श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ सप्तविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
प्रस्रवणगिरौ श्रीरामलक्ष्मणयोर्मिथः संलापः - प्रस्त्रवणगिरिवर श्रीराम आणि लक्ष्मणांचे परस्परांतील संभाषण -
अभिषिक्ते तु सुग्रीवे प्रविष्टे वानरे गुहाम् ।
आजगाम सह भ्रात्रा रामः प्रस्रवणं गिरिम् ॥ १ ॥
ज्यावेळी वानर सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला आणि ते किष्किंधामध्ये जाऊन राहू लागले, त्या समयी आपला भाऊ लक्ष्मण याच्यासह राम प्रस्त्रवण गिरीवर निघून गेले. ॥१॥
शार्दूलमृगसङ्‌घु्ष्टं सिंहैर्भीमरवैर्वृतम् ।
नानागुल्मलतागूढं बहुपादपसंकुलम् ॥ २ ॥
तेथे चित्ते आणि मृगांचा आवाज गुंजत राहात होता. भयंकर गर्जना करणार्‍या सिंहाने ते स्थान भरलेले होते. नाना प्रकारची झाडी आणि लता यांनी त्या पर्वताला आच्छादित केलेले होते आणि सघन वृक्षांच्या द्वारे तो सर्व बाजूनी व्याप्त होता. ॥२॥
ऋक्षवानरगोपुच्छैः मार्जारैश्च निषेवितम् ।
मेघराशिनिभं शैलं नित्यं शुचिकतं शिवम् ॥ ३ ॥
अस्वले, वानर, लंगूर आणि बोके आदि जंतु तेथे निवास करीत होते. तो पर्वत मेघांच्या समूहासारखा भासत होता. दर्शन करणार्‍या लोकासाठी तो सदाच मंगलमय आणि पवित्रकारक होता. ॥३॥
तस्य शैलस्य शिखरे महतीमायतां गुहाम् ।
प्रत्यगृह्णत वासार्थं रामः सौमित्रिणा सह ॥ ४ ॥
त्या पर्वताच्या शिखरावर एक फारच मोठी आणि विस्तृत गुहा होती. लक्ष्मणासहित रामांनी स्वतःला राहण्यासाठी तिचाच आश्रय घेतला. ॥४॥
कृत्वा च समयं रामः सुग्रीवेण सहानघः ।
कालयुक्तं महद् वाक्यं उवाच रघुनंदनः ॥ ५ ॥

विनीतं भ्रातरं भ्राता लक्ष्मणं लक्ष्मिवर्धनम् ।
रघुकुलाचा आनंद वाढविणारे निष्पाप श्रीराम वर्षा ऋतूचा अंत झाल्यावर सुग्रीवासह रावणावर आक्रमण करण्याचा निश्चय करून तेथे आलेले होते. त्यांनी लक्ष्मीची वृद्धि करणार्‍या आपल्या विनययुक्त भ्रात्यास लक्ष्मणास ही समयोचित गोष्ट सांगितली. ॥५ १/२॥
इयं गिरिगुहा रम्या विशाला युक्तमारुता ॥ ६ ॥

अस्यां वत्साम सौमित्रे वर्षरात्रमरिंदम ।
’शत्रुदमन सौमित्र ! ही पर्वताची गुहा फारच सुंदर आणि विशाल आहे. येथे हवेसाठी येण्या-जाण्याचा ही मार्ग आहे. आपण वर्षा ऋतूत याच गुहेमध्ये निवास करू. ॥६ १/२॥
गिरिशृङ्‌ग्मिदं रम्यं उत्तमं पार्थिवात्मज ॥ ७ ॥

श्वेताभिः कृष्णताम्राभिः शिलाभिरुपशोभितम् ।
’राजकुमार ! पर्वताचे हे शिखर फारच उत्तम आणि रमणीय आहे. पांढरे, काळे आणि लाल इत्यादि प्रकारचे प्रस्तर-खण्ड याची शोभा वाढवीत आहेत. ॥७ १/२॥
नानाधातुसमाकीर्णं नदीदर्दुरसंयुतम् ॥ ८ ॥

विविधैर्वृक्षषण्डैश्च चारुचित्रलतायुतम् ।
नानाविहगसंघुष्टं मयूरवरनादितम् ॥ ९ ॥
’येथे नाना प्रकारच्या धातुंच्या खाणी आहेत. जवळच नदी वहात आहे. तिच्यामध्ये राहाणारे बेडूक उड्या मारीत मारीत येथेही निघून येत आहेत. नाना प्रकारचे वृक्ष-समूह याची शोभा वाढवीत आहेत. सुंदर आणि विचित्र लतांनी हे शैलशिखर हिरवेगार दिसत आहे. नाना प्रकारचे पक्षी येथे किलबिलत आहेत. तसेच सुंदर मोरांची गोड केका गुंजत राहिली आहे. ॥८-९॥
मालतीकुंदगुल्मैश्च सिंदुवारैः शिरीषकैः ।
कदंबार्जुनसर्जैश्च पुष्पितैरुपशोभितम् ॥ १० ॥
’मालती आणि कुंदाची झाडी, सिंदुवार, शिरिष, कदंब, अर्जुन आणि सर्जांचे फुललेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवित आहेत. ॥१०॥
इयं च नलिनी रम्या फुल्लपङ्‌ककजमण्डिता ।
नातिदूरे गुहाया नौ भविष्यति नृपात्मज ॥ ११ ॥
’राजकुमार ! ही पुष्करिणी फुललेल्या कमळांनी अलंकृत होऊन फारच रमणीय दिसत आहे. ही आपल्या गुहेपासून जास्त दूर नाही. ॥११॥
प्रागुदक्प्रवणे देशे गुहा साधु भविष्यति ।
पश्चाच्चैवोन्नता सौम्य निवातेयं भविष्यति ॥ १२ ॥
’सौम्या ! येथील स्थान ईशान्य कोनाच्या बाजूने खाली आहे म्हणून येथे ही गुहा आपल्या निवासासाठी फार चांगली राहील. पश्चिम-दक्षिण कोनाच्या बाजूने उंच असलली ही गुफा हवेपासून आणि पावसापासून बचाव होण्यासाठी चांगली ठरेल.(**) ॥१२॥
(**- ईशान्य कोनाकडून खोल आणि नैऋत्य कोनाकडून उंच असल्याने तिचे द्वार नैऋत्य कोनाकडे होते- असे प्रतीत होत आहे, यामुळे तिच्यात पूर्वी (पूर्वेकडून येणारी) हवा आणि तिकडूनच येणारी वर्षा (पाऊस) यांचा प्रवेश होणार नाही.)
गुहाद्वारे च सौमित्रे शिला समतला शिवा ।
कृष्णा चैवायता चैव भिन्नाञ्जनचयोपमा ॥ १३ ॥
’सुमित्रानंदन ! या गुफेच्या द्वारावर समतल शिला आहे जी बाहेर बसण्यास सुविधाजनक असल्यामुळे सुखदायक आहे. ही लांब-रूंद असून शिवाय खाणीतून काढून आणलेल्या कोळशाच्या राशीप्रमाणे काळी आहे. ॥१३॥
गिरिशृङ्‌गेमिदं तात पश्य चोत्तरतः शुभम् ।
भिन्नाञ्जनचयाकारं अंभोधरमिवोदितम् ॥ १४ ॥
’तात ! पहा, हे सुंदर पर्वत-शिखर उत्तरेच्या बाजूने कापलेल्या कोळशाच्या राशीप्रमाणे तसेच एकत्र जमलेल्या ढगांच्या समुदायाप्रमाणे काळे दिसत आहे. ॥१४॥
दक्षिणस्यामपि दिशि स्थितं श्वेतमिवाम्बरम् ।
कैलासशिखरप्रख्यं नानाधातुविराजितम् ॥ १५ ॥
’याच प्रकारे दक्षिण दिशेला याचे जे शिखर आहे ते श्वेत वस्त्र आणि कैलासशृंगासमान श्वेत दिसत आहे. नाना प्रकारच्या धातु त्याची शोभा वाढवीत आहेत. ॥१५॥
प्राचीनवाहिनीं चैव नदीं भृशमकर्दमाम् ।
गुहायाः परतः पश्य त्रिकूटे जाह्नवीमिव ॥ १६ ॥
’ते पहा, या गुफेच्या दुसर्‍या बाजूस त्रिकूट पर्वतासमीप वहाणार्‍या मंदाकिनी समान तुंगभद्रा नदी वहात आहे. तिची धारा (प्रवाह) पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. त्यात चिखलाचे नाव सुद्धा नाही. ॥१६॥
चंदनैःस्तिलकैः सालैः तमालैरतिमुक्तकैः ।
पद्मकैः सरलैश्चैव अशोकैश्चैव शोभिताम् ॥ १७ ॥
’चंदन, तिलक, साल, तमाल, अतिमुक्तक, पद्मक, सरल आणि शोक आदि नाना प्रकारच्या वृक्षांनी त्या नदीची कशी शोभा दिसत आहे ? ॥१७॥
वानीरैस्तिमिदैश्चैव बकुलैः केतकैरपि ।
हिन्तालैस्तिनिशैर्नीपैः वेतसैः कृतमालकैः ॥ १८ ॥

तीरजैः शोभिता भाति नानारूपैस्ततस्ततः ।
वसनाभरणोपेता प्रमदेवाभ्यलंकृता ॥ १९ ॥
’जलवेत, तिमिद, बकुल, केतकी, हिन्ताल, तिनिश, नीप, स्थलवेत, कृतमाल (अमिलतास) आदि निरनिराळ्या तटवर्ती वृक्षांनी जेथे तेथे सुशोभित झालेली ही नदी वस्त्रे, आभूषणे यांनी विभूषित शृगांरसज्जित युवती स्त्रीसमान भासत आहे. ॥१८-१९॥
शतशः पक्षिसङ्‌घैरश्च नानानादविनादिता ।
एकैकमनुरक्तैश्च चक्रवाकैरलङ्‌कृ्ता ॥ २० ॥
’शेकडो पक्षीसमूहांनी संयुक्त झालेली ही नदी त्यांच्या नानाप्रकारच्या कलरवांनी गुंजत राहात आहे. परस्परावर अनुरक्त असलेले चक्रवाक या सरितेची शोभा वाढवीत आहेत. ॥२०॥
पुलिनैरतिरम्यैश्च हंससारससेविता ।
प्रहसत्येव भात्येषा नाना रत्‍नbसमन्विता ॥ २१ ॥
’अत्यंत रमणीय तटांनी अलंकृत, नाना प्रकारच्या रत्‍नांनी संपन्न तसेच हंस आणि सारसांनी सेवित ही नदी आपली हास्यछटा विखरून टाकीत असल्यासारखी वाटत आहे. ॥२१॥
क्वचिन्नीलोत्पलच्छन्ना भाति रक्तोत्पलैः क्वचित् ।
क्वचिदाभाति शुक्लैश्च दिव्यैः कुमुदकुड्मलैः ॥ २२ ॥
’काही ठिकाणी ही नील-कमलांनी झाकली गेली आहे; काही ठिकाणी लाल कमलांनी सुशोभित झाली आहे आणि काही ठिकाणी श्वेत तसेच दिव्य कुमुदकलिकांनी शोभा प्राप्त करीत आहे. ॥२२॥
पारिप्लवशतैर्जुष्टा बर्हिक्रौञ्चविनादिता ।
रमणीया नदी सौम्य मुनिसङ्‌घ निषेविता ॥ २३ ॥
’शेकडो जलपक्ष्यांनी सेवित तसेच मोर आणि क्रौंच यांच्या कलरवाने मुखरित झालेली ही सौम्य नदी फारच रमणीय प्रतीत होत आहे. मुनींचे समुदाय हिच्या जलाचे सेवन करीत आहेत. ॥२३॥
पश्य चंदनवृक्षाणां पड्क्तीः सुरुचिरा इव ।
ककुभानां च दृश्यंते मनसैवोदिताः समम् ॥ २४ ॥
’त्या पहा, अर्जुन आणि चंदन वृक्षांच्या पंक्ति किती सुंदर दिसत आहेत. असे वाटत आहे की जणु मनाच्या संकल्पाबरोबरच या प्रकट झालेल्या आहेत. ॥२४॥
अहो सुरमणीयोऽयं देशः शत्रुनिषूदन ।
दृढं रंस्याव सौमित्रे साध्वत्र निवसावहे ॥ २५ ॥
’शत्रुसूदन सौमित्रा ! हे स्थान अत्यंत रमणीय आणि अद्‌भुत आहे. येथे आपले मन खूप रमेल, म्हणून येथेच राहाणे ठीक होईल. ॥२५॥
इतश्च नातिदूरे सा किष्किंधा चित्रकानना ।
सुग्रीवस्य पुरी रम्या भविष्यति नृपात्मज ॥ २६ ॥
’राजकुमार ! विचित्र काननांनी सुशोभित सुग्रीवाची रमणीय किष्किंधापुरीही येथून जास्त दूर असणार नाही. ॥२६॥
गीतवादित्रनिर्घोषः श्रूयते जयतां वर ।
नर्दतां वानराणां च मृदङ्‌गााडंबरैः सह ॥ २७ ॥
’विजयी वीरात श्रेष्ठ लक्ष्मणा ! मृदुंगाच्या मधुर ध्वनि बरोबरच गर्जत असलेल्या वानरांच्या गीत आणि वाद्यांचा गंभीर घोष ऐकू येत आहे. ॥२७॥
लब्ध्वा भार्यां कपिवरः प्राप्य राज्यं सुहृद्‌वृतः ।
ध्रुवं नंदति सुग्रीवः संप्राप्य महतीं श्रियम् ॥ २८ ॥
’निश्चितच कपिश्रेष्ठ सुग्रीव आपली पत्‍नी मिळाल्याने, राज्य हस्तगत झाल्याने आणि फार मोठ्या लक्ष्मीवर अधिकार प्राप्त करून सुहृदांसह आनंदोत्सव साजरा करीत आहे.’ ॥२८॥
इत्युक्त्वा न्यवसत् तत्र राघवः सहलक्ष्मणः ।
बहुदृश्यदरीकुञ्जे तस्मिन् प्रस्रवणे गिरौ ॥ २९ ॥
असे म्हणून राघव लक्ष्मणासह त्या प्रस्त्रवण पर्वतावर, जेथे बर्‍याचशा कंदरांचे आणि कुंजांचे दर्शन होत होते, निवास करू लागले. ॥२९॥
सुसुखेपि बहुद्रव्ये तस्मिन् हि धरणीधरे ।
वसतस्तस्य रामस्य रतिरल्पापि नाभवत् ॥ ३० ॥

हृतां हि भार्यां स्मरतः प्राणेभ्यो ऽपि गरीयसीम् ।
यद्यपि त्या पर्वतावर परम सुख प्रदान करणारी बरीचशी फुले फळे आदि आवश्यक पदार्थ होते तथापि राक्षसद्वारा हरण केल्या गेलेल्या प्राणांहूनही अधिक प्रिय आदरणीय सीतेचे स्मरण करीत असतां भगवान् रामांना तेथे थोडे सुद्धा सुख मिळत नव्हते. ॥३० १/२॥
उदयाभ्युदितं दृष्ट्‍वा शशाङ्‌कंर च विशेषतः ॥ ३१ ॥

आविवेश न तं निद्रा निशासु शयनं गतम् ।
विशेषतः उदयाचलावर उदित झालेल्या चंद्राचे दर्शन करून रात्री शय्येवर पडल्यावरही त्यांना झोप येत नसे. ॥३१ १/२॥
तत्समुत्थेन शोकेन बाष्पोपहतचेतसम् ॥ ३२ ॥

तं शोचमानं काकुत्स्थं नित्यं शोकपरायणम् ।
तुल्यदुःखोऽब्रवीद्‌भ्राकता लक्ष्मणोऽनुनयन् वचः ॥ ३३ ॥
