[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षड्‌विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण दूषणसहितानां चतुर्दशसहस्रराक्षसानां वधः -
श्रीरामांच्या द्वारा दूषणासहित चौदा हजार राक्षसांचा वध -
दूषणस्तु स्वकं सैन्यं हन्यमानं विलोक्य सः ।
संदिदेश महाबाहुrभीमवेगान् दुरासदान् ॥ १ ॥

राक्षसान् पञ्च साहस्रान् समरेष्वनिवर्तिनः ।
महाबाहु दूषणाने जेव्हा पाहिले की माझी सेना वाईट रीतीने मारली जात आहे तेव्हा त्याने युद्धात माघार न घेणार्‍या भयंकर वेगवान पाच हजार राक्षसांना, ज्यांना जिंकणे अत्यंत कठीण होते, पुढे जाण्याची आज्ञा दिली. ॥१ १/२॥
ते शूलैः पट्टिशैः खड्गैः शिलावर्षेर्द्रुमैरपि ॥ २ ॥

शरवर्षैरविच्छिन्नं ववृषुस्तं समन्ततः ।
ते श्रीरामांवर चोहोबाजूंनी शूल, पट्टिश, तलवार, दगड, वृक्ष आणि बाणांची निरंतर वृष्टि करू लागले. ॥२ १/२॥
तद् द्रुमाणां शिलानां च वर्षं प्राणहरं महत् ॥ ३ ॥

प्रतिजग्राह धर्मात्मा राघवस्तीक्ष्णसायकैः ।
हे पाहून धर्मात्मा राघवांनी वृक्ष आणि शिलांच्या त्या प्राणहारिणी वृष्टीला आपल्या तीक्ष्ण बाणांनी रोखून धरले. ॥३ १/२॥
प्रतिगृह्य च तद्वर्षं निमीलित इवर्षभः ॥ ४ ॥

रामः क्रोधं परं लेभे वधार्थं सर्वरक्षसाम् ।
त्या भारी वर्षावाला रोखल्यावर डोळे मिटून वळूप्रमाणे अविचल उभ्या असलेल्या श्रीरामांनी समस्त राक्षसांच्या वधासाठी महान क्रोध धारण केला. ॥४ १/२॥
ततः क्रोधसमाविष्टः प्रदीप्त इव तेजसा ॥ ५ ॥

शरैरभ्यकिरत् सैन्यं सर्वतः सहदूषणम् ।
क्रोधाने युक्त आणि तेजाने उद्दीप्त श्रीरामांनी दूषणासहित सार्‍या राक्षससेनेवर चहूकडून बाणांची वृष्टी करण्यास आरंभ केला. ॥५ १/२॥
ततः सेनापतिः क्रुद्धो दूषणः शत्रुदूषणः ॥ ६ ॥

शरैरशनिकल्पैस्तं राघवं समवारयत् ।
यामुळे शत्रुदूषण सेनापति दूषणास फार क्रोध आला आणि त्याने वज्रासमान बाणांनी श्रीरामचंद्रांना रोखले. ॥६ १/२॥
ततो रामः सुसंक्रुद्धः क्षुरेणास्य महद् धनुः ॥ ७ ॥

चिच्छेद समरे वीरश्चतुर्भिश्चतुरो हयान् ।
हत्वा चाश्वाञ्शरैस्तीक्ष्णैरर्धचन्द्रेण सारथेः ॥ ८ ॥

शिरो जहार तद्‌रक्षस्त्रिभिर्विव्याध वक्षसि ।
तेव्हा अत्यंत कुपित झालेल्या वीर रामांनी समराङ्‌गणात क्षुर नामक बाणाने दूषणाचे विशाल धनुष्य तोडून टाकले आणि चार तीक्ष्ण सायकांनी त्याच्या चारी घोड्यांना ठार मारून एका अर्धचंद्राकार बाणाने सारथ्याचेही मस्तक उडविले. तसेच तीन बाणांनी त्या राक्षसाच्या छातीवरही जखम केली. ॥७-८ १/२॥
स च्छिन्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथिः ॥ ९ ॥

जग्राह गिरिशृङ्‌गाभं परिघं रोमहर्षणम् ।
वेष्टितं काञ्चनैः पट्टैर्देवसैन्याभिमर्दनम् ॥ १० ॥
धनुष्य तुटल्यावर आणि घोडे आणि सारथी मारले गेल्यावर रथहीन झालेल्या दूषणाने पर्वत शिखराप्रमाणे एक रोमांचकारी परिध हातात घेतला. ज्याच्यावर सोन्याचे पत्र मढविलेले होते आणि जो परिध देवतांच्या सेनेला चिरडून टाकणारा होता. ॥९-१०॥
आयसैः शङ्‌कुभिस्तीक्ष्णैः कीर्णं परवसोक्षितम् ।
वज्राशनिसमस्पर्शं परगोपुरदारणम् ॥ ११ ॥
त्यावर चारी बाजूस लोखंडाचे खिळे लावलेले होते. तो शत्रुच्या चरवीने लडबडलेला होता. त्याचा स्पर्श हिरा अथवा वज्र यांच्या प्रमाणे कठोर आणि असह्य होता. तो शत्रूंच्या नगरद्वाराला विदीर्ण करण्यास समर्थ होता. ॥११॥
तं महोरगसंकाशं प्रगृह्य परिघं रणे ।
दूषणोऽभ्यपतद् रामं क्रूरकर्मा निशाचरः ॥ १२ ॥
रणभूमीवर फार मोठ्या सर्पाप्रमाणे भयंकर अशा त्या परिधाला हातात घेऊन तो क्रूरकर्मा निशाचर दूषण श्रीरामांवर तुटून पडला. ॥१२॥
तस्याभिपतमानस्य दूषणस्य च राघवः ।
द्वाभ्यां शराभ्यां चिच्छेद सहस्ताभरणौ भुजौ ॥ १३ ॥
त्याला आपल्यावर आक्रमण करतांना पाहून श्रीरामचंद्रांनी दोन बाणांनी आभूषणांसहित त्याच्या दोन्ही भुजा तोडून टाकल्या. ॥१३॥
भ्रष्टस्तस्य महाकायः पपात रणमूर्धनि ।
परिघश्छिन्नहस्तस्य शक्रध्वज इवाग्रतः ॥ १४ ॥
युद्धाच्या सुरूवातीलाच ज्याच्या दोन्ही भुजा तोडल्या गेल्या होत्या, त्या दूषणाच्या हातून घसरून तो विशालकाय परिध इंद्रध्वजा प्रमाणे समोर पडला. ॥१४॥
कराभ्यां च विकीर्णाभ्यां पपात भुवि दूषणः ।
विषाणाभ्यां विशीर्णाभ्यां मनस्वीव महागजः ॥ १५ ॥
ज्याप्रमाणे दोन्ही दात उपटले गेल्यावर महान मनस्वी गजराज त्यांच्याच बरोबर धराशायी होऊन जातो त्या प्रकारे तुटून पडलेल्या आपल्या भुजांच्या समवेतच दूषणही पृथ्वीवर कोसळला. ॥१५॥
दृष्ट्‍वा तं पतितं भूमौ दूषणं निहतं रणे ।
साधुसाध्विति काकुत्स्थं सर्वभूतान्यपूजयन् ॥ १६ ॥
रणभूमीत मारल्या गेलेल्या दूषणाला धराशायी झालेला पाहून समस्त प्राण्यांनी साधु-साधु म्हणून भगवान श्रीरामांची प्रशंसा केली. ॥१६॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धास्त्रयः सेनाग्रयायिनः ।
संहत्याभ्यद्रवन् रामं मृत्युपाशावपाशिताः ॥ १७ ॥

महाकपालः स्थूलाक्षः प्रमाक्षी च महाबलः ।
याच समयी सेनेच्या पुढे चालणारे - महाकपाल, स्थूलाक्ष आणि महाबलाढ्‍य प्रमाथी - हे तीन राक्षस कुपित होऊन मृत्युच्या जाळ्यात फसून संघटित रूपाने श्रीरामांवर तुटून पडले. ॥१७ १/२॥
महाकपालो विपुलं शूलमुद्यम्य राक्षसः ॥ १८ ॥

स्थूलाक्षः पट्टिशं गृह्य प्रमाथी च परश्वधम् ।
राक्षस महाकपालाने एक विशाल शूल उचलला, स्थूलाक्षाने पट्टिश हातात घेतला आणि प्रमाथीने परशु संभाळून आक्रमण केले. ॥१८ १/२॥
दृष्ट्‍वैवापततस्तांस्तु राघवः सायकैः शितैः ॥ १९ ॥

तीक्ष्णाग्रैः प्रतिजग्राह संप्राप्तानतिथीनिव ।
त्या तिघांना आपल्याकडे येतांना पाहून भगवान श्रीरामांनी तीक्ष्ण अग्रभाग असलेल्या टोकदार सायकांनी दारावर आलेल्या अतिथीं प्रमाणे त्यांचे स्वागत केले. ॥१९ १/२॥
महाकपालस्य शिरश्चिच्छेद रघुनन्दनः ॥ २० ॥

असङ्‌ख्येयैस्तु बाणौघैः प्रममाथ प्रमाथिनम् ।
स्थूलाक्षस्याक्षिणी स्थूले पूरयामास सायकैः ॥ २१ ॥
श्रीरघुनंदनाने महाकपालाचे शिर व कपाल उडवून टाकले. प्रमाथीला असंख्य बाणसमूहाने व्याकुळ केले आणि स्थूलाक्षाच्या स्थूल डोळ्यांना सायकांनी भरून टाकले. ॥२०-२१ ॥
स पपात हतो भूमौ विटपीव महाद्रुमः ।
दूषणस्यानुगान् पञ्चसाहस्रान् कुपितः क्षणात् ॥ २२ ॥

हत्वा तु पञ्चसाहस्रैरनयद् यमसादनम् ।
तीन्ही अग्रभागी सैनिकांचा तो समूह अनेक शाखा असलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. त्यानंतर श्रीरामचंद्रांनी कुपित होऊन दूषणाच्या अनुयायी पाच हजार राक्षसांना तितक्या बाणांचे लक्ष्य बनवून क्षणभरात यमलोकात पोहोचविले. ॥२२ १/२॥
दूषणं निहतं श्रुत्वा तस्य चैव पदानुगान् ॥ २३ ॥

व्यादिदेश खरः क्रुद्धः सेनाध्यक्षान् महाबलान् ।
अयं विनिहतः संख्ये दूषणः सपदानुगः ॥ २४ ॥

महत्या सेनया सार्धं युध्वा रामं कुमानुषम् ।
शस्त्रैर्नानाविधाकारैर्हनध्वं सर्वराक्षसाः ॥ २५ ॥
दूषण आणि त्याचे अनुयायी मारले गेले - हे ऐकून खराला फारच क्रोध आला. त्याने आपल्या महाबलाढ्‍य सेनापतींना आज्ञा दिली - वीरानों ! हा दूषण आपल्या सेवकांसहित युद्धात मारला गेला आहे. म्हणून आता तुम्ही सर्व राक्षस फार मोठ्‍या सेनेसहित आक्रमण करून त्या दुष्ट मनुष्य रामाबरोबर युद्ध करा आणि नाना प्रकारच्या शस्त्रांच्या द्वारा त्याचा वध करून टाका. ॥२३-२५॥
एवमुक्त्वा खरः क्रुद्धो राममेवाभिदुद्रुवे ।
श्येनगामी पृथुग्रीवो यज्ञशत्रुर्विहंगमः ॥ २६ ॥

दुर्जयः करवीराक्षः परुषः कालकार्मुकः
हेममाली महामाली सर्पास्यो रुधिराशनः ॥ २७ ॥

द्वादशैते महावीर्या बलाध्यक्षाः ससैनिकाः ।
राममेवाभ्यधावन्त विसृजन्तः शरोत्तमान् ॥ २८ ॥
असे म्हणून कुपित झालेल्या खराने श्रीरामांवरही हल्ला केला. त्याच बरोबर श्येनगामी, पृथुग्रीव, यज्ञशत्रु, विहङ्‌गम, दुर्जय, करवीराक्ष, परूष, कालकार्मुक, हेममाली, महामाली, सर्वास्य तसेच रूधिराशन - हे बारा महापराक्रमी सेनापतिही उत्तम बाणांचा वर्षाव करीत आपल्या सैनिकांसह श्रीरामावरच तुटून पडले. ॥२६-२८॥
ततः पावक संकाशैर्हेमवज्रविभूषितैः ।
जघान शेषं तेजस्वी तस्य सैन्यस्य सायकैः ॥ २९ ॥
तेव्हा तेजस्वी श्रीरामांचद्रांनी सोने आणि हिर्‍यांनी विभूषित अग्नितुल्य तेजस्वी सायकांच्या द्वारा त्या सेनेच्या उरल्या सुरल्या शिपायांचा देखील संहार करून टाकला. ॥२९॥
ते रुक्मपुङ्‌खा विशिखाः सधूमा इव पावकाः ।
निजध्नुस्तानि रक्षांसि वज्रा इव महाद्रुमान् ॥ ३० ॥
जसे वज्र मोठमोठ्‍या वृक्षांना नष्ट करून टाकते त्या प्रकारे धूमयुक्त अग्निसमान प्रतीत होणार्‍या त्या सोन्याचे पंख असणार्‍या बाणांनी त्या समस्त राक्षसांचा विनाश करून टाकला. ॥३०॥
रक्षसां तु शतं रामः शतेनैकेन कर्णिना ।
सहस्रं च सहस्रेण जघान रणमूर्धनि ॥ ३१ ॥
त्या युद्धाच्या तोंडावरच श्रीरामांनी कर्णी नामक शंभर बाणांनी शंभर राक्षसांचा आणि सहस्त्र बाणांनी सहस्त्र निशचरांचा एकाच वेळी संहार करून टाकला. ॥३१॥
तैर्भिन्नवर्माभरणाश्छिन्नभिन्नशरासनाः ।
निपेतुः शोणितादिग्धा धरण्यां रजनीचराः ॥ ३२ ॥
त्या बाणांनी निशाचरांची कवचे, आभूषणे आणि धनुष्ये छिन्न-भिन्न होऊन गेली. तसेच ती रक्तांनी चिंब भिजून पृथ्वीवर पडली. ॥३२॥
तैर्मुक्तकेशैः समरे पतितैः शोणितोक्षितैः ।
आस्तीर्णा वसुधा कृत्स्ना महावेदिः कुशैरिव ॥ ३३ ॥
कुशांनी झाकलेल्या वेदीप्रमाणे युद्धात रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडलेल्या मोकळ्या केसांच्या राक्षसांनी सारी रणभूमी भरून गेली. ॥३३॥
तत्क्षणे तु महाघोरं वनं निहतराक्षसम् ।
बभूव निरयप्रख्यं मांसशोणितकर्दमम् ॥ ३४ ॥
राक्षस मारले गेल्याने त्या समयी तेथे रक्त आणि मांसाचा चिखल सांचला म्हणून ते महाभयंकर वन नरकासमान प्रतीत होऊ लागले. ॥३४॥
चतुर्दशसहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
हतान्येकेन रामेण मानुषेण पदातिना ॥ ३५ ॥
मानवरूपधारी श्रीराम एकटे आणि (वाहनाशिवाय) अनवाणी होते तरीही त्यांनी भयानक कर्म करणार्‍या चौदा हजार राक्षसांना तात्काळ मृत्यु लोकात धाडले. ॥३५॥
तस्य सैन्यस्य सर्वस्य खरः शेषो महारथः ।
राक्षसस्त्रिशिराश्चैव रामश्च रिपुसूदनः ॥ ३६ ॥
त्या संपूर्ण सेनेमध्ये केवळ महारथी खर आणि त्रिशिरा - हे दोनच राक्षस वाचले. तिकडे शत्रुसंहारक भगवान श्रीराम जसेच्या तसेच युद्धासाठी खिळून उभे राहिले होते. ॥३६॥
शेषा हता महावीर्या राक्षसा रणमूर्धनि ।
घोरा दुर्विषहाः सर्वे लक्ष्मणस्याग्रजेन ते ॥ ३७ ॥
उपर्युक्त दोन राक्षसांना सोडून शेष सर्व निशाचर जे महान पराक्रमी, भयंकर आणि दुर्धर्ष होते, युद्धाच्या आरंभीच लक्ष्मणांचे मोठे भाऊ श्रीराम यांच्या हातांनी मारले गेले. ॥३७॥
ततस्तु तद्‌भीमबलं महाहवे
समीक्ष्य रामेण हतं बलीयसा ।
रथेन रामं महता खरस्ततः
समाससादेन्द्र इवोद्यताशनिः ॥ ३८ ॥
त्यानंतर महासमरात महाबलवान श्रीरामांच्या द्वारा आपली भयंकर सेना मारली गेली हे पाहून खर एका विशाल रथाद्वारा श्रीरामांचा सामना करण्यासाठी आला, जणु वज्रधारी इंद्रानेच कुणा शत्रूवर आक्रमण केले असावे. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षड्‌विंशः सर्गः ॥ २६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सव्वीसावा सर्ग पूरा झाला. ॥२६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP