[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रयोविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भयंकरानुत्पातान् दृष्टवापि तानचिंतयित्वा खरस्य राक्षससेनायाश्च श्रीरामस्याश्रमसमीपे गमनम् -
भयंकर उत्पातांना पाहून ही खराने त्यांची पर्वा न करणे तसेच राक्षस सेनेचे श्रीरामाच्या आश्रमाच्या समीप पोहोंचणे -
तत्प्रयातं बलं घोरमशिवं शोणितोदकम् ।
अभ्यवर्षन्महाघोरस्तुमुलो गर्दभारुणः ॥ १ ॥
ती सेना प्रस्थान करतेवेळी आकाशात गाढवाप्रमाणे धूसर रंगाच्या मेघांचा महाभयंकर समूह घेरून आला, त्याची तुमुल गर्जना होऊ लागली तसेच सैनिकांच्या वर घोर अमंगलसूचक रक्तमय जलाची वृष्टि आरंभ झाली. ॥१॥
निपेतुस्तुरगास्तस्य रथयुक्ता महाजवाः ।
समे पुष्पचिते देशे राजमार्गे यदृच्छया ॥ २ ॥
खराच्या रथाला जुंपलेले महान वेगवान घोडे फुले पसरलेल्या समतलस्थानी रस्त्यावर चालता चालता अकस्मात खाली पडले. ॥२॥
श्यामं रुधिरपर्यन्तं बभूव परिवेषणम् ।
अलातचक्रप्रतिमं परिगृह्य दिवाकरम् ॥ ३ ॥
सूर्यमण्डलाच्या चारी बाजूस अलात चक्राप्रमाणे गोलाकार घेरा दिसून येऊ लागला, ज्याचा रंग काळा आणि कडेचा रंग लाल होता. ॥३॥
ततो ध्वजमुपागम्य हेमदण्डं समुच्छ्रितम् ।
समाक्रम्य महाकायस्तस्थौ गृध्रः सुदारुणः ॥ ४ ॥
त्यानंतर खराच्या रथाच्या सुवर्णमय दण्ड असलेल्या उंच ध्वजेवर एक विशालकाय गिधाड येऊन बसले, जे दिसण्यात फार भयानक होते. ॥४॥
जनस्थानसमीपे तु समाक्रम्य खरस्वनाः ।
विस्वरान् विविधान् नादान् मांसादा मृगपक्षिणः ॥ ५ ॥

व्याजह्रुरभिदीप्तायां दिशि वै भैरवस्वनम् ।
अशिवं यातुधानानां शिवा घोरा महास्वनाः ॥ ६ ॥
कठोर स्वर असणारे मांसभक्षी पशु आणि पक्षी जनस्थानाजवळ येऊन विकृत स्वरात अनेक प्रकारचे विकट शब्द बोलू लागले. तसेच सूर्याच्या प्रभेने प्रकाशित झालेल्या दिशांमध्ये जोरजोराने चीत्कार करणारे आणि तोंडातून आग ओकणारे भयंकर कोल्हे राक्षसांसाठी अमंगलजनक भैरवनाद करू लागले. ॥५-६॥
प्रभिन्नगजसंकाशास्तोयशोणितधारिणः ।
आकाशं तदनाकाशं चक्रुर्भीमांबुवाहकाः ॥ ७ ॥
भयंकर मेघ, जे मदाची धारा वहाविणार्‍या गजराजाप्रमाणे दिसून येत होते आणि जलाच्या जागी रक्त धारण केलेले होते ते तात्काळ घेरून आले त्यांनी संपूर्ण आकाश झाकून टाकले, थोडासा ही अवकाश राहू दिला नाही. ॥७॥
बभूव तिमिरं घोरं उद्धतं रोमहर्षणम् ।
दिशो वा प्रदिशो वापि न च व्यक्तं चकाशिरे ॥ ८ ॥
सर्वत्र अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी दाट अंधकार पसरला. दिशांचे अथवा कोनांचे स्पष्ट रूपाने भान होत नाहीसे झाले होते. ॥८॥
क्षतजार्द्रसवर्णाभा संध्या कालं विना बभौ ।
खरं चाभिमुखं नेदुस्तदा घोर मृगाः खगाः ॥ ९ ॥
अवेळीच रक्तांनी भिजलेल्या वस्त्रासमान रंगाची संध्या प्रकट झाली. त्या समयी भयंकर पशुपक्षी खराच्या समोर येऊन गर्जना करू लागले. ॥९॥
कङ्‌कगोमायुगृध्राश्च चुक्रुशुर्भयशंसिनः ।
नित्याशिवकरा युद्धे शिवा घोरनिदर्शनाः ॥ १० ॥

नेदुर्बलस्याभिमुखं ज्वालोद्‌गारिभिराननैः ।
भयाची सूचना देणारी कंक (पांढरी घार), कोल्हे आणि गिधाडे खराच्या समोर येऊन चित्कार करू लागले. युद्धात सदा अमंगल सूचित करणार्‍या आणि भय दाखविणार्‍या कोल्ह्यांच्या माद्या खराच्या सेने समोर येऊन आग ओकणार्‍या तोडांने घोर शब्द करू लागल्या. ॥१० १/२॥
कबन्धः परिघाभासो दृश्यते भास्करान्तिके ॥ ११ ॥

जग्राह सूर्यं स्वर्भानुरपर्वणि महाग्रहः ।
प्रवाति मारुतः शीघ्रं निष्प्रभोऽभूद् दिवाकरः ॥ १२ ॥
सूर्याच्या जवळ परिधा प्रमाणे कबंध (शिरकापलेले धड) दिसून येऊ लागले. महान ग्रह राहु अमावस्या नसतांनाच सूर्याला ग्रासू लागला. वारा तीव्र गतीने वाहू लागला तसेच सूर्यदेवाची प्रभा फिकी पडली. ॥११-१२॥
उत्पेतुश्च विना रात्रिं ताराः खद्योतसप्रभाः ।
संलीनमीनविहगा नलिन्यः शुष्कपङ्‌कजाः ॥ १३ ॥
रात्र नसतांनाच काजव्यांप्रमाणे चमकणारे तारे आकाशात उदित झाले. सरोवरात मासे आणि जलपक्षी विलीन होऊन गेले. त्यांतील कमळे सुकून गेली. ॥१३॥
तस्मिन् क्षणे बभूवुश्च विना पुष्पफलैर्द्रुमाः ।
उद्धूतश्च विना वातं रेणुर्जलधरारुणः ॥ १४ ॥
त्या क्षणी वृक्षांची फुले आणि फळे गळून गेली. वारा नसतांनाही ढगांप्रमाणे धूसर रंगाची धूळ उंच जाऊन आकाशात पसरली गेली. ॥१४॥
चीचीकूचिति वाश्यन्त्यो बभूवुस्तत्र सारिकाः ।
उल्काश्चापि सनिर्घोषा निपेतुर्घोरदर्शनाः ॥ १५ ॥
तेथे वनातील सारिका चीं चीं करू लागल्या. मोठा आवाज करीत आकाशांतून भयानक उल्का पृथ्वीवर येऊन पडून लागल्या. ॥१५॥
प्रचचाल मही चापि सशैलवनकानना ।
खरस्य च रथस्थस्य नर्दमानस्य धीमतः ॥ १६ ॥

प्राकम्पत भुजः सव्यः स्वरश्चास्यावसज्जत ।
सास्रा संपद्यते दृष्टिः पश्यमानस्य सर्वतः ॥ १७ ॥
पर्वत, वने आणि काननांसहित पृथ्वी डोलू लागली. बुद्धिमान खर रथात बसून गर्जना करीत होता. त्या समयी त्याची डावी भुजा एकाएकी कापू लागली, स्वर अवरूद्ध झाला आणि सर्व बाजूस पहात असता त्याच्या डोळ्यात अश्रु येऊ लागले. ॥१६-१७॥
ललाटे च रुजो जाता न च मोहान्न्यवर्तत ।
तान् समीक्ष्य महोत्पातानुत्थितान् रोमहर्षणान् ॥ १८ ॥

अब्रवीद् राक्षसान् सर्वान् प्रहसन् स खरस्तदा ।
त्याचे डोके भयंकर दुखू लागले. तरी ही मोहवश तो युद्धापासून निवृत्त झाला नाही. त्या समयी प्रकट झालेल्या त्या मोठ मोठ्या रोमांचकारी उत्पातांना पाहून खर जोरजोराने हसू लागला आणि समस्त राक्षसांना म्हणाला - ॥१८ १/२॥
महोत्पातानिमान् सर्वानुत्थितान् घोरदर्शनान् ॥ १९ ॥

न चिन्तयाम्यहं वीर्याद् बलवान् दुर्बलानिव ।
तारा अपि शरैस्तीक्ष्णैः पातयामि नभस्थलात् ॥ २० ॥
’हे जे भयानक दिसणारे मोठ मोठे उत्पात प्रकट होत आहेत, त्या सर्वांची मी आपल्या बळाच्या भरवंशावर काहीही पर्वा करीत नाही. ज्या प्रमाणे बलवान वीर दुर्बल शत्रुंना काहीही गणत नाही (त्या प्रमाणे मी त्यांना तुच्छ लेखतो. मी आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारे आकाशांतून तारकांनाही खाली पाडू शकतो.’ ॥१९-२०॥
मृत्युं मरणधर्मेण संक्रुद्धो योजयाम्यहम् ।
राघवं तं बलोत्सिक्तं भ्रातरं चास्य लक्ष्मणम् ॥ २१ ॥

अहत्वा सायकैस्तीक्ष्णैर्नोपावर्तितुमुत्सहे ।
’जर मी कुपित झालो तर मृत्युलाही मरणाच्या मुखात घालू शकतो. आज बळाची घमेंड बाळगणारे राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांना तीक्ष्ण बाणांनी मारल्या शिवाय मी परत जाऊ शकत नाही.’ ॥२१ १/२॥
यन्निमित्तं तु रामस्य लक्ष्मणस्य विपर्ययः ॥ २२ ॥

सकामा भगिनी मेऽस्तु पीत्वा तु रुधिरं तयोः ।
’जिला दण्ड देण्याचा विपरित विचार राम आणि लक्ष्मणाच्या (क्रूरतापूर्ण कर्म करण्याचा भाव) बुद्धित उदय पावला आहे, ती माझी बहीण शूर्पणखा त्या दोघांचे रक्त पिऊन सफल मनोरथ होऊन जावो.’ ॥२२ १/२॥
न क्वचित् प्राप्तपूर्वो मे संयुगेषु पराजयः ॥ २३ ॥

युष्माकमेतत् प्रत्यक्षं नानृतं कथयाम्यहम् ।
’आजपर्यंत जितकी युद्धे झाली आहेत, त्यातील कुठल्याही युद्धात पूर्वी माझा कधी पराजय झालेला नाही, हे तुम्ही लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. मी खोटे बोलत नाही.’ ॥२३ १/२॥
देवराजमपि क्रुद्धो मत्तैरावतगामिनम् ॥ २४ ॥

वज्रहस्तं रणे हन्यां किं पुनस्तौ च मानवौ ।
’मी मत्त ऐरावतावरुन जाणार्‍या वज्रधारी देवराज इंद्रालाही रणभूमीत कुपित होऊन कालाच्या मुखात घालू शकतो, मग त्या दोन मनुष्यांची तर गोष्ट कशाला ?’ ॥२४ १/२॥
सा तस्य गर्जितं श्रुत्वा राक्षसानां महाचमूः ॥ २५ ॥

प्रहर्षमतुलं लेभे मृत्युपाशावपाशिता ।
खराची हि गर्जना ऐकून राक्षसांची ती विशाल सेना, जी मृत्युच्या पाशात बांधली गेलेली होती, अनुपम हर्षाने भरून गेली. ॥२५ १/२॥
समेयुश्च महात्मानो युद्धदर्शनकाङ्‌क्षिणः ॥ २६ ॥

ऋषयो देवगन्धर्वाः सिद्धाश्च सह चारणैः ।
समेत्य चोचुः सहितास्तेऽन्योन्यं पुण्यकर्मणः ॥ २७ ॥
त्या समयी युद्ध पहाण्याची इच्छा असलेले बरेचसे पुण्यकर्म करणारे महात्मा, ऋषि, देवता, सिद्ध आणि चारण तेथे एकत्र झाले. एकत्र होऊन ते सर्व मिळून एक दुसर्‍यास म्हणू लागले- ॥२६-२७॥
स्वस्ति गोब्राह्मणेभ्यस्तु लोकानां ये च सम्मताः ।
जयतां राघवो युद्धे पौलस्त्यान् रजनीचरान् ॥ २८ ॥

चक्रहस्तो यथा विष्णुः सर्वानसुरसत्तमान् ।
’गायी आणि ब्राह्मणांचे कल्याण होवो. तसेच जे अन्य लोकप्रिय महात्मे आहेत ते ही कल्याणाचे भागी होवोत. ज्या प्रमाणे चक्रधारी भगवान विष्णु समस्त असुर-शिरोमणींना परास्त करून टाकतात त्याच प्रमाणे राघव श्रीराम युद्धात या पुलत्स्यवंशी निशाचरांना परास्त करोत.’ ॥२८ १/२॥
एतच्चान्यच्च बहुशो ब्रुवाणाः परमर्षयः ॥ २९ ॥

जातकौतूहलास्तत्र विमानस्थाश्च देवताः ।
ददृशुर्वाहिनीं तेषां राक्षसानां गतायुषाम् ॥ ३० ॥
ही आणि आणखीही बरीचशी मंगलकामना सूचक बोलणी बोलत ते महर्षि आणि देवता कुतूहलवश विमानात बसून, ज्यांचे आयुष्य समाप्त होत आले होते त्या राक्षसांच्या त्या विशाल वाहिनीला (सेनेला) पाहू लागले. ॥२९-३०॥
रथेन तु खरो वेगात् सैन्यस्याग्राद् विनिःसृतः ।
श्येनगामी पृथुग्रीवो यज्ञशत्रुर्विहंगमः ॥ ३१ ॥

दुर्जयः करवीराक्षः परुषः कालकार्मुकः ।
हेममाली महामाली सर्पास्यो रुधिराशनः ॥ ३२ ॥

द्वादशैते महावीर्याः प्रतस्थुरभितः खरम् ।
खर रथाच्या द्वारा अत्यंत वेगाने चालून सर्व सेनेच्या पुढे निघून आला आणि श्येनगामी, पृथ्वीग्रीव, यज्ञशत्रु, विहंगम, दुर्जय, करवीराक्ष, परूष, कालकार्मुक, हेममाली, महामाली, सर्पास्य तसेच रूधिराशन - हे बारा महापराक्रमी राक्षस खराला दोन्ही बाजूने घेरून त्याच्या बरोबर चालू लागले. ॥३१-३२ १/२॥
महाकपालः स्थूलाक्षः प्रमाथस्त्रिशिरास्तथा ।
चत्वार एते सेनाग्रे दूषणं पृष्ठतोऽन्वयुः ॥ ३३ ॥
महाकपाल, स्थूलाक्ष, प्रमाथ आणि त्रिशिरा - हे चार राक्षस वीर सेनेच्या पुढे आणि सेनापती दूषणाच्या पाठोपाठ चालत राहिले होते. ॥३३॥
सा भीमवेगा समराभिकाङ्‌क्षिणी
सुदारुणा राक्षसवीरसेना ।
तौ राजपुत्रौ सहसाभ्युपेता
माला ग्रहाणामिव चन्द्रसूर्यौ ॥ ३४ ॥
राक्षस- वीरांची ती भयंकर वेगवान अत्यंत दारूण सेना, जी युद्धाच्या अभिलाषेने येत होती, एकाएकी त्या दोन्ही राजकुमाराजवळ- श्रीराम आणि लक्ष्मणाजवळ येऊन पोहोंचली, जणु काय ग्रहांची पंक्ति चंद्रमा आणि सूर्याच्या समीप प्रकाशित होऊन राहिली होती. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा तेविसावा सर्ग पूरा झाला. ॥२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP