[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य गुणप्रभावानुपवर्ण्य मारीचेन सीताहरणोद्यमाद्‌रावणस्य निवारणम् - मारीचाने रावणाला श्रीरामचंद्रांचे गुण आणि प्रभाव सांगून सीताहरणाच्या उद्योगापासून परावृत्त करणे -
तच्छ्रुत्वा राक्षसेन्द्रस्य वाक्यं वाक्यविशारदः ।
प्रत्युवाच महातेजा मारीचो राक्षसेश्वरम् ॥ १ ॥
राक्षसराज रावणाचे पूर्वोक्त बोलणे ऐकून वाक्यविशारद महातेजस्वी मारीचाने त्याला या प्रकारे उत्तर दिले - ॥१॥
सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥ २ ॥
राजन ! सदा प्रिय वचन बोलणारे पुरुष तर सर्वत्र सुलभच असतात. परंतु जे अप्रिय असूनही हितकर असेल अशी गोष्ट सांगणारे आणि ऐकणारे दोन्ही दुर्लभ असतात. ॥२॥
न नूनं बुध्यसे रामं महावीर्यगुणोन्नतम् ।
अयुक्तचारश्चपलो महेन्द्रवरुणोपमम् ॥ ३ ॥
तुम्ही कोणी गुप्तहेर ठेवत नाही आणि तुमचे हृदयही फार चंचल आहे, म्हणून निश्चितच तुम्ही श्रीरामचंद्रांना बिलकुल जाणत नाही. ते पराक्रमोचित गुणात फारच वरचढ तसेच इंद्र आणि वरूणासमान आहेत. ॥३॥
अपि स्वस्ति भवेत् तात सर्वेषामपि रक्षसाम् ।
अपि रामो न संक्रुद्धः कुर्याल्लोकानमराक्षसान् ॥ ४ ॥
तात ! मी तर असे इच्छितो कि समस्त राक्षसांचे कल्याण व्हावे. असे तर होणार नाही ना की कदाचित श्रीरामचंद्र अत्यंत कुपित होऊन समस्त लोकांना राक्षस-शून्य तर करून टाकणार नाहीत ना ? ॥४॥
अपि ते जीवितान्ताय नोत्पन्ना जनकात्मजा ।
अपि सीतानिमित्तं च न भवेद् व्यसनं महत् ॥ ५ ॥
जनकनंदिनी सीता तुमच्या जीवनाचा अंत करण्यासाठी तर उत्पन्न झाली नाही ना ? कदाचित असे तर होणार नाही ना की सीतेमुळे तुमच्यावर कोठले फार मोठे संकट येणार आहे ? ॥५॥
अपि त्वामीश्वरं प्राप्य कामवृत्तं निरङ्‌कुशम् ।
न विनश्येत् पुरी लङ्‌का त्वया सह सराक्षसा ॥ ६ ॥
तुमच्या सारखा स्वेच्छाचारी आणि उच्छृङ्‌खल राजा प्राप्त झाल्यामुळे लंकापुरी तुमच्यासह आणि राक्षसांसह नष्ट तर होऊन जाणार नाही ? ॥६॥
त्वद्विधः कामवृत्तो हि दुःशीलः पापमन्त्रितः ।
आत्मानं स्वजनं राष्ट्रं स राजा हन्ति दुर्मतिः ॥ ७ ॥
जो राजा तुमच्या सारखा दुराचारी, स्वेच्छाचारी, पापपूर्ण विचार ठेवणारा आणि खोटी बुद्धि असणारा असतो, तो आपला, आपल्या स्वजनांचा तसेच संपूर्ण राष्ट्राचाही विनाश करून टाकतो. ॥७॥
न च पित्रा परित्यक्तो नामर्यादः कथञ्चन ।
न लुब्धो न च दुःशीलो न च क्षत्रिपांसनः ॥ ८ ॥
श्रीरामचंद्र पित्याद्वारे त्यागले वा घालवून दिले गेलेले नाहीत, किंवा त्यांनी धर्माच्या मर्यादेचाही कुठल्या प्रकारे त्याग केलेला नाही. ते लोभी नाहीत वा दूषित विचार ठेवणारे आणि क्षत्रिय कुलकलंकही नाहीत. ॥८॥
न च धर्मगुणैर्हीनः कौसल्यानन्दिवर्धनः ।
न च तीक्ष्णो हि भूतानां सर्वभूतहिते रतः ॥ ९ ॥
कौसल्यानंदवर्धन श्रीराम धर्मासंबंधीच्या गुणांनी हीन झालेले नाही आहेत. त्यांचा स्वभावही कुणा प्राण्याप्रति तिखट नाही आहे. ते सदा समस्त प्राण्यांच्या हितामध्येच तत्पर राहात असतात. ॥९॥
वञ्चितं पितरं दृष्ट्‍वा कैकेय्या सत्यवादिनम् ।
करिष्यामीति धर्मात्मा ततः प्रव्रजितो वनम् ॥ १० ॥
राणी कैकेयीने पित्याला धोका देऊन माझ्या वनवासाचा वर मागितला - हे पाहून धर्मात्मा श्रीरामांनी मनातल्या मनात हा निश्चय केला की मी पित्याला सत्यवादी बनवीन. (त्यांनी दिलेल्या वराला अथवा वचनाला पूर्ण करीन.) या निश्चयाच्या अनुसार ते स्वतःच वनात निघून आले. ॥१०॥
कैकेय्याः प्रियकामार्थं पितुर्दशरथस्य च ।
हित्वा राज्यं च भोगांश्च प्रविष्टो दण्डकावनम् ॥ ११ ॥
माता कैकेयी आणि पिता राजा दशरथ यांचे प्रिय करण्याच्या इच्छेनेच ते स्वतः राज्य आणि भोगांचा परित्याग करून दण्डकवनात प्रविष्ट झाले आहेत. ॥११॥
न रामः कर्कशस्तात नाविद्वान् नाजितेन्द्रियः ।
अनृतं न श्रुतं चैव नैव त्वं वक्तुमर्हसि ॥ १२ ॥
तात ! श्रीराम क्रूर नाही आहेत. ते मूर्ख किंवा अजितेन्द्रियही नाही आहेत. श्रीरामामध्ये मिथ्या भाषणाचा दोष असल्याचे मी कधीही ऐकलेले नाही म्हणून त्यांच्या विषयी अशा उलट गोष्टी तुम्ही कधीही बोलतां कामा नयेत. ॥१२॥
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासवः ॥ १३ ॥
श्रीराम धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. ते साधु आणि पराक्रमी आहेत. जसे इंद्र समस्त देवतांचे अधिपति आहेत त्याच प्रकारे श्रीरामही संपूर्ण जगताचे राजे आहेत. ॥१३॥
कथं नु तस्य वैदेहीं रक्षितां स्वेन तेजसा ।
इच्छसे प्रसभं हर्तुं प्रभामिव विवस्वतः ॥ १४ ॥
त्यांची पत्‍नी वैदेही सीता आपल्याच पतिव्रत्याच्या तेजाने सुरक्षित आहे. ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा त्याच्या पासून अलग केली जात नाही त्याच प्रकारे सीतेला श्रीरामांपासून अलग करणे असंभव आहे. अशा स्थितिमध्ये तू बलपूर्वक तिचे अपहरण करण्याची इच्छा कशी करत आहेस ? ॥१४॥
शरार्चिषमनाधृष्यं चापखड्गेन्धनं रणे ।
रामाग्निं सहसा दीप्तं न प्रवेष्टुं त्वमर्हसि ॥ १५ ॥
श्रीराम प्रज्वलित अग्नि समान आहेत. बाणच त्या अग्निची ज्वाला आहे, धनुष्य आणि खड्‍ग ही त्यांच्यासाठी इंधनाचे काम करतात. तुम्ही युद्धासाठी एकाएकी त्या अग्निमध्ये प्रवेश करता उपयोगी नाही. ॥१५॥
धनुर्व्यादितदीप्तास्यं शरार्चिषममर्षणम् ।
चापपाशधरं तीक्ष्णं शत्रुसेनापहारिणम् ॥ १६ ॥

राज्यं सुखं च संत्यज्य जीवितं चेष्टमात्मनः ।
नात्यासादयितुं तात रामान्तकमिहार्हसि ॥ १७ ॥
तात ! धनुष्य हेच ज्यांचे पसरलेले मुख आहे आणि बाण हीच प्रभा आहे आणि जे अमर्षाने भरलेले आहेत, धनुष्य आणि बाण घेऊन उभे आहेत. रोषवश तिखट स्वभावाचा परिचय देत आहेत आणि शत्रुसेनेचे प्राण घेण्यास समर्थ आहेत, त्या रामरूपी यमराजाजवळ तुम्ही येथे आपले राज्यसुख आणि प्रिय प्राणांचा मोह सोडून एकाएकी जाता उपयोगी नाही. ॥१६-१७॥
अप्रमेयं हि तत्तेजो यस्य सा जनकात्मजा ।
न त्वं समर्थस्तां हर्तुं रामचापाश्रयां वने ॥ १८ ॥
जनककिशोरी सीता ज्यांची धर्मपत्‍नी आहे त्यांचे तेज अप्रमेय आहे. श्रीरामचंद्रांचे धनुष्य त्यांचा आश्रय आहे म्हणून तुमच्यात इतकी शक्ती नाही आहे की वनात तिचे अपहरण करू शकाल. ॥१८॥
तस्य वै नरसिंहस्य सिंहोरस्कस्य भामिनी ।
प्राणेभ्योऽपि प्रियतरा भार्या नित्यमनुव्रता ॥ १९ ॥
श्रीरामचंद्र मनुष्यांमध्ये सिंहासमान पराक्रमी आहेत. त्यांचे वक्षःस्थल सिंहासमान उन्नत आहे. भामिनी सीता त्यांची प्राणाहूनही अधिक प्रियतम पत्‍नी आहे. ती सदा आपल्या पतिचेच अनुसरण करीत असते. ॥१९॥
न सा धर्षयितुं शक्या मैथिल्योजस्विनः प्रिया ।
दीप्तस्येव हुताशस्य शिखा सीता सुमध्यमा ॥ २० ॥
मैथिली सीता ओजस्वी श्रीरामांची प्रिय पत्‍नी आहे. ती प्रज्वलित अग्निच्या ज्वाले समान असह्य आहे, म्हणून त्या सुंदर सीतेवर बलात्कार केला जाऊ शकत नाही. ॥२०॥
किमुद्यमं व्यर्थमिमं कृत्वा ते राक्षसाधिप ।
दृष्टश्चेत् त्वं रणे तेन तदन्तमुपजीवितम् ॥ २१ ॥
राक्षसराज ! हा व्यर्थ असलेला उद्योग करून तुम्हांला काय लाभ होणार आहे ? ज्या दिवशी युद्धात तुमच्यावर श्रीरामांची दृष्टी पडेल त्यादिवशी तुम्ही आपल्या जीवनाचा अंत (आहे असे) समजा. ॥२१॥
जीवितं च सुखं चैव राज्यं चैव सुदुर्लभम् ।
यदीच्छसि चिरं भोक्तुं मा कृथा रामविप्रियम् ॥ २२ ॥
जर तुम्ही आपल्या जीवनाचा, सुखाचा आणि परम दुर्लभ राज्याचा चिरकाळपर्यंत उपभोग घेऊ इच्छित असाल तर श्रीरामांचा अपराध करू नका. ॥२२॥
स सर्वैः सचिवैः सार्धं विभीषणपुरस्कृतैः ।
मन्त्रयित्वा स धर्मिष्ठैः कृत्वा निश्चयमात्मनः ।
दोषाणां च गुणानां च सम्प्रधार्य बलाबलम् ॥ २३ ॥

आत्मनश्च बलं ज्ञात्वा राघवस्य च तत्त्वतः ।
हितं हि तव निश्चित्य क्षमं त्वं कर्तुमर्हसि ॥ २४ ॥
तुम्ही विभिषण आदि सर्व धर्मात्मा मंत्र्यांच्या बरोबर सल्लामसलत करून आपल्या कर्तव्याचा निश्चय करा. आपल्या आणि श्रीरामांच्या दोष आणि गुण यांच्या बरोबर बलाबलावर उत्तम प्रकारे समजून घ्या नंतर काय करण्यामुळे तुमचे हित होईल याचा निश्चय करून जे उचित वाटेल तेच कार्य तुम्ही केले पाहिजे. ॥२३-२४॥
अहं तु मन्ये तव न क्षमं रणे
समागमं कोसलराजसूनुना ।
इदं हि भूयः शृणु वाक्यमुत्तमं
क्षमं च युक्तं च निशाचराधिप ॥ २५ ॥
निशाचर राज ! मी तर समजतो कि कोसल राजकुमार श्रीरामचंद्रांबरोबर तुम्ही युद्ध करणे उचित नाही आहे. आता परत माझी एक गोष्ट आणखी ऐका ती तुमच्या साठी फारच उत्तम , उचित आणि उपयुक्त सिद्ध होईल. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सदतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP