श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ पञ्चदश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वनसुषमां अवलोकयता हनुमता चैत्यप्रासादसंनिधौ दयनीयां सीमालोक्येयमेव सेति तर्कणं तस्य प्रसन्नता च -
वनाची शोभा पहात असता हनुमंताने एका चैत्यप्रसादाच्या (मंदिराच्या) जवळ सीतेला दयनीय अवस्थेत पहाणे, ओळखणे आणि प्रसन्न होणे -
स वीक्षमाणः तत्रस्थो मार्गमाणश्च मैथिलीम् ।
अवेक्षमाणश्च महीं सर्वां तां अन्ववैक्षत ॥ १ ॥
त्या अशोक वृक्षावर बसलेले असतां हनुमान त्या संपूर्ण वनाचे निरीक्षण करू लागले आणि सीतेचा शोध घेण्यासाठी तेथील सर्व भूमीवर दृष्टीपात करू लागले. ॥१॥
संतानकलताभिश्च पादपैरुपशोभिताम् ।
दिव्यगंधरसोपेतां सर्वतः समलङ्कृताम् ॥ २ ॥
ती भूमी कल्पवृक्षाच्या लतांनी आणि वृक्षांनी सुशोभित झालेली होती आणि दिव्य गंध आणि दिव्य रसाने परिपूर्ण होती, तसेच ती सर्व बाजूनी सजविलेली होती. ॥२॥
तां स नंदनसङ्काशां मृगपक्षिभिरावृताम् ।
हर्म्यप्रासादसंबाधां कोकिलाकुलनिःस्वनाम् ॥ ३ ॥
मृगानी आणि पक्ष्यांनी व्याप्त असलेली ती भूमी नंदनवनाप्रमाणे शोभून दिसत होती आणि अट्टालिका आणि प्रासाद यांनी युक्त होती. तसेच कोकिळ समूहाच्या कूजनाने ती गजबजून गेली होती. ॥३॥
काञ्चनोत्पलपद्माभिः वापीभिरुपशोभिताम् ।
बह्वासनकुथोपेतां बहुभूमिगृहायुताम् ॥ ४ ॥
सुवर्णमय उत्पल आणि कमळांनी भरलेल्या विहिरीमुळे तिची शोभा वाढली होती. तेथे अनेक प्रकारची आसने आणि गालिचे पसरलेले होते. अनेकानेक भूमीगृह (तळघरे) तेथे शोभून दिसत होती. ॥४॥
सर्वर्तुकुसुमै रम्यां फलवद्‌भिश्च पादपैः ।
पुष्पितानामशोकानां श्रिया सूर्योदयप्रभाम् ॥ ५ ॥
सर्व ऋतुमध्ये फुले देणारे आणि फळांनी लगडलेले वृक्ष त्या भूमीला सुशोभित करत होते. फुललेल्या अशोकांच्या शोभेमुळे सूर्योदयकाळीन छटा तेथे दिसून येत होती. ॥५॥
प्रदीप्तामिव तत्रस्थो मारुतिः समुदैक्षत ।
निष्पत्रशाखां विहगैः क्रियमाणामिवासकृत् ॥ ६ ॥
पवनकुमार हनुमंतानी त्या अशोकावर बसल्या बसल्याच त्या प्रदीप्त अशा वाटिकेचे निरीक्षण केले. तेथील पक्षी त्या वाटिकेस वारंवार पर्णहीन, शाखाहीन करीत होते. ॥६॥
विनिष्पतद्‌भिः शतशः चित्रैः पुष्पावतंसकैः ।
समूलपुष्परचितैः अशोकैः शोकनाशनैः ॥ ७ ॥

पुष्पभारातिभारैश्च स्पृशद्‌भिरिव मेदिनीम् ।
कर्णिकारैः कुसुमितैः किंशुकैश्च सुपुष्पितैः ॥ ८ ॥

स देशः प्रभया तेषां प्रदीप्त इव सर्वतः ।
वृक्षांवरून गळून पडलेल्या शेकडो विचित्र पुष्पगुच्छांमुळे खालपासून वरपर्यंत जणु फुलांचे बनलेले आहेत की काय अशा शोकनाशक अशोकानी, फुलांच्या आत्यंतिक भाराने झुकून जणु पृथ्वीला स्पर्श करणार्‍या विकसित कण्हेरीच्या वृक्षांनी आणि सुंदर फुले फुललेल्या पळशांनी तो भाग उपलक्षित झाला होता, आणि त्यांच्या प्रभेमुळे सर्वबाजूनी प्रदीप्त झाल्यासारखा दिसत होता. ॥७-८ १/२॥
पुन्नागाः सप्तपर्णाश्च चंपकोद्दालकास्तथा ॥ ९ ॥

विवृद्धमूला बहवः शोभंते स्म सुपुष्पिताः ।
पुन्नाग (श्वेत कमळ अथवा नागकेसर) सप्तपर्णी, चंपक आणि उद्दालक आदि अनेक सुंदर पुष्पे असणारे वृक्ष, ज्यांची मूळे अत्यंत सुदृढ होती असे तेथे शोभून दिसत होते. ॥९ १/२॥
शातकुम्भनिभाः केचित् केचिद् अग्निशिखप्रभाः ॥ १० ॥

नीलाञ्जननिभाः केचित् तत्राशोकाः सहस्रशः ।
तेथे हजारो अशोकाचे वृक्ष होते. त्यापैकी काही सुवर्णासारखे कांतीमान होते, काही अग्निच्या ज्वालेप्रमाणे प्रकाशित होत होते तर काही काही काळ्या काजळासारखी कांती असलेले होते. ॥१० १/२॥
नंदनं विबुधोद्यानं चित्रं चैत्ररथं यथा ॥ ११ ॥

अतिवृत्तमिवाचिन्त्यं दिव्यं रम्यश्रिया युतम् ।
ते अशोकवन देवांचे उद्यान नंदनवनाप्रमाणे आनंददायी, कुबेराच्या चैत्ररथ वनाप्रमाणे विचित्र तथा त्या दोन्ही पेक्षांही अधिक अचिंत्य, दिव्य आणि रमणीय शोभेने संपन्न होते. ॥११ १/२॥
द्वितीयमिव चाकाशं पुष्पज्योतिर्गणायुतम् ॥ १२ ॥

पुष्परत्‍नशतैश्चित्रं द्वितीयं सागरं यथा ।
ते अशोकवन पुष्परूपी नक्षात्रांनी युक्त असे दुसरे जणु आकाशाच सुशोभित होत आहे असे भासत होते. अथवा पुष्पमय शेकडो रत्‍नांनी विचित्र शोभा प्राप्त झालेल्या पाचव्या समुद्रासारखेच दिसत होते. ॥१२ १/२॥
सर्वर्तुपुष्पैर्निचितं पादपैर्मधुगंधिभिः ॥ १३ ॥

नानानिनादैरुद्यानं रम्यं मृगगणद्विजैः ।
अनेकगंधप्रवहं पुण्यगंधं मनोहरम् ॥ १४ ॥

शैलेन्द्रमिव गंधाढ्यं द्वितीयं गंधमादनम् ।
सर्व ऋतूत फुले देणार्‍या मनोरम गंधयुक्त अशा वृक्षांनी भरलेले आणि अनेक प्रकारचे मधुर ध्वनी उत्पन्न करणार्‍या मृगांनी आणि पक्ष्यांनी सुशोभित असे ते वन अत्यंत रमणीय भासत होते. अनेक प्रकारच्या सुगंधाचा भार वहन करण्यामुळे ते वन पवित्र गंधाने युक्त आणि मनोहर भासत होते. दुसर्‍या गिरिराज गंधमादनाप्रमाणे ते उत्तम सुगंधाने व्याप्त होते. ॥१३-१४ १/२॥
अशोकवनिकायां तु तस्यां वानरपुङ्गवः ॥ १५ ॥

स ददर्शाविदूरस्थं चैत्यप्रासादमूर्जितम् ।
मथ्ये स्तंभसहस्रेण स्थितं कैलासपाण्डुरम् ॥ १६ ॥

प्रवालकृतसोपानं तप्तकाञ्चनवेदिकम् ।
त्या अशोकवाटिकेमध्ये वानरश्रेष्ठ हनुमंतानी थोड्या दूर अंतरावर एक गोलाकार उंच मंदिर पाहिले. त्यात एक हजार खांब उभारलेले होते आणि ते कैलास पर्वताप्रमाणे श्वेत वर्णाचे होते. त्यात वैडूर्य रत्‍नाच्या पायर्‍या बनविलेल्या होत्या आणि तापविलेल्या सोन्याच्या वेदी बनविलेल्या होत्या. तो निर्मळ प्रासाद आपल्या शोभेने देदिप्यमान असल्याप्रमाणे भासत होता आणि दर्शकांची दृष्टी दिपवून टाकीत होता; आणि अत्यंत उंच असल्याने आकाशात जणु स्वर्ण रेखा ओढावी तसा भासत होता. ॥१५-१६ १/२॥
मुष्णंतमिव चक्षूंषि द्योतमानमिव श्रिया ॥ १७ ॥

विमलं प्रांशुभावत्वाद् उल्लिखंतमिवाम्बरम् ।
ततो मलिनसंवीतां राक्षसीभिः समावृताम् ॥ १८ ॥

उपवासकृशां दीनां निःश्वसंतीं पुनः पुनः ।
ददर्श शुक्लपक्षादौ चंद्ररेखामिवामलाम् ॥ १९ ॥
तो चैत्य प्रासाद पाहिल्यानंतर त्यांची दृष्टी एका मलीन वस्त्र धारण केलेल्या आणि राक्षसस्त्रियांनी घेरलेल्या सुंदर स्त्री वर पडली. ती उपवास केल्यामुळे अत्यंत कृश आणि दीन दिसत होती आणि वारंवार सुस्कारे टाकीत होती. शुक्लपक्षाच्या आरंभी चंद्राची कोर जशी निर्मळ आणि कृश दिसते तशी ती दृष्टीगोचर होत होती. धुराच्या लोटांनी आतील अग्नीची ज्वाळा अगदी तेजस्वी असून नसल्यासारखी दिसते, त्या प्रमाणे मनोहर अंगकांति असून रतीला मागे सारणारी ती सीता मारूतीला नीटशी ओळखता आली नाही. ॥१७-१९॥
मंदप्रख्यायमानेन रूपेण रुचिरप्रभाम् ।
पिनद्धां धूमजालेन शिखामिव विभावसोः ॥ २० ॥
मंद झालेल्या स्मृतीच्या आधारावर थोड्याशा ओळख पटणार्‍या आपल्या रूपाच्या योगे ती सुंदर प्रभा पसरवीत होती. आणि धुराच्या योगे झाकल्या गेलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे भासत होती. ॥२०॥
पीतेनैकेन संवीतां क्लिष्टेनोत्तमवाससा ।
सपङ्कामनलङ्कारां विपद्मामिव पद्मिनीम् ॥ २१ ॥
एकच पिवळ्या रंगाचे जुने वस्त्र रेशमी नेसून तिने आपले शरीर झाकले होते. मलीन आणि अलंकाररहित असल्याने ती कमळरहित आणि पंकयुक्त पुष्करिणीप्रमाणे श्रीहीन दिसत होती. ॥२१॥
व्रीडितां दुःखसंतप्तां परिक्षीणां तपस्विनीम् ।
ग्रहेणाङ्गारकेणेव पीडितामिव रोहिणीम् ॥ २२ ॥
ती तपस्विनी मंगळासह केतु या ग्रहांनी पीडित रोहिणी प्रमाणे शोकाने पीडित, दु:खाने संतप्त आणि अत्यंत क्षीण देह झालेली दिसत होती. ॥२२॥
अश्रुपूर्णमुखीं दीनां कृशामनशनेन च ।
शोकध्यानपरां दीनां नित्यं दुःखपरायणाम् ॥ २३ ॥
उपवासाने कृश झालेल्या त्या स्त्रीच्या नेत्रांतून मुखावर अश्रूंची धार वाहत होती आणि ती शोक आणि चिंतेत मग्न होऊन अगदी दीन दशेत पडली होती, आणि निरंतर दु:खात बुडून गेली होती. ॥२३॥
प्रियं जनमपश्यंतीं पश्यंतीं राक्षसीगणम् ।
स्वगणेन मृगीं हीनां श्वगणेनावृतामिव ॥ २४ ॥
ती आपल्या प्रियजनांना तर पाहूच शकत नव्हती, पण तिच्या समोर सतत राक्षसींचा समूह बसून राहिलेला असे. जशी एखादी मृगी आपल्या कळपापासून वियोग होऊन कुत्र्यांच्या झुंडीने घेरली जावी, त्या मृगीची जशी दशा होते तशीच तिची दशा झाली होती. ॥२४॥
नीलनागाभया वेण्या जघनं गतयैकया ।
नीलया नीरदापाये वनराज्या महीमिव ॥ २५ ॥
काळ्या निळ्या नागीणी प्रमाणे तिच्या कटिच्याही खालपर्यत लोंबणारी तिची एक मात्र काळी वेणी पर्जन्यकाळ संपल्यानंतर नीलवर्ण वनपंक्तीमुळे शोभणार्‍या भूमीप्रमाणे शोभत होती. ॥२५॥
सुखार्हां दुःखसंतप्तां व्यसनानामकोविदाम् ।
तां समीक्ष्य विशालाक्षीं अधिकं मलिनां कृशाम् ॥ २६ ॥

तर्कयामास सीतेति कारणैरुपपादिभिः ।
जगातील सुखोपभोग घेण्याची योग्यता असूनही ती दु:खाने संतप्त होत होती. यापूर्वी तिला संकटांचा काहीच अनुभव नव्हता. त्या विशालनयना, अत्यंत मलीन आणि कृशतनु स्त्रीला अवलोकन करून युक्तायुक्त कारणांच्याद्वारे हनुमंतानी काय असेल ते असो पण हीच सीता आहे असे अनुमान केले. ॥२६ १/२॥
ह्रियमाणा तदा तेन रक्षसा कामरूपिणा ॥ २७ ॥

यथारूपा हि दृष्टा वै तथारूपेयमङ्गना ।
इच्छेप्रमाणे देह धारण करणार्‍या त्या राक्षसाने जेव्हा सीतेचे हरण करून तो तिला घेऊन जात होता त्या दिवशी ज्या रूपात तिचे दर्शन झाले होते, (कल्याणी) स्त्रीही त्या रूपाने युक्त आहे. (रूपाने हुबेहूब तशीच आहे) ॥२७ १/२॥
पूर्णचंद्राननां सुभ्रूं चारुवृत्तपयोधराम् ॥ २८ ॥

कुर्वतीं प्रभयादेवीं सर्वा वितिमिरा दिशः ।
देवी सीतेचे मुख पूर्णचंद्रासारखे मनोहर होते. तिच्या भुवयाही अत्यंत सुंदर होत्या. दोन्ही स्तन मनोहर आणि गोलाकार होते. ती स्वत:च्या अंगकांतीने संपूर्ण दिशांतील अन्ध:कार दूर करीत असे. ॥२८ १/२॥
तां नीलकेशीं बिम्बोष्ठीं सुमध्यां सुप्रतिष्ठिताम् ॥ २९ ॥
तिचे केस काळे भोर होते आणि ओठ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल होते. कटिभाग अत्यंत सुंदर होता आणि शरीराचा बांधाही अत्यंत सुडौल आणि सुगठित होता. ॥२९॥
सीतां पद्मपलाशाक्षीं मन्मथस्य रतिं यथा ।
इष्टां सर्वस्य जगतः पूर्णचंद्रप्रभामिव ॥ ३० ॥

भूमौ सुतनुमासीनां नियतामिव तापसीम् ।
निःश्वासबहुलां भीरुं भुजगेन्द्रवधूमिव ॥ ३१ ॥
कमलनयना सीता कामदेवी प्रेयसी रतिप्रमाणे सुंदर होती, पूर्ण चंद्राच्या प्रभेप्रमाणे सर्व जगाला प्रिय होती. तिचे शरीर फारच सुंदर होते. ती नियम परायण तपस्विनी प्रमाणे भूमीवर बसली होती. जरी ती स्वभावत:च भीरू होती आणि चिंतेमुळे वारंवार दीर्घ सुस्कारे टाकीत होती तरी ती दुसर्‍यासाठी नागिणी प्रमाणे भयंकर भासत होती. ॥३०-३१॥
शोकजालेन महता विततेन न राजतीम् ।
संसक्तां धूमजालेन शिखामिव विभावसोः ॥ ३२ ॥
ती विस्तृत आणि महान शोकजाळ्याच्या योगे आच्छादित झाल्याने विशेष शोभून दिसत नव्हती. धुराच्या लोटाने व्याप्त अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे भासत होती. ॥३२॥
तां स्मृतीमिव संदिग्धां ऋद्धिं निपतितामिव ।
विहतामिव च श्रद्धां आशां प्रतिहतामिव ॥ ३३ ॥

सोपसर्गां यथा सिद्धिं बुद्धिं सकलुषामिव ।
अभूतेनापवादेन कीर्तिं निपतितामिव ॥ ३४ ॥
आणि संदिग्ध अर्थाच्या स्मृतिप्रमाणे, भूतलावर पडलेल्या ऋद्धिप्रमाणे, भंग पावलेल्या श्रद्धेप्रमाणे, भग्न झालेल्या आशेप्रमाणे, विघ्नयुक्त सिद्धिप्रमाणे अथवा कलुषित झालेल्या बुद्धिप्रमाणे किंवा मिथ्या कलंकाप्रमाणे भ्रष्ट झालेल्या कीर्तीप्रमाणे भासत होती. ॥३३-३४॥
रामोपरोधव्यथितां रक्षोगणनिपीडिताम् ।
अबलां मृगशावाक्षीं वीक्षमाणां ततस्ततः ॥ ३५ ॥
श्रीरामचंद्रांच्या सेवेत अडथळा आल्याने तिच्या मनाला फार क्लेश होत होता. राक्षसांनी पीडा दिलेली ती मृगशावकनयनी अबला सीता असहाय असल्याप्रमाणे बावरून इकडे तिकडे पहात होती. ॥३५॥
बाष्पाम्बुपरिपूर्णेन कृष्णवक्राक्षिपक्ष्मणा ।
वदनेनाप्रसन्नेन निःश्वसंतीं पुनः पुनः ॥ ३६ ॥
तिचे मुख प्रसन्न नव्हते व त्यावरून अश्रुच्या धारा ओघळत होत्या. नेत्रांच्या पापण्या काळ्या आणि वक्र दिसत होत्या. ती वारंवार दीर्घ श्वास घेऊन सुस्कारे सोडत होती. ॥३६॥
मलपङ्कधरां दीनां मण्डनार्हाममण्डिताम् ।
प्रभां नक्षत्रराजस्य कालमेघैरिवावृताम् ॥ ३७ ॥
तिच्य शरीरास मळ आणि चिखल लागलेला होता आणि ती जणु दीनतेची मूर्तीच होऊन बसली होती. श्रृंगार आणि भूषणे धारण करण्यायोग्य असूनही ती अलंकाररहित होती, त्यामुळे काळ्या ढगांनी झाकल्या गेलेल्या चंद्राच्या प्रभेप्रमाणे भासत होती. ॥३७॥
तस्य संदिदिहे बुद्धिः तथा सीतां निरीक्ष्य च ।
आम्नायानामयोगेन विद्यां प्रशिथिलामिव ॥ ३८ ॥
अभ्यास न करण्यामुळे विस्मृत झालेल्या विद्येप्रमाणे क्षीण झालेल्या सीतेला पाहून हनुमंतांच्या बुद्धित संदेह उत्पन्न झाला. ॥३८॥
दुःखेन बुबुधे सीतां हनुमाननलङ्‌कृताम् ।
संस्कारेण यथा हीनां वाचमर्थान्तरं गताम् ॥ ३९ ॥
अलंकार आणि अनुलेपनादि अंगसंस्काररहित असलेल्या सीतेस पाहून व्याकरणादिजनित संस्कारशून्य होण्यामुळे अर्थान्तरास प्राप्त झालेल्या वाणीप्रमाणे तिला ओळखता येईना. हनुमंतानी अत्यंत कष्टाने तिला ओळखले. ॥३९॥
तां समीक्षय विशालाक्षीं राजपुत्रीमनिंदिताम् ।
तर्कयामास सीतेति कारणैरुपपादयन् ॥ ४० ॥
त्या विशाल लोचना सती-साध्वी राजकुमारीला पाहिल्यानंतर त्याने अनेक कारणांची (मीमांसा) उपपादन करून मनाशी निश्चय केला कि ही सीताच आहे. ॥४०॥
वैदेह्या यानि चाङ्‌गेषु तदा रामोऽन्वकीर्तयत् ।
तान्याभरणजालानि गात्रशोभीन्यलक्षयत् ॥ ४१ ॥
त्या दिवशी श्रीरामचंद्रांनी विदेहकुमारीच्या अंगावरील ज्या ज्या आभूषणासंबंधी चर्चा केली होती तीच आभूषणे (आभूषण समूह) या वेळीही तिच्या अंगांची शोभा वाढवीत होती. हनुमंतानी या गोष्टीकडे लक्ष्य केंद्रित केले. ॥४१॥
सुकृतौ कर्णवेष्टौ च श्वदंष्ट्रौ च सुसंस्थितौ ।
मणिविद्रुमचित्राणि हस्तेष्वाभरणानि च ॥ ४२ ॥
सुंदर रीतीने बनविलेली कुण्डले आणि कुत्रांच्या दातांप्रमाणे आकृती असणारी त्रिकूर्ण नावाची कर्णफुले कानात सुंदर रीतीने सुप्रतिष्टित आणि सुशोभित झालेली होती. हातात ज्यांत रत्‍ने, पोवळी (प्रवाळ) वगैरे जडविलेली होती अशी कांकणे आदि अंलकार होते. ॥४२॥
श्यामानि चिरयुक्तत्वात् तथा संस्थानवंति च ।
तान्यैवेतानि मन्येऽहं यानि रामोऽन्वकीर्तयत् ॥ ४३ ॥

तत्र यान्यवहीनानि तान्यहं नोपलक्षये ।
यान्यस्या नावहीनानि तानीमानि न संशयः ॥ ४४ ॥
जरी अनेक दिवस धारण केले गेल्याने ते थोडे काळे पडले होते तरी त्यांचे आकार-प्रकार तसेच होते. (हनुमंतानी विचार केला कि) श्रीरामचंद्रांनी ज्यांची चर्चा केली होती, मला वाटते की तेच हे अंलकार आहेत. सीतेने जे अलंकार खाली टाकले होते ते मला आत्ता तिच्या अंगावर दिसून येत नाही आहेत. जे दागिने मार्गात टाकून दिले गेले नव्हते तेच (तिच्या अंगावर) दिसून येत आहेत यात संशय नाही. ॥४३-४४॥
पीतं कनकपट्टाभं स्रस्तं तद्वसनं शुभम् ।
उत्तरीयं नगासक्तं तदा दृष्टं प्लवङ्‌गमैः ॥ ४५ ॥

भूषणानि च मुख्यानि दृष्टानि धरणीतले ।
अनयैवापविद्धानि स्वनवंति महान्ति च ॥ ४६ ॥
त्या वेळी वानरांनी पर्वतावर टाकून दिलेले सुवर्णाच्या पाना प्रमाणे जे सुंदर पीत वस्त्र आणि पृथ्वीवर पडलेले उत्तमोत्तम, बहुमूल्य आणि वजनदार अलंकार पाहिले होते ते हिच्या द्वारेच टाकले गेले होते. ॥४५-४६॥
इदं चिरगृहीतत्वाद् वसनं क्लिष्टवत्तरम् ।
तथाऽपि नूनं तद्वर्णं तथा श्रीमद्यथेतरत् ॥ ४७ ॥
हे वस्त्र जरी अनेक दिवस वापरल्यामुळे बरेच जुने झाले आहे, तरीही त्याचा पीत रंग अद्याप विटलेला नाही. हे ही वस्त्र ते दुसरे वस्त्र जसे होते तसेच (अद्याप) कांतिमान आहे. ॥४७॥
इयं कनकवर्णाङ्‌गी रामस्य महिषी प्रिया ।
प्रणष्टापि सती यस्य मनसो न प्रणश्यति ॥ ४८ ॥
ही सुवर्णसमान गौर अंगकांति असणारी स्त्री नक्कीच श्रीरामचंद्रांची प्रिय महाराणीच आहे; जी अदृश्य होऊनही त्यांच्या मनांतून मात्र कधी वेगळी झालेली नाही. ॥४८॥
इयं सा यत्कृते रामः चतुर्भिरिह तप्यते ।
कारुण्येनानृशंस्येन शोकेन मदनेन च ॥ ४९ ॥
ही तीच सीता आहे, जिच्यासाठी श्रीरामचंद्र या जगात करूणा, दया, शोक आणि प्रेम - या चार कारणांनी संतप्त होऊन राहिले आहेत. ॥४९॥
स्त्री प्रणष्टेति कारुण्याद् आश्रितेत्यानृशंस्यतः ।
पत्‍नी नष्टेति शोकेन प्रियेति मदनेन च ॥ ५० ॥
एक स्त्री हरवली आहे या विचाराने त्यांच्या हृदयात करूणा भरून राहिली आहे. ती स्त्री आपली आश्रित होती या विचाराने ते दयेने द्रवित झाले आहेत. माझ्या पत्‍नीचा मला वियोग झाला आहे अशा विचाराने ते शोकाने व्याकुळ झाले आहेत आणि माझी प्रियतमा माझ्याजवळ आता राहिलेली नाही या भावनेने त्यांच्या हृदयात प्रेमामुळे पीडा वेदना होत आहेत. ॥५०॥
अस्या देव्या यथा रूपं अङ्‌गप्रत्यङ्‌गसौष्ठवम् ।
रामस्य च यथा रूपं तस्येयमसितेक्षणा ॥ ५१ ॥
श्रीरामचंद्रांचे रूप जसे अलौकिक आहे त्याप्रमाणेच मनोहर रूप आणि अंग-प्रत्यंगाचे सौष्ठव या देवी सीतेचे आहे, हे पाहून ही काळेभोर नेत्र असणारी सीता, रामचंद्रास अगदी योग्य पत्‍नी आहे, असे वाटते. ॥५१॥
अस्या देव्या मनस्तस्मिन् तस्य चास्यां प्रतिष्ठितम् ।
तेनेयं स च धर्मात्मा मुहूर्तमपि जीवति ॥ ५२ ॥
या देवीचे मन रघुनाथाच्या ठिकाणी जडलेले आहे आणि रघुनाथाचे मन हिच्या ठिकाणी जडलेले आहे, म्हणूनच ही आणि धर्मात्मा श्रीरामही जीवित आहेत. यांच्या मुहूर्तमात्र जिवंत राहण्यामागेही हेच कारण आहे. ॥५२॥
दुष्करं कृतवान् रामो हीनो यदनया प्रभुः ।
धारयत्यात्मनो देहं न शोकेनावसीदति ॥ ५३ ॥
हिचा शोक होऊनही भगवान श्रीराम जे आपले शरीर धारण करीत आहेत त शोकाने शिथिल होत नाहीत, हे त्यांनी फारच दुष्कर कार्य केले आहे. ॥५३॥
एवं सीतां तदा दृष्ट्वा हृष्टः पवनसंभवः ।
जगाम मनसा रामं प्रशशंस च तं प्रभुम् ॥ ५४ ॥
या प्रमाणे त्या अवस्थेत सीतेचे दर्शन झाल्याने पवनपुत्र हनुमान फारच प्रसन्न झाले, आणि ते मनानेच भगवान श्रीरामचंद्रांजवळ जाऊन पोहोंचले- अर्थात त्यांचे मन चिंतन करू लागले तसेच सीतेसारख्या साध्वीची त्यांना पत्‍नीरूपाने प्राप्ती झाली या बद्दल त्यांच्या भाग्याची वरचेवर आणि खूपच प्रशंसा करू लागले. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुंदरकाण्डे पञ्चदशः सर्गः ।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा पंधरावा सर्ग पूर्ण झाला. ॥१५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP