[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ नवमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणस्य भवनं पुष्पकविमानं सुन्दरनिवेशनं चावलोक्य हनुमता तत्र सुप्तानां सहस्रशः सुन्दरीणां समवलोकनम् -
हनुमानांचे, रावणाचे श्रेष्ठ भुवन, पुष्पक विमान, तथा रावणाच्या राहाण्याची सुन्दर हवेली पाहून, त्यात झोपलेल्या हजारो सुन्दर स्त्रियांचे अवलोकन करणे -
तस्यालयवरिष्ठस्य मध्ये विपुलमायतम् ।
ददर्श भवनश्रेष्ठं हनुमान् मारुतात्मजः ॥ १ ॥

अर्द्धयोजनविस्तीर्णमायतं योजनं महत् ।
भवनं राक्षसेन्द्रस्य बहुप्रासादसङ्‌कुलम् ॥ २ ॥
लंकेत असलेल्या सर्वश्रेष्ठ गृहांच्या मध्यभागी पवनपुत्र हनुमानांनी एक उत्तम भुवन शोभत असलेले पाहिले. ते अत्यन्त निर्मळ आणि विस्तृत होते. त्याची लांबी एक योजन आणि रून्दी अर्ध योजन होती. राक्षसराज रावणाचे ते विशाल भुवन अनेक प्रासादांनी व्याप्त होते. ॥१-२॥
मार्गमाणस्तु वैदेहीं सीतामायतलोचनाम् ।
सर्वतः परिचक्राम हनुमानरिसूदनः ॥ ३ ॥
विशाललोचना विदेहनन्दिनी सीतेचा शोध करता करता शत्रुसूदन हनुमान त्या गृहात सर्वत्र फिरले. ॥३॥
उत्तमं राक्षसावासं हनुमानवलोकयन् ।
आससादाथ लक्ष्मीवान् राक्षसेन्द्रनिवेशनम् ॥ ४ ॥
तेव्हा फिरता फिरता राक्षसांचेच ज्यामध्ये वास्तव्य आहे अशी उत्तम घरे पहात हनुमान चालले असता शेवटी राक्षसाधिपती रावणाचे स्वतःचे निवासस्थान त्या भव्य हनुमानास आढळले. ॥४॥
चतुर्विषाणैर्द्विरदैस्त्रिविषाणैस्तथैव च ।
परिक्षिप्तमसम्बाधं रक्ष्यमाणमुदायुधैः ॥ ५ ॥
चार, तीन व दोन दात असलेले ह्त्ती जरी तेथे पुष्कळ होते तथापि त्या घरात गर्दी झालेली नव्हती आणि हातामध्ये आयुधे सज्ज असलेले अनेक राक्षस त्याचे रक्षण करीत होते. ॥५॥
राक्षसीभिश्च पत्‍नीभी रावणस्य निवेशनम् ।
आहृताभिश्च विक्रम्य राजकन्याभिरावृतम् ॥ ६ ॥
रावणाचा तो महाल त्याच्या राक्षसजातीय पत्‍नी आणि पराक्रमाने हरण करून आणलेल्या राजकन्यांनी भरून गेलेला होता. ॥६॥
तन्नक्रमकराकीर्णं तिमिंगिलझषाकुलम् ।
वायुवेगसमाधूतं पन्नगैरिव सागरम् ॥ ७ ॥
या प्रमाणे स्त्री पुरूषांनी गजबजून गेलेले ते गृह नक्र, मगर, तिमिंगळ व इतरही मत्स्यांनी परिपूर्ण आणि वायुवेगामुळे विक्षुब्ध झालेल्या आणि सर्पांनी आवृत्त महासागराप्रमाणे दिसत होते. ॥७॥
या हि वैश्रवणे लक्ष्मीर्या चन्द्रे हरिवाहने ।
सा रावणगृहे रमा नित्यमेवानपायिनी ॥ ८ ॥
जी लक्ष्मी, कुबेर, इन्द्र आणि गरूड यांच्या ठिकाणी निवास करते तीच लक्ष्मी अधिक सुरम्य रूपाने रावणाच्या घरात नित्य निश्चळ होऊन राहिली होती. ॥८॥
या च राज्ञः कुबेरस्य यमस्य वरुणस्य च ।
तादृशी तद्‌विशिष्टा वा ऋद्धी रक्षोगृहेष्विह ॥ ९ ॥
जी समृद्धि महाराज कुबेर, यम आणि वरूण यांच्या ठिकाणी दृष्टिगोचर होत होती, ती अथवा तिच्या पेक्षाही अधिक समृद्धि राक्षसांच्या घरात दिसून येत होती. ॥९॥
तस्य हर्म्यस्य मध्यस्थवेश्म चान्यत् सुनिर्मितम् ।
बहुनिर्यूहसंयुक्तं ददर्श पवनात्मजः ॥ १० ॥
त्या (एक योजन लांब आणि अर्धा योजन रून्द) महालाच्या मध्यभागी एक दुसरे भवन (पुष्पक विमान) होते. त्याची निर्मिती अत्यन्त सुन्दर रीतीने केलेली होती. ते भवन अनेक मत्त गजांनी युक्त होते. पवनपुत्र हनुमानांनी ते फिरून पाहिले. ॥१०॥
ब्रह्मणोऽर्थे कृतं दिव्यं दिवि यद् विश्वकर्मणा ।
विमानं पुष्पकं नाम सर्वरत्‍नविभूषितम् ॥ ११ ॥
ते सर्व प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित पुष्पक नामक दिव्य विमान स्वर्गलोकात विश्वकर्म्याने ब्रह्मदेवासाठी तयार केलेले होते. ते कुबेराने परम तपश्चर्या करून ब्रह्मदेवापासून (पितामहापासून) प्राप्त केले होते. ॥११॥
परेण तपसा लेभे यत् कुबेरः पितामहात् ।
कुबेरमोजसा जित्वा लेभे तद् राक्षसेश्वरः ॥ १२ ॥
नन्तर कुबेराला स्वतःच्या पराक्रमाने जिंकून राक्षसराज रावणाने ते प्राप्त करून घेतले होते. ॥१२॥
ईहामृगसमायुक्तैः कार्तस्वरहिरण्मयैः ।
सुकृतैराचितं स्तम्भैः प्रदीप्तमिव च श्रिया ॥ १३ ॥
लांडग्यांच्या मूर्तीनी युक्त सोन्या-चान्दीच्या सुन्दर स्तंभांनी ते युक्त होते आणि त्यामुळे ते भवन अद्‍भुत कान्तिने उद्‍दीप्त झाल्यासारखे वाटत होते. ॥१३॥
मेरुमन्दरसंकाशैरुल्लिखद्‌भिरिवाम्बरम् ।
कूटागारैः शुभागारैः सर्वतः समलंकृतम् ॥ १४ ॥
त्यात मेरूमन्दार तुल्य उंच अनेकानेक गुप्त गृह आणि मंगळ भुवने बनविली गेली होती, जी आपल्या उंचीमुळे आकाशात रेषा ओढली जावी त्याप्रमाणे वाटत होती आणि त्यांच्यामुळे ते विमान सर्व बाजूनी सुशोभित झालेले होते. ॥१४॥
ज्वलनार्कप्रतीकाशैः सुकृतं विश्वकर्मणा ।
हेमसोपानयुक्तं च चारुप्रवरवेदिकम् ॥ १५ ॥
त्याचा प्रकाश अग्नि आणि सूर्यासमान भासत होता. विश्वकर्म्याने अत्यन्त कौशल्याने त्याची निर्मिती केली होती. त्यात सोन्याच्या पायर्‍या आणि अत्यन्त उत्तम मनोहर वेदी बनविल्या गेल्या होत्या. ॥१५॥
जालवातायनैर्युक्तं काञ्चनैः स्फाटिकैरपि ।
इन्द्रनीलमहानीलमणिप्रवरवेदिकम् ॥ १६ ॥
त्यात सोने आणि स्फटिकाच्या खिडक्या आणि इन्द्रनीळ आणि महानीळ व इतरही श्रेष्ठ रत्‍नांच्या वेदिका निर्मित केल्या गेल्या होत्या. ॥१६॥
विद्रुमेण विचित्रेण मणिभिश्च महाधनैः ।
निस्तुलाभिश्च मुक्ताभिस्तलेनाभिविराजितम् ॥ १७ ॥
नाना प्रकारची पोवळी, महामूल्यवान्‌ रत्‍ने आणि निरूपम मोती यांनी तयार केलेल्या फरशीने ते विमान झळकत होते. ॥१७॥
चन्दनेन च रक्तेन तपनीयनिभेन च ।
सुपुण्यगन्धिना युक्तमादित्यतरुणोपमम् ॥ १८ ॥
आरक्तवर्ण आणि सुवर्णवर्ण या अत्यन्त सुगन्धी चन्दनाने संयुक्त झाल्यामुळे ते बाल सूर्याप्रमाणे भासत होते. ॥१८॥
कूटागारैर्वराकारैर्विविधैः समलंकृतम् ।
विमानं पुष्पकं दिव्यं आरुरोह महाकपिः ।
तत्रस्थः सर्वतो गन्धं पानभक्ष्यान्नसम्भवम् ॥ १९ ॥

दिव्यं सम्मूर्च्छितं जिघ्रन् रूपवन्तमिवानिलम् ।
नाना प्रकारच्या कूटागारांनी (अट्‍टालिकांनी) अलंकृत अशा त्या सुन्दर दिव्य पुष्पक विमानावर महाकपि हनुमान आरूढ झाले. या प्रमाणे हनुमान त्या विमानात जाऊन बसले असता सर्वत्र व्याप्त असलेल्या पेय, भक्ष्य आणि अन्न पदार्थांच्या दिव्य गन्धास हुंगू लागले. तो गन्ध म्हणजे मूर्तीमान वायूच की काय असा प्रतीत होत होता. ॥१९ १/२॥
स गन्धस्तं महासत्त्वं बन्धुर्बन्धुमिवोत्तमम् ॥ २० ॥

इत एहीत्युवाचेव तत्र यत्र स रावणः ।
ज्याप्रमाणे एखादा बन्धु आपल्या दुसर्‍या श्रेष्ठ बन्धुला (हाक मारून) आपल्याजवळ बोलावीत असतो, त्याप्रमाणे तो सुगन्ध त्या महावीर्यवान हनुमन्तांना इकडे ये म्हणून जिकडे रावण होता तिकडे येण्यासाठी जणु काही हाक मारू लागला (कारण त्या दिव्य सुगन्धामुळे रावणाचे शयनगृह येथेच जवळ कोठेतरी असावे असा अन्दाज हनुमन्तास करता आला). ॥२० १/२॥
ततस्तां प्रस्थितः शालां ददर्श महतीं शुभाम् ॥ २१ ॥

रावणस्य महाकान्तां कान्तामिव वरस्त्रियम् ।
त्यानन्तर हनुमान त्या बाजूस पुढे गेले असता त्यास एक अत्यन्त विस्तीर्ण दिवाणखाणा दिसला. तो फारच सुन्दर आणि सुखद होता. ज्याप्रमाणे कान्तीमयी सुन्दर पत्‍नी पतीला अधिक प्रिय असते त्याप्रमाणे तो दिवाणखाना रावणाला फारच प्रिय होती. ॥२१ १/२॥
मणिसोपानविकृतां हेमजालविराजिताम् ॥ २२ ॥

स्फाटिकैरावृततलां दन्तान्तरितरूपिकाम् ।
मुक्तावज्रप्रवालैश्च रूप्यचामीकरैरपि ॥ २३ ॥
त्या हवेलीत मणिसोपान रत्‍नांच्या पायर्‍या बनविलेल्या होत्या आणि सुवर्णाच्या खिडक्यांनी तिची शोभा वाढलेली होती. तिच्यातील फरशी स्फटिक मण्याची बनविलेली ओती आणि मध्ये मध्ये हस्तिदन्ताच्या योगे विभिन्न प्रकारच्या आकृती बनविलेल्या होत्या. मोती, हिरे, पोवळी, चान्दी आणि सोन्याच्या द्वारे त्या हवेलीत अनेक प्रकारचे आकार अंकित केले होते. ॥२२-२३॥
विभूषितां मणिस्तम्भैः सुबहुस्तम्भभूषिताम् ।
समैर्ऋजुभिरत्युच्चैः समन्तात् सुविभूषितैः ॥ २४ ॥
मण्यांनी, रत्‍नांनी बनविलेल्या अनेक स्तंभांनी ती सुशोभित झाली होती. ते स्तंभ समान, सरळ, खूपच उंच आणि सर्व बाजूनी सजविलेले होते, अलङ्‌काराप्रमाणे ते त्या हवेलीची शोभा वृद्धिंगत करीत होते. ॥२४॥
स्तम्भैः पक्षैरिवात्युच्चैर्दिवं सम्प्रस्थितामिव ।
महत्या कुथयाऽऽस्तीर्णां पृथिवीलक्षणाङ्‌कया ॥ २५ ॥
आपल्या अत्यन्त उंच स्तंभरूपी पंखांनी ती हवेली जणु काय आकाशात उडत आहे की काय असे भासत होते. तिच्यात पृथ्वी, वन-पर्वत आदि चिह्नांनी अंकित एक अत्यन्त मोठा गालिचाही पसरलेला होता. ॥२५॥
पृथिवीमिव विस्तीर्णां सराष्ट्रगृहशालिनीम् ।
नादितां मत्तविहगैर्दिव्यगन्धाधिवासिताम् ॥ २६ ॥
राष्ट्र आणि गृह आदिच्या चित्रांनी सुशोभित ती शाळा पृथ्वीप्रमाणे विस्तीर्ण भासत होती. तेथे मत्त विहंगांचे कलरव गुञ्जत रहात होते आणि दिव्य सुगन्धाने ती सुवासित झालेली होती. ॥२६॥
परार्घ्यास्तरणोपेतां रक्षोऽधिपनिषेविताम् ।
धूम्रामगुरुधूपेन विमलां हंसपाण्डुराम् ॥ २७ ॥
त्या हवेलीत बहुमूल्य बिछाने पसरलेले होते आणि स्वयं राक्षसराज रावण तिच्यामध्ये निवास करीत होता. ती अगुरू नामक धूपाच्या धुरामुळे धूसर भासत होती, परन्तु वास्तविक हंसाप्रमाणे श्वेत आणि निर्मळ होती. ॥२७॥
पत्रपुष्पोपहारेण कल्माषीमिव सुप्रभाम् ।
मनसो मोदजननीं वर्णस्यापि प्रसाधिनीम् ॥ २८ ॥
चित्र-विचित्र पुष्पोपहारामुळे ती शाळा कबर्‍या-शबल रंगाची भासत होती, अथवा वसिष्ठ मुनींच्या शबला गाईप्रमाणे संपूर्ण कामना पूर्ण करणारी भासत होती. तिची कान्ति अत्यन्त सुन्दर होती आणि ती मनाला आनन्द देणारी आणि शोभेलाही सुशोभित करणारी होती. ॥२८॥
तां शोकनाशिनीं दिव्यां श्रियः सञ्जननीमिव ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थैस्तु पञ्च पञ्चभिरुत्तमैः ॥ २९ ॥

तर्पयामास मातेव तदा रावणपालिता ।
ती दिव्य शाळा शोकाचा नाश करणारी तथा संपत्तिची जननीच अशी भासत होती. हनुमन्तानी ती पाहिली. त्या रावणपालित शाळेने (हवेलीने) त्या समयी मातेप्रमाणे शब्द, स्पर्श आदि पाच विषयांनी हनुमानाच्या नेत्र आदि पांच ही इन्द्रियांना तृप्त केले. ॥२९ १/२॥
स्वर्गोऽयं देवलोकोऽयमिन्द्रस्यापि पुरी भवेत् ।
सिद्धिर्वेयं परा हि स्यादित्यमन्यत मारुतिः ॥ ३० ॥
ती पाहून हा स्वर्गलोक आहे कि देवलोक आहे कि इन्द्रपुरी (अमरावती) आहे कि हा ब्रह्मलोक आहे कि परमसिद्धि आहे असे विविध तर्क हनुमान करू लागले. ॥३०॥
प्रध्यायत इवापश्यत् प्रदीपांस्तत्र काञ्चनान् ।
धूर्तानिव महाधूर्तैर्देवनेन पराजितान् ॥ ३१ ॥
नन्तर त्या शाळेत असलेले सुवर्णमय दीप एकसारखे जळत असलेले हनुमानांनी पाहिले. अट्‍टल जुगार्‍याने, जुगारात हरविल्यानन्तर ते (हरलेले) लहान जुगारी धननाशाच्या चिन्तेने जसे विचारात (ध्यानात) गढलेले दिसतात तसे ते दीप भासत होते. ॥३१॥
दीपानां च प्रकाशेन तेजसा रावणस्य च ।
अर्चिर्भिर्भूषणानां च प्रदीप्तेत्यभ्यमन्यत ॥ ३२ ॥
दीपांचा प्रकाश, रावणाचे तेज आणि आभूषणांची प्रभा या योगे ती हवेली जणु प्रज्वलित असल्यासारखी त्यांना दिसली. ॥३२॥
ततोऽपश्यत् कुथासीनं नानावर्णाम्बरस्रजम् ।
सहस्रं वरनारीणां नानावेषविभूषितम् ॥ ३३ ॥
त्यानन्तर हनुमानानी त्या गालिच्यावर बसलेल्या हजारो सुन्दर स्त्रियांना पाहिले. त्यांनी रंगबेरंगी वस्त्रे आणि पुष्पमाळा धारण केल्या होत्या आणि अनेक प्रकारच्या वेषभूषांनी त्या विभूषित झाल्या होत्या. ॥३३॥
परिवृत्तेऽर्धरात्रे तु पाननिद्रावशंगतम् ।
क्रीडित्वोपरतं रात्रौ सुष्वाप बलवत् तदा ॥ ३४ ॥
अर्धी रात्र उलटून गेल्यावर, त्या क्रीडे पासून उपरत होऊन मधुपानाच्या मदाने आणि निद्रेला वश होऊन त्या समयी गाढ झोपी गेल्या होत्या. ॥३४॥
तत् प्रसुप्तं विरुरुचे निःशब्दान्तरभूषितम् ।
निःशब्दहंसभ्रमरं यथा पद्मवनं महत् ॥ ३५ ॥
त्या हजार स्त्रियांना गाढ झोप लागली असल्यामुळे त्यांच्या कटिभागावरील कमर पट्‍यान्तील घुगरांचा जराही आवाज येत नव्हता. त्या निःशब्द होत्या. त्यामुळे हंसांचा कलरव अथवा भ्रमरांचा गुञ्जारव नसलेल्या निःशब्द अशा विशाल कमळ वनांप्रमाणे त्या सुप्त सुन्दरीचा समुदाय शोभत होता. ॥३५॥
तासां संवृतदान्तानि मीलिताक्षीणि मारुतिः ।
अपश्यत् पद्मगन्धीनि वदनानि सुयोषिताम् ॥ ३६ ॥
ज्यांच्या मुखान्तून कमळांसारखा सुगन्ध येत होता अशा त्या सुन्दर युवतींच्या मुखाकडे पवनकुमार हनुमानांनी पाहिले. त्यांचे दात झाकले गेलेले होते आणि डोळे बन्द झालेले होते. ॥३६॥
प्रबुद्धानीव पद्मानि तासां भूत्वा क्षपाक्षये ।
पुनः संवृतपत्राणि रात्राविव बभुस्तदा ॥ ३७ ॥
ज्या स्त्रियांची मुखे रात्र (संपल्यावर) कमला प्रमाणे विकसित होऊन हर्षाने प्रफुल्लित दिसत असत, ती परत रात्र आल्यावर झोपी गेल्यामुळे पाकळ्या मिटलेल्या कमळाप्रमाणे शोभून दिसत होत्या. ॥३७॥
इमानि मुखपद्मानि नियतं मत्तषट्पदाः ।
अम्बुजानीव फुल्लानि प्रार्थयन्ति पुनः पुनः ॥ ३८ ॥

इति वामन्यत श्रीमानुपपत्त्या महाकपिः ।
मेने हि गुणतस्तानि समानि सलिलोद्‌भवैः ॥ ३९ ॥
त्यांना पाहून श्रीमान महाकपि हनुमान अशी संभावना करुं लागले की उन्मत्त भ्रमर प्रफुल्ल कमळाप्रमाणे असणार्‍या यांच्या मुखारविन्दांच्या प्राप्तीसाठी नित्य वारंवार प्रार्थना करीत असतील, त्यावर स्थान मिळविण्यासाठी व्याकुळ होत असतील, कारण गुणांच्या दृष्टीने ते यांच्या मुखारविन्दांना पाण्यान्तून उत्पन्न होणार्‍या कमलांप्रमाणेच समजत होते. ॥३८-३९॥
सा तस्य शुशुभे शाला ताभिः स्त्रीभिर्विराजिता ।
शारदीव प्रसन्ना द्यौस्ताराभिरभिशोभिता ॥ ४० ॥
ज्याप्रमाणे शरद-ऋतूमध्ये निर्मळ आकाश तारकांनी प्रकाशित आणि सुशोभित होते, त्याप्रमाणे रावणाची हवेली त्या स्त्रियांच्या योगे प्रकाशित होऊन शोभत होती. ॥४०॥
स च ताभिः परिवृतः शुशुभे राक्षसाधिपः ।
यथा ह्युडुपतिः श्रीमांस्ताराभिरिव संवृतः ॥ ४१ ॥
त्या स्त्रियांनी वेढलेला राक्षसराज रावण तारकांनी वेढलेल्या कान्तिमान नक्षत्रपति चन्द्रम्याप्रमाणे शोभत होता. ॥४१॥
याश्च्यवन्तेऽम्बरात् ताराः पुण्यशेषसमावृताः ।
इमास्ताः सङ्‌गताः कृत्स्ना इति मेने हरिस्तदा ॥ ४२ ॥
त्या समयी हनुमन्तास असे वाटले की आकाशान्तून (स्वर्गान्तून) भोगावशिष्ट पुण्यासहित ज्या तारका खाली पडतात त्याच जणु काय सर्वच्या सर्व या सुन्दरींच्या रूपाने एकत्रित झाल्या आहेत की काय ? ॥४२॥
ताराणामिव सुव्यक्तं महतीनां शुभार्चिषाम् ।
प्रभावर्णप्रसादाश्च विरेजुस्तत्र योषिताम् ॥ ४३ ॥
(या श्लोकात अत्युक्ति अलङ्‌कार आहे) तेथे त्या युवतींचे तेज, वर्ण आणि (प्रसाद) प्रसन्नता स्पष्टपणे सुन्दर प्रभासंपन्न महान तारकाप्रमाणेच सुशोभित दिसत होती. ॥४३॥
व्यावृत्तकचपीनस्रक्प्रकीर्णवरभूषणाः ।
पानव्यायामकालेषु निद्रापहतचेतसः ॥ ४४ ॥
मधुपानानन्तर व्यायामा (नृत्य, गान, क्रीडा आदि) च्या वेळी ज्यांचे केस सुटून विखुरलेले होते, पुष्पमाळा चुरगळून छिन्न-भिन्न झाल्या होत्या आणि सुन्दर आभूषणेही सैल पडून इकडे तिकडे विखुरळी होती त्या सर्व सुन्दर स्त्रिया झोपेमुळे जणु अचेत होऊन तेथे निद्राधीन झाल्या होत्या. ॥४४॥
व्यावृत्ततिलकाः काश्चित् काश्चिदुद्‌भ्रान्तनूपुराः ।
पार्श्वे गलितहाराश्च काश्चित् परमयोषितः ॥ ४५ ॥
काहींच्या कपाळावरील, मस्तकावरील सिन्दूर-कस्तूरी, कुंकू आदिचे तिळक पुसले गेले होते (विस्कटले गेले होते). तर काहींच्या पायान्तीळ नुपूर पायान्तून निघून दूर कुठे तरी पडले होते तर काही सुन्दर युवतींचे हार तुटून तेथेच त्यांच्या शेजारी आस-पास पडले होते. ॥४५॥
मुक्ताहारावृताश्चान्याः काश्चित् प्रस्रस्तवाससः ।
व्याविद्धरशनादामाः किशोर्य इव वाहिताः ॥ ४६ ॥
काही स्त्रियांचे मोत्यांचे हार तुटल्याने त्यां मोत्यांनी आवृत्त झाल्या होत्या, काहींची वस्त्रे सुटली होती आणि काहींच्या कमरपट्‍यातील लडी तुटून गेल्या होत्या. त्यामुळे भार वाहून थकलेल्या लहान घोडीच्या प्रमाणे त्या दिसत होत्या. ॥४६॥
अकुण्डलधराश्चान्या विच्छिन्नमृदितस्रजः ।
गजेन्द्रमृदिताः फुल्ला लता इव महावने ॥ ४७ ॥
काहींच्या कानान्तील कुंडले जाग्यावर नव्हती, काहींच्या पुष्पमाळा चुरगळून तुटून गेल्या होत्या त्यामुळे त्या स्त्रिया गजेन्द्रांनी तुडविलेल्या महावनातील प्रफुल्लित लतांप्रमाणे दिसत होत्या. ॥४७॥
चन्द्रांशुकिरणाभाश्च हाराः कासांचिदुद्‌गताः ।
हंसा इव बभुः सुप्ताः स्तनमध्येषु योषिताम् ॥ ४८ ॥
काहींचे, चन्द्र सूर्यांच्या लहान मोठ्‍या किरणा प्रमाणे ज्यांचे तेज होते, असे हार त्यांच्या वक्षःस्थलावर पडून वर उचलले गेल्याने त्या युवतींच्या स्तनमण्डलामध्ये निद्रिस्त हंसाप्रमाणे शोभत होते. ॥४८॥
अपरासां च वैदूर्याः कादम्बा इव पक्षिणः ।
हेमसूत्राणि चान्यासां चक्रवाका इवाभवन् ॥ ४९ ॥
दुसर्‍या स्त्रियांच्या स्तनांच्या मध्ये आलेल्या वैडूर्यरत्‍नांच्या माळा कादंब नामक पक्ष्यांप्रमाणे शोभत होत्या. (कादंब- बदक अथवा जळकाक) तर अन्य स्त्रियांच्या उरोजांवर जे सोन्याचे हार होते ते चक्रवाक नामक पक्ष्याप्रमाणे भासत होते. ॥४९॥
हंसकारण्डवोपेताश्चक्रवाकोपशोभिताः ।
आपगा इव ता रेजुर्जघनैः पुलिनैरिव ॥ ५० ॥
या प्रकारे त्या स्त्रिया हंस, कारण्डव आणि चक्रवाक पक्ष्यांनी सुशोभित नद्यांप्रमाणे शोभत होत्या. त्यांचे जंघप्रदेश त्या नद्यांच्या तटांच्या प्रमाणे भासत होते. ॥५०॥
किङ्‌किणीजालसङ्‌काशास्ता हेमविपुलाम्बुजाः ।
भावग्राहा यशस्तीराः सुप्ता नद्य इवाबभुः ॥ ५१ ॥
त्या झोपलेल्या सुन्दर स्त्रिया तेथे नद्यांच्या प्रमाणे शोभत होत्या. घागर्‍या, घुगुरूंचे समूह त्यांच्या ठिकाणी मुकुळाप्रमाणे शोभत होते. सोन्याचे विविध अलङ्‌कार तेथे बहुसंख्य सुवर्णकमळांप्रमाणे सुशोभित दिसत होते आणि भाव (स्वप्नावस्थेमध्येच वासना वश होणार्‍या शृगांर चेष्टा) च जणु ग्राह होते आणि यश (कान्ती) च तटाप्रमाणे भासत होते. ॥५१॥
मृदुष्वङ्‌गेषु कासांचित् कुचाग्रेषु च संस्थिताः ।
बभूवुर्भूषणानीव शुभा भूषणराजयः ॥ ५२ ॥
काही सुन्दर स्त्रियांच्या कोमल अंगावर तथा स्तनांच्या अग्रभागावर सुवर्ण अलङ्‌कारामुळे उठलेले ओरखडे नवीन दागिन्याप्रमाणे शोभत होते. ॥५२॥
अंशुकान्ताश्च कासांचिन्मुखमारुतकम्पिताः ।
उपर्युपरि वक्त्राणां व्याधूयन्ते पुनः पुनः ॥ ५३ ॥
काहींच्या मुखावर पडलेले त्यांच्या साड्‍यांचे पदर त्यांच्या नासिकान्तून निघणार्‍या श्वासामुळे कंपित होऊन वारंवार हलत होते. ॥५३॥
ताः पताका इवोद्धूताः पत्‍नीनां रुचिरप्रभाः ।
ननावर्णसुवर्णानां वक्त्रमूलेषु रेजिरे ॥ ५४ ॥
नाना प्रकारच्या सुन्दर रूप आणि वर्णाच्या त्या रावणाच्या पत्‍नींच्या मुखावर हलणारे त्यांचे ते पदर सुन्दर कान्तीयुक्त फडफडणार्‍या पताकांप्रमाणे शोभत होते. ॥५४॥
ववल्गुश्चात्र कासांचित् कुण्डलानि शुभार्चिषाम् ।
मुखमारुतसंकम्पैर्मन्दं मन्दं सुयोषिताम् ॥ ५५ ॥
तेथे काही काही सुन्दर कान्तीमती कामिनींच्या कानान्तील कुण्डले त्यांच्या निश्वासाजनित वायुने मन्द मन्द हलत होती. ॥५५॥
शर्करासवगन्धः स प्रकृत्या सुरभिः सुखः ।
तासां वदननिःश्वासः सिषेवे रावणं तदा ॥ ५६ ॥
त्या सुन्दर स्त्रियांच्या मुखान्तून निघणारा स्वाभाविक सुगन्धित श्वासवायु शर्करामिश्रित आसवाच्या मनोहर गन्धाने युक्त होऊन आणखीच सुखद बनून त्या समयी रावणाची सेवा करीत होता. ॥५६॥
रावणाननशङ्‌काश्च काश्चिद् रावणयोषितः ।
मुखानि स्म सपत्‍नीनामुपाजिघ्रन् पुनः पुनः ॥ ५७ ॥
रावणाच्या कित्येक तरूण भार्या (स्त्रिया) रावणाचेच मुख समजून वारंवार आपल्या सवतींचे मुख हुंगत होत्या. ॥५७॥
अत्यर्थं सक्तमनसो रावणे ता वरस्त्रियः ।
अस्वतन्त्राः सपत्‍नीनां प्रियमेवाचरंस्तदा ॥ ५८ ॥
त्या सुन्दर स्त्रियांचे मन रावणाच्या ठिकाणी अत्यन्त आसक्त होते म्हणून आसक्ती आणि मदिरेच्या मदाने परवश होऊन त्या समयी रावणाच्या मुखाच्या भ्रमाने त्या आपल्या सवतींचे मुख हुंगून तिचेच प्रिय करीत होत्या. (अर्थात त्याही त्यावेळी आपल्या मुखाशी संलग्न झालेल्या त्या सवतींच्या मुखांना रावणाचेच मुख समजून हुंगण्याचे सुख भोगत होत्या.) ॥५८॥
बाहूनुपनिधायान्याः पारिहार्यविभूषितान् ।
अंशुकानि च रम्याणि प्रमदास्तत्र शिश्यिरे ॥ ५९ ॥
अन्य मदाने मत्त झालेल्या युवती आपल्याच वलयविभूषित भुजांचाच तक्क्या करून तथा कोणी कोणी डोक्याखाली आपली सुरम्य वस्त्रेंच घेऊन तेथे झोपी गेल्या होत्या. ॥५९॥
अन्या वक्षसि चान्यस्यास्तस्याः काश्चित् पुनर्भुजम् ।
अपरा त्वङ्‌कमन्यस्यास्तस्याश्चाप्यपरा कुचौ ॥ ६० ॥
कुणी एखादी स्त्री दुसरीच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती, तर दुसरी तिच्याच एखाद्या हाताचा तक्क्या बनवून त्यावर डोके ठेवून झोपली होती. याच प्रकारे दुसरी एखादी कुणा स्त्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपली होती तर दुसरी कोणी तिच्याच कुंचाचा (स्तनांचा) तक्क्या करून झोपी गेली होती. ॥६०॥
ऊरुपार्श्वकटीपृष्ठमन्योन्यस्य समाश्रिताः ।
परस्परनिविष्टाङ्‌ग्यो मदस्नेहवशानुगाः ॥ ६१ ॥
याप्रमाणे रावणाविषयीचा स्नेह आणि मदिराजनित मद यास वश होऊन त्या सुन्दर स्त्रिया एक दुसरीच्या मांड्‍या, पार्श्वभाग कटिप्रदेश तथा पृष्ठभाग यांचा आधार घेऊन एकमेकींच्या अंगास अंग भिडवून तेथे बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. ॥६१॥
अन्योन्यस्यांगसंस्पर्शात् प्रीयमाणाः सुमध्यमाः ।
एकीकृतभुजाः सर्वाः सुषुपुस्तत्र योषितः ॥ ६२ ॥
त्या सुन्दर कटिप्रदेश असलेल्या समस्त युवती एक दुसरीच्या अंग स्पर्शास, प्रियतमाचा स्पर्श मानून त्यायोगे मनातल्या मनात आनन्दाचा अनुभव घेत घेत हातास मिळवून झोपी गेल्या होत्या. ॥६२॥
अन्योन्यभुजसूत्रेण स्त्रीमाला ग्रथिता हि सा ।
मालेव ग्रथिता सूत्रे शुशुभे मत्तषट्पदा ॥ ६३॥
एक दुसरीच्या बाहुरूपी सूत्रात गुंफलेली त्या काळे काळे केस असणार्‍या स्त्रियांची ती माळा, सुतात ओवल्या गेलेल्या मतवाल्या भ्रमरांनी युक्त पुष्पमाळे प्रमाणे शोभत होती. ॥६३॥
लतानां माधवे मासि फुल्लानां वायुसेवनात् ।
अन्योन्यमालाग्रथितं संसक्तकुसुमोच्चयम् ॥ ६४ ॥

प्रतिवेष्टितसुस्कन्धमन्योन्यभ्रमराकुलम् ।
आसीद् वनमिवोद्धूतं स्त्रीवनं रावणस्य तत् ॥ ६५ ॥
माधव मासात (वैशाख महिन्यात, वसन्त ऋतूत) मलयानिलाच्या सेवनाने, फुललेल्या लतांचे वन जसे कंपित होत राहाते, त्याप्रमाणे रावणाच्या स्त्रियांचा तो समुदाय निःश्वास वायुच्या वहाण्याने, पदरांच्या हलण्यामुळे कंपित होत आहे असा भासत होता. ज्याप्रमाणे लता परस्परात गुंफल्यामुळे माळेप्रमाणे आबद्ध होतात, त्यांच्या सुन्दर शाखा परस्परास चिकटतात आणि त्यामुळे त्यांचे फुलांचे गुच्छही आपसात मिसळल्या सारखे प्रतीत होतात आणि त्यांच्यावर बसलेले भ्रमरही एकमेकास भिडतात, त्याप्रमाणे त्या सुन्दर युवती एकसरीस भिडल्यामुळे माळेप्रमाणे एकत्र गुंफल्या गेल्या होत्या. त्यांच्या भुजा आणि खान्दे परस्परास भिडले होते. त्यांच्या वेण्यांमध्ये गुंफलेली फुलेही आपसात मिसळली होती आणि त्या सर्वांचे केशकलापही एकान्त एक गुंफले गेले होते. ॥६४-६५॥
उचितेष्वपि सुव्यक्तं न तासां योषितां तदा ।
विवेकः शक्य आधातुं भूषणांगाम्बरस्रजाम् ॥ ६६ ॥
जरी त्या युवतींची वस्त्रे, अंग आभूषण आणि हार उचित स्थानांवरच प्रतिष्ठित होते, तरीही ही गोष्ट स्पष्ट दिसून येत होती कि त्या सर्वांच्या परस्परात गुन्तले जाण्यामुळे कोठले वस्त्र, आभूषण, अंग आणि हार इत्यादि कोणाचे आहेत याचा विवेक करणे असंभव झाले होते (*+). ॥६६॥
(*+ येथे भ्रान्तिमान नामक अलङ्‌कार आहे)
रावणे सुखसंविष्टे ताः स्त्रियो विविधप्रभाः ।
ज्वलन्तः काञ्चना दीपाः प्रेक्षन्तो निमिषा इव ॥ ६७ ॥
रावण सुखपूर्वक निद्राधीन झाल्यावर तेथे जळत असणारे सुवर्णमय दीप त्या अनेक प्रकारच्या कान्तीमान कामिनींना जणु काय एकटक पहात राहिले होते. ॥६७॥
राजर्षिपितृदैत्यानां गन्धर्वाणां च योषितः ।
राक्षसां चाभवन् कन्यास्तस्य कामवशंगताः ॥ ६८ ॥
राजर्षी, ब्रह्मर्षी, दैत्य, गन्धर्व तसेच राक्षसांच्या कन्या कामाला वशीभूत होऊन रावणाच्या (पत्‍नी) भार्या बनल्या होत्या. ॥६८॥
युद्धकामेन ताः सर्वा रावणेन हृताः स्त्रियः ।
समदा मदनेनैव मोहिताः काश्चिदागताः ॥ ६९ ॥
काही स्त्रियांचे रावणाने युद्धात त्याच्या इच्छेने अपहरण केले होते आणि काही इतर मदमत्त रमणी कामदेवाने मोहित होऊन स्वतःच त्याच्या (रावणाच्या) सेवेत उपस्थित झाल्या होत्या. ॥६९॥
न तत्र काश्चित् प्रमदाः प्रसह्य
वीर्योपपन्नेन गुणेन लब्धाः ।
न चान्यकामापि न चान्यपूर्वा
विना वरार्हां जनकात्मजां तु ॥ ७० ॥
तेथे अशा कुणीही स्त्रिया नव्हत्या की ज्यांना बळ आणि पराक्रमाने संपन्न असूनही रावणाने त्यांच्या इच्छेविरूद्ध बलात त्यांचे हरण केले होते. त्या सर्वच्या सर्व त्यास त्याच्या स्वतःच्या अलौकिक गुणांमुळेच उपलब्ध झाल्या होत्या. जी श्रेष्ठतम श्रीरामचन्द्रांनाच योग्य होती त्या जनककिशोरी सीतेखेरिज दुसरी अशी कुणीही स्त्री तेथे नव्हती की जी रावणाशिवाय इतर दुसर्‍या कोणाची इच्छा करणारी होती अथवा जिचा पहिल्याने दुसरा कुणी पति होता. ॥७०॥
न चाकुलीना न च हीनरूपा
नादक्षिणा नानुपचारयुक्ता ।
भार्याभवत् तस्य न हीनसत्त्वा
न चापि कान्तस्य न कामनीया ॥ ७१ ॥
रावणाची एकही भार्या अशी नव्हती की जी उत्तम कुळात उत्पन्न झालेली नव्हती, जी कुरूप, अनुदात्य आणि कौशल्य रहित अथवा उत्तम वस्त्रे भूषणे तसेच माळा इत्यादिनी वंचित, शक्तीहीन तथा प्रियतमास अप्रिय होती. (अर्थात सर्वच कुलीन, रूपसंपन्न इत्यादि होत्या) ॥७१॥
बभूव बुद्धिस्तु हरीश्वरस्य
यदीदृशी राघवधर्मपत्‍नी ।
इमा महाराक्षसराजभार्याः
सुजातमस्येति हि साधुबुद्धेः ॥ ७२ ॥
त्यावेळी श्रेष्ठ बुद्धिमान वानरराज हनुमन्ताच्या मनान्त असा विचार उत्पन्न झाला की या महान राक्षसराज रावणाच्या भार्या ज्याप्रमाणे आपल्या पतिच्या बरोबर सुखात राहात आहेत, त्याप्रमाणेच जर रघुनाथाची धर्मपत्‍नी सीताही त्यांच्या प्रमाणेच आपल्या पतिसह राहून सुखाचा अनुभव घेईल अर्थात जर रावणाने तिला शीघ्र श्रीरामचन्द्रांच्या सेवेत समर्पित केले असते, तर ते त्याच्यासाठी परम मंगलकारी ठरले असते. ॥७२॥
पुनश्च सोऽचिन्तयदात्तरूपो
ध्रुवं विशिष्टा गुणतो हि सीता ।
अथायमस्यां कृतवान् महात्मा
लङ्‌केश्वरः कष्टमनार्यकर्म ॥ ७३ ॥
नन्तर परत त्यांनी विचार केला की सीता ही निश्चितच गुणांच्या दृष्टीने या सर्वांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. या महाबलवान लङ्‌कापतिने मायामय रूप धारण करून सीतेला धोका देऊन तिच्या बाबतीत हे अपहरणरूप महान कष्टप्रद नीच कर्म केले आहे. ॥७३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा नववा सर्ग पूरा झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP