[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ अष्टादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण तदनुरोधस्यानङ्‌गीकारे कृते शूर्पणखाया लक्ष्मणं प्रति प्रणययाचना तेनापि प्रत्याख्यातायास्तस्याः सीतां प्रत्याक्रमणं लक्ष्मणेन तस्या नासिकाश्रवणयोश्छेदश्च -
श्रीरामांनी टाकल्यावर शूर्पणखेने लक्ष्मणाकडे प्रणययाचना करणे, परत त्यांनी ही टाकल्यावर तिचे सीतेवर आक्रमण आणि लक्ष्मणांनी तिचे नाक-कान कापणे -
तां तु शूर्पणखां रामः कामपाशावपाशिताम् ।
स्वेच्छया श्लक्ष्णया वाचा स्मितपूर्वमथाब्रवीत् ॥ १ ॥
श्रीरामांनी कामपाशात बद्ध झालेल्या त्या शूर्पणखेला आपल्या इच्छेनुसार मधुर वाणीने मंद - मंद हसत म्हटले - ॥१॥
कृतदारोऽस्मि भवति भार्येयं दयिता मम ।
त्वद्विधानां तु नारीणां सुदुःखा ससपत्‍नता ॥ २ ॥
’आदरणीय देवी ! मी तर विवाह करून चुकलो आहे. ही माझी प्रिय पत्‍नी विद्यमान आहे. तुझ्या सारख्या स्त्रियांसाठी सवत असणे अत्यंत दुःखदायक होईल. ॥२॥
अनुजस्त्वेष मे भ्राता शीलवान् प्रियदर्शनः ।
श्रीमानकृतदारश्च लक्ष्मणो नाम वीर्यवान् ॥ ३ ॥

अपूर्वी भार्यया चार्थी तरुणः प्रियदर्शनः ।
अनुरूपश्च ते भर्ता रूपस्यास्य भविष्यति ॥ ४ ॥
’हे माझे धाकटे बंधु श्रीमान् लक्ष्मण अत्यंत शीलवान दिसण्यांत प्रिय वाटणारे आणि बल-पराक्रमाने संपन्न आहेत. त्यांच्याबरोबर स्त्री नाही आणि ते अपूर्व गुणांनी संपन्न आहेत. ते तरूण तर आहेतच, त्यांचे रूपही दिसण्यात मनोरम आहे. म्हणून जर त्यांना भार्येची इच्छा असेल तर हेच तुमच्या या सुंदर रूपास योग्य पति होतील. ॥३-४॥
एनं भज विशालाक्षि भर्तारं भ्रातरं मम ।
असपत्‍ना वरारोहे मेरुमर्कप्रभा यथा ॥ ५ ॥
’विशाल लोचने ! वरारोहे ! ज्या प्रमाणे सूर्याची प्रभा मेरूपर्वताचे सेवन करीत असते त्या प्रकारे तुम्ही माझ्या या लहान भाऊ लक्ष्मणांना पतिच्या रूपाने आपलेसे करून सवतीच्या भयाविरहितच त्यांची सेवा करा.’ ॥५॥
इति रामेण सा प्रोक्ता राक्षसी काममोहिता ।
विसृज्य रामं सहसा ततो लक्ष्मणमब्रवीत् ॥ ६ ॥
श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर ती कामाने मोहित झालेली राक्षसी त्यांना सोडून एकाएकी लक्ष्मणापाशी जाऊन पोहोंचली आणि या प्रकारे म्हणाली- ॥६॥
अस्य रूपस्य ते युक्ता भार्याहं वरवर्णिनी ।
मया सह सुखं सर्वान् दण्डकान् विचरिष्यसि ॥ ७ ॥
’लक्ष्मण ! तुमच्या या सुंदर रूपासाठी मीच योग्य आहे.- म्हणून मीच तुमची परम सुंदर भार्या होऊ शकते. माझ्या अङ्‌गीकार केल्यावर तुम्ही माझ्या बरोबर संपूर्ण दण्डकारण्यात सुखपूर्वक विचरण करू शकाल.’ ॥७॥
एवमुक्तस्तु सौमित्री राक्षस्या वाक्यकोविदः ।
ततः शूर्पनखीं स्मित्वा लक्ष्मणो युक्तमब्रवीत् ॥ ८ ॥
त्या राक्षसीने असे म्हटल्यावर वाक्यकोविद सौमित्री लक्ष्मणांनी हसून सूपासारखी नखे असलेल्या त्या निशाचरीस ही युक्तीयुक्त गोष्ट सांगितली - ॥८॥
कथं दासस्य मे दासी भार्या भवितुमिच्छसि ।
सोऽहमार्येण परवान् भ्रात्रा कमलवर्णिनि ॥ ९ ॥
’लाल- कमलासारख्या गौर वर्णाच्या सुंदरी ! मी तर दास आहे; आपले मोठे भाऊ भगवान श्रीराम यांच्या अधीन मी आहे. तू माझी स्त्री होऊन दासी बनण्याची इच्छा का करीत आहेस ?’ ॥९॥
समृद्धार्थस्य सिद्धार्था मुदितामलवर्णिनी ।
आर्यस्य त्वं विशालाक्षि भार्या भव यवीयसी ॥ १० ॥
’विशाल लोचने ! माझे मोठे भाऊ ऐश्वर्यांनी (अथवा सर्व अभीष्ट वस्तुनी) संपन्न आहेत. तुम्ही त्यांचीच धाकटी स्त्री होऊन जा. यायोगे तुमचे सर्व मनोरथ सिद्ध होऊन जातील. आणि तुम्ही सदा प्रसन्न राहाल. तुमचे रूप रंग त्यांच्याच योग्य निर्मल आहे. ’ ॥१०॥
एतां विरूपामसतीं करालां निर्णतोदरीम् ।
भार्यां वृद्धां परित्यज्य त्वामेवैष भजिष्यति ॥ ११ ॥
’कुरूप, तुच्छ, विकृत, खपाटीला पोट गेलेल्या आणि वृद्ध असलेल्या भार्येच्या त्याग करून ते तुम्हाला सादर ग्रहण करतील.(*) ॥११॥
(*) (येथे लक्ष्मणानी त्याच विशेषणांची पुनरूक्ति केली आहे जी शूर्पणखेने सीतेसाठी प्रयुक्त केली होती. शूर्पणखेच्या दृष्टीने जो अर्थ आहे तो वर दिलेला आहे, परंतु लक्ष्मणांच्या दृष्टीने ही विशेषणे निंदापरक नाहीत स्तुतिपर आहेत. म्हणून त्यांच्या दृष्टीने त्या विशेषणांचा अर्थ येथे दिला जात आहे. - विरुपा - विशिष्ट रूपाची त्रिभुवन सुंदरी. असती - जिच्याहून श्रेष्ठ दुसरी कुणी सती नाही आहे अशी. कराला - शरीराच्या ठेवणीस अनुसरून उंच- नीच अङ्‌गे असलेली. निर्णतोदरी - निम्न उदर अथवा क्षीण कटि-प्रदेश असणारी. वृद्धा - ज्ञानाने वरचढ (श्रेष्ठ) अर्थात तुम्हांला सोडून (श्रीराम) उक्त विशेषणे असलेल्या सीतेचेच ग्रहण करतील.)
को हि रूपमिदं श्रेष्ठं सन्त्यज्य वरवर्णिनि ।
मानुषीषु वरारोहे कुर्याद् भावं विचक्षणः ॥ १२ ॥
’सुंदर कटिप्रदेश असणार्‍या वरवर्णिनी ! कोण असा बुद्धिमान मनुष्य असेल की जो तुमच्या या श्रेष्ठ रूपास सोडून मानव कन्यांवर प्रेम करेल ?’ ॥१२॥
इति सा लक्ष्मणेनोक्ता कराला निर्णतोदरी ।
मन्यते तद्‌वचः सत्यं परिहासाविचक्षणा ॥ १३ ॥
लक्ष्मणांनी असे म्हटलावर परिहासाला न समजणार्‍या त्या मोठ्या पोटाच्या विकराळ राक्षसीने त्यांचे म्हणणे खरे मानले. ॥१३॥
सा रामं पर्णशालायामुपविष्टं परंतपम् ।
सीतया सह दुर्धर्षमब्रवीत् काममोहिता ॥ १४ ॥
ती पर्णशालेत सीतेसह बसलेल्या शत्रुसंतापी दुर्जय वीर श्रीरामचंद्रांच्या जवळ परत आली आणि कामाने मोहित होऊन म्हणाली - ॥१४॥
इमां विरूपामसतीं करालां निर्णतोदरीम् ।
वृद्धां भार्यामवष्टभ्य न मां त्वं बहु मन्यसे ॥ १५ ॥
’राम ! तुम्ही या कुरूप, तुच्छ, विकृत, खपाटीस गेलेल्या पोटाच्या आणि वृद्धेचा आश्रय घेऊन माझा विशेष आदर करीत नाही. ॥१५॥
अद्येमां भक्षयिष्यामि पश्यतस्तव मानुषीम् ।
त्वया सह चरिष्यामि निःसपत्‍ना यथासुखम् ॥ १६ ॥
’म्हणून आज तुम्ही पहात असतानाच मी या मानुषीला खाऊन टाकीन आणि या सौतीच्या नाहीसे होण्यानंतर मी तुमच्या बरोबर, सुखपूर्वक विचरण करीन.’ ॥१६॥
इत्युक्त्वा मृगशावाक्षीमलातसदृशेक्षणा ।
अभ्यगच्छत् सुसङ्‌क्रुद्धा महोल्का रोहिणीमिव ॥ १७ ॥
असे म्हणून फुललेल्या निखार्‍यांप्रमाणे नेत्र असलेली शूर्पणखा अत्यंत क्रोधाने भडकून मृगनयनी सीतेकडे झेपावली, जणु काही कुणी फार मोठी उल्का रोहिणी नामक तारकेवर तुटून पडत आहे. ॥१७॥
तां मृत्युपाशप्रतिमामापतन्तीं महाबलः ।
निगृह्य रामः कुपितस्ततो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १८ ॥
महाबली श्रीरामांनी मृत्युच्या पाशाप्रमाणे येणार्‍या त्या राक्षसीला हुंकाराने रोखून कुपित होऊन लक्ष्मणास म्हटले - ॥१८॥
क्रूरैरनार्यैः सौमित्रे परिहासः कथञ्चन ।
न कार्यः पश्य वैदेहीं कथञ्चित् सौम्य जीवतीम् ॥ १९ ॥
’सुमित्रानंदन ! क्रूर कर्मे करणार्‍या अनार्यांशी कुठल्याही प्रकारचा परिहास ही करता कामा नये. सौम्य ! पहा ना. या समयी सीतेचे प्राण कुठल्याही प्रकारे फार मुष्किलीने वाचले आहेत. ॥१९॥
इमां विरूपामसतीमतिमत्तां महोदरीम् ।
राक्षसीं पुरुषव्याघ्र विरूपयितुमर्हसि ॥ २० ॥
’पुरुषसिंह ! तुम्ही या कुरूप, कुलटा, अत्यंत उन्मत्त आणि मोठे पोट असणार्‍या राक्षसीला कुरूप (कुठल्याही प्रकारे अङ्‌गहीन) करणे आवश्यक आहे.’ ॥२०॥
इत्युक्तो लक्ष्मणस्तस्याः क्रुद्धो रामस्य पश्यतः ।
उद्धृत्य खड्गं चिच्छेद कर्णनासे महाबलः ॥ २१ ॥
श्रीरामांनी या प्रकारे आदेश दिल्यावर क्रोधाने संतप्त झालेल्या महान लक्ष्मणांनी ते पहात असतांनाच म्यानातून तलवार उपसली आणि शूर्पणखाचे नाक- कान कापून टाकले. ॥२१॥
निकृत्तकर्णनासा तु विस्वरं सा विनद्य च ।
यथागतं प्रदुद्राव घोरा शूर्पणखा वनम् ॥ २२ ॥
नाक- कान कापले गेल्यावर भयंकर राक्षसी शूर्पणखा फार मोठ्याने ओरडत जशी आली होती त्याच प्रकारे वनात पळून गेली. ॥२२॥
सा विरूपा महाघोरा राक्षसी शोणितोक्षिता ।
ननाद विविधान् नादान् यथा प्रावृषि तोयदः ॥ २३ ॥
रक्तानी भिजलेली ती महाभयंकर आणि विकराळ रूप असलेली निचाचरी नाना प्रकारच्या स्वरात जोरजोराने किंचाळू लागली, जणु वर्षाकालात मेघांचा समूहच गर्जना (गडगडाट) करीत होता. ॥२३॥
सा विक्षरन्ती रुधिरं बहुधा घोरदर्शना ।
प्रगृह्य बाहू गर्जन्ती प्रविवेश महावनम् ॥ २४ ॥
ती दिसण्यात फारच भयानक होती. तिने आपल्या कापल्या गेलेल्या अङ्‌गांतून वारंवार रक्ताची धार वहात असता दोन्ही भुजा वर उचलून किंचाळत एका विशाल वनाच्या मध्ये प्रवेश केला. ॥२४॥
ततस्तु सा राक्षससङ्‌घसंवृतं
खरं जनस्थानगतं विरूपिता ।
उपेत्य तं भ्रातरमुग्रतेजसं
पपात भूमौ गगनाद् यथाशनिः ॥ २५ ॥
’लक्ष्मणांच्या द्वारा कुरूप केली गेलेली शूर्पणखा तेथून पळून राक्षस समूहानी घेरलेल्या भयंकर तेज असणार्‍या जनस्थान निवासी भ्राता खर याच्यापाशी गेली आणि आकाशातून वीज पडावी त्या प्रकारे ती पृथ्वीवर कोसळली. ॥२५॥
ततः सभार्यं भयमोहमूर्च्छिता
सलक्ष्मणं राघवमागतं वनम् ।
विरूपणं चात्मनि शोणितोक्षिता
शशंस सर्वं भगिनी खरस्य सा ॥ २६ ॥
खराची ती बहीण रक्ताने न्हाली होती आणि भय आणि मोहाने अचेत झाल्यासारखी झाली होती. तिने वनात सीता आणि लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्रांच्या येण्याचा आणि आपल्या कुरूप केला जाण्याचा सर्व वृत्तांत खराला ऐकविला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टादशः सर्गः ॥ १८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा अठरावा सर्ग पूरा झाला. ॥१८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP