श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणेन निगूढतया शुकसारणयोः वानरसेनायां प्रेषणं विभीषणेन तयोर्निग्र्हणं श्रीरामकृपया मोक्षणं अदीयं संदेशमादाय ताभ्यां लंकां गत्वा रावणस्य प्रबोधनं च - रावणाने शुक आणि सारणाला गुप्तरूपाने वानरसेनेत धाडणे, विभीषणद्वारा त्यांचे पकडले जाणे, श्रीरामांच्या कृपेने सुटका होणे तसेच श्रीरामांचा संदेश घेऊन लंकेत परत येऊन त्यांनी रावणास समजाविणे -
सबले सागरं तीर्णे रामे दशरथात्मजे ।
अमात्यौ रावणः श्रीमान् अब्रवीच्छुकसारणौ ॥ १ ॥
दशरथात्मज भगवान्‌ राम जेव्हा सेनेसहित समुद्र पार करून चुकले, तेव्हा श्रीमान्‌ रावणाने आपले दोन्ही मंत्री शुक आणि सारण यांना पुन्हा म्हटले - ॥१॥
समग्रं सागरं तीर्णं दुस्तरं वानरं बलम् ।
अभूतपूर्वं रामेण सागरे सेतुबंधनम् ॥ २ ॥
जरी समुद्राला पार करणे अत्यंत कठीण होते तरी ही सारी वानरसेना त्याला ओलांडून इकडे चालत आली आहे. रामांच्या द्वारा सागरावर सेतु बांधला जाणे अभूतपूर्व कार्य आहे. ॥२॥
सागरे सेतुबंधं तु न श्रद्दध्यां कथंचन ।
अवश्यं चापि संख्येयं तन्मया वानरं बलम् ॥ ३ ॥
लोकांच्या मुखाने ऐकूनही मला कुठल्याही प्रकारे विश्वास वाटत नाही की समुद्रावर सेतु बांधला गेला आहे. वानरसेना किती आहे ? याचे ज्ञान मला अवश्य केले पाहिजे. ॥३॥
भवन्तौ वानरं सैन्यं प्रविश्यानुपलक्षितौ ।
परिमाणं च वीर्यं च ये च मुख्याः प्लवंगमाः ॥ ४ ॥

मंत्रिणो ये च रामस्य सुग्रीवस्य च सम्मताः ।
ये पूर्वमभिवर्तन्ते ये च शूराः प्लवंगमाः ॥ ५ ॥

स च सेतुर्यथा बद्धः सागरे सलिलार्णवे ।
निवेशं च यथा तेषां वानराणां महात्मनाम् ॥ ६ ॥

रामस्य व्यवसायं च वीर्यं प्रहरणानि च ।
लक्ष्मणस्य च वीर्यं च तत्त्वतो ज्ञातुमर्हथः ॥ ७ ॥

कश्च सेनापतिस्तेषां वानराणां महात्मनाम् ।
तच्च ज्ञात्वा यथातत्त्वं शीघ्रमागन्तुमर्हथः ॥ ८ ॥
तुम्ही दोघे अशा तर्‍हेने वानरसेनेत प्रवेश करा की तुम्हांला कोणी ओळखू शकणार नाही. तेथे जाऊन वानरांची सेना किती आहे याचा पत्ता लावा. त्यांची शक्ति किती आहे ? तिच्यात मुख्य मुख्य वानर कोण कोण आहेत ? श्रीराम आणि सुग्रीव यांच्या मनोऽनुकूल मंत्री कोण कोण आहेत ? कोण कोण शूरवीर वानर सेनेच्या पुढे राहातात ? अगाध जलराशीने भरलेल्या या समुद्रामध्ये हा पूल कशा तर्‍हेने बांधला गेला ? महामनस्वी वानरांची छावणी कशी पडली आहे ? श्रीराम आणि वीर लक्ष्मणाचा निश्चय काय आहे ? ते काय करू इच्छितात ? त्यांचे बळ-पराक्रम कसे आहेत ? त्या दोघांजवळ कोण कोणती अस्त्रे-शस्त्रे आहेत ? आणि त्या महामना वानरांचा प्रधान सेनापति कोण आहे ? या सर्व गोष्टींची तुम्ही व्यवस्थित माहिती मिळवा आणि सर्वांचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर शीघ्र परत या. ॥४-८॥
इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
हरिरूपधरौ वीरौ प्रविष्टौ वानरं बलम् ॥ ९ ॥
असा आदेश मिळाल्यावर दोन्ही वीर राक्षस शुक आणि सारण वानररूप धारण करून त्या वानर सेनेमध्ये घुसले. ॥९॥
ततस्तद् वानरं सैन्यं अचिन्त्यं लोमहर्षणम् ।
सङ्‌ख्यातुं नाध्यगच्छेतां तदा तौ शुकसारणौ ॥ १० ॥
वानरांची ती सेना किती आहे ? याची गणना करणे तर दूरच राहिले मनाने तिचा अंदाज घेणेही असंभव होते. त्या अपार सेनेला पाहून अंगावर काटा येत होता. त्या समयी शुक आणि सारण कुठल्याही प्रकारे तिची गणना करू शकले नाहीत. ॥१०॥
संस्थितं पर्वताग्रेषु निर्झरेषु गुहासु च ।
समुद्रस्य च तीरेषु वनेषूपवनेषु च ।
तरमाणं च तीर्णं च तर्तुकामं च सर्वशः ॥ ११ ॥
ती सेना पर्वतांच्या शिखरांवर, झर्‍यांच्या आसपास, गुफांमध्ये समुद्राच्या किनार्‍यावर तसेच वनांत आणि उपवनामध्ये ही पसरलेली होती. तिचा काही भाग समुद्र पार करत होता, काही भाग समुद्रपार करून चुकला होता आणि काही सर्व प्रकारे समुद्र पार करण्याच्या तयारीत लागलेला होता. ॥११॥
निविष्टं निविशच्चैव भीमनादं महाबलम् ।
तद् बलार्णवमक्षोभ्यं ददृशाते निशाचरौ ॥ १२ ॥
भयंकर कोलाहल करणारी ती विशाल सेना काही स्थानांवर छावणी ठोकून चुकली होती आणि काही जागांवर छावणी ठोकत होती. दोन्ही निशाचरांनी पाहिले की ती वानरवाहिनी समुद्रासमान अक्षोभ्य होती. ॥१२॥
तौ ददर्श महातेजाः प्रच्छन्नौ च विभीषणः ।
आचचक्षेऽथ रामाय गृहीत्वा शुकसारणौ ॥ १३ ॥
वानरवेषात लपून सेनेचे निरीक्षण करणार्‍या दोन्ही राक्षसांना शुक आणि सारणाला महातेजस्वी विभीषणाने पाहिले आणि पाहताच ओळखले आणि त्या दोघांना पकडून श्रीरामांना म्हटले- ॥१३॥
तस्यैतौ राक्षसेन्द्रस्य मंत्रिणौ शुकसारणौ ।
लङ्‌कायाः समनुप्राप्तौ चारौ परपुरञ्जय ॥ १४ ॥
परपुरंजय नरेश्वरा ! हे दोघेही लंकेतून आलेले गुप्तचर आणि राक्षसराज रावणाचे मंत्री शुक तसेच सारण आहेत. ॥१४॥
तौ दृष्ट्‍वा व्यथितौ रामं निराशौ जीविते तथा ।
कृताञ्जलिपुटौ भीतौ वचनं चेदमूचतुः ॥ १५ ॥
ते दोन्ही राक्षस श्रीरामांना पाहून अत्यंत व्यथित झाले आणि जीवनाविषयी निराश होऊन गेले. त्या दोघांच्या मनात भय उत्पन्न झाले. ते हात जोडून याप्रकारे म्हणाले - ॥१५॥
आवामिहागतौ सौम्य रावणप्रहितावुभौ ।
परिज्ञातुं बलं सर्वं तदिदं रघुनंदन ॥ १६ ॥
सौम्य ! रघुनंदना ! आम्हा दोघांना रावणाने धाडले आहे आणि आम्ही या सार्‍या सेनेविषयी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी आलो आहोत. ॥१६॥
तयोस्तद् वचनं श्रुत्वा रामो दशरथात्मजः ।
अब्रवीत् प्रहसन् वाक्यं सर्वभूतहिते रतः ॥ १७ ॥
त्या दोघांचे हे बोलणे ऐकून संपूर्ण प्राण्यांच्या हितामध्ये तत्पर राहाणारे दशरथात्मज भगवान्‌ श्रीराम हसत हसत म्हणाले- ॥१७॥
यदि दृष्टं बलं सर्वं वयं वा सुसमाहिताः ।
यथोक्तं वा कृतं कार्यं छन्दतः प्रतिगम्यताम् ॥ १८ ॥
जर तुम्ही सार्‍या सेनेला पाहिले असेल, आमच्या सैनिकांच्या शक्तीचे ज्ञान प्राप्त केले असेल तसेच रावणाच्या कथनानुसार सर्व काम पूर्ण केले असेल तर आता तुम्ही दोघे आपल्या इच्छेनुसार प्रसन्नतापूर्वक परत जा. ॥१८॥
अथ किंचिददृष्टं वा भूयस्तद् द्रष्टुमर्हथः ।
विभीषणो वा कार्त्स्न्येन भूयः संदर्शयिष्यति ॥ १९ ॥
अथवा जर अजून काही बघावयाचे बाकी राहिले असेल तर परत पाहून घ्या. विभीषण तुम्हांला सर्व काही पूर्णरूपाने दाखवून देतील. ॥१९॥
न चेदं ग्रहणं प्राप्य भेतव्यं जीवितं प्रति ।
न्यस्तशस्त्रौ गृहीतौ वा न दूतौ वधमर्हथः ॥ २० ॥
यासमयी तुम्ही जे पकडले गेले आहात यामुळे तुम्हांला आपल्या जीवनाविषयी काहीही भय वाटता कामा नये, कारण की शस्त्रहीन अवस्थेमध्ये पकडले गेलेले तुम्ही दोघेही दूत वधास योग्य नाही आहात. ॥२०॥
पृच्छमानौ विमुञ्चेमौ चारौ रात्रिंचरावुभौ ।
शत्रुपक्षस्य सततं विभीषण विकर्षणौ ॥ २१ ॥
विभीषणा ! हे दोघे राक्षस रावणाचे गुप्तचर आहेत आणि लपून छपून येथला भेद घेण्यासाठी आले आहेत. हे आपल्या शत्रुपक्षात (वानरसेनेत) फूट पाडण्याचा प्रयास करीत आहेत. आता तर त्यांचे बिंग फुटले आहेच म्हणून यांना सोडून द्या. ॥२१॥
प्रविश्य नगरीं लङ्‌कां भवद्‌भ्यां धनदानुजः ।
वक्तव्यो रक्षसां राजा यथोक्तं वचनं मम ॥ २२ ॥
शुक आणि सारणा ! जेव्हा तुम्ही दोघे लंकेत पोहोचाल तेव्हा कुबेराचा लहान भाऊ राक्षसराज रावण यास माझ्या वतीने हा संदेश ऐकवा- ॥२२॥
यद् बलं त्वं समाश्रित्य सीतां मे हृतवानसि ।
तद् दर्शय यथाकामं ससैन्यः सहबांधवः ॥ २३ ॥
रावणा ! ज्या बळाच्या भरवंशावर तू माझ्या सीतेचे अपहरण केले आहेस ते (बळ) आता सेना आणि बंधुबांधवांसहित येऊन इच्छेनुसार दाखव. ॥२३॥
श्वः काल्ये नगरीं लङ्‌कां सप्राकारां सतोरणाम् ।
राक्षसं च बलं पश्य शरैर्विध्वंसितं मया ॥ २४ ॥
उद्यां प्रात:काळीच तू तटबंदी आणि दरवाजांसहित लंकापुरी तसेच राक्षसी सेनेला माझ्या बाणांनी विध्वंस होत असतांना पहाशील. ॥२४॥
क्रोधं भीममहं मोक्ष्ये ससैन्ये त्वयि रावण ।
श्वः काल्ये वज्रवान् वज्रं दानवेष्विव वासवः ॥ २५ ॥
रावणा ! ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र दानवांवर आपले वज्र सोडतात त्याप्रमाणे मी उद्या सकाळीच सेनेसहित तुझ्यावर आपला भयंकर क्रोध सोडीन. ॥२५॥
इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
जयेति प्रतिनन्द्यैनं राघवं धर्मवत्सलम् ॥ २६ ॥

आगम्य नगरीं लङ्‌कां अब्रूतां राक्षसाधिपम् ।
भगवान्‌ श्रीरामांचा हा संदेश प्राप्त होताच दोन्ही राक्षस शुक आणि सारण धर्मवत्सल राघवांचे आपला जय होवो, आपण चिरंजीवी व्हा इत्यादि वचनांच्या द्वारे अभिनंदन करून लंकापुरीत येऊन राक्षसराज रावणास म्हणाले- ॥२६ १/२॥
विभीषणगृहीतौ तु वधार्थं राक्षसेश्वर ॥ २७ ॥

दृष्ट्‍वा धर्मात्मना मुक्तौ रामेणामिततेजसा ।
राक्षसेश्वर ! आम्हाला तर विभीषणाने वध करण्यासाठीच पकडले होते, परंतु जेव्हा अमित तेजस्वी धर्मात्मा श्रीरामांनी पाहिले तेव्हा त्यांनी आम्हांला सोडून दिले. ॥२७ १/२॥
एकस्थानगता यत्र चत्वारः पुरुषर्षभाः ॥ २८ ॥

लोकपालोपमाः शूराः कृतास्त्रा दृढविक्रमाः ।
रामो दाशरथिः श्रीमान् लक्ष्मणश्च विभीषणः ॥ २९ ॥

सुग्रीवश्च महातेजा महेंद्रसमविक्रमः ।
एते शक्ताः पुरीं लङ्‌कां सप्राकारां सतोरणाम् ॥ ३० ॥

उत्पाट्य संक्रामयितुं सर्वे तिष्ठन्तु वानराः ।
दाशरथि श्रीराम, श्रीमान्‌ लक्ष्मण, विभीषण तसेच महेन्द्रतुल्य सुग्रीव - हे चारी वीर लोकपालांप्रमाणे शौर्यशाली, दृढ, पराक्रमी आणि अस्त्रशस्त्रांचे ज्ञाते आहेत. जेथे हे चारी पुरूषप्रवर एका जागी एकत्र होतात, तेथे विजय निश्चित आहे, आणि सर्व वानर वेगळे राहिले तरी हे चौघे तटबंदी, दरवाजासहित सार्‍या लंकापुरीला उखडून फेकून देऊ शकतात. ॥२८-३० १/२॥
यादृशं तद्धि रामस्य रूपं प्रहरणानि च ॥ ३१ ॥

वधिष्यति पुरीं लङ्‌कां एकस्तिष्ठन्तु ते त्रयः ।
श्रीरामांचे जसे रूप आहे आणि जशी त्यांची अस्त्रेशस्त्रे आहेत त्यावरुन तर कळून येत आहे की ते एकटे सार्‍या लंकापुरीचा वध करून टाकतील, भलेही बाकी तीन्ही वीर बसून राहोत. ॥३१ १/२॥
रामलक्ष्मणगुप्ता सा सुग्रीवेण च वाहिनी ।
बभूव दुर्धर्षतरा सर्वैरपि सुरासुरैः ॥ ३२ ॥
महाराज ! श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव द्वारा सुरक्षित ती वानरांची सेना तर समस्त देवता आणि असुरांसाठीही अत्यंत दुर्जय आहे. ॥३२॥
प्रहृष्टरूपा ध्वजिनी महात्मनां
वनौकसां संप्रति योद्धुमिच्छताम् ।
अलं विरोधेन शमो विधीयतां
प्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ ३३ ॥
महामनस्वी वानर या समयी युद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या सेनेतील सर्व वीर योद्धे प्रसन्न आहेत. म्हणून त्यांच्याशी विरोध केल्याने आपल्याला काहीही लाभ होणार नाही. म्हणून संधि करावी आणि दाशरथी श्रीरामांच्या सेवेत सीतेला परत देऊन टाकावी. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पंचविसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP