श्रीमद् वाल्मीकि रामायणे

श्रीमद् वाल्मिकीय रामायण माहात्म्यम्

। प्रथमोऽध्यायः ।

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कलिवृत्तवर्णनं कलिकाले मनुष्याणां उद्धारोपायो रामायणस्य पाठः श्रवणं च रामायणमहिमा तच्छ्रवणायोत्तमकालादेर्वर्णनं च -
कलियुगाची स्थिति, कलिकालातील मनुष्यांच्या उद्धाराचा उपाय, रामायणपाठ, त्याचा महिमा, त्याच्या श्रवणासाठी उत्तम काल आदिंचे वर्णन -
श्रीरामः शरणं समस्तजगतां
रामं विना का गती
रामेण प्रतिहन्यते कलिमलं
रामाय कार्यं नमः ।
रामात् त्रस्यति कालभीमभुजगो
रामस्य सर्वं वशे
रामे भक्तिरखण्डिता भवतु मे
राम त्वमेवाश्रयः ॥ १

श्रीरामचंद्र समस्त संसाराला शरण देणारे आहेत. श्रीरामाशिवाय दुसरी कोणती गति आहे ? श्रीराम कलियुगाच्या समस्त दोषांना नष्ट करून टाकतात; म्हणून श्रीरामचंद्रांनाच नमस्कार केला पाहिजे. श्रीरामांना कालरूपी भयंकर सर्पही घाबरतो. जगातील सर्व काही भगवान् श्रीरामांना वश आहे. श्रीरामांच्या ठिकाणी माझी अखण्ड भक्ति टिकून राहो. हे राम ! आपणच माझा आधार आहात. ॥ १ ॥
चित्रकूटालयं रामं इन्दिरानन्दमन्दिरम् ।
वन्दे च परमानन्दं भक्तानां अभयप्रदम् ॥ २

जे चित्रकूटात निवास करणार्‍या भगवती लक्ष्मी (सीता) हिचे जे आनंदनिकेतन आहेत, आणि भक्तांना अभय देणारे आहेत, त्या परमानंदस्वरूप भगवान श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करतो. ॥ २ ॥
ब्रह्मविष्णुमहेशाद्या यस्यांशा लोकसाधकाः ।
नमामि देवं चिद्‌रूपं विशुद्धं परमं भजे ॥ ३

संपूर्ण जगताच्या अभीष्ट मनोरथांना सिद्ध करणारे [अथवा सृष्टि (उत्पत्ति), पालन आणि संहारद्वारा जगताच्या व्यावहारिक सत्तेला सिद्ध करणारे], ब्रह्मा, विष्णु आणि महेश आदि देवता ज्यांचे अभिन्न अंशमात्र आहेत, त्या परम विशुद्ध सच्चिदानंदमय परमात्मदेव श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करीत आहे, आणि त्यांच्याच भजन-चिंतनात मी मन लावीत आहे ॥ ३ ॥
ऋषयः उचुः -
भगवन् सर्वमाख्यातं यत् पृष्ठं विदुषा त्वया ।
संसारपाशबद्धानां दुःखानि सुबहूनि च ॥ ४

ऋषींनी म्हटले - "भगवन् ! आपण विद्वान आहात, ज्ञानी आहात. आम्ही जे काही विचारले होते, ते सर्व आपण आम्हाला उत्तम प्रकारे सांगितले आहे. संसार बंधनात बद्ध झालेल्या जीवांना फार दुःख सोसावे लागते. ॥ ४ ॥
एतत् संसारपाशस्य च्छेदकः कतमः स्मृतः ।
कलौ वेदोक्तमार्गाश्च नश्यन्तीति त्वयोदिताः ॥ ५

'या संसार बंधनाचा उच्छेद करणारा कोण आहे ? आपण सांगितले आहे की कलियुगात वेदोक्त मार्ग नष्ट होऊन जातील. ॥ ५ ॥
अधर्मनिरतानां च यातनाश्च प्रकीर्तिताः ।
घोरे कलियुगे प्राप्ते वेदमार्ग बहिष्कृते ॥ ६

पाखंडत्वं प्रसिद्धं वै सर्वैश्च परिकीर्तितम् ।

अधर्मपरायण पुरुषांना प्राप्त होणार्‍या यातनांचेही आपण वर्णन केले आहे. घोर कलियुग आल्यावर ज्यावेळी वेदोक्त मार्ग लुप्त होतील, त्या समयी सर्वत्र पाखण्ड पसरेल - ही गोष्ट प्रसिद्ध आहे. प्रायः सर्व लोकांनी अशीच गोष्ट सांगितली आहे. ॥ ६ १/२ ॥
कामार्त्ता ह्रस्वदेहाश्च लुब्धा अन्योन्यतत्पराः ॥ ७
कलौ सर्वे भविष्यंति स्वल्पायुः बहुपुत्रकाः ।

कलियुगात सर्व लोक कामवेदनेने पीडित, ठेंगण्या शरीयष्टीचे, आणि लोभी असतील; आणि धर्माचा आणि ईश्वराचा आश्रय सोडून आपापसात एक दुसर्‍यावर निर्भर राहाणारे होतील. प्रायः सर्व लोक कमी आयुष्य आणि अधिक संतति असणारे होतील. ॥ ७ १/२ ॥
[काही काही प्रतिमध्ये "स्वल्पायुर्बहुपुत्रका" याच्या स्थानी "स्वल्परायोर्बहुप्रजाः" असा पाठ आहे. यानुसार कलियुगात प्रायः सर्व लोक थोडे धन आणि जास्त संतति असणारे होतील, असा अर्थ समजला पाहिजे]
स्त्रियः स्वपोषणपरा वेश्याचरण तत्पराः ॥ ८

पतिवाक्यं अनादृत्य सदा अन्यगृह तत्पराः ।
दुःशीलेषु करिष्यंति पुरुषेषु सदा स्पृहाम् ॥ ९

या युगातील स्त्रिया आपल्याच शरीराच्या पोषणात तत्पर आणि वेश्याप्रमाणे आचरणात प्रवृत्त होतील. त्या आपल्या पतीच्या आज्ञेचा अनादर करून सदा दुसर्‍यांचे घरी ये जा करीत राहतील. दुराचारी पुरुषांना भेटण्याचीच सदैव अभिलाषा करतील. ॥ ८-९ ॥
असद्वार्त्तां भविष्यन्ति पुरुषेषु कुलाङ्गनाः ।
परुषानृतभाषिण्यो देहसंस्कारवर्जिताः ॥ १०

उत्तम कुळातील स्त्रियाही परपुरुषांशी लाडीगोडीच्या गोष्टी करणार्‍या होतील; कठोर आणि असत्य बोलतील आणि शरीराला शुद्ध आणि सुसंस्कृत ठेवण्याच्या सद्‌गुणांपासून वञ्चित राहतील. ॥ १० ॥
वाचालश्च भविष्यन्ति कलौ प्रायेण योषितः ।
भिक्षवश्चापि मित्रादि स्नेहसम्बन्ध यन्त्रिताः ॥ ११

कलियुगात अधिकांश स्त्रिया वाचाळ (व्यर्थ बडबड करणार्‍या) होतील. भिक्षेवर जीवन निर्वाह करणारे संन्यासीही मित्र आदिंच्या स्नेह बंधनात बद्ध राहणारे होतील. ॥ ११ ॥
अन्नोपाधिनिमित्तेन शिष्यान् बध्नन्ति लोलुपाः ।
उभाभ्यां अपि पाणिभ्यां शिरः कण्डूयनं स्त्रियः ॥ १२

कुर्वन्त्यो गृहभर्तृणां आज्ञां भेत्स्यन्त्यतन्द्रिताः ।

ते उदर निर्वाहाच्या चिंतेमुळे लोभवश शिष्यांचा संग्रह करतील. स्त्रिया दोन्ही हातांनी डोके खाजवतील. गृहपतिच्या आज्ञेचे जाणून बुजून उल्लंघन करतील. ॥ १२ १/२ ॥
पाखण्डालापनिरताः पाखण्डजनसङ्‌गिनः ॥ १३
यदा द्विजा भविष्यन्ति तदा वृद्धिं गतः कलिः ।

ज्यावेळी ब्राह्मण पाखण्डी लोकांबरोबर राहून पाखण्डपूर्ण गोष्टी करू लागतील, त्यावेळी कलियुगाचा प्रभाव खूप वाढला आहे असे समजले पाहिजे. ॥ १३ १/२ ॥
घोरे कलियुगे ब्रह्मन् जनानां पापकर्मिणाम् ॥ १४
मनः शुद्धि विहीनानां निष्कृतिश्च कथं भवेत् ।

ब्रह्मन् ! या प्रकारे घोर कलियुग आल्यावर सदा पापपरायण राहण्यामुळे ज्यांचे अंतःकरण शुद्ध होऊ शकणार नाही अशा लोकांची मुक्ति कशी होईल ? ॥ १४ १/२ ॥
यथा तुष्यति देवेशो देवदेवो जगद्‌गुरुः ॥ १५
ततो वदस्व सर्वज्ञ सुत धर्मभृतां वर ।

धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ सर्वज्ञ सूत हो ! देवाधिदेव देवेश्वर जगद्‌गुरु भगवान् श्रीरामचंद्र ज्या प्रकारे संतुष्ट होतील असा उपाय आम्हाला सांगावा. ॥ १५ १/२ ॥
वद सूत मुनिश्रेष्ठ सर्वं एतत् अशेषतः ॥ १६
कस्य नो जायते तुष्टिः सूत त्वत् वचनामृतात् ॥ १७

मुनिश्रेष्ठ सूत हो ! या सर्व गोष्टींवर आपण पूर्णरूपाने प्रकाश टाकावा. आपल्या वचनामृताचे पान करण्याने कुणाला बरे संतोष होणार नाही ?" ॥ १६-१७ ॥
सूत उवाच -
शृणुध्वं ऋषयः सर्वे यदिष्टं वो वदाम्यहम् ।
गीतं सनत्कुमाराय नारदेन महात्मना ॥ १८

रामायणं महाकाव्यं सर्ववेदेषु सम्मतम् ।
सर्वपापप्रशमनं दुष्टग्रह निवारणम् ॥ १९

सूत म्हणाले : मुनिवर हो ! आपण सर्व ऐका. आपण जे ऐकणे अभीष्ट आहे तेच मी सांगत आहे. महात्मा नारदांनी सनत्कुमारांना ज्या रामायण नामक महाकाव्याचे गान ऐकविले होते, ते समस्त पापांचा नाश आणि दुष्ट ग्रहांच्या बाधांचे निवारण करणारे आहे. ते संपूर्ण वेदार्थांच्या संमतीस व अनुकूल आहे. ॥ १८-१९ ॥
दुःस्वप्न नाशनं धन्यं भुक्तिमुक्ति फलप्रदम् ।
रामचंद्रकथोपेतं सर्वकल्याणसिद्धिदम् ॥ २०

त्याने समस्त दुःस्वप्नांचा नाश होऊन जातो. ते धन्यवादास योग्य आणि भोग आणि मोक्षरूप फल प्रदान करणारे आहे. त्यात भगवान् श्रीरामचंद्रांच्या लीला कथांचे वर्णन आहे. ते काव्य आपले वाचक आणि श्रोते यांना समस्त कल्याणमयी सिद्धि देणारे आहे. ॥ २० ॥
धर्मार्थकाममोक्षाणां हेतुभूतं महाफलम् ।
अपूर्वं पुण्यफलदं शृणुध्वं सुसमाहिताः ॥ २१

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष - या चारही पुरुषार्थांचे साधन असून ते महान फल देणारे आहे. ते अपूर्व काव्य पूज्यमय फल प्रदान करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे. आपण सर्व एकाग्रचित्त होऊन त्याचे श्रवण करावे. ॥ २१ ॥
महापातक युक्तो वा युक्तो वा सर्वपातकैः ।
शृत्वैतदार्षं दिव्यं हि काव्यं शुद्धिं अवाप्नुयात् ॥ २२

रामायणेन वर्तन्ते सुतरां ये जगद्धिताः ।
त एव कृतकृत्याश्च सर्वशास्त्रार्थ कोविदाः ॥ २३

महान् पातकांनी अथवा संपूर्ण उपपातकांनी युक्त मनुष्यही त्या ऋषिप्रणीत दिव्य काव्याचे श्रवण केल्याने शुद्धि (अथवा सिद्धि) प्राप्त करून घेतो. संपूर्ण जगताच्या हित साधनात रत असणारे जे मानव सदा रामायणास अनुसरून वागतात, तेच संपूर्ण शास्त्रांचे मर्म जाणणारे आणि कृतार्थ आहेत. ॥ २२-२३ ॥
धर्मार्थकाममोक्षाणां साधनं च द्विजोत्तमाः ।
श्रोतव्यं च सदा भक्त्या रामायणपरामृतम् ॥ २४

विप्रवर हो ! रामायण धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचे साधन तसेच परम अमृतरूप आहे. म्हणून सदा भक्तिभावाने त्याचे श्रवण केले पाहिजे ॥ २४ ॥
पुनर्जितानि पापानि नाशमायांति यस्य वै ।
रामायणे महाप्रीतिः तस्य वै भवति ध्रुवन् ॥२५

ज्या मनुष्याची पूर्वजन्मोपार्जित सर्व पापे नष्ट झालेली असतात त्यालाच रामायणाबद्दल आत्यंतिक प्रेम वाटते, ही गोष्ट निश्चित आहे. ॥ २५ ॥
रामायणे वर्तमाने पापपाशेन यन्त्रितः ।
अनादृत्य असद्‌गाथा आसक्तबुद्धिः प्रवर्तते ॥ २६

जो पापाच्या बंधनात जखडलेला असतो तो रामायणाची कथा प्रारंभ झाल्यावर तिची अवहेलना करून भोग लालसा वाढविणार्‍या निम्न कोटीच्या गोष्टीत फसतो. त्या असद्‌ग्रंथांमध्ये आपल्या बुद्धिने आसक्त झाल्यामुळे तो तदनुरूपच आचरण करू लागतो. ॥ २६ ॥
रामायणं नाम परं तु काव्यं
सुपुण्यदं वै शृणुत द्विजेंद्राः ।
यस्मिन् शृते जन्मजरादिनाशो
भवत्यदोषः स नरोऽच्युतः स्यात् ॥ २७

म्हणून हे द्विजेंद्रगण हो ! आपण रामायण नामक परम पुण्यदायक उत्तम काव्याचे श्रवण करा; ज्याच्या श्रवणाने ऐकणार्‍याच्या जन्म, जरा आणि मृत्युच्या भयाचा नाश होतो आणि श्रवण करणारा मनुष्य पाप-दोष रहित होऊन अच्युतस्वरूप होऊन जातो. ॥ २७ ॥
वरं वरेण्यं वरदं तु काव्यं
संतारयत्याशु च सर्वलोकम् ।
संकल्पितार्थप्रदमादिकाव्यं
शृत्वा च रामस्य पदं प्रयाति ॥ २८

रामायण काव्य अत्यंत उत्तम, वरणीय आणि मनोवाञ्छित वर देणारे आहे. ते त्याचा पाठ आणि श्रवण करणार्‍या समस्त जगताला शीघ्रच संसार सागरातून पार करून टाकते. त्या आदिकाव्याला ऐकून मनुष्य श्रीरामचंद्रांच्या परम पदाला प्राप्त करून घेतो. ॥ २८ ॥
ब्रह्मेशविष्ण्वाख्य शरीरभेदैः
विश्वं सृजत्यत्ति च पाति यश्च ।
तमादिदेवं परमं वरेण्यं
आधाय चेतस्युपयाति मुक्तिम् ॥ २९

जे ब्रह्मा, रुद्र आणि विष्णु नामक भिन्न भिन्न रूपे धारण करून विश्वाची सृष्टि, संहार आणि पालन करतात, त्या आदिदेव परमोत्कृष्ट परमात्मा श्रीरामचंद्रांना आपल्या हृदय मंदिरात स्थापन करून मनुष्य मोक्षाचा भागी होतो. ॥ २९ ॥
यो नामजात्यादि विकल्पहीनः
परावराणां परमः परः स्यात् ।
वेदाअंतवेद्यः स्वरुचा प्रकाशः
स वीक्ष्यते सर्वपुराणवेदै ॥ ३०

जो नाम तथा जाति आदि विकल्पांच्या रहित, कार्यकारण भावाहून पर, सर्वोत्क्रुष्ट, वेदांत शास्त्रद्वारा जाणण्यास योग्य, आणि आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. (या रामायणाच्या अनुशिलनानेही त्याची प्राप्ति होत असते). ॥ ३० ॥
ऊर्जे माहे सिते पक्षे चैत्रे च द्विजसत्तमाः ।
नवाह्ना खलु श्रोतव्यं रामायण कथामृतम् ॥ ३१

विप्रवर हो ! कार्तिक, माघ आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नऊ दिवसात रामायणाच्या अमृतमयी कथेचे श्रवण केले पाहिजे. ॥ ३१ ॥
इत्येवं शृणुयाद् यस्तु श्रीरामचरितं शुभम् ।
सर्वान् कामान् अवाप्नोति परत्रामुत्र चोत्तमान् ॥ ३२

जो या प्रकारे श्रीरामचंद्रांच्या मंगलमय चरित्राचे श्रवण करतो तो या लोकात आणि परलोकातही आपल्या समस्त शुभ कामनांना प्राप्त करून घेतो. ॥ ३२ ॥
त्रिसप्तकुलसंयुक्तः सर्वपापविवर्जितः ।
प्रयाति रामभवनं यत्र गत्वा न शोचते ॥ ३३

तो सर्व पापापासून मुक्त होऊन आपल्या एकवीस पिढ्यांसहित श्रीरामचंद्रांच्या त्या परमधामास निघून जातो, जेथे गेल्यावर मनुष्याला कधी शोक करावा लागत नाही. ॥ ३३ ॥
चैत्रे माघे कार्तिके च सिते पक्षे चा वाचयेत् ।
नवाहस्सु महापुण्यं श्रोतव्यं च प्रयत्‍नतः ॥ ३४

चैत्र, माघ आणि कार्तिकाच्या शुक्लपक्षात परम पुण्यमय रामायण कथेचे नवान्ह पारायण केले पाहिजे आणि नऊ दिवसापर्यंत ते प्रयत्‍नपूर्वक ऐकले पाहिजे. ॥ ३४ ॥
रामायणं आदिकाव्यं स्वर्गमोक्ष प्रदायकम् ।
तस्माद् घोरे कलियुगे सर्वधर्म बहिष्कृते ॥ ३५

नवभिर्दिनैः श्रोतव्यं रामायण कथामृतम् ।

रामायण आदिकाव्य आहे. हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे आहे; म्हणून धर्मरहित घोर कलियुग आल्यावर नऊ दिवसात रामायणाच्या अमृतमयी कथेचे श्रवण केले पाहिजे. ॥ ३५ १/२ ॥
रामनामपरा ये तु घोरे कलियुगे द्विजाः ॥ ३६
त एव कृतकृत्याश्च न कलिर्बाधते हि तान् ।

'ब्राह्मणांनो ! जे लोक भयंकर कलिकालात श्रीराम नामाचा आश्रय घेतात, तेच कृतार्थ होतात. कलियुग त्यांना बाधा पोहोचवू शकत नाही. ॥ ३६ १/२ ॥
कथा रामयणस्यापि नित्यं भवति यद्‌गृहे ॥ ३७
तद् गृहं तीर्थरूपं हि दुष्टानां पापनाशनम् ।

ज्या घरात प्रतिदिन रामायणाची कथा होते ते तीर्थरूप होऊन जाते. तेथे जाण्याने दुष्टांच्या पापांचा नाश होतो. ॥ ३७ १/२ ॥
तावत्पापानि देहेस्मिन् निवसंति तपोधनाः ॥ ३८ ॥
यावन्न श्रूयते सम्यक् श्रीमद्‌रामायणं नरैः ।

तपोधनांनो ! जो पर्यंत मनुष्य श्रीरामायण कथेचे उत्तम प्रकारे श्रवण करीत नाही, तो पर्यंतच या शरीरात पाप राहते. ॥ ३८ १/२ ॥
दुर्लभैव कथा लोके श्रीमद्‌रामायणोद्‌भवा ॥ ३९
कोटिजन्मसमुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते ।

संसारात श्रीरामायणाची कथा परम दुर्लभ आहे. जेव्हां कोटी जन्मांच्या पुण्याचा उदय होतो, तेव्हांच तिची प्राप्ति होत असते. ॥ ३९ १/२ ॥
ऊर्जे माघे सिते पक्षे चैत्रे च द्विजसत्तमाः ॥ ४०
यस्य श्रवणमात्रेण सैदासोऽपि विमोचितः ।

श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! कार्तिक, माघ आणि चैत्राच्या शुक्लपक्षात रामायणच्या केवळ श्रवणाने राक्षसभाव असलेला सौदासही शापमुक्त झाला. ॥ ४० १/२ ॥
गौतमशापतः प्राप्तः सौदासो राक्षसीं तनुम् ॥ ४१
रामायणप्रभावेण विमुक्तिं प्राप्तवान् पुनः ।

सौदासाला महर्षि गौतमांच्या शापाने राक्षस शरीर प्राप्त झाले होते. तो रामायणाच्या प्रभावानेच पुन्हा त्या शापातून मुक्त होऊ शकला. ॥ ४१ १/२ ॥
यस्त्वेतत् श्रुणुयाद् भक्त्या रामभक्तिपरायणः ॥ ४२
स मुचते पहापापैः पुरुष पातकादिभिः ॥ ४३

जो पुरुष श्रीरामचंद्रांच्या भक्तिचा आश्रय घेऊन प्रेमपूर्वक या कथेचे श्रवण करतो तो मोठमोठ्या पापांतून आणि पातकांदितून मुक्त होतो. ॥ ४२-४३
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखण्डे नारद-सनत्कुमार संवादे रामायणमाहात्म्ये कल्पानुकीर्तनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
या प्रकारे श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखण्डातील नारद-सनत्कुमार संवादाच्या अंतर्गत रामायण माहात्म्यविषयक कल्पाचे अनुकीर्तन नामक प्रथम अध्याय समाप्त झाला. ॥ १ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