[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामं प्रत्ययोध्यां राज्यग्रहणार्थं भरतस्यानुरोधः, जीवनस्यानित्यतां निरूपयतः श्रीरामस्य ’पितृनिधनहेतोः शोको न कर्तव्यः’ इति भरतं प्रत्युपदेशस्तथा श्रीरामेण पितुराज्ञापालनार्थमेव राज्यमगृहित्वा वनवासायैव स्वाभिप्रायप्रकटनम् -
भरतांनी श्रीरामास अयोध्येत येऊन राज्य ग्रहण करण्यासाठी सांगणे, श्रीरामांनी जीवनाची अनित्यता सांगून पित्याच्या मृत्युसाठी शोक न करण्यासंबंची भरतास उपदेश करणे आणि पित्याची आज्ञा पालन करण्यासाठीच राज्य ग्रहण न करता वनात राहण्याचाच दृढ निश्चय सांगणे -
ततः पुरुषसिंहानां वृतानां तैः सुहृद्‌गणैः ।
शोचतामेव रजनी दुःखेन व्यत्यवर्तत ॥ १ ॥

रजन्यां सुप्रभातायां भ्रातरस्ते सुहृद्‌वृताः ।
मन्दाकिन्यां हुतं जप्यं कृत्वा राममुपागमन् ॥ २ ॥
आपल्या सुहृदांनी घेरून बसलेल्या पुरुषसिंह श्रीराम आदि भावांची ती रात्र पित्याच्या मृत्युच्या दुःखाने शोक करीत असताच व्यतीत झाली. सकाळ झाल्यावर भरत आदि तिन्ही भाऊ सुहृदांसह मंदाकिनीच्या तटावर गेले आणि स्नान, होम तसेच जप आदि करून पुन्हा श्रीरामांच्या जवळ परत आले. ॥ १-२ ॥
तूष्णीं ते समुपासीना न कश्चित् किञ्चिदब्रवीत् ।
भरतस्तु सुहृन्मध्ये रामं वचनमब्रवीत् ॥ ३ ॥
तेथे येऊन सर्व गुपचुप बसून राहिले. कुणी काहीच बोलत नव्हते. तेव्हां सुहृदांच्या मध्ये बसलेल्या भरतांनी श्रीरामास याप्रकारे म्हटले - ॥ ३ ॥
सान्त्विता मामिका माता दत्तं राज्यमिदं मम ।
तद् ददामि तवैवाहं भुङ्‌क्ष्व राज्यमकण्टकम् ॥ ४ ॥
"हे बंधो ! पित्याने वरदान देऊन माझ्या मातेला संतुष्ट केले आणि मातेने हे राज्य मला दिले आहे. आता मी माझ्या वतीने हे अकण्टक राज्य आपल्या सेवेमध्ये समर्पित करीत आहे. आपण याचे पालन करावे आणि उपभोग घ्यावा." ॥ ४ ॥
महतेवाम्बुवेगेन भिन्नः सेतुर्जलागमे ।
दुरावारं त्वदन्येन राज्यखण्डमिदं महत् ॥ ५ ॥
’वर्षाकाळी जलाच्या महान् वेगाने तुटून गेलेल्या सेतुप्रमाणे या विशाल राज्यखण्डास संभाळणे आपल्या शिवाय दुसर्‍यांसाठी अत्यंत कठीण आहे. ॥ ५ ॥
गतिं खर इवाश्वस्य तार्क्ष्यस्येव पतत्त्रिणः ।
अनुगन्तुं न शक्तिर्मे गतिं तव महीपते ॥ ६ ॥
’हे महीपति ! ज्याप्रमाणे गाढव घोड्याच्या आणि अन्य साधारण पक्षी गरुडाच्या चालीने चालू शकत नाही, त्याप्रकारे माझ्यात आपल्या गतिचे, आपल्या पद्धतीचे अनुसरण करण्याची शक्ति नाही आहे. ॥ ६ ॥
सुजीवं नित्यशस्तस्य यः परानुपजीव्यते ।
राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥ ७ ॥
श्रीरामा ! ज्याच्या जवळ जाऊन दुसरे लोक जीवन निर्वाह करतात, त्याचे जीवन उत्तम आहे आणि जो दुसर्‍यांचा आश्रय घेऊन जीवन निर्वाह करतो, त्याचे जीवन दुःखमय आहे (म्हणून आपल्यासाठी राज्य करणे हेच उचित आहे). ॥ ७ ॥
यथा तु रोपितो वृक्षः पुरुषेण विवर्धितः ।
ह्रस्वकेन दुरारोहो रूढस्कन्धो महाद्रुमः ॥ ८ ॥

स यथा पुष्पितो भूत्वा फलानि न विदर्शयेत् ।
स तां नानुभवेत् प्रीतिं यस्य हेतोः प्ररोपितः ॥ ९ ॥

एषोपमा महाबाहो तदर्थं वेत्तुमर्हसि ।
यदि त्वमस्मान् वृषभो भर्ता भृत्यान् न शाधि हि ॥ १० ॥
’ज्याप्रमाणे फळाची इच्छा ठेवणार्‍या कुणा पुरुषाने एक वृक्ष लावला, त्याचे पालनपोषण करून त्याला मोठा केला; नंतर त्याच्या फांद्या मोठ्या झाल्या आणि तो असा विशाल बृक्ष झाला की कुणा ठेंगण्या उंचीच्या पुरुषाला त्याच्यावर चढणे अत्यंत कठीण होते. त्या वृक्षाला जेव्हां फुले लागतील, त्यानंतरही जर फळ दिसून आले नाही तर ज्यासाठी तो वृक्ष लावला होता तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही, अशा स्थितीमध्ये तो वृक्ष लावणारा पुरुष, फलाची प्राप्ती होण्याने जो प्रसन्नतेचा अनुभव येणे संभवनीय असते त्या प्रसन्नतेचा अनुभव करू शकत नाही. महाबाहु ! ही एक उपमा आहे, याचा अर्थ आपण स्वतः समजून घ्यावा (अर्थात् पित्याने आपल्या सारख्या सर्वगुणसंपन्न पुत्राला लोकरक्षणासाठी उत्पन्न केले होते. जर आपण राज्यपालनाचा भार आपल्या हाती घेतला नाहीत तर त्यांचा तो उद्देश व्यर्थच होऊन जाईल). या राज्यपालनाच्या अवसरी आपण श्रेष्ठ आणि भरण-पोषणास समर्थ असूनही जर आमचे भृत्यांचे शासन केले नाहीत तर पूर्वोक्त उपमाच आपल्याला लागू पडेल. ॥ ८-१० ॥
श्रेणयस्त्वां महाराज पश्यन्त्वग्र्याश्च सर्वशः ।
प्रतपन्तमिवादित्यं राज्ये स्थितमरिंदमम् ॥ ११ ॥
’महाराज ! विभिन्न जातीचे संघ आणि प्रधान प्रधान पुरुष आपणास शत्रुदमन नरेशास सर्व बाजूनी तप्त होणार्‍या सूर्याप्रमाणे राजसिंहासनावर विराजमान झालेले पाहोत. ॥ ११ ॥
तथानुयाने काकुत्स्थ मत्ता नर्दंतु कुञ्जराः ।
अन्तःपुरगता नार्यो नन्दन्तु सुसमाहिताः ॥ १२ ॥
’काकुत्स्थ ! या प्रकारे आपण अयोध्येस परत जाल तेव्हां मत्त हत्ती गर्जना करोत आणि अंतःपुरातील स्त्रिया एकाग्रचित्त होऊन प्रसन्नतापूर्वक आपले अभिनंदन करोत."॥ १२ ॥
तस्य साध्वनुमन्यन्त नागरा विविधा जनाः ।
भरतस्य वचः श्रुत्वा रामं प्रत्यनुयाचतः ॥ १३ ॥
या प्रकारे श्रीरामांनी राज्य ग्रहण करावे म्हणून प्रार्थना करणार्‍या भरताचे हे बोलणे ऐकून नगरातल्या वेगवेगळ्या लोकांनी त्याचे उत्तम प्रकारे अनुमोदन केले. ॥ १३ ॥
तमेवं दुःखितं प्रेक्ष्य विलपन्तं यशस्विनम् ।
रामः कृतात्मा भरतं समाश्वासयदात्मवान् ॥ १४ ॥
तेव्हां शिक्षित बुद्धि असणार्‍या अत्यंत धीर भगवान श्रीरामांनी यशस्वी भरतास याप्रमाणे दुःखी होऊन विलाप करताना पाहून त्यांना सांत्वना देत म्हटले - ॥ १४ ॥
नात्मनः कामकारो हि पुरुषोऽयमनीश्वरः ।
इतश्चेतरतश्चैनं कृतान्तः परिकर्षति ॥ १५ ॥
हे बंधो ! हा जीव ईश्वराप्रमाणे स्वतंत्र नाही म्हणून कोणी येथे आपल्या इच्छेनुसार अनुसरून काही करू शकत नाही. काल या पुरुषाला इकडे तिकडे खेंचत राहात असतो. ॥ १५ ॥
सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः ।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् ॥ १६ ॥
’समस्त संग्रहाचा अंत-विनाश आहे. लौकिक उन्नतिंचा अंत पतन आहे. संयोगाचा अंत वियोग आहे आणि जीवनाचा अंत मरण आहे. ॥ १६ ॥
यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद् भयम् ।
एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद् भयम् ॥ १७ ॥
’ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाला पतनाशिवाय आणखी कुणापासून भय नाही, त्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या मनुष्यांना मृत्युशिवाय आणखी कुणापासून भय नाही. ॥ १७ ॥
यथाऽऽगारं दृढस्थूणं जीर्णं भूत्वोपसीदति ।
तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशंगताः ॥ १८ ॥
’जसे सुदृढ खांब असलेले घरही जुने झाले की पडून जाते त्याप्रमाणे मनुष्यही जरा आणि मृत्यु यांच्या अधीन होऊन नष्ट होऊन जातो. ॥ १८ ॥
अत्येति रजनी या तु सा न प्रतिनिवर्तते ।
यात्येव यमुना पूर्णं समुद्रमुदकार्णवम् ॥ १९ ॥
’जी रात्र निघून जाते ती परतून येत नाही. ज्याप्रमाणे जलांनी भरलेली यमुना समुद्राकडे जाते, ती तिकडून परत येत नाही. ॥ १९ ॥
अहोरात्राणि गच्छन्ति सर्वेषां प्राणिनामिह ।
आयूंषि क्षपयन्त्याशु ग्रीष्मे जलमिवांशवः ॥ २० ॥
’दिवसरात्र निरंतर निघून जात आहेत आणि या संसारात सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा तीव्र गतीने नाश करीत आहेत. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत सूर्याचे किरण शीघ्रतापूर्वक जलाचे शोषण करीत असतात त्याप्रमाणेच. ॥ २० ॥
आत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि ।
आयुस्ते हीयते यस्य स्थितस्यास्य गतस्य च ॥ २१ ॥
’तुम्ही स्वतःचीच चिंता करा; दुसर्‍यासाठी वारंवार शोक कशाला करीत आहात ? कुणी या लोकात स्थित असो अथवा अन्यत्र गेलेला असो, प्रत्येकाचे आयुष्य निरंतर क्षयच पावत असते. ॥ २१ ॥
सहैव मृत्युर्व्रजति सह मृत्युर्निषीदति ।
गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते ॥ २२ ॥
’मृत्यु बरोबरच चालत असतो, बरोबरच बसत असतो आणि बर्‍याच मोठ्या मार्गाची यात्रा करतांनाही मृत्यु बरोबरच जाऊन त्या मनुष्याबरोबरच परतही येत असतो. ॥ २२ ॥
गात्रेषु वलयः प्राप्ताः श्वेताश्चैव शिरोरुहाः ।
जरया पुरुषो जीर्णः किं हि कृत्वा प्रभावयेत् ॥ २३ ॥
’शरीरावर सुरकुत्या पडल्या, डोक्यावरील केस पांढरे झाले, नंतर जरावस्थेत जीर्ण झालेला मनुष्य कोणता उपाय करून मृत्युपासून वाचावे म्हणून आपला प्रभाव प्रकट करू शकतो ? ॥ २३ ॥
नन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि ।
आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम् ॥ २४ ॥
’लोक सूर्योदय झाल्यावर प्रसन्न होतात, सूर्यास्त झाल्यावरही खुष होतात. परंतु प्रतिदिन आपल्या जीवनाचा नाश होत आहे हे जाणत नाहीत. ॥ २४ ॥
हृष्यन्त्यृतुमुखं दृष्ट्‍वा नवं नवमिवागतम् ।
ऋतूनां परिवर्तेन प्राणिनां प्राणसंक्षयः ॥ २५ ॥
’कोणत्याही ऋतूचा प्रारंभ पाहून जणु तो नव्याने आला आहे (पूर्वी कधी आलाच नव्हता) असे समजून लोक हर्षाने प्रफुल्ल होतात, परंतु ऋतूंच्या परिवर्तनाने प्राण्यांच्या प्राणांचा (आयुष्याचा) क्रमशः क्षय होत आहे हे लोक जाणत नाहीत. ॥ २५ ॥
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य च व्यपेयातां कालमासाद्य कञ्चन ॥ २६ ॥

एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च ।
समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः ॥ २७ ॥
’ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एक दुसर्‍यास भेटतात आणि काही काळाने विलग होतात; त्याप्रकारेच स्त्री, पुत्र, कुटुंब आणि धनही मिळते आणि त्यांचा वियोगही होतो (सुटून जातात) कारण की त्यांचा वियोग अवश्यंभावी आहे. ॥ २६-२७ ॥
नात्र कश्चिद् यथाभावं प्राणी समभिवर्तते ।
तेन तस्मिन् न सामर्थ्यं प्रेतस्यास्त्यनुशोचतः ॥ २८ ॥
’या संसारात कोणताही प्राणी यथासमय प्राप्त होणार्‍या जन्म-मरणाचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून जो कुणी मेलेल्या व्यक्तिसाठी वारंवार शोक करतो, त्याच्यापाशी हे सामर्थ्य नाही की तो आपल्याही मृत्युला टाळू शकेल. ॥ २८ ॥
यथा हि सार्थं गच्छन्तं ब्रूयात् कश्चित् पथि स्थितः ।
अहमप्यागमिष्यामि पृष्ठतो भवतामिति ॥ २९ ॥

एवं पूर्वैर्गतो मार्गः पैतृपितामहैर्ध्रुवः ।
तमापन्नः कथं शोचेद् यस्य नास्ति व्यतिक्रमः ॥ ३० ॥
ज्याप्रमाणे पुढे जाणार्‍या यात्रेकरूंच्या अथवा व्यापार्‍यांच्या समुदायास रस्त्यात उभा असलेला पथिक असे म्हणतो की मी देखील आपणा सर्वांच्या मागोमाग येईन आणि तदनुसार तो त्यांच्या पाठोपाठ जातो; त्याप्रकारेच आपले पूर्वज-पिता-पितामह आदि ज्या मार्गाने गेले आहेत, ज्यावर जाणे अनिवार्य आहे; तसेच ज्यापासून वाचण्याचा काहीही उपाय नाही, त्याच मार्गावर स्थित असलेला मनुष्य दुसर्‍यांसाठी शोक कसा करेल ? ॥ २९-३० ॥
वयसः पतमानस्य स्रोतसो वानिवर्तिनः ।
आत्मा सुखे नियोक्तव्यः सुखभाजः प्रजाः स्मृताः ॥ ३१ ॥
’ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह उलटा मागे फिरत नाही, त्याप्रकारे प्रतिदिन ढळणारी अवस्था परतून येत नाही. तिचा क्रमशः नाश होत आहे असा विचार करून आत्म्याला कल्याणाच्या साधनभूत धर्मामध्ये लावावे. कारण सर्व लोक आपल्या कल्याणाचीच इच्छा करतात. ॥ ३१ ॥
धर्मात्मा सुशुभैः कृत्स्नैः क्रतुभिश्चाप्तदक्षिणैः ।
धूतपापो गतः स्वर्गं पिता नः पृथिवीपतिः ॥ ३२ ॥

भृत्यानां भरणात् सम्यक् प्रजानां परिपालनात् ।
अर्थादानाच्च धर्मेण पिता नस्त्रिदिवं गतः ॥ ३३ ॥
’तात ! आपले पिता धर्मात्मा होते. त्यांनी पर्याप्त दक्षिणा देऊन प्रायः सर्व परम शुभकारक यज्ञांचे अनुष्ठान केले होते. प्रजाजनांचे उतम प्रकारे पालन करीत होते. आणि प्रजाजनांकडून धर्मानुसार कर आदिंच्या रूपात धन घेत होते - या सर्व कारणांमुळे आपले पिता उत्तम स्वर्गात गेले आहेत. ॥ ३२-३३ ॥
कर्मभिस्तु शुभैरिष्टैः क्रतुभिश्चाप्तदक्षिणैः ।
स्वर्गं दशरथः प्राप्तः पिता नः पृथिवीपतिः ॥ ३४ ॥
’सर्वप्रिय शुभ कर्मे आणि प्रचुर दक्षिणा देणार्‍या यज्ञांच्या अनुष्ठानामुळे आपले पिता पृथ्वीपति दशरथ महाराज स्वर्गलोकात गेले आहेत. ॥ ३४ ॥
इष्ट्‍वा बहुविधैर्यज्ञैर्भोगांश्चावाप्य पुष्कलान् ।
उत्तमं चायुरासाद्य स्वर्गतः पृथिवीपतिः ॥ ३५ ॥
’त्यांनी नाना प्रकारच्या यज्ञांच्या द्वारे यज्ञपुरुषाची आराधना केली, प्रचुर भोग प्राप्त केले आणि उत्तम आयुष्यही त्यांना लाभले होते. यानंतर ते दशरथ महाराज येथून स्वर्गलोकात गेले आहेत. ॥ ३५ ॥
आयुरुत्तममासाद्य भोगानपि च राघवः ।
स न शोच्यः पिता तात स्वर्गतः सत्कृतः सताम् ॥ ३६ ॥
’तात ! अन्य राजांच्यापेक्षा उत्तम आयुष्य आणि श्रेष्ठभोग मिळवून आपले वडील सदा सत्पुरुषांच्या द्वारा सन्मानित झालेले आहेत, म्हणून स्वर्गवासी झाल्यावरही ते शोक करण्यायोग्य नाहीत. ॥ ३६ ॥
स जीर्णमानुषं देहं परित्यज्य पिता हि नः ।
दैवीमृद्धिमनुप्राप्तो ब्रह्मलोकविहारिणीम् ॥ ३७ ॥
’आपल्या पित्याने जरा-जीर्ण मानव शरीराचा परित्याग करून दैवी संपत्ती प्राप्त केली आहे जी ब्रह्मलोकात विहार करविणारी आहे. ॥ ३७ ॥
तं तु नैवंविधः कश्चित् प्राज्ञः शोचितुमर्हसि ।
त्वद्विधो मद्विधश्चापि श्रुतवान् बुद्धिमत्तरः ॥ ३८ ॥
’कुणीही असा विद्वान, जो तुमच्या आणि माझ्यासारखा शास्त्रज्ञान संपन्न आणि परम बुद्धिमान आहे, पित्यासाठी शोक करू शकत नाही. ॥ ३८ ॥
एते बहुविधाः शोका विलापरुदिते तदा ।
वर्जनीया हि धीरेण सर्वावस्थासु धीमता ॥ ३९ ॥
’धीर आणि प्रज्ञावान पुरुषांनी सर्व अवस्थांमध्ये हे नाना प्रकारचे शोक, विलाप तसेच रोदन यांचा त्याग करणे आवश्यक आहे. ॥ ३९ ॥
स स्वस्थो भव मा शोको यात्वा चावस तां पुरीम् ।
तथा पित्रा नियुक्तोऽसि वशिना वदतां वर ॥ ४० ॥
’म्हणून तू स्वस्थ होऊन जा. तुम्ही मनात शोक करीत असता उपयोगी नाही. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ भरता ! तुम्ही येथून जाऊन अयोध्यापुरीत निवास करा. कारण की मनाला वश ठेवणार्‍या पित्याने तुमच्यासाठी हाच आदेश दिला आहे. ॥ ४० ॥
यत्राहमपि तेनैव नियुक्तः पुण्यकर्मणा ।
तत्रैवाहं करिष्यामि पितुरार्यस्य शासनम् ॥ ४१ ॥
’त्या पुण्यकर्मा महाराजांनी मलाही जेथे राहण्याची आज्ञा दिली आहे, तेथेच राहून मी त्या पूज्य पित्याच्या आदेशाचे पालन करीन. ॥ ४१ ॥
न मया शासनं तस्य त्यक्तुं न्याय्यमरिंदम ।
तत् त्वयापि सदा मान्यः स वै बन्धुः स नः पिता ॥ ४२ ॥
शत्रुदमन भरत ! पित्याच्या आज्ञेची अवहेलना करणे माझ्यासाठी कदापि उचित नाही. ते तुमच्यासाठीही सर्वदा सन्मानास योग्य आहेत. कारण की तेच आम्हां लोकांचे हितैषी बंधु आणि जन्मदाते आहेत. ॥ ४२ ॥
तद् वचः पितुरेवाहं सम्मतं धर्मचारिणाम् ।
कर्मणा पालयिष्यामि वनवासेन राघव ॥ ४३ ॥
’राघव (भरत) ! मी या वनवासरूपी कर्मद्वारा पित्याच्याच वचनाचे, जे धर्मात्म्यांनाही मान्य आहे, पालन करीन. ॥ ४३ ॥
धार्मिकेणानृशंसेन नरेण गुरुवर्तिना ।
भवितव्यं नरव्याघ्र परलोकं जिगीषता ॥ ४४ ॥
’नरश्रेष्ठ ! परलोकावर विजय प्राप्त करण्याची इच्छा ठेवणार्‍या मनुष्याने धार्मिक, क्रूरतारहित आणि गुरुजनांचे आज्ञापालक होणे आवश्यक आहे. ॥ ४४ ॥
आत्मानमनुतिष्ठ त्वं स्वभावेन नरर्षभ ।
निशाम्य तु शुभं वृत्तं पितुर्दशरथस्य नः ॥ ४५ ॥
’मनुष्यात श्रेष्ठ भरता ! आपले पूज्य पिता दशरथ यांच्या शुभ आचरणांवर दृष्टिपात करून तुम्ही आपल्या धार्मिक स्वभावाच्या द्वारा आत्म्याच्या उन्नतीसाठी प्रयत्‍न करा." ॥ ४५ ॥
इत्येवमुक्त्वा वचनं महात्मा
     पितुर्निदेशप्रतिपालनार्थम् ।
यवीयसं भ्रातरमर्थवच्च
     प्रभुर्मुहूर्ताद् विरराम रामः ॥ ४६ ॥
सर्वशक्तिमान महात्मा श्रीराम एक मुहूर्तपर्यंत आपला लहान भाऊ भरत याच्याकडून पित्याच्या आज्ञेचे पालन करविण्याच्या उद्देशाने ही अर्थयुक्त वचने बोलून गप्प झाले. ॥ ४६ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चाधिकशततमः सर्गः ॥ १०५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे पाचवा सर्ग पूरा झाला ॥ १०५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP