श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुर्विंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण लक्ष्मणं प्रति लंकाशोभां वर्णयित्वा सेना व्यूह्य स्थापयितुमादेशः; श्रीरामाज्ञया मुक्तेन शुकेन रावणमुपगम्य तदग्रे श्रीरामसैन्यशक्तेः प्राबलस्य वर्णनं रावणेन स्वबलस्य विकत्थनं च - श्रीरामांनी लक्ष्मणाजवळ लंकेच्या शोभेचे वर्णन करून सेनेला व्यूहबद्ध उभी राहण्यासाठी आदेश देणे, श्रीरामांच्या आज्ञेने बंधनमुक्त झालेल्या शुकाचे रावणाजवळ त्यांच्या सैन्यशक्तीची प्रबलता सांगणे तसेच रावणाचे आपल्या बळाचा डांगोरा पिटणे -
सा वीरसमिती राज्ञा विरराज व्यवस्थिता ।
शशिना शुभनक्षत्रा पौर्णमासीव शारदी ॥ १ ॥
सुग्रीवांनी त्या वीर वानरसेनेची यथोचित व्यवस्था केली होती. त्यामुळे ती सेना, चंद्रमा आणि शुभ नक्षत्रांनी युक्त शरत्कालीन पौर्णिमेप्रमाणे सुशोभित होत होती. ॥१॥
प्रचचाल च वेगेन त्रस्ता चैव वसुंधरा ।
पीड्यमाना बलौघेन तेन सागरवर्चसा ॥ २ ॥
तो विशाल सैन्यसमूह समुद्रासारखा भासत होता. त्याच्या भाराने दबलेली वसुधा भयभीत होऊन गेली आणि त्याच्या वेगाने डोलू लागली. ॥२॥
ततः शुश्रुवुराक्रुष्टं लङ्‌कायां काननौकसः ।
भेरीमृदंगसंघुष्टं तुमुलं लोमहर्षणम् ॥ ३ ॥
त्यानंतर वानरांनी लंकेमध्ये महान्‌ कोलाहल ऐकला जो भेरी आणि मृदुगांच्या गंभीर घोषात मिसळून गेल्याने फारच भयंकर आणि रोमांचकारी वाटत होता. ॥३॥
बभूवुस्तेन घोषेण संहृष्टा हरियूथपाः ।
अमृष्यमाणास्तद् घोषं विनेदुर्घोषवत्तरम् ॥ ४ ॥
तो तुमुलनाद ऐकून वानरयूथपति हर्ष आणि उत्साहाने भरून गेले आणि तो सहन करू न शकल्याने त्याच्याहून अधिक मोठ्‍याने जोरजोराने गर्जना करू लागले. ॥४॥
राक्षसास्तु प्लवंगानां शुश्रुवुश्चापि गर्जितम् ।
नर्दतामिव दृप्तानां मेघानामम्बरे स्वनम् ॥ ५ ॥
राक्षसांनी वानरांची ती गर्जना ऐकली, ज्यात दर्पाने भरून ते सिंहनाद करत होते. त्यांच्या आवाज आकाशात मेघांच्या गर्जनेप्रमाणे वाटत होता. ॥५॥
दृष्ट्‍वा दाशरथिर्लङ्‌कां चित्रध्वजपताकिनीम् ।
जगाम मनसा सीतां दूयमानेन चेतसा ॥ ६ ॥
दाशरथि श्रीरामांनी विचित्र ध्वजा पताकांनी सुशोभित लंकापुरीला पाहून व्यथितचित्ताने मनातल्या मनात सीतेचे स्मरण केले. ॥६॥
अत्र सा मृगशावाक्षी रावणेनोपरुध्यते ।
अभिभूता ग्रहेणेव लोहिताङ्‌गेन रोहिणी ॥ ७ ॥
ते मनातल्या मनात म्हणू लागले -हाय ! येथेच ती मृगलोचनी सीता रावणाच्या कैदेत पडलेली आहे. मंगळग्रहाने आक्रांत झालेल्या रोहिणी सारखी तिची दशा होत आहे. ॥७॥
दीर्घमुष्णं च निश्वस्य समुद्वीक्ष्य च लक्ष्मणम् ।
उवाच वचनं वीरः तत्कालहितमात्मनः ॥ ८ ॥
मनातल्या मनात असे म्हणून वीर श्रीराम दीर्घ उष्ण श्वास खेचू लागले आणि लक्ष्मणाकडे पाहून आपल्यासाठी समयानुकूल हितकारक वचन बोलले- ॥८॥
आलिखन्तीमिवाकाशं उत्थितां पश्य लक्ष्मण ।
मनसेव कृतां लङ्‌कां नगाग्रे विश्वकर्मणा ॥ ९ ॥
लक्ष्मणा ! या लंकेकडे तर पहा. ही आपल्या उंचीने आकाशात जणु रेखा ओढत असल्याप्रमाणे भासत आहे. असे कळून येत आहे की पूर्वकाळी विश्वकर्म्याने आपल्या मनानेच या पर्वतशिखरावर लंकापुरीची निर्मिती केली आहे. ॥९॥
विमानैर्बहुभिर्लङ्‌का संकीर्णा भुवि राजते ।
विष्णोः पदमिवाकाशं छादितं पाण्डुभिर्घनैः ॥ १० ॥
पूर्वकाळी ही पुरी अनेक सातमजली घरांनी परिपूर्ण बनविली गेली होती. हिच्या श्वेत आणि सघन विमानाकार भवनांनी भगवान्‌ विष्णूंच्या चरणस्थापनाचे स्थानभूत आकाश जणु आच्छादितसे झाले होते. ॥१०॥
पुष्पितैः शोभिता लङ्‌का वनैश्चैत्ररथोपमैः ।
नानापतगसङ्‌घुष्ट फलपुष्पोपगैः शुभैः ॥ ११ ॥
फुलांनी भरलेल्या चैत्ररथ वनासदृश्य सुंदर काननांनी लंकापुरी सुशोभित होत आहे. त्या काननात नाना प्रकारचे पक्षी कलरव करत आहेत. तसेच फळा फुलांच्या विपुलतेमुळे ते फार सुंदर भासत आहेत. ॥११॥
पश्य मत्तविहंगानि प्रलीनभ्रमराणि च ।
कोकिलाकुलखण्डानि दोधवीति शिवोऽनिलः ॥ १२ ॥
पहा, हा शीतल सुखद वायु, ज्यात मत्त पक्षी किलबिलाट करत आहेत, भ्रमर पानांफुलांत लीन होत आहेत तसेच ज्याचा प्रत्येक खंद कोकिळांचे समूह तसेच संगीताने व्याप्त आहेत अशा वनांना वारंवार कंपित करत राहिला आहे. ॥१२॥
इति दाशरथी रामो लक्ष्मणं समभाषत ।
बलं च तत्र विभजन् शास्त्रदृष्टेन कर्मणा ॥ १३ ॥
दाशरथी भगवान्‌ श्रीरामांनी लक्ष्मणांना असे म्हटले आणि युद्धाच्या शास्त्रीय नियमानुसार सेनेचे विभाग केले. ॥१३॥
शशास कपिसेनां तां बलादादाय वीर्यवान् ।
अङ्‌गदः सह नीलेन तिष्ठेदुरसि दुर्जयः ॥ १४ ॥
त्यासमयी भगवान्‌ श्रीरामांनी वानरसैनिकांना हा आदेश दिला - या विशाल सेनेमधून आपल्या सेनेला बरोबर घेऊन दुर्जय तसेच पराक्रमी वीर अंगद नीलासह वानरसेनेच्या पुरूषव्यूहामध्ये हृदयाच्या स्थानी स्थित होवो. ॥१४॥
तिष्ठेद् वानरवाहिन्या वानरौघसमावृतः ।
आश्रितो दक्षिणं पार्श्वं ऋषभो नाम वानरः ॥ १५ ॥
याच प्रकारे ऋषभ नामक वानर कपिंच्या समुदायाने घेरलेले राहून या वानर-वाहिनीच्या उजव्या पार्श्वभागी उभे राहू देत. ॥१५॥
गंधहस्तीव दुर्धर्षः तरस्वी गंधमादनः ।
तिष्ठेद् वानरवाहिन्याः सव्यं पार्श्वं अधिष्ठितः ॥ १६ ॥
जे गंधहत्ती समान दुर्जय आणि वेगवान्‌ आहेत ते कपिश्रेष्ठ गंधमादन वानरसेनेच्या वाम पार्श्वभागी उभे राहोत. ॥१६॥
मूर्ध्नि स्थास्याम्यहं युक्तो लक्ष्मणेन समन्वितः ।
जाम्बवांश्च सुषेणश्च वेगदर्शी च वानरः ॥ १७ ॥

ऋक्षमुख्या महात्मानः कुक्षिं रक्षन्तु ते त्रयः ।
मी लक्ष्मणासह सावधान राहून या व्यूहाच्या मस्तकाच्या स्थानी उभा राहीन. जांबवान्‌, सुषेण आणि वानर वेगदर्शी - हे तीन महामनस्वी वीर जे अस्वलांच्या सेनेत प्रधान आहेत, ते सैन्य व्यूहाच्या कुक्षिभागाचे रक्षण करोत. ॥१७ १/२॥
जघनं कपिसेनायाः कपिराजोऽभिरक्षतु ।
पश्चार्धमिव लोकस्य प्रचेतास्तेजसा वृतः ॥ १८ ॥
वानरराज सुग्रीव वानरवाहिनीच्या मागील भागाचे रक्षणात, जसे तेजस्वी वरुण या जगताच्या पश्चिम दिशेचे संरक्षण करतात त्याप्रमाणे तत्पर राहोत. ॥१८॥
सुविभक्तमहाव्यूहा महावानररक्षिता ।
अनीकिनी सा विबभौ यथा द्यौः साभ्रसंप्लवा ॥ १९ ॥
याप्रकारे सुंदर रीतीने विभक्त झालेली, विशाल व्यूहात बद्ध झालेली ती सेना, जिचे रक्षण मोठ मोठे वानर करत होते, मेघांनी घेरलेल्या आकाशासमान वाटत होती. ॥१९॥
प्रगृह्य गिरिशृंगाणि महतश्च महीरुहान् ।
आसेदुर्वानरा लङ्‌कां मिमर्दयिषवो रणे ॥ २० ॥
वानरलोक पर्वतांची शिखरे आणि मोठ मोठे वृक्ष घेऊन युद्धासाठी लंकेवर चढाई करू लागले. ते त्या पुरीला पददलित करून धुळीत मिळविण्याची इच्छा करत होते. ॥२०॥
शिखरैर्विकिरामैनां लङ्‌कां मुष्टिभिरेव वा ।
इति स्म दधिरे सर्वे मनांसि हरिपुंगवाः ॥ २१ ॥
सर्व वानरयूथपति असेच मनोरथ करत होते की आम्ही लंकेवर पर्वत शिखरांची वृष्टि करू आणि लंकावासीयांना बुक्क्यांनी मार मारून यमलोकी पोहोचवून देऊ. ॥२१॥
ततो रामो महातेजाः सुग्रीवमिदमब्रवीत् ।
सुविभक्तानि सैन्यानि शुक एष विमुच्यताम् ॥ २२ ॥
त्यानंतर महातेजस्वी श्रीरामांनी सुग्रीवास म्हटले- आपण आपल्या सेनेला सुंदर रीतीने विभक्त करून तिला व्यूहबद्ध करून ठेवले आहे म्हणून आता या शुकाला सोडून दिले जावे. ॥२२॥
रामस्य वचनं श्रुत्वा वानरेन्द्रो महाबलः ।
मोचयामास तं दूतं शुकं रामस्य शासनात् ॥ २३ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून महाबली वानरराजाने त्यांच्या आदेशाने रावणदूत शुकाला बंधनमुक्त करून टाकले. ॥२३॥
मोचितो रामवाक्येन वानरैश्च निपीडितः ।
शुकः परमसंत्रस्तो रक्षोधिपमुपागमत् ॥ २४ ॥
श्रीरामांच्या आज्ञेने सुटका होताच वानरांकडून पीडित झाल्याने अत्यंत भयभीत झालेला शुक राक्षसराजा जवळ गेला. ॥२४॥
रावणः प्रहसन्नेव शुकं वाक्यमभाषत ।
किमिमौ ते सितौ पक्षौ लूनपक्षश्च दृश्यसे ॥ २५ ॥

कच्चिन्नानेकचित्तानां तेषां त्वं वशमागतः ।
त्यासमयी रावणाने हसतच शुकाला म्हटले- हे तुझे पंख बांधले का गेले आहेत ? यामुळे तू असा दिसत आहेस की जणु तुझे पंख उपटले गेले आहेत. तू त्या चंचल चित्ताच्या वानरांच्या तावडीत तर सापडला नव्हतास ना ?॥२५ १/२॥
ततः स भयसंविग्नः तेन राज्ञाभिचोदितः ।
वचनं प्रत्युवाचेदं राक्षसाधिपमुत्तमम् ॥ २६ ॥
राजा रावणाने या प्रकारे विचारल्यावर भयाने घाबरलेल्या शुकाने त्यासमयी त्या श्रेष्ठ राक्षसराजाला याप्रकारे उत्तर दिले- ॥२६॥
सागरस्योत्तरे तीरे अब्रुवं ते वचनं तथा ।
यथासंदेशमक्लिष्टं सान्त्वयन् श्लक्ष्णया गिरा ॥ २७ ॥
महाराज ! मी समुद्राच्या उत्तर तटावर पोहोचून आपला संदेश अत्यंत स्पष्ट शब्दात मधुरवाणी द्वारा सांत्वना देत देत ऐकवला. ॥२७॥
क्रुद्धैस्तैरहमुत्प्लुत्य दृष्टमात्रैः प्लवंगमेः ।
गृहीतोऽस्म्यपि चारब्धो हन्तुं लोप्तुं च मुष्टिभिः ॥ २८ ॥
परंतु माझ्यावर दृष्टि पडताच कुपित झालेल्या वानरांनी उड्‍या मारून मला पकडले आणि गुद्‍यांनी मारण्यास तसेच पंख उपटण्यास आरंभ केला. ॥२८॥
नैव सम्भाषितुं शक्याः संप्रश्नोऽत्र न लभ्यते ।
प्रकृत्या कोपनास्तीक्ष्णा वानरा राक्षसाधिप ॥ २९ ॥
राक्षसराज ! ते वानर स्वभावत:च क्रोधी आणि तीक्ष्ण आहेत. त्यांच्याशी बोलता येणेही शक्य नव्हते. मग तुम्ही मला का मारत आहात असे विचारण्यास तरी अवसर कोठे होता ? ॥२९॥
स च हन्ता विराधस्य कबंधस्य खरस्य च ।
सुग्रीवसहितो रामः सीतायाः पदमागतः ॥ ३० ॥
जे विराध, कबंध आणि खराचा वध करून चुकले आहेत, ते श्रीराम सुग्रीवासह, सीतेच्या स्थानाचा पत्ता लागल्यामुळे, तिचा उध्दार करण्यासाठी आले आहेत. ॥३०॥
स कृत्वा सागरे सेतुं तीर्त्वा च लवणोदधिम् ।
एष रक्षांसि निर्धूय धन्वी तिष्ठति राघवः ॥ ३१ ॥
ते राघव समुद्रावर पूल बांधून लवणसागराला पार करून राक्षसांना गवताच्या काडीप्रमाणे (तुच्छ) समजून धनुष्य हातात घेऊन येथे जवळच उभे आहेत. ॥३१॥
ऋक्षवानरसङ्‌घानां अनीकानि सहस्रशः ।
गिरिमेघनिकाशानां छादयन्ति वसुंधराम् ॥ ३२ ॥
पर्वत आणि मेघांसमान विशालकाय अस्वले आणि वानरसमूहांच्या हजारो सेना या पृथ्वीवर पसरल्या आहेत. ॥३२॥
राक्षसानां बलौघस्य वानरेन्द्रबलस्य च ।
नैतयोर्विद्यते संधिः देवदानवयोरिव ॥ ३३ ॥
देवता आणि दानवांमध्ये ज्याप्रमाणे संधि होणे असंभाव्य आहे त्याप्रकारे राक्षस आणि वानरराज सुग्रीवांच्या सैनिकांमध्ये संधि होऊ शकत नाही. ॥३३॥
पुरा प्राकारमायान्ति क्षिप्रमेकतरं कुरु ।
सीतां चास्मै प्रयच्छाशु युद्धं वापि प्रदीयताम् ॥ ३४ ॥
म्हणून जो पर्यंत हे लंकापुरीच्या तटबंदीवर चढून आलेले नाहीत त्याच्या पूर्वीच आपण शीघ्रतापूर्वक दोहोपैकी एक काम करून टाकावे- एक तर तात्काळच त्यांना सीता परत द्यावी अथवा मग समोर उभे राहून युद्ध करावे. ॥३४॥
शुकस्य वचनं श्रुत्वा रावणो वाक्यमब्रवीत् ।
रोषसंरक्तनयनो निर्दहन्निव चक्षुषा ॥ ३५ ॥
शुकाचे हे बोलणे ऐकून रावणाचे डोळे रागाने लाल झाले. तो अशा रीतिने डोळे वटारून पाहू लागला की जणु आपल्या दृष्टीने त्याला दग्ध करून टाकील. तो म्हणाला- ॥३५॥
यदि मां प्रति युद्ध्येरन् देवगंधर्वदानवाः ।
नैव सीतां प्रयच्छामि सर्वलोकभयादपि ॥ ३६ ॥
जर देवता, गंधर्व आणि दानवही माझ्याशी युद्ध करण्यास तयार होतील तसेच सर्व संसारातील लोक मला भय दाखवू लागले तरीही मी सीतेला परत करणार नाही. ॥३६॥
कदा समभिधावन्ति मामकाः राघवं शराः ।
वसन्ते पुष्पितं मत्ता भ्रमरा इव पादपम् ॥ ३७ ॥
ज्याप्रमाणे मत्त भ्रमर वसंत ऋतुमध्ये फुलांनी भरलेल्या वृक्षांवर तुटून पडतात, त्याच प्रकारे माझे बाण कधी त्या राघवावर धावा करतील ? (हल्ला करतील ?) ॥३७॥
कदा शोणितदिग्धांगं र्दीप्तैः कार्मुकविच्युतैः ।
शरैरादीपयिष्यामि उल्काभिरिव कुञ्जरम् ॥ ३८ ॥
असा अवसर कधी येईल की जेव्हा माझ्या धनुष्यातून सुटलेल्या तेजस्वी बाणांच्या द्वारा घायाळ होऊन रामाचे शरीर रक्तबंबाळ होईल आणि जळत असलेल्या उल्केने लोक हत्तीला जाळतात त्याचप्रकारे मी त्या बाणांनी रामांना दग्ध करून टाकीन. ॥३८॥
तच्चास्य बलमादास्ये बलेन महता वृतः ।
ज्योतिषामिव सर्वेषां प्रभामुद्यन् दिवाकरः ॥ ३९ ॥
जसा सूर्य उदयाबरोबरच समस्त नक्षत्रांची प्रभा हरण करतो, त्या प्रकारे मी विशाल सेनेसह रणभूमीमध्ये उभा राहून रामांच्या समस्त वानर-सेनेला आत्मसात्‌ करून घेईन. ॥३९॥
सागरस्येव मे वेगो मारुतस्येव मे बलम् ।
न हि दाशरथिर्वेद तेन मां योद्धुमिच्छति ॥ ४० ॥
दाशरथि रामाने अजून समरभूमिमध्ये समुद्रासमान माझा वेग आणि वायुसमान माझ्या बळाचा अनुभव केलेला नाही आहे म्हणून तो माझ्या बरोबर युद्ध करू इच्छित आहे. ॥४०॥
न मे तूणीशयान् बाणान् सविषानिव पन्नगान् ।
रामः पश्यति संग्रामे तेन मां योद्धुमिच्छति ॥ ४१ ॥
माझ्या भात्यात झोपी गेलेले बाण, विषधर सर्पासमान भयंकर आहेत. रामानी संग्रामात त्या बाणांना पाहिलेले नाही आहे म्हणून तर तो माझ्याशी झुंजण्याची इच्छा करत आहे. ॥४१॥
न जानाति पुरा वीर्यं मम युद्धे स राघवः ।
मम चापमयीं वीणां शरकोणैः प्रवादिताम् ॥ ४२ ॥

ज्याशब्दतुमुलां घोरां आर्तभीतमहास्वनाम् ।
नाराचतलसंनादां नदीमहितवाहिनीम् ।
अवगाह्य महारङ्‌गं वादयिष्याम्यहं रणे ॥ ४३ ॥
पूर्वी कधी युद्धात रामाचा माझ्या बळ-पराक्रमाशी संबंध आलेला नाही म्हणून तो माझ्याशी लढण्याचा उत्साह बाळगून आहे. माझे धनुष्य एक सुंदर वीणा आहे जी बाणांच्या कोनांनी वाजवली जात असते. तिच्या प्रत्यञ्चेपासून जो टणत्कार ध्वनि उठतो, तीच तिची भयंकर स्वरलहरी आहे. आर्तांचे चीत्कार आणि ओरडणे (हाका मारणे) हेच तिच्यावर उच्च स्वरात गायले जाणारे गीत आहे. नाराचांना सोडते समयी जो चट्‍ चट्‍ शब्द होत असतो, तोच जणु काही हातावर दिला जाणारा ताल आहे. वाहणार्‍या नदी समान जी शत्रुंची वाहिनी आहे तीच जणु या संगीतोत्सवासाठी विशाल रंगभूमी आहे. मी समरांगणात त्या रंगभूमिमध्ये प्रवेश करून आपली ती भयंकर वीणा वाजवीन. ॥४२-४३॥
न वासवेनापि सहस्रचक्षुषा
यथाऽस्मि शक्यो वरुणेन वा स्वयम् ।
यमेन वा धर्षयितुं शराग्निना
महाहवे वैश्रवणेन वा पुनः ॥ ४४ ॥
जरी महासमरात सहस्त्रनेत्रधारी इंद्र अथवा साक्षात्‌ वरूण अथवा स्वयं यमराज अथवा माझा मोठा भाऊ कुबेरही जरी आले, तरी तेही आपल्या बाणाग्निने मला पराजित करू शकत नाहीत. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चुतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चोविसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP