पळून जाई. अशा प्रकारे मायामृगाचा वेष आणि रूप धारण करणारा तो दुष्ट मारीच सीतेला पूर्णपणे मोहात पाडीत हिंडू लागला. (४१)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
अरण्यकाण्डातील सहावा सर्गः समाप्त ॥ ६ ॥


GO TOP