सीतेच्या वियोगजनित शोकाने अश्रु ढाळीत असता ते अचेत होऊन जात. श्रीरामांना निरंतर शोकमग्न होऊन चिंता करतांना पाहून त्यांच्या दुःखात समानरूपाने भाग घेणार्‍या भाऊ लक्ष्मणाने त्यांना विनयपूर्वक म्हटले- ॥ ३२-३३॥
अलं वीर व्यथां गत्वा न त्वं शोचितुमर्हसि ।
शोचतो ह्यवसीदंति सर्वार्था विदितं हि ते ॥ ३४ ॥
’वीरा ! या प्रकारे व्यथित होण्याने काही लाभ होणार नाही. म्हणून आपण शोक करता कामा नये; कारण शोक करणार्‍या पुरुषाचे सर्व मनोरथ नष्ट होऊन जातात, ही गोष्ट आपल्याला माहीतच आहे. ॥३४॥
भवान् क्रियापरो लोके भवान् दैवपरायणः ।
आस्तिको धर्मशीलश्च व्यवसायी च राघव ॥ ३५ ॥
’राघवा ! आपण जगतात कर्मनिष्ठ - वीर तसेच देवतांचा समादर करणारे आहात. आस्तिक, धर्मात्मा आणि उद्योगी आहात. ॥३५॥
न ह्यव्यवसितः शुत्रुं राक्षसं तं विशेषतः ।
समर्थस्त्वं रणे हंतुं विक्रमैर्जिह्मकारिणम् ॥ ३६ ॥
’जर आपण शोकवश उद्यम सोडून बसत आहात तर पराक्रमाच्या स्थानस्वरूप समरांगणात कुटिल कर्म करणार्‍या त्या शत्रुचा जो विशेषतः राक्षस आहे, वध करण्यास समर्थ होऊ शकणार नाही. ॥३६॥
समुन्मूलय शोकं त्वं व्यवसायं स्थिरी कुरु ।
ततः सपरिवारं तं राक्षसं हंतुमर्हसि ॥ ३७ ॥
म्हणून आता आपण आपल्या शोकास मूळापासून उपटून टाकावे. आणि उद्योगाच्या विचारास सुस्थिर करावे. तेव्हा आपण परिवारासहित त्या राक्षसाचा विनाश करू शकता. ॥३७॥
पृथिवीमपि काकुत्स्थ ससागरवनाचलाम् ।
परिवर्तयितुं शक्तः किं पुनस्तं हि रावणम् ॥ ३८ ॥
’काकुत्स्थ ! आपण तर समुद्र, वन आणि पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वीला उलटवू शकता, मग त्या रावणाचा संहार करणे ही आपल्यासाठी काय मोठी गोष्ट आहे ? ॥३८॥
शरत्कालं प्रतीक्षस्व प्रावृट्कालोऽयमागतः ।
ततः सराष्ट्रं सगणं रावणं त्वं वधिष्यसि ॥ ३९ ॥
हा वर्षाकाल आला आहे आता शरद ऋतुची प्रतीक्षा करावी. नंतर राज्य आणि सेनेसह रावणाचा वध करावा. ॥३९॥
अहं तु खलु ते वीर्यं प्रसुप्तं प्रतिबोधये ।
दीप्तैराहुतिभिः काले भस्मच्छन्नमिवानलम् ॥ ४० ॥
जसे राखेत लपलेला अग्नि हवनकाळी आहुतीद्वारा प्रज्वलित केला जातो, त्या प्रकारे मी आपल्या झोपी गेलेल्या पराक्रमाला जागे करीत आहे- विसरलेल्या बल-विक्रमांची आठवण करून देत आहे.’ ॥४०॥
लक्ष्मणस्य तु तद्वाक्यं प्रतिपूज्य हितं शुभम् ।
राघवः सुहृदं स्निग्धं इदं वचनमब्रवीत् ॥ ४१ ॥
लक्ष्मणाच्या या शुभ आणि हितकर वचनांची प्रशंसा करून राघव आपला स्नेही, सुहृद सौमित्रास या प्रकारे बोलले- ॥४१॥
वाच्यं यदनुरक्तेन स्निग्धेन च हितेन च ।
सत्यविक्रमयुक्तेन तदुक्तं लक्ष्मण त्वया ॥ ४२ ॥
’लक्ष्मणा ! अनुरागी, स्नेही, हितैषी, आणि सत्यपराक्रमी वीराने जशी गोष्ट सांगावयास हवी तशीच तुम्ही सांगितलेली आहे. ॥४२॥
एष शोकः परित्यक्तः सर्वकार्यावसादकः ।
विक्रमेष्वप्रतिहतं तेजः प्रोत्साहयाम्यहम् ॥ ४३ ॥
’घ्या, सर्व प्रकारे कार्य बिघडविणार्‍या शोकाचा मी त्याग केला आहे. आता मी माझ्यातील पराक्रमविषयक दुर्धर्ष तेजाला प्रोत्साहित करीत आहे. ॥४३॥
शरत्कालं प्रतीक्षिष्ये स्थितोऽस्मि वचने तव ।
सुग्रीवस्य नदीनां च प्रसादमनुपालयन् ॥ ४४ ॥
’तुझे म्हणणे मी मान्य करतो. सुग्रीवाने प्रसन्न होऊन सहायता करण्याची आणि नद्यांचे जल स्वच्छ होण्याची वाट पहात मी शरत्कालाची प्रतीक्षा करीन. ॥४४॥
उपकारेण वीरस्तु प्रतिकारेण युज्यते ।
अकृतज्ञोऽप्रतिकृतो हंति सत्त्ववतां मनः ॥ ४५ ॥
’जो वीर पुरुष कुणाच्या उपकाराने उपकृत होत असतो तो प्रत्युपकार करून त्याची परतफेड अवश्य करतो, परंतु जर कुणी उपकार न मानता अथवा विसरून प्रत्युपकारापासून तोंड फिरवतो तो शक्तीशाली श्रेष्ठ पुरुषांच्या मनास दुःख पोहोंचवीत असतो. ॥४५॥
अथैवमुक्तः प्रणिधाय लक्ष्मणः
कृताञ्जलिस्तत् प्रतिपूज्य भाषितम् ।
उवाच रामं स्वभिरामदर्शनं
प्रदर्शयन् दर्शनमात्मनः शुभम् ॥ ४६ ॥
श्रीरामांचे हे वचन युक्तियुक्तच आहे असे मानून लक्ष्मणांनी त्यांची भरपूर प्रशंसा केली आणि दोन्ही हात जोडून आपल्या शुभ दृष्टीचा परिचय देत ते नयनाभिराम रामांना याप्रकारे बोलले- ॥४६॥
यथोक्तमेतत् तव सर्वमीप्सितं
नरेंद्र कर्ता नचिरात् तु वानरः ।
शरत् प्रतीक्षः क्षमतामिमं भवान्
जलप्रपातं रिपुनिग्रहे धृतः ॥ ४७ ॥
’नरेश्वर ! जसे की आपण म्हटले आहे, वानरराज सुग्रीव शीघ्रच आपला हा मनोरथ सिद्ध करतील. म्हणून आपण शत्रुचा संहार करण्याचा दृढ निश्चय करून शरत्काळाची प्रतीक्षा करावी आणि या वर्षाकाळाच्या विलंबास सहन करावे. ॥४७॥
नियम्य कोपं प्रतिपाल्यतां शरत्
क्षमस्व मासांश्चतुरो मया सह ।
वसाचलेऽस्मिन् मृगराजसेविते
संवर्धयन् शत्रुवधे समुद्यमम् ॥ ४८ ॥
’क्रोधाला काबूत ठेवून शरत्काळाची वाट पहावी. पावसाळ्याच्या चार महिन्याचे जे काही कष्ट असतील ते सहन करावे; तसेच शत्रुवधास समर्थ असूनही हा वर्षाकाळ व्यतीत करीत माझ्यासह या सिंहसेवित पर्वतावर निवास करावा. ॥४८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सत्ताविसावा सर्ग पूरा झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP