श्रीमद् वाल्मीकि रामायण - अरण्यकाण्ड - ॥ नवमः सर्गः ॥
श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ नवमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अनागसां देहिनामहिंसनायाहिंसाधर्मस्य पालनाय च सीतायाः श्रीरामं प्रति प्रार्थनम् -
सीतेचा श्रीरामांना निरपराध प्राण्यांना न मारण्यासाठी आणि अहिंसा धर्माचे पालन करण्यासाठी अनुरोध -
सुतीक्ष्णेनाभ्यनुज्ञातं प्रस्थितं रघुनन्दनम् ।
हृद्यया स्निग्धया वाचा भर्तारमिदमब्रवीत् ॥ १ ॥
सुतीक्ष्णाची आज्ञा घेऊन वनाकडे प्रस्थित झालेल्या आपल्या स्वामी रघुनंदन श्रीरामांना सीतेने स्नेहयुक्त मनोहर वाणीने या प्रकारे म्हटले - ॥१॥
अधर्मं तु सुसूक्ष्मेण विधिना प्राप्यते महान् ।
निवृत्तेन च शक्योऽयं व्यसनात् कामजादिह ॥ २ ॥
’आर्यपुत्र ! यद्यपि आपण महान पुरुष आहात तथापि अत्यंत सूक्ष्म विधिने विचार केल्यावर आपण अधर्मास प्राप्त होत आहात (असे मला वाटते) जर कामजनित व्यसनापासून आपण सर्वथा निवृत्त आहात तर येथे या अधर्मापासूनही आपण वाचू शकता. ॥२॥
त्रीण्येव व्यसनान्यत्र कामजानि भवन्त्युत ।
मिथ्यावाक्यं तु परमं तस्माद् गुरुतरावुभौ ॥ ३ ॥

परदाराभिगमनं विना वैरं च रौद्रता ।
मिथ्यावाक्यं न ते भूतं न भविष्यति राघव ॥ ४ ॥
’या जगतात कामापासून उत्पन्न होणारी तीनच (संकटे) असू शकतात. मिथ्याभाषण फार मोठे व्यसन (दोष) आहे, परंतु याहून भारी आणखी दोन व्यसने आहेत- परस्त्रीगमन आणि वैर नसताही दुसर्‍या प्रति क्रूरतापूर्ण आचरण. रघुनंदन ! या पैकी मिथ्या भाषण रूपी व्यसन (दोष) तर आपल्या ठिकाणी कधी उत्पन्न झालाच नाही आणि पुढेही होणार नाही. ॥३-४॥
कुतोऽभिलषणं स्त्रीणां परेषां धर्मनाशनम् ।
तव नास्ति मनुष्येन्द्र न चाभूत् ते कदाचन ॥ ५ ॥

मनस्यपि तथा राम न चैतद् विद्यते क्वचित् ।
स्वदारनिरतश्चैव नित्यमेव नृपात्मज ॥ ६ ॥

धर्मिष्ठः सत्यसन्घश्च पितुर्निर्देशकारकः ।
त्वयि धर्मश्च च सत्यं च त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् ॥ ७ ॥
’परस्त्री विषयक अभिलाषा तर आपल्याला होऊच कशी शकेल ? नरेंद्र ! धर्माचा नाश करणारी ही कुत्सित इच्छा आपल्या मनांत कधींही उत्पन्न झालेली नाही, सध्याही नाही आणि भविष्यातही कधी उत्पन्न होण्याची संभावनाही नाही आहे. राजकुमार श्रीराम ! हा दोष तर आपल्या मनांत कधी उदित झालेला नाही आहे (मग वाणी आणि क्रियेत कसा येऊ शकेल ?) आपण सदाच आपल्या धर्मपत्‍नी मध्ये अनुरक्त राहाणारे, धर्मनिष्ठ, सत्यप्रतिज्ञ, तसेच पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे आहात. आपल्या ठिकाणी धर्म आणि सत्य दोन्हीची स्थिती आहे. आपल्याच ठिकाणी सर्व काही प्रतिष्ठित आहे. ॥५-७॥
तच्च सर्वं महाबाहो शक्यं वोढुं जितेन्द्रियैः ।
तव वश्येन्द्रियत्वं च जानामि शुभदर्शन ॥ ८ ॥
’महाबाहो ! जे लोक जितेंद्रिय आहेत, ते सदा सत्य आणि धर्माला पूर्ण रूपाने धारण करू शकतात. शुभदर्शी महापुरुष ! आपल्या जितेंद्रियतेला मी चांगल्या प्रकारे जाणते. (म्हणून मला विश्वास आहे की आपल्या ठिकाणी पूर्वोक्त दोन्ही दोष कदापि राहू शकत नाहीत.) ॥८॥
तृतीयं यदिदं रौद्रं परप्राणाभिहिंसनम् ।
निर्वैरं क्रियते मोहात् तच्च ते समुपस्थितम् ॥ ९ ॥
’परंतु दुसर्‍यांच्या प्राणांची हिंसारूप जो हा तिसरा भयंकर दोष आहे तो लोक मोहवश विना वैरविरोधाशिवाय ही करीत असतात. तोच दोष आपल्या समोरही उपस्थित आहे. ॥९॥
प्रतिज्ञातस्त्वया वीर दण्डकारण्यवासिनाम् ।
ऋषीणां रक्षणार्थाय वधः संयति रक्षसाम् ॥ १० ॥
’वीर ! आपण दण्डकारण्य निवासी ऋषिंच्या रक्षणासाठी युद्धात राक्षसांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ॥१०॥
एतन्निमित्तं च वनं दण्डका इति विश्रुतम् ।
प्रस्थितस्त्वं सह भ्रात्रा धृतबाणशरासनः ॥ ११ ॥
’त्यासाठीच आपण भावासह धनुष्य-बाण घेऊन दण्डकारण्य या नावाने विख्यात वनाकडे प्रस्थित होत आहात. ॥११॥
ततस्त्वां प्रस्थितं दृष्ट्वा मम चिन्ताकुलं मनः ।
त्वद्वृयत्तं चिन्तयन्त्या वै भवेन्निःश्रेयसं हितम् ॥ १२ ॥
’म्हणून आपल्याला या घोर कर्मासाठी प्रस्थित झालेले पाहून माझे चित्त चिंतेने व्याकुळ होऊन गेले आहे. आपल्या प्रतिज्ञापालन रूपी व्रताचा विचार करून मी सदा हाच विचार करीत असते की आपले कल्याण कसे होईल ? ॥१२॥
नहि मे रोचते वीर गमनं दण्डकान् प्रति ।
कारणं तत्र वक्ष्यामि वदन्त्याः श्रूयतां मम ॥ १३ ॥
’वीर ! मला या समयी आपले दण्डकारण्यात जाणे चांगले वाटत नाही याचे काय कारण आहे - हेच मी सांगते, आपण माझ्या मुखाने ऐकावे. ॥१३॥
त्वं हि बाणधनुष्पाणिर्भ्रात्रा सह वनं गतः ।
दृष्ट्वा वनचरान् सर्वान् कच्चित् कुर्याः शरव्ययम् ॥ १४ ॥
’आपण हातात धनुष्य-बाण घेऊन आपल्या भावा बरोबर वनात आला आहात. संभव आहे, समस्त वनचारी राक्षसांना पाहून कदाचित आपण त्यांच्या प्रति आपल्या बाणांचा प्रयोग करून बसाल. ॥१४॥
क्षत्रियाणामिह धनुर्हुताशस्येन्धनानि च ।
समीपतः स्थितं तेजो-बलमुच्छ्रयते भृशम् ॥ १५ ॥
’ज्याप्रमाणे आगीच्या जवळ ठेवलेले इंधन तिच्या तेजरूप बलाला अत्यंत उद्दीप्त करते त्या प्रकारे जेथे क्षत्रियांजवळ धनुष्य असेल तर ते त्यांच्या बळाला आणि प्रतापाला उद्‍बोधित करून टाकते. ॥१५॥
पुरा किल महाबाहो तपस्वी सत्यवाञ्शुचिः ।
कस्मिंश्चिदभवत् पुण्ये वने रतमृगद्विजे ॥ १६ ॥
’महाबाहो ! पूर्वकालातील गोष्ट आहे. कुठल्या तरी पवित्र वनात जेथे मृग आणि पक्षी मोठ्या आनंदात राहात असत, तेथे एक सत्यवादी आणि पवित्र तपस्वी निवास करीत होते. ॥१६॥
तस्यैव तपसो विध्नं कर्तुमिन्द्रः शचीपतिः ।
खड्गपाणिरथागच्छदाश्रमं भटरूपधृक् ॥ १७ ॥
’त्यांच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी शचीपति इंद्र कुणा योद्धाचे रूप धारण करून हातात तलवार घेऊन एक दिवस त्यांच्या आश्रमावर गेले. ॥१७॥
तस्मिंस्तदाश्रमपदे निहितः खड्ग उत्तमः ।
स न्यासविधिना दत्तः पुण्ये तपसि तिष्ठतः ॥ १८ ॥
’त्यांनी मुनींच्या आश्रमात आपले उत्तम खङ्‌ग ठेवून दिले. पवित्र तपस्येत लागलेल्या त्या मुनींना ठेव (अमानत) रूपाने हे खड्‌ग दिले गेले. ॥१८॥
स तच्छस्त्रमनुप्राप्य न्यासरक्षणतत्परः ।
वने तं विचरत्येव रक्षन् प्रत्ययमात्मनः ॥ १९ ॥
’ते शस्त्र मिळताच मुनि त्या ठेवीचे रक्षण करण्यात मग्न झाले. ते आपल्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी वनात विचरते समयी त्यास बरोबर बाळगू लागले. ॥१९॥
यत्र गच्छत्युपादातुं मूलानि च फलानि च ।
न विना याति तं खड्गं न्यासरक्षणतत्परः ॥ २० ॥
’अमानत (ठेवीच्या) रक्षणात तत्पर राहाणारे ते मुनि फल-मूल आणण्यासाठी जेथे कोठे ही जात असत, ते खङ्‌ग बरोबर घेतल्या खेरीज जात नसत. ॥२०॥
नित्यं शस्त्रं परिवहन् क्रमेण स तपोधनः ।
चकार रौद्रीं स्वां बुद्धिं त्यक्त्वा तपसि निश्चयम् ॥ २१ ॥
’तप हेच ज्यांचे धन होते, त्या मुनिंनी नित्य प्रतिदिन शस्त्र बरोबर बाळगण्याच्या कारणाने क्रमशः तपस्येचा निश्चय सोडून देऊन आपल्या बुद्धिला क्रूरतापूर्ण बनविले. ॥२१॥
ततः स रौद्राभिरतः प्रमत्तोऽधर्मकर्शितः ।
तस्य शस्त्रस्य संवासाज्जगाम नरकं मुनिः ॥ २२ ॥
’नंतर तर अधर्माने त्यांना आकृष्ट करून घेतले. ते मुनि प्रमादवश रौद्रकर्मात तत्पर झाले आणि त्या शस्त्राच्या सहवासाने त्यांना नरकात जाऊन पडावे लागले. ॥२२॥
एवमेतत् पुरावृत्तं शस्त्रसंयोगकारणम् ।
अग्निसंयोगवद्धेतुः शस्त्रसंयोग उच्यते ॥ २३ ॥
या प्रकारे शस्त्राचा संयोग होण्यामुळे पूर्वकाळी त्या तपस्वी मुनिला अशी दुर्दशा भोगावी लागली. जसे आगीच्या संयोगाने इंधन जळून जाते त्याप्रकारे शस्त्राचा संयोग शस्त्रधार्‍याच्या हृदयात विकाराचा उत्पादक सांगितला जातो. ॥२३॥
स्नेहाच्च बहुमानाच्च स्मारये त्वां न शिक्षये ।
न कथञ्चन सा कार्या गृहीतधनुषा त्वया ॥ २४ ॥

बुद्धिर्वैरं विना हन्तुं राक्षसान् दण्डकाश्रितान् ।
अपराधं विना हन्तुं लोको वीर न मंस्यते ॥ २५ ॥
’माझ्या मनात आपल्या प्रति जो स्नेह आणि विषेश आदर आहे त्या कारणामुळेच मी आपल्याला त्या प्राचीन घटनेची आठवण करून देत आहे. आणि तसेच ही शिकवणही देत आहे की आपण धनुष्य घेऊन कुठल्या ही प्रकारे वैर नसतानाही दण्डकारण्यवासी राक्षसांच्या वधाचा विचार करता कामा नये. वीरवर ! विना अपराधच कुणाला मारणे संसारांतील लोक चांगले समजणार नाहीत. ॥२४-२५॥
क्षत्रियाणां तु वीराणां वनेषु निरतात्मनाम् ।
धनुषा कार्यमेतावदार्तानामभिरक्षणम् ॥ २६ ॥
’आपल्या मन आणि इंद्रियांना वश ठेवणार्‍या क्षत्रिय वीरांसाठी वनात धनुष्य धारण करण्याचे इतकेच प्रयोजन आहे की त्यांनी संकटात पडलेल्या प्राण्यांचे रक्षण करावे. ॥२६॥
क्व च शस्त्रं क्व च वनं क्व च क्षात्रं तपः क्व च ।
व्याविद्धमिदमस्माभिर्देशधर्मस्तु पूज्यताम् ॥ २७ ॥
’कोठे शस्त्र-धारण आणि कोठे वनवास ! कोठे क्षत्रियाचे हिंसामय कठोर कर्म आणि कोठे सर्व प्राण्यांवर दया करणे रूपी तप हे परस्पर विरूद्ध कळून येत आहेत म्हणून आपण देशधर्माचाच आदर केला पाहिजे. (या समयी आपण तपोवन रूप देशात निवास करीत आहोत, म्हणून येथील अहिंसामय धर्माचे पालन करणेच आपले कर्तव्य आहे.) ॥२७॥
कदर्य कलुषा बुद्धिर्जायते शस्त्रसेवनात् ।
पुनर्गत्वा त्वयोध्यायां क्षत्रधर्मं चरिष्यसि ॥ २८ ॥
’केवळ शस्त्राचे सेवन करण्याने मनुष्याची बुद्धि कृपण पुरुषाप्रमाणे कलुषित होऊन जाते म्हणून आपण अयोध्येस गेल्यावरच पुन्हा क्षात्रधर्माचे अनुष्ठान करावे. ॥२८॥
अक्षया तु भवेत् प्रीतिः श्वश्रूश्वशुरयोर्मम ।
यदि राज्यं हि संन्यस्य भवेस्त्वं निरतो मुनिः ॥ २९ ॥
’राज्य त्यागून वनात येऊन जर आपण मुनिवृत्तीनेच राहिलात तर त्या योगे माझ्या सासू आणि सासर्‍यांना अक्षय प्रसन्नता मिळेल. ॥२९॥
धर्मादर्थः प्रभवति धर्मात् प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत् ॥ ३० ॥
’धर्मापासून अर्थ प्राप्त होतो, धर्मापासूनच सुखाचा उदय होतो आणि धर्मापासूनच मनुष्य सर्व काही मिळवू शकतो. या संसारात धर्म हेच सार आहे. ॥३०॥
आत्मानं नियमैस्तैस्तैः कर्शयित्वा प्रयत्‍नतः ।
प्राप्यते निपुणैर्धर्मो न सुखाल्लभते सुखम् ॥ ३१ ॥
’चतुर मनुष्य भिन्न-भिन्न वानप्रस्थोचित नियमांच्या द्वारा आपल्या शरीराला तीक्ष्ण करून यत्‍नपूर्वक धर्माचे संपादन करतात कारण की सुखदायक साधनाने सुखाच्या हेतुभूत धर्माची प्राप्ति होत नाही. ॥३१॥
नित्यं शुचिमतिः सौम्य चर धर्मं तपोवने ।
सर्वं हि विदितं तुभ्यं त्रेलोक्यमपि तत्त्वतः ॥ ३२ ॥
’सौम्य ! प्रतिदिन शुद्धचित्त होऊन तपोवनात धर्माचे अनुष्ठान करावे. त्रैलोक्यात जे काही आहे, आपल्याला तर ते सर्व काही यथार्थ रूपाने विदितच आहे. ॥३२॥
स्त्रीचापलादेतदुदाहृतं मे
धर्मं च वक्तुं तव कः समर्थः ।
विचार्य बुद्ध्या तु सहानुजेन
यद् रोचते तत्कुरु माचिरेण ॥ ३३ ॥
’मी स्त्री जातिच्या स्वाभाविक चपलतेच्या कारणामुळेच आपल्या सेवेत या सर्व गोष्टी निवेदन केल्या आहेत. वास्तविक आपल्याला धर्माचा उपदेश करण्यास कोण समर्थ आहे ? आपण या विषयात आपल्या लहान भावाशी बुद्धिपूर्वक विचार (विमर्श) करावा. नंतर आपल्याला जे योग्य वाटेल तेच शीघ्रता पूर्वक करावे.’ ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा नववा सर्ग पूरा झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP