श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोनशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इक्ष्वाकुसुतस्य दण्डस्य राज्यम् -
इक्ष्वाकुपुत्र राजा दण्डाचे राज्य -
तदद्‌भुततमं वाक्यं श्रुत्वागस्त्यस्य राघवः ।
गौरवाद् विस्मयाच्चैव पुनः प्रष्टुं प्रचक्रमे ॥ १ ॥
अगस्त्यांचे ते अत्यंत अद्‍भुत वचन ऐकून राघवांच्या मनात त्यांच्या प्रति विशेष गौरवाचा उदय झाला आणि त्यांनी विस्मित होऊन पुन्हा त्यांना विचारण्यास आरंभ केला - ॥१॥
भगवंस्तद् वनं घोरं तपस्तप्यति यत्र सः ।
श्वेतो वैदर्भको राजा कथं तदमृगद्विजम् ॥ २ ॥
भगवन्‌ ! ते भयंकर वन ज्यात विदर्भ देशाचे राजे श्वेत घोर तपस्या करत होते, पशु-पक्ष्यां विरहित का झालेले होते ? ॥२॥
तद् वनं स कथ राजा शून्यं मनुजवर्जितम् ।
तपश्चर्तुं प्रविष्टः स श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ ३ ॥
ते विदर्भराज त्या शून्य निर्जन वनात तपस्या करण्यासाठी कां गेले ? हे मी यथार्थरूपाने ऐकू इच्छितो. ॥३॥
रामस्य वचनं श्रुत्वा कौतूहलसमन्वितम् ।
वाक्यं परमतेजस्वी वक्तुमेवोपचक्रमे ॥ ४ ॥
श्रीरामांचे कौतुहलयुक्त वचन ऐकून ते परम तेजस्वी महर्षि पुन्हा या प्रकारे सांगू लागले - ॥४॥
पुरा कृतयुगे राम मनुर्दण्डधरः प्रभुः ।
तस्य पुत्रो महान् आसीद् इक्ष्वाकुः कुलनन्दनः ॥ ५ ॥
श्रीरामा ! पूर्वकाळच्या सत्ययुगांतील गोष्ट आहे. दण्डधारी मनु या भूतलावर शासन करीत होते. त्यांचा एक श्रेष्ठ पुत्र झाला. त्याचे नाव इक्ष्वाकु होते. राजकुमार इक्ष्वाकु आपल्या कुळाला आनंदित करणारे होते. ॥५॥
तं पुत्रं पूर्वंकं राज्ये निक्षिप्य भुवि दुर्जयम् ।
पृथिव्यां राजवंशानां भव कर्तेत्युवाच ह ॥ ६ ॥
आपल्या त्या ज्येष्ठ आणि दुर्जय पुत्राला भूमण्डलाच्या राज्यावर स्थापित करून मनुनी त्याला म्हटले - मुला ! तू भूतलावर राजवंशांची सृष्टि कर. ॥६॥
तथैव च प्रतिज्ञातं पितुः पुत्रेण राघव ।
ततः परमसन्तुष्टो मनुः पुत्रमुवाच ह ॥ ७ ॥
राघवा ! पुत्र इक्ष्वाकुने पित्याच्या समोर तसेच करण्याची प्रतिज्ञा केली. यामुळे मनु फार संतुष्ट झाले आणि आपल्या पुत्राला म्हणाले - ॥७॥
प्रीतोऽस्मि परमोदार कर्ता चासि न संशयः ।
दण्डेन च प्रजा रक्ष मा च दण्डमकारणे ॥ ८ ॥
परम उदार पुत्रा ! मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तू राजवंशाची सृष्टि करशील यात संशय नाही, तू दण्डाच्या द्वारा दुष्टांचे दमन करीत प्रजेचे रक्षण कर, परंतु विना अपराध कुणालाही दण्ड देऊ नको. ॥८॥
अपराधिषु यो दण्डः पात्यते मानवेषु वै ।
स दण्डो विधिवन्मुक्तः स्वर्गं नयति पार्थिवम् ॥ ९ ॥
अपराधी मनुष्यांवर जो दण्डाचा प्रयोग केला जातो तो विधिपूर्वक दिला गेलेला दण्ड राजाला स्वर्गलोकात पोहोचवून देतो. ॥९॥
तस्माद्दण्डे महाबाहो यत्‍नवान्भव पुत्रक ।
धर्मो हि परमो लोके कुर्वतस्ते भविष्यति ॥ १० ॥
म्हणून महाबाहु पुत्रा ! तू दण्डाचा समुचित प्रयोग करण्यसाठी प्रयत्‍नशील रहा. असे करण्याने तुला संसारात परम धर्माची प्राप्ति होईल. ॥१०॥
इति तं बहु सन्दिश्य मनुः पुत्रं समाधिना ।
जगाम त्रिदिवं हृष्टो ब्रह्मलोकं सनातनम् ॥ ११ ॥
याप्रकारे पुत्राला बरेचसे संदेश देऊन मनु समाधि लावून मोठ्‍या हर्षाने स्वर्गाला - सनातन ब्रह्मलोकाला निघून गेले. ॥११॥
प्रयाते त्रिदिवं तस्मिन् इक्ष्वाकुरमितप्रभः ।
जनयिष्ये कथं पुत्रान् इति चिन्तापरोऽभवत् ॥ १२ ॥
ते ब्रह्मलोकनिवासी झाल्यावर अमित तेजस्वी राजा इक्ष्वाकु या चिंतेत पडले की मी कशाप्रकारे पुत्रांना उत्पन्न करूं ? ॥१२॥
कर्मभिर्बहुरूपैश्च तैस्तैर्मनुसुतस्तदा ।
जनयामास धर्मात्मा शतं देवसुतोपमान् ॥ १३ ॥
तेव्हा यज्ञ, दान आणि तपस्यारूप विविध कर्मांच्या द्वारा धर्मात्मा मनुपुत्राने शंभर पुत्र उत्पन्न केले जे देवकुमारांप्रमाणे तेजस्वी होते. ॥१३॥
तेषामवरजस्तात सर्वेषां रघुनन्दन ।
मूढश्चाकृतविद्यश्च न शुश्रूषति पूर्वजान् ॥ १४ ॥
तात रघुनंदना ! त्यात सर्वात जो लहान पुत्र होता तो मूढ आणि विद्याविहिन होता म्हणून आपल्या मोठ्‍या भावांची सेवा करीत नव्हता. ॥१४॥
नाम तस्य च दण्डेति पिता चक्रेऽल्पमेधसः ।
अवश्यं दण्डपतनं शरीरेऽस्य भविष्यति ॥ १५ ॥
याच्या शरीरावर अवश्य दण्डपात होईल असा विचार करून पित्याने त्या मंदबुद्धि पुत्राचे नाम दण्ड ठेवले. ॥१५॥
अपश्यमानस्तं देशं घोरं पुत्रस्य राघव ।
विन्ध्यशैवलयोर्मध्ये राज्यं प्रादादरिन्दम ॥ १६ ॥
शत्रुदमन नरेशा ! रामा ! त्या पुत्राच्या योग्य दुसरा कुठला भयंकर देश न दिसल्याने राजाने त्याला विंध्य आणि शैवल पर्वताच्या मधील (प्रदेशाचे) राज्य दिले. ॥१६॥
स दण्डस्तत्र राजाभूद् रम्ये पर्वतरोधसि ।
पुरं चाप्रतिमं राम न्यवेशयदनुत्तमम् ॥ १७ ॥
श्रीरामा ! पर्वताच्या त्या रमणीय तटप्रांतात दण्ड राजा झाला. त्याने स्वतःला राहाण्यासाठी एक बरेचसे अनुपम आणि उत्तम नगर वसविले. ॥१७॥
पुरस्य चाकरोन्नाम मधुमन्तमिति प्रभो ।
पुरोहितं तूशनसं वरयामास सुव्रतम् ॥ १८ ॥
प्रभो ! त्याने त्या नगराचे नाम मधुमंत ठेवले आणि उत्तम व्रताचे पालन करणार्‍या शुक्राचार्यांना आपले पुरोहित बनविले. ॥१८॥
एवं स राजा तद् राज्यं अमकरोत् सुपुरोहितः ।
प्रहृष्टमनुजाकीर्णं देवराजो यथा दिवि ॥ १९ ॥
याप्रकारे स्वर्गातील देवराजासमान भूतलावर राजा दण्डाने पुरोहिताबरोबर राहून हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या त्या राज्याचे पालन करण्यास आरंभ केला. ॥१९॥
ततः स राजा मनुजेन्द्रपुत्रः
सार्धं च तेनोशनसा तदानीम् ।
चकार राज्यं सुमहान् महात्मा
शक्रो दिवीवोशनसा समेतः ॥ २० ॥
त्या समयी तो महामनस्वी महाराजकुमार तसेच महान्‌ राजा दण्ड शुक्राचार्याबरोबर राहून आपल्या राज्याचे, जसे स्वर्गात देवराज इंद्र देवगुरू बृहस्पतिंबरोबर राहून आपल्या राज्याचे शासन करतात त्याप्रकारे पालन करू लागला. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोनशीतितमः सर्गः ॥ ७९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोण‍ऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥७९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP