॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चाळिसावा ॥
लक्ष्मणाला सावध केले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजित वधाने वानर सैन्याला व देवादिकांना हर्ष :

रणीं पाडूनि इंद्रजित शूर । विजयी झाला सौ‍मित्र ।
हर्षे उपरमती वानर । जयजयकार करोनी ॥ १ ॥
इंद्रजित पडतांचि रणपाडीं । तेचि काळीं तेचि घडी ।
बिभीषणा हर्षकोडी । जोडिला जोडी आल्हाद ॥ २॥


पतितं रावणिं ज्ञात्वा सा राक्षसमहाचमूः ।
वध्यमाना प्रदुद्राव हरिभिर्जितकाशिभिः ॥१॥
केचिल्लंकामभिमुखं प्रविष्टा वानरार्दिताः ।
समुद्रे पतिताः केचित्केचिच्छैलान्समाश्रिताः ॥२॥
हतमिन्द्रजितं दृष्ट्वा शयानं धरणीतले ।
जहर्ष शक्रो भगवान्सह सर्वैर्महर्षिभिः ॥३॥
जगाम निहते तस्मिन्‍राक्षसे पापकर्मणि ॥४॥


रणीं पडतां इंद्रजित वीर । राक्षसांचे महाभार ।
वानरीं त्रासितां अपार । निशाचर पैं पळती ॥ ३ ॥
धाकें धाकें राक्षसकोडी । धरिली समुद्राची थडी ।
एक पळाले लंकापहाडीं । पर्वतीं दडी देती एक ॥ ४ ॥
पडिल्या देखोनि इंद्रजितासी । अति उल्हास पैं इंद्रासीं ।
उल्हास सुरनरसिद्धांसी । आल्हादेंसी नाचती ॥ ५ ॥
मारितां इंद्रजिता महापाप्यासी । परम सूख सदाशिवासीं ।
अति उल्लास ब्रह्मयासीं । वंशज दुष्टासी मारितां ॥ ६ ॥
दश दिशा विधूमवंता । सुप्रसन्न उगवे सविता ।
निर्मळ जळें वाहती सरिता । सुख समस्तां सौ‍मित्रें ॥ ७ ॥
सौ‍मित्राची आंगवण । स्वयें वानिती शिवगण ।
स्वर्गी वानिती सुरगण । वानरगण भूतळीं ॥ ८ ॥
रणीं लाहोनि निजविजया । उभवोनि पुच्छाचिया गुढिया ।
वानर नाचती सुखोर्मिया । उभवोनि बाह्या रामनामें ॥ ९ ॥
रामनामगीत गात । विजयमुखें नृत्यान्वित ।
वानर स्वानंदें डुल्लत । रणीं गर्जत हरिनामें ॥ १० ॥
रणीं विजयाचा उत्साहो । देखोनि वानरांचा लवलाहो ।
सौ‍मित्र महाबाहो । काय स्वयमेव बोलत ॥ ११ ॥


रुधिरक्लिन्नगात्रस्तु लक्ष्मणः शुभलक्षणः ।
बभूव हृष्टस्तं हत्वा शत्रुजेतारमाहवे ॥५॥
ततः स शरभं वीरं जांबवंतई च वीर्यवान् ।
संनिपत्य महातेजास्तांश्च सर्वान्वनौकसः ॥६॥

व्यथित लक्ष्मणाचा आदेश :

लक्ष्मणाचे शुभ लक्षण । विकळ जाहलिया प्राण ।
न सांडून रणांगण । शत्रु संपूर्ण निर्दाळिला ॥ १२ ॥
अवघे ऐका सावचित्त । रामप्रतापें रणाआंत ।
म्यां मारिला इंद्रजित । स्वयें सांगत सौ‍मित्र ॥ १३ ॥
इंद्रजित मारिला शौर्यवृत्तीं । ते तंव नव्हे माझी शक्ती ।
श्रीरामप्रतापयुक्ती । स्मरणानुवृत्तीं निर्दाळिला ॥ १४ ॥
श्रीराम माझे बळाचें बळ । श्रीरामबळें शौर्यशीळ ।
इंद्रजिताचें शिरकमळ । छेदिलें समूळ श्रीरामसत्वें ॥ १५ ॥
घालोनि श्रीरामाची शपत । म्यां मारिला इंद्रजित ।
ऐसें लक्ष्मण सांगत । चांचरी जात विकळत्वें ॥ १६ ॥
रणीं भिडतां निशाचरा । बाणीं खिळलें सौ‍मित्रा ।
सर्वांगी रुधिरधारा । तेणें शरीरा विकळत्व ॥ १७ ॥
तिन्ही बाण रुतले कपाळीं । ते भेदले ब्रह्मांडमूळीं ।
बाणीं खिळिल्या रोमावळी । तेणें महाबळी विकळांग ॥ १८ ॥
शरभ जांबवंत कपिगण । युद्धीं निवारोनि जाण ।
पाचारोनि बिभीषण । काय लक्ष्मण सांगत ॥ १९ ॥
मी घायवट सर्व शरीरीं । सर्वांग निथळे रुधिरीं ।
प्राणांत मज देखिल्यावरी । राम पोटीं सुरी घालील ॥ २० ॥
यालागीं पूर्वसूचनेवरी । सुग्रीवसंज्ञानुकारीं ।
शस्त्रें काढवावीं दूरी । पुढें वानरीं जाऊनी ॥ २१ ॥
संतोषावया श्रीरामचंद्र । देवोनि इंद्रजिताचें शिर ।
पुढें धाडावे वानर । अति चतुर बोलके ॥ २२ ॥
वानावी माझी वाढीव । करावी माझी भाटीव ।
संतोषलिया राघव । सस्त्रें सुग्रीव काढील ॥ २३ ॥

लक्ष्मणाला मूर्च्छा :

हें अंतीचे माझे वचन । तुम्ही करावें सावधान ।
ऐसें बोलतां लक्ष्मण । मूर्च्छापन्न स्वयें पडला ॥ २४ ॥
झांकले दोन्ही नयन । खुंटलें वदतें वदन ।
तें देखोनियां बिभीषण । वानरगण अति दुःखी ॥ २५ ॥
सखा अंतरला लक्ष्मण । वानर करिती शंखस्फुरण ।
दुःखीं फुटे बिभीषण । अवघे जण लोळती ॥ २६ ॥
कोण कोणा आश्वासील । कोण कोणा संबोखील ।
अवघ्यां समान कळवळ । अति तळमळ वानरां ॥ २७ ॥
तंव बोलिला जांबवंत । साधिला सौ‍मित्रें कार्यार्थ ।
मध्यें ओढवला अति अनर्थ । गडबडित अति दुःखी ॥ २८ ॥

हनुमंताचा शोक, आज्ञा :

अवघ्या सांगे हनुमंत । सौ‍मित आज्ञा करा समस्त ।
यासी घेवोनि जावें तेंथ । श्रीरघुनाथ वंदावया ॥ २९ ॥
मी तंव न यें रामापासीं । मज निरविलें सौ‍मित्रासीं ।
रणीं मारवोनि त्यासी । काय रामासी मुख दावूं ॥ ३० ॥
बळी देवोनि लक्ष्मणासी । रणीं मारिलें इंद्रजितासी ।
पूर्ण जहालों अपेशी । काय रामासी मुख दावूं ॥ ३१ ॥
बळीं दिधलें सौ‍मित्रासी । हें यश मिरवूं अति श्लाघ्यतेसीं ।
अपेशकाळिमा अली मुखासीं । काय रामासी मुख दावूं ॥ ३२ ॥
मरों जातां न ये मरण । धिक् चिरंजीवपण ।
मज न जाळी हुताशन । समुद्र मग्न मज न करी ॥ ३३ ॥
मरण न ये पर्वतपातें । न चले शस्त्राचा आघात ।
विष घेतल्या न ये अंत अपेशवंत मी एक ॥ ३४ ॥
अपेशें गांजिलों मी मोठां । पडल्या पडल्या येथें करंटा ।
वाळोनि होईन खराटा । परी त्या वाटा मी न यें ॥ ३५ ॥
तंव बोलिला बिभीषण । भाक देवोनि आपण ।
आणून मारविला लक्ष्मण । अपेशी पूर्ण मी जालों ॥ ३६ ॥
अपेश बैसलें माझे माथां । काही चालेना पैं आतां ।
केंवी मुख दावूं रघुनाथा । मरणावस्था मज आली ॥ ३७ ॥
अपेश बैसलें दारुण । वांचल्याचे फळ कोण ।
अवश्य सांडीन मी प्राण । बिभीषण अनुवादे ॥ ३८ ॥
ऐकोनि क्षोभला हनुमंत । येथें मतरां शरणागत ।
प्राण सांडील रघुनाथ । ऐसा अनर्थ न करावा ॥ ३९ ॥
जाहल्या सौ‍मित्राचा घात । वांचो न शके रघुनाथ ।
मरतांचि शरणागत । सद्यःप्राणांत श्रीरामा ॥ ४० ॥
लक्ष्मणाचें आज्ञापन । आम्ही करुं अवघे जण ।
मीही येतों गा आपण । रघुनंदन वंदावया ॥ ४१ ॥
देऊनि इंद्रजिताचें शिर । गुढिया उभवोनि सत्वर ।
पुढें धाडावें वानर । अति चतुर ते कोण ॥ ४२ ॥
तंव बोलिला बिभीषण । इंद्रजिताचें शिर घेऊन ।
पुढें जाईन मी आपण । रघुनंदन उल्लासा ॥ ४३ ॥
बिभीषण निशाचर । घेवोनि इंद्रजितांचें शिर ।
गुढिया उभवोनि वानर । अति सत्वर निघाले ॥ ४४ ॥
मागील जे का वानरवीर । उचलोनियां सौ‍मित्र ।
अंगीचा सलों न देता शर । अति अरुवार चालती ॥ ४५ ॥


अथाचचक्षे धर्मात्मा राघवाय बिभीषणः ।
छिन्नमिंद्रजितः शीर्ष लक्ष्मणेन महात्मना ॥७॥
निवेदयित्वा रामाय तस्थौ हृष्टो बिभीषण ॥८॥

श्रीरामांपुढे इंद्रजिताचे शिर ठेवून बिभीषणाचे कथन :

पुढें येवोनि बिभीषण । वंदूनि श्रीरामाचे चरण ।
लक्ष्मणाचें रणांगण । सांगे आपण तें ऐका ॥ ४६ ॥
सप्तावरणें दुर्धर वाट । करोनि सौ‍मित्रें सपाट ।
उघडोनियां यज्ञवाट । झाला प्रविष्ट होमस्थानीं ॥ ४७ ॥
इंद्रजित होम करित । कुंडी निगाला साश्व रथ ।
उडी घालोनि हनुमंत । इंद्रजित आंसुडिला ॥ ४८ ॥
कर्म न होतां समाप्त । उठविला इंद्रजित ।
बिभीषण घेवोनि आला येथ । त्या माझा घात करुं धांवे ॥ ४९ ॥
पाठीसीं घालोनि शरणागत । सौ‍मित्र आला युद्धाआंत ।
त्यासी देखोनि इंद्रजित । साशंकित स्वयें झाला ॥ ५० ॥
विवर सांडोनियां कपटी । गेला मेघाचिये पृष्ठीं ।
मग हनुमंतें उठाउठीं । सौ‍मित्र जगजेठी तेथें नेला ॥ ५१ ॥
सौ‍मित्र निधडा वीर शूर । अचुक संधानी दुर्धर ।
वारू सारथी रहंवर । बाणीं सत्वर छेदिले ॥ ५२ ॥
बाणीं बाणनिवारण । शत्रीं शस्त्रनिराकरण ।
दोघे योद्धे विचक्षण । रण प्रवीण संग्रामीं ॥ ५३ ॥
अचुक सौ‍मित्राचा हात । उभय भुजां करोनि घात ।
सवेंचि केला शिरःपात । तें शिर येथ आणिलेंसे ॥ ५४ ॥
बिभीषण अति चतुर । आणून इंद्रजिताचें शिर ।
ठेविलें श्रीरामासमोर । देखोनि वानर बुजाले ॥ ५५ ॥
धन्य सौ‍मित्र आतुर्बळी । बाण भेदले कपाळीं ।
हेमपिच्छाची मुंडावळी । शिरासीं बांधिली रणरंगी ॥ ५६ ॥
मिशा मुर्डिवा विशाळा । दाढा विका विक्राळा ।
बाण भेदले कपाळा । कपाळीं टिळा गोरोचनाचा ॥ ५७ ॥
देखोनि हरिखला राघव । बिभीषणसंज्ञा सुग्रीव ।
शस्त्रसामग्री नेली सर्व । अतर्क्य लाघवविन्यासें ॥ ५८ ॥
लक्ष्मणाचें बळ दुर्धर । देखोनि इंद्रजिताचें शिर ।
ऐकोनि बिभीषणउत्तर । हर्षे रघुवीर अनुवादे ॥ ५९ ॥


बिभीषणवचः श्रुत्वा हर्षव्याकुललोचनः ।
बिभीषणं पुरस्कृत्य हनूमंतं च राघवः ॥९॥
जांबवंतं ससुग्रीवं सभाज्य च वनौकसः ।
शूरमिक्ष्वाकुशार्दूलं समाश्वासयतानुजम् ॥१०॥
रामचंद्रसमो भ्राता लक्ष्मणं शुभलक्ष्णम् ।
उपवेश्य तमुत्संगे परिष्वज्य सुपीडितम् ॥११॥
पीडितं सायकैर्दृष्ट्वा दुःखितो राघवस्तदा ।
दुःखहर्षयुतो रामः स मूर्च्छित इवाबभौ ॥१२॥

लक्ष्मणाची स्थिती ऐकून श्रीरामांना मूर्च्छा :

देखोनि इंद्रजिताचे शिर । ऐकोनि बिभीषण‍उत्तर ।
सौ‍मित्रप्रताप अति गंभीर । तेणें रघुवीर हरिखला ॥ ६० ॥
लक्ष्मण योद्धा अति गहन । तेणें हरिखला रघुनंदन ।
वर्षे स्वानंदजीवन । संतप्त जन निववावया ॥ ६१ ॥
बाप कृपाळु रघुनाथा । बिभीषण हनुमान जांबवंता ।
अनुक्रमें आलिंगितां । वानरां समस्तां आल्हाद ॥ ६२ ॥
अवघीं केला नमस्कार । अद्यापि कां न ये सौ‍मित्र ।
ऐसें पुसतां श्रीरामचंद्र । झालें चरित्र तें एके ॥ ६३ ॥
बाणीं जर्जर सर्व शरीरीं । सौ‍मित्र उचलोनियां वानरीं ।
घालितां श्रीरामाचें मांडीवरी । नाहीं शरीरीं चेतना ॥ ६४ ॥
इंद्र वंदी ज्याचे बळासी । ऐसिया सबळ सौ‍मित्रासी ।
बाणीं खिळिले सर्वांगांसी । पाहे चौपासी श्रीराम ॥ ६५ ॥
तीन बाण हे कपाळीं । रुतले ब्रह्मांडीच्या मूळी ।
बाणीं भेदल्या रोमावळी । बाणजाळीं खिळिलासे ॥ ६६ ॥
रणीं विंधिता शरधारीं । रिती जागा अंगावरी ।
नाहीं उरली तिळभरी । शरीं शरीरीं खिळिला ॥ ६७ ॥
इंद्रजितमरणें सुखोद्‍भूत । सौ‍मित्रदुःखें दुःखित ।
रघुनाथ ऐसा हर्षशोकान्वित । पडे मूर्च्छित श्रीराम ॥ ६८ ॥
श्रीराम पडतां मूर्च्छापन्न । गजबजिला बिभीषण ।
हडबडिले वानरगण । करिती रुदन अति दुःखें ॥ ६९ ॥
दोघे पढियंते पूर्ण । येरयेरा जीव प्राण ।
सौ‍मित्रदुःखें रघुनंदन । झणी हा प्राण सांडील ॥ ७० ॥
मूर्च्छित पडतां रघुनंदन । सुग्रीव आणि बिभीषण ।
मिळोनिया वानरगण । करीती रुदन अति दुःखे ॥ ७१ ॥
एक निमाला रणरंगी । दुजा निमतो तयालागीं ।
काय करावें या प्रसंगी । वानरांअंतरीं अति चिंता ॥ ७२ ॥
सौ‍मित्रातें आलिंगून । श्रीराम पडिला मूर्च्छापन्न ।
सवेंच चेतना लाहोन । सावाधान स्वयें जाला ॥ ७३ ॥


उपलभ्य ततः संज्ञां लक्ष्मणं समुदैक्षत ।
मूर्घ्नि चैनमुपाघ्राय रामः शूरमुपागतम् ॥१३॥
कृतं परमकल्याणं कर्मेदं दुष्करं त्वया ।
अद्य मन्ये हते पुत्रे रावणं निहतं युधि ॥१४॥
निरमित्रः कृतोस्म्यद्य निर्यास्यति हि रावणः ।
बलव्यूहेन महता श्रुत्वा पुत्रं निपातितम् ॥१५॥
त्वया लक्ष्मण नाथेन सीता च पृथिवी च मे ।
न दुष्प्रापा हते तस्मिन्शक्रजेतरि चाहवे ॥१६॥

शुद्धीवर आल्यावर श्रीरामांचा शोक व प्राणत्यागाची तयारी :

संज्ञा पावोनि रघुनंदन । घायीं जर्जरित लक्ष्मण ।
देखोनियां विगतप्राण । करी रुदन अति दुःखें ॥ ७४ ॥
निकुंबळे जावोनि आपण । इंद्रजित मारोनि दिधला प्राण ।
तें कल्याण तेंचि अकल्याण । मज तुजवीण सौ‍मित्रा ॥ ७५ ॥
ऐकोनि इंद्रजिताचें मरण । निर्वाणयुद्धा येईल रावण ।
त्यासीं कोणें करावे रण । तुजवीण सौ‍मित्रा ॥ ७६ ॥
बारा वर्षे निराहारी । राहोनियां ब्रह्मचारी ।
मारुन दिधला माझा वैरी । तरी मजवरी कां रुसलासी ॥ ७७ ॥
बारा वर्षे वनवासी । म्यां नाही पुसिलें आहारासी ।
तेणें मजवरी रुसलासी । लागोनि पायांसी बुझावूं ॥ ७८ ॥
इंद्रजितासीं उठाउठीं । रणीं केली त्वां संवसाठी ।
तुजवीण जगजेठी । मी ये सृष्टीं वांचेंना ॥ ७९ ॥
निकुंबळे धाडिला एकला । तेणें धरिला त्वां अबोला ।
बंधुस्नेहें आक्रोशिला । आक्रंदला श्रीराम ॥ ८० ॥
दुर्धर इंद्रजिताचें मरण । तें त्वां साधिले करोनि रण ।
रणांगणीं दिधला प्राण । तें अकल्याण मज केलें ॥ ८१ ॥
करोनि इंद्रजिताच्या घाता । तवां निर्मुक्त केली सीता ।
वसुधा वश्य केली माझ्या हाता । सत्य तत्वातां सुबंधो ॥ ८२ ॥
सीता सुंदर महासती । कोणें भोगावी वसुमती ।
तुजवीण ऊर्मिलापती । प्राण निश्चितीं त्यागीन ॥ ८३ ॥
अनंत अपराध मजपाशीं । तेणें मजवरी रुसलासी ।
चरण झाडिन मी केंशी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ८४ ॥
धांव पावगा सौ‍मित्रा । साद से कां सहोदरा ।
माझिया दुःखा दुर्धरा । महावीरा निवारीं ॥ ८५ ॥
केउता गेलासी सुबंधु । अद्यापि कां ने देसी सादु ।
करितां श्रीरामासीं खेदु । दुःखबाधु समग्रां ॥ ८६ ॥
तुजवीण मी अनाथ । तुजवीण मी हताहत ।
तुजवीण निजजीवित । त्यागीन निश्चित सौ‍मित्रा ॥ ८७ ॥
तुजवीन मी प्रभाहीन । तुजवीण मी हीन दीन ।
तुजलागीं त्यजीन प्राण । सत्य जाण सौ‍मित्रा ॥ ८८ ॥
राया दशरथाची आण । तुजवीण मी त्यागीन प्राण ।
ऐसें बोलोनि रघुनंदन । घातलें आसन प्राणांता ॥ ८९ ॥
देवोनि सौ‍मित्रा आलिंगन । चुंबोनियां त्याचें वदन ।
श्रीरामें त्यागावया प्राण । घातलें आसन प्राणांता ॥ ८९ ॥
देवोनि सौ‍मित्रा आलिंगन । चुंबोनियां त्याचें वदन ।
श्रीरामें त्यागावया प्राण घातले आसन प्राणांत ॥ ९० ॥

हनुमंताची गर्जना :

तें देखोनि हनुमंत । खवळला काळकृतांत ।
स्वयें येवोनि गर्जत । काय सांगत श्रीरामा ॥ ९१ ॥
मी सेवक असतां जाण । कोण मारुं शकेल लक्ष्मण ।
तूं कां वृथा त्यजिसी प्राण । आंगवण पाहें माझी ॥ ९२ ॥
यमें नेलिया लक्ष्मणासी । धुळी मेळवीन यमासी ।
शीक लावीन कळिकाळासीं । सौ‍मित्रासी नेतांचि ॥ ९३ ॥
इंद्र चंद्र वरुण कुबेर । मुख्य करोनि दिवाकर ।
त्यांचेनि न मारवे सौ‍मित्र । मारिल्या समग्र निर्दळीन ॥ ९४ ॥
सौ‍मित्र नेलिया कैलासासीं । तेथून मी आणींन त्यासी ।
जरी नेला वैकुंठासीं । ख्याती करीन ते ऐका ॥ ९५ ॥
उभें करोनियां भगवंतासी । झाडा घेईन वैकुंठासीं ।
ओळखोनि सौ‍मित्रासी । तुझा तुजपासीं आणीन ॥ ९६ ॥
नेलिया क्षीरसागरासीं । झाडा घेईंन शेषापासीं ।
उलथोनि नारायणासी । सौ‍मित्रासी आणीन ॥ ९७ ॥
सौ‍मित्र शेषावतार बळी । अडकल्या नारायणातळीं ।
तोही उलथोनि तत्काळीं । तुझा तुजजवळी आणीन ॥ ९८ ॥
पृथ्वी मिनली पृथ्वीसीं । आप मिनलें आपासीं ।
तेज मिनलें तेजासीं । प्राण वाय़ूसी मीनला ॥ ९९ ॥
आकाश मिनलें आकाशासीं । चैतन्य मिनलें चैतन्यासीं ।
कैंचा सौ‍मित्र आणिसी । मूर्ख म्हणसी वानर ॥ १०० ॥
ऐसाही आणीन लक्ष्मण । तरी मी तुझा सेवक जाण ।
तुझें करितां नामस्मरण । अटक कोण मजलागीं ॥ १ ॥
तुझ्या नामाचेनि बळें । कळिकाळाची शक्ति गळे ।
संसार आपभयें पळे । मोक्ष मावळे मिथ्यात्वें ॥ २ ॥
नामस्मरण परम धर्म । नाम निर्दळी कर्माकर्म ।
नमा केवळ परब्रह्म । पुरुषोत्तमहरिकीर्ती ॥ ३ ॥
दाटुगें तुझें नामस्मरण । नामबळें लक्ष्मण ।
तुझा तुजपासीं आणीन । तेंही लक्ष्मण अवधारीं ॥ ४ ॥
पृथ्वी दमिली पृथूनीं । मीही दमीन मेदीनी ।
सौ‍मित्राचें शरीर अवरी । जंव आणोनि मज अर्पी ॥ ५ ॥
आर्पी आपत्व तंव शोधीन । सौ‍मित्रा निजजीवन ।
आणोनियां गा आपण । मदर्प्ण जंव करी ॥ ६ ॥
निजतेजाच्या आवेशीं । तेज दमीन तेजासीं ।
सौ‍मित्राच्या निजतेजासी । जंव मजपासीं तें अर्पी ॥ ७ ॥
माझा निजपिता पवन । त्याचेंही करीन शोषण ।
लक्ष्मणाचा निजप्राण । जंव आणून मज अर्पीं ॥ ८ ॥
दंडणें न लगे आकाशासी । सहज प्रवेश आकाशीं ।
ध्यानीं धरोनि चैतन्यासी । आणीन जीवकळा चेतना ॥ ९ ॥
जावया देहींचा जडपणा । तेज निजप्राणा चेतवी ॥ ११० ॥
धरोनि चेतनेचा हात । प्राण प्रवेश देहाआंत ।
तंव तंव देहीं देहवंत । सावचित्त होय जीव ॥ ११ ॥

सुषेणाचे आगमन :

वांचवावया लक्ष्मण । सांडून स्थूळ लिंग कारण ।
हनुमान करुं पाहे उड्डाण । तेंव सुषेण तेथे आला ॥ १२ ॥
हनुमंता तूं परोपकारी । आणिला होता द्रोणागिरी ।
दिव्यौषधी तयावरी । त्या म्यां गृहीं संग्रहिल्या ॥ १३ ॥
पर्वतावेगळ्या औषधी जाण । न राहती अर्ध क्षण ।
घालितां श्रीरामपादकण । ओषधी संपूर्ण थांबल्या ॥ १४ ॥
त्यांचा रस देतां जाण । सावध होईल लक्ष्मण ।
ऐसें बोलतां सुषेण । रघुनंदन सुखावे ॥ १५ ॥
ऐकतां हनुमंताची कथा । परम सुख रघुनाथा ।
आलिंगिला जीवापरता । उल्लासतां स्वानंदे ॥ १६ ॥


स तं भ्रातरमश्वास्य परिष्वज्य च राघवः ।
रामः सुषेण मुदितः समाभाष्येदमब्रवीत् ॥१७॥
सशल्योऽयं महाप्राज्ञ सौ‍मित्रिर्मित्रनंदनः ।
यथा भवति निःशल्यस्तथा त्वं कर्तुमर्हसि ॥१८॥
विशल्यकरणी नाम वने हिमवतः शुभा ।
लक्ष्मणाय ददौ नस्यं सुषेणः परमौषधिम् ॥१९॥
स तस्या गंधामाघ्राय विशल्यः समपद्यत ।
तथा निर्वेदनश्चैव संरुढव्रण एव च ॥२०॥


लक्ष्मण व्हावया सावधान । श्रीरामें जें केले रुदन ।
ऐसें नव्हे ते अमृतपान । स्वानंदजीवन संतप्तां ॥ १७ ॥
अश्रु तेंचि अमृतपन । आलिंगन तेंचि विशल्यकरण ।
करसंस्पर्शें करी निर्व्रण । कृपाळु पूर्ण श्रीराम ॥ १८ ॥
निजभक्तांची जे जे व्यथा । नानापरींच्या नानावस्था ।
निवारण श्रीरघुनाथा । पुढील कथा अवधारा ॥ १९ ॥

श्रीरामांच्या आज्ञेने सुषेणाच्या दिव्यौषधीने लक्ष्मण सावध होतो :

सावध व्हावया लक्ष्मण । रामें पाचारोनि सुषेण ।
शल्या विशल्या ओषधी जाण । देववई आपण साक्षेपें ॥ १२० ॥
शल्या शल्य फेडी संपूर्ण । विशल्या घाय बुजी आपण ।
अंगीचे हरपती व्रण । ते सुवर्ण जाण दिव्यौषधी ॥ २१ ॥
अंगीचें कानपोनि व्रण । सुवर्णा करी सुवर्णवर्ण ।
ऐशिया दिव्यौषधी जाण । दे सुषेण सौ‍मित्रा ॥ २२ ॥
शल्या विशल्या देतां जाण । शल्यें विरालीं संपूर्ण ।
हर्षे निर्भर अंतःकरण । सावध होय सौ‍मित्र ॥ २३ ॥
ओषधी देतां सुवर्ण । कानपोनि अंगीचे व्रण ।
शरीर जालें सुवर्णवर्ण । उठला लक्ष्मण स्वानंदें ॥ २४ ॥
पूर्विल्यापेक्षा जाण । शक्ति पावोनि शतगुण ।
साटोपें उठिला लक्ष्मण । रणीं रावण दंडावया ॥ २५ ॥


बिभीषणमुखानां च सुहृदां राघवाज्ञया ।
तामोषधिं महाबाहुः सुषेणः प्रददौ तदा ॥२१॥


लक्ष्मण जालिया सावधान । बिभीषण सुग्रीव रघुनंदन ।
पाचारोनि सुषेण । सांगे आपण तें ऐका ॥ २६ ॥
लक्ष्मणासवें वानर वीर । घायीं जालें अति जर्जर ।
ओषधी देवोनि सत्वर । करी समग्र सावध ॥ २७ ॥
ऐसें सांगतां रघुवीर । असंख्यात कपि वानर ।
सुषेणे अपरिमित ऋक्षवीर । केले समग्र सावध ॥ २८ ॥
अपरिमित ऋक्षवीर । असंक्यात कपि वानर ।
बिभीषणाचे निशाचर । घायीं जर्जर अमित ॥ २९ ॥
धन्य सुषेण वैद्यरावो । वेंचून ओषधींचा संग्रहो ।
अंगी व्रण न दिसे घावो । सकळ समुदावो सुखी केला ॥ १३० ॥
गेला क्लेशश्रमेंसी स्वेद । गेली शल्यबाधा गेला खेद ।
सकळ वीरांसी आल्हाद । परमानंद श्रीरामें ॥ ३१ ॥
पूर्विल्या बळापेक्षां जाण । प्रताप आला पैं चौगुण ।
उपमिती आंगवण । गडगर्जन हरिनामें ॥ ३२ ॥
रामनामाचा गजर । वानरीं केला भुभःकार ।
संतोषला श्रीरामचंद्र । विशल्य वीर देखोनी ॥ ३३ ॥
जैसें अमरां अमृतपान । तैशा वानरां ओषधी जाण ।
करितांचि अवघ्राण । सुखसंपन्न स्वानंदे ॥ ३४ ॥
सुखी झाला लक्ष्मण । सुखी झाला बिभीषण ।
सुखी झाले वानरगण । सुखसंपन्न सुग्रीव ॥ ३५ ॥
सुखी देखोनि सौ‍मित्र । सुखावला श्रीरामचंद्र ।
तेणें संतोषें वानर । हर्षें निर्भर नाचती ॥ ३६ ॥
इंद्रजित मारोनि दुर्धर । विजयी झाला सौ‍मित्र ।
वानरीं करोनि जयजयकार । हर्षें निर्भर नाचती ॥ ३७ ॥
किशुकवृक्ष उचलोनियां । उभवोनि पुच्छाग्रीं गुढिया ।
वानर नाचती लवलाह्या । श्रीरामरायाचेनि धर्में ॥ ३८ ॥
एका जनार्दना शरण । स्वानंदें उठला लक्ष्मण ।
तेणें संतोषला रघुनंदन । कथा पावन श्रीरामें ॥ ३९ ॥
इंद्रजिताची निजकांता । सुलोचना पतिव्रता ।
तिच्या सतीत्वाची कथा । सावधानता अवधारा ॥ १४० ॥
रामें सत्या सत्ववृत्ती । रामें भक्तां भुक्ती मुक्ती ।
राम वैरियां परमगती । नामें त्रिजगती पावन ॥ १४१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणसावधानीकरणं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ४० ॥
ओंव्या ॥ १४१ ॥ श्लोक ॥ २१ ॥ एवं ॥ १६२ ॥


GO TOP