श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चतुःसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रस्य स्वाश्रमं प्रति प्रस्थानं, जनककर्तृकं कन्यानां कृते प्रचुरधनदानं, राज्ञो दशरथस्य विदापनं च मार्गे शुभाशुभशकुनोदयः परशुरामस्यागमनं च - विश्वामित्रांचे आपल्या आश्रमास प्रस्थान, राजा जनकांनी आपल्या कन्यांना भारी भेट देऊन राजा दशरथ आदिंना निरोप देणे, मार्गात शुभाशुभ शकुन आणि परशुरामांचे आगमन -
अथ रात्र्यां व्यतीतायां विश्वामित्रो महामुनिः ।
आपृष्ट्‍वा तौ च राजानौ जगामोत्तरपर्वतम् ॥ १ ॥
त्या दिवशीची रात्र सरून जेव्हां सकाळ झाली तेव्हां महामुनि विश्वामित्र राजा जनक आणि महाराज दशरथ या दोघांची भेट घेऊन, त्यांची स्विकृति घेऊन उत्तरपर्वतावर (जेथे कौशिकी नदीच्या तटावर त्यांचा आश्रम होता तेथे) निघून गेले. ॥ १ ॥
विश्वामित्रे गते राजा वैदेहं मिथिलाधिपम् ।
आपृष्ट्‍वैव जगामाशु राजा दशरथः पुरीम् ॥ २ ॥
विश्वामित्र निघून गेल्यावर महाराज दशरथही विदेहराज मिथिला नरेशांची अनुमति घेऊन शीघ्र आपली पुरी अयोध्येस जाण्यास सज्ज झाले. ॥ २ ॥
अथ राजा विदेहानां ददौ कन्याधनं बहु ।
गवां शतसहस्राणि बहूनि मिथिलेश्वरः ॥ ३ ॥

कम्बलानां च मुख्यानां क्षौमान् कोट्यम्बराणि च ।
हस्त्यश्वरथपादातं दिव्यरूपं स्वलं‍कृतम् ॥ ४ ॥
त्यावेळी विदेहराजाने आपल्या कन्यांना विपुल प्रमाणात धन दिले. मिथिला नरेशाने कित्येक लक्ष गायी, कित्येक उत्तमोत्तम गालिचे आणि असंख्य रेशमी व सुती वस्त्रे दिली. नाना प्रकारच्या दागिन्यांनी सजलेले बरेचसे दिव्य हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैनिक भेट म्हणून दिले. ॥ ३-४ ॥
ददौ कन्याशतं तासां दासीदासमनुत्तमम् ।
हिरण्यस्य सुवर्णस्य मुक्तानां विद्रुमस्य च ॥ ५ ॥
आपल्या मुलींच्या सख्या म्हणून त्यांनी शंभर शंभर कन्या तसेच उत्तम दासदासी अर्पित केल्या. या सर्वां अतिरिक्त राजांनी त्या सर्वांसाठी एक कोटि सुवर्णमुद्रा, रजतमुद्रा, मोती आणि पोवळी देखील दिली. ॥ ५ ॥
ददौ राजा सुसंहृष्टः कन्याधनमनुत्तमम् ।
दत्त्वा बहुविधं राजा समनुज्ञाप्य पार्थिवम् ॥ ६ ॥

प्रविवेश स्वनिलयं मिथिलां मिथिलेश्वरः ।
राजाप्ययोध्याधिपतिः सह पुत्रैर्महात्मभिः ॥ ७ ॥

ऋषीन् सर्वान् पुरस्कृत्य जगाम सबलानुगः ।
या प्रकारे मिथिलापति राजा जनकांनी मोठ्या हर्षाने कन्याधन दिले. नाना प्रकारच्या वस्तु भेट म्हणून देऊन, महाराज दशरथांची आज्ञा घेऊन, ते मिथिलानगरीत, आपल्या महालात परत आले. ॥ ६-७ १/२ ॥
गच्छन्तं तं नरव्याघ्रं सर्षिसङ्‍घं सराघवम् ॥ ८ ॥

घोरास्तु पक्षिणो वाचो व्याहरन्ति ततस्ततः ।
भौमाश्चैव मृगाः सर्वे गच्छन्ति स्म प्रदक्षिणम् ॥ ९ ॥
त्यावेळी ऋषिसमूह तथा श्रीरामासह परतीची यात्रा करीत असलेले पुरुषसिंह महाराज दशरथ यांच्या चारी बाजूस भयंकर कर्कश आवाजात पक्षी कलकलाट करू लागले आणि भूमिवर विचरण करणारे सगळे मृग त्यांना उजव्या बाजूस ठेऊन जाऊ लागले. ॥ ८-९ ॥
तान् दृष्ट्‍वा राजशार्दूलो वसिष्ठं पर्यपृच्छत ।
असौम्याः पक्षिणो घोरा मृगाश्चापि प्रदक्षिणाः ॥ १० ॥

किमिदं हृदयोत्कम्पि मनो मम विषीदति ।
त्या सर्वांना पाहून राजसिंह दशरथांनी वसिष्ठांना विचारले - "मुनिवर ! एकीकडे तर हे भयंकर पक्षी घोर शब्द करीत आहेत आणि दुसरीकडे हे मृग आपल्याला उजवीकडे ठेऊन जात आहेत. हे अशुभ आणि शुभ दोन्ही प्रकारचे शकुन कसे काय ? हे माझ्या हृदयास कंपित करत आहेत. माझे मन विषादाने भरून जात आहे." ॥ १० १/२ ॥
राज्ञो दशरथस्यैतच्छ्रुत्वा वाक्यं महानृषिः ॥ ११ ॥

उवाच मधुरां वाणीं श्रूयतामस्य यत्फलम् ।
उपस्थितं भयं घोरं दिव्यं पक्षिमुखाच्च्युतम् ॥ १२ ॥

मृगाः प्रशमयन्त्येते संतापस्त्यज्यतामयम् ।
राजा दशरथांचे हे वचन ऐकून महर्षि वसिष्ठांनी मधुर वाणीत म्हटले - "राजन् ! या शकुनाचे जे फळ आहे ते ऐकावे. आकाशांत पक्ष्यांच्या मुखांतून जे शब्द निघत आहेत ते सांगत आहेत की या समयी कुठले तरी घोर भय उपस्थित होणार आहे. परंतु आम्हाला उजवीकडे ठेवून जाणारे हे मृग ते भय शांत होण्याची सूचना देत आहेत. म्हणून आपण ही चिंता सोडून द्यावी. ॥ ११-१२ १/२ ॥
तेषां संवदतां तत्र वायुः प्रादुर्बभूव ह ॥ १३ ॥

कम्पयन् मेदिनीं सर्वां पातयंश्च महाद्रुमान् ।
तमसा संवृतः सूर्यः सर्वे नावेदिषुर्दिशः ॥ १४ ॥

भस्मना चावृतं सर्वं सम्मूढमिव तद्‍बलम् ।
त्यांच्यात या प्रकारे संभाषण चालले होते इतक्यात तेथे भयंकर वादळ उठले. ते वादळ सार्‍या पृथ्वीला कंपित करीत मोठमोठ्या वृक्षांना धराशायी करू लागले. सूर्य अंधःकाराने आच्छन्न झाला. कुणाला दिशांचे भान राहिले नाही. धुळीने झांकली गेल्याने सर्व सेना मूर्च्छितशी झाली. ॥ १३-१४ १/२ ॥
वसिष्ठ ऋषयश्चान्ये राजा च ससुतस्तदा ॥ १५ ॥

ससञ्ज्ञा इव तत्रासन् सर्वमन्यद्विचेतनम् ।
तस्मिंस्तमसि घोरे तु भस्मच्छन्नेव सा चमूः ॥ १६ ॥
त्यावेळी केवळ वसिष्ठ मुनि, अन्यान्य ऋषि आणि पुत्रांसहित राजा दशरथांनाच भान राहिले होते. शेष सर्व लोक अचेत झाले होते. त्या घोर अंधःकारात राजाची सेना धुळीने आच्छादित झाली होते. ॥ १५-१६ ॥
ददर्श भीमसं‍काशं जटामण्डलधारिणम् ।
भार्गवं जामदग्न्येयं राज राजविमर्दनम् ॥ १७ ॥

कैलासमिव दुर्धर्षं कालाग्निमिव दुःसहम् ।
ज्वलन्तमिव तेजोभिर्दुर्निरीक्षं पृथग्जनैः ॥ १८ ॥

स्कन्धे चासज्ज्य परशुं धनुर्विद्युद्‍गणोपमम् ।
प्रगृह्य शरमुग्रं च त्रिपुरघ्नं यथा शिवम् ॥ १९ ॥
त्यावेळी राजा दशरथांनी पाहिले - क्षत्रिय राजांचा मान मर्दन करणारे भृगुकुलनन्दन जमदग्निकुमार परशुराम समोरून येत आहेत. ते फारच भयानक असल्यासारखे दिसत होते. त्यांनी मस्तकावर मोठमोठ्या जटा धारण केल्या होत्या. ते कैलासाप्रमाणे दुर्जय आणि कालाग्निप्रमाणे दुःसह प्रतीत होत होते. तेजोमण्डलद्वारा जाज्वल्यमान असे होते. साधारण लोकांना त्यांच्याकडे पाहणेही कठीण होत होते. त्यांच्या खांद्यावर परशु ठेवलेला होता आणि हातात विद्युत्‌गणांसमान दीप्तिमान धनुष्य एवं भयंकर बाण घेतलेले ते त्रिपुराविनाशक भगवान् शिवासमान भासत होते. ॥ १७-१९ ॥
तं दृष्ट्‍वा भीमसं‍काशं ज्वलन्तमिव पावकम् ।
वसिष्ठप्रमुखा विप्रा जपहोमपरायणाः ॥ २० ॥

सङ्‍गता मुनयः सर्वे सञ्जजल्पुरथो मिथः ।
प्रज्वलित अग्निसमान भयानक प्रतीत होणार्‍या परशुरामांना उपस्थित पाहून जप आणि होमात तत्पर राहणारे वसिष्ठ आदि सर्व ब्रह्मर्षि एकत्रित येऊन परस्परात चर्चा करू लागले - ॥ २० १/२ ॥
कच्चित् पितृवधामर्षी क्षत्रं नोत्सादयिष्यति ॥ २१ ॥

पूर्वं क्षत्रवधं कृत्वा गतमन्युर्गतज्वरः ।
क्षत्रस्योत्सादनं भूयो न खल्वस्य चिकीर्षितम् ॥ २२ ॥
'काय करणार आपल्या पित्याच्या वधाने अमर्षाच्या वशीभूत होऊन हे क्षत्रियांचा संहार तर करणार नाहीत ना ? पूर्वकाली क्षत्रियांचा वध करून यांनी आपला क्रोध उतरविला होता. आता यांची बदला घेण्याची चिंता दूर झालेली आहे म्हणून परत क्षत्रियांचा संहार करणे यांच्यासाठी अभीष्ट नाही हे निश्चयपूर्वक सांगता येणे कसे शक्य आहे. ॥ २१-२२ ॥
एवमुक्त्वार्घ्यमादाय भार्गवं भीमदर्शनम् ।
ऋषयो राम रामेति मधुरं वाक्यमब्रुवन् ॥ २३ ॥
असे म्हणून ऋषिंनी भयंकर दिसणार्‍या भृगुनन्दन परशुरामांना अर्घ्य दिले आणि 'राम ! राम !' म्हणून त्यांच्याशी मधुरवाणीत गप्पागोष्टी केल्या. ॥ २३ ॥
प्रतिगृह्य तु तां पूजामृषिदत्तां प्रतापवान् ।
रामं दाशरथिं रामो जामदग्न्योऽभ्यभाषत ॥ २४ ॥
ऋषिंच्या द्वारा दिली गेलेली पूजा स्विकार करून प्रतापी जमदग्निपुत्र परशुरामांनी दशरथनन्दन रामास या प्रकारे म्हटले. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुःसप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चौर्‍याहत्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP