[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकोनपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणस्य प्रभावशालिरूपमवलोक्य हनुमतो मनसि नैकविधानां विचाराणामुद्रेकः -
रावणाचे प्रभावशाली स्वरूप पाहून हनुमन्ताच्या मनात नाना प्रकारचे विचार उत्पन्न होणे -
ततः स कर्मणा तस्य विस्मितो भीमविक्रमः ।
हनुमान् रोषताम्राक्षो रक्षोऽधिपमवैक्षत ॥ १॥
इन्द्रजिताच्या त्या नीतिपूर्ण कर्माने विस्मयचकित झालेल्या आणि रावणाच्या सीताहरण आदि कर्मानी कुपित झालेल्या त्या भयंकर पराक्रमी हनुमानांचे नेत्र लाल झाले आणि ते राक्षसाधिपती रावणाकडे पाहू लागले. ॥१॥
भ्राजमानं महार्हेण काञ्चनेन विराजता ।
मुक्ताजालावृतेनाथ मुकुटेन महाद्युतिम् ॥ २॥
तो महातेजस्वी रावण मोत्यांच्या घोसांनी भरलेल्या सोन्याने बनविलेल्या बहुमूल्य आणि दीप्तिमान मुकुटाने झळकत होता. ॥२॥
वज्रसंयोगसंयुक्तैर्महार्हमणिविग्रहैः ।
हेमैराभरणैश्चित्रैर्मनसेव प्रकल्पितैः ॥ ३॥
हिरे बसविलेल्या आणि मुख्य दर्शनी भागावर मोठी-मोठी रत्‍ने जडविलेल्या अद्‍भुत सुवर्णालङ्‌कारानी तो देदीप्यमान दिसत होता आणि ती भूषणे जशी काही मनःकल्पितच आहेत असे वाटत होते. ॥३॥
महार्हक्षौमसंवीतं रक्तचन्दनरूषितम् ।
स्वनुलिप्तं विचित्राभिर्विविधाभिश्च भक्तिभिः ॥ ४॥
त्याने बहुमूल्य रेशमी शेला पांघरला होता, रक्तचन्दनाच्या उटीने आणि नाना प्रकारच्या विचित्र आकृतींनी युक्त अंगरागामुळे त्याचे सर्व अंग सुशोभित झालेले होते. ॥४॥
विचित्रं र्दर्शनीयैश्च रक्ताक्षैर्भीमदर्शनैः ।
दीप्ततीक्ष्णमहादंष्ट्रं प्रलम्बं दशनच्छदैः ॥ ५॥
त्याचे नेत्र प्रेक्षणीय असून लालबुन्द आणि दिसण्यात भयानक होते आणि चमकदार, तीक्ष्ण आणि मोठमोठ्‍या दाढा आणि लांब लांब ओठ ह्यामुळे त्याच्या मुखाची विचित्र शोभा दिसत होती. ॥५॥
शिरोभिर्दशभिर्वीरो भ्राजमानं महौजसम् ।
नानाव्यालसमाकीर्णैः शिखरैरिव मन्दरम् ॥ ६॥
वीर हनुमन्तानी पाहिले की आपल्या दहा मस्तकांनी सुशोभित महाबलाढ्‍य रावण नाना प्रकारच्या सर्पांनी भरलेल्या आणि अनेक शिखरांच्यामुळे प्राप्त झालेल्या मन्दराचला प्रमाणे प्रतीत होत आहे. ॥६॥
नीलाञ्जनचयप्रख्यं हारेणोरसि राजता ।
पूर्णचन्द्राभवक्रेण सबालार्कमिवाम्बुदम् ॥ ७॥
त्याचे शरीर काळ्या कोळशाच्या ढीगाप्रमाणे काळे होते आणि वक्षःस्थळ चमकदार हारांनी विभूषित झालेले होते. तो पूर्ण चन्द्रासमान मनोरम मुखामुळे प्रातःकाळीन सूर्याने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे शोभून दिसत होता. ॥७॥
बाहुभिर्बद्धकेयूरैश्चन्दनोत्तमरूषितैः ।
भ्राजमानाङ्‌गदैर्भीमैः पञ्चशीर्षैरिवोरगैः ॥ ८॥
ज्यामध्ये केयूर बान्धलेले होते, ज्यावर उत्तम चन्दनाचा लेप लावलेला होता आणि चमकदार बाजूबन्द ज्यांची शोभा वाढवीत होते, अशा भयंकर भुजांनी सुशोभित रावण जणु पाच फडा असलेल्या अनेक सर्पांनी सेवीत होत आहे, असा भासत होता. ॥८॥
महति स्फाटिके चित्रे रत्‍नसंयोगचित्रिते ।
उत्तमास्तरणास्तीर्णे सूपविष्टं वरासने ॥ ९॥
तो रावण स्फटिक मण्यांनी बनविलेल्या विशाल आणि सुन्दर सिंहासनावर बसलेला होता. ते सिंहासन नाना प्रकारच्या रत्‍ने जडविलेली असल्याने विचित्र दिसत होते आणि ते सुन्दर आस्तरणांनी आच्छादित केलेले होते. ॥९॥
अलंकृताभिरत्यर्थं प्रमदाभिः समन्ततः ।
वालव्यजनहस्ताभिरारात्समुपसेवितम् ॥ १०॥
उत्तम वस्त्रालङ्‌कारानी खूप सजलेल्या अनेक युवती चवर्‍या, पंखे आदि घेऊन सर्व बाजूने जवळ पास उभ्या राहून त्याची सेवा करीत होत्या. ॥१०॥
दुर्धरेण प्रहस्तेन महापार्श्वेन रक्षसा ।
मन्त्रिभिर्मन्त्रतत्त्वज्ञैःर्निकुम्भेन च मन्त्रिणा ॥ ११॥

सुखोपविष्टं रक्षोभिश्चतुर्भिर्बलदर्पितम् ।
कृत्स्नं परिवृतं लोकं चतुर्भिरिव सागरैः ॥ १२॥
मन्त्रतत्त्वाला जाणणारे दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व आणि निकुम्भ - हे चार राक्षसजातीचे मन्त्री त्याच्याजवळ बसलेले होते. त्या चार राक्षसांनी वेढलेला तो बळाभिमानी रावण जणु चार समुद्रांनी वेढलेल्या समस्त भूलोकाप्रमाणे शोभून दिसत होता. ॥११-१२॥
मन्त्रिभिर्मन्त्रतत्त्वज्ञैः अन्यैश्च शुभदर्शिभिः ।
आश्वास्यमानं सचिवैः सुरैरिव सुरेश्वरम् ॥ १३॥
ज्याप्रमाणे देवता देवराज इन्द्राला सान्त्वना देतात त्याच प्रकारे ते मन्त्रतत्त्वाचे ज्ञाते असलेले मन्त्री तसेच आणखी इतरही शुभचिन्तक सचिव रावणास सान्त्वना देत होते. ॥१३॥
अपश्यद् राक्षसपतिं हनुमानतितेजसम् ।
विष्ठितं मेरुशिखरे सतोयमिव तोयदम् ॥ १४॥
याप्रकारे हनुमन्तांनी मन्त्र्यांनी घेरलेल्या अत्यन्त तेजस्वी सिंहासनारूढ राक्षसराज रावणास, मेरूशिखरावर विराजमान झालेल्या सजल जलधाराप्रमाणे पाहिले. ॥१४॥
स तैः सम्पीड्यमानोऽपि रक्षोभिर्भीमविक्रमैः ।
विस्मयं परमं गत्वा रक्षोऽधिपमवैक्षत ॥ १५॥
त्या भयानक पराक्रमी राक्षसांकडून पीडा होत असूनही हनुमान अत्यन्त विस्मित होऊन राक्षसराज रावणाकडेच फार बारकाईने पहात होते. ॥१५॥
भ्राजमानं ततो दृष्ट्‍वा हनुमान् राक्षसेश्वरम् ।
मनसा चिन्तयामास तेजसा तस्य मोहितः ॥ १६॥
त्या दीप्तिमान राक्षसराजाला उत्तम प्रकारे न्याहाळून पाहिल्यावर त्याच्या तेजाने मोहित होऊन हनुमान मनातल्या मनात असा विचार करू लागले- ॥१६॥
अहो रूपमहो धैर्यमहो सत्त्वमहो द्युतिः ।
अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता ॥ १७॥
अहो ! या राक्षसराजाचे रूप कसे अद्‍भुत आहे ! कसे विलक्षण धैर्य आहे ! कशी अनुपम शक्ती आहे ! आणि कसे आश्चर्यजनक तेज आहे ! याचे संपूर्ण राजोचित लक्षणांनी संपन्न असणे ही किती आश्चर्याची गोष्ट आहे ! ॥१७॥
यद्यधर्मो न बलवान् स्यादयं राक्षसेश्वरः ।
स्यादयं सुरलोकस्य सशक्रस्यापि रक्षिता ॥ १८॥
जर याच्या ठिकाणी अधर्म प्रबळ नसता तर हा राक्षसराज रावण इन्द्रासहित संपूर्ण देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता. ॥१८॥
अस्य क्रूरैर्नृशंसैश्च कर्मभिर्लोककुत्सितैः ।
तेन बिभ्यति खल्वस्माल्लोकाः सामरदानवाः ॥ १९॥

अयं ह्युत्सहते क्रुद्धः कर्तुमेकार्णवं जगत् ।
इति चिन्तां बहुविधामकरोन्मतिमान् हरिः ।
दृष्ट्‍वा राक्षसराजस्य प्रभावममितौजसः ॥ २०॥
याच्या लोकनिन्दित क्रूरतापूर्वक निष्ठुर कर्मांमुळे देवता आणि दानवांसहित संपूर्ण लोक याच्यापासून भयभीत झाले आहेत. हा कुपित झाला तर समस्त जगाला एका क्षणात निमग्न करू शकेल. संसारात प्रलय उत्पन्न करू शकेल. अमित तेजस्वी राक्षसराजाचा प्रभाव पाहून ते बुद्धिमान वानरवीर अशा अनेक प्रकारच्या चिन्ता करू लागले. ॥१९-२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग पूर्ण झाला. ॥४९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP