[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रिचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कपटमृगं दृष्ट्‍वा लक्ष्मणस्य संदेहः सीतया जीवन्तं मृतं वा मृगमानेतुं श्रीरामस्य प्रेरणं श्रीरामेण लक्ष्मणं सम्बोध्य तदुपरि सीतारक्षाभारं निक्षिप्य तं मृगं हन्तुं गमनम् -
कपटमृगाला पाहून लक्ष्मणाला संदेह, सीतेने त्या मृगाला जीवित अथवा मृत अवस्थेमध्यें घेऊन येण्यासाठी श्रीरामास प्रेरित करणे; तसेच श्रीरामांनी लक्ष्मणास समजावून सीतेच्या रक्षणाचा भार त्याच्यावर सोपवून त्या मृगाला मारण्यासाठी जाणे -
सा तं सम्प्रेक्ष्य सुश्रोणी कुसुमानि विचिन्वती ।
हेमराजतवर्णाभ्यां पार्श्वाभ्यामुपशोभितम् ॥ १ ॥

प्रहृष्टा चानवद्याङ्‌गी मृष्टहाटकवर्णिनी ।
भर्तारमपि चक्रन्द लक्ष्मणं चैव सायुधम् ॥ २ ॥
तो मृग सोने आणि चांदीच्या प्रमाणे कांति असलेल्या पार्श्वभागाने सुशोभित होता. शुद्ध सुवर्णाप्रमाणे कांति असलेली तसेच निर्दोष अंगे असलेली सुंदर सीता फुले वेचत असतांच त्या मृगाला पाहून मनातल्या मनात अत्यंत प्रसन्न झाली आणि आपला पति श्रीराम आणि दीर लक्ष्मण यांना हत्यार घेऊन येण्यासाठी हाका मारू लागली. ॥१-२॥
आहूयाहूय च पुनस्तं मृगं साधु वीक्षते ।
आगच्छागच्छ शीघ्रं वै आर्यपुत्र सहानुज ॥ ३ ॥
ती वारंवार त्यांना हाका मारी आणि परत त्या मृगाला नीट न्यहाळून पाही. ती म्हणाली - आर्यपुत्र ! आपल्या भावाच्या बरोबर या, लवकर या ! ॥३॥
तावाहूतौ नरव्याघ्रौ वैदेह्या रामलक्ष्मणौ ।
वीक्षमाणौ तु तं देशं तदा ददृशतुर्मृगम् ॥ ४ ॥
वैदेही सीतेने वारंवार बोलावल्या वरून नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मण तेथे आले आणि त्या ठिकाणी सर्वत्र दृष्टि टाकीत असतां त्यांनी त्या समयी त्या मृगास पाहिले. ॥४॥
शंकमानस्तु तं दृष्ट्‍वा लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
तमेवैनमहं मन्ये मारीचं राक्षसं मृगम् ॥ ५ ॥
त्याला पाहून लक्ष्मणाच्या मनात संदेह आला आणि तो म्हणाला हे बंधो ! मी तर समजतो की या मृगाच्या रूपात तो मारीच नामक राक्षसच आला आहे. ॥५॥
चरन्तो मृगयां हृष्टाः पापेनोपाधिना वने ।
अनेन निहता राम राजानः कामरूपिणा ॥ ६ ॥
श्रीरामा ! स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करणार्‍या त्या पाप्याने कपट-वेष धारण करून वनात शिकार खेळण्यासाठी आलेल्या कित्येक हर्षोत्फुल्ल नरेशांचा वध केला आहे. ॥६॥
अस्य मायाविदो माया मृगरूपमिदं कृतम् ।
भानुमत् पुरुषव्याघ्र गन्धर्वपुरसंनिभम् ॥ ७ ॥
पुरुषसिंह ! हा अनेक प्रकारच्या माया जाणतो. त्याच्या ज्या मायेबद्दल ऐकले होते तीच या प्रकाशमान मृगरूपात परिणत झाली आहे. हा गंधर्व-नगरा प्रमाणे नुसता दिखाऊच आहे. (यात वास्तविकता नाही आहे.) ॥७॥
मृगो ह्येवंविधो रत्‍नविचित्रो नास्ति राघव ।
जगत्यां जगतीनाथ मायैषा हि न संशयः ॥ ८ ॥
हे राघवा ! पृथ्वीनाथ ! या भूतलावर कुठेही असा विचित्र रत्‍नमय मृग नाही आहे, म्हणून निःसंशय ही मायाच आहे. ॥८॥
एवं ब्रुवाणं काकुत्स्थं प्रतिवार्य शुचिस्मिता ।
उवाच सीता संहृष्टा छद्मना हृतचेतना ॥ ९ ॥
मारीचाच्या छळाने जिची विचारशक्ती हरण केली गेली होती ती शुचिस्मिता सीता या प्रमाणे (उपर्युक्त) गोष्टी सांगणार्‍या लक्ष्मणास अडवून स्वतःच अत्यंत हर्षाने म्हणाली- ॥९॥
आर्यपुत्राभिरामोऽसौ मृगो हरति मे मनः ।
आनयैनं महाबाहो क्रीडार्थं नो भविष्यति ॥ १० ॥
आर्यपुत्र ! हा मृग अत्यंत सुंदर आहे. याने माझे मन हरण केले आहे. महाबाहो ! याला घेऊन या. आम्हा लोकांच्या मनोरंजनासाठी तो राहील. ॥१०॥
इहाश्रमपदेऽस्माकं बहवः पुण्यदर्शनाः ।
मृगाश्चरंति सहिताश्चमराः सृमरास्तथा ॥ ११ ॥

ऋक्षाः पृषतसङ्‌घाश्च वानराः किन्नरास्तथा ।
विचरंति महाबाहो रूपश्रेष्ठा महाबलाः ॥ १२ ॥

न चास्य सदृशो राजन् दृष्टः पूर्वं मृगो मया ।
तेजसा क्षमया दीप्त्या यथायं मृगसत्तमः ॥ १३ ॥
राजन ! महाबाहो ! यद्यपि आपल्या या आश्रमावर बरेचसे पवित्र आणि दर्शनीय मृग एकाचवेळी चरत असतात तसेच सृमर (काळी शेपटी असणारी चवरी गाय), चमर (पांढरी शेपटी असणारी चवरी गाय), चितकबर्‍या मृगांच्या झुंडी, वानरे तसेच सुंदर रूप असणारे महाबली किन्नरही विचरण करीत असतात, तथापि आजच्या पूर्वी मी दुसरा कोठलाही असा तेजस्वी, सौम्य आणि दीप्तिमान मृग पाहिलेला नव्हता, जसा हा श्रेष्ठ मृग दिसून येत आहे. ॥११-१३॥
नानावर्णविचित्राङ्‌गो रत्‍न भूतो ममाग्रतः ।
द्योतयन् वनमव्यग्रं शोभते शशिसंनिभः ॥ १४ ॥
नाना प्रकारच्या रंगाने युक्त होण्यामुळे याचे अंग विचित्र वाटत आहे. हा विचित्र अंगाचाच बनलेला आहे की काय असे प्रतीत होत आहे. माझ्या समोर निर्भय आणि शान्तभावाने स्थित होऊन वनास प्रकाशित करीत हा चंद्रम्याप्रमाणे शोभून दिसत आहे. ॥१४॥
अहो रूपमहो लक्ष्मीः स्वरसम्पच्च शोभना ।
मृगोऽद्‌भुतो विचित्राङ्‌गो हृदयं हरतीव मे ॥ १५ ॥
याचे रूप अद्‍भुत आहे. याची शोभा अवर्णनीय आहे. याची स्वरसंपत्ती (बोली) अत्यंत सुंदर आहे. विचित्र अंगांनी सुशोभित हा अद्‍भुत मृग माझ्या मनास मोहून टाकीत आहे. ॥१५॥
यदि ग्रहणमभ्येति जीवन्नेव मृगस्तव ।
आश्चर्यभूतं भवति विस्मयं जनयिष्यति ॥ १६ ॥
जर हा मृग जिवंत आपल्या हाती सापडला तर ती एक आश्चर्याची वस्तु होईल आणि सर्वांच्या हृदयात विस्मय उत्पन्न करील. ॥१६॥
समाप्तवनवासानां राज्यस्थानां च नः पुनः ।
अन्तःपुरे विभूषार्थो मृग एष भविष्यति ॥ १७ ॥
जेव्हा आपल्या वनवासाचा अवधी पूर्ण होईल आणि आपण पुन्हा राज्य प्राप्त करू, त्या समयी हा मृग आपल्या अंतःपुराची शोभा वाढवील. ॥१७॥
भरतस्यार्यपुत्रस्य श्वश्रूणां मम च प्रभो ।
मृगरूपमिदं दिव्यं विस्मयं जनयिष्यति ॥ १८ ॥
प्रभो ! या मृगाचे हे दिव्य रूप, भरतासाठी, आपल्यासाठी, माझ्या सासवांसाठी आणि माझ्यासाठी ही विस्मयजनक होईल. ॥१८॥
जीवन्न यदि तेऽभ्येति ग्रहणं मृगसत्तमः ।
अजिनं नरशार्दूल रुचिरं तु भविष्यति ॥ १९ ॥
पुरुषसिंह ! जर कदाचित हा श्रेष्ठ मृग जिवंत असता पकडता येणे शक्य झाले नाही तरी याचे कातडेही फारच सुंदर असेल. ॥१९॥
निहतस्यास्य सत्त्वस्य जाम्बूनदमयत्वचि ।
शष्पबृस्यां विनीतायामिच्छाम्यहमुपासितुम् ॥ २० ॥
गवताच्या बनविलेल्या चटईवर या मेलेल्या मृगाचे सुवर्णमय कातडे पसरून मी त्यावर आपणासह बसू इच्छिते. ॥२०॥
कामवृत्तमिदं रौद्रं स्त्रीणामसदृशं मतम् ।
वपुषा त्वस्य सत्त्वस्य विस्मयो जनितो मम ॥ २१ ॥
यद्यपि स्वेच्छेने प्रेरित होऊन आपल्या पतिला अशा कामास लावणे हा भयंकर स्वेच्छाचार आहे आणि साध्वी स्त्रियांसाठी तो उचित मानला जात नाही तथापि या जंतुच्या शरीराने माझ्या हृदयात विस्मय उत्पन्न केला आहे. (म्हणून मी यास पकडून आणण्याविषयी अनुरोध करीत आहे.) ॥२१॥
तेन काञ्चनरोम्णा तु मणिप्रवरशृंगिणा ।
तरुणादित्यवर्णेन नक्षत्रपथवर्चसा ॥ २२ ॥

बभूव राघवस्यापि मनो विस्मयमागतम् ।
इति सीतावचः श्रुत्वा दृष्ट्‍वा च मृगमद्‌भुतम् ॥ २३ ॥

लोभितस्तेन रूपेण सीतया च प्रचोदितः ।
उवाच राघवो हृष्टो भ्रातरं लक्ष्मणं वचः ॥ २४ ॥
सोनेरी रोमावली, इंद्रनील मण्याप्रमाणे शिंगे, उदयकालीन सूर्याप्रमाणे कांति असणार्‍या आणि नक्षत्रलोकांप्रमाणे बिंदुयुक्त तेजाने सुशोभित त्या मृगाला पाहून श्रीरामचंद्रांचे मनही विस्मित होऊन गेले. सीतेचे पूर्वोक्त बोलणे ऐकून, त्या मृगाचे अद्‍भुत रूप पाहून, त्याच्या त्या रूपावर लुब्ध होऊन आणि सीतेद्वारा प्रेरित होऊन हर्षाने भरून जाऊन श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मण यांस म्हटले- ॥२२-२४॥
पश्य लक्ष्मण वैदेह्याः स्पृहामुल्लसितामिमाम् ।
रूपश्रेष्ठतया ह्येष मृगोऽद्य न भविष्यति ॥ २५ ॥
लक्ष्मणा ! पहा तर खरे, वैदेही सीतेच्या मनात या मृगाला प्राप्त करण्याविषयी किती प्रबळ इच्छा उत्पन्न झाली आहे. वास्तविक याचे रूप आहे ही फारच सुंदर. आपल्या रूपाच्या श्रेष्ठतेमुळेच हा मृग आता जिवंत राहू शकणार नाही. ॥२५॥
न वने नन्दनोद्देशे न चैत्ररथसंश्रये ।
कुतः पृथिव्यां सौमित्रे योऽस्य कश्चित् समो मृगः ॥ २६ ॥
सौमित्र ! देवराज इंद्राच्या नंदनवनात आणि कुबेराच्या चैत्ररथ वनातही याची बरोबरी करू शकेल असा कुणी मृग असणार नाही. मग पृथ्वीवर तर कोठून शक्य होणार आहे ? ॥२६॥
