श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोननवतितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणस्य रक्षःसु प्रहारस्तेन वानरयूथपानां प्रोत्साहनं लक्ष्मणेनेन्द्रजितः सारथेर्वधो वानरैस्तदीयानामश्वानां विनिपातनम् -
विभीषणांचा राक्षसांवर प्रहार, त्यांचे वानरयूथपतिंना प्रोत्साहन देणे, लक्ष्मणांच्या द्वारा इन्द्रजिताच्या सारथ्याचा आणि वानरांच्या द्वारा त्याच्या घोड्‍यांचा वध -
युध्यमानौ ततो दृष्ट्‍वा प्रसक्तौ नरराक्षसौ ।
प्रभिन्नाविव मातङ्‌गौ परस्परजयैषिणौ ॥ १ ॥

तयोर्युद्धं द्रष्टुकामः वरचापधरो बली ।
शूरः स रावणभ्राता तस्थौ सङ्‌ग्राममूर्धनि ॥ २ ॥
लक्ष्मण आणि इन्द्रजित यांना दोन मदमस्त हत्तींप्रमाणे परस्परांवर विजय प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्धासक्त होऊन झुंजतांना पाहून त्या दोघांचे युद्ध पहाण्याच्या इच्छेने रावणाचे बलवान्‌ भाऊ शूरवीर विभीषण सुंदर धनुष्य धारण करून त्या युद्धाच्या तोंडावर तेथे येऊन उभे राहिले. ॥१-२॥
ततो विस्फारयामास महद् धनुरवस्थितः ।
उत्ससर्ज च तीक्ष्णाग्रान् राक्षसेषु महाशरान् ॥ ३ ॥
तेथे उभे राहून त्यांनी आपले विशाल धनुष्यास खेचले आणि राक्षसांवर तीक्ष्ण धारेच्या मोठमोठ्‍या बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३॥
ते शराः शिखिसंस्पर्शा निपतन्तः समाहिताः ।
राक्षसान् दारयामासुः वज्राणीव महागिरीन् ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे वज्र नामक अस्त्र मोठमोठ्‍या पर्वतांना विदीर्ण करते त्याप्रमाणे विभीषणाने सोडलेले ते बाण, ज्यांच्या स्पर्श अग्निप्रमाणे जाळणारा होता, राक्षसांवर पडून त्यांची अंगे चिरून टाकू लागले. ॥४॥
विभीषणस्यानुचराः तेऽपि शूलासिपट्टिशैः ।
चिच्छिदुः समरे वीरान् राक्षसान् राक्षसोत्तमाः ॥ ५ ॥
विभीषणांचे अनुचरही राक्षसांत श्रेष्ठ वीर होते, म्हणून ते ही समरांगणात शूल, खङ्‌ग आणि पट्‍टिशांच्या द्वारे वीर राक्षसांचा संहार करू लागले. ॥५॥
राक्षसैस्तैः परिवृतः स तदा तु विभीषणः ।
बभौ मध्ये प्रधृष्टानां कलभानामिव द्विपः ॥ ६ ॥
त्या चारी राक्षसांनी घेरलेले विभीषण धृष्ट गजशावकांच्या मध्ये उभे असलेल्या गजराजाप्रमाणे शोभा प्राप्त करत होते. ॥६॥
ततः सञ्चोदमानो वै हरीन् रक्षोवधप्रियान् ।
उवाच वचनं काले कालज्ञो रक्षसां वरः ॥ ७ ॥
राक्षसांमध्ये श्रेष्ठ विभीषण समयोचित कर्तव्य जाणत होते म्हणून त्यांनी वानरांना ज्यांना राक्षसांचा वध करणे प्रिय होते, युद्धासाठी प्रेरित करत असतांना, समयास अनुरूप गोष्ट सांगितली - ॥७॥
एकोऽयं राक्षसेन्द्रस्य परायणमिवस्थितः ।
एतच्छेषं बलं तस्य किं तिष्ठत हरीश्वराः ॥ ८ ॥
वानरेश्वरांनो ! आता उभे राहून बघत काय राहिला आहात ? राक्षसराजा रावणाचा हा एक मात्र आश्रय आहे, जो तुमच्या समोर उभा आहे. रावणाच्या सेनेचा इतकाच भाग आता शेष राहिलेला आहे. ॥८॥
अस्मिंश्च निहते पापे राक्षसे रणमूर्धनि ।
रावणं वर्जयित्वा तु शेषमस्य बलं हतम् ॥ ९ ॥
या युद्धाच्या तोंडावर या पापी राक्षस इन्द्रजिताच्या मारले जाण्याने रावणाला सोडून त्याची सर्व सेना जणु मेलेली आहे, असेच समजा. ॥९॥
प्रहस्तो निहतो वीरो निकुम्भश्च महाबलः ।
कुम्भकर्णश्च कुम्भश्च धूम्राक्षश्च निशाचरः ॥ १० ॥
वीर प्रहस्त मारला गेला, महाबली निकुम्भ, कुंभकर्ण, कुम्भ तसेच निशाचर धूम्राक्षही काळाच्या जबड्‍यात निघून गेले आहेत. ॥१०॥
जम्बुमाली महामाली तीक्ष्णवेगोऽशनिप्रभः ।
सुप्तघ्नो यज्ञकोपश्च वज्रदंष्ट्रश्च राक्षसः ॥ ११ ॥

संह्रादी विकटोऽरिघ्नः तपनो मन्द एव च ।
प्रघासः प्रघसश्चैव प्रजङ्‌घो जङ्‌घ एव च ॥ १२ ॥

अग्निकेतुश्च दुर्धर्षो रश्मिकेतुश्च वीर्यवान् ।
विद्युज्जिह्वो द्विजिह्वश्च सूर्यशत्रुश्च राक्षसः ॥ १३ ॥

अकम्पनः सुपार्श्वश्च चक्रमाली च राक्षसः ।
कम्पनः सत्त्ववन्तौ तौ देवान्तकनरान्तकौ ॥ १४ ॥
जम्बुमाळी, महामाळी, तीक्ष्णवेग, अशनिप्रभ, सुप्तघ्न, यज्ञकोष, राक्षस वज्रदंष्ट्र, संघ्नादी, विकट, अरिघ्न, तपन, मन्द, प्रघास, प्रघस, प्रजङ्‌घ, जङ्‌घ, दुर्जय अग्निकेतु, पराक्रमी रश्मिकेतु, विद्युञ्जिव्ह, द्विजिह्न, राक्षस सूर्यशत्रु, अकम्पन, सुपार्श्व, निशाचर चक्रमाळी, कम्पन तसेच ते दोघे शक्तिशाली वीर देवान्तक आणि नरान्तक - हे सर्व मारले गेले आहेत. ॥११-१४॥
एतान् निहत्यातिबलान् बहून् राक्षससत्तमान् ।
बाहुभ्यां सागरं तीर्त्वा लङ्‌घ्यतां गोष्पदं लघु ॥ १५ ॥
या अत्यंत बलशाली बहुसंख्य राक्षसशिरोमणींचा वध करून तुम्ही लोकांनी हातांनी पोहून समुद्र पार केला आहे. आता गाईच्या खुराबरोबर हा लहानसा राक्षस वाचलेला आहे. म्हणून यालाही शीघ्र ओलांडून जा. ॥१५॥
एतावदेव शेषं वो जेतव्यमिह वानराः ।
हताः सर्वे समागम्य राक्षसा बलदर्पिताः ॥ १६ ॥
वानरांनो ! इतकीच राक्षससेना आणखी शेष राहिलेली आहे जिला तुम्ही जिंकावयाचे. आपल्या बळाची घमेंड बाळगणारे प्राय: सर्व राक्षस तुमच्याशी भिडून मारले गेले आहेत. ॥१६॥
अयुक्तं निधनं कर्तुं पुत्रस्य जनितुर्मम ।
घृणामपास्य रामार्थे निहन्यां भ्रातुरात्मजम् ॥ १७ ॥
मी याच्या बापाचा भाऊ आहे. या नात्याने हा माझा पुत्र आहे. म्हणून माझ्यासाठी याचा वध करणे अनुचित आहे, तथापि श्रीरामांसाठी दयेला तिलांजली देऊन मी आपल्या या पुतण्याला मारण्यासाठी उद्यत झालो आहे. ॥१७॥
हन्तुकामस्य मे बाष्पं चक्षुश्चैव निरुध्यति ।
तमेवैष महाबाहुः लक्ष्मणः शमयिष्यति ॥ १८ ॥
जेव्हा मी स्वत: मारण्यासाठी याच्यावर हत्यार चालवू इच्छितो त्यासमयी अश्रु माझी दृष्टी बंद करून टाकतात, म्हणून हे महाबाहु लक्ष्मणच याचा विनाश करतील. ॥१८॥
वानरा घ्नत सम्भूय भृत्यानस्य समीपगान् ।
इति तेनातियशसा राक्षसेनाभिचोदिताः ॥ १९ ॥

वानरेन्द्रा जहृषिरे लाङ्‌गूलानि च विव्यधुः ।
वानरांनो ! तुम्ही लोक झुंडी बनवून याच्या समीपवर्ती सेवकांवर तुटून पडा आणि त्यांना मारून टाका. याप्रकारे अत्यंत यशस्वी राक्षस विभीषणाने प्रेरित केल्यावर वानर यूथपति हर्ष आणि उत्साहाने भरून गेले तसेच आपले पुच्छ आपटू लागले. ॥१९ १/२॥
ततस्ते कपिशार्दूलाः क्ष्वेलन्तश्च पुनः पुनः ।
मुमुचुर्विविधान् नादान् मेघान् दृष्ट्‍वेव बर्हिणः ॥ २० ॥
नंतर ते सिंहाप्रमाणे पराक्रमी वानर वारंवार गर्जना करत, ज्याप्रमाणे मेघांना पाहून मोर आपल्या बोलीत बोलू लागतात, त्याप्रमाणे नाना प्रकारचे शब्द काढू लागले. ॥२०॥
जाम्बवानपि तैः सर्वैः स्वयूथ्यैरभिसंवृतः ।
तेऽश्मभिस्ताडयामासुः नखैर्दन्तैश्च राक्षसान् ॥ २१ ॥
आपल्या यूथातील समस्त अस्वलांनी घेरलेले जाम्बवान्‌ तसेच ते वानर दगड, नखे आणि दातांनी तेथे राक्षसांचे ताडन करू लागले. ॥२१॥
निघ्नन्तमृक्षाधिपतिं राक्षसास्ते महाबलाः ।
परिवव्रुभयं त्यक्त्वा तमनेकविधायुधाः ॥ २२ ॥
आपल्यावर प्रहार करणार्‍या ऋक्षराज जाम्बवानास त्या महाबली राक्षसांनी भय सोडून चारी बाजुनी घेरून टाकले. त्यांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे होती. ॥२२॥
शरैः परशुभिस्तीक्ष्णैः पट्टिशैर्यष्टितोमरैः ।
जाम्बवन्तं मृधे जघ्नुः निघ्नन्तं राक्षसीं चमूम् ॥ २३ ॥
ते राक्षस सेनेचा संहार करणार्‍या जाम्बवानावर युद्धस्थळी बाण, तीक्ष्ण परशु, पट्‍टिश, काठ्‍या आणि तोमरांच्या द्वारा प्रहार करू लागले. ॥२३॥
स सम्प्रहारस्तुमुलः संजज्ञे कपिरक्षसाम् ।
देवासुराणां क्रुद्धानां यथा भीमो महास्वनः ॥ २४ ॥
वानर आणि राक्षसांचे ते महायुद्ध, क्रोधाने भरलेल्या देवासुर-संग्रामाप्रमाणे फार भयंकर होऊ लागले. त्यात फार मोठ मोठ्याने भयानक कोलाहल होऊ लागला. ॥२४॥
हनुमानपि सङ्‌क्रुद्धः सालमुत्पाट्य पर्वतात् ।
स लक्ष्मणं स्वयं पृष्ठाद् अवरोप्य महात्मनाः ॥ २५ ॥

रक्षसां कदनं चक्रे समासाद्य सहस्रशः ।
त्यासमयी महामनस्वी हनुमानाने लक्ष्मणांना आपल्या पाठीवरून खाली उतरविले आणि स्वत:ही अत्यंत कुपित होऊन पर्वतशिखराने तसेच एक सालवृक्ष उपटून हजारो राक्षसांचा संहार करू लागले. शत्रूंना त्यांना परास्त करणे फारच कठीण होते. ॥२५ १/२॥
स दत्त्वा तुमुलं युद्धं पितृव्यस्येन्द्रजिद् बली ॥ २६ ॥

लक्ष्मणं परवीरघ्नं पुनरेवाभ्यधावत ।
शत्रुवीरांचा संहार करणार्‍या बलवान्‌ इन्द्रजिताने आपल्या चुलत्यालाही घोर युद्धाचा अवसर देऊन पुन्हा लक्ष्मणांवर हल्ला केला. ॥२६ १/२॥
तौ प्रयुद्धौ तदा वीरौ मृधे लक्ष्मणराक्षसौ ॥ २७ ॥

शरौघानभिवर्षन्तौ जघ्नतुस्तौ परस्परम् ।
लक्ष्मण आणि इन्द्रजित दोन्ही वीर त्यासमयी रणभूमीवर अत्यंत वेगाने युद्ध करू लागले. ते दोघेही बाणसमूहांची वृष्टि करत एक दुसर्‍याला घायाळ करू लागले. ॥२७ १/२॥
अभीक्ष्णमन्तर्दधतुः शरजालैर्महाबलौ ॥ २८ ॥

चन्द्रादित्याविवोष्णान्ते यथा मेघैस्तरस्विनौ ।
ते महाबली वीर बाणांचे जणु जाळे पसरून वारंवार एकमेकांना झाकून टाकत होते. ज्याप्रमाणे वर्षाकाळी वेगशाली चन्द्र आणि सूर्य मेघांनी आच्छादित होतात अगदी त्याचप्रमाणे. ॥२८ १/२॥
न ह्यादानं न सन्धानं धनुषो वा परिग्रहः ॥ २९ ॥

न विप्रमोक्षो बाणानां न विकर्षो न विग्रहः ।
न मुष्टिप्रतिसन्धानं न लक्ष्यप्रतिपादनम् ॥ ३० ॥

अदृश्यत तयोस्तत्र युध्यतोः पाणिलाघवात् ।
युद्धात गुंतलेल्या त्या दोन्ही वीरांच्या हातात इतकी चपलता होती की भात्यातून बाण काढणे, धनुष्यावर ठेवणे, धनुष्याला या हातातून त्या हातात घेणे, त्याला मुठीत दृढतापूर्वक पकडणे, कानापर्यंत खेचणे, बाणांचा विभाग करणे, त्यांना सोडणे आणि लक्ष्यास वेधणे आदि काहीही दृष्टीला पडत नव्हते. ॥२९ -३० १/२॥
चापवेगप्रयुक्तैश्च बाणजालैः समन्ततः ॥ ३१ ॥

अन्तरिक्षेऽभ्संपन्ने न रूपाणि चकाशिरे ।
धनुष्यातून वेगाने सोडल्या गेलेल्या बाणसमूहांच्या द्वारा आकाश सर्व बाजूने झाकले गेले. म्हणून त्यात साकार वस्तुंना पहाणे बंद झाले. ॥३१ १/२॥
लक्ष्मणो रावणिं प्राप्य रावणिश्चापि लक्ष्मणम् ॥ ३२ ॥

अव्यवस्था भवत्युग्रा ताभ्यामन्योन्यविग्रहे ।
लक्ष्मण रावणकुमारा जवळ पोहोचून आणि रावणकुमार लक्ष्मणांच्या निकट जाऊन दोघे परस्परांशी झुंजू लागले. या प्रकारे युद्ध करत असता जेव्हा ते एकमेकांवर प्रहार करू लागले तेव्हा भयंकर अव्यवस्था निर्माण होत असे. क्षणोक्षणी हे निश्चित करणे कठीण होऊन जात होते की अमक्याचा विजय अथवा पराजय होईल. ॥३२ १/२॥
ताभ्यामुभाभ्यां तरसा विसृष्टैर्विशिखैः शितैः ॥ ३३ ॥

निरन्तरमिवाकाशं बभूव तमसा वृतम् ।
त्या दोघांच्या द्वारा वेगपूर्वक सोडले गेलेल्या तीक्ष्ण बाणांनी आकाश ठसाठस भरून गेले आणि तेथे अंधार पसरला. ॥३३ १/२॥
तैः पतद्‌भिश्च बहुभिः तयोः शरशतैः शितैः ॥ ३४ ॥

दिशश्च प्रदिशश्चैव बभूवुः शरसङ्‌कुलाः ।
तेथे पडणार्‍या बहुसंख्य अस्त्रांनी आणि शेकडो तीक्ष्ण सायकांनी संपूर्ण दिशा, विदिशा व्याप्त झाल्या. ॥३४ १/२॥
तमसा संवृतं सर्वं आसीत् प्रतिभयं महत् ॥ ३५ ॥

अस्तं गते सहस्रांशौ संवृतं तमसा च वै ।
रुधिरौघा महानद्यः प्रावर्तन्त सहस्रशः ॥ ३६ ॥
म्हणून सर्व काही अंधकाराने आच्छन्न झाले आणि फार भयंकर दृश्य दिसू लागले. सूर्य अस्तास गेला. सर्वत्र अंधार पसरला आणि रक्ताच्या प्रवाहाने परिपूर्ण हजारो मोठ मोठ्‍या नद्या वाहू लागल्या. ॥३५ -३६॥
क्रव्यादा दारुणा वाग्भिः चिक्षिपुर्भीमनिःस्वनम् ।
न तदानीं ववौ वायुः न च जज्वाल पावकः ॥ ३७ ॥
मांसभक्षी भयंकर जन्तु आपल्या वाणीद्वारा भयानक शब्द प्रकट करू लागले. त्या समयी वाराही वहात नव्हता आणि अग्निही प्रज्वलित नव्हता. ॥३७॥
स्वस्त्यस्तु लोकेभ्य इति जजल्पुश्च महर्षयः ।
सम्पेतुश्चात्र सम्प्राप्ता गन्धर्वाः सह चारणैः ॥ ३८ ॥
महर्षिगण बोलू लागले - ’संसाराचे कल्याण होवो !’ त्यासमयी गन्धर्वांना फार संताप झाला. ते चारणांसहित तेथून पळू लागले. ॥३८॥
अथ राक्षससिंहस्य कृष्णान् कनकभूषणान् ।
शरैश्चतुर्भिः सौमित्रिः विव्याध चतुरो हयान् ॥ ३९ ॥
त्यानंतर लक्ष्मणांनी चार बाण मारून त्या राक्षससिंहाच्या सोन्याच्या आभूषणांनी सजलेल्या काळ्या रंगाच्या चारी घोड्‍यांना बांधून टाकले. ॥३९॥
ततोऽपरेण भल्लेन शितेन निशितेन च ।
सम्पूर्णायतमुक्तेन सुपत्रेण सुवर्चसा ॥ ४० ॥

महेन्द्राशनिकल्पेन सुतस्य विचरिष्यतः ।
स तेन बाणाशनिना तलशब्दानुनादिना ॥ ४१ ॥

लाघवाद्राघवः श्रीमान् शिरः कायादपाहरत् ।
तत्पश्चात्‌ राघव श्रीमान्‌ लक्ष्मणांनी दुसरे तीक्ष्ण पाणीदार सुंदर पंखाच्या आणि चमकदार भल्लाने, जे इन्द्राच्या वज्राची बरोबरी करत होते तसेच ज्याला कानापर्यंत खेचून सोडले गेले होते, रणभूमीत विचरणार्‍या इन्द्रजिताच्या सारथ्याचे मस्तक शीघ्रतापूर्वक धडापासून वेगळे करून टाकले. तो वज्रोपम बाण सुटत असतांनाच करतलाच्या शब्दाने अनुनादित होऊन सणसणत पुढे घुसला होता. ॥४० -४१ १/२॥
स यन्तरि महातेजा हते मन्दोदरीसुतः ॥ ४२ ॥

स्वयं सारथ्यमकरोत् पुनश्च धनुरस्पृशत् ।
तद् अद्‌भुनतमभूत् तत्र सामर्थ्यं पश्यतां युधि ॥ ४३ ॥
सारथि मारला गेल्यावर महातेजस्वी मन्दोदरीकुमार इन्द्रजित स्वत:च सारथ्याचेही काम संभाळत - घोड्‍यांनाही काबूत ठेवत होता आणि शिवाय धनुष्यही चालवत होता. युद्धस्थळी त्याच्या द्वारा तेथे सारथ्याच्या कार्याचेही संपादन होणे दर्शकांच्या दृष्टीत फार अद्‍भुत गोष्ट होती. ॥४२-४३॥
हयेषु व्यग्रहस्तं तं विव्याध निशितैः शरैः ।
धनुष्यथ पुनर्व्यग्रं हयेषु मुमुचे शरान् ॥ ४४ ॥
इन्द्रजित जेव्हा घोड्‍यांना रोखण्यासाठी हात पुढे करी तेव्हा लक्ष्मण त्याला तीक्ष्ण बाणांनी विंधू लागत आणि जेव्हा तो युद्धासाठी धनुष्य उचलत असे तेव्हा त्याच्या घोड्‍यांवर बाणांचा प्रहार करीत होते. ॥४४॥
छिद्रेषु तेषु बाणौघैः विचरन्तं अभीतवत् ।
अर्दयामास समरे सौमित्रिः शीघ्रकृत्तमः ॥ ४५ ॥
त्या छिद्रांच्या (बाण प्रहारांच्या अवसरी) शीघ्रतापूर्वक हात चालविणार्‍या सौमित्र लक्ष्मणाने समरांगणात निर्भयपणे विचरत असलेल्या इन्द्रजिताला आपल्या बाण समूहांच्या द्वारा अत्यंत पीडित केले. ॥४५॥
निहतं सारथिं दृष्ट्‍वा समरे रावणात्मजः ।
प्रजहौ समरोद्धर्षं विषण्णः स बभूव ह ॥ ४६ ॥
समरभूमीमध्ये सारथ्याला मारला गेलेला पाहून रावणकुमाराने युद्धविषयक उत्साहाचा त्याग केला. तो विषादात बुडून गेला. ॥४६॥
विषण्णवदनं दृष्ट्‍वा राक्षसं हरियूथपाः ।
ततः परमसंहृष्टा लक्ष्मणं चाभ्यपूजयन् ॥ ४७ ॥
त्या राक्षसाच्या मुखावर विषाद पसरलेला पाहून ते वानर-यूथपति फार प्रसन्न झाले आणि लक्ष्मणांची वारंवार प्रशंसा करू लागले. ॥४७॥
ततः प्रमाथी रभसः शरभो गन्धमादनः ।
अमृष्यमाणाश्चत्वारः चक्रुर्वेगं हरीश्वराः ॥ ४८ ॥
तत्पश्चात्‌ प्रमाथी, शरभ, रभस आणि गन्धमादन - या चार वानरेश्वरांनी अमर्षाने भरून आपला महान्‌ वेग प्रकट केला. ॥४८॥
ते चास्य हयमुख्येषु तूर्णमुत्पत्य वानराः ।
चतुर्षु समहावीर्या निपेतुर्भीमविक्रमाः ॥ ४९ ॥
ते चारही वानर महान्‌ बलशाली आणि भयंकर पराक्रमी होते. ते एकाएकी उसळून इन्द्रजिताच्या चारी घोड्‍यांवर तुटून पडले. ॥४९॥
तेषामधिष्ठितानां तैः वानरैः पर्वतोपमैः ।
मुखेभ्यो रुधिरं व्यक्तं हयानां समवर्तत ॥ ५० ॥
त्या पर्वताकार वानरांच्या भाराने दबले गेल्याने त्या घोड्‍यांच्या मुखांतून रक्त निघू लागले. ॥५०॥
ते हया मथिता भग्ना व्यसवो धरणीं गताः ।
ते निहत्य हयांस्तस्य प्रमथ्य च महारथम् ।
पुनरुत्पत्य वेगेन तस्थुर्लक्ष्मणपार्श्वतः ॥ ५१ ॥
त्यांच्याकडून चिरडले गेल्यामुळे घोड्‍यांची अंगे भंग पावली आणि ते प्राणहीन होऊन पृथ्वीवर कोसळले. याप्रकारे घोड्‍यांचे प्राण घेऊन इन्द्रजिताच्या विशाल रथालाही मोडून तोडून ते चारी वानर पुन्हा वेगाने उसळले आणि लक्ष्मणांच्या जवळ येऊन उभे राहिले. ॥५१॥
स हताश्वादवप्लुत्य रथान्मथितसारथिः ।
शरवर्षेण सौमित्रिं अभ्यधावत रावणिः ॥ ५२ ॥
सारथि तर प्रथमच मारला गेला होता. जेव्हा घोडेही मारले गेले, तेव्हा रावणकुमार रथांतून उडी मारून खाली उतरला आणि बाणांची वृष्टि करत सौमित्राकडे धावला. ॥५२॥
ततो महेन्द्रप्रतिमः स लक्ष्मणः
पदातिनं तं निहतैर्हयोत्तमैः ।
सृजन्तमाजौ निशितान् शरोत्तमान्
भृशं तदा बाणगणैर्व्यदारयत् ॥ ५३ ॥
त्यासमयी इन्द्रासमान पराक्रमी लक्ष्मणांनी, श्रेष्ठ घोड्‍यांच्या मारले जाण्याने पायी चालत युद्धात तीक्ष्ण उत्तम बाणांची वृष्टि करणार्‍या इन्द्रजिताला आपल्या बाणसमूहांच्या माराने अत्यंत घायाळ केले. ॥५३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोननवतितमः सर्गः ॥ ८९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकोणनव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥८९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP