[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकोनत्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतया श्रीरामं प्रति तेन सहात्मनो वनगमनौचित्यस्य प्रतिपादनम् - सीतेचे रामा समक्ष त्यांच्या बरोबर आपल्या वनगमनाचे औचित्य दाखविणे -
एतत् तु वचनं श्रुत्वा सीता रामस्य दुःखिता ।
प्रसक्ताश्रुमुखी मन्दमिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीरामांचे हे बोलणे ऐकून सीतेला फार दुःख झाले. तिच्या मुखावरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ती हळू हळू असे म्हणाली - ॥१॥
ये त्वया कीर्तिता दोषा वने वस्तव्यतां प्रति ।
गुणानित्येव तान् विद्धि तव स्नेहपुरस्कृता ॥ २ ॥
'प्राणनाथ ! आपण वनांत राहण्याचे जे दोष वर्णन केले आहेत ते सर्व मला आपला स्नेह मिळाल्याने माझ्यासाठी गुणरूप होऊन जातील. ही गोष्ट आपण नीट समजून घ्यावी. ॥२॥
मृगाः सिंहा गजाश्चैव शार्दूलाः शरभास्तथा ।
पक्षिणः सृमराश्चैव ये चान्ये वनचारिणः ॥ ३ ॥

अदृष्टपूर्वरूपत्वात् सर्वे ते तव राघव ।
रूपं दृष्ट्‍वापसर्पेयुस्तव सर्वे हि बिभ्यति ॥ ४ ॥
'राघव ! मृग, सिंह, हत्ती, वाघ, शरभ, चमरी गाय, नील गाय तसेच अन्य जे जंगली जीव आहेत, ते सर्वच्या सर्व आपले रूप पाहून पळून जातील, कारण की असे प्रभावशाली स्वरूप त्यांनी कधी पाहिलेले नसेल. आपल्याला तर सर्वच घाबरतात, मग ते पशु का बरे घाबरणार नाहीत ? ॥३-४॥
त्वया च सह गन्तव्यं मया गुरुजनाज्ञया ।
त्वद्वियोगेन मे राम त्यक्तव्यमिह जीवितम् ॥ ५ ॥
श्रीराम गुरूजनांच्या आज्ञेने मला निश्चितच आपल्या बरोबर यावयाचे आहे, कारण की आपला वियोग झाल्यावर मी येथे आपल्या जीवनाचा परित्याग करीन. ॥५॥
नहि मां त्वत्समीपस्थामपि शक्रोऽपि राघव ।
सुराणामीश्वरः शक्तः प्रधर्षयितुमोजसा ॥ ६ ॥
'राघव ! आपल्या समीप राहिल्यावर देवांचा राजा इंद्रही बलपूर्वक माझा तिरस्कार करू शकणार नाही. ॥६॥
पतिहीना तु या नारी न सा शक्ष्यति जीवितुम् ।
काममेवंविधं राम त्वया मम निदर्शितम् ॥ ७ ॥
'श्रीरामा ! पतिव्रता स्त्री आपल्या पतिचा वियोग झाल्यावर जीवंत राहू शकणार नाही असे आपणही मला उत्तमप्रकारे सूचित केले आहे. ॥७॥
अथापि च महाप्राज्ञ ब्राह्मणानां मया श्रुतम् ।
पुरा पितृगृहे सत्यं वस्तव्यं किल मे वने ॥ ८ ॥
'महाप्राज्ञ ! यद्यपि वनांत दुःख आणि दोष भरलेले आहेत, तथापि मी आपल्या पित्याच्या घरी राहात असता ब्राह्मणांच्या मुखाने 'मला अवश्यच वनात राहावे लागेल' असे बोलणे मी पूर्वी ऐकलेलेच आहे. ती गोष्ट माझ्या जीवनात सत्य ठरून जाईल. ॥८॥
लक्षणिभ्यो द्विजातिभ्यः श्रुत्वाहं वचनं पुरा ।
वनवासकृतोत्साहा नित्यमेव महाबल ॥ ९ ॥
'महाबली वीर ! ह्स्तरेषा पाहून आपल्या घरी भविष्यकालीन गोष्टी जाणणार्‍या ब्राह्मणांकडून अशी गोष्ट ऐकून मी सदाच वनवासासाठी उत्साहित राहात असते. ॥९॥
आदेशो वनवासस्य प्राप्तव्यः स मया किल ।
सा त्वया सह भर्त्राहं यास्यामि प्रिय नान्यथा ॥ १० ॥
'प्रियतम ! ब्राह्मणांकडून ज्ञात झालेला वनात राहाण्याचा आदेश एक-न-एक दिवस मला पूरा करावाच लागेल, तो कुठल्याही प्रकारे पालटू शकत नाही. म्हणून मी आपल्या स्वामींच्या बरोबर वनात अवश्य येईन. ॥१०॥
कृतादेशा भविष्यामि गमिष्यामि त्वया सह ।
कालश्चायं समुत्पन्नः सत्यवाग् भवतु द्विजः ॥ ११ ॥
असे होण्याने मी ते भाग्यातील विधान भोगेन. त्यासाठी हा समय आलेला आहे म्हणून आपल्या बरोबर मला यायचेच आहे. त्यामुळे त्या ब्राह्मणाचे वचनही खरे ठरेल. ॥११॥
वनवासे हि जानामि दुःखानि बहुधा किल ।
प्राप्यन्ते नियतं वीर पुरुषैरकृतात्मभिः ॥ १२ ॥
'वीर ! मी जाणते कि वनवासात अवश्य बरेचसी दुःखे प्राप्त होतात, परंतु ज्यांची इंद्रिये आणि मन स्वतःस वश नसते त्यांनाच ती दुःखे जाणवतात. ॥१२॥
कन्यया च पितुर्गेहे वनवासः श्रुतो मया ।
भिक्षिण्याः शमवृत्ताया मम मातुरिहाग्रतः ॥ १३ ॥
'पित्याच्या घरी कुमारी अवस्थेत एका शांतिपरायण भिक्षुकीच्या मुखानेही मी आपल्या वनवासाची गोष्ट ऐकलेली होती. तिने माझ्या मातेच्या समोरच अशी गोष्ट सांगितली होती. ॥१३॥
प्रसादितश्च वै पूर्वं त्वं वै बहुतिथं प्रभो ।
गमनं वनवासस्य काङ्‌‍क्षितं हि सह त्वया ॥ १४ ॥
'प्रभो ! येथे आल्यावरही मी पूर्वीही अनेक वेळा आपल्याला काही काळ वनात राहाण्यासाठी प्रार्थना केली होती आणि आपल्याला तयारही केले होते. या वरून आपण निश्चितच जाणून घ्यावे की आपल्या बरोबर वनात जाणे मला पूर्वी पासून अभिष्ट आहे. ॥१४॥
कृतक्षणाहं भद्रं ते गमनं प्रति राघव ।
वनवासस्य शूरस्य मम चर्या हि रोचते ॥ १५ ॥
'राघवा ! आपले भले होवो. मी तेथे येण्यासाठी पूर्वीच आपली अनुमती प्राप्त करून चुकले आहे. आपल्या शूरवीर वनवासी पतिची सेवा करणे माझ्यासाठी अधिक रुचिकर आहे. (मला अधिक आवडेल) ॥१५॥
शुद्धात्मन् प्रेमभावाद्धि भविष्यामि विकल्मषा ।
भर्तारमनुगच्छन्ती भर्ता हि परदैवतम् ॥ १६ ॥
'शुद्धात्मन् ! आपण माझे स्वामी आहात. आपल्या पाठोपाठ प्रेमभावाने वनात जाण्याने माझे पाप दूर होऊन जाईल कारण स्त्रीला तिचा स्वामी (पति) हेच सर्वश्रेष्ठ दैवत आहे. ॥१६॥
प्रेत्यभावे हि कल्याणः सङ्‌‍गमो मे सदा त्वया ।
श्रुतिर्हि श्रूयते पुण्या ब्राह्मणानां यशस्विनाम् ॥ १७ ॥
'आपल्या अनुगमनाने परलोकातही माझे कल्याण होईल आणि सदा आपल्या बरोबर माझा संयोग टिकून राहील. या विषयी यशस्वी ब्राह्मणांच्या मुखाने एक पवित्र श्रुति ऐकण्यात येत असते. ( ती या प्रकारे आहे-) ॥१७॥
इह लोके च पितृभिर्या स्त्री यस्य महाबल ।
अद्‌भिर्दत्ता स्वधर्मेण प्रेत्यभाऽवेपि तस्य सा ॥ १८ ॥
'महाबली वीरा ! या लोकात पिता आदिंच्या द्वारा जी कन्या ज्या पुरुषाला आपल्या धर्मास अनुसरून जलाने संकल्प करून दिली जाते, ती मेल्यानंतर परलोकातही त्याचीच स्त्री होते. ॥१८॥
एवमस्मात् स्वकां नारीं सुवृत्तां हि पतिव्रताम् ।
नाभिरोचयसे नेतुं त्वं मां केनेह हेतुना ॥ १९ ॥
'मी आपली धर्मपत्‍नी आहे, उत्तम व्रताचे पालन करणारी आणि पतिव्रता आहे. मी आपण येथून मला आपल्या बरोबर नेण्याची इच्छा करत नाही याचे कारण तरी काय आहे ? ॥१९॥
भक्तां पतिव्रतां दीनां मां समां सुखदुःखयोः ।
नेतुमर्हसि काकुत्स्थ समानसुखदुःखिनीम् ॥ २० ॥
'काकुत्स्थ ! मी आपली भक्त आहे, पतिव्रत्याचे पालन करीत आहे, आपल्या वियोगाच्या भयाने दीन होत आहे. तथा आपल्या सुखदुःखात समान रूपाने सहभागी होणारी आहे. मला सुख मिळो अथवा दुःख, मी दोन्ही अवस्था मध्ये सम राहीन - हर्ष अथवा शोकाला वश होणार नाही. म्हणून आपण मला अवश्यच आपल्या बरोबर वनात घेऊन जाण्याची कृपा करावी. ॥२०॥
यदि मां दुःखितामेवं वनं नेतुं न चेच्छसि ।
विषमग्निं जलं वाहमास्थास्ये मृत्युकारणात् ॥ २१ ॥
'जर आपण या प्रकारे दुःखात पडलेल्या सेविकेला आपल्या बरोबर वनात घेऊन जाऊ इच्छित नसाल तर मी मृत्यु यावा म्हणून विष खाईन, आगीत उडी घेईन अथवा जलात बुडून जाईन. ॥२१॥
एवं बहुविधं तं सा याचते गमनं प्रति ।
नानुमेने महाबाहुस्तां नेतुं विजनं वनम् ॥ २२ ॥
याप्रमाणे अनेक प्रकारांनी सीता वनात जाण्यासाठी याचना करीत होती तथापि महाबाहु रामांनी तिला आपल्या बरोबर निर्जन वनात (घेऊन जाण्यास) चलण्यास अनुमति दिली नाही. ॥२२॥
एवमुक्ता तु सा चिन्तां मैथिली समुपागता ।
स्नापयन्तीव गामुष्णैरश्रुभिर्नयनच्युतैः ॥ २३ ॥
याप्रकारे त्यांनी अस्वीकार केल्यावर मैथिलीला मोठी चिंता उत्पन्न झाली आणि ती आपल्या नेत्रांतून उष्ण अश्रू ढाळून भूमीला भिजवू लागली. ॥२३॥
चिन्तयन्तीं तथा तां तु निवर्तयितुमात्मवान् ।
क्रोधाविष्ठां तु वैदेहीं काकुत्स्थो बह्वसान्त्वयत् ॥ २४ ॥
त्या समयी वैदेहीला चिंतित आणि कुपित पाहून मनाला वश ठेवणार्‍या काकुत्स्थांनी तिला वनवासाच्या विचारापासून निवृत्त करण्यासाठी तर्‍हे-तर्‍हेच्या गोष्टी सांगून समजाविले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायणाच्या आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणतिसावा सर्ग पूरा झाला. ॥२९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP