|
| धूम्राक्षस्य युद्धं तस्य हनुमता वधश्च - 
 | धूम्राक्षाचे युद्ध आणि हनुमान् द्वारा त्याचा वध - | 
| धूम्राक्षं प्रेक्ष्य निर्यान्तं राक्षसं भीमविक्रमम् । विनेदुर्वानराः सर्वे प्रहृष्टा युद्धकाङ्क्षिणः ॥ १ ॥
 
 | भयंकर पराक्रमी निशाचर धूम्राक्षाला बाहेर पडतांना पाहून युद्धाची इच्छा बाळगणारे समस्त वानर हर्ष आणि उत्साहाने भरून जाऊन सिंहनाद करू लागले. ॥१॥ | 
| तेषां सुतुमुलं युद्धं सञ्जज्ञे कपिरक्षसाम् । अन्योन्यं पादपैर्घोरैः निघ्नतां शूलमुद्गरैः ॥ २ ॥
 
 | त्यासमयी त्या वानरांमध्ये आणि राक्षसांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. ते घोर वृक्ष तसेच शूल आणि मुद्गरांनी एकमेकावर प्रहार करू लागले. (एकमेकाला जखमी करू लागले.) ॥२॥ | 
| राक्षसैर्वानरा घोरा विनिकृत्ताः समन्ततः । वानरै राक्षसाश्चापि द्रुमैर्भूमि समीकृताः ॥ ३ ॥
 
 | राक्षसांनी चोहो बाजुनी घोर वानरांना कापून काढण्यास आरंभ केला, तसेच वानरांनीही वृक्षांनी मारमारून राक्षसांना धराशायी केले. ॥३॥ | 
| राक्षसास्त्वभि संक्रुद्धा वानरान् निशितैः शरैः । विव्यधुर्घोरसंकाशैः कङ्कपत्रैरजिह्मगैः ॥ ४ ॥
 
 | क्रोधाविष्ट झालेल्या राक्षसांनी आपले कंकपुत्रयुक्त, सरळ जाणार्या घोर आणि तीक्ष्ण बाणांनी खोल जखमा केल्या. ॥४॥ | 
| ते गदाभिश्च भीमाभिः पट्टिशैः कूटमुद्गरैः । घोरैश्च परिघैश्चित्रैः त्रिशूलैश्चापि संश्रितैः ॥ ५ ॥
 
 विदार्यमाणा रक्षोभिः वानरास्ते महाबलाः ।
 अमर्षजनितोद्धर्षाः चक्रुः कर्माण्यभीतवत् ॥ ६ ॥
 
 | राक्षसांच्या द्वारा भयंकर गदा, पट्टिश, कूट, मुद्गर, घोर परिघ, आणि हातात घेतलेल्या विचित्र त्रिशूलांनी विदिर्ण केले जाणारे ते महाबलाढ्य वानर अमर्षजनित उत्साहाने निर्भय असल्याप्रमाणे महान् कर्म करू लागले. ॥५-६॥ | 
| शरनिर्भिन्नगात्रास्ते शूलनिर्भिन्नदेहिनः । जगृहुस्ते द्रुमांस्तत्र शिलाश्च हरियूथपाः ॥ ७ ॥
 
 | बाणांच्या आघातांनी त्यांचे शरीर विंधले गेले होते. शूलांच्या मारांनी देह विदीर्ण झाले होते. या अवस्थेत त्या वानरयूथपतिंनी हातामध्ये वृक्ष आणि शिला उचलल्या. ॥७॥ | 
| ते भीमवेगा हरयो नर्दमानास्ततस्ततः । ममन्थू राक्षसान् वीरान् नामानि च बभाषिरे ॥ ८ ॥
 
 | त्यासमयी त्यांचा वेग फार भयंकर होता. ते जोरजोराने गर्जना करत जेथे तेथे वीर राक्षसांना आपटून आपटून मथू लागले आणि आपल्या नामांचीही घोषणा करू लागले. ॥८॥ | 
| तद्वभूवाद्भुतं घोरं युद्धं वानररक्षसाम् । शिलाभिर्विविधाभिश्च बहुभिश्चैव पादपैः ॥ ९ ॥
 
 | नाना प्रकारच्या शिला, बर्याच शाखा असलेल्या वृक्षांच्या प्रहाराने तेथे वानर आणि राक्षसांमध्ये घोर आणि अद्भुत युद्ध होऊ लागले. ॥९॥ | 
| राक्षसा मथिताः केचिद् वानरैर्जितकाशिभिः । प्रवेमू रुधिरं केचिद् मुखै रुधिरभोजनाः ॥ १० ॥
 
 | विजयोल्हासांनी सुशोभित होणार्या वानरांनी कित्येक राक्षसांना चिरडून टाकले. कित्येक रक्तभोजी राक्षस त्यांचा मार खाऊन आपल्या मुखातून रक्त ओकू लागले. ॥१०॥ | 
| पार्श्वेषु दारिताः केचित् केचिद् राशीकृता द्रुमैः । शिलाभिश्चूर्णिताः केचित् केचिद् दन्तैर्विदारिताः ॥ ११ ॥
 
 | कित्येक राक्षसांच्या बरगडीचा चुराडा केला गेला. कित्येक तर वृक्षांचा आघात होऊन तेथल्या तेथे मरण पावले होते. कांहीचे दगडांच्या मारांने चूर्ण बनले होते आणि कित्येक तर दातांनी विदीर्ण केले गेले होते. ॥११॥ | 
| ध्वजैर्विमथितैर्भग्नैः खरैश्च विनिपातितैः । रथैर्विध्वंसितैः केचिद् व्यथिता रजनीचराः ॥ १२ ॥
 
 | कित्येकांचे ध्वज खण्डित करून चुरगळले गेले होते. तलवारी खेचून खाली टाकून दिल्या होत्या आणि रथ मोडून टाकण्यात आले होते. याप्रकारे दुर्दशेत पडून बरेचसे राक्षस व्यथित झाले होते. ॥१२॥ | 
| गजेन्द्रैः पर्वताकारैः पर्वताग्रैर्वनौकसाम् । मथितैर्वाजिभिः कीर्णं सारोहैर्वसुधातलम् ॥ १३ ॥
 
 | वानरांनी फेकलेल्या पर्वत शिखरांनी चिरडले गेलेले पर्वताकार गजराज, घोडे आणि घोडेस्वार यांनी ती सारी रणभूमी भरून गेली होती. ॥१३॥ | 
| वानरैर्भीमविक्रान्तैः आप्लुत्योप्लुत्य वेगितैः । राक्षसाः करजैस्तीक्ष्णैः मुखेषु विनिदारिताः ॥ १४ ॥
 
 | भयानक पराक्रम प्रकट करणारे वेगवान् वानर उड्या मारमारून आपल्या पंजांनी राक्षसांची तोंडे ओरबाडत होते अथवा विदीर्ण करत होते. ॥१४॥ | 
| विषण्णवदना भूयो विप्रकीर्णशिरोरुहाः । मूढाः शोणितगन्धेन निपेतुर्धरणीतले ॥ १५ ॥
 
 | त्या राक्षसांच्या मुखांवर विषाद पसरत होता. त्यांचे केस सर्व बाजूनी विखुरले जात होते आणि रक्ताच्या गंधाने मूर्च्छित होऊन ते पृथ्वीवर कोसळत होते. ॥१५॥ | 
| अन्ये परमसंक्रुद्धा राक्षसा भीमनिस्वनाः । तलैरेवाभिधावन्ति वज्रस्पर्शसमैर्हरीन् ॥ १६ ॥
 
 | दुसरे भीषण पराक्रमी राक्षस अत्यंत क्रुद्ध होऊन आपल्या वज्र सदृश कठोर थपडा मारून तेथे वानरांवर हल्ला करत होते. ॥१६॥ | 
| वानरै पातयन्तस्ते वेगिता वेगवत्तरैः । मुष्टिभिश्चरणैर्दन्तैः पादपैश्चावपोथिताः ॥ १७ ॥
 
 | प्रतिपक्ष्याला वेगपूर्वक पाडणार्या त्या राक्षसांचा बर्याचशा अत्यंत वेगशाली वानरांनी लाथा, बुक्क्या, दात आणि वृक्षांच्या माराने ठेचा करून टाकला. ॥१७॥ | 
| सैन्यं तु विद्रुतं दृष्ट्वा धूम्राक्षो राक्षसर्षभः । क्रोधेन कदनं चक्रे वानराणां युयुत्सताम् ॥ १८ ॥
 
 | आपल्या सेनेला वानरांच्या द्वारा पळवून लावली जातांना पाहून राक्षसश्रेष्ठ धूम्राक्षाने युद्धाच्या इच्छेने समोर आलेल्या वानरांचा रोषपूर्वक संहार आरंभला. ॥१८॥ | 
| प्रासैः प्रमथिताः केचिद् वानराः शोणितस्रवाः । मुद्गरैराहताः केचित् पतिता धरणीतले ॥ १९ ॥
 
 | काही वानरांना त्याने भाल्यांनी विंधले, ज्यामुळे त्यांच्या शरीरांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. कित्येक वानर त्याच्या मुद्गरांनी आहत होऊन जमिनीवर लोळू लागले. ॥१९॥ | 
| परिघैर्मथिताः केचिद् भिन्दिपालैश्च दारिताः । पट्टिशैर्मथिताः केचिद् विह्वलन्तो गतासवः ॥ २० ॥
 
 | काही वानर परिघांनी जखमी झाले, काही भिंदीपालानी चिरले गेले आणि काही पट्टिशांनी मथले जाऊन व्याकुळ होऊन आपले प्राण गमावून बसले. ॥२०॥ | 
| केचिद् विनिहताः शूलै रुधिरार्द्रा वनौकसः । केचिद् विद्राविता नष्टाः संक्रुद्धैः राक्षसैर्युधि ॥ २१ ॥
 
 | कित्येक वानर राक्षसांच्या द्वारे मारले जाऊन रक्तबंबाळ होऊन पृथ्वीवर पडले आणि कित्येक क्रोधाविष्ट राक्षसांच्या द्वारा युद्धस्थळी पिटाळले गेल्यावर पळून जाऊन कोठेतरी लपले. ॥२१॥ | 
| विभिन्नहृदयाः केचिद् एकपार्श्वेन शायिताः । विदारिता स्त्रिशूलैश्च केचिदान्त्रैर्विनिःसृताः ॥ २२ ॥
 
 | कित्येकांची हृदये विदीर्ण झाली. कित्येक तर एका कुशीवर झोपविले गेले तसेच कित्येकांना शूलांनी विदीर्ण करून धूम्राक्षाने त्यांची आंतडी बाहेर काढली. ॥२२॥ | 
| तत्सुभीमं महायुद्धं हरिराक्षससङ्कुलम् । प्रबभौ शस्त्रबहुलं शिलापादपसङ्कुलम् ॥ २३ ॥
 
 | वानरांनी आणि राक्षसांनी भरलेले ते महान् युद्ध फार भयानक प्रतीत होत होते. त्यामध्ये अस्त्रशस्त्रांची विपुलता होती तसेच शिला आणि वृक्ष यांच्या वृष्टिने सारी रणभूमी भरून गेली होती. ॥२३॥ | 
| धनुर्ज्यातन्त्रिमधुरं हिक्कातालसमन्वितम् । मन्दस्तनिततं तद् युद्धगान्धर्वमाबभौ ॥ २४ ॥
 
 | तो युद्धरूपी गांधर्व (संगीत-महोत्सव) अद्भुत प्रतीत होत होता. धनुष्येच्या प्रत्यञ्चेमुळे जो टणत्कार ध्वनि उत्पन्न होत होता तोच जणु वीणेचा मधुरनाद होता, उचक्या तालाचे काम करत होत्या आणि मंदस्वरातले कण्हणे जे चालू होते, तेच गीताचे स्थान घेत होते. ॥२४॥ | 
| धूम्राक्षस्तु धनुष्पाणिः वानरान् रणमूर्धनि । हसन् विद्रावयामास दिशस्तु शरवृष्टिभिः ॥ २५ ॥
 
 | याप्रकारे धनुष्य हातात घेऊन धूम्राक्षाने युद्धाच्या तोंडावरच बाणांची वृष्टि करून वानरांना हसत हसत संपूर्ण दिशामध्ये पळवून लावले. ॥२५॥ | 
| धूम्राक्षेणार्दितं सैन्यं व्यथितं प्रेश्य मारुतिः । अभ्यवर्तत संक्रुद्धः प्रगृह्य विपुलां शिलाम् ॥ २६ ॥
 
 | धूम्राक्षाच्या माराने आपल्या सेनेला पीडित आणि व्यथित झालेली पाहून मारूती अत्यंत कुपित झाले आणि एक विशाल शिला हातात घेऊन त्याच्या समोर आले. ॥२६॥ | 
| क्रोधाद् द्विगुणताम्राक्षः पितृतुल्यपराक्रमः । शिलां तां पातयामास धूम्राक्षस्य रथं प्रति ॥ २७ ॥
 
 | त्यासमयी क्रोधाने त्यांचे नेत्र दुप्पट लाल झाले होते. त्यांचा पराक्रम त्यांचे पिता वायुदेव यांच्या समान होता. त्यांनी धूम्राक्षाच्या रथावर ती विशाल शिला फेकून मारली. ॥२७॥ | 
| आपतन्तीं शिलां दृष्ट्वा गदामुद्यम्य संभ्रमात् । रथादाप्लुत्य वेगेन वसुधायां व्यतिष्ठत ॥ २८ ॥
 
 | त्या शिलेला रथाकडे येतांना पाहून धूम्राक्ष गडबडीने गदा घेऊन उठला आणि वेगाने रथांतून उडी मारून पृथ्वीवर उभा राहिला. ॥२८॥ | 
| स प्रमथ्य रथं तस्य निपपात शिला भुवि । सचक्रकूबरं साश्वं सध्वजं सशरासनम् ॥ २९ ॥
 
 | ती शिला रथाची चाके, कूवर, अश्व, ध्वज आणि धनुष्यासहित त्याच्या रथाचा चुराडा करून पृथ्वीवर पडली. ॥२९॥ | 
| स भङ्क्त्वा तु रथं तस्य हनुमान् मारुतात्मजः । रक्षसां कदनं चक्रे सस्कन्धविटपैर्द्रुमैः ॥ ३० ॥
 
 | याप्रकारे धूम्राक्षाच्या रथाचा विध्वंस करून पवनपुत्र हनुमानांनी लहान-मोठ्या फांद्यासहित वृक्षांनी राक्षसांचा संहार आरंभला. ॥३०॥ | 
| विभिन्नशिरसो भूत्वा राक्षसाः शोणितोक्षिताः । द्रुमैः प्रमथिताश्चान्ये निपेतुर्धरणीतले ॥ ३१ ॥
 
 | बर्याच राक्षसांची डोकी फुटली आणि ते रक्ताने न्हाऊन निघाले. दुसरे बरेचसे निशाचर वृक्षांच्या माराने चिरडले जाऊन धराशायी झाले. ॥३१॥ | 
| विद्राव्य रासक्षं सैन्यं हनुमान् मारुतात्मजः । गिरेः शिखरमादाय धूम्राक्षमभिदुद्रुवे ॥ ३२ ॥
 
 | याप्रकारे राक्षससेनेला पिटाळून पवनकुमार हनुमानांनी एका पर्वताचे शिखर उचलले आणि धूम्राक्षावर हल्ला केला. ॥३२॥ | 
| तमापतन्तं धूम्राक्षो गदामुद्यम्य वीर्यवान् । विनर्दमानः सहसा हनुमन्तमभिद्रवत् ॥ ३३ ॥
 
 | त्यांना येतांना पाहून पराक्रमी धूम्राक्षानेही गदा उचलली आणि गर्जना करत तो एकाएकी हनुमानाकडे धावला. ॥३३॥ | 
| ततः क्रुद्धस्तु रोषेण गदां तां बहुकण्टकाम् । पातयामास धूम्राक्षो मस्तकेऽथ हनूमतः ॥ ३४ ॥
 
 | धूम्राक्षाने कुपित झालेल्या हनुमानांच्या मस्तकावर बहुसंख्य काट्यांनी भरलेली ती गदा फेकून मारली. ॥३४॥ | 
| ताडितः स तया तत्र गदया भीमवेगया । स कपिर्मारुतबलः तं प्रहारमचिन्तयन् ॥ ३५ ॥
 
 धूम्राक्षस्य शिरोमध्ये गिरिशृङ्गमपातयत् ।
 
 | भयानक वेगवान् त्या गदेचा आघात होऊनही वायुसमान बलशाली कपिवर हनुमानांनी तेथे त्या प्रहारास काही महत्वच दिले नाही आणि धूम्राक्षाच्या मस्तकावर ते पर्वतशिखर फेकले. ॥३५ १/२॥ | 
| स विह्वलितसर्वाङ्गो गिरिशृङ्गेण ताडितः ॥ ३६ ॥ 
 पपात सहसा भूमौ विकीर्ण इव पर्वतः ।
 
 | पर्वतशिखराचा जबरदस्त आघात होताच धूम्राक्षाचे सारे अंग छिन्न-भिन्न झाले आणि तो विखुरलेल्या पर्वताप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥३६ १/२॥ | 
| धूम्राक्षं निहतं दृष्टवा हतशेषा निशाचराः । त्रस्ताः प्रविविशुर्लङ्कां वध्यमानाः प्लवंगमैः ॥ ३७ ॥
 
 | धूम्राक्ष मारला गेल्याचे पाहून मरणापासून वाचलेले निशाचर भयभीत होऊन वानरांचा मार खात लंकेमध्ये घुसले. ॥३७॥ | 
| स तु पवनसुतो निहत्य शत्रुन् क्षतजवहाः सरितश्च संविकीर्य ।
 रिपुवधजनितश्रमो महात्मा
 मुदमगमत् कपिभि सुपूज्यमानः ॥ ३८ ॥
 
 | याप्रकारे शत्रुंना मारून आणि रक्ताची धार वहावणार्या बर्याचशा नद्यांना प्रवाहित करून महात्मा पवनकुमार हनुमान् जरी शत्रुवधजनित परिश्रमाने थकलेले होते तरी वानरांच्या द्वारा पूजित आणि प्रशंसित झाल्यामुळे त्यांना फार प्रसन्नता वाटली. ॥३८॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५२॥ | 
 
 
|