श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सुग्रीवेण महोदरस्य वधः -
सुग्रीवाबरोबर महोदराचे घोर युद्ध तसेच वध -
हन्यमाने बले तूर्णं अन्योन्यं ते महामृधे ।
सरसीव महाघर्मे सोपक्षीणे बभूवतुः ॥ १ ॥
त्या महासमरांत त्या दोन्हीकडील सेना परस्परात मारामारी करून ग्रीष्म ऋतुमध्ये आटून जाणार्‍या दोन तलावाप्रमाणे क्षीण होऊ लागल्या. ॥१॥
स्वबलस्य तु घातेन विरूपाक्षवधेन च ।
बभूव द्विगुणं क्रुद्धो रावणो राक्षसाधिपः ॥ २ ॥
आपल्या सेनेचा विनाश आणि विरूपाक्षाचा वध यामुळे राक्षसराज रावणाचा क्रोध दुप्पट वाढला. ॥२॥
प्रक्षीणं स्वबलं दृष्ट्‍वा वध्यमानं वलीमुखैः ।
बभूवास्य व्यथा युद्धे प्रेक्ष्य दैवविपर्ययम् ॥ ३ ॥
वानरांच्या माराने आपली सेना क्षीण होत असलेली पाहून दैव उलटलेले पाहून युद्धस्थळी त्याला फार व्यथा झाली. ॥३॥
उवाच च समीपस्थं महोदरमनन्तरम् ।
अस्मिन् काले महाबाहो जयाशा त्वयि मे स्थिता ॥ ४ ॥
त्याने जवळच उभा असलेल्या महोदरास म्हटले - महाबाहो ! या समयी माझी विजयाची आशा तुझ्यावरच अवलंबून आहे. ॥४॥
जहि शत्रुचमूं वीर दर्शयाद्य पराक्रमम् ।
भर्तृपिण्डस्य कालोऽयं निर्देष्टुं साधु युध्यताम् ॥ ५ ॥
वीरा ! आज आपला पराक्रम दाखव आणि शत्रुसेनेचा वध कर. हाच स्वामीच्या अन्नाचा बदला चुकविण्याचा समय आहे, म्हणून चांगल्या प्रकारे युद्ध कर. ॥५॥
एवमुक्तस्तथेत्युक्त्वा राक्षसेन्द्रो महोदरः ।
प्रविवेशारिसेनां तां पतङ्‌ग इव पावकम् ॥ ६ ॥
रावणाने असे म्हटल्यावर राक्षसराज महोदराने ’फारच चांगले’ असे म्हणून त्याची आज्ञा शिरोधार्य केली आणि ज्याप्रमाणे पतंग आगीत उडी घेतो त्याप्रमाणे त्याने शत्रुसेनेमध्ये प्रवेश केला. ॥६॥
ततः स कदनं चक्रे वानराणां महाबलः ।
भर्तृवाक्येन तेजस्वी स्वेन वीर्येण चोदितः ॥ ७ ॥
सेनेमध्ये प्रवेश करून तेजस्वी आणि महाबली महोदराने स्वामीच्या आज्ञेने प्रेरित होऊन आपल्या पराक्रमद्वारा वानरांचा संहार करण्यास आरंभ केला. ॥७॥
वानराश्च महासत्त्वाः प्रगृह्य विपुलाः शिलाः ।
प्रविश्यारिबलं भीमं जघ्नुस्ते सर्वराक्षसान् ॥ ८ ॥
वानरही फार शक्तिशाली होते. ते मोठ मोठ्‍या शिला घेऊन शत्रुच्या भयंकर सेनेमध्ये घुसले आणि समस्त राक्षसांचा संहार करू लागले. ॥८॥
महोद सुसङ्‌क्रुद्धः शरैः काञ्चनभूषणैः ।
चिच्छेद पाणिपादोरु वानराणां महाहवे ॥ ९ ॥
महोदराने अत्यंत कुपित होऊन आपल्या सुवर्णभूषित बाणांच्या द्वारा त्या महायुद्धात वानरांचे हात-पाय आणि जांघा कापल्या. ॥९॥
ततस्ते वानराः सर्वे राक्षसैरर्दिता भृशम् ।
दिशो दश द्रुताः केचित् केचित् सुग्रीवमाश्रिताः ॥ १० ॥
राक्षसांच्या द्वारा अत्यंत पीडित झालेले ते सर्व वानर दाही दिशांस पळू लागले. कित्येक सुग्रीवास शरण गेले. ॥१०॥
प्रभग्नां समरे दृष्ट्‍वा वानराणां महाबलम् ।
अभिदुद्राव सुग्रीवो महोदरमनन्तरम् ॥ ११ ॥
वानरांच्या विशाल सेनेला समरभूमीमध्ये पळून जात असलेली पाहून सुग्रीवांनी जवळच उभे असलेल्या महोदरावर आक्रमण केले. ॥११॥
प्रगृह्य विपुलां घोरां महीधरसमां शिलाम् ।
चिक्षेप च महातेजाः तद् वधाय हरीश्वरः ॥ १२ ॥
वानरराज फार तेजस्वी होते. त्यांनी पर्वतसमान विशाल आणि भयंकर शिला उचलून महोदराच्या वधासाठी त्याच्यावर फेकली. ॥१२॥
तामापतन्तीं सहसा शिलां दृष्ट्‍वा महोदरः ।
असम्भ्रान्तस्ततो बाणैः निर्बिभेद दुरासदाम् ॥ १३ ॥
त्या दुर्जय शिलेला एकाएकी आपल्यावर येतांना पाहूनही महोदराच्या मनांत भीती उत्पन्न झाली नाही. त्याने बाणाच्या द्वारे तिचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥१३॥
रक्षसा तेन बाणौघैः निकृत्ता सा सहस्रधा ।
निपपात तदा भूमौ गृध्रचक्रमिवाकुलम् ॥ १४ ॥
त्या राक्षसाच्या बाणसमूहाने तुटून हजारो तुकड्‍यात विभक्त होऊन ती शिला त्या समयी आकुल झालेल्या गिधाडांच्या समुदायाप्रमाणे पृथ्वीवर पडली. ॥१४॥
तां तु भिन्नां शिलां दृष्ट्‍वा सुग्रीवः क्रोधमूर्च्छितः ।
सालमुत्पाट्य चिक्षेप तं स चिच्छेद नैकधा ॥ १५ ॥
ती शिला विदीर्ण झालेली पाहून सुग्रीव क्रोधाने बेभान झाले. त्यांनी एक शालवृक्ष उपटून त्या राक्षसावर फेकला परंतु राक्षसाने त्याचेही कित्येक तुकडे करून टाकले. ॥१५॥
शरैश्च विददारैनं शूरः परबलार्दनः ।
स ददर्श ततः क्रुद्धः परिघं पतितं भुवि ॥ १६ ॥
त्याच बरोबर शत्रुसेनेचे दमन करणार्‍या त्या शूरवीराने त्यांना आपल्या बाणांनी घायाळ करून टाकले. त्यासमयी क्रोधाविष्ट झालेल्या सुग्रीवांना तेथे पृथ्वीवर पडलेला एक परिघ दिसून आला. ॥१६॥
आविध्य तु स तं दीप्तं परिघं तस्य दर्शयन् ।
परिघेणोग्रवेगेन जघानास्य हयोत्तमान् ॥ १७ ॥
तो तेजस्वी परिघ फिरवून, सुग्रीवांनी महोदराला आपले लाघव दाखवीत त्या भयानक वेगवान्‌ परिघाच्या द्वारा त्या राक्षसाच्या उत्तम घोड्‍यांना मारून टाकले. ॥१७॥
तस्माद् हतहयाद् वीरः सोऽवप्लुत्य महारथात् ।
गदां जग्राह सङ्‌क्रुद्धो राक्षसोऽथ महोदरः ॥ १८ ॥
घोडे मारले गेल्यावर वीर राक्षस महोदराने आपल्या विशाल रथातून खाली उडी मारली आणि अत्यंत रोषाने भडकून त्याने गदा उचलली. ॥१८॥
गदापरिघहस्तौ तौ युधि वीरौ समीयतुः ।
नर्दन्तौ गौवृषप्रख्यौ घनाविव सविद्युतौ ॥ १९ ॥
एकाच्या हातात गदा होती आणि दुसर्‍याच्या हातात परिघ होता. ते दोन्ही वीर युद्धस्थळी दोन बैलांप्रमाणे आणि वीजेसहित दोन मेघांप्रमाणे गर्जना करत एक दुसर्‍याशी भिडले होते. ॥१९॥
ततः क्रुद्धो गदां तस्मै चिक्षेप रजनीचरः ।
ज्वलन्तीं भास्कराभासां सुग्रीवाय महोदरः ॥ २० ॥
त्यानंतर कुपित झालेल्या राक्षस महोदराने सुग्रीवावर सूर्यतुल्य तेजाने चमकणारी एक गदा फेकली. ॥२०॥
गदां तां सुमहाघोरां आपतन्तीं महाबलः ।
सुग्रीवो रोषताम्राक्षः समुद्यम्य महाहवे ॥ २१ ॥

आजघान गदां तस्य परिघेण हरीश्वरः ।
पपात तरसा भिन्नः परिघस्तस्य भूतले ॥ २२ ॥
ती महाभयंकर गदा आपल्याकडे येतांना पाहून महासमरात महाबली वानरराज सुग्रीवांचे नेत्र रोषाने लाल झाले आणि त्यांनी परिघ उचलून त्याच्या द्वारे राक्षसाच्या गदेवर आघात केला. ती गदा खाली पडली परंतु तिच्याशी वेगाने टक्कर होऊन सुग्रीवांचा परिघही तुकडे होऊन पृथ्वीवर जाऊन पडला. ॥२१-२२॥
ततो जग्राह तेजस्वी सुग्रीवो वसुधातलात् ।
आयसं मुसलं घोरं सर्वतो हेमभूषितम् ॥ २३ ॥
तेव्हा तेजस्वी सुग्रीवांनी भूमीवरून एक लोखडांचे भयंकर मुसळ उचलले, ज्याच्यावर सर्व बाजूनी सोने जडवलेले होते. ॥२३॥
स तमुद्यम्य चिक्षेप सोऽप्यस्य प्राक्षिपद् गदाम् ।
भिन्नावन्योन्यमासाद्य पेततुस्तौ महीतले ॥ २४ ॥
ते उचलून त्यांनी राक्षसावर फेकून मारले. त्याच वेळी त्या राक्षसानेही त्याच्यावर गदा फेकली. गदा आणि मुसळ दोन्ही आपसात टकरून तुटून गेली आणि जमिनीवर जाऊन पडली. ॥२४॥
ततो भग्नप्रहरणौ मुष्टिभ्यां तौ समीयतुः ।
तेजोबलसमाविष्टौ दीप्ताविव हुताशनौ ॥ २५ ॥
ते दोन्ही वीर तेज आणि बळाने संपन्न आणि जळत असणार्‍या अग्निप्रमाणे उद्दीप्त होत होते. आपापली आयुधे तुटल्यावर ते मुठीनी एक दुसर्‍याला मारू लागले. ॥२५॥
जघ्नतुस्तौ तदान्योन्यं नेदतुश्च पुनः पुनः ।
तलैश्चान्योन्यमासाद्य पेततुश्च महीतले ॥ २६ ॥
त्यासमयी वारंवार गर्जना करीत ते दोघे योद्धे परस्परांवर मुठींनी बुक्के मारून प्रहार करू लागले. नंतर एक दुसर्‍याला थप्पडा मारून दोघेही पृथ्वीवर पडले. ॥२६॥
उत्पेततुस्तदा तूर्णं जघ्नतुश्च परस्परम् ।
भुजैश्चिक्षिपतुर्वीरौ अन्योन्यं अपराजितौ ॥ २७ ॥
नंतर तात्काळच ते उडी मारून उभे राहिले आणि शीघ्रच एकमेकांवर प्रहार करू लागले. ते दोन्ही वीर हार मानत नव्हते. दोघेही दोघांवर भुजांच्या द्वारे प्रहार करत राहिले. ॥२७॥
जग्मतुस्तौ श्रमं वीरौ बाहुयुद्धे परन्तपौ ।
आजहार ततः खड्गं अदूरपरिवर्तिनम् ॥ २८ ॥

राक्षसश्चर्मणा सार्धं महावेगो महोदरः ।
तथैव च महाखड्गं चर्मणा पतितं सह ।
जग्राह वानरश्रेष्ठः सुग्रीवो वेगवत्तरः ॥ २९ ॥
शत्रुंना ताप देणारे ते दोन्ही वीर बाहु-युद्ध करता थकून गेले. तेव्हा महान्‌ वेगशाली राक्षस महोदराने थोडीशी दूर पडलेली ढाली सहित तलवार उचलून घेतली. त्याचप्रमाणे अत्यंत वेगवान्‌ कपिश्रेष्ठ सुग्रीवांनीही तेथे पडलेले विशाल खड्ग ढालीसकट उचलले. ॥२८-२९॥
तौ तु रोषपरीताङ्‌गौ नर्दन्तावभ्यधावताम् ।
उद्यतासी रणे हृष्टौ युधि शस्त्रविशारदौ ॥ ३० ॥
महोदर आणि सुग्रीव दोघेही युद्धाच्या मैदानात शस्त्र चालविण्याच्या कलेत चतुर होते तसेच दोघांचेही शरीर रोषाने प्रभावित झाले होते, म्हणून रणभूमीमध्ये हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन तलवार उचलून गर्जना करत एक दुसर्‍यावर तुटून पडले. ॥३०॥
दक्षिणं मण्डलं चोभौ सुतूर्णं सम्परीयतुः ।
अन्योन्यमभिसङ्‌क्रुद्धौ जये प्रणिहितावुभौ ॥ ३१ ॥
ते दोघेही अत्यंत वेगाने डावे-उजवे पवित्रे बदलत राहिले होते, दोघाचा दोघांवर क्रोध भडकलेला होता तसेच दोघेही आपापल्या विजयाची आशा धरून होते. ॥३१॥
स तु शूरो महावेगो वीर्यश्लाघी महोदरः ।
महावर्मणि तं खड्गं पातयामास दुर्मतिः ॥ ३२ ॥
आपल्या बळावर घमेंड करणार्‍या महान्‌ वेगवान्‌ तसेच शौर्यसंपन्न दुर्बुद्धि महोदराने आपली तलवार सुग्रीवांच्या विशाल कवचावर फेकून मारली. ॥३२॥
लग्नमुत्कर्षतः खड्गं खड्गेन कपिकुञ्जरः ।
जहार सशिरस्त्राणं कुण्डलोपगतं शिरः ॥ ३३ ॥
सुग्रीवाच्या कवचावर लागलेली ती तलवार जेव्हा तो राक्षस खेचू लागला, त्याच समयी कपिकुंजर सुग्रीवांनी महोदराचे शिरस्त्राणसहित कुण्डलमण्डित मस्तकाला आपल्या खड्गाने कापून टाकले. ॥३३॥
निकृत्तशिरसस्तस्य पतितस्य महीतले ।
तद् बलं राक्षसेन्द्रस्य दृष्ट्‍वा तत्र न दृश्यते ॥ ३४ ॥
मस्तक छाटले गेल्यावर राक्षसराज महोदर पृथ्वीवर कोसळला. हे पाहिल्यावर त्याची सेना परत तेथे दिसून आली नाही. ॥३४॥
हत्वा तं वानरैः सार्धं ननाद मुदितो हरिः ।
चुक्रोध च दशग्रीवो बभौ हृष्टश्च राघवः ॥ ३५ ॥
महोदराला मारून प्रसन्न झालेले वानरराज सुग्रीव अन्य वानरांसह गर्जना करू लागले. त्यासमयी दशमुख रावणाला फार क्रोध आला आणि राघव हर्षाने प्रफुल्लित झाले. ॥३५॥
विषण्णवदनाः सर्वे राक्षसा दीनचेतसः ।
विद्रवन्ति ततः सर्वे भयवित्रस्तचेतसः ॥ ३६ ॥
त्यासमयी सर्व राक्षसांचे मन दुःखी झाले. त्या सर्वांच्या मुखावर विषाद पसरला आणि ते सर्व भयभीत चित्त होऊन तेथून पळून जाऊ लागले. ॥३६॥
महोदरं तं विनिपात्य भूमौ
महागिरेः कीर्णमिवैकदेशम् ।
सूर्यात्मजस्तत्र रराज लक्ष्म्या
सूर्यः स्वतेजोभिरिवाप्रधृष्यः ॥ ३७ ॥
महोदराचे शरीर महान्‌ पर्वताच्या एखाद्या तुटलेल्या शिखरासारखे वाटत होते. त्याला पृथ्वीवर पाडून सूर्यपुत्र सुग्रीव तेथे विजयलक्ष्मीने सुशोभित होऊ लागले, जणु अघर्षणीय सूर्यदेव आपल्या तेजाने प्रकाशित होत होते. ॥३७॥
अथ विजयमवाप्य वानरेन्द्रः
समरमुखे सुरयक्षसिद्धसङ्‌घैः ।
अवनितलगतैश्च भूतसङ्‌घैः
हरुषसमाकुलितैः निरीक्ष्यमाणाः ॥ ३८ ॥
याप्रकारे वानरराज सुग्रीव युद्धाच्या तोंडावरच विजय प्राप्त करून फारच शोभून दिसू लागले. त्यासमयी देवता, सिद्ध आणि यक्षांचे समुदाय तसेच भूतलनिवासी प्राण्यांचे समूहही मोठ्‍या हर्षाने त्यांच्याकडे पाहू लागले. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तनवतितमः सर्गः ॥ ९७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सत्त्याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP