श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ विंशत्यधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्यानुनयेनेन्द्रेण मृतवानराणां उज्जीवनं देवानां प्रस्थानं वानरसेनाया विश्रामश्च -
श्रीरामांच्या अनुरोधाने इंद्रांनी मेलेल्या वानरांना जीवित करणे, देवतांचे प्रस्थान आणि वानरसेनेचा विश्राम -
प्रतिप्रयाते काकुत्स्थे महेन्द्रः पाकशासनः ।
अब्रवीत् परमप्रीतो राघवं प्राञ्जलिं स्थितम् ।। १ ।।
महाराज दशरथ परत गेल्यावर पाकशासन इंद्रांनी अत्यंत प्रसन्न होऊन हात जोडून उभे असलेल्या राघवांना म्हटले - ॥१॥
अमोघं दर्शनं राम तवास्माकं परन्तप ।
प्रीतियुक्ताः स्म तेन त्वं ब्रूहि यन्मनसेच्छसि ।। २ ।।
नरश्रेष्ठ रामा ! तुम्हांला जे माझे दर्शन झाले आहे ते व्यर्थ होता उपयोगी नाही आणि आम्ही तुझ्यावर फार प्रसन्न आहोत म्हणून तुझ्या मनांत जी इच्छा असेल ती मला सांग. ॥२॥
एवमुक्तो महेन्द्रेण प्रसन्नेन महात्मना ।
सुप्रसन्नमना हृष्टो वचनं प्राह राघव ।। ३ ।।
महात्मा इंद्रांनी जेव्हा प्रसन्न होऊन असे म्हटले तेव्हा राघवांच्या मनाला फार प्रसन्नता वाटली. त्यांनी हर्षाने म्हटले - ॥३॥
यदि प्रीतिः समुत्पन्ना मयि ते विबुधेश्वर ।
वक्ष्यामि कुरु ते सत्यं वचनं वदतां वर ।। ४ ।।
वक्त्यांमध्ये श्रेष्ठ देवेश्वरा ! जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मी आपल्याला एक प्रार्थना करीन - आपण माझी ती प्रार्थना सफल करावी. ॥४॥
मम हेतोः पराक्रान्ता ये गता यमसादनम् ।
ते सर्वे जिवितं प्राप्य समुत्तिष्ठन्तु वानराः ।। ५ ।।
माझ्यासाठी युद्धात पराक्रम करून जे यमलोकास निघून गेले आहेत ते सर्व वानर नवीन जीवन प्राप्त करून उभे राहावेत. ॥५॥
मत्कृते विप्रयुक्ता ये पुत्रैर्दारैश्च वानराः ।
तान् प्रीतमनसः सर्वान् द्रष्टुमिच्छामि मानद ।। ६ ।।
मानद ! जे वानर माझ्यासाठी आपल्या स्त्री-पुत्रांपासून दुरावले आहेत, त्या सर्वांना मी प्रसन्नचित्त पाहू इच्छितो. ॥६॥
विक्रान्ताश्चपि शूराश्च न मृत्युं गणयन्ति च ।
कृतयत्‍नाप विपन्नाश्च जीवयैतान् पुरंदर ॥ ७ ॥
पुरंदरा ! ते पराक्रमी आणि शूरवीर होते तसेच मृत्युला काही गणतच नव्हते. त्यांनी माझ्यासाठी फार प्रयत्‍न केले आहेत आणि शेवटी काळाच्या मुखांत निघून गेले आहेत. आपण त्या सर्वांना जिवंत करावे. ॥७॥
मत्प्रियेषु अभिरक्ताश्च न मृत्युं गणयन्ति च ।
त्वत्प्रसादात् समेयुस्ते वरमेतमहं वृणे ।। ८ ।।
जे वानर सदा माझे प्रिय करण्यात लागलेले होते आणि मृत्युलाही काही गणत नव्हते ते सर्व आपल्या कृपेने परत मला भेटोत - हा वर मी इच्छितो. ॥८॥
नीरुजो निर्व्रणांश्चैव सम्पन्नबलपौरुषान् ।
गोलाङ्‌गूलांस्तथर्क्षांश्च द्रष्टुमिच्छामि मानद ।। ९ ।।
दुसर्‍यांना मान देणार्‍या देवराजा ! मी त्या वानर, लंगूर आणि भालूंना निरोगी, व्रणहीन आणि बल-पौरूषाने संपन्न पाहू इच्छितो. ॥९॥
अकाले चापि पुष्पाणि मूलानि च फलानि च ।
नद्यश्च विमलास्तत्र तिष्ठेयुर्यत्र वानराः ।। १० ।।
हे वानर ज्या स्थानी राहातील तेथे असमयी सुद्धा फळे-मूळे आणि फुलांची विपुलता असावी आणि निर्मळ जलाच्या नद्या वहात असाव्यात. ॥१०॥
श्रुत्वा तु वचनं तस्य राघवस्य महात्मनः ।
महेन्द्रः प्रत्युवाचेदं वचनं प्रीतिसंयुतम् ।। ११ ।।
महात्मा राघवांचे हे वचन ऐकून महेंद्राने प्रसन्नतापूर्वक असे उत्तर दिले - ॥११॥
महानयं वरस्तात त्वयोक्तो रघूत्तमः ।
द्विर्मया नोक्तपूर्वं हि तस्मादेतद् भविष्यति ।। १२ ।।
तात ! रघूत्तमा ! आपण जो वर मागितला आहे तो फार मोठा आहे तथापि मी कधी दोन प्रकारचे बोलत नाही, म्हणून हा वर अवश्य सफल होईल. ॥१२॥
समुत्तिष्ठन्तु ते सर्वे हता ये युधि राक्षसैः ।
ऋक्षाश्च सह गोपुच्छैः निकृत्ताननबाहवः ॥ १३ ॥
जे युद्धात मारले गेले आहेत आणि राक्षसांनी ज्यांचे मस्तक तसेच भुजा छाटल्या आहेत, ते सर्व वानर, भालू आणि लंगूर जिवंत होऊन उठावे. ॥१३॥
नीरुजो निर्व्रणांश्चैव सम्पन्नबलपौरुषाः ।
समुत्थास्यन्ति हरयः सुप्ता निद्राक्षये यथा ॥ १४ ॥
झोप संपल्यावर उठणार्‍या मनुष्याप्रमाणे ते सर्व वानर निरोगी, व्रणहीन तसेच बल पौरूषाने संपन्न होऊन उठून बसतील. ॥१४॥
सुहृद्‌भिर्बान्धवैश्चैव ज्ञातिभिः स्वजनेन च ।
सर्व एव समेष्यन्ति संयुक्ताः परया मुदा ।। १५ ।।
सर्व परमानंदानी युक्त होऊन आपल्या सुहृदांना, बांधवांना जाति-बंधुना आणि स्वजनांना भेटतील. ॥१५॥
अकाले पुष्पशबलाः फलवन्तश्च पादपाः ।
भविष्यन्ति महेष्वास नद्यश्च सलिलायुताः ।। १६ ।।
महाधनुर्धर वीरा ! हे वानर जेथे राहातील तेथे असमयी ही वृक्ष फळाफुलांनी लगडलेले राहातील आणि नद्या जलांनी भरलेल्या राहातील. ॥१६॥
सव्रणैः प्रथमं गात्रैः इदानीं निर्व्रणैः समैः ।
ततः समुत्थिताः सर्वे सुप्त्वेव हरिसत्तमाः ॥ १७ ॥
इंद्रांनी असे म्हटल्यावर ते सर्व श्रेष्ठ वानर ज्यांची सर्व अंगे पूर्वी जखमांनी भरलेली होती त्या समयी घावरहित झाले आणि सर्व झोपून उठल्याप्रमाणे एकाएकी उठून उभे राहिले. ॥१७॥
बभूवुर्वानराः सर्वे किमेतदिति विस्मिताः ।
काकुत्स्थं परिपूर्णार्थं दृष्ट्‍वा सर्वे सुरोत्तमाः ॥ १८ ॥

अब्रुवन् परमप्रीताः स्तुत्वा रामं सलक्ष्मणम् ।
गच्छायोध्यामितो वीर विसर्जय च वानरान् ।। १९ ।।
यांना याप्रकारे जिवंत झालेले पाहून सर्व वानर आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले की ही काय गोष्ट झाली ? काकुत्स्थ रामांना सफल मनोरथ झालेले पाहून समस्त श्रेष्ठ देवता अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणासहित रामांची स्तुति करीत म्हणाले - राजन्‌ ! आता आपण येथून अयोध्येस चलावे आणि समस्त वानरांना निरोप द्यावा. ॥१८-१९॥
मैथिलीं सान्त्वयस्वैनां अनुरक्तां यशस्विनीम् ।
भ्रातरं भरतं पश्य त्वच्छोकाद् व्रतचारिणम् ॥ २० ॥
ही यशस्विनी मैथिली सीता सदा आपल्या ठिकाणीच अनुराग ठेवते. तिचे सान्त्वन करावे आणि भाऊ भरत आपल्या शोकाने पीडित होऊन व्रत करीत आहे, म्हणून जाऊन त्यास भेटावे. ॥२०॥
शत्रुघ्नं च महात्मानं मातॄः सर्वाः परंतप ।
अभिषेचय चात्मानं पौरान् गत्वा प्रहर्षय ।। २१ ।।
परंतप ! आपण महात्मा शत्रुघ्न आणि समस्त मातांना ही जाऊन भेटावे, आपणास अभिषेक करवावा आणि पुरवासी लोकांना हर्ष प्रदान करावा. ॥२१॥
एवमुक्त्वा सहस्राक्षो रामं सौमित्रिणा सह ।
विमानैः सूर्यसङ्‌काशैः ययौ हृष्टः सुरैः सह ।। २२ ।।
श्रीराम आणि सौमित्रास असे सांगून देवराज इंद्र सर्व देवतांसह सूर्यतुल्य तेजस्वी विमानांच्या द्वारा अत्यंत प्रसन्नतेने आपल्या लोकास निघून गेले. ॥२२॥
अभिवाद्य च काकुत्स्थः सर्वांस्तांस्त्रिदशोत्तमान् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा वासमाज्ञापयत् तदा ।। २३ ।।
त्या समस्त श्रेष्ठ देवतांना नमस्कार करून भाऊ लक्ष्मणासहित काकुत्स्थ श्रीरामांनी सर्वांना विश्राम करण्याची आज्ञा दिली. ॥२३॥
ततस्तु सा लक्ष्मणरामपालिता महाचमूर्हृष्टजना यशस्विनी ।
श्रिया ज्वलन्ती विरराज सर्वतो
निशा प्रणीतेव हि शीतरश्मिना ।। २४ ।।
श्रीराम आणि लक्ष्मण द्वारा सुरक्षित तसेच हृष्ट-पुष्ट सैनिकांनी भरलेली ती यशस्विनी विशाल सेना चंद्रम्याच्या चांदण्यानी प्रकाशित होणार्‍या रात्रीप्रमाणे अद्‍भुत शोभेने उद्‌भासित होऊन विराजत होती. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयो विंशत्यधिकशततमः सर्गः ।। १२० ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP