[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
श्रीरामप्रभावं वर्णयता हनुमता रावणस्य प्रबोधनम् -
हनुमन्ताचे श्रीरामांचा प्रभाव वर्णन करून रावणास समजाविणे -
तं समीक्ष्य महासत्त्वं सत्त्ववान् हरिसत्तमः ।
वाक्यमर्थवदव्यग्रस्तमुवाच दशाननम् ॥ १॥
नन्तर स्वकर्तव्यचतुर, सत्त्वशील आणि शक्तिशाली वानरश्रेष्ठ हनुमन्तांनी महाबली रावणाकडे पाहून शान्त चित्ताने अर्थयुक्त भाषण केले. ॥१॥
अहं सुग्रीवसन्देशादिह प्राप्तस्तवान्तिके ।
राक्षसेन्द्र हरीशस्त्वां भ्राता कुशलमब्रवीत् ॥ २ ॥
ते म्हणाले - हे राक्षसाधिपती ! मी सुग्रीवाचा सन्देश घेऊन येथे तुझ्या महालात आलो आहे. वानरराज सुग्रीव तुझा भ्राता आहे. या नात्यानेच त्याने तुझा कुशल समाचार विचारला आहे. ॥२॥
भ्रातुः शृणु समादेशं सुग्रीवस्य महात्मनः ।
धर्मार्थसहितं वाक्यं इह चामुत्र च क्षमम् ॥ ३ ॥
आता धर्म आणि अर्थ यांना अनुसरून असलेला आणि इहलोकी आणि परलोकी तुला हितावह होणारा असा महात्मा भ्रात्या सुग्रीवाचा सन्देश तू ऐकून घे. ॥३॥
राजा दशरथो नाम रथकुञ्जरवाजिमान् ।
पितेव बन्धुर्लोकस्य सुरेश्वरसमद्युतिः ॥ ४ ॥
नुकताच रथ, गज आणि अश्व यांनी संपन्न, इन्द्राप्रमाणे तेजस्वी आणि प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारा दशरथ नावाचा एक राजा होऊन गेला. ॥४॥
ज्येष्ठस्तस्य महाबाहुः पुत्रः प्रियतरः प्रभुः ।
पितुर्निर्देशान्निष्क्रान्तः प्रविष्टो दण्डकावनम् ॥ ५ ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया सह भार्यया ।
रामो नाम महातेजा धर्म्यं पन्थानमाश्रितः ॥ ६ ॥
त्याचा परम प्रिय ज्येष्ठ पुत्र महातेजस्वी प्रभावशाली महाबाहु श्रीराम पित्याच्या आज्ञेने धर्ममार्गाचे अवलंबन करून आपली पत्‍नी सीता आणि बन्धु लक्ष्मण यांच्यासह दंडकारण्यात आले. ॥५-६॥
तस्य भार्या जनस्थाने भ्रष्टा सीतेति विश्रुता ।
वैदेहस्य सुता राज्ञो जनकस्य महात्मनः ॥ ७ ॥
त्यांची पत्‍नी सीता ही विदेहदेशाचा राजा महात्मा जनक यांची कन्या आहे. वनात आल्यावर ती पतिचे अनुसरण करणारी सीता कोठे तरी नाहीशी झाली आहे. ॥७॥
मार्गमाणस्तु तां देवीं राजपुत्रः सहानुजः ।
ऋश्यमूकमनुप्राप्तः सुग्रीवेण च संगतः ॥ ८ ॥
त्या देवीला शोधत शोधत राजपुत्र श्रीराम आपल्या धाकट्‍या बन्धुसह ऋष्यमूक पर्वतावर आले तेव्हा सुग्रीवाची आणि त्यांची भेट झाली. ॥८॥
तस्य तेन प्रतिज्ञातं सीतायाः परिमार्गणम् ।
सुग्रीवस्यापि रामेण हरिराज्यं निवेदितम् ॥ ९ ॥
तेव्हा सीतेचा शोध लावण्याचे त्या सुग्रीवाने श्रीरामांना वचन दिले आणि रामांनीही सुग्रीवाला वानरराज्य मिळवून देण्याचे अभिवचन दिले. ॥९॥
ततस्तेन मृधे हत्वा राजपुत्रेण वालिनम् ।
सुग्रीवः स्थापितो राज्ये हर्यृक्षाणां गणेश्वरः ॥ १० ॥
त्यानन्तर राजकुमार रामचन्द्रांनी युद्धात वालीला मारून सुग्रीवाला किष्किन्धेच्या राज्यावर बसविले. यावेळी सुग्रीव वानर आणि अस्वलांच्या समुदायाचा स्वामी आहे. ॥१०॥
त्वया विज्ञातपूर्वश्च वाली वानरपुङ्‌‍गवः ।
रामेण निहतः सङ्‌‍ख्ये शरेणैकेन वानरः ॥ ११ ॥
वानरराज वालीला तर तू प्रथमपासूनच जाणत आहेस श्रीरामांनी संग्रामात त्याचा एकाच बाणाने वध केला. ॥११ ॥
स सीतामार्गणे व्यग्रः सुग्रीवः सत्यसंगरः ।
हरीन् सम्प्रेषयामास दिशः सर्वा हरीश्वरः ॥ १२ ॥
नन्तर स्वकर्तव्याविषयी नेहमी दक्ष असलेल्या त्या सत्यवचनी वानराधिपती सुग्रीवाने सीतेच्या शोधाकरिता सर्व दिशांना वानर पाठवून दिले आहेत. ॥१२॥
तां हरीणां सहस्राणि शतानि नियुतानि च ।
दिक्षु सर्वासु मार्गन्ते ह्यधश्चोपरि चाम्बरे ॥ १३ ॥
या समयी शेकडो, हजारो आणि लाखो वानर संपूर्ण दिशांमध्ये तसेच आकाश आणि पाताळातही सीतेचा शोध करीत आहेत. ॥१३॥
वैनतेयसमाः केचित् केचित् तत्रानिलोपमाः ।
असङ्‌‍गगतयः शीघ्रा हरिवीरा महाबलाः ॥ १४ ॥
त्या वानरांमध्ये काही गरूडाप्रमाणे वेगवान आहेत तर काही वायुसमान वेगवान आहेत. त्यांची गती कुठेही कुंठित होत नाही. ते कपिवीर शीघ्रगामी आणि महाबलाढ्‍य आहेत. ॥१४॥
अहं तु हनुमान्नाम मारुतस्यौरसः सुतः ।
सीतायास्तु कृते तूर्णं शतयोजनमायतम् ॥ १५ ॥

समुद्रं लङ्‌‍घयित्वैव तां दिदृक्षुरिहागतः ।
भ्रमता च मया दृष्टा गृहे ते जनकात्मजा ॥ १६ ॥
माझे नाव हनुमान असून मी वायूचा औरसपुत्र आहे. केवळ सीतेच्या शोधासाठी शंभर योजने विस्तृत समुद्र एका उड्‍डाणात उल्लंघन करून तुला पाहण्याकरिता मी येथे आलो आहे. हिंडत फिरत असतां तुझ्या घरी असलेली जनकनन्दिनी सीताही माझ्या दृष्टीस पडली आहे. ॥१५-१६॥
तद् भवान् दृष्टधर्मार्थस्तपःकृतपरिग्रहः ।
परदारान् महाप्राज्ञ नोपरोद्धुं त्वमर्हसि ॥ १७ ॥
हे महामान्य रावणा ! तू धर्म आणि अर्थ यांचे तत्त्व जाणतोस. तू फार मोठ्‍या तपाचाही संग्रह केला आहेस म्हणून परस्त्रीला आपल्या घरात डांबून ठेवणे तुला केव्हाही योग्य नाही. ॥१७॥
न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु ।
मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्‌विधाः ॥ १८ ॥
धर्माविरूद्ध कार्यात फार मोठे अनर्थ भरलेले असतात. ते कर्त्याचा समूळ नाश करून टाकतात. म्हणून तुझ्यासारख्या बुद्धिमान पुरुषाने अशा कार्यास प्रवृत्त होता उपयोगी नाही. ॥१८॥
कश्च लक्ष्मणमुक्तानां रामकोपानुवर्तिनाम् ।
शराणामग्रतः स्थातुं शक्तो देवासुरेष्वपि ॥ १९ ॥
देवता आणि असुर यात असा कोण वीर आहे की जो श्रीरामांनी क्रोध केल्यावर आणि लक्ष्मणांनी सोडलेल्या बाणांसमोर टिकाव धरू शकेल ? ॥१९॥
न चापि त्रिषु लोकेषु राजन् विद्येत कश्चन ।
राघवस्य व्यलीकं यः कृत्वा सुखमवाप्नुयात् ॥ २० ॥
हे राजन ! तीन्ही लोकात असा एकही प्राणी नाही की जो भगवान श्रीरामांचा अपराध करून सुखी राहू शकेल. ॥२०॥
तत्त्रिकालहितं वाक्यं धर्म्यमर्थानुयायि च ।
मन्यस्व नरदेवाय जानकी प्रतिदीयताम् ॥ २१ ॥
म्हणून हे माझे धर्म आणि अर्थ यांना अनुसरून असलेले आणि सर्वकाळी हितावह असणारे भाषण तू लक्षात घे आणि जानकीला पुरुषश्रेष्ठ श्रीरामास परत दे. ॥२१॥
दृष्टा हीयं मया देवी लब्धं यदिह दुर्लभम् ।
उत्तरं कर्म यच्छेषं निमित्तं तत्र राघवः ॥ २२ ॥
सर्वात दुर्लभ असणारी जी गोष्ट सीतादेवीचे दर्शन ती मला मिळाली आहे. यानन्तर जे कार्य शेष आहे त्याच्या साध्य होण्यात राघवच निमित्त आहेत. (म्हणजे अवशिष्ट कार्य श्रीराम येथे आल्यावर पूर्ण होईल) ॥२२॥
लक्षितेयं मया सीता तथा शोकपरायणा ।
गृह्य यां नाभिजानासि पञ्चास्यामिव पन्नगीम् ॥ २३ ॥
मी येथे सीतेची अवस्था प्रत्यक्ष पाहिली आहे. ती निरन्तर शोकात बुडून गेली आहे. सीता तुझ्या घरात पाच (फणा) मुखे असलेल्या नागिणी प्रमाणे निवास करीत आहे. तिला तू पूर्णपणे ओळखलेले नाहीस. ॥२३॥
नेयं जरयितुं शक्या सासुरैरमरैरपि ।
विषसंसृष्टमत्यर्थं भुक्तमन्नमिवौजसा ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे अत्यन्त विषमिश्रित अन्न खाऊन त्याला बलपूर्वक कोणी पचवू शकत नाही, त्याचप्रमाणे सीतेलाही आपल्या शक्तीच्या बळावर देवता आणि असुरही पचवू शकत नाहीत. (ते असंभवनीय आहे) ॥२४॥
तपःसन्तापलब्धस्ते योऽयं धर्मपरिग्रहः ।
न स नाशयितुं न्याय्यं आत्मप्राणपरिग्रहः ॥। २५ ॥
तू तपस्येचे कष्ट घेऊन हा धर्माचे फळस्वरूप जो ऐश्वर्याचा संग्रह केला आहेस आणि शरीर आणि प्राणांनाही दीर्घकाळ पर्यन्त धारण करण्याची शक्ति प्राप्त केली आहेस, त्याचा विनाश करणे उचित नाही. ॥२५॥
अवध्यतां तपोभिर्यां भवान् समनुपश्यति ।
आत्मनः सासुरैर्देवैर्हेतुस्तत्राप्ययं महान् ॥ २६ ॥
तुला तपामुळे देव आणि असुर यांच्याकडून जी अवध्यता प्राप्त झाली आहे तिचे कारणही तुझे हे धर्माचरण आहे. (अथवा ती अवध्यता प्राप्त असूनही तुझ्या वधाचे महान कारण उपस्थित झाले आहे) ॥२६॥
सुग्रीवो न हि देवोऽयं न यक्षो न च राक्षसः ।
मानुषो राघवो राजन् सुग्रीवश्च हरीश्वरः ।
तस्मात् प्राणपरित्राणं कथं राजन् करिष्यसि ॥ २७ ॥
हे राजन ! हा सुग्रीव आणि श्रीरामचन्द्र देव नाहीत, असुर नाहीत, राक्षस नाहीत अथवा दानव, गन्धर्व, यक्ष अथवा नागही नाहीत. श्रीरघुनाथ मनुष्य आहेत आणि सुग्रीव वानरांचा राजा आहे म्हणून तू त्यांच्या हातून आपल्या प्राणांचे रक्षण कसे करशील ? ॥२७॥
न तु धर्मोपसंहारमधर्मफलसंहितम् ।
तदेव फलमन्वेति धर्मश्चाधर्मनाशनः ॥ २८ ॥
(धर्माचे फळ सुख आहे. अधर्माचे फळ जे दुःख त्याने कधीही सुख मिळत नाही) जो पुरुष प्रबळ अधर्माच्या फळाने बान्धला जातो तो बद्ध होतो, त्याला धर्माचे फळ मिळत नाही; त्याला त्या अधर्मफळाचीच प्राप्ती होते. हां, जर त्याने त्या अधर्मानन्तर कुठल्याही प्रबळ धर्माचे अनुष्ठान केले तर ते अनुष्ठान पहिल्याने केलेल्या अधर्माचे नाशक होते. (जसे श्रुतीचे वचन आहे की - "धर्मेण पापमपनुदति" अर्थात धर्माने मनुष्य आपल्या पापांना दूर करतो. स्मृतीमध्ये सांगितलेली प्रायश्चित्ते कृच्छव्रत आदि पण या गोष्टीचे समर्थन करतात) ॥२८॥
प्राप्तं धर्मफलं तावद् भवता नात्र संशयः ।
फलमस्याप्यधर्मस्य क्षिप्रमेव प्रपत्स्यसे ॥ २९ ॥
तू पहिल्याने जो धर्म केला होतास त्याचे फळ तुला येथे पूर्णरूपाने प्राप्त झाले आहे, यान्त संशयच नाही. आता या सीताहरणरूपी अधर्माचे फळही तुला लवकरच भोगावे लागेल. ॥२९॥
जनस्थानवधं बुद्ध्वा वालिनश्च वधं तथा ।
रामसुग्रीवसख्यं च बुद्ध्यस्व हितमात्मनः ॥ ३० ॥
जनस्थानातील राक्षसांचा संहार, वालीचा वध आणि राम आणि सुग्रीव यांचे सख्य - या तीन कार्यांचा कार्यकारण संबन्ध नीट जाणून घे आणि त्यानन्तर आपल्या हिताचा विचार कर. ॥३०॥
कामं खल्वहमप्येकः सवाजिरथकुञ्जराम् ।
लङ्‌‍कां नाशयितुं शक्तस्तस्यैष तु न निश्चयः ॥ ३१ ॥
जरी मी एकटा सुद्धा हत्ती, घोडे आणि रथांसहित संपूर्ण लंकेचा नाश करू शकतो, तथापि श्रीरामांचा असा विचार नाही आहे. (त्यांनी मला या कार्यासाठी आज्ञा दिलेली नाही) ॥३१॥
रामेण हि प्रतिज्ञातं हर्यृक्षगणसन्निधौ ।
उत्सादनममित्राणां सीता यैस्तु प्रधर्षिता ॥ ३२ ॥
ज्या लोकांनी सीतेचा अपहार केलेला आहे त्या शत्रूंचा नाश स्वतः करण्याची प्रतिज्ञा श्रीरामांनी वानरगण आणि ऋक्षगण यांच्या समक्ष केली आहे. ॥३२॥
अपकुर्वन् हि रामस्य साक्षादपि पुरन्दरः ।
न सुखं प्राप्नुयादन्यः किं पुनस्त्वद्विधो जनः ॥ ३३ ॥
भगवान श्रीरामांचा अपराध करून साक्षात इन्द्रालाही सुख लाभू शकत नाही मग तुझ्यासारख्या यःकश्चित सामान्य जनाची गोष्ट कशाला पाहिजे ? ॥३३॥
यां सीतेत्यभिजानासि येयं तिष्ठति ते गृहे ।
कालरात्रीति तां विद्धि सर्वलङ्‌‍काविनाशिनीम् ॥ ३ ४॥
जिला तू सीता असे समजत आहेस आणि जी सांप्रत तुझ्या ताब्यात आहे, ती संपूर्ण लंकेचा नाश करणारी काळरात्रच आहे, हे तू लक्षात ठेव. ॥३४॥
तदलं कालपाशेन सीताविग्रहरूपिणा ।
स्वयं स्कन्धावसक्तेन क्षममात्मनि चिन्त्यताम् ॥ ३५ ॥
सीतेचे शरीर धारण करुन तुझ्याजवळच काळाचाच पाश येऊन पोहोचला आहे. त्यात स्वतः होऊन गळा अडकवणे ठीक नाही म्हणून आपल्या कल्याणाचा तू आता काही तरी विचार कर. ॥३५॥
सीतायास्तेजसा दग्धां रामकोपप्रपीडिताम् ।
दह्यमानामिमां पश्य पुरीं साट्टप्रतोलिकाम् ॥ ३६ ॥
नाहीतर श्रीरामांच्या क्रोधाने प्रदीप्त झालेली आणि सीतेच्या तेजाने आधीच दग्ध झालेली ही लङ्‌कानगरी, तिच्यातील मार्ग, इमारती यांसह जळत असलेली पाहण्याचा प्रसंग तुझ्यावर येईल. (वाचवणे शक्य असेल तर वाचव) ॥३६ ॥
स्वानि मित्राणि मन्त्रींश्च ज्ञातीन् भ्रातॄऽन् सुतान् हितान् ।
भोगान् दारांश्च लङ्‌‍कां च मा विनाशमुपानय ॥ ३७ ॥
हे स्वतःचे मित्र, मन्त्री, कुटुंबी जन, भ्राते, पुत्र, हितचिन्तक, स्त्रिया आणि सुखोपभोगाची सर्व साधने आणि संपूर्ण लङ्‌का यांना तू मृत्युमुखान्त ढकलू नकोस. त्यांच्या नाशास कारण बनू नकोस. ॥३७॥
सत्यं राक्षसराजेन्द्र शृणुष्व वचनं मम ।
रामदासस्य दूतस्य वानरस्य विशेषतः ॥ ३८ ॥
हे राक्षसांच्या राजाधिराज, मी भगवान श्रीरामांचा दास आहे. दूत आहे आणि विशेषतः वानर आहे. माझे सत्य भाषण तू नीट ऐक. ॥३८॥
सर्वान्लोकान् सुसंहृत्य सभूतान् सचराचरान् ।
पुनरेव तथा स्रष्टुं शक्तो रामो महायशाः ॥ ३९ ॥
महायशस्वी श्रीरामचन्द्र स्थावर जंगमात्मक सर्व प्राण्यांचा आणि पंचमहाभूतासह सर्व लोकांचा संहार करून, पुन्हा त्यांना उत्पन्न करण्यास समर्थ आहेत. ॥३९॥
देवासुरनरेन्द्रेषु यक्षरक्षोगणेषु च ।
विद्याधरेषु सर्वेषु गन्धर्वेषु मृगेषु च ॥ ४० ॥

सिद्धेषु किन्नरेन्द्रेषु पतत्त्रिषु च सर्वतः ।
सर्वत्र सर्वभूतेषु सर्वकालेषु नास्ति सः ॥ ४१ ॥

यो रामं प्रतियुद्ध्येत विष्णुतुल्यपराक्रमम् ।
भगवान श्रीराम श्रीविष्णुतुल्य पराक्रमी आहेत. देवता, असुर, मनुष्य, यक्ष, राक्षस, सर्प, विद्याधर, नाग, गन्धर्व, मृग, सिद्ध, किन्नर, पक्षी तसेच अन्य सर्व प्राण्यांमध्ये कोठेही, कुठल्याही काळी असा कोणीही नाही की जो श्रीरामांचा सामना करू शकेल. ॥४०-४१ १/२॥
सर्वलोकेश्वरस्येह कृत्वा विप्रियमुत्तमम् ।
रामस्य राजसिंहस्य दुर्लभं तव जीवितम् ॥ ४२ ॥
संपूर्ण लोकांचे अधीश्वर (राजसिंह) नृपश्रेष्ठ श्रीरामांचा तू आपल्या कृत्याने अपराध केला आहेस म्हणून तुझे जीवित सुरक्षित राहणे कठीण आहे. ॥४२॥
देवाश्च दैत्याश्च निशाचरेन्द्र
गन्धर्वविद्याधरनागयक्षाः ।
रामस्य लोकत्रयनायकस्य
स्थातुं न शक्ताः समरेषु सर्वे ॥ ४३ ॥
हे निशाचरराज ! श्रीराम त्रैलोक्याचे स्वामी आहेत. देव, दैत्य, गन्धर्व, विद्याधर, नाग, यक्ष हे सर्व मिळूनही युद्धात त्यांच्या समोर टिकाव धरू शकणार नाहीत. ॥४३॥
ब्रह्मा स्वयंभूश्चतुराननो वा
रुद्रस्त्रिनेत्रस्त्रिपुरान्तको वा ।
इन्द्रो महेन्द्रः सुरनायको वा
त्रातुं न शक्ता युधि राघवस्य ॥ ४४ ॥
स्वयंभू चतुर्मुख ब्रह्मदेव, त्रिपुरनाशक त्रिलोचन रूद्र, विष्णु आणि सर्व देवांचे स्वामी महान ऐश्वर्यशाली इन्द्र सुद्धा समरांगणात राघवासमोर उभे राहू शकत नाहीत. ॥४४॥
स सौष्ठवोपेतमदीनवादिनः
कपेर्निशम्याप्रतिमोऽप्रियं वचः ।
दशाननः कोपविवृत्तलोचनः
समादिशत् तस्य वधं महाकपेः ॥ ४५ ॥
वीरभावाने निर्भयतापूर्वक भाषण करणार्‍या महाकपि हनुमन्तांचे ते भाषण सुन्दर आणि संयुक्तिक होते तथापि रावणाला ते अप्रिय वाटले. ते ऐकून अनुपम शक्तिशाली दशानन रावणाने क्रोधाने डोळे वटारून सेवकांना त्या महाकपिचा वध करण्याची आज्ञा दिली. ॥४५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकावन्नावा सर्ग पूर्ण झाला. ॥५१॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP