| 
 
  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
 ॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
 उत्तरकांड 
 ॥  अध्याय अठ्ठावन्नावा ॥  शत्रुघ्नाला राज्याभिषेक
 
 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
 
श्रीराम म्हणे भार्गवासी । मधूचा पुत्र लवणासूर नामेंसीं । कोण कर्म करी कोठें क्रीडेसीं । कोणें देशीं विचरतसे ॥१॥
 ऐकोनि श्रीरामाचें वचन । आनंदयुक्त समस्त जन ।
 तयांत भार्गव समूळ कथन । सांगता होय ते समयीं ॥२॥
 
सर्व प्राण्यांना भक्षण करणारा लवणासुर :  
लवणासुराची समूळ विवंचना । ऐकें गां पद्माक्षीरमणा । मधुकुळीं जन्मोनि जाण । नाना प्राणी भक्षितो ॥३॥
 विशेषेंकरोनि तापस । लवणासुर भक्षितो सावकाश ।
 रुद्रकर्म तोचि आचार त्यास । नित्य क्रीडेसी मधुवचन ॥४॥
 सहस्त्रें सहस्त्र मारोनी । व्याघ्रमृगादिक प्राणी ।
 मानवें भक्षोनि आव्हानी । कर्मक्रिया करितसे ॥५॥
 जैसा प्रळयकाळींचा काळ । भक्षितसे जीवजाळ ।
 तैसा लवणासुर केवळ । प्राणिमात्रां अंतक ॥६॥
 ऐसें ऋषीचें मधुर वचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
 म्हणे स्वामी तपोधन । बहुत दुःख पावले ॥७॥
 लवणासुरासी मारीन । मी तंव न लागतां क्षण ।
 तुमचें दुःख हृदयींचे दारुण । निर्दाळीन निमेषें एका ॥८॥
 ऐसी प्रतीज्ञा रामें करुन । ऋषींसमवेत बंधुजन ।
 बैसले असतां सावधान । सीतारमण बोलता झाला ॥९॥
 
रामांची बंधूंना लवणासुराला मारण्याविषयी विचारणा :  
कोण मारील लवणासुरासी । ऐसे श्रीराम बोले बंधूंसी । कोणाचा वाटा ते मजपासीं । शीघ्रवत सांगावें ॥१०॥
 भरत आणि शत्रुघ्न । राम लक्ष्मण आणि तपोधन ।
 त्यांत श्रीराम ऐसें बोलिल्यावरुन । भरत आपण विनविता झाला ॥११॥
 ऐकें नरवीर चूडामणी । ममांश तो दैत्य मधुवनीं ।
 जेणें भक्षिले तापस अनेक प्राणी । तयाचे निर्दळणीं मी असें ॥१२॥
 ऐसें भरताचें वचन । ऐकोनी शत्रुघ्न टाकोनि आसन ।
 श्रीरामासंमुख उभा राहोन । विनंति करिता पैं झाला ॥१३॥
 तो शत्रुघ्न म्हणाल कैसा । शत्रुनिर्दाळणीं सिंह जैसा ।
 जयाचे धाकें वैरिमानसा । धडका लागे दारुण ॥१४॥
 
लवणासुराला ठार मारण्याची शत्रुघ्नाची तयारी :  
ऐसा शत्रुघ्न वीरपंचानन । बोलता झाला सभा लक्षोन । म्हणे लवणासुर माझा वांटा जाण । तो मज स्वामी देईजे ॥१५॥
 भरतें शून्य नगरी । मागें रक्षिली अयोध्यापुरी ।
 आणि तप करोनि भारी । थोर श्रम पावला ॥१६॥
 चीरकृष्णाजिनधर । मस्तकीं वाहे जटाभार ।
 करुन वनफळांचा आहार । भूमिशयन येणें केलें ॥१७॥
 चतुर्दश वर्षेपर्यंत । नंदिग्रामीं राहिला भरत ।
 अनुभविलें दुःख बहुत । याचा वांटा पावला ॥१८॥
 आतां माझा वांटा लवणासुर । तो मज देइजे सत्वर ।
 ऐसा कृपा करो रघुवीर । मज किंकरावर ये काळीं ॥१९॥
 माझा लाड पुरवावा । मज लवणासुर वांटा द्यावा ।
 ऐसा कृपा करावी राघवा । कृपाळुवा कृपानिधे ॥२०॥
 मज पाठवावें मधुपुरा । मी मारीन मधुकुमरा ।
 जेणें भक्षिलें मुनिवरां । तयाचा सूड घेईन ॥२१॥
 
हे कार्य करण्याची संधी शत्रुघ्नाला देण्याची भरताला रामांची विनंती :  
ऐसी शत्रुघ्नाची मधुर गिरा । ऐकोनि सुख श्रीरामचंद्रा । म्हणे ऐक भरतवीरा । तुझा पराक्रम अद्भूत ॥२२॥
 तूं मारिसील लवणासुरा । यदर्थी निःसंदेह कैकयीकुमरा ।
 परी पाठवावें शत्रुघ्नवीरा । तयासी हें कृत्य पैं दीजे ॥२३॥
 शत्रुघ्नासी लवणासुर । वांटा देइजे सत्वर ।
 ऐसें बोलोनि श्रीरघुवीर । पुनरपि बोलता पैं झाला ॥२४॥
 लवणासुराचें निर्दाळण । करील शत्रुघ्न निश्चयें जाण ।
 तेथील शत्रुघ्ना राज्य देईन । मी तोषोन निश्चयेंसीं ॥२५॥
 शत्रुघ्नासि राज्य मधुपुरीचें । लवणांती देईन साचें ।
 ऐसें मुखकमळ श्रीरामाचें । वदतें झालें ते काळीं ॥२६॥
 लवणासुर वधिलियाउपरी । तेथील राज्य शत्रुघ्ना करीं ।
 अति रमणीय मधुपुरी । यमुनातीरीं वसली जे ॥२७॥
 जेथील जन पुण्यवंत । नित्य नेमें अनुष्ठान करित ।
 जयांचें दानीं उदार चित्त । जे संग्रामीं शूर पराक्रमी ॥२८॥
 श्रीराम म्हणे शत्रुघ्नासी । असुर वधोनि तेथील राज्यासी ।
 अंगीकारीं माझ्या वचनासी । मान देवोनि ये समयीं ॥२९॥
 कनिष्ठें ज्येष्ठवचन । अवश्य करावें शास्त्रप्रमाण ।
 वसिष्ठादि ऋषि पाचारुन । तयांसि आज्ञा करिता झाला ॥३०॥
 ऐसें रघुनाथ बोलिल्यावरी । मग तो शत्रुघ्न दैत्यारी ।
 श्रीरामाप्रति मंद उत्तरीं । प्रार्थिता झाला ते वेळीं ॥३१॥
 
राज्य स्वीकारण्यास शत्रुघ्नाचा नकार :  
ऐकें नरवीरचूडामणी । राज्य ज्येष्ठ भरतावांचोनी । मज करितां अधर्म जनीं । यशा हानि होईल ॥३२॥
 सोडोनियां ज्येष्ठ बंधु । कनिष्ठा राज्यपट अबद्धु ।
 ऐसें असतां कृपासिंधु । राजा मज करुं नये ॥३३॥
 मी लवणासुरातें वधीन । राज्यीं स्थापावा मांडवीरमण ।
 राज्य मधुपुरीचें भरता आपण । कृपा करोन देईजे ॥३४॥
 लवणासुर घोरकर्मी । तुमचे आज्ञेनें वधीन संग्रामीं ।
 भरतासि अधिकार राज्यधर्मी । मजलागोनि पैं नाहीं ॥३५॥
 तुमचे आज्ञेसारिखे जन । वर्तताति स्वधर्मेकरुन ।
 तैसेच मी जैं न करिन । तैं दोष दारुण मज स्वामी ॥३६॥
 शिर सांडोनि धडासि जाण । कोण पूजितसे रघुनंदन ।
 ऐसें मज करितां परलोक शून्य । सत्य रामा होईल ॥३७॥
 मी स्वामीचा आज्ञाधर । आणि सेवेचा किंकर ।
 परी हे अधर्मांचें उत्तर । मज सहावेना नरव्याघ्रा ॥३८॥
 ऐसें शत्रुघ्नवचनानंतरें । कृपाळुवें श्रीरघुवीरें ।
 संतोषोनि भरतलक्ष्मणांसामोरें । आणि ऋषीश्वरां ऐकतां ॥३९॥
 
शत्रुघ्नाला अभिषेक :  
श्रीराम म्हणे भरतासी  । वेगीं आणावें सर्व सामग्रीसी । राज्याभिषेक शत्रुघ्नासी । लवणवधासी मग धाडूं ॥४०॥
 पाचारोनि ऋत्विज ब्राह्मण । ऋषि वसिष्ठादिकरुन ।
 आणि प्रधान सेवकजन । श्रीरामाज्ञा करिते झाले ॥४१॥
 जाणोनि श्रीरामज्ञेसी । करिते झाले समारंभासी ।
 जैसें देवीं इंद्रासी । तैसें राम करितसे ॥४२॥
 इंद्रभवनासमान । सुरुचिर गृहीं  प्रवेशोन ।
 शत्रुघ्नासी अभिषिंचन । करिते झाले ते समयीं ॥४३॥
 चंद्रशेखर गंगाधर । स्कंदा अभिषेकी तत्पर ।
 तैसा श्रीराम धरणीधर । अभिषेक केला शत्रुघ्नासी ॥४४॥
 नगरवासी प्रजाजन । आणि पंडित मुनिगण ।
 तिघी माता सुखसंपन्न । थोर संतोष पावल्या ॥४५॥
 नगरस्त्रिया आणि पुरवासी । बहुत झाले अति संतोषी ।
 म्हणती धन्य श्रीराम शत्रुघ्नासी । मधुपुरीचें राज्य देतो ॥४६॥
 ऐसी नगरजनांची वार्ता ऐकोन । मग तो धरणिजापति आपण ।
 शत्रुघ्नासी अभिषेक करुन । वरदबाण देता झाला ॥४७॥
 
श्रीरामांकडून लवणासुराला ठार करण्यासाठी शत्रुघ्नाला वरदबाणाची प्राप्ती  :  
श्रीराम म्हणे शत्रुघ्नासी । या बाणाचा महिमा परियेसी । हा शर धरित्या पुरुषासी । सदा यश कल्याण देतसे ॥४८॥
 या बाणें निश्चयेसीं जाण । करिशील लवणासुराचें हनन ।
 पुरुषव्याघ्रा संदेह न धरुन । कार्यसिद्धि करीं वेगीं ॥४९॥
 पूर्वी विधात्यानें हा बाण । निर्मिला दैत्यवधालागून ।
 संग्राम करितां वैरियांसि जाण । अदृश्य बाण लक्षेना ॥५०॥
 ब्रह्मदेबें क्रोधेंकरुन । करावया दुष्टांचे निर्दळण ।
 प्रतिपाळावया साधुजन । हा शर निर्माण पैं केला  ॥५१॥
 या शराचा पराक्रम थोर । येणे मारिले दैत्यदानव दुर्धर ।
 हा शर घेवोनियां सत्वर । मधुपुरीस शत्रुघ्ना जाइजे ॥५२॥
 पूर्वी रावणवधार्थी । हा शर मोकलिला नाहीं निश्चितीं ।
 अनसूट असे याची शक्ती । लवणासुरवधार्थी मी देतों ॥५३॥
 तो शर मी तुजप्रती । देतों लवणासुरवधार्थी ।
 आणिकही सांगू युक्ती । सावधवृत्ती अवधारीं ॥५४॥
 
मधुपुरात न जाता त्याला बाहेर बोलवावे; शत्रुघ्नाला आदेश :  
त्वां जावें मधुपुरांबाहेरी । प्रवेशावें ना नगरीं । दुरी राहोनि तो द्विजारी । युद्धालागीं पाचरिजे ॥५५॥
 तयासि शिवाचें वरदान । शिवें शूळ तया दिधला जाण ।
 तो बळें तापसां कंदन । शूळ घेवोनियां करीतसे ॥५६॥
 तुवां जावोनि नगरद्वारीं । शर धरोनि युद्धा पाचारीं ।
 अवश्य मरण पावेल वैरी । सत्य जाण शत्रुघ्ना ॥५७॥
 ऐसें करोनि शत्रुघ्ना । जय पावसी नाहीं अनुमाना ।
 श्रीरामें करोनि प्रतिज्ञा । प्रयाण शत्रुघ्ना करविता झाला ॥५८॥
 एका जनार्दना शरण । पुढील रसाळ निरुपण ।
 श्रीरामें गोड रामायण । चरित्र गहन शतकोटि ॥५९॥
 स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
 मधुपुरीशत्रुघ्नराज्याभिषेको नाम अष्टपंचाशत्तमोऽध्यायः ॥५८॥ ओंव्या ॥५९॥
 GO TOP 
 
 |