[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ द्वाविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
चतुर्दशसहस्रसैनिकैः सह खरदूषणयोर्जनस्थानात् पञ्चवटीं प्रति प्रस्थानम् -
चौदा हजार राक्षसांच्या सेनेसह खर-दूषणांचे जनस्थानातून पंचवटीकडे प्रस्थान -
एवमाधर्षितः शूरः शूर्पणख्या खरस्ततः ।
उवाच रक्षसां मध्ये खरः खरतरं वचः ॥ १ ॥
शूर्पणखेच्या द्वारा या प्रकारे तिरस्कृत होऊन शूरवीर खराने राक्षसांच्या मध्ये अत्यंत कठोर वाणीने म्हटले - ॥१॥
तवावमानप्रभवः क्रोधोऽयमतुलो मम ।
न श्क्यते धारयितुं लवणाम्भ इवोल्बणम् ॥ २ ॥
’हे भागिनी ! तुझ्या अपमानामुळे मला भयंकर क्रोध आलेला आहे. तो धारण करणे किंवा दाबून ठेवणे हे पौर्णिमेला प्रचण्ड वेगाने वाढणार्‍या समुद्राच्या खार्‍या पाण्या प्रमाणे असंभव झाले असून जखमेवर खारे पाणी शिंपडले असता जशा असह्य वेदना होतात (त्या प्रमाणे तो क्रोधही असह्य झाला आहे.)’ ॥२॥
न रामं गणये वीर्यान्मानुषं क्षीणजीवितम् ।
आत्मदुश्चरितैः प्राणान् हतो योऽद्य विमोक्ष्यते ॥ ३ ॥
’मी पराक्रमाच्या दृष्टीने रामाला काहीच गणत नाही (तुच्छ मानतो) कारण की त्या मनुष्याचे जीवन आता क्षीण होऊ लागले आहे. तो आपल्या दुष्कर्मांनीच मारला जाऊन आज आपले प्राण गमावून बसेल.’ ॥३॥
बाष्पः संधार्यतामेष संभ्रमश्च विमुच्यताम् ।
अहं रामं सह भ्रात्रा नयामि यमसादनम् ॥ ४ ॥
’तू आपल्या अश्रूंना रोखून धर आणि ही भीति सोडून दे. मी भावासह रामाला आत्ता यमलोकात पोहोचवून टाकतो.’ ॥४॥
परश्वधहतस्याद्य मन्दप्राणस्य भूतले ।
रामस्य रुधिरं रक्तमुष्णं पास्यसि राक्षसि ॥ ५ ॥
’राक्षसी ! आज माझ्या कुह्राडीच्या घावाने निष्प्राण होऊन भूतलावर पडलेल्या रामाचे गरम गरम रक्त तुला पिण्यास मिळेल.’ ॥५॥
सम्प्रहृष्टा वचः श्रुत्वा खरस्य वदनाच्च्युतम् ।
प्रशशंस पुनर्मौर्ख्याद् भ्रातरं रक्षसां वरम् ॥ ६ ॥
खराच्या मुखातून निघालेली गोष्ट ऐकून शूर्पणखेला फार प्रसन्नता वाटली. तिने मूर्खतावश राक्षसांमध्ये श्रेष्ठ भाऊ खर याची भूरि भूरि प्रशंसा केली. ॥६॥
तया परुषितः पूर्वं पुनरेव प्रशंसितः ।
अब्रवीद् दूषणं नाम खरः सेनापतिं तदा ॥ ७ ॥
तिने प्रथम ज्याचा कठोर वाणी द्वारा तिरस्कार केला आणि पुन्हा ज्याची अत्यंत प्रशंसा केली त्या खराने त्या समयी आपला सेनापति दूषण यास म्हटले- ॥७॥
चतुर्दश सहस्राणि मम चित्तानुवर्तिनाम् ।
रक्षसां भीमवेगानां समरेष्वनिवर्तिनाम् ॥ ८ ॥

नीलजीमूतवर्णानां लोकहिंसाविहारिणाम् ।
सर्वोद्योगमुदीर्णानां रक्षसां सौम्य कारय ॥ ९ ॥
’सौम्य ! माझ्या मनास अनुकूल वागणारे, युद्धाच्या मैदानातून माघार न घेणारे, भयंकर वेगवान, मेघांच्या काळ्या समूहाप्रमाणे काळ्या रंगाचे, लोकांच्या हिंसेनेच क्रीडा विहार करणारे तसेच युद्धात उत्साहाने पुढे सरसावणास चौदा हजार राक्षसांना युद्धासाठी तयार करून धाडण्याची पूर्ण तयारी करवा.’ ॥८-९॥
उपस्थापय मे क्षिप्रं रथं सौम्य धनूंषि च ।
शरांश्च चित्रान् खङ्‌गांश्च शक्तीश्च विविधाः शिताः ॥ १० ॥
’सौम्य सेनापति ! तुम्ही शीघ्रच माझा ही रथ येथे मागवून घ्या. त्यावर बरीचशी धनुष्ये, बाण, चित्रविचित्र खंग आणि नाना प्रकारच्या तीक्ष्ण शक्तीही ठेवून द्या.’ ॥१०॥
अग्रे निर्यातुमिच्छामि पौलस्त्यानां महात्मनाम् ।
वधार्थं दुर्विनीतस्य रामस्य रणकोविद ॥ ११ ॥
’रणकुशल वीरा ! मी ह्या उद्दंड रामाचा वध करण्यासाठी महामनस्वी पुलस्त्यवंशी राक्षसांच्या पुढे पुढे जाऊ इच्छिंतो.’ ॥११॥
इति तस्य ब्रुवाणस्य सूर्यवर्णं महारथम् ।
सदश्वैः शबलैर्युक्तमाचचक्षेऽथ दूषणः ॥ १२ ॥
त्याने या प्रकारे आज्ञा देताच एक सूर्यासमान प्रकाशमान आणि चितकबर्‍या रंगाचे उत्तम घोडे जुंपलेला विशाल रथ तेथे आला. दूषणाने खराला याची सूचना दिली. ॥१२॥
तं मेरुशिखराकारं तप्तकाञ्चनभूषणम् ।
हेमचक्रमसम्बाधं वैदूर्यमयकूबरम् ॥ १३ ॥

मत्स्यैः पुष्पैर्द्रुमैः शैलैश्चंद्रसूर्यैश्च काञ्चनैः ।
माङ्‌गल्यैः पक्षिसङ्‌घैश्च ताराभिश्च समावृतम् ॥ १४ ॥

ध्वजनिस्त्रिंशसम्पन्नं किङ्‌किणीवरभूषितम् ।
सदश्वयुक्तं सोऽमर्षादारुरोह खरस्तदा ॥ १५ ॥
तो रथ मेरू पर्वताच्या शिखरांप्रमाणे उंच होता. त्याला तापविलेल्या सोन्याच्या बनविलेल्या साजाने सजविलेले होते. त्याच्या चाकात ही सोने जडविलेले होते. त्याचा विस्तार खूप मोठा होता. त्या रथाचे कूबर वैडूर्य मण्यांचे जडविलेले होते. त्याच्या सजावटीसाठी सोन्याचे बनविलेले मत्स्य, फुले, वृक्ष, पर्वत, चंद्रमा, सूर्य, मांगलिक पक्ष्यांचे समुदाय तसेच तारकांसहित तो रथ सुशोभित होत होता. त्याच्यावर ध्वजा फडकत होती. तसेच रथामध्ये खंग आदि अस्त्रेशस्त्रे ठेवलेली होती. लहान लहान घंटा अथवा सुंदर घुंगुरांनी सजविलेल्या आणि उत्तम घोडे जुंपलेल्या त्या रथावर राक्षसराज खर त्यावेळी आरूढ झाला. आपल्या बहीणीच्या अपमानाचे स्मरण करून त्याच्या मनात अत्यंत अमर्ष होत होता. ॥१३-१५॥
खरस्तु तन्महत्सैन्यं रथचर्मायुधध्वजम् ।
निर्यातेत्यब्रवीत् प्रेक्ष्य दूषणः सर्वराक्षसान् ॥ १६ ॥
रथ, ढाल, अस्त्र-शस्त्र तसेच ध्वजाने संपन्न त्या विशाल सेनेकडे पाहून खर आणि दूषणांनी समस्त राक्षसांना म्हटले- ’निघा ! पुढे चला !’ ॥१६॥
ततस्तद् राक्षसं सैन्यं घोरचर्मायुधध्वजम् ।
निर्जगाम जनस्थानान्महानादं महाजवम् ॥ १७ ॥
कूच करण्याची आज्ञा होताच भयंकर ढाल, अस्त्र-शस्त्र तसेच ध्वजेने युक्त ती विशाल राक्षस सेना जोरजोराने गर्जना करीत जनस्थानातून मोठ्या वेगाने निघाली. ॥१७॥
मुद्गरैः पट्टिशैः शूलैः सुतीक्ष्णैश्च परश्वधैः ।
खड्गैश्चक्रैश्च हस्तस्थैर्भ्राजमानै सतोमरैः ॥ १८ ॥

शक्तिभिः परिघैर्घोरैरतिमात्रैश्च कार्मुकैः ।
गदासिमुसलैर्वज्रैर्गृहीतैर्भीमदर्शनैः ॥ १९ ॥

राक्षसानां सुघोराणां सहस्राणि चतुर्दश ।
निर्यातानि जनस्थानात् खरचित्तानुवर्तिनाम् ॥ २० ॥
सैनिकांच्या हातात मुदगर, पट्टिश, शूल, अत्यंत तीक्ष्ण कुर्‍हाडी, खंग, चक्र आणि तोमर चमकत होते. शक्ती, भयंकर परिध, विशाल धनुष्य, गदा, तलवार, मुसळ तसेच वज्र (आठ कोनाचे एक विशेष आयुध) त्या राक्षसांच्या हातांत येऊन फारच भयानक दिसून येत होते. या अस्त्र-शस्त्रांनी उपलक्षित आणि खराच्या मनाच्या इच्छेनुसार चालणारे अत्यंत भयंकर चौदा हजार राक्षस जनस्थानातून युद्धासाठी निघाले. ॥१८-२०॥
तांस्तु निर्धावतो दृष्ट्‍वा राक्षसान् भीमदर्शनान् ।
खरस्यापि रथः किञ्चिज्जगाम तदनन्तरम् ॥ २१ ॥
त्या भयंकर दिसणार्‍या राक्षसांना हल्ला करतांना पाहून खराचा रथ ही थोडा वेळ सैनिकांच्या निघण्याची प्रतीक्षा करून त्यांच्याच बरोबर पुढे निघाला. ॥२१॥
ततस्ताञ्छबलानश्वांस्तप्तकाञ्चनभूषितान् ।
खरस्य मतमाज्ञाय सारथिः पर्यचोदयत् ॥ २२ ॥
त्यानंतर खराचा अभिप्राय जाणून त्याच्या सारथ्याने तापलेल्या सोन्याच्या आभूषणांनी विभूषित त्या चितकबर्‍या घोड्यांना हाकलले. ॥२२॥
संचोदितो रथः शीघ्रं खरस्य रिपुघातिनः ।
शब्देनापूरयामास दिशः सप्रदिशस्तथा ॥ २३ ॥
त्यांना हाकलतांच शत्रुघाती खराचा रथ शीघ्रच आपल्या घर-घर शब्दाने संपूर्ण दिशा आणि उपदिशांना प्रतिध्वनित करू लागला. ॥२३॥
प्रवृद्धमन्युस्तु खरः खरस्वरो
रिपोर्वधार्थं त्वरितो यथान्तकः ।
अचूचुदत् सारथिमुन्नदन् पुन-
र्महाबलो मेघ इवाश्मवर्षवान् ॥ २४ ॥
त्या समयी खराचा क्रोध खूप वाढलेला होता. त्याचा स्वर ही कठोर झाला होता. तो शत्रूच्या वधासाठी उतावळा होऊन यमराजा प्रमाणे भयानक वाटत होता. ज्या प्रमाणे गारांची वृष्टी करणारा मेघ मोठ्या जोराने गर्जना करतो त्या प्रकारे महाबली खराने उच्चस्वरात सिंहनाद करून पुन्हा सारथ्याला रथ हांकण्यासाठी प्रेरित केले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा बाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP