| 
 
 
 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 अरण्यकाण्ड
 ॥  अध्याय बाविसावा ॥  कबंध राक्षसाचा उद्धार
 
 
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
 
पुढें मार्ग क्रमीत असताना लक्ष्मणाला अपशकुन होऊ लागतातः
 
करोनि जतायूद्धरण । श्रीराम आणि लक्षमण ।करावया सीतागवेषण । वनोपवन शोधिती ॥ १ ॥
 वन शोधितां लक्ष्मण । तंव देखता होय अपशकुन ।
 तेणे भयें  कंपायमान । सांगता होय श्रीरामा ॥ २ ॥
 
 
 
लक्ष्मणस्तं महातेजाःसत्यवांश्छीलवाश्छुचिः ।अब्रवित्प्रांजलिर्वाक्यं भ्रातरं दीनचेतसम् ॥ १ ॥
 स्पंदते मे दृढं बाहुरुव्दिग्नमिव मे मनः ।
 प्रायशश्चाप्यनिष्टानि निमित्तान्युपलक्षये ॥ २ ॥
 तत्मात्सज्जोभवार्य त्वं कुरुष्व वचनं मम ।
 ममैव हि निमित्तानि सद्यःशंसन्ति संभ्रमम् ॥ ३ ॥
 
 
 
सौमित्र तेजस्वी महावीर । परनारी सहोदर ।सत्यवादी अति पवित्र । नित्य एकाग्र श्रीरामभजनीं ॥ ३ ॥
 त्यायोनियां धनमान । रामा त्यजोनि श्रीरामभजन ।
 ऐसा सौमित्र अति पावन । अशुभ चिन्ह अनुवादे ॥ ४ ॥
 बाहु स्फुरती दुःखायमान । अशुभ लवती लोचन ।
 तरी श्रीरामा होई सावधान । अति विघ्न दिसताहे ॥ ५ ॥
 सव्य जाती पैं चाष । कुशब्द बोलती वायस ।
 दिग्दाहें कोदले आकाश । दिसे त्रास पशुपक्ष्यां ॥ ६ ॥
 ऐसें देखोनियां चिन्ह । दोघे जाले सावधान ।
 पुढें करावया गमन । तंव दुर्धर विघ्न ओढवलें ॥ ७ ॥
 
 
 
वनस्य तस्य शब्दोऽभूव्दनमापूरयन्निव ।तं शब्दं कांक्षमाणस्तु रामः खड्गी सहानुजः॥४॥
 
 
 
श्रीरामलक्ष्मणांसन्मुख । वनीं जाली महाहाक ।तेणे दुमदुमिले तिन्ही लोक । वनीं वनौक गजबजिले ॥ ८ ॥
 श्वापदें आक्रोशें आरडती । एक दिर्घ स्वरें गर्जती ।
 एक मूर्च्छागत पडती । वृक्ष उन्मुळती समूळीं ॥ ९ ॥
 ऐसे देखोनि दोघे जण । धनुष्यीं सज्जोनियां बाण ।
 वनींचे निर्दाळावया विघ्न । सावधान चालिले ॥ १० ॥
 
 
मार्गात जवळपास कोणीतरी राक्षस असेल तर त्याचे पारिपत्य करुन पुढे जाण्याचा विचार :
 
शुद्ध करावें दंडकारण्य । हे माझी प्रतिज्ञा संपूर्ण ।तरी आधी निरसोनि येथींचें विघ्न । मग गमन पुढे करुं ॥ ११ ॥
 ऐसे बोलोनि श्रीरघुनाथ । विघ्न निरसावया चालिला तेथ ।
 तंव राक्षस अत्यद्भुत । त्या वनांत देखिला ॥ १२ ॥
 
 
 
ददर्श समुहाकायं राक्षसं घोरदर्शनम् ।विवृद्धमशिरोग्रीवं कबंधमुदरे मुखम् ॥ ५ ॥
 घोरौ भुजौ विकुर्वाणमुभौ योगनमायतौ ।
 आकर्षत विकर्षंतंमनेकान्मृगयूथपान् ।
 भक्षयंतं महाघोरानुक्षसींहमृगव्दिजान् ॥ ६ ॥
 
 
तेवढ्यात दीर्घ शरीर, लांबच लांब हात, पोटात मुख व तुटक्या पायांचा असा भयानक प्राणी दिसतो :
 
 
सकंठ मस्तकीं नाहीं शिर । आकाशप्राय दीर्घ शरीर ।उदरोदरीं मुख । दाढा अत्युग्र कराळ ॥ १३ ॥
 धगधगित दोन्ही नयन । अति क्रोधीं निमग्न ।
 आणि तळवटीं भग्नचरण । बैसलें स्थान सोडीना ॥ १४ ॥
 
 
त्याचे भीतिप्रद वर्णन :
 
अति सलंब दोन्ही हात । एकैक बाहु योजनांत ।हात दश दिशा भोंवत । कवळोनि खात पशुपक्षी ॥ १५ ॥
 मत्तमांतंगाचें कळप । मुखामाजी   होती गडप ।
 सिंह व्याघ्र आस्वलें अमुप । मुखीं निक्षेप दों हातीं ॥ १६ ॥
 पक्षी उडतां योजनांत । धरोनि घाली मुखाआंत ।
 पशु वनांतरीं चरत । कवळोनि समस्त मुखीं घाली ॥ १७ ॥
 गांवगांव उंच हात । अखंड गगनांत भोंवत ।
 प्राणी त्यातें न देखत । धरोनि मुखांत स्वयें घाली ॥ १८ ॥
 कबंध दिसे जैसा पर्वत । गुप्त कर भोंवत गगनांत ।
 प्राण्यांचें लक्ष नाहीं तेथ । धरोनि समस्त मुखीं घाली ॥ १९ ॥
 मारावया राम लक्ष्मण । रावणें धाडिले आठ जण ।
 ते राक्षस महाबळिये दारुण । दोघांसी धरोन मारावया ॥ २० ॥
 पुढिले अति गूढ विविनीं । वाट धरोनि मारावया दोनी ।
 आठही निघाले कबंधवनीं ।  तंव तेणे धरोनि भक्षिले ॥ २१ ॥
 कबंधें धरोनि आठही जण । स्वेच्छा केलें त्यांचे  भक्षण ।
 मग पुढे धरावया राम लक्ष्मण । लक्ष लावोन राहिलासे ॥ २२ ॥
 शिरश्चरणरहित मध्य । यालागी नामें तो कबंध ।
 देखोनि राम लक्ष्मण सन्निध । धरावया सिद्ध तो जाला ॥ २३ ॥
 
 
 
कंबधेनातिकायेन समूढौ दीर्घबाहुना ।भ्रातरौ वैरिणा प्राप्तौ कृशप्राणौ महाबलौ ॥ ७ ॥
 वदतं कार्यमिह वां किमर्थं चागतौ युवाम् ।
 इमं देशमनुप्रातौ क्षुधार्तस्येह तिष्ठतः ॥ ८ ॥
 
 
कबंधाच्या कक्षेत आल्याबरोबर राम लक्ष्मणांना ओढण्याचा त्याचा प्रयत्नः
 
त्या दोघांतें लक्षोनी । कबंधें दोनी बाहु पसरोनी ।दोहीं हातीं धरिले दोनी । आवरोनी निजबळें ॥ २४ ॥
 त्यांचें करावया भक्षण । कबंध ओढी रघुनंदन लक्ष्मण ।
 तंव श्रीराम ओढेना अणुप्रमाण । देखोनि आपण साशंक ॥ २५ ॥
 
 
परंतु श्रीरामांना ओढता न आल्याने जिज्ञासा :
 
मज कबंधाची निजशक्ती । आतां दोन्ही माणसें न ओढवती ।तरी यांचे ठायीं दुर्धर शक्ती । याची कुळवृत्ति पुसों पां  ॥ २६ ॥
 तुम्ही कोणाचे पैं कोण । आणि येथें यावया काय कारण ।
 या ठाया जे आलेति जाण । मुख्य भक्षण तें माझें ॥ २७ ॥
 
 
कबंधाचा पुनः आवळन्यास प्रारंभ :
 
तंव रामासी म्हणे लक्ष्मण । राक्षसें लाविले दृढ बंधन ।बळें सुटका नव्हे जाण । काय आपण करावें ॥ २८ ॥
 राम म्हणे लागल्या दृढबंधन । तरी आपणा सोडवावें आपण ।
 दुज्याची करी जो आस जाण । हीन दीन तो नपुंसक ॥ २९ ॥
 सौमित्रा ऐकें सावचित्त । याचा पुसूंदे वृत्तात ।
 मग याचा करीन घात । न लागतां येथ क्षणमात्र ॥ ३० ॥
 कबंध म्हने जरी न सांगतां वृत्तांत । तरी मी तुमचा करीन घात ।
 मग हांसोनियां श्रीरघुनाथ । निजवृत्तांत सांगत ॥ ३१ ॥
 
 
श्रीराम स्वतःचा वृत्तांत कबंधाला सांगतात :
 
अरे मी दाशरथि रघुनंदन । रावणें केले सीता हरण ।तिचे करावया गवेषण । दोघे जण येथें आलों ॥ ३२ ॥
 तव दीर्घबाहु निमग्नवदन । विक्राळरुपी कैचा कोण ।
 मार्ग रोधावया काय कारण । निजलक्ष्मण मज सांगें ॥ ३३ ॥
 हेंचि माझें निजवृत्त । तूं म्हणसील भक्षावें म्या येथ ।
 बाहुबळें आकर्षित । दोघे मुखांत घालावया ॥ ३४ ॥
 कबंध अति क्रोधानळीं । दोघांतें ओढी सबळ बळी ।
 बाहु उखळूं पाहती समुळीं । परी बंधूंची जाळी ओढेना ॥ ३५ ॥
 तंव लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । हा तंव पेटला निजघाता ।
 तरी यासी वधावें शीघ्रता । विलंब आतां करुं नये ॥ ३६ ॥
 
 
त्याचे बाहू कापण्याची लक्ष्मणाला आज्ञा :
 
श्रीराम सांगे आपण । यासी तंव नाहींत चरण ।बाहुबळें हा सबळ पूर्ण । त्या आपण छेदाव्या ॥ ३७ ॥
 आम्हां दोघातें धरोनि  येथे । याचे यानें गोविले हात ।
 तरी भुजा छेदोनि येथ । सावचित्त निजखर्गें ॥ ३८ ॥
 
 
 
दक्षिणो दक्षिणं बाहुमासक्तमसिना ततः ।चिच्छेद रामो वेगेन सव्यं विरस्तु लक्ष्मणः ॥ ९ ॥
 स पपात महाबाहुश्छिन्नबाहुर्महास्वनः ।
 खं च गां च दिशश्वैव नादयज्जलदो यथा ॥ १० ॥
 स निकृत्तौ भुजौ दृष्टवा शोनितौघपरिप्लुतः ।
 दिनःपप्रच्छतौ वीरो कौ युवामिति दानवः ॥ ११ ॥
 
 
 
खर्ग काढोनिं सावचित्त । श्रीरामें छेदिला दक्षिण हस्त ।आणि लक्ष्मणें  त्याचि क्षणांत । वाम हस्त छेकिला ॥ ३९ ॥
 भुजा छेदिल्या महा थोर । तंव वाहती रुधिराचे पूर ।
 राक्षस अति आक्रंदे थोर । तेणें चराचर दमदमिलें ॥ ४० ॥
 नाद कोंदला अंतराळीं । नाद कोंदला सप्त पाताळीं ।
 नादें पक्षी श्वापदें आंदोळी । बैसली टाळी दिग्गजां ॥ ४१ ॥
 घायें राक्षस कंपायमान । तुम्ही दोघे काय राम लक्ष्मण ।
 केलें माझ्या भुजांचें छेदन । आणिकांसी जाण न तुटती ॥ ४२ ॥
 अतर्क्य माझ्या भुजा जाण । लक्षूं जाणे श्रीराम लक्ष्मण ।
 आणिका न करवे छेदन । मूर्च्छापन्न देखोनि ॥ ४३ ॥
 आणिकां न कळे माझी गोष्टी । आणिक मज देखतां दृष्टीं ।
 मूर्च्छापन्न पडती सृष्टीं । ते उठाउठीं मी भक्षीं ॥ ४४ ॥
 माझ्या भुजांचे बळ संपूर्ण । ओढितां न ओढती दोघे जण ।
 आणि बळें बाहूंचें केले छेदन । तरी राम लक्ष्मण तुम्ही दोघे ॥ ४५ ॥
 तुमचा घाव लागतां देख । दुःख नासूनि वाटे सुख ।
 श्रीराम सौमित्र तुम्ही आवश्यक । अलोलिक निजशक्ति ॥ ४६ ॥
 ऐसे ऐकोनि राक्षस वचन । श्रीराम सौमित्र सांगे आपण ।
 आम्ही दोघे श्रीराम लक्ष्मण । सीतागवेषणे करुं आलों ॥ ४७ ॥
 
 
 
त्वं तु को वा किमर्थ वा कबंधसद्दशो वने ।आस्येनोरसि दीप्तेन भग्नजंघो विचेष्टसे ॥ १२ ॥
 
 
लक्ष्मणाच्या प्रश्नावरुन कबंधाने आपला वृत्तांत सांगितला :
 
तंव लक्ष्मण पुसे राक्षसासी । तरी तूं कोण येथें वनवासी ।शिरश्चरणेंवीण कबंधेंसीं । येथें रहावयासी काय कारण ॥ ४८ ॥
 कोथळ प्रचंड चरणेवीण । येथे कैसें आगमन ।
 आणि उदरीं क्रूर वदन । दीर्घ दर्शन विकराळ ॥ ४९ ॥
 येथें तुझ्या मुखाहातीं । पशुपक्ष्यां जाली शांती ।
 कवळोनि श्वापदें दोन्हीं होतीं । ऐसा अति क्षुधार्थी तूं कोअण ॥ ५० ॥
 
 
 
एवमुक्तः कबंधस्तु लक्ष्मणेनोत्तरं वचः ।उवाच वचनं प्रतिस्तदिदं वचनं स्मरन् ॥ १३ ॥
 श्रिया विराजितं पुत्रं दनोस्त्वं विद्धि लक्ष्मण ।
 रुपमासीन्ममाचिन्त्यं त्रिषु लोकेषु विश्रुतम् ।
 सोऽहं रुपमिदं कृत्वा लोकवित्रासनं महत्॥ १४ ॥
 
 
 
ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । राक्षस स्वयें संतोषोन ।मग आपुलें पूर्वविधान । स्वयें सावधान सांगत ॥ ५१ ॥
 कश्यपाची प्रियपत्नी । दिती अदिती आणि दनी ।
 जे कां रुपें श्रीसमानी । ते माझी जननी श्रीरामा ॥ ५२ ॥
 
 
कश्यपभार्या दनीचा पुत्र दनू स्थूलशिरा ऋषीच्या शापाने कबंध राक्षस झाला :
 
तरी त्या दनूचा पुत्र मी प्रिय पूर्णु । यालागीं मातें म्हणती दनु ।रुपें मदनमोहनु । सबळें पूर्णू बळवंत ॥ ५३ ॥
 रुपयौवनसंपत्ती । अंगीच्या बळाची उद्धती ।
 नानावरदविकटवृत्ती । ऋषी वनांतीं भेडसावीं ॥ ५४ ॥
 
 
 
ततः स्थूलशिरा नाम महर्षिः कोपितो मया ।स चिन्वन्विविधं वन्य रुपेणानेन धर्षितः ॥ १५ ॥
 तेनाहमुक्तः प्रेक्ष्यैवं घोरशापाभिधायिना ।
 एवदेवं नृशंसं ते रुपमस्तु विगर्हितम् ॥ १६ ॥
 स मयाः याचितः क्रुद्धः शापस्यांतो भवेदिति ।
 यदा छित्वा भुजौ रामस्त्वां दहेव्दिजने वने ।
 तदा त्वं प्राप्यसे रुपं स्वमेव विपुलं शुभम् ॥ १७ ॥
 
 
 
स्थूळशिरा महाऋषीसी । वनीं वेंचितां वनफळांसी ।मी अधोमुखें भेडसावीं त्यासी । तंव तेणें क्रोधावेशीं शापिलें ॥ ५५ ॥
 विक्राळ मुखयोजन कर । चरणरहित स्थूळ शरीर ।
 उदरामाजी निमग्न शिर । होसी अधोर राक्षस ॥ ५६ ॥
 मग त्याचे धरोनि चरण । उश्शाप मागितला आपण ।
 करितां सीतागवेषण । राम लक्ष्मण वना येती ॥ ५७ ॥
 त्यांसीं तूं धरितां भक्षणार्थी । ते दोघे दोन्ही बाहु छेदिती ।
 तेव्हा तूं पावसी उद्धारगती । ऐसी वरदोक्ति ऋषि वदला ॥ ५८ ॥
 आणिक एक माझी उद्धती । ते मी सांगे तुम्हांप्रती ।
 मज तुष्टला प्रजापती । तपोनुवृत्ती संतोषोनी ॥ ५९ ॥
 
 
 
अहं हि तप्सोग्रेण पितामहमतोषयम् ।दीर्घमायुःस मे प्रादात्ततो मां बिभ्रामोऽस्पृशत् ॥ १८ ॥
 दीर्घमायुर्मया प्राप्तं किं मां शकःकरिष्यति ।
 इत्येवं बुद्धिमास्थाय रणे शक्रमधर्षयम् ॥ १९ ॥
 तस्य बाहुप्रमुक्तेन वज्रेण शतपर्वणा ।
 सक्थिनी च शिरश्चैव शरीरे संप्रवेशितम् ॥ २० ॥
 
 
ब्रह्मदेवाच्या वराने दीर्घायुष्य मिळविलेः
 
तपें पसन्न केला विधाता । ब्रह्मशाप निवारीं म्हणतां ।द्विजशापीं न चले सामर्थ्यता । म्हणे नान्यथा ऋषिभाषित ॥ ६० ॥
 न निवारवे ऋषिशापासी । मग मागितलें दीर्घायुष्यासी ।
 ब्रह्मयानें देवोनि त्या वरासी । अदृश्येसीं तो गेला ॥ ६१ ॥
 व्हावया ब्रह्मशापप्राप्ती । गर्व वाटला माझे चित्तीं ।
 मी तंव चिरंजीव त्रिजगतीं । इंद्रादि किती मजपुढें ॥ ६२ ॥
 
 
त्या वराच्या उन्मत्तपणाने इंद्राशी केलेल्या युद्धात इंद्राने त्याला विद्रूप केला :
 
ऐसिया गर्वाची उद्धती । घ्यावया त्याची स्वर्गसंपत्ती ।जाली इंद्रपदाची प्राप्ती । मज शचीपति कोपला ॥ ६३ ॥
 मज आयुष्य आहे संपूर्ण । इंद्र मारावया मशक कोण ।
 येणेंचि अति गर्वें जाण । युद्ध दारुण म्यां केलें ॥ ६४ ॥
 तीक्ष्ण वज्र शतधारा । घायें हाणीतल्या पुरा ।
 शरीर निमग्न केलें शिरा । चरण धाराअ खंडिले ॥ ६५ ॥
 घायें दुःखी जालों  अत्यंत । इंद्रासी म्हणे मी न करीं घात ।
 तंव तो म्हणे तूं चिरंजीवित । जीविता अंत घडेना ॥ ६६ ॥
 ऐसें बोलतां सुरपती । मज आली ब्रह्मशापप्राप्ती ।
 क्षणामाजी पडली भ्रांती । अति उन्मत्ती राक्षस ॥ ६७ ॥
 उदरोदरीं दिधले मुख । अति विक्राळ आणि  विकट ।
 दोनी हात योजन एक । अति अगाध अनिवार ॥ ६८ ॥
 जें जें सापडे हातांत । पशु पक्षी प्राणी नित्य भक्षित ।
 तरी क्षुधेसी नाहीं अंत । समसमित अति दुःखी ॥ ६९ ॥
 नवल कैसें श्रीरघुनाथा । काय खाऊं हे चिंता ।
 आणिक नाठवेचि सर्वथा । उदरवस्था  अति दुःखी ॥ ७० ॥
 पोटाचिये चिंतेहातीं । जगासी पडली अति भ्रांती ।
 हृदयीं नाठवे श्रीरघुपती । ऐसा दुःखावर्त उदरार्थ ॥ ७१ ॥
 वेदशास्त्रीं अति संपन्न । स्वयें म्हणवीं मी सज्ञान ।
 तरी शिश्र्नोदरपरायण । इतर जन ते शमक ॥ ७२ ॥
 असो इतरांची काय कथा । माझी जे कां दुःखावस्था ।
 सावध ऐकें श्रीरघुनाथा । मोक्षदाता तूं माझा ॥ ७३ ॥
 
 
 
ममाप्यनेने रुपेण निर्वेदःसुमहान्प्रभो ।मृत्पिण्डभूत एकस्थो जीवलोकविगर्हितः ॥ २१ ॥
 दीर्घौचमौ निकृत्तौमे युवाभ्यामायतौ भुजौ ।
 राघवौ सन्मया दृष्टौ नास्ति धन्यतरो मया ॥ २२ ॥
 सत्यसंधौ तथावीरौ धार्मिकौ सत्यविक्रमौ ।
 सहितौ भ्रातरौ दृष्ट्वा मुक्तोहं पापजीवितात् ॥ २३ ॥
 
 
श्रीरामदर्शनाने त्याचा उद्धारकाळ समीप आला :
 
या देहाचे संगतीं । अति दुःखी मी रघुपती ।मृत्पिंडप्राय नाहीं गती । निंद्य सर्वांर्थी सर्वस्वें ॥ ७४ ॥
 यासी नाहीं गमनगती । नाहीं अंतरीं शुद्धमती ।
 बाह्य क्रिया जीवघाती । निंद्य सर्वार्थी सर्वस्वें  ॥ ७५ ॥
 मारोनि खावे जीवमात्र । न म्हणें ब्राह्मण क्षत्रिय शुद्र ।
 ऐसा राक्षस मी  अपवित्र । दुःखें दुर्धर अति दुःखी ॥ ७६ ॥
 तरी शापभाग्यास्तव जाण । तुम्ही आलेती दोघे जण ।
 तरी हें नव्हे सीतागवेषण । माझे उद्धरण करुं आलां ॥ ७७ ॥
 करितां माझे बाहुच्छेदन । छेदिला माझा देहाभिमान ।
 घायें केलें सावधान । सुखसंपन्न श्रीरामा   ॥ ७८ ॥
 तुम्ही दोघे पूर्ण पुरुष । सत्वनिष्ठ सद्विवेक ।
 तुमचे चरण सुखदायक ।   सदा सात्विक तुमचेनि ॥ ७९ ॥
 ऐसे तुम्ही धीर वीर । सत्स्वरुप महाशूर ।
 तुम्ही निजधर्माचें माहेर । चिदचिन्मात्र तुम्ही दोघे ॥ ८० ॥
 तुम्हांसी देखतांचि दृष्टीं । निमाल्या अविद्या पापें कोटी ।
 सुखस्वरुपीं झाली भेटी । कृपाळु सृष्टीं श्रीराम ॥ ८१ ॥
 तुम्ही दोघे अलौकिक । तुमच्या चरणां लोळंगतां देख ।
 दुःख छेदोनि दिधलें सुख । परम पुरुष तुम्ही दोघे ॥ ८२ ॥
 पापकारी अति निंदित । राक्षययोनीं अधःपात ।
 त्या मज केलें निर्मुक्त । ब्रह्मभूत तुम्ही दोघे ॥ ८३ ॥
 
 
कबंधाच्या विनंतीवरुन त्याचे दहन केले :
 
ऐसें बोलोनि आपण । कबंध घाली लोटांगण ।माझें केलिया देहदहन । सांगेन संपूर्ण सीताशुद्धि ॥ ८४ ॥
 सीताशुद्धि   मी सांगेन । हें ऐकोनि श्रीरामवचन ।
 त्यासी पुसे स्वयें आपण । अति सावधान शुद्ध्यार्थी ॥ ८५ ॥
 
 
 
स त्वं सीता समाचक्ष्व येन वा यत्र वाहृताः ।कुरु कल्याणमत्यर्थं यदि जानासि सत्वतः ॥ २४ ॥
 
 
 
श्रीराम पुसे कबंधासी । सीताशुद्धि सांगेन म्हणसी ।कोणीं नेली कोने स्थळासी । कोने देशीं तें सांगें ॥ ९६ ॥
 बुद्धि करोनि सावधान । स्वस्थ करोनि निजमन ।
 सीतेचें केउतें गमन । स्थान मान मज सांगें ॥ ९७ ॥
 
 
 
एवमुक्तस्तु रामेण वाक्यं दनुरनुत्तमम् ।इदं जगाद वचनं लक्ष्मणस्य च पश्यतः ॥ २५ ॥
 रावनेन हृता सीता रामपत्नी यशस्विनी ।
 नाममात्रं तु जानामि न रुपं तस्य रक्षसः ॥ २६ ॥
 निवासंवा प्रभावंवा वयं तस्य न विद्महे ।
 दिव्यमस्ति नमे ज्ञानं नाभिजानामि मैथिलीम् ॥ २७ ॥
 
 
 
सीतेला रावणाने नेली हे कबंधाने रामांना सांगितले :
 
ऐसें ऐकोनि श्रीरामवचन । कबंध सागें आपण ।ऐसें मज आहे ज्ञान । तें सावधान अवधारीं ॥ ८८ ॥
 मग लक्ष्मणासी उभे करोनी । कबंध सांगे गर्जोनी ।
 श्रीरामाची धर्मपत्नी । गेला घेवोनी रावण ॥ ८९ ॥
 त्याचें नांव म्यां ऐकिलें कानीं । परी तो देखिला नाहीं नयनीं ।
 अते केउता गेला गगनीं । कोणे स्थानीं मी नेणें ॥ ९० ॥
 त्याचा आवास ना निवास । कोने ठायीं  रहिवास ।
 जनवास कीं वनवास । तें मी निःशेष जाणें ना ॥ ९१ ॥
 
 
 
विज्ञानं तु परिभ्रष्टं शापदोषेण राघव ।स्वकृतेन मया प्राप्तं रुपं लोकविगर्हितम् ॥ २८ ॥
 किं तु यावन्न यात्यस्तंस्विता श्रांतवाहनः ।
 तावन्मामवटे कृत्वा दह राम यथाविधे ॥ २९ ॥
 
 
 
श्रीरामा माझें शुद्ध ज्ञान । ब्रह्मशापें जालें विच्छिन्न ।न करितां राक्षसदेहाचें दहन । माझें मज ज्ञान प्रकटेना ॥ ९२ ॥
 आच्छादावया निजज्ञान । श्रीरामा मुख्य देहबंधन ।
 देहाभिमान केलिया दहन । ज्ञानविज्ञान प्रांजळ ॥ ९३ ॥
 यालागीं राक्षसीदेहदहन । दीर्घ गर्तेत खाणून ।
 त्यामाजी शुष्क काष्ठे घालून । करावें दहन सौमित्रें ॥ ९४ ॥
 अंतकाळ करी जो मित्र । तयाचें नाम गा सुमित्र ।
 मी तंव तुमचें कृपापात्र । श्रीरामचंद्र कृपाळु ॥ ९५ ॥
 लक्ष्मणा ऐकें सावधान । या देहा नाहीं प्रेतपण ।
 श्रीरामहस्तें अति पावन । कृपेनें दहन करी स्वामी ॥ ९६ ॥
 केलिया राक्षसदेहदहन । सीताप्राप्तीचे विधान ।
 मी यथार्थ सांगेन । सत्यवचन श्रीरामा ॥ ९७ ॥
 ऐकोनि कबंधाचें वचन । संतोषला रघुनंदन ।
 पाचारोनि लक्ष्मण । देहदहन करविलें ॥ ९८ ॥
 
 
 
चितामादीपयामास सा प्रजज्वाल सर्वतः ।तच्छीरीरं कबंधस्य घृतपिण्डोपमं महत् ॥ ३० ॥
 स विधूय चितामाशु विधूमोऽगिरिवोत्थिततः ।
 अरजे वससी विभ्रन्माल्यं दिव्यं महबलः ॥ ३१ ॥
 उत्पपाताशु संहृष्टः सर्वप्रत्यंगभूषणः ।
 विमाने भास्वरें निष्ठन्हंसयुक्ते यशस्करे ॥ ३२ ॥
 
 
 
कबंधाचें देहदहन । चितेमाजी करतां जाण ।तो निद्य देह त्यागून । जाला आपण दिव्यदेही ॥ ९९ ॥
 दिव्यांबरपरिधान । अनर्घ्य भूषणें दिव्य चंदन ।
 मांदार पारिजात सनातन । माळा परिधान मघमघित ॥ १०० ॥
 त्यजितां राक्षसदेहासी । दनुदानव उल्लासेंसीं ।
 श्रीरामा तुझी कृपा ऐसी । निमेषार्धेंसीं सुखी केलें ॥ १ ॥
 तुझें देखिलिया श्रीचरण । चरणां शरण सायुज्य ॥ २ ॥
 त्यांत तुझें सांग संदर्शन । मज घडलें संपूर्ण ।
 म्हणोनि घालितां लोटांगण । आलें विमान हंसयुक्त ॥ ३ ॥
 धन्य द्विजाचा निजशाप । शापें केला निष्पाप ।
 श्रीराम भेटला चित्स्वश्रूप । सुखरुप मी जालों ॥ ४ ॥
 सुखरुप चराचर । सुखें भरले सागर ।
 कबंधासी उत्साह थोर । श्रीरामचंद्र संतुष्टला ॥ ५ ॥
 कबंध अति उल्लासोनि । बैसला हंसयुक्त विमानीं ।
 सीताप्राप्तीचे विधानीं । स्वयें गर्जोनि सांगत ॥ ६ ॥
 
 
 
सोऽन्तरिक्षगतो वाक्यं कबन्धो राममब्रवीत् ।शृणु राघव तत्वेन यथा सीतामवाप्स्यसि ॥ ३३ ॥
 श्रूयतां राम वक्ष्यामि सुग्रिवो नाम वानरः ।
 भ्रात्रा निरसतः क्रुद्धेन वालिना शक्रसूनुना ॥ ३४ ॥
 
 
दहन झाल्यावर विमानात बसून कबंध श्रीरामांना सुग्रीवाशी सख्य करण्यास सांगतोः
 
कबंध बैसोनि विमानीं । श्रीरामा सांगे कळवळोनी ।सीताशुद्धीचे विधानीं । सावधानीं अवधारीं ॥ ७ ॥
 ऐक श्रीरामा सत्योत्तर । सीता भेटावया अति सत्वर ।
 सुग्रीवासी करीं मित्र । वानर वीर महाबळीं ॥ ८ ॥
 पालेखाइरे वानर । केवळ नव्हती वनचर ।
 किंष्किंधेचा राज्यधर । सैन्य अपार जयाचें ॥ ९ ॥
 सुग्रीवाचें चवघे प्रधान । राजनीतीं अति संपन्न ।
 चहू पुरुषार्थी अति सज्ञान बळवाहन वळिष्ठ ॥ ११० ॥
 
 
दोघांचे दुःख एकच असल्याने उभयता मैत्रीस योग्य :
 
समानशीळ योग्य मैत्री । येरयेरां नित्यसाहाकारी ।तुम्हां दोघां समान सरी । तेहीं अवधारीं श्रीरामा ॥ ११ ॥
 तुझी भार्या रावणें हरण । सुग्रीवभार्या वाळिग्रहण ।
 दोघांची अवस्था समसमान । दोघे दीन स्त्रीविरहें ॥ १२ ॥
 तुज राज्यत्यागें प्राप्त वन । त्यासी राज्यत्यागें ऋष्यमूळ स्थान ।
 दोघाचें दुःख समसमान । अति दीन स्थिति गति ॥ १३ ॥
 तुम्ही नरपति सुग्रीव वीर । आणि वानरपति सुग्रीव वीर ।
 त्यासीं करावा अगत्य मित्राचार । सीतासुंदरीप्राप्तर्थीं   ॥ १४ ॥
 हें तंव मानलें श्रीरामा वचन । केउतें सुग्रीवाचें स्थान ।
 कोणे मार्गे करावें  गमन । श्रीरघुनंदन पुसतसे ॥ १५ ॥
 
 
 
स वानरवरः पंपामटतीव सुशंकितः ।अभिषिक्तो बलौ कर्तुं कार्यं ते हरिपुंगवः ॥ ३५ ॥
 वानरेंद्रो महावीर्यस्तेजोवानमितप्रभः ।
 दिशो विचेतुं तां सीतां त्वद्वियोगेन शोचतीम् ॥ ३६ ॥
 भास्करस्यौरसः पुत्रो वालिना कृतकिल्बिषः ।
 सन्निधायायुधं क्षिप्रमृष्यमूकालयं कपिम् ॥३७॥
 
 
पंपासरोवरावर सुग्रीवाची भेट व मैत्री होईल :
 
कबंध सागें श्रीरामाप्रती । येणेंचि मार्गे श्रीरघुपती ।पंपासरोवराची ख्याती । अति विश्रांति तापसां ॥ १६ ॥
 देखिलिया पंपेचें दर्शन । दुःखी होती सुखसंपन्न ।
 तें त्या वानराचें स्थान । स्वानंदें पूर्ण क्रीडती ॥ १७ ॥
 
 
वालीचा वध झाल्यावर मैत्री होऊन सीतेचा शोध लागेल :
 
तुज सुग्रीवा जालिया  भेट । दोहींच्या दुःखा होईल तुटीं ।मेळवोनि वानरकोटी । सीता गोरटी शोधील ॥ १८ ॥
 वानर धाडोनी महाबळीं । त्रैलोक्य़ीं घेतील घरधांडोळी ।
 ठायीं घालोनि जनकबाळी । वानर  तत्काळीं येतील ॥ १९ ॥
 सीताविरहें तूं आपण । गिंवसिसी गिरिकंदरें वन ।
 तिची शुद्धि वानरगण । न लागतां क्षण आणिती ॥ १२० ॥
 स्त्रीविषयींचे सुबद्ध । वालिसुग्रीवां महाद्वंद्व ।
 सहा सहा मासां करिती युद्ध । वीरां उन्माद वाटिव ॥ २१ ॥
 तुझेनि हातें वालिमरण । हें मज आहे ज्ञान पूर्ण ।
 शीघ्र जावोनि आपण । वालिनिर्दळण करावें   ॥ २२ ॥
 त्या दोघांच्या युद्धसंधीसीं । ठाकोनि जावें त्वरेंसीं ।
 रणीं निर्दाळावया वालीसीं । सुख सुग्रीवासी स्वानंदें ॥ २३ ॥
 जें वालीचें निर्दळण । तेंचि सुग्रीवा मित्रत्व पूर्ण ।
 तेणें तूं पावशील कल्याण । सत्य वचन श्रीरामा ॥ २४ ॥
 बंधुबंधुंमाजी वैर । पडावया मुख्य स्त्री साचार ।
 स्त्रीसंग मुख्य दुर्धर । दुःखी नर स्त्रीसंगें ॥ १५ ॥
 सुग्रीव मित्राचें महिमान । पावसील सीतारत्न ।
 किर्ति प्रकटेल अति पावन सत्य्वचन श्रीरामा ॥ २६ ॥
 ऐसें कबंधें सांगोनी । स्वये श्रीरामासी वंदोनी ।
 आल्हादें विमानीं बैसोनी । उर्ध्वगमनीं तो गेला  ॥ २७ ॥
 एकाजनार्दना शरण । जालें कबंधोद्धरण ।
 पुढें श्रीरामलक्ष्मण । पंपाप्रयाण स्वयें करिती ॥ २८ ॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
 कबंधोद्धरणं नाम द्वाविंशतिमोऽध्यायः ॥ २२ ॥
 ॥ ओव्या  १२८ ॥ श्लोक  ३७ ॥ एवं  १६५ ॥
 
 
 
 GO TOP 
 
 |