प्रतिलोमानुलोमाश्च रुचिरा रोमराजयः ।
शोभन्ते मृगमाश्रित्य चित्राः कनकबिन्दुभिः ॥ २७ ॥
वक्र आणि सरळ रूचिर रोमावळी या मृगाच्या शरीराचा आश्रय घेऊन सोनरी ठिपक्यानी चित्रित होऊन अत्यंत शोभा प्राप्त करीत आहेत. ॥२७॥
पश्यास्य जृम्भमाणस्य दीप्तामग्निशिखोपमाम् ।
जिह्वां मुखान्निःसरन्तीं मेघादिव शतह्रदाम् ॥ २८ ॥
पहा ना ! हा जेव्हा जांभई देत आहे, तेव्हा त्याच्या मुखातून प्रज्वलित अग्निशिखे प्रमाणे चमकणारी जिव्हा बाहेर निघत आहे आणि मेघातून प्रकट होणार्‍या वीजेप्रमाणे चमकू लागत आहे. ॥२८॥
मसारगल्वर्कमुखः शङ्‌खमुक्तानिभोदरः ।
कस्य नामानिरूप्योऽसौ न मनो लोभयेन्मृगः ॥ २९ ॥
त्याचे मुख-संपुट इंद्रनील मण्यापासून बनविलेल्या चषकाप्रमाणे (पानपात्रा प्रमाणे) भासत आहे, उदर शंख आणि मोत्या प्रमाणे सफेद आहे. हा अवर्णनीय मृग कुणाच्या मनाला लुब्ध करणार नाही ? ॥२९॥
कस्य रूपमिदं दृष्ट्‍वा जाम्बूनदमयप्रभम् ।
नानारत्‍नमयं दिव्यं न मनो विस्मयं व्रजेत् ॥ ३० ॥
नाना प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित याचे सोनेरी प्रभा असणारे दिव्य रूप पाहून कुणाच्या मनात विस्मय उत्पन्न होणार नाही ? ॥३०॥
मांसहेतोरपि मृगान् विहारार्थं च धन्विनः ।
घ्नन्ति लक्ष्मण राजानो मृगयायां महावने ॥ ३१ ॥
लक्ष्मणा ! राजे लोक मोठमोठ्‍या वनात मृगया (शिकार) खेळते वेळी मांसा (मृगचर्मा) साठी आणि शिकार खेळण्याची हौस पूरी करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन मृगांना मारतात. ॥३१॥
धनानि व्यवसायेन विचीयन्ते महावने ।
धातवो विविधाश्चापि मणिरत्‍नसुवर्णिनः ॥ ३२ ॥
मृगयेच्या उद्योगामुळेच राजेलोक विशाल वनात धनाचा ही संग्रह करतात कारण की तेथे मणि, रत्‍ने आणि सुवर्ण आदिनी युक्त नाना प्रकारच्या धातुही उपलब्ध होत असतात. ॥३२॥
तत्सारमखिलं नॄणां धनं निचयवर्धनम् ।
मनसा चिन्तितं सर्वं यथा शुक्रस्य लक्ष्मण ॥ ३३ ॥
लक्ष्मणा ! कोषाची वृद्धि करणारे ते वन्य धन मनुष्यांसाठी अत्यंत उत्कृष्ट ठरते. ज्याप्रमाणे ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या पुरुषासाठी मनाच्या केवळ चिंतनाने प्राप्त झालेल्या सार्‍या वस्तु अत्यंत उत्तम सांगितल्या गेल्या आहेत त्याप्रमाणेच. ॥३३॥
अर्थी येनार्थकृत्येन संव्रजत्यविचारयन् ।
तमर्थमर्थशास्त्रज्ञाः प्राहुरर्थ्याः सुलक्ष्मण ॥ ३४ ॥
लक्ष्मणा ! अर्थार्थी मनुष्य ज्या अर्थाचे (प्रयोजनाचे) संपादन करण्यासाठी त्यांच्याकडे आकृष्ट होऊन विचार न करताच चालू लागतो, त्या अत्यंत आवश्यक प्रयोजनालाच, अर्थ साधण्यात चतुर आणि अर्थशास्त्राचे ज्ञाते विद्वान अर्थ म्हणतात. ॥३४॥
एतस्य मृगरत्‍नस्य परार्ध्ये काञ्चनत्वचि ।
उपवेक्ष्यति वैदेही मया सह सुमध्यमा ॥ ३५ ॥
या रत्‍नस्वरुप श्रेष्ठ मृगाच्या सोनेरी कातड्‍यावर सुंदर वैदेही सीता माझ्यासह बसेल. ॥३५॥
न कादली न प्रियकी न प्रवेणी न चाविकी ।
भवेदेतस्य सदृशी स्पर्शेऽनेनेति मे मतिः ॥ ३६ ॥
कदली (कोमल उत्तम चितकबर्‍या रंगाचे आणि नीलाग्ररोम असणारे मृगविशेष), प्रियक (कोमल उत्तम तुकतुकीत आणि घनदाट रोम असणारे मृगविशेष), प्रवेण( विशेष प्रकारचे बोकड) आणि अवि (मेंढे) यांची त्वचा ही स्पर्श करण्यास या कांचन मृगाच्या त्वचेसमान कोमल आणि सुखद असू शकत नाही असा माझा विश्वास आहे. ॥३६॥
एष चैव मृगः श्रीमान् यश्च दिव्यो नभश्चरः ।
उभावेतै मृगौ दिव्यौ तारामृगमहीमृगौ ॥ ३७ ॥
हा सुंदर मृग आणि तो जो दिव्य आकाशचारी मृग (मृगशीर्ष नक्षत्र) आहे. हे दोन्ही दिव्य मृग आहेत. यांच्यापैकी एक तारामृग(१) आणि दुसरा महीमृग(२) आहे. ॥३७॥
**(१) - नक्षत्रलोकात विचरणारा मृग (मृगशीर्ष नक्षत्र). **(२) - दुसरा पृथ्वीवर विचरत असलेला कांचनमृग)
यदि वाऽयं तथा यन्मां भवेद् वदसि लक्ष्मण ।
मायैषा राक्षसस्येति कर्तव्योऽस्य वधो मया ॥ ३८ ॥
लक्ष्मणा ! तू मला जसे सांगत आहेस तसा जरी हा मृग असेल, जर ही राक्षसाची मायाच असेल तरीही मला त्याचा वध केलाच पाहिजे. ॥३८॥
एतेन हि नृशंसेन मारीचेनाकृतात्मना ।
वने विचरता पूर्वं हिंसिता मुनिपुंगवाः ॥ ३९ ॥
कारण की अपवित्र (दुष्ट) असणार्‍या या क्रूरकर्मा मारीचाने वनात विचरते वेळी पूर्वी अनेकानेक श्रेष्ठ मुनींची हत्या केलेली आहे. ॥३९॥
उत्थाय बहवोऽनेन मृगयायां जनाधिपाः ।
निहताः परमेष्वासास्तस्माद् वध्यस्त्वयं मृगः ॥ ४० ॥
याने मृगयेच्या समयी प्रकट होऊन बर्‍याचशा महाधनुर्धर नरेशांचा वध केला आहे. म्हणून या मृगाच्या रूपात याचाही वध अवश्य करण्यायोग्य आहे. ॥४०॥
पुरस्तादिह वातापिः परिभूय तपस्विनः ।
उदरस्थो द्विजान् हन्ति स्वगर्भोऽश्वतरीमिव ॥ ४१ ॥
या वनात पूर्वी वातापि नामक राक्षस राहात होता जो तपस्वी महात्म्यांचा तिरस्कार करून कपटपूर्ण उपायाने त्यांच्या पोटात प्रवेश करीत असे; आणि खेचरीला जसे तिचेच गर्भस्थ पिल्लू नष्ट करून टाकते त्या प्रकारे त्या ब्रह्मर्षिंना नष्ट करून टाकीत असे. ॥४१॥
स कदाचिच्चिराल्लोभादाससाद महामुनिम् ।
अगस्त्यं तेजसा युक्तं भक्षस्तस्य बभूव ह ॥ ४२ ॥
तो वातापि एक दिवस दीर्घकालानंतर लोभवश तेजस्वी महामुनी अगस्त्यांच्या जवळ जाऊन पोहोंचला आणि (श्राद्धकाळात) त्यांचा आहार बनला. त्यांच्या पोटात जाऊन पोहोचला. ॥४२॥
समुत्थाने च तद्‌रूपं कर्तुकामं समीक्ष्य तम् ।
उत्स्मयित्वा तु भगवान् वातापिमिदमब्रवीत् ॥ ४३ ॥
श्राद्धाच्या शेवटी जेव्हा तो आपले राक्षसरूप प्रकट करण्याची इच्छा करू लागला- त्यांचे पोट फाडून बाहेर येण्यास उद्यत झाला, तेव्हा त्या वातापिला उद्देशून भगवान्‌ अगस्त्य हसले आणि त्याला या प्रकारे म्हणाले- ॥४३॥
त्वयाविगण्य वातापे परिभूताश्च तेजसा ।
जीवलोके द्विजश्रेष्ठास्तस्मादसि जरां गतः ॥ ४४ ॥
वातापि ! तू विचार न करता या जीव जगतात बर्‍याचश्या श्रेष्ठ ब्राह्मणांना आपल्या तेजाने तिरस्कृत केले आहेत त्या पापाने आता तू पचून गेला आहेस. ॥४४॥
तद् रक्षो न भवेदेव वातापिरिव लक्ष्मण ।
मद्विधं योऽतिमन्येत धर्मनित्यं जितेन्द्रियम् ॥ ४५ ॥
लक्ष्मणा ! जो सदा धर्मात तत्पर राहाणार्‍या माझ्या सारख्या जितेन्द्रिय पुरुषांचे अतिक्रमण करेल त्या मारीच नामक राक्षसाला ही वातापि प्रमाणेच नष्ट झाले पाहिजे. ॥४५॥
भवेद्धतोऽयं वातापिः अगस्त्येनेव मा गतः ।
इह त्वं भव सन्नद्धो यन्त्रितो रक्ष मैथिलीम् ॥ ४६ ॥
जसा वातापि अगस्त्यांच्या द्वारा नष्ट झाला त्या प्रकारे हा मारीच आता माझ्या समोर येऊन अवश्यच मारला जाईल. तू अस्त्र आणि कवच इत्यादिनी सुसज्ज होऊन जा आणि येथे सावध राहून मैथिली सीतेचे रक्षण कर. ॥४६॥
अस्यामायत्तमस्माकं यत् कृत्यं रघुनन्दन
अहमेनं वधिष्यामि ग्रहीष्याम्यथवा मृगम् ॥ ४७ ॥
रघुनंदना ! आपले जे आवश्यक कर्तव्य आहे ते सीतेच्या रक्षणाच्याच अधीन आहे. मी या मृगाला मारून टाकीन अथवा जिवंतच पकडून आणीन. ॥४७॥
यावद् गच्छामि सौमित्रे मृगमानयितुं द्रुतम् ।
पश्य लक्ष्मण वैदेह्या मृगत्वचि गतां स्पृहाम् ॥ ४८ ॥
सुमित्राकुमार लक्ष्मणा ! पहा, या मृगाचे चर्म हस्तगत करण्यासाठी वैदेहीला किती उत्कण्ठा होत आहे. म्हणून या मृगाला घेऊन येण्यासाठी मी तात्काळच जात आहे. ॥४८॥
त्वचा प्रधानया ह्येष मृगोऽद्य न भविष्यति ।
अप्रमत्तेन ते भाव्यं आश्रमस्थेन सीतया ॥ ४९ ॥

यावत् पृषतमेकेन सायकेन निहन्म्यहम् ।
हत्वैतच्चर्म चादाय शीघ्रमेष्यामि लक्ष्मण ॥ ५० ॥
या मृगाला मारण्यात प्रधान हेतु आहे याचे कातडे प्राप्त करणे. आज यामुळेच हा मृग जिवंत राहू शकणार नाही. लक्ष्मणा ! तू आश्रमात राहून सीतेसह सावधान राहा.- मी जो पर्यंत एकाच बाणाने या चितकबर्‍या मृगाला मारणार नाही तो पर्यत सावध राहून हिचे रक्षण कर. मारल्यानंतर याचे कातडे घेऊन मी शीघ्र परत येईन. ॥४९-५०॥
प्रदक्षिणेनातिबलेन पक्षिणा
जटायुषा बुद्धिमता च लक्ष्मण ।
भवाप्रमत्तः प्रतिगृह्य मैथीलीं
प्रतिक्षणं सर्वत एव शंकितः ॥ ५१ ॥
लक्ष्मणा ! बुद्धिराज पक्षी गृध्रराज जटायु फारच बलवान आणि सामर्थ्यशाली आहेत. त्यांच्या सहच येथे सदा सावधान राहा. मैथिली सीतेला आपल्या संरक्षणात ठेवून प्रतिक्षण सर्व दिशांमध्ये राहाणार्‍या राक्षसांच्या संबंधी सावध राहा. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा त्रेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP