श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रयोविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मुनिना सह श्रीरामलक्ष्मणयोः सरयूगङ्गासङ्गमसमीपे पुण्याश्रमे नक्तं विश्रामः - विश्वामित्रांसहित श्रीराम आणि लक्ष्मणांचे शरयू-गंगा संगमाच्या समीप पुण्य आश्रमात रात्री विश्राम करणे -
प्रभातायां तु शर्वर्यां विश्वामित्रो महामुनिः ।
अभ्यभाषत काकुत्स्थौ शयानौ पर्णसंस्तरे ॥ १ ॥
रात्र संपून प्रभात झाल्यावर महामुनि विश्वामित्रांनी गवत आणि पानांच्या बिछान्यावर झोपलेल्या त्या दोन्ही काकुत्स्थवंशी राजकुमारांना म्हटले - ॥ १ ॥
कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम् ॥ २ ॥
"नरश्रेष्ठ रामा ! तुझ्यासारख्या पुत्राला प्राप्त करून महाराणी कौसल्या सुपुत्रजननी म्हटली जात आहे. हा पहा, प्रातःकालचा संध्यासमय होत आहे, उठा आणि प्रतिदिन केली जाणारी देवकार्यांची (आन्हिक इत्यादि) पूर्ति करा." ॥ २ ॥
तस्यर्षेः परमोदारं वचः श्रुत्वा नरोत्तमौ ।
स्नात्वा कृतोदकौ वीरौ जेपतुः परमं जपम् ॥ ३ ॥
महर्षिंचे हे परम उदार वचन ऐकून दोन्ही नरश्रेष्ठ वीरांनी स्नान करून देवतर्पण केले आणि नंतर ते परम उत्तम जपनीय मंत्र गायत्री जप करू लागले. ॥ ३ ॥
कृताह्निकौ महावीर्यौ विश्वामित्रं तपोधनम् ।
अभिवाद्यातिसंहृष्टौ गमनायाभितस्थतुः ॥ ४ ॥
नित्यकर्म समाप्त करून महापराक्रमी श्रीराम आणि लक्ष्मण अत्यंत प्रसन्न होऊन तपोधन विश्वामित्रांना प्रणाम करून पुढील प्रवासासाठी तयार झाले. ॥ ४ ॥
तौ प्रयान्तौ महावीर्यौ दिव्यां त्रिपथगां नदीम् ।
ददृशाते ततस्तत्र सरय्वाः सङ्‍गमे शुभे ॥ ५ ॥
जाता जाता महाबली राजकुमारांनी गंगा आणि शरयूच्या शुभ संगमावर पोहोचून तेथे दिव्य त्रिपथगा गंगा नदीचे दर्शन केले. ॥ ५ ॥
तत्राश्रमपदं पुण्यमृषीणां भावितात्मनाम् ।
बहुवर्षसहस्राणि तप्यतां परमं तपः ॥ ६ ॥
संगमाजवळच शुद्ध अंतःकरण असलेल्या महर्षिंचा एक पवित्र आश्रम होता, जेथे ते कित्येक हजार वर्षांपासून तीव्र तपस्या करीत होते. ॥ ६ ॥
तं दृष्ट्‍वा परमप्रीतौ राघवौ पुण्यमाश्रमम् ।
ऊचतुस्तं महात्मानं विश्वामित्रमिदं वचः ॥ ७ ॥
तो पवित्र आश्रम बघून रघुकुलरत्‍न श्रीराम आणि लक्ष्मण प्रसन्न झाले. ते महात्मा विश्वामित्रांना म्हणाले - ॥ ७ ॥
कस्यायमाश्रमः पुण्यः को न्वस्मिन् वसते पुमान् ।
भगवञ्छ्रोतुमिच्छावः परं कौतूहलं हि नौ ॥ ८ ॥
"भगवन् ! हा पवित्र आश्रम कुणाचा आहे ? आणि यात कोण पुरुष निवास करत आहेत ? हे आम्ही दोघे जाणू इच्छितो. यासाठी आमच्या मनात फार उत्कंठा आहे." ॥ ८ ॥
तयोस्तद् वचनं श्रुत्वा प्रहस्य मुनिपुङ्‍गवः ।
अब्रवीच्छ्रूयतां राम यस्यायं पूर्व आश्रमः ॥ ९ ॥
त्या दोघांचे हे वचन ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्र हसून म्हणाले, "राम ! हा आश्रम प्रथम ज्यांच्या अधिकारात होता त्यांचा परिचय करून देतो. ऐक. ॥ ९ ॥
कंदर्पो मूर्तिमानासीत् काम इत्युच्यते बुधैः ।
तपस्यन्तमिह स्थाणुं नियमेन समाहितम् ॥ १० ॥
'विद्वान् पुरुष ज्याला काम म्हणतात तो कन्दर्प पूर्वकाली मूर्तिमान होता, शरीर धारण करून विचरत होता. त्या दिवसात भगवान् स्थाणु (शिव) याच आश्रमात चित्ताला एकाग्र करून निश्चयपूर्वक तपस्या करीत होते. ॥ १० ॥
कृतोद्वाहं तु देवेशं गच्छन्तं समरुद्‍गणम् ।
धर्षयामास दुर्मेधा हुङ्‍कृतश्च महात्मना ॥ ११ ॥
'एक दिवस समाधीतून उठून देवेश्वर शिव मरुद्‌गणांबरोबर कोठेतरी जात होते. त्याच वेळी दुर्बुद्धी कामाने त्यांच्यावर आक्रमण केले. हे पाहून महात्मा शिवाने हुंकार करून त्यांना अडविले. ॥ ११ ॥
अवध्यातश्च रुद्रेण चक्षुषा रघुनन्दन ।
व्यशीर्यन्त शरीरात् स्वात् सर्वगात्राणि दुर्मतेः ॥ १२ ॥
'रघुनंदन ! भगवान रुद्राने रोषपूर्ण दृष्टीने अवहेलनापूर्वक त्याच्याकडे पाहिले, तेव्हां तर त्या दुर्बुद्धीची सारी अंगे त्याच्या शरीरापासून जीर्ण शीर्ण होऊन गळून पडली. ॥ १२ ॥
तत्र गात्रं हतं तस्य निर्दग्धस्य महात्मनः ।
अशरीरः कृतः कामः क्रोधाद् देवेश्वरेण हि ॥ १३ ॥
'तेथे दग्ध झालेल्या महामना कन्दर्पाचे शरीर नष्ट झाले. देवेश्वर रुद्राने आपल्या क्रोधाने कामाला अंगहीन करून टाकले. ॥ १३ ॥
अनङ्‍ग इति विख्यातस्तदाप्रभृति राघव ।
स चाङ्‍गविषयः श्रीमान् यत्राङ्‍गं स मुमोच ह ॥ १४ ॥
'रामा तेव्हांपासून तो 'अनंग' नामाने विख्यात झाला. शोभाशाली कन्दर्पाचे अंग जेथे गळून पडले होते तो प्रदेश अंगदेश नामाने विख्यात झाला. ॥ १४ ॥
तस्यायमाश्रमः पुण्यस्तस्येमे मुनयः पुरा ।
शिष्या धर्मपरा वीर तेषां पापं न विद्यते ॥ १५ ॥
हा त्याच महादेवांचा पुण्य आश्रम आहे. वीर ! हे मुनिलोक पूर्वकाली त्याच स्थाणुचे धर्मपरायण शिष्य होते. त्यांचे सर्व पाप नष्ट झलेले आहे. ॥ १५ ॥
इहाद्य रजनीं राम वसेम शुभदर्शन । पुण्ययोः सरितोर्मध्ये श्वस्तरिष्यामहे वयम् ॥ १६ ॥
'शुभदर्शन रामा ! आजच्या रात्री आपण या पुण्य सलिला सरितांच्यामध्ये निवास करूं. उद्या सकाळी यांना पार करून पुढे जाऊ. ॥ १६ ॥
अभिगच्छामहे सर्वे शुचयः पुण्यमाश्रमम् ।
इह वासः परोऽस्माकं सुखं वत्स्यामहे निशाम् ॥ १७ ॥

स्नाताश्च कृतजप्याश्च हुतहव्या नरोत्तम ।
'आपण सर्वजण पवित्र होऊन या पुण्य आश्रमात जाऊ या. येथे राहणे आपल्यासाठी फारच उत्तम होईल. नरश्रेष्ठ ! येथे स्नान करून जप आणि हवन केल्यानंतर आपण रात्री सुखाने राहू." ॥ १७ १/२ ॥
तेषां संवदतां तत्र तपोदीर्घेण चक्षुषा ॥ १८ ॥

विज्ञाय परमप्रीता मुनयो हर्षमागमन् ।
ते तिघे याप्रमाणे आपसात बोलत असतानाच त्या आश्रमांतील निवासी मुनिंनी तपस्येने प्राप्त झालेल्या दूरदृष्टीने यांचे आगमन जाणून ते मनातल्या मनात फार प्रसन्न झाले. त्यांच्या हृदयात हर्षजनित उल्हास भरला. ॥ १८ १/२ ॥
अर्घ्यं पाद्यं तथाऽऽतिथ्यं निवेद्य कुशिकात्मजे ॥ १९ ॥

रामलक्ष्मणयोः पश्चादकुर्वन्नतिथिक्रियाम् ।
त्यांनी विश्वामित्रांना अर्घ्य, पाद्य आणि अतिथि सत्काराची सामग्री अर्पित केल्यावर श्रीराम आणि लक्ष्मणांचे आतिथ्य केले. ॥ १९ १/२ ॥
सत्कारं समनुप्राप्य कथाभिरभिरञ्जयन् ॥ २० ॥

यथार्हमजपन् संध्यामृषयस्ते समाहिताः ।
यथोचित सत्कार करून त्या मुनींनी या अतिथींचे विविध प्रकारच्या कथा, वार्ता द्वारे मनोरंजन केले. नंतर त्यांनी एकाग्रचित्त होऊन यथावत संध्यावंदन आणि जप केला. ॥ २० १/२ ॥
तत्र वासिभिरानीता मुनिभिः सुव्रतैः सह ॥ २१ ॥

न्यवसन् सुसुखं तत्र कामाश्रमपदे तथा ।
तदनंतर तेथे राहणार्‍या मुनींनी अन्य उतम व्रतधारी मुनिंच्या सह विश्वामित्र आदिंना शयनासाठी उपयुक्त स्थानी पोहोंचविले. सर्व कामनांची पूर्ति करणार्‍या त्या पुण्य आश्रमात विश्वामित्र व राजकुमारांनी अत्यंत सुखपूर्वक निवास केला. ॥ २१ १/२ ॥
कथाभिरभिरामाभिरभिरामौ नृपात्मजौ ।
रमयामास धर्मात्मा कौशिको मुनिपुङ्‍गवः ॥ २२ ॥
धर्मात्मा मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी त्या मनोहर राजकुमारांचे सुंदर कथांच्या द्वारा मनोरंजन केले. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा तेविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP