श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षट्षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमदुत्पत्तिकथां श्रावयित्वा जांबवता समुद्रलंघनाय तस्य प्रोत्साहनम् - जाम्बवानांनी हनुमानास त्यांची उत्पत्तिकथा ऐकवून समुद्र लंघनासाठी उत्साहित करणे -
अनेकशतसाहस्रीं विषण्णां हरिवाहिनीम् ।
जांबवान् समुदीक्ष्यैवं हनुमंतमथाब्रवीत् ॥ १ ॥
लाखो वानरांच्या सेनेला या प्रकारे विषादात पडलेली पाहून जाम्बवानांनी हनुमानास म्हटले- ॥१॥
वीर वानरलोकस्य सर्वशास्त्रविदां वर ।
तूष्णीमेकांतमाश्रित्य हनुमान् किं न जल्पसि ॥ २ ॥
’वानर जगतांतील वीरा ! तसेच संपूर्ण शास्त्रवेत्त्यामध्ये श्रेष्ठ हनुमाना ! तू एकान्तात जाऊन गुपचुप का बसला आहेस ? काही बोलत का नाहीस ? ॥२॥
हनुमन् हरिराजस्य सुग्रीवस्य समो ह्यसि ।
रामलक्ष्मणयोश्चापि तेजसा च बलेन च ॥ ३ ॥
हनुमान् ! तू तर वानरराज सुग्रीवासमान पराक्रमी आहेस; तसेच तेज आणि बलामध्ये श्रीराम आणि लक्ष्मणाशी तुल्य आहेस. ॥३॥
अरिष्टनेमिनः पुत्रो वैनतेयो महाबलः ।
गरुत्मानिव विख्यात उत्तमः सर्वपक्षिणाम् ॥ ४ ॥
’कश्यपांचा महाबली पुत्र आणि समस्त पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ जो विनतानंदन गरूड आहे, त्याच्या प्रमाणेच तू सुद्धा विख्यात शक्तिशाली तसेच शीघ्रगामी आहेस. ॥४॥
बहुशो हि मया दृष्टः सागरे स महाबलः ।
भुजगानुद्धरन् पक्षी महाबाहुर्महाबलः ॥ ५ ॥
’महाबली, महाबाहु पक्षिराज गरूडाला मी समुद्रात कित्येक वेळा पाहिले आहे, जो मोठ मोठ्या सर्पांना तेथून खेचून आणतो. ॥५॥
पक्षयोर्यद् बलं तस्य भुजवीर्यबलं तव ।
विक्रमश्चापि वेगश्च न ते तेनापहीयते ॥ ६ ॥
त्यांच्या दोन्ही पंखामध्ये जे बळ आहे, तेच बळ, तोच पराक्रम तुमच्या या दोन्ही भुजांमध्येही आहे. म्हणून तुमचा वेग आणि विक्रमही त्यांच्यापेक्षा कमी नाही आहे. ॥६॥
बलं बुद्धिश्च तेजश्च सत्त्वं च हरिपुंगव ।
विशिष्टं सर्वभूतेषु किमात्मानं न बुध्यसे ॥ ७ ॥
’वानरश्रेष्ठा ! तुमचे बळ, बुद्धि, तेज आणि धैर्य ही समस्त प्राण्यांपेक्षा वरचढ आहे. मग तू स्वतःच आपण आपल्याशीच समुद्र ओलांडून जाण्यास का तयार होत नाहीस ? ॥७॥
अप्सराऽप्सरसां श्रेष्ठा विख्याता पुञ्जिकस्थला ।
अञ्जनेति परिख्याता पत्‍नी केसरिणो हरेः ॥ ८ ॥

विख्याता त्रिषु लोकेषु रूपेणाप्रतिमा भुवि ।
अभिशापादभूत् तात्तात वानरी कामरूपिणी ॥ ९ ॥

दुहिता वानरेंद्रस्य कुञ्जरस्य महात्मनः ।
(’वीरवर ! तुमच्या प्रादुर्भावाची कथा अशी आहे-) पुञ्जिकस्थला नामाने विख्यात जी अप्सरा आहे, ती समस्त अप्सरांमध्ये अग्रगण्य आहे. तात ! एका समयी शापवश ती कपियोनीमध्ये अवतीर्ण झाली. त्यासमयी ती वानरराज महामनस्वी कुञ्जराची कन्या इच्छे प्रमाणे रूप धारण करणारी होती. या भूतलावर तिच्या रूपाची बरोबरी करणारी दुसरी कुणीही स्त्री नव्हती. ती तीन्ही लोकामध्ये विख्यात होती. तिचे नाव अञ्जना होते. ती वानरराज केसरीची पत्‍नी झाली. ॥८-९ १/२॥
मानुषं विग्रहं कृत्वा रूपयौवनशालिनी ॥ १० ॥

विचित्रमाल्याभरणा कदाचित् क्षौमधारिणी ।
अचरत् पर्वतस्याग्रे प्रावृडंबुदसंनिभे ॥ ११ ॥
’एका दिवसाची गोष्ट आहे. रूप आणि यौवनाने सुशोभित असणारी अञ्जना मानवी स्त्रीचे शरीर धारण करून वर्षाकालातील मेघाप्रमाणे श्याम कांति असलेल्या पर्वतशिखरावर विचरत होती. ती फुलांच्या विचित्र आभूषणांनी विभूषित झालेली होती. ॥१०-११॥
तस्या वस्त्रं विशालाक्ष्याः पीतं रक्तदशं शुभम् ।
स्थितायाः पर्वतस्याग्रे मारुतोऽपाहरच्छनैः ॥ १२ ॥
’त्या विशाल लोचन बालेचे सुंदर वस्त्र तर पीत वर्णाचे होते पण त्याच्या काठाचा रंग लाल होता. ती पर्वताच्या शिखरावर उभी होती. त्याच समयी वायुदेवाने तिचे ते वस्त्र हळूच हरण केले. ॥१२॥
स ददर्श ततस्तस्या वृत्तावूरू सुसंहतौ ।
स्तनौ च पीनौ सहितौ सुजातं चारु चाननम् ॥ १३ ॥
’तत्पश्चात् त्यांनी तिच्या परस्परास भिडलेल्या गोल गोल जांघा, एक दुसर्‍यास भिडलेले पीन उरोज (स्तन) तसेच मनोहर मुखही पाहिले. ॥१३॥
तां बलादायतश्रोणीं तनुमध्यां यशस्विनीम् ।
दृष्ट्‍वैव शुभसर्वाङ्‌गींि पवनः काममोहितः ॥ १४ ॥
’तिचे नितंब उंच आणि विस्तृत होते. कटिभाग फारच सडपातळ होता. तिचे सर्व अंग परम सुंदर होते. या प्रकारे बलपूर्वक यशस्विनी अञ्जनेच्या अंगांचे अवलोकन करून पवनदेव कामाने मोहित झाले. ॥१४॥
स तां भुजाभ्यां दीर्घाभ्यां पर्यष्वजत मारुतः ।
मन्मथाविष्टसर्वाङ्‌गोभ गतात्मा तामनिंदिताम् ॥ १५ ॥
’त्यांच्या संपूर्ण अंगात कामभावाचा आवेश उत्पन्न झाला. मन अञ्जनेमध्येच लागले. त्यांनी त्या अनिंद्य सुंदरीला आपल्या दोन्ही विशाल भुजामध्ये धरून हृदयाशी धरले (आलिंगन दिले) ॥१५॥
सा तु तत्रैव संभ्रांता सुवृत्ता वाक्यमब्रवीत् ।
एकपत्‍नीिव्रतमिदं को नाशयितुमिच्छति ॥ १६ ॥
’अञ्जना उत्तम व्रताचे पालन करणारी सती नारी होती. म्हणून त्या अवस्थेत सांपडल्याने ती घाबरून गेली आणि म्हणाली -’ कोण माझ्या या पतिव्रत्याचा नाश करू इच्छित आहे ?’ ॥१६॥
अञ्जनाया वचः श्रुत्वा मारुतः प्रत्यभाषत ।
न त्वां हिंसामि सुश्रोणि माभूत् ते सुभगे भयम् ॥ १७ ॥
अञ्जनाचे बोलणे ऐकून पवनदेवाने उत्तर दिले- ’सुश्रोणि ! मी तुमच्या एक-पत्‍नी व्रताचा नाश करीत नाही आहे म्हणून तुमच्या मनांतील हे भय दूर झाले पाहिजे. ॥१७॥
मनसास्मि गतो यत् त्वां परिष्वज्य यशस्विनि ।
वीर्यवान् बुद्धिसंपन्नः तव पुत्रो भविष्यति ॥ १८ ॥
’यशस्विनी ! मी अव्यक्त रूपाने तुझे आलिंगन करून मानसिक संकल्पाच्या द्वारा तुझ्याशी समागम केला आहे. यामुळे तुला बल-पराक्रमाने संपन्न आणि बुद्धिमान् पुत्र प्राप्त होईल. ॥१८॥
महासत्त्वो महातेजा महाबलपराक्रमः ।
लङ्‌घतने प्लवने चैव भविष्यति मया समः ॥ १९ ॥
’तो महान् धैर्यवान्, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी तसेच ओलांडून जाणे आणि उड्डाण करणे, उडी मारणे यात माझ्यासमान होईल.’ ॥१९॥
एवमुक्ता ततस्तुष्टा जननी ते महाकपे ।
गुहायां त्वं महाबाहो प्रजज्ञे प्लवगर्षभ ॥ २० ॥
’महाकपे ! वायुदेवाने असे सांगितल्यावर तुझी माता प्रसन्न झाली. महाबाहो ! वानरश्रेष्ठ ! नंतर तिने तुला एका गुहेत जन्म दिला. ॥२०॥
अभ्युत्थितं ततः सूर्यं बालो दृष्ट्‍वा महावने ।
फलं चेति जिघृक्षुस्त्वं उत्प्लुत्याभ्युत्पतो दिवम् ॥ २१ ॥
’बाल्यावस्थेमध्ये एका विशाल वनामध्ये एक दिवस उदित होत असलेल्या सूर्याला पाहून तुला असे वाटले की हे देखील कुठले तरी फळ आहे, म्हणून ते घेण्यासाठी तू एकाएकी आकाशात झेप घेतलीस. ॥२१॥
शतानि त्रीणि गत्वाथ योजनानां महाकपे ।
तेजसा तस्य निर्धूतो न विषादं गतस्ततः ॥ २२ ॥
’महाकपे ! तीनशे योजने उंच गेल्यावर सूर्याच्या तेजाने आक्रान्त होऊनही तुझ्या मनात खेद वा चिंता उत्पन्न झाली नाही. ॥२२॥
त्वामप्युपगतं तूर्णं अंतरिक्षं महाकपे ।
क्षिप्तमिंद्रेण ते वज्रं क्रोधाविष्टेन तेजसा ॥ २३ ॥
’कपिप्रवर ! अंतरिक्षात जाऊन जेव्हा तात्काळच तुम्ही सूर्याजवळ पोहोचलात, तेव्हा इंद्रांनी कुपित होऊन तुमच्यावर तेजाने प्रकाशित वज्राने प्रहार केला. ॥२३॥
तदा शैलाग्रशिखरे वामो हनुरभज्यत ।
ततो हि नामधेयं ते हनुमानिति कीर्तितम् ॥ २४ ॥
’त्यावेळी उदयगिरिच्या शिखरावर तुमच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खण्डित झाला. तेव्हा पासून तुमचे नाम हनुमान् पडले. ॥२४॥
ततस्त्वां निहतं दृष्ट्‍वा वायुर्गंधवहः स्वयम् ।
त्रैलोक्यं भृशसङ्‌क्रुषद्धो न ववौ वै प्रभञ्जनः ॥ २५ ॥
’तुमच्यावर प्रहार केला गेला आहे हे पाहून गंधवाहक वायुदेवांना फार क्रोध आला. त्या प्रभञ्जन देवांनी तीन्ही लोकात प्रवाहित होण्याचे थांबवले. ॥२५॥
संभ्रांताश्च सुराः सर्वे त्रैलोक्ये क्षुभिते सति ।
प्रसादयंति सङ्‌क्रु्द्धं मारुतं भुवनेश्वराः ॥ २६ ॥
’यामुळे संपूर्ण देवता घाबरून गेल्या. कारण वायु अवरूद्ध होण्यामुळे तीन्ही लोकात खळबळ उडाली. त्या समयी समस्त लोकपाल कुपित झालेल्या वायुदेवांची मनधरणी करू लागले. ॥२६॥
प्रसादिते च पवने ब्रह्मा तुभ्यं वरं ददौ ।
अशस्त्रवध्यतां तात समरे सत्यविक्रम ॥ २७ ॥
’सत्यपराक्रमी तात ! पवनदेव प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी हा वर दिला की तुम्ही समरांगणामध्ये कुठल्याही अस्त्र-शस्त्र द्वारा मारले जाऊ शकणार नाही. ॥२७॥
वज्रस्य च निपातेन विरुजं त्वां समीक्ष्य च ।
सहस्रनेत्रः प्रीतात्मा ददौ ते वरमुत्तमम् ॥ २८ ॥

स्वच्छंदतश्च मरणं तव द्यादिति वै प्रभो ।
’प्रभो ! वज्राच्या प्रहारानेही तुम्ही पीडित झाला नाही हे पाहून सहस्त्र नेत्रधारी इंद्रांच्या मनात फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी तुम्हाला हा उत्तम वर दिला- ’मृत्यु तुमच्या इच्छेच्या अधीन राहील- तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हाच तुम्हाला मृत्यु येईल, अन्यथा नाही.’ ॥२८ १/२॥
स त्वं केसरिणः पुत्रः क्षेत्रजो भीमविक्रमः ॥ २९ ॥

मारुतस्यौरसः पुत्रः तेजसा चापि तत्समः ।
’या प्रकारे तुम्ही केसरीचे क्षेत्रज पुत्र आहात. तुमचा पराक्रम शत्रुंसाठी भयंकर आहे. तुम्ही वायुदेवांचे औरस पुत्र आहात. म्हणून तेजाच्या दृष्टिनेही त्यांच्या समान आहात. ॥२९ १/२॥
त्वं हि वायुसुतो वत्स प्लवने चापि तत्समः ॥ ३० ॥

वयमद्य गतप्राणा भवानस्मासु सांप्रतम् ।
दाक्ष्यविक्रमसंपन्नः पक्षिराज इवापरः ॥ ३१ ॥
’वत्स ! तुम्ही पवनाचे पुत्र आहात, म्हणून उड्डाण करण्यातही त्यांच्या तुल्य आहात. आमची प्राणशक्ती आता निघून गेली आहे. यासमयी तुम्ही आम्हा लोकांमध्ये दुसर्‍या वानरराजा प्रमाणे चातुर्य आणि पौरुषाने संपन्न आहात. ॥३०-३१॥
त्रिविक्रमे मया तात सशैलवनकानना ।
त्रिःसप्तकृत्वः पृथिवी परिक्रांता प्रदक्षिणम् ॥ ३२ ॥
’तात ! भगवान् वामनांनी त्रैलोक्यास मोजण्यासाठी जेव्हा आपले पाऊल वाढविले होते तेव्हा मी पर्वत, वने आणि काननांसहित संपूर्ण पृथ्वीची एकवीस वेळा प्रदक्षिणा केली होती. ॥३२॥
तथा चौषधयोऽस्माभिः सञ्चिता देवशासनात् ।
निर्मर्थममृतं याभिः तदानीं नो महद् बलं ॥ ३३ ॥
’समुद्र-मंथनाच्या वेळी देवतांच्या आज्ञेने आम्ही त्या औषधीचा संचय केला होता, ज्यांच्या द्वारा मंथन करून अमृत काढावयाचे होते. त्या काळात आमच्या ठिकाणी महान् बल होते. ॥३३॥
स इदानीमहं वृद्धः परिहीनपराक्रमः ।
सांप्रतं कालमस्माकं भवान् सर्वगुणान्वितः ॥ ३४ ॥
’आता तर मी म्हातारा झालो आहे. माझा पराक्रम घटला आहे. या समयी आम्हा लोकामध्ये तुम्हीच सर्व प्रकाराच्या गुणांनी संपन्न आहात. ॥३४॥
तद्विजृंभस्व विक्रांत प्लवतामुत्तमो ह्यसि ।
त्वद्वीर्यं द्रष्टुकामा हि सर्वा वानरवाहीनी ॥ ३५ ॥
’म्हणून पराक्रमी वीरा ! तुम्ही आपल्या असीम बळाचा विस्तार करा. उड्डाण करण्यात तुम्ही सर्वांहून श्रेष्ठ आहात. ही सर्व वानरसेना तुमच्या बल-पराक्रमास पाहू इच्छित आहे. ॥३५॥
उत्तिष्ठ हरिशार्दूल लङ्‌घहयस्व महार्णवम् ।
परा हि सर्वभूतानां हनुमन् या गतिस्तव ॥ ३६ ॥
’वानरश्रेष्ठ ! उठा आणि या महासागरास ओलांडून जा. कारण तुमची गति सर्व प्राण्यांहून वरचढ आहे. ॥२६॥
विषण्णा हरयः सर्वे हनूमन् किमुपेक्षसे ।
विक्रमस्व महावेग विष्णुस्त्रीन् विक्रमानिव ॥ ३७ ॥
’हनुमन् ! सर्व वानर चिंतेमध्ये पडले आहेत. तुम्ही त्यांची का उपेक्षा करीत आहात ? महान् वेगवान् वीरा ! ज्याप्रमाणे भगवान् विष्णुंनी त्रैलोक्य मोजण्यासाठी तीन पावले वाढविली होती त्या प्रकारे तुम्ही सुद्धा पाऊल वाढवा.’ ॥३७॥
ततः कपीनामृषभेण चोदितः
प्रतीतवेगः पवनात्मजः कपिः ।
प्रहर्षयंस्तां हरिवीरवाहिनीं
चकार रूपं महदात्मनस्तदा ॥ ३८ ॥
या प्रकारे वानरे आणि भालु यांच्यामध्ये श्रेष्ठ जाम्बवानाची प्रेरणा मिळाल्याने कपिवर पवनकुमार हनुमानास आपल्या महान् वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी वानर वीरांच्या सेनेचा हर्ष वाढवित त्या समयी आपले विराट रूप प्रकट केले. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षट्षष्ठितमः सर्गः ॥ ६६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सहासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP