| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 सुंदरकांड 
 ॥  अध्याय सतरावा ॥  हनुमंताचे रावणसभेत आगमन
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
इंद्रजिताची दैन्यावस्था, ब्रह्मदेवाचे स्मरण
 
रणीं पाठी देवोनि वानरा । लपाला असतां विवरा । परम लज्जा राजकुमरा । काय महावीरां मुख दावूं ॥ १ ॥
 माझी वीरवृत्ति अति लाठी । इंद्रजितनामाची ख्याती मोठी ।
 वानरें नेली पुच्छासाठीं । रणसंकटीं गांजोनी ॥ २ ॥
 कपिपुच्छाचा दुर्धर मार । रणीं गांजिला राजकुमर ।
 सैन्या जाला समूळ मार । काय करूं मी आतां ॥ ३ ॥
 कैसेनि भेटों महावीरां । केंवी मुख दावूं राक्षसेंद्रा ।
 आतां न वचें लंकापुरा । लाजेचें वीरा अति दुःख ॥ ४ ॥
 वाहिली सदाशिवाची आण । शिवलों रावणाचे चरण ।
 प्रमाणें जालीं अप्रमाण । वानरें पूर्ण गांजिलें ॥ ५ ॥
 मज रणीं येतें मरण । तरी पावतो कृतकल्याण ।
 अवकळा वांचले प्राण । वरदान जळो माझें ॥ ६ ॥
 अवकळेचें जें जिणें । त्याहूनि श्रेष्ठ रणीं मरणें ।
 जळोत माझीं वरदवचनें । वरदानें नागविलें ॥ ७ ॥
 पोटीं घालावयापुरतें । शस्त्र नुरेचि माझें हातें ।
 जें जीव द्यावा येथें । वरदान मातें मरों नेदी ॥ ८ ॥
 रणीं गांजिलें माकडें । कांही उपाय न चले पुढें ।
 इंद्रजित खळखळां रडे । अति सांकडें ओढवलें ॥ ९ ॥
 मुख दावूं नये लाजेहातीं । मरण नये वरदोक्तीं ।
 इंद्रजित पडला अति आकांतीं । तंव ब्रह्मोक्ती आठवली ॥ १० ॥
 गळा बांधोनि मारूती । इंद्रजित आणील लंकेप्रती ।
 ऐसें बोलिला प्रजापती । त्यासी निश्चितीं पाचारूं ॥ ११ ॥
 मिथ्या नव्हे ब्रह्मवाणी । तरी कां मी भंगलो रणीं ।
 हनुमान न बांधवे बंधनीं । सत्यवचनी केंवी ब्रह्मा ॥ १२ ॥
 पाचारावया चतुरानन । धाडावया नाहीं सेवकजन ।
 बाहेर निघतां आपण । रोकडें मरण कपिपुच्छें ॥ १३ ॥
 मज बाहेरी निघतां । पुच्छ करील माझे घाता ।
 हनुमंत लागला मजभोंवता । नेदी विधाता मज भेटो ॥ १४ ॥
 माझ्या पित्याचे पित्याचा पिता । कैसेनि भेटे मज विधाता ।
 ऐसी इंद्रजित करितां चिंता । आला अवचिता परमेष्ठी ॥ १५ ॥
 
 
ब्रह्मदेवाचे आगमन, इंद्रजिताची दुर्बलता : 
 
ब्रह्मा देखोनि अवचिता । हर्ष इंद्रजिताच्या चित्ता । चरण वंदोनियां माथां । होय सांगतां उल्लासें ॥ १६ ॥
 स्वामी बोलिलेति वचनोक्ती । गळा बांधोनि मारुती ।
 तूं आणिसील लंकेप्रती । मज उपहति कां जाली ॥ १७ ॥
 तो राक्षसराजसुत । स्त्रष्ट्याप्रति असे पुसत ।
 कैसेनि बांधवे हनुमंत । त्यासी निग्रहार्थ मज सांगें ॥ १८ ॥
 हनुमान हरिहरां अवध्य । तया माझे न करवे बंध ।
 कपीसीं न चले माझा क्रोध । वाक्य अबद्ध बंधनीं ॥ १९ ॥
 इंद्रजिताचे निजहस्तीं । बंधन पावोनि मारूती ।
 आणिजेल लंकेप्रती । ते वचनोक्ती सत्य करा ॥ २० ॥
 असत्य न व्हावें ब्रह्मवचन । कपीस ब्रह्मापाशबंधन ।
 नारदें सांगितलें आपण । ते आठवण मज जाली ॥ २१ ॥
 स्वामीनें कृपा करून । द्यावें ब्रह्मपाशबंधन ।
 तेणें मी हनुमंता बांधोन । मग श्लाघ्यता वाढिवीं ॥ २२ ॥
 यासी ब्रह्मपाश नेदितां । मिथ्या मानी ब्रह्मवाक्यता ।
 दिधल्या न बांधवे हनुमंता । प्रत्ययार्था दिधलें ॥ २३ ॥
 इंद्रजित ब्रह्मपाश घेऊनी । मोकली मारूती लक्षोनी ।
 कपि न लिंपे पाशबंधनीं । निर्बंधनी ब्रह्मपाशा ॥ २४ ॥
 इंद्र यम वायु वरूण । यांचें हनुमंता वरदान ।
 शशी सूर्य वन्हि ईशान । यांचें वरदान हनुमंता ॥ २५ ॥
 हरिहरांचें वरदान । ब्रह्मयाचें ब्रह्मवरदान ।
 कपीस ब्रह्मपाश-बंधन । न बांधी जाण वरदानें ॥ २६ ॥
 कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचें ब्रह्मपाश ।
 बांधूं न शके जन्मपाश । नित्य निर्दोष हनुमंत ॥ २७ ॥
 हनुमांन सबाह्य निराश । निरपेक्षाचे हरिहर दास ।
 त्यासी कैसेनि बांधिती पाश । नित्यनिराश हनुमंत ॥ २८ ॥
 पाश न लागती हनुमंता । इंद्रजितासी परम चिंता ।
 ब्रह्मपाश गेले वृथा । तेचि श्लोकार्था अनुवादे ॥ २९ ॥
 इंद्रजित ब्रह्मपाश घालितां । ते न लागती हनुमंता ।
 वानरें महाकर्म केलें वृथा । जघन्यता मज आली ॥ ३० ॥
 जेथें न चले माझी मंत्रशक्ती । न चले ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
 तेथें राक्षसमंत्रियुक्ती । कैसेनि रीती सरेल ॥ ३१ ॥
 माझी अस्त्रशस्त्रशक्ती । ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
 अवघी वृथा केली मारूतीं । राक्षसयुक्ती अति मिथ्यां ॥ ३२ ॥
 ज्यासी बांधीना ब्रह्मपाशशस्त्र । त्यावरी न चले आणिकाचें अस्त्र ।
 वानर सर्वार्थीं दुर्धर । यासी कपींद्र नाटोपे ॥ ३३ ॥
 ब्रह्मयानें दिधली खोटी शक्ती । म्हणोनि न बांधवे मारूती ।
 इंद्रजित कोपला प्रजापती । दुष्टमति आम्हांवरी ॥ ३४ ॥
 तूं आमुचा मूळपुरूष । तुवांचि मांडिला आमुचा द्वेष ।
 रणीं मारावे राक्षस । देशी उपदेश वानरा ॥ ३५ ॥
 
 
ब्रह्मदेवावर दोषारोप करताच ब्रह्मदेवाने सांगितले की राक्षसांच्या कपटवृत्तीमुळे माझा पाश प्रभावी रीतीने मारूतीला पकडू शकत नाही :
 
 
ब्रह्मा म्हणे तूं विकल्पमूर्ती । ब्रह्मद्वेष तुझ्या चित्तीं । तुज नातळे ब्रह्मशक्तीं । रणीं मारूती केंवी बांधवे ॥ ३६ ॥
 निष्कपट निर्मळवृत्ती । शम दम नित्य शांती ।
 त्याचेनि हातें ब्रह्मशक्ती । विजयाप्राप्ती स्वानंदें ॥ ३७ ॥
 माझी शक्ती दे मजप्रती । बांधोन देईन मी मारूती ।
 तुमच्या न चलती युक्ती । तुम्हां मारूती न बांधवे ॥ ३८ ॥
 मापेंवीण करांच्या राशी । न मोजवती आणिकांसी ।
 राक्षसीं पीडावे भूतांसी । हनुमंतासी न बांधवे ॥ ३९ ॥
 डोळा देखे सर्वरूपासी । देखों न शके आपणासी ।
 जीवपीडा राक्षसांपासीं । हनुमंतासी न बांधवे ॥ ४० ॥
 पाशशक्ति घेवोनि हातीं । सन्मुख येवोनि प्रजापती ।
 स्वयें बोले हनुमंताप्रती । तेही उपपत्ती अवधारा ॥ ४१ ॥
 
 
पाशात अडकण्याविषयी ब्रह्मदेवाची मारूतीला विनंती : 
 
ब्रह्मा म्हणे हनुमंतासी । तुज न बांधवे ब्रह्मपाशीं । माझें वचन सत्यत्वासी । मानीं आपणांसी पाशबंध ॥ ४२ ॥
 असत्यवाद माझे माथां । येवों नेदीं हनुमंता ।
 ब्रह्मवाक्यें बंधनता । पाशबंधनता मानावी ॥ ४३ ॥
 ब्राह्मणाचें ब्रह्मवचन । नुल्लंघिसी अणुप्रमाण ।
 माझें पाळोनियां वचन । पाशबंधन मानावें ॥ ४४ ॥
 साधना ब्रह्मयाचें वचन । हनुमंत घाली लोटांगण ।
 तुझेनि बोलें देह त्यागीन । पाशबंधन तें किती ॥ ४५ ॥
 ऐसें बोलोनि हनुमंत । ब्रह्मापाशीं पडे मूर्च्छित ।
 धरणीवरी निचेष्टित । धकधकित जेंवी भ्याडा ॥ ४६ ॥
 
 
विनंती मान्य करून हनुमंताने बांधून घेतले : 
 
ब्रह्मपाशीं हनुमंत । पडला दिसे निचेष्टित । परी तो बंधमोक्षातीत । नित्यनिर्मुक्त रामभक्त ॥ ४७ ॥
 ब्रह्मपाशीं हनुमंत । निश्चयेंसी नित्य निर्मुक्त ।
 ब्रह्माज्ञे बद्धत्व दावित । प्राकृत मानित बांधला ॥ ४८ ॥
 जेंवी रवि थिल्लरांत । लोक मानिती थिल्लरस्थ ।
 तेंवी कपि ब्रह्मपाशांत । बांधला दिसत परी मुक्त ॥ ४९ ॥
 विजयी वीर इंद्रजित । ब्रह्मपाशीं बांधला हनुमंत ।
 ऐशा गोष्टी लंकेआंत । सांगती मात घरोघरीं ॥ ५० ॥
 ब्रह्मपाशें बांधला हनुमंत । परी तो ब्रह्मबंधातीत ।
 देखोनि इंद्रजित विस्मित । तेंचि बोलेन श्लोकार्थीं ॥ ५१ ॥
 
 
पाशबद्ध झालेल्या मारुतीशी राक्षसांच्या चेष्टा व त्याची ओढाताण : 
 
क्षितितळीं निश्चेष्टिंत । पडिला देखोनि हनुमंत । राक्षस धाम्वोनि समस्त । त्यासी बांधित वेलवाखीं ॥ ५२ ॥
 एक तृणवेंठी वळिती । एक वृक्षासाली काढिती ।
 एक द्रुम चिरफाळिती । रणीं मारूती बांधावया ॥ ५३ ॥
 एक आणिती चर्हाटें । एक वळिती सलंब फांटे ।
 देखोनि हासिजे मर्कटे । बंधन खोटें मज न लागे ॥ ५४ ॥
 राक्षसें बापुडीं वेडीं । व्यर्थ करिती ओढाओढी ।
 फोडीन लंकेच्या उतरंडी । पाडीन दरडी दुर्गाच्या ॥ ५५ ॥
 रावणा देखोनिया दृष्टीं । यांचा घावो साहोनि पृष्ठीं ।
 तो घावो नेवोनि तृणासाठीं । लंका उठाउठीं जाळूं आजी ॥ ५६ ॥
 ऐसा आवांका धरोनि पोटीं । द्रुमचीरबंधन मानूनि कंठीं ।
 घ्यावया रावणाची भेटी । जातो जगजेठी हनुमंत ॥ ५७ ॥
 जातां हनुमंता प्रती । भेणें पळाली ब्रह्मपाशीं ।
 ब्रह्मपाशीं मुक्त मारूती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ ५८ ॥
 जो बांधवेना ब्रह्मपाशीं । तो केंवी बांधवे द्रुमपाशीं ।
 बंधनमिसें जातो लंकेसी । रावणासी गांजावया ॥ ५९ ॥
 बंधन नाहीं हनुमंता । मिथ्या मानोनि बंधनता ।
 स्वयें लंकेसी जातो आतां । लंकानाथा गांजावया ॥ ६० ॥
 आम्हांसी गांजिल अशोकवनी । रावणा गांजील लंकाभुवनीं ।
 परमचिंता इंद्रजिताचे मनीं । अपेश जनीं मज आलें ॥ ६१ ॥
 इंद्रजितें हनुमंत । बांधोनि आणिला लंकेआंत ।
 हेंची लोकीं विरूढली मात । करील अनर्थ तें नकळे ॥ ६२ ॥
 
 
अशा रीतीने मारूतीचा लंकेत प्रवेश : 
 
ब्रह्मयानें सांगितलें कानीं । तें हनुमंतें धरोनि मनीं । प्रवेशला लंकाभुवनीं । इंद्रजिताचें मनीं चळकांप ॥ ६३ ॥
 इंद्रजित म्हणे राक्षसांसी । हनुमान बांधा ब्रह्मपाशीं ।
 ब्रह्मपाशें बंधन नाहीं त्यासी । तो तुम्हांसी न धरवे ॥ ६४ ॥
 राक्षस म्हणती वानर किती । सांपडलें आमुच्या हातीं ।
 आम्ही याची करूं शांती । तूं का चित्ती भितोसी ॥ ६५ ॥
 मत्तमातंग महाबळी । वृथा बांधिजे कमळमृणालीं ।
 तेंवी हनुमंत महाबळी । बांधिजे सकळीं वृक्षशाखा ॥ ६६ ॥
 एक बांधितीं रज्जुबंधनीं । एक बांधिती वाक वळूनी ।
 एक बांधिती मुंज चिरूनी । कपि धरोनि आणिला ॥ ६७ ॥
 एक ओढिती पूर्वेसी । एक ओढिती पश्चिमेसी ।
 एक ओढिती उत्तरेसी । दक्षिणेसी एक पैं ॥ ६८ ॥
 एक रागें हाणिती बुक्की । जो हाणी तो होय दुःखी ।
 मणगटें मोडोनि तवकी । महाशंख वामहस्तें ॥ ६९ ॥
 एक आक्रोशें हाणिती मुसळ । मुसळ पिष्ट होय तत्काळ ।
 हाणी त्याचा हात उखळे । पडे तत्काळ मूर्च्छित ॥ ७० ॥
 एक धांवोनि टोला हाणित । घायें रूधिर स्त्रवे हात ।
 हनुमान गदगदां हांसत । व्यर्थ पुरूषार्थ राक्षसांचा ॥ ७१ ॥
 ओढाओढी हनुमंतासीं । राक्षस करिती कासाविसी ।
 कपि कुंथत लौकिसेंसीं । निजमानसीं उल्लास ॥ ७२ ॥
 धरोनि नेला रावणाप्रती । मी गांजीन लंकापती ।
 राक्षस माझा घात करिती । वानरचित्तीम नाहीं शंका ॥ ७३ ॥
 राक्षस अट्टहासें गर्जती । अखयाचा हा जीवघाती ।
 सांपडला आमुच्या हातीं । प्राणाहुती करूं याची ॥ ७४ ॥
 हनुमान पुढें नेइजेत । धरोनि इंद्रजिताचा हात ।
 ब्रह्मा त्यामागें पैं जात । मंत्र जपत तो ऐका ॥ ७५ ॥
 गृहा वै प्रतिष्ठासूक्त । ब्रह्मा स्वानंदें जपत ।
 रामराज्य लंकेआंत । हनुमंत प्रवेशें ॥ ७६ ॥
 वेगें आणिला रावणापासीं । कोप आला दशमुखासी ।
 रागें सांगे राक्षसांसी । भक्षा यासी सगळाचि ॥ ७७ ॥
 रावण दांत खाय करकरां । मज देखतां शस्त्रधारा ।
 वानरा तिळप्राय करा । निशाचरां प्रेरिलें ॥ ७८ ॥
 कोट्यनुकोटि पार्षद । धांविन्नले गदायोध ।
 घाव हाणिती सुबुद्ध । करावया छेद कपीचा ॥ ७९ ॥
 बाण सुटती सणसण । शस्त्रें वाजती खणखण ।
 घाय हाणिती दणदण । कपीचा प्राण घ्यावया ॥ ८० ॥
 एक खोचिती सबळ शूळें । एक हाणिती सबळ मुसळें ।
 एक हाणिती काती त्रिशूळें । गदामुद्गळें पैं एक ॥ ८१ ॥
 आलगाईत कोइतेकार । अढाउ चव्हाण चेंडूचक्र ।
 फरश पशिट्टश तोमर । हाणिती वानरा जमदाढा ॥ ८२ ॥
 वानरासीं सवतोडी । हाणिती भाले ओढण खांडीं ।
 एक हाणिती लहुडी । प्रचंड धोंडी पैं एक ॥ ८३ ॥
 जीवें मरावया वानर । मिळोनि अवघे निशाचर ।
 वर्षती शस्त्रांचे संभार । अति निष्ठुर निर्घातें ॥ ८४ ॥
 ऐशिया शस्त्रघातीं हाणित । शस्त्रें मोडलीं समस्त ।
 एकाचे उखळले हात । वीरीं दांत समसगट ॥ ८५ ॥
 एकएकें समस्त । वीर पडियेले मूर्च्छित ।
 हनुमंतासी न लागे घात । लंकानाथ क्षोभला ॥ ८६ ॥
 हनुमंताचे अभ्यंतरीं । श्रीराम नांदे सबाह्यान्तरीं ।
 शस्त्रें न रूपती तिळभरी । वीर महामारीं मूर्च्छित ॥ ८९ ॥
 
 
रावणाचा खड्गप्रहार मारूतीने निष्फळ केला : 
 
नव्हेचि हनुमंताचा घात । सारथी वीर समस्त । पडिले देखोनि मूर्च्छित । कोपे कृतांत रावण ॥ ९० ॥
 क्षोभोनिया लंकानाथ । चंद्रसेन खड्गा घाली हात ।
 कोपें हाणितां हनुमंत । कपि हांसत गदगदां ॥ ९१ ॥
 
 
मारूतीचे हास्य व रावणाचा त्याला प्रश्न : 
 
घावो हाणितां प्रचंड । त्यानें दणाणिलें ब्रह्मांड । सरलें रावणाचें बळबंड । खालतें तोंड तेणें केलें ॥ ९२ ॥
 रावण म्हणे गा हनुमंता । तूं हांसलासि कवणे अर्था ।
 कपि म्हणे लंकानाथा । ऐक आतां सांगेन ॥ ९३ ॥
 
 
रावणाला उत्तर : 
 
राक्षसस्वामी तूं लंकानाथा । तुझिया बळाचा मज भ्रम होता ।घावो हाणोनि त्वां आतां । केला वृथा पुरूषार्थ ॥ ९४ ॥
 राक्षसघायाचा समेळ । जैसी पिसाची बुळबुळ ।
 तुझा घावो अति निर्बळ । जैसी पेळ कापसाची ॥ ९५ ॥
 रावण निर्बळी हीन दीन । केंवी रामासीं करिसील रण ।
 जगीं निर्लज्ज तूं एक जाण । हास्य संपूर्ण तेणें मज ॥ ९६ ॥
 सैंवरी पाहतां हरकोदंड । तुझें झालें काळें तोंड ।
 श्रीरामें तें केलें दुखंड । युद्ध वितंड केंवी त्यासी ॥ ९७ ॥
 संमुख न येववे श्रीरघुनाथा । चोरोनि पळालासी घेवोनि सीता ।
 त्यासीं युद्ध करीन म्हणतां । निर्लज्ज तूं रावणा ॥ ९८ ॥
 तुझें शुभचिन्ह कळलें आतां । भीक लागली चोरितां सीता ।
 त्यासी तुझी राज्यसत्ता । नुरे सर्वथा रावणा ॥ ९९ ॥
 तुझा हात गा हळुवट । घावो अतिशयों पोंचट ।
 माझी लोम न तुटे स्पष्ट । अहा कटकट राक्षसां ॥ १०० ॥
 
 
प्रहस्त प्रधानाकडून मारूतीला प्रश्न : 
 
संमुख बैसोनि लंकानाथा । निःशंक बोलतां हनुमंता । चिंता रावणाच्या चित्ता । अवध्यता वानरीं ॥ १०१ ॥
 अवध्य जाणतां वानरासी । प्रहस्ताहातीं पुसवी त्यासी ।
 तूं कोण कोणाचा कैंचा आलासी । वन भंगिलें किमर्थ ॥ १०२ ॥
 
 
मारूतीचे कथन : 
 
रावण राजा प्रतापराशी । भेटी न घडे वानरासीं । म्हणोनि भंगिलें वनासी । दशमुखासी भेटावया ॥ १०३ ॥
 राक्षस आले मारावयासी । म्हणोनि युद्ध केलें त्यांसी ।
 वांचवावया निजदेहासी । राक्षसांसी मारिलें ॥ १०४ ॥
 
 
रावणाचा उपहास, धिक्कार, त्याच्या समोर मारूतीच्या चेष्टा : 
 
ऐसें सांगोनि प्रहस्तासी । हनुमान बोले निजवृत्तांतासी । दृष्टीं नाणी प्रहस्तासी । राक्षसांसी गणीना ॥ १०५ ॥
 दशमुखाचे संमुख । पुच्छासनीं बैसला देख ।
 हनुमंत अतिशयेंसी निःशंक । नव्हे साशंक रावणा ॥ १०६ ॥
 रावणासंमुख हनुमंत । बैसल्या वांकुल्या दावित ।
 सवेंचि डोळे मिचकावित । अंगोठा दावित नोकूनी ॥ १०७ ॥
 हनुमंत न भी राक्षसांसी । दृष्टीं नाणी प्रधानासी ।
 रावण जाणोनि मानसीं । स्वमुखें त्यासी पुसतसें ॥ १०८ ॥
 
 
रावण-मारूती प्रश्नोत्तर : 
 
रावण हेळसोनि बोले उत्तर । अरे तूं कोणाचा वानर । ऐक रे रावणा प्रत्युत्तर । सत्य साचार सांगेन ॥ १०९ ॥
 मारिले बनकर किंकर । जंबुमाळी निशाचर ।
 रणीं मारिले प्रधानकुमर । तो मी वानर महावीर ॥ ११० ॥
 पंच सेनानी मारिले शूर । निर्दळिला सैन्यसंभार ।
 रणीं मारिला अखया कुमर । तो मी वानर महावीर ॥ १११ ॥
 मारिलासे अखया सुत । ज्येष्ठ गांजिला इंद्रजित ।
 त्याच्या सेने केला निःपात । तो मी हनुमंत महावीर ॥ ११२ ॥
 वनविध्वंस कवण्या चाडां । जैसे उपडिले म्या झाडां ।
 तैसें राक्षसकुळउपाडा । करूं रोकडा मी आलों ॥ ११३ ॥
 तूं कोणाचा कैंचा कोण । येथें यावया काय कारण ।
 ऐसा पुसिला जो प्रश्न । तयाचें उत्तर अवधारीं ॥ ११४ ॥
 सुबाहुताटकानिर्दळण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
 त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवों आलों ॥ ११५ ॥
 चौदा सहस्त्र रक्षोगण । वधूनि घेतलें जनस्थान ।
 त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवों आलों ॥ ११६ ॥
 विराध मारिला विंधोनि बाणें । मारीच कपटी मारिला जेणें ।
 त्या श्रीरामाचा भक्त मी जाणें । तुझा प्राण घेवों आलों ॥ ११७ ॥
 कोदंडधारियां दीक्षागुरू । सूर्यवंशी श्रीरामचंद्रु ।
 त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करूं आलों ॥ ११८ ॥
 दंडधारिया परम गुरू । कामक्रोध वधी रघुवीरू ।
 त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करूं आलां ॥ ११९ ॥
 म्हणसी वधावया रावण । तुज कैंची रे आंगवण ।
 माझें बळ असाधारण । नाहीं प्रमाण रणमारा ॥ १२० ॥
 लागतां बाहुबळचपेट । मेरूमांदार होती पीठ ।
 रावण दशमुख कीट । लंकात्रिकूट तें किती ॥ १२१ ॥
 दशमुखांचिया हारी । शिरें छेदीन नखाग्रीं ।
 जेंवी पतंग अग्नीवरी । तैसी परी राक्षसां ॥ १२२ ॥
 रावणा ऐसे दशकंठी । मिनलिया कोट्यनुकोटी ।
 त्यातें निर्दळीन वामांगुष्ठी । लंकात्रिकूटीसमवेत ॥ १२३ ॥
 जळो ती रावणा तुझी पुरूषार्थ थोरी । जळो तो राजा तो होय भिकारी ।
 जळो तें कर्म करणें चोरी । परनारी पतिव्रता ॥ १२४ ॥
 जळों तें रावणां तुझें कुळ । जळों तें रावणा तुझें शीळ ।
 जळों तें रावणा तुझें बळ । पापीं तूं केवळ परद्वारी ॥ १२५ ॥
 धिक् धिक् रावणा राक्षसजाती । धिक् धिक् रावणा तुझी ख्याती ।
 धिक् धिक् रावणा तुझी कीर्ती । झाली अपकीर्ती तिहीं लोकीं ॥ १२६ ॥
 धिक् धिक् रावणा तुझी श्रीमंती । धिक् धिक् रावणा तुझी शक्ती ।
 धिक् धिक् तो खड्गा तुझ्या मुष्टीं । लव मारूतीची न तुटे ॥ १२७ ॥
 धिक् धिक् रावणा तुझे जन्म । धिक् धिक् रावणा तुझा धर्म ।
 धिक् धिक् रावणा तुझें कर्म । निंद्य परम तिहीं लोकीं ॥ १२८ ॥
 धिक् धिक् जीवित्व तुझी ख्याती । धिक् धिक् रावणा तुझी शौर्यवृत्ती ।
 परोक्ष हरिली सीता सती । बाणभयें भीसी श्रीरामा ॥ १२९ ॥
 माझ्या स्वामीची चोरिली नारी । तूं तंव माझा प्रत्यक्ष वैरी ।
 मी तंव सीतेचा धांवणेकरी । तुजला मारीन मी आतां ॥ १३० ॥
 तुजसीं प्रत्यक्ष व्हावया भेटी । वनीं वृक्षां केली अटाटी ।
 राक्षस मारिले कोट्यनुकोटी । तुज दृष्टी देखावया ॥ १३१ ॥
 तुज म्यां देखावया दृष्टीं । बंधना लावूं दिधलें कंठी ।
 लत्ता टोले साहोनि मुष्टी । तुझिये भेटी मी आलो ॥ १३२ ॥
 तुझे भेटीचें हेंचि फळ । तुज म्यां मारावें तत्काळ ।
 सिद्धि नेवोनि श्रीरामसळ । जनकबाळ सोडवावी ॥ १३३ ॥
 त्या तुज मज जाली भेटी । तुवां पुसिली जी गुह्यगोष्टी ।
 ते म्यां सांगितली परिपाटी । मरण शेवटीं उरलेसें ॥ १३४ ॥
 तुझ्या आंगीं सबळ बळ । सैन्य सेनानी प्रधान प्रबळ ।
 मज मारोनी तत्काळ । जनकबाळ भोगावी ॥ १३५ ॥
 राक्षसां देखतां स्पष्टा । तुझें मर्दीन मी ओष्ठा ।
 तुझ्या छेदावया दशकंठां । आलों मी वांटा रामाचा ॥ १३६ ॥
 ऐसें बोलतां महाबळी । फिंदारल्या रोमावळी ।
 लांगूल त्राहाटिलें भूतळीं । वटारिलें निराळीं कपिपुच्छा ॥ १३७ ॥
 माथां शेंडी थरथराट । वाटरिले नेत्रवाट ।
 तंव कांपिंनला दशकंठ । समसगट राक्षसां ॥ १३८ ॥
 करावया सर्व संहार । जैसा वाढे प्रळयरूद्र ।
 तैसा वाढला वानर । निशाचर कांपती ॥ १३९ ॥
 मी तंव एककें एक वानर । श्रीरामाचा निजकिंकर ।
 तुझे कोट्यनुकोटि झुंझार । मजसमोर करीं उभे ॥ १४० ॥
 मशकें कोट्यनुकोटी झुंझार । मज मारितां दशशिर ।
 कोण राखेल निशाचर । सुरासुर पाहों पां ॥ १४१ ॥
 क्षोभला देखोनि हनुमंत । इंद्रजित चळाचळां कांपत ।
 आजि निमाला लंकानाथ । करील घात वानर ॥ १४२ ॥
 निश्चयें रावणा आला अंत । ऐसें इंद्रजित चिंतित ।
 तंव बोलिला हनुमंत । राही वृत्तांत अवधारा ॥ १४३ ॥
 रणीं मारोनि रावण । करोनि सीतासोडवण ।
 श्रीरामापासीं नेतां जाण । मज कोण निवारी ॥ १४४ ॥
 इतुकें करितां न लगे क्षण । परी श्रीरामें वाहिली आण ।
 दक्षिणहस्तें विंधोनि बाण । रणीं रावण मारणें ॥ १४५ ॥
 मारोनियां दशशिरा । स्वस्थ करीन वसुंधरा ।
 सुखी करावें चराचरा । श्रीरामचंद्रा निजनेम ॥ १४६ ॥
 सोडावी देवांची बांधवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
 उभारावी रामराज्याची गुढी । मर्यादा गाढी श्रीरामें ॥ १४७ ॥
 श्रीराम बळवंतांचें बळ । श्रीरामबळें वीर सबळ ।
 श्रीरामाचें सत्य शीळ । प्रतिज्ञा अढळ रामाची ॥ १४८ ॥
 रामें मारावें लंकानाथा । सत्य प्रतिज्ञा श्रीरघुनाथा ।
 माझ्यानें न करवे अन्यथा । केंवी मी आतां तुज मारूं ॥ १४९ ॥
 संमुख देखिल्या दशानन । वानरें उडोनि घ्यावा प्राण ।
 रागें वाचंविला रावण । स्वहस्तें आपण न मारावें ॥ १५० ॥
 
 
मारूतीच्या भाषणाने इंद्रजितास चिंता : 
 
श्रीराम प्रतिज्ञेची पाखर । तेणें वांचविला दशशिर । रावणा न मारीच वानर । मर्यादामेरू नुल्लंघी ॥ १५१ ॥
 रावणा तुज मी मारीन आतां । ऐसें बोलतां हनुमंता ।
 इंद्रजितासी परम चिंता । आला लंकानाथा अपघात ॥ १५२ ॥
 
 
बिभीषणास सांगणे : 
 
इंद्रजित बिभीषणा सांगत । आजि निमाला लंकानाथ । क्रोधें खवळला हनुमंत । उपाय येथें चालेना ॥ १५३ ॥
 न चले शस्त्र अस्त्र सकळ । न चले वानरासीं बळ ।
 न चले कपटविद्याछळ । बळें प्रबळ वानर ॥ १५४ ॥
 मंत्रशक्ती तंत्रशक्ती । नातळे आक्रमविद्याशक्ती ।
 न चले मायामोहनशक्ती । रणीं मारूती नाटोपे ॥ १५५ ॥
 वानर नाटोपे सैन्यासीं । शेखी नाटोपे ब्रह्मपाशीं ।
 तो केंवी आटोपे रावणासी । बिभीषणासीं सांगत ॥ १५६ ॥
 जें जें बांधावें बंधन । वानर ना म्हणे आपण ।
 तृणासमान त्यासी मरण । निर्बंधन पाशबंधीं ॥ १५७ ॥
 
 
बिभीषणाची रावणाला सूचना : 
 
ऐसें इंद्रजितें सांगतां । बिभीषण म्हणे लंकानाथा । वानर अवध्य तत्वतां । तुज वधितां वधवेना ॥ १५८ ॥
 वानर न वधवे सर्वथा । ऐसें कळले लंकानाथा ।
 श्रीरामा अर्पोनि सीता । शरण रघुनाथा निघावे ॥ १५९ ॥
 श्रीरामा निघालिया शरण । आम्हांसीं नाहीं जन्ममरण ।
 त्रिसत्य सत्य रावणा जाण । विचार आन न करावा ॥ १६० ॥
 अन्यथा विचार करूं जातां । रोकडें हनुमंत करील घाता ।
 उपाय न चले सर्वथा । लंकानाथा भुलूं नको ॥ १६१ ॥
 श्रीरामाचें एक वानर । आम्हां नाटोपे साचार ।
 कोपोनि आलिया श्रीरघुवीर । रण दुर्धर कोण साहे ॥ १६२ ॥
 अर्पोनियां जानकीतें । काया वाचा चित्तें वित्तें ।
 शरण निघालिया रघूत्तमातें । कल्याणातें पावाल ॥ १६३ ॥
 एकाजनार्दना शरण । सत्त्वबुद्धि बिभीषण ।
 ते बुद्धि न मानी रावण । गर्वाभिमान तों ऐका ॥ १६४ ॥
 वानरा वनचराचे भेण । रिघतां श्रीरामासी शरण ।
 तें मज आलें उणेपण । जगीं जघन्य वाढिवे ॥ १६५ ॥
 मरण पुसोनि कपिनाथा । त्याचेनि बोलें त्याचे घाता ।
 बुद्धि विचारूनि हनुमंता । कुबुद्धितां रावणीं ॥ १६६ ॥
 जटायूनें केला कासाविसी । सिंतरोनि म्यां मारिलें त्यासी ।
 तैंसेंचि करीन हनुमंतासी । रावणापासी कुबुद्धि ॥ १६७ ॥
 एकाजनार्दना शरण । पुसतां हनुमंतासी मरण ।
 दहाही मुखें होरपळून । करील दहन लंकेचें ॥ १६८ ॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
 रावण सभाहनूमदागमनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
 ॥ ओव्यां १६८ ॥ श्लोक १८ ॥ एवं संख्या १८६ ॥
 
 
 
 GO TOP 
 
 |