॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ सुन्दरकाण्ड ॥

॥ चतुर्थः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



हनुमान आणि रावण यांचा संवाद आणि लंकादहन


श्रीमहादेवौवाच
यान्तंकपीन्द्रं धृतपाशबन्धनं
    विलोकयन्तं नगरं विभीतवत् ।
अताडयन्मुष्टितलैः सुकोपनाः
    पौराः समन्तादनुयान्त ईक्षितुम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, ब्रह्मपाशात पकडला गेलेला तो कपिश्रेष्ठ निर्भय मनाने परंतु वरवर भ्याल्याप्रमाणे, लंकानगरी पाहात पाहात जात होता, तेव्हा अतिशय रागावलेले आणि त्याला पाहाण्यास सर्व बाजूंनी एकत्र येऊन त्याच्या मागोमाग जाणारे नगरवासी राक्षस त्याला बुक्क्यांनी मारू लागले. (१)

ब्रह्मास्त्रमेनं क्षणमात्रसङ्‌गमं
    कृत्वा गतं ब्रह्मवरेण सत्वरम् ।
ज्ञात्वा हनूमानपि फल्गुरज्जुभिः-
    धृतो ययौ कार्यविशेषगौरवात् ॥ २ ॥
ब्रह्मदेवाने मारुतीला दिलेल्या वरामुळे ब्रह्मास्त्राने त्याच्या देहाला क्षणमात्र स्पर्श केला आणि ते सत्वर निघून गेले, ही गोष्ट हनुमानाला कळली असूनसुद्धा काही विशिष्ट महत्त्वाचे कार्य पार पाडावयाचे असल्यामुळे, हनुमान साध्या दोऱ्यांनी बांधलेल्या स्थितीत जात होता. (२)

सभान्तरस्थस्य च रावणस्य तं
    पुरो निधायाह बलारिजित्तदा ।
बद्धोः मया ब्रह्मवरेण वानरः
    समागतोऽनेन हता महासुराः ॥ ३ ॥
राजसभेमध्ये बसलेल्या रावणापुढे त्या हनुमानाला उभे करून, इंद्रजित रावणाला म्हणाला, "ब्रह्मदेवाच्या वराच्या सामर्थ्याने बांधलेला हा वानर पकडून मी येथे आणला आहे. मोठमोठ्या राक्षसांना याने ठार केले आहे. (३)

यदुक्तमत्रार्य विचार्य मंत्रिभिः-
    विधीयतामेष न लौकिको हरिः ।
ततो विलोक्याह स राक्षसेश्वरः
    प्रहस्तमग्रे स्थितमञ्जनाद्रिभम् ॥ ४ ॥
महाराज, मंत्र्यांबरोबर विचार करून याचे बाबतीत जे योग्य आहे, ते तुम्ही करा. कारण हा वानर सामान्य नाही." त्यानंतर मारुतीकडे पाहिल्यावर, तो राक्षसराज समोर बसलेल्या, काजळाच्या पर्वताप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या प्रहस्त राक्षसाला म्हणाला. (४)

प्रहस्त पृच्छैनमसौ किमागतः
    किमत्र कार्यं कुत एव वानरः ।
वनं किमर्थं सकलं विनाशितं
    हताः किमर्थं मम राक्षसा बलात् ॥ ५ ॥
"अरे प्रहस्ता, या वानराला विचार की हा येथे का आला आहे ? त्याचे येथे काय काम आहे ? हा वानर कोठून आला ? याने संपूर्ण अशोकवन का नष्ट करून टाकले ? तसेच माझ्या राक्षसांना याने बळजबरीने का बरे ठार केले ?" (५)

ततः प्रहस्तो हनूमन्तमादरात्
    पप्रच्छ केन प्रहितोऽसि वानर ।
भयं च ते मास्तु विमोक्ष्यसे मया
    सत्यं वदस्वाखिलराजसन्निधौ ॥ ६ ॥
तेव्हा आदरपूर्वक प्रहस्ताने हनुमंताला प्रश्र केला, "अरे वानरा, तुला कोणी इकडे पाठविले आहे ? तू घाबरू नकोस. या राजराजेश्वर रावणाजवळ सत्य सांग, मी तुला सोडवीन." (६)

ततोऽतिहर्षात्पवनात्मजो रिपुं
    निरीक्ष्य लोकत्रयकण्टकासुरम् ।
वक्तुं प्रचक्रे रघुनाथसत्कथां
    क्रमेण रामं मनसा स्मरन्मुहुः ॥ ७ ॥
त्यानंतर तिन्ही लोकांना कंटकभूत असणाऱ्या असूर शत्रूला नीट पाहिल्यानंतर, मनात रामांचे वारंवार स्मरण करून, अतिशय आनंदाने, हनुमानाने श्रीरामांची सुंदर कथा क्रमाने सांगण्यास प्रारंभ केला. (७)

शृणु स्फुटं देवगणाद्यमित्र हे
    रामस्य दूतोऽहमशेषहृत्स्थितेः ।
यस्याखिलेशस्य हृताधुना त्वया
    भार्या स्वनाशाय शुनेव सद्धविः ॥ ८ ॥
(तो म्हणाला,) "देवादिकांचा शत्रू असणाऱ्या हे रावणा, नीट ऐक. ज्या प्रमाणे एकादा कुत्रा यज्ञातील हवी चोरून नेतो, त्या प्रमाणे तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठी, ज्या सर्वेश्वर श्रीरामांची भार्या हरण करून आणली आहेस, त्या सर्वांच्या अंतःकरणात स्थित असणाऱ्या श्रीरामांचा मी दूत आहे. (८)

स राघवोऽभेत्य मतङ्पर्वतं
    सुग्रीवमैत्रीमनलस्य सन्निधौ ।
कृत्वैकबाणेन निहत्य वालिनं
    सुग्रीवमेवाधिपतिं चकार तम् ॥ ९ ॥
ते श्रीराघव मतंक पर्वतावर आले आणि अग्नीच्या साक्षीने त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली. नंतर एका बाणाने वालीचा वध करून, रामांनी सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले आहे. (९)

स वानराणामधिपो महाबली
    महाबलैर्वानरयूथकोटिभिः ।
रामेण सार्धं सह लक्ष्मणेन भोः
    प्रवर्षणेऽमर्षयुतोऽवतिष्ठते ॥ १० ॥
अरे रावणा, तो महाबलवान वानरांचा राजा सुग्रीव महाबलवान अशा कोट्यवधी वानरांच्या समूहाबरोबर आणि श्रीराम व लक्ष्मण यांच्यासह क्रोधयुक्त होऊन, सध्या प्रवर्षण नावाच्या पर्वतावर राहात आहे. (१०)

सञ्चोदितास्तेन महाहरीश्वरा
    धरायुतां मार्गयितुं दिशो दश ।
तत्राहमेकं पवनात्मजः कपिः
    सीतां विचिन्वञ्छनकैः समागतः ॥ ११ ॥
पृथ्वीकन्या सीतेचा शोध घेण्यासाठी त्याने दाही दिशांना मोठमोठे वानरश्रेष्ठ पाठविले आहेत. त्यांच्यापैकी मी एक वानर आहे. मी वायूचा पुत्र आहे. सीतेचा शोध करीत मी हळूहळू येथे आलो आहे. (११)

दृष्ट्वा मया पद्मपलाशलोचना
    सीता कपित्वाद्विपिनं विनाशितम् ।
दृष्ट्वा ततोऽहं रभसा समागतान्
    मां हन्तुकामान् धृतचापसायकान् ॥ १२ ॥
मया हतास्ते परिरक्षितं वपुः
    प्रियो हि देहोऽखिलदेहिनां प्रभो ।
ब्रह्मास्त्रपाशेन निबध्य मां ततः
    समागमन्मेघनिनादनामकः ॥ १३ ॥
कमलदलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या सीतेला मी भेटलो आहे. वानर जातीच्या हूड स्वभावाला अनुसरून मी अशोकवनाचा विध्वंस केला आहे. त्यानंतर मला ठार मारण्यासाठी धनुष्य बाण घेऊन वेगाने येणारे राक्षस जेव्हा मला दिसले, तेव्हा मी त्यांना ठार केले आणि माझ्या शरीराचे रक्षण केले. कारण, हे प्रभो, सर्व प्राण्यांना स्वतःचा देह प्रिय असतो. त्यानंतर मेघनाद नावाच्या राक्षसाने ब्रह्मास्त्राच्या पाशाने मला बांधून येथे आणले आहे. (१२-१३)

स्पृष्ट्वैव मा ब्रह्मवरप्रभावतः
    त्यक्‍त्वा गतं सर्वमवैमि रावण ।
तथाप्यहं बद्ध इवागतो हितं
    प्रवक्तुकामः करुणारसार्द्रधीः ॥ । १४ ॥
हे रावणा, ब्रह्मदेवाने दिलेल्या वराच्या प्रभावामुळे ते ब्रह्मास्त्र मला फक्त स्पर्श करून निघून गेले आहे, हे जरी मला माहीत होते तरीसुद्धा माझी बुद्धी करुणापूर्ण असल्यामुळे, तुला हितकारक गोष्ट सांगण्याच्या इच्छेने, एखाद्या बंद्याप्रमाणे मी येथे आलो आहे. (१४)

विचार्य लोकस्य विवेकतो गतिं
    न राक्षसीं बुद्धिमुपैहि रावण ।
दैवीं गतिं संसृतिमोक्षहैतुकीं
    समाश्रयात्यन्तहिताय देहिनः ॥ १५ ॥
हे रावणा, विवेक केल्यामुळे लोकांना चांगली गती मिळते म्हणून तू राक्षसी बुद्धीचा अंगीकार करू नकोस. प्राण्यांचे अतिशय हित करणारी आणि त्यांना संसारातून मुक्त करणारी अशी जी दैवी बुद्धी आहे, तिचा तू आश्रय घे. (१५)

त्वं ब्रह्मणो ह्युत्तमवंशसम्भवः ।
    पौलस्त्यपुत्रोऽसि कुबेरबान्धवः ।
देहात्मबुद्ध्यापि च पश्य राक्षसो
    नास्यात्मबुद्ध्या किमु राक्षसो नहि ॥ १६ ॥
तू ब्रह्मदेवांच्या उत्तम वंशात जन्माला आला आहेस. तू पुलस्त्यपुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस. हे बघ ! देह म्हणजेच आत्मा, अशा देहाल्पबुद्धीने जरी पाहिले तरी तू राक्षस नाहीस, मग देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे, अशा आत्मबुद्धीने पाहिले तर तू राक्षस नाहीसच, हे काय सांगावयास हवे ? (१६)

शरीरबुद्धीन्द्रियदुःखसन्ततिः
    न ते न च त्वं तव निर्विकारतः ।
अज्ञानहेतोश्च तथैश्च सन्तते
    रसत्त्वमस्या स्वपतो हि दृश्यवत् ॥ १७ ॥
तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिये आणि दुःखाचे ओघ हे तुझे गुण नाहीत, तसेच ते म्हणजे तू स्वतः नाहीस. ते सर्व अज्ञानामुळे वाटते. स्वप्नातील दृश्य जसे असत्य असते, तसे हे सर्व पदार्थ असत् आहेत. (१७)

इदं तु सत्यं तव नास्ति विक्रिया
    विकारहेतुर्न च तेऽद्वयत्वतः ।
यथा नभः सर्वगतं न लिप्यते
    तथा भवान् देहगतोऽपि सूक्ष्मकः ।
देहेन्द्रियप्राणशरीरसङ्‌गतः-
    त्वात्मेति बुद्ध्याखिलबन्धभाग्भवेत् ॥ १८ ॥
हे सत्य आहे की तुझ्या आत्मरूपात कोणताही विकार होत नाही. कारण आत्मा हा अद्वितीय असल्यामुळे त्याचे ठिकाणी विकारांचे कोणतेही कारण असत नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी ते कोणत्याही गुणदोषांनी लिप्त होत नाही, त्या प्रमाणे तू देहात राहात असलास, तरी सूक्ष्म असा आत्मा असल्यामुळे तू कशानेही लिप्त होत नाहीस. देह, इंद्रिये, प्राण आणि शरीर यांच्याशी आत्म्याचे मीलन झाले आहे, अशा बुद्धीनेच माणूस सर्व बंधनांत सापडतो. (१८)

चिन्मात्रमेवाहमजोऽहमक्षरो
    ह्यानन्दभावोऽहमिति प्रमुच्यते ।
देहोऽप्यनात्मा पृथिवीविकारजो
    न प्राण आत्मानिल एष एव सः ॥ १९ ॥
मी फक्त चैतन्य, जन्मरहित, अविनाशी आणि आनंद-स्वरूप आहे. अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न झालेला देह हा आत्मा नाही. तसेच प्राण म्हणजेही आत्मा नव्हे, कारण प्राण हा नुसता अचेतन वायूच आहे. (१९)

मनोऽप्यहङ्‌कारविकार एव नो
    न चापि बुद्धिः प्रकृतेर्विकारजा ।
आत्मा चिदानन्दमयोऽविकारवान्-
    देहादिसङ्‌घाद्व्यतिरिक्त ईश्वरः ॥ २० ॥
अहंकाराचा विकार असणारे मन हे सुद्धा आत्मा नाहीच; त्याचप्रमाणे प्रकृतीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी ही सुद्धा आत्मा नाही. आत्मा हा तर चिदानंदस्वरूप, विकाररहित, देह इत्यादी समुदायापेक्षा वेगळा, आणि त्यांचा स्वामी किंवा ईश्वर आहे. (२०)

निरञ्जनो मुक्त उपाधितः सदा
    ज्ञात्वैवमात्मानमितो विमुच्यते ।
अतोऽहमात्यन्तिकमोक्षसाधनं
    वक्ष्ये शृणुस्वावहितो महामते ॥ २१ ॥
तो आत्मा निरंजन, आणि उपाधीतून सदा मुक्त आहे. अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर, प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. म्हणून हे महाबुद्धिमाना, मी तुझ्यासाठी आत्यंतिक मोक्षाचे साधन सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. (२१)

विष्णोर्हि भक्तिः सुविशोधन धियः-
    ततो भवेज्ज्ञानमतीव निर्मलम् ।
विशुद्धतत्त्वानुभवो भवेत्ततः
    समग्विदित्वा परमं पदं व्रजेत् ॥ २२ ॥
विष्णूची भक्ती ही बुद्धीला अतिशय शुद्ध करणारी आहे; त्यानंतर अतिशय निर्मळ असे आत्मज्ञान होते. त्यानंतर विशुद्ध आत्मतत्त्वाचा अनुभव येईल. अशा प्रकारे योग्य प्रकारे आत्म्याला जाणल्यावर मनुष्य परमपदाप्रत जातो. (२२)

अतो भजस्वाद्य हरिं रमापतिं
    रामं पुराणं प्रकृते परं विभुम् ।
विसृज्य मौर्ख्यं हृदि शत्रुभावनां
    भजस्व रामं शरणागतप्रियम् ।
सीतां पुरस्कृत्य सपुत्रबान्धवो
    रामं नमस्कृत्य विमुच्यसे भयात् ॥ २३ ॥
म्हणून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या, पुराण पुरुष, सर्वव्यापक, आदिनारायण, लक्ष्मीपती रामाची भक्ती कर. तुझ्या हृदयातील शत्रुभावनारूपी मूर्खपणा टाकून देऊन, शरणागत माणसाविषयी प्रेम असणाऱ्या श्रीरामांचा आश्रय घे. सीतेला पुढे करून, पुत्र आणि बांधव यांच्यासह तू रामांना नमस्कार कर म्हणजे तू भयातून सुटशील. (२३)

रामं परात्मानमभावयञ्जनो
    भक्त्या हृदिस्थं सुखरूपमद्वयम् ।
कथं परं तीरमवाप्नुयाज्जनो
    भवाम्बुधेर्दुःखतरङ्‌गमालिनः ॥ २४ ॥
जो माणूस आपल्या हृदयांत असणार्‍या अद्वितीय, शुखस्वरूप, परमात्मा अशा रामांचे भक्तीने ध्यान करीत नाही, तो दुःखरूपी तरंगांनी भरलेल्या संसार सागराच्या पलीकडील तीराला कसा बरे पोचेल ? (२४)

नो चेत्त्वमज्ञानमयेन वह्निना
    ज्वलन्तमात्मानमरक्षितारिवत् ।
नयस्यधोऽधः स्वकृतैश्च पातकैः-
    विमोक्षशङ्‌का न च ते भविष्यति ॥ २५ ॥
अशा प्रकारे जर तू रामांचे ध्यान केले नाहीस, तर अज्ञानरूपी अग्नीने जळणाऱ्या स्वतःला एखाद्या शत्रूप्रमाणे तू सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. उलट आपण केलेल्या पापांनी तू स्वतःला अधोगतीला नेत राहशील. मग तुझ्याम्ो क्षाची कोणतीच शक्यता राहाणार नाही." (२५)

श्रुत्वामृतास्वादसमानभाषितं
    तद्वायुसूनोर्दशकन्धरोऽसुरः ।
अमृष्यमाणोऽतिरुषा कपीश्वरं
    जगाद रक्तांतविलोचनो ज्वलन् ॥२६ ॥
वायुसुताचे अमृताच्या आस्वादाप्रमाणे असणारे ते भाषण रावणाला सहन झाले नाही; म्हणून अतिशय रागाने त्याचे डोळे लाल बुंद झाले. त्याच्या अंगाचा भडका उडाला आणि तो हनुमानाला म्हणाला. (२६)

कथं ममाग्रे विलपस्यभीतवत्
    प्लवङ्‌गमानामधमोऽसि दुष्टधीः ।
क एष रामं कतमो वनेचरो
    निहन्मि सुग्रीवयुतं नराधमम् ॥ २७ ॥
"अरे दुष्ट बुद्धी असणाऱ्या वानरा, तू अधम वानर आहेस. बेडरपणे तू माझ्यापुढे कशी बरे फालतू बडबड करीत आहेस ? हा राम तरी असा कोण आहे ? आणि तो वनचर सुग्रीव तरी असा कोण आहे ? सुग्रीवासहित त्या नराधम रामाला मी ठार करीन. (२७)

त्वां चाद्य हत्वा जनकात्मजां ततो
    निहन्मि रामं सहलक्ष्मणं ततः ।
सुग्रीवमग्रे बलिनं कपीश्वरं
    सवानरं हन्म्यचिरेण वानर ।
श्रुत्वा दशग्रीववचः स मारुतिः-
    विवृद्धकोपेन दहन्निवासुरम् ॥ २८ ॥
अरे वानरा, आज प्रथम तुला ठार मारून, नंतर जनककन्या सीतेचा वध करून, त्यानंतर लक्ष्मणासकट रामाला मी ठार करीन आणि मग बलवान वानरराज सुग्रीवाला त्याच्या वानरांसकट लगेच ठार मारून टाकीन." रावणाचे ते बोलणे ऐकल्यावर, आपल्या रागाने जणू त्या रावणाला जाळीत मारुती बोलला. (२८)

न मे समा रावणकोटयोऽधम
    रामस्य दासोऽहमपारविक्रमः ।
श्रुत्वातिकोपेन हनूमतो वचो
    दशाननो राक्षसमेवमब्रवीत् ॥ २९ ॥
पार्श्वे स्थितं मारय खण्डशः कपिं
    पश्यन्तु सर्वेऽसुरमित्रबान्धवाः ।
निवारयामास ततो विभीषणो
    महासुरं सायुधमुद्यतं वधे ।
राजन्वधार्हो न भवेत्कथञ्चन
    प्रतापयुक्तैः परराजवानरः ॥ ३० ॥
"अरे नीचा, कोट्यवधी रावणसुद्धा माझी बरोबरी करू शकत नाहीत. मी श्रीरामांचा दास आहे आणि माझ्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही." हनुमंताचे हे बोलणे ऐकल्यावर, अतिशय रागाने रावणाने जवळच उभ्या असणाऱ्या एका राक्षसाला म्हटले, "अरे, या वानराचे तुकडे तुकडे करून याचा वध कर आणि हे सर्व असुर, त्यांचे मित्र आणि बांधव यांना पाहू दे." त्या वेळी शस्त्र उगारून मारुतीचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या त्या प्रचंड राक्षसाचे बिभीषणाने निवारण केले. आणि तो रावणाला म्हणाला, "हे राजन्, दुसऱ्या राजाकडून दूत म्हणून आलेला हा वानर कोणत्याही प्रकाराने ठार करणे योग्य ठरत नाही. (२९-३०)

हतेऽस्मिन्वानरे दूते वार्ता को वा निवेदयेत्
रामाय त्वं यमुद्दिश्य वधाय समुपस्थितः ॥ ३१ ॥
जर दूत म्हणून आलेल्या या वानराचा वध केला गेला, तर तू ज्यांच्या वधाला तयार झाला आहेस, त्या रामांना सर्व वार्ता कोण बरे निवेदन करील ? (३१)

अतो वधसमं किञ्चित् अन्यच्चिन्तय वानरे ।
सचिह्नो गच्छतु हरिः यं दृष्ट्वायास्यति द्रुतम् ॥ ३२ ॥
रामः सुग्रीवोसहितः ततो युद्धं भवेत्तव ।
विभीषणवचः श्रुत्वा रावणोऽप्येतदब्रवीत् ॥ ३३ ॥
म्हणून या वानराच्या बाबतीत वधासारखीच दुसरी कोणती तरी शिक्षा देण्याचा तू विचार कर. त्या शिक्षेची खूण घेऊन हा वानर परत जाऊ दे, म्हणजे त्याला पाहून सुग्रीवासह राम येथे त्वरित येतील. मग त्यांच्याशी तुझे युद्ध होईल." बिभीषणाचे हे वचन ऐकल्यावर रावणसुद्धा म्हणाला. (३२-३३)

वानराणां हि लाङ्‌गूले महामानो भवेत्किल ।
अतो वस्त्रादिभिः पुच्छं वेष्टयित्वा प्रयत्‍नतः ॥३४ ॥
वह्निना योजयित्वैनं भ्रामयित्वा पुरेऽभितः ।
विसर्जयत पश्यंतु सर्वे वानरयूथपाः ॥ ३५ ॥
"आपल्या शेपटीचा वानरांना मोठा अभिमान नक्कीच असतो. तेव्हा प्रयत्नपूर्वक याचे शेपूट वस्त्रे इत्यादींनी लपेटून टाका आणि मग त्या शेपटीला आग लावा. नंतर या वानराला आपल्या नगरात सगळीकडे फिरवा आणि त्याला सोडून द्या. तो परत गेल्यावर सर्व वानर समूहांचे प्रमुख त्याची दुर्दशा बघू देत." (३४-३५)

तथेति शणपट्टैश्च वस्त्रैरन्यैरनेकशः ।
तैलाक्तैर्वेष्टयामासुः लाङ्‌गूलं मारुतेर्दृढम् ॥ ३६ ॥
"ठीक आहे" असे म्हणून तागाच्या फडक्यांनी आणि तेलाने भिजलेल्या नाना प्रकारच्या अन्य वस्त्रांनी राक्षसांनी मारुतीचे शेपूट घट्ट बांधून टाकले. (३६)

पुच्छाग्रे किञ्चिदनलं दीपयित्वाथ राक्षसाः ।
रज्जुभिः सुदृढं बद्‍ध्वा धृत्वा तं बलिनोऽसुराः ॥ ३७ ॥
समन्ताद् भ्रामयामासुः चोरोऽयमिति वादिनः ।
तूर्यघोषैर्घोषयन्तः ताडयन्तो मुहुर्मुहुः ॥ ३८ ॥
त्याच्या शेपटीच्या टोकाला थोडासा अग्नी लावला. नंतर त्या बलवान राक्षसांनी मारुतीला दोऱ्यांनी घट्ट बांधून टाकले; त्याला धरून, त्याला वरचेवर बडवून काढीत, आणि वाद्यांच्या घोषात 'हा चोर आहे' असे ओरडत, बलवान राक्षस त्याला लंका नगरीत सगळीकडे फिरवू लागले. (३७-३८)

हनूमतापि तत्सर्वं सोढं किञ्चिच्चिकिर्षुणा ।
गत्वा तु पश्चिमद्वार-समीपं तत्र मारुतिः ॥ ३९ ॥
सूक्ष्म बभूव बन्धेभ्यो निःसृतः पुनरप्यसौ ।
बभूव पर्वताकारः तत उत्प्लुत्य गोपुरम् ॥ ४० ॥
तत्रैकं स्तम्भमादाय हत्वा तान् रक्षिणः क्षणात् ।
विचार्य कार्यशेषं स प्रासादाग्राद् गृहाद् गृहम् ॥ ४१ ॥
उत्प्लुत्योप्लुत्य सन्दीप्त पुच्छेन महता कपिः ।
ददाह लङ्‌कां अखिलां साट्टप्रासादतोरणाम् ॥ ४२ ॥
काही तरी अद्‌भूत कृत्य करण्याची इच्छा धरून हनुमंताने ते सर्व सहन केले. पुढे नगराच्या पश्चिम द्वाराजवळ येताच तेथे मारुतीने सूक्ष्म रूप धारण केले, तेव्हा तो त्या बंधनांतून मुक्त झाला. मग तो पुनः पर्वताच्या आकाराचा झाला. नंतर त्याने नगराच्या गोपुरावर उडी मारली. तेथे एक खांब उपटून, त्याने एका क्षणात त्या सर्व रक्षकांना ठार केले. मग उरलेल्या कार्याचा विचार करून, एका प्रासादावरून दुसऱ्या प्रासादावर, एका घरावरून दुसऱ्या घरावर सतत उड्या मारीत मारीत, आपल्या पेटलेल्या प्रचंड शेपटीने प्रासाद, तोरणे आणि वेशी या सर्वांसह संपूर्ण लंका नगरीला आग लावली. (३९-४२)

हा तात पुत्र नाथेति क्रंदमानाः समन्ततः ।
व्याप्ताः प्रासादशिखरेऽपि आरूढा दैत्ययोषितः ॥ ४३ ॥
देवता इव दृश्यन्ते पतन्त्यं पावकेऽखिलाः ।
विभीषणगृहं त्यक्‍त्वा सर्वं भस्मीकृतं पुरम् ॥ ४४ ॥
प्रासादांच्या माथ्यावर चढलेल्या, आणि 'अहो बाबा, अरे पोरा, अहो नाथ' असा आक्रोश करीत आगीत पडणाऱ्या त्या सर्व दैत्य स्त्रियासुद्धा देवतांप्रमाणे दिसत होत्या. बिभीषणाचे घर सोडून मारुतीने सर्व लंकानगर भस्मसात करून टाकले. (४३-४४)

तत उत्प्लुत्य जलधौ हनूमान् मारुतात्मजः ।
लाङ्‌गूलं मज्जयित्वान्तः स्वस्थचित्तो बभूव सः ॥ ४५ ॥
त्यानंतर हनुमानाने समुद्रात उडी घेतली आणि त्यात आपली शेपूट विझवून तो स्वस्थचित्त झाला. (४५)

वायोः प्रियसखित्वाच्च सीतया प्रार्थितोऽनलः ।
न ददाह हरेः पुच्छं बभूवात्यन्तशीतलः ॥ ४६ ॥
वायू हा प्रिय मित्र असल्यामुळे आणि सीतेने प्रार्थना केल्यामुळे, अग्नीने हनुमानाची शेपूट जाळली नाही. उलट तो अग्नी त्याला अत्यंत शीतल झाला. (४६)

यन्नाम-संस्मरण-धूतसमस्तपापाः-
    तापत्रयानलमपीह तरन्ति सद्यः ।
तस्यैव किं रघुवरस्य विशिष्टदूतः
    सन्तप्यते कथमसौ प्रकृतानलेन ॥ ४७ ॥
ज्यांच्या नामस्मरणाने मनुष्यांची सर्व पापे धुऊन जातात आणि ते ताबडतोब या जगात त्रिविध तापरूपी अग्नी पार करून जातात, त्याच रघुनाथांचा विशेष दूत असणारा तो हनुमान सामान्य अग्नीकडून कसा बरे जाळला जाईल ? (४७)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
सुन्दरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
इति श्रीमद्‌ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥


GO TOP