[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ सप्तत्रिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य शीघ्रं आनयनाय हनुमन्तं प्रति सीताया आग्रहो; हुमताऽऽत्मना सह चलितुं सीतां प्रत्यनुनयः; सीताया तस्यानङ्‌गीकरणं च -
सीतेचा श्रीरामास लवकर बोलावून आणण्याविषयी हनुमन्तास आग्रह, हनुमन्ताने सीतेस आपल्या बरोबर येण्याविषयी आग्रह करणे तसेच सीतेने त्यास नकार देणे -
सीता तद्वचनं श्रुत्वा पूर्णचन्द्रनिभानना ।
हनूमन्तमुवाचेदं धर्मार्थसहितं वचः ॥ १ ॥
हनुमन्ताचे पूर्वोक्त वचन ऐकून पूर्णचन्द्रासारखे आल्हादकारक मनोहर मुख असलेली ती सीता धर्म आणि अर्थ यांनी युक्त असे भाषण करू लागली- ॥१॥
अमृतं विषसम्पृक्तं त्वया वानर भाषितम् ।
यच्च नान्यमना रामो यच्च शोकपरायणः ॥ २ ॥
ती म्हणाली - हे वानरा ! तू जे सांगितलेस की श्रीरामांचे मन दुसरीकडे जात नाही आणि ते एकसारखा शोक करीत आहेत, ते तुझे कथन मला विषमिश्रित अमृताप्रमाणे भासत आहे. ॥२॥
ऐश्वर्ये वा सुविस्तीर्णे व्यसने वा सुदारुणे ।
रज्ज्वेव पुरुषं बद्ध्वा कृतान्तः परिकर्षति ॥ ३ ॥
अत्यन्त ऐश्वर्याच्या ठिकाणी अथवा अत्यन्त दारूण विपत्तिमध्ये दैव, पुरुषाला जणु काही दोरीने बान्धून खेचूनच नेत असते. ॥३॥
विधिर्नूनमसंहार्यः प्राणिनां प्लवगोत्तम ।
सौमित्रिं मां च रामं च व्यसनैः पश्य मोहितान् ॥ ४ ॥
हे वानरश्रेष्ठा ! प्राण्यांना खरोखरच दैवाचे उल्लंघन करता येत नाही. उदाहरणार्थ सुमित्रापुत्र लक्ष्मण, मी आणि राम पहा कसे संकटात सापडलो आहोत, वियोग दुःखाने कसे मोहित झालो आहोत. ॥४॥
शोकस्यास्य कथं पारं राघवोऽधिगमिष्यति ।
प्लवमानः परिश्रान्तो हतनौः सागरे यथा ॥ ५ ॥
ज्याची नाव सागरात बुडालेली आहे, असा पराक्रमी पुरुष ज्याप्रमाणे बाहुबलाने सागरामध्ये पोहत पोहत मोठ्‍या पराकाष्ठेने परतीरास जाऊन पोहोचतो, त्याप्रमाणे श्रीरघुनाथ कसे बरे या शोक समुद्रातून पार जातील ? ॥५॥
राक्षसानां वधं कृत्वा सूदयित्वा च रावणम् ।
लङ्‌कामुन्मथितां कृत्वा कदा द्रक्ष्यति मां पतिः ॥ ६ ॥
राक्षसांचा वध, रावणाचा संहार आणि लङ्‌कापुरीचा विध्वंस करून माझे पति मला केव्हा बरे पाहतील ? ॥६॥
स वाच्यः सन्त्वरस्वेति यावदेव न पूर्यते ।
अयं संवत्सरः कालस्तावद्धि मम जीवितम् ॥ ७ ॥
तू जाऊन त्यांना त्वरा करा असा माझा निरोप सांग कारण जो पर्यन्त ही वर्षाची मुदत संपलेली नाही तोपर्यन्तच मी जिवन्त आहे. ॥७॥
वर्तते दशमो मासो द्वौ तु शेषौ प्लवङ्‌गम ।
रावणेन नृशंसेन समयो यः कृतो मम ॥ ८ ॥
हे वानरा ! दुष्ट रावणाने मला जी वर्षाची मुदत दिली आहे, त्यातील हा दहावा महिना चालू आहे. वर्ष पूर्ण होण्यास फक्त दोन महिने बाकी आहेत. ॥८॥
विभीषणेन च भ्रात्रा मम निर्यातनं प्रति ।
अनुनीतः प्रयत्‍नेन न च तत् कुरुते मतिम् ॥ ९ ॥
रावणाचा भाऊ विभीषण याने मला परत पाठविण्याविषयी त्याचे मन वळविण्याचा खूप प्रयत्‍न केला परन्तु त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्याची बुद्धि त्याला होत नाही. ॥९॥
मम प्रतिप्रदानं हि रावणस्य न रोचते ।
रावणं मार्गते सङ्‌ख्ये मृत्युः कालवशं गतम् ॥ १० ॥
मला पुनरपि रामाच्या स्वाधीन करावे ही गोष्ट रावणास रूचत नाही, कारण मृत्यु हा काळाच्या आधीन झालेल्या त्या रावणाची युद्धामध्ये वाट पहात आहे. ॥१०॥
ज्येष्ठा कन्या कला नाम विभीषणसुता कपे ।
तया ममैतदाख्यातं मात्रा प्रहितया स्वयम् ॥ ११ ॥
हे कपि ! विभिषणाच्या ज्येष्ठ कन्येचे नाव कला आहे. तिच्या मातेनेच स्वतः तिला माझ्या जवळ पाठविली असता तिने मला या सर्व गोष्टी सांगितल्या. ॥११॥
अविन्ध्यो नाम नाम मेधावी विद्वान् राक्षसपुंगवः ।
धृतिमाञ्छीलवान् वृद्धो रावणस्य सुसम्मतः ॥ १२ ॥
अविन्ध्य नावाचा एक श्रेष्ठ राक्षस आहे जो अत्यन्त बुद्धिमान, विद्वान, धीर, सुशील, वृद्ध आणि रावणास सन्माननीय आहे. ॥१२॥
रामात् क्षयमनुप्राप्तं रक्षसां प्रत्यचोदयत् ।
न च तस्य स दुष्टात्मा शृणोति वचनं हितम् ॥ १३ ॥
त्याने रावणास श्रीरामाच्या हातून राक्षसांच्या विनाशाचा समय जवळ आला आहे तरी मला रामाच्या पाशी परत धाडावे म्हणून समजाविले, पण तो दुष्टात्मा रावण त्याचे हितकारक वचनही ऐकत नाही. ॥१३॥
आशंसेयं हरिश्रेष्ठ क्षिप्रं मां प्राप्स्यते पतिः ।
अन्तरात्मा हि मे शुद्धस्तस्मिंश्च बहवो गुणाः ॥ १४ ॥
हे कपिश्रेष्ठ ! मला तर अशी आशा वाटत आहे की माझा पति मला लवकरच भेटेल कारण की माझा अन्तरात्मा शुद्ध आहे आणि श्रीरामाच्या ठिकाणीही अनेक गुण आहेत. ॥१४॥
उत्साहः पौरुषं सत्त्वमानृशंस्यं कृतज्ञता ।
विक्रमश्च प्रभावश्च सन्ति वानर राघवे ॥ १५ ॥
हे वानरा ! उत्साह, पुरुषार्थ, बळ, दयाळूपणा, कृतज्ञता, पराक्रम आणि प्रभाव आदि सर्व गुण श्रीरामांच्या ठिकाणी विद्यमान आहेत. ॥१५॥
चतुर्दश सहस्राणि राक्षसानां जघान यः ।
जनस्थाने विना भ्रात्रा शत्रुः कस्तस्य नोद्विजेत् ॥ १६ ॥
ज्यांनी जनस्थानात आपल्या भावाचे सहाय्य न घेताच चौदा हजार राक्षसांचा संहार केला, त्यांचे भय, त्यांच्या कुठल्या शत्रूला वाटणार नाही ? ॥१६॥
न स शक्यस्तुलयितुं व्यसनैः पुरुषर्षभः ।
अहं तस्यानुभावज्ञा शक्रस्येव पुलोमजा ॥ १७ ॥
श्रीरामचन्द्र पुरुषात श्रेष्ठ आहेत, ते संकटसमयी विचलित होतील हे सर्वथा असंभवनीय आहे. ज्या प्रमाणे पुलोमकन्या शची इन्द्राचा प्रभाव जाणते, त्याप्रमाणेच मीही श्रीरामांचा प्रभाव त्यांची शक्ति, सामर्थ्य उत्तम प्रकारे जाणत आहे. ॥१७॥
शरजालांशुमाञ्छूरः कपे रामदिवाकरः ।
शत्रुरक्षोमयं तोयमुपशोषं नयिष्यति ॥ १८ ॥
हे कपिश्रेष्ठ ! शूरवीर भगवान श्रीराम सूर्याप्रमाणे असून त्यांचे बाणसमूह हेच त्यांचे किरण आहेत, त्या किरणांच्या द्वारा राक्षसशत्रूरूपी उदकाला ते लवकरच शुष्क करून टाकतील. ॥१८॥
इति सञ्जल्पमानां तां रामार्थे शोककर्शिताम् ।
अश्रुसम्पूर्णनयनामुवाच वचनं कपिः ॥ १९ ॥
याप्रमाणे श्रीरामांसाठी शोकाने पीडित झालेली ती सीता भाषण करीत असतांनाच तिचे मुख अश्रूनी भरून गेले. त्यावेळी हनुमान पुढील वचन तिला बोलले- ॥१९॥
कृत्वैव तु वचो मह्यं क्षिप्रमेष्यति राघवः ।
चमूं प्रकर्षन् महतीं हर्यृक्षगणसङ्‌कुलाम् ॥ २० ॥
हे देवी ! तू धैर्य धारण कर. माझे वचन ऐकताच राघव वानर आणि अस्वलांची विशाल सेना घेऊन येथे येण्यासाठी प्रस्थान करतील. ॥२०॥
अथवा मोचयिष्यामि त्वामद्यैव सराक्षसात् ।
अस्माद् दुःखादुपारोह मम पृष्ठमनिन्दिते ॥ २१ ॥
अथवा हे वरानने ! इतके कशाला, मीच राक्षसांमुळे होत असलेल्या या दुःखातून तुझी आजच्या आजच सुटका करतो. हे निर्दोष सीते ! हे सती साध्वी ! तू माझ्या पाठीवर बस. ॥२१॥
त्वां तु पृष्ठगतां कृत्वा सन्तरिष्यामि सागरम् ।
शक्तिरस्ति हि मे वोढुं लङ्‌कामपि सरावणाम् ॥ २२ ॥
तुला पाठीवर घेऊन मी हा सर्व समुद्र उल्लंघून जाईन, इतकेच नव्हे तर रावणासहित ही लङ्‌का समुद्रापलिकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य माझ्या अंगापाशी आहे. ॥२२॥
अहं प्रस्रवणस्थाय राघवायाद्य मैथिलि ।
प्रापयिष्यामि शक्राय हव्यं हुतमिवानलः ॥ २३ ॥
हे मैथिली ! श्रीराम प्रस्त्रवणगिरी वर राहात आहेत. अग्निदेव ज्याप्रमाणे हवन केले गेलेले हविष्य इन्द्राच्या सेवेत अर्पण करण्यास घेऊन जातो, त्याप्रमाणे मी तुला आजच राघवापाशी पोहोचती करीन. ॥२३॥
द्रक्ष्यस्यद्यैव वैदेहि राघवं सह लक्ष्मणम् ।
व्यवसायसमायुक्तं विष्णुं दैत्यवधे यथा ॥ २४ ॥
हे वैदेही ! दैत्यवधार्थ उत्सुक झालेल्या भगवान विष्णूप्रमाणे, राक्षसांच्या संहारासाठी सज्ज झालेल्या श्रीरामांचे व लक्ष्मणाचे दर्शन तू आजच करू शकशील. ॥२४॥
त्वद्दर्शनकृतोत्साहमाश्रमस्थं महाबलम् ।
पुरन्दरमिवासीनं नगराजस्य मूर्धनि ॥ २५ ॥
स्वर्गात देवराज इन्द्र ऐरावताच्या पाठीवर विराजमान व्हावा, त्याप्रमाणे तुझ्या दर्शनासाठी उत्सुक झालेले महाबलवान श्रीराम पर्वतशिखरावरील आपल्या आश्रमात विराजमान झालेले आहेत. ॥२५॥
पृष्ठमारोह मे देवि मा विकाङ्‌क्षस्व शोभने ।
योगमन्विच्छ रामेण शशाङ्‌केनेव रोहिणी ॥ २६ ॥
हे देवी ! तू माझ्या पाठीवर बस. हे शोभने ! माझ्या कथनाची तू उपेक्षा करू नकोस. चन्द्राला भेटणार्‍या रोहिणीप्रमाणे तू श्रीरामचन्द्रांशी तुझे मिलन होईलच, असा निश्चय कर. ॥२६॥
कथयन्तीव शशिना संगमिष्यसि रोहिणी ।
मत्पृष्ठमधिरोह त्वं तराकाशं महार्णवम् ॥ २७ ॥
मला भगवान श्रीरामास भेटावयाचे आहे एवढे म्हणे पर्यन्तच माझ्या पाठीवर बसलेली तू चन्द्र आणि सूर्य ज्याप्रमाणे आकाशरूप महासागराच्या पार जातात त्याप्रमाणे माझ्यासह आकाशमार्गाने महासागर पार करशील. ॥२७॥
न हि मे सम्प्रयातस्य त्वामितो नयतोऽङ्‌गने ।
अनुगन्तुं गतिं शक्ताः सर्वे लङ्‌कानिवासिनः ॥ २८ ॥
हे कल्याणी ! हे अंगने ! मी तुला घेऊन ज्यावेळी येथून निघेन तेव्हा समस्त लङ्‌कानिवासी मिळूनही माझा पाठलाग करू शकणार नाहीत. ॥२८॥
यथैवाहमिह प्राप्तस्तथैवाहमसंशयम् ।
यास्यामि पश्य वैदेहि त्वामुद्यम्य विहायसम् ॥ २९ ॥
हे वैदेही ! मी ज्याप्रकारे येथे आलो त्याचप्रकारे तुला घेऊन आकाशमार्गाने निघून जाईन, यात जराही शंका नाही. तू माझा पराक्रम पहा. ॥२९॥
मैथिली तु हरिश्रेष्ठाच्छ्रुत्वा वचनमद्‌भुतम् ।
हर्षविस्मितसर्वाङ्‌गी हनुमन्तमथाब्रवीत् ॥ ३० ॥
वानरश्रेष्ठ हनुमन्ताच्या मुखातील हे अद्‌भुत वचन ऐकून मैथिली सीतेचे सर्व शरीर हर्षाने आणि विस्मयाने रोमांचित झाले. ती हनुमन्तास म्हणाली - ॥३०॥
हनुमन् दूरमध्वानं कथं मां नेतुमिच्छसि ।
तदेव खलु ते मन्ये कपित्वं हरियूथप ॥ ३१ ॥
हे वानरयूथपति हनुमान ! तू इतक्या दूरवर मला घेऊन जाण्याची इच्छा कशी काय करीत आहेस ? तुझे हे दुःसाहस म्हणजे वानरोचित चपलताच (माकडचेष्टाच) आहे, असे मला वाटते आहे. ॥३१॥
कथं चाल्पशरीरस्त्वं मामितो नेतुमिच्छसि ।
सकाशं मानवेन्द्रस्य भर्तुर्मे प्लवगर्षभ ॥ ३२ ॥
हे वानरशिरोमणी ! तुझे शरीर तर फारच लहान आहे आणि तरीही तू मला माझे स्वामी पुरुषश्रेष्ठ श्रीरामचन्द्र यांच्या जवळ घेऊन जाण्याची इच्छा कशी काय करीत आहेस ? ॥३२॥
सीतायास्तु वचः श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
चिन्तयामास लक्ष्मीवान् नवं परिभवं कृतम् ॥ ३३ ॥
सीतेचे हे वचन ऐकून लक्ष्मीवान शोभासंपन्न हनुमन्तास हा आपला अपमानच सीतेने केला आहे, असे वाटू लागले. ॥३३॥
न मे जानाति सत्त्वं वा प्रभावं वासितेक्षणा ।
तस्मात् पश्यतु वैदही यद् रूपं मम कामतः ॥ ३४ ॥
तो मनामध्ये विचार करू लागला की कृष्णवर्णनेत्राच्या या विदेहनन्दिनी सीतेला आपला प्रभाव व बळ माहीत नाही हेच खरे. तेव्हा आज एकदा स्वेच्छेप्रमाणे घेता येणारे माझे रूप मी हिला दाखवतोच. ॥३४॥
इति संचिन्त्य हनुमांस्तदा प्लवगसत्तमः ।
दर्शयामास वैदेह्याः स्वरूपमरिमर्दनः ॥ ३५ ॥
याप्रमाणे विचार करून शत्रूमर्दन वानर शिरोमणी हनुमन्तांनी सीतेला आपले स्वरूप दाखविले. ॥३५॥
स तस्मात् पादपाद् धीमानाप्लुत्य प्लवगर्षभः ।
ततो वर्धितुमारेभे सीताप्रत्ययकारणात् ॥ ३६ ॥
ते बुद्धिमान कपिश्रेष्ठ वृक्षावरून उडी मारून खाली उतरले आणि सीतेला विश्वास वाटावा म्हणून आपला देह अधिकाधिक वृद्धिगत करण्यास त्यांनी आरंभ केला. ॥३६॥
मेरुमन्दरसङ्‌काशो बभौ दीप्तानलप्रभः ।
अग्रतो व्यवतस्थे च सीताया वानरर्षभः ॥ ३७ ॥
पहाता पहाता त्यांचे शरीर मेरू पर्वताप्रमाणे उंच झाले आणि प्रदीप्त अग्निप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. याप्रमाणे विशाल देह धारण करून ते वानरश्रेष्ठ हनुमान सीतेसमोर उभे राहिले. ॥३७॥
हरिः पर्वतसङ्‌काशस्ताम्रवक्त्रो महाबलः ।
वज्रदंष्ट्रनखो भीमो वैदेहीमिदमब्रवीत् ॥ ३८ ॥
त्यानन्तर ताम्रवर्णाचे मुख आणि वज्रतुल्य दाढा आणि नखे असलेले ते महाबलाढ्‍य भयंकर वानरवीर वैदेहीला याप्रमाणे म्हणाले- ॥३८॥
सपर्वतवनोद्देशां साट्टप्रकारतोरणाम् ।
लङ्‌कामिमां सनाथां व नयितुं शक्तिरस्ति मे ॥ ३९ ॥
हे देवी ! येथील पर्वत, वनप्रदेश, अट्‍टालिका (गच्च्या) कोट, आणि नगराच्या वेशीसह या लङ्‌कापुरीला तिच्या अधिपति रावणासह उचलून घेऊन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. ॥३९॥
तदवस्थाप्यतां बुद्धिरलं देवि विकाङ्‌क्षया ।
विशोकं कुरु वैदेहि राघवं सहलक्ष्मणम् ॥ ४० ॥
म्हणून हे देवी ! तू माझ्या बरोबर येण्याचा निश्चय कर. माझ्या सामर्थ्याविषयीची तुझी शंका व्यर्थ आहे. हे वैदेही ! माझ्या बरोबर येऊन तू लक्ष्मणासह राघवाचा शोक दूर कर. ॥४०॥
तं दृष्ट्‍वा भीमसङ्‌काशमुवाच जनकात्मजा ।
पद्मपत्रविशालाक्षी मारुतस्यौरसं सुतम् ॥ ४१ ॥
इतके झाल्यावर कमल पत्राप्रमाणे विशाल नेत्र असलेली जनकात्मजा सीता त्या पर्वतप्राय विशाल देह धारण केलेल्या वायुच्या औरस पुत्राला म्हणाली - ॥४१॥
तव सत्त्वं बलं चैव विजानामि महाकपे ।
वायोरिव गतिश्चापि तेजश्चाग्नेरिवाद्‌भुततम् ॥ ४२ ॥
हे महाकपि ! मी तुझी शक्ती आणि पराक्रम जाणत आहे. तुझी गती वायुसमान असून अग्नीप्रमाणे अद्‍भुत असे तुझे तेज आहे. ॥४२॥
प्राकृतोऽन्यः कथं चेमां भूमिमागन्तुमर्हति ।
उदधेरप्रमेयस्य पारं वानरयूथप ॥ ४३ ॥
हे वानरयूथपति ! दुसरा एखादा सामान्य वानर या अपार समुद्राचे उल्लंघन करून या भूमीवर येईल तरी कसा ? ॥४३॥
जानामि गमने शक्तिं नयने चापि ते मम ।
अवश्यं सम्प्रधार्याशु कार्यसिद्धिरिवात्मनः ॥ ४४ ॥
मी जाणते कि येथून परत जाण्याचे आणि तेही मला येथून घेऊन जाण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. परन्तु तू ज्याप्रमाणे आपल्या कार्यसिद्धीचा सत्वर विचार केला आहेस, याप्रमाणे मलाही स्वतःसंबन्धी, कार्यसिद्धिसंबन्धी अवश्य विचार केला पाहिजे. ॥४४॥
अयुक्तं तु कपिश्रेष्ठ मम गन्तुं त्वया सह ।
वायुवेगसवेगस्य वेगो मां मोहयेत् तव ॥ ४५ ॥
हे कपिश्रेष्ठा ! तुझ्या बरोबर जाणे मला कुठल्याही प्रकारे योग्य (उचित) वाटत नाही. कारण तुझा वेग वायूच्या वेगाप्रमाणे तीव्र असल्याने त्याने मला मूर्च्छा येण्याची शक्यता आहे. ॥४५॥
अहमाकाशमासक्ता उपर्युपरि सागरम् ।
प्रपतेयं हि ते पृष्ठाद् भूयो वेगेन गच्छतः ॥ ४६ ॥
आकाशामध्ये उंच उंच गेल्यावर अधिक वेगाने जाणार्‍या तुझ्या पाठीवरून मी खाली समुद्रातच पडेन. ॥४६॥
पतिता सागरे चाहं तिमिनक्रझषाकुले ।
भवेयमाशु विवशा यादसामन्नमुत्तमम् ॥ ४७ ॥
तिमी, नक्र आणि मत्स्य असलेल्या सागरामध्ये मी निश्चेष्ट पडले तर जलचर प्राण्यांचे सत्वर उत्कृष्ट अन्नच मी होऊन जाईन. ॥४७॥
न च शक्ष्ये त्वया सार्धं गन्तुं शत्रुविनाशन ।
कलत्रवति सन्देहस्त्वयि स्यादप्यसंशयम् ॥ ४८ ॥
म्हणून हे शत्रूविनाशन वीरा ! तुझ्या बरोबर मी येऊ शकत नाही. शिवाय एका स्त्रीला घेऊन तू परत जाऊ लागलास की त्यावेळी इतरांना तुझ्या संबंधी निश्चितच संशय येईल, यात शंका नाही. ॥४८॥
ह्रियमाणं तु मां दृष्ट्‍वा राक्षसा भीमविक्रमाः ।
अनुगच्छेयुरादिष्टा रावणेन दुरात्मना ॥ ४९ ॥
म्हणून एका स्त्रीला घेऊन तू परत जाऊ लागल्यास की त्यावेळी तू मला घेऊन जात आहेत असे दृष्टीस पडल्यावर दुरात्मा रावणाच्या आज्ञेवरून भयंकर पराक्रमी राक्षस तुझा पाठलाग करू लागतील. ॥४९॥
तैस्त्वं परिवृतः शूरैः शूलमुद्‌गरपाणिभिः ।
भवेस्त्वं संशयं प्राप्तो मया वीर कलत्रवान् ॥ ५० ॥
हे वीरा ! त्यावेळी हातामध्ये शूल आणि मुद्‍गर घेऊन ते शूर राक्षस तुला वेढून टाकतील आणि माझ्या सारखी रक्षणीय अबला बरोबर असल्याने तू प्राणसंकटात सापडशील. ॥५०॥
सायुधा बहवो व्योम्नि राक्षसास्त्वं निरायुधः ।
कथं शक्ष्यसि संयातुं मां चैव परिरक्षितुम् ॥ ५१ ॥
आकाशात हातात आयुधे घेतलेले असे पुष्कळ राक्षस तुझ्यावर आक्रमण करतील आणि तुझ्याजवळ तर आयुध मुळीच नाही. अशा स्थितीत आकाशामध्ये त्या सर्वांशी युद्ध करणे आणि माझे रक्षण करणे ही दोन्ही कार्ये तू कशी करू शकशील ? ॥५१॥
युद्ध्यमानस्य रक्षोभिस्ततस्तैः क्रूरकर्मभिः ।
प्रपतेयं हि ते पृष्ठाद् भयार्ता कपिसत्तम ॥ ५२ ॥
हे कपिश्रेष्ठा ! त्या क्रूरकर्मी राक्षसांच्या बरोबर जेव्हा तू युद्ध करू लागशील त्यावेळी मी भयभीत होऊन तुझ्या पाठीवरून खाली पडेन. ॥५२॥
अथ रक्षांसि भीमानि महान्ति बलवन्ति च ।
कथंचित् साम्पराये त्वां जयेयुः कपिसत्तम ॥ ५३ ॥

अथवा युध्यमानस्य पतेयं विमुखस्य ते ।
पतितां च गृहीत्वा मां नयेयुः पापराक्षसाः ॥ ५४ ॥
हे कपिश्रेष्ठा ! जर यदा कदाचित त्या महाबलाढ्‍य भयानक राक्षसांनी कुठल्याही प्रकारे युद्धात जय मिळवला अथवा युद्ध करतेवेळी माझ्या रक्षणाकडे तुला लक्ष न देता आल्याने जर मी खाली पडले तर ते पापी राक्षस त्या पडलेल्या अगतिक अशा मला परत पकडून घेऊन जातील. ॥५३-५४॥
मां वा हरेयुस्त्वद्धस्ताद् विशसेयुरथापि वा ।
अव्यवस्थौ हि दृश्येते युद्धे जयपराजयौ ॥ ५५ ॥
अथवा हेही संभव आहे की ते निशाचर मला तुझ्या हातातून ओढून नेतील अथवा माझा वधही करतील. कारण युद्धामध्ये जय अथवा पराजय खात्रीने होईलच असे निश्चित सांगता येत नाही. ॥५५॥
अहं वापि विपद्येयं रक्षोभिरभितर्जिता ।
त्वत्प्रयत्‍नो हरिश्रोष्ठ भवेन्निष्फल एव तु ॥ ५६ ॥
अथवा हे वानरश्रेष्ठा ! जरी राक्षसांनी सर्व प्रकारानी मला अधिक धमकी दिली तरी ही मरून जाईन आणि मग तुझे हे सर्व प्रयत्‍न निष्फळ ठरतील. ॥५६॥
कामं त्वमपि पर्याप्तौ निहन्तुं सर्वराक्षसान् ।
राघवस्य यशो हीयेत् त्वया शस्तैस्तु राक्षसैः ॥ ५७ ॥
जरी तू सुद्धा संपूर्ण राक्षसांचा संहार करण्यास समर्थ आहेस तरीही तुझ्याकडून सर्व राक्षसांचा वध झाला तर त्यामुळे राघवाच्या सुयशात बाधा येईल. (लोक असेच म्हणतील की श्रीराम स्वतः काहीच करू शकले नाहीत.) ॥५७॥
अथवाऽऽदाय रक्षांसि न्यसेयुः संवृते हि माम् ।
यत्र ते नाभिजानीयुर्हरयो नापि राघवः ॥ ५८ ॥
अथवा असेही होणे संभवनीय आहे की राक्षस लोक मला घेऊन जाऊन अशा गुप्त स्थानी ठेवतील की ज्या स्थानाचा पत्ता वानरांनाही लागणार नाही, राघवालाही लागणार नाही. ॥५८॥
आरम्भस्तु मदर्थोऽयं ततस्तव निरर्थकः ।
त्वया हि सह रामस्य महानागमने गुणः ॥। ५९ ॥
जर असे झाले तर माझ्यासाठी तू केलेला हा सर्व उद्योग व्यर्थ होईल. जर तुझ्याबरोबर श्रीरामचन्द्र येथे आले तर त्यांच्या आगमनामुळे फार मोठा लाभ होईल. ॥५९॥
मयि जीवितमायत्तं राघवस्यामित्तौजसः ।
भ्रातॄणां च महाबाहो तव राजकुलस्य च ॥ ६० ॥
हे महाबाहो ! महात्मा राघवाचे, त्यांच्या बन्धूचे, तुझे आणि वानरराज सुग्रीवाच्या कुळाचे सर्वांचे जीवन माझ्यावर अवलंबून आहे. ॥६०॥
तौ निराशौ मदर्थं तु शोकसन्तापकर्शितौ ।
सह सर्वर्क्षहरिभिस्त्यक्ष्यतः प्राणसंग्रहम् ॥ ६१ ॥
शोक आणि सन्तापाने पीडित झालेले ते दोन्ही बन्धु माझ्या प्राप्तीविषयी जर निराश होतील तर संपूर्ण अस्वले आणि वानरांसह आपल्या प्राणांचा परित्याग करतील. ॥६१॥
भर्तृर्भक्तिं पुरस्कृत्य रामादन्यस्य वानर ।
नाहं स्प्रष्टुं स्वतो गात्रमिच्छेयं वानरोत्तम ॥ ६२ ॥
हे वानरश्रेष्ठा ! तुझ्याबरोबर न येण्याचे एक प्रधान कारण आणखीही असे आहे की, हे वानरवीरा ! पतिभक्तिकडे (पातिव्रत्याकडे) दृष्टी ठेवून मी भगवान श्रीरामांखेरिज अन्य कुणा पुरुषाच्या शरीरास स्वेच्छेने स्पर्श करू इच्छित नाही. ॥६२॥
यदहं गात्रसंस्पर्शं रावणस्य गता बलात् ।
अनीशा किं करिष्यामि विनाथा विवशा सती ॥ ६३ ॥
रावणाच्या शरीराचा मला स्पर्श झाला तो तर त्याने बळजबरीने केलेला होता. त्यासमयी मी असमर्थ, अनाथ आणि विवश झाले होते, त्यामुळे काय करू शकत होते ? ॥६३॥
यदि रामो दशग्रीवमिह हत्वा सराक्षसम् ।
मामितो गृह्य गच्छेत तत् तस्य सदृशं भवेत् ॥ ६४ ॥
जर श्रीराम येथे येऊन राक्षसांसहित दशमुख रावणाचा वध करून मला येथून घेऊन जातील तर ते त्यांच्या दृष्टीने अधिक योग्य ठरेल. ॥६४॥
श्रुताश्च दृष्टा हि मया पराक्रमा
महात्मनस्तस्य रणावमर्दिनः ।
न देवगन्धर्वभुजङ्‌गराक्षसा
भवन्ति रामेण समा हि संयुगे ॥ ६५ ॥
मी युद्धात शत्रूंचे मर्दन करणार्‍या महात्मा श्रीरामांचे पराक्रम अनेक वेळा पाहिले आणि ऐकले आहेत. देवता, गन्धर्व, नाग आणि राक्षस सर्व मिळूनही संग्रामात त्यांची बरोबरी करू शकत नाहीत. ॥६५॥
समीक्ष्य तं संयति चित्रकार्मुकं
महाबलं वासवतुल्यविक्रमम् ।
सलक्ष्मणं को विषहेत राघवं
हुताशनं दीप्तमिवानिलेरितम् ॥ ६६ ॥
युद्धभूमीवर विचित्र धनुष्य धारण करणारे इन्द्राप्रमाणे पराक्रमी असलेले महाबलवान श्रीराम वायुचे सहाय्य मिळालेल्या प्रदीप्त अग्नीप्रमाणे लक्ष्मणाच्या साथीने उद्दीप्त होतात. त्यावेळी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या तो वेग कोण बरे सहन करू शकणार आहे ? ॥६६॥
सलक्ष्मणं राघवमाजिमर्दनं
दिशागजं मत्तमिव व्यवस्थितम् ।
सहेत को वानरमुख्य संयुगे
युगान्तसूर्यप्रतिमं शरार्चिषम् ॥ ६७ ॥
हे वानरश्रेष्ठा ! समरांगणान्त आपल्या बाणरूपी तेजाने प्रलयकाळीन सूर्याप्रमाणे प्रकाशित होणार्‍या आणि उन्मत्त दिग्गजाप्रमाणे उभे राहणार्‍या रणमर्दन श्रीराम आणि लक्ष्मण यांचा सामना कोण करू शकणार आहे ? ॥६७॥
स मे कपिश्रेष्ठ सलक्ष्मणं प्रियं
सयूथपं क्षिप्रमिहोपपादय ।
चिराय रामं प्रति शोककर्शितां
कुरुष्व मां वानरवीर हर्षिताम् ॥ ६८ ॥
म्हणून हे कपिश्रेष्ठा ! हे वानरवीरा ! तू प्रयत्‍न करून यूथपति सुग्रीव आणि लक्ष्मणासह माझ्या प्रियतम पतींना श्रीरामचन्द्रांना शीघ्र येथे बोलावून आण. मी चिरकालपर्यन्त श्रीरामाच्या विरहाने शोकाकुल झालेली आहे. तू त्यांच्या शुभागमनाने मला हर्ष प्रदान कर. ॥६८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सदतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP