॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ उत्तरकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



वाली आणि सुग्रीव यांचे पूर्वचरित्र तसेच रावण व सनतकुमार यांचा संवाद


श्रीराम उवाच
वालिसुग्रीवयोर्जन्म श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ।
रवीन्द्रौ वानराकारौ जज्ञात इति नः श्रुतम् ॥ १ ॥
श्रीराम म्हणाले- "हे अगस्त्य मुने, वाली आणि सुग्रीव यांच्या जन्माचा यथार्थ वृत्तांत मी ऐकू इच्छितो. सूर्य आणि इंद्र हे वानररूपाने जन्माला आले होते, असे ऐकले होते." (१)

अगस्त्य उवाच
मेरोः स्वर्णमयस्याद्रेः मध्यशृङ्‍गे मणिप्रभे ।
तस्मिन्सभास्ते विस्तीर्णा ब्रह्मणः शतयोजना ॥ २ ॥
अगस्त्य म्हणाले- "हे रामा, सुवर्णमय मेरू पर्वताच्या रत्नाप्रमाणे प्रकाशमान अशा मध्य शिखरावर शंभर योजने विस्तार असणारी ब्रह्मदेवांची सभा आहे. (२)

तस्यां चतुर्मुखः साक्षात् कदाचित् योगमास्थितः ।
नेत्राभ्यां पतितं दिव्यं आनन्दसलिलं बहु ॥ ३ ॥
त्या सभेत एकदा साक्षात चतुर्मुख ब्रह्मदेव ध्यानस्थ होऊन बसले होते. त्या वेळी त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून पुष्कळ दिव्य आनंदाश्रू पडले. (३)

तद्‍गृहीत्वा करे ब्रह्मा ध्यात्वा किञ्चित्तदत्यजत् ।
भूमौ पतितमात्रेण तस्माज्जातो महाकपिः ॥ ४ ॥
ते अश्रुजल आपल्या हातात घेऊन, काही वेळ विचार करून, ब्रह्मदेवांनी ते खाली पृथ्वीवर टाकले. ते पृथ्वीवर पक्काच त्यातून एकमोठा वानर जन्माला आला. (४)

तमाह द्रुहिणो वत्स किञ्चित्कालं वसात्र मे ।
समीपे सर्वशोभाढ्ये ततः श्रेयो भविष्यति ॥ ५ ॥
त्याला ब्रह्मदेव म्हणाले, "हे वत्सा, तू काही काळ येथे माझ्याजवळ या सर्व शोभासंपन्न स्थानी राहा. त्यामुळे तुझे कल्याण होईल." (५)

इत्युक्तो न्यवसत् तत्र ब्रह्मणा वानरोत्तमः ।
एवं बहुतिथे काले गते ऋक्षाधिपः सुधीः ॥ ६ ॥
कदाचित् पर्यटन् अद्रौ फलमूलार्थमुद्यतः ।
अपश्यद्दिव्यसलिलां वापीं मणिशिलान्विताम् ॥ ७ ॥
ब्रह्मदेवांनी त्याला असे सांगितल्यावर, तो वानरश्रेष्ठ तेथे राहिला. अशा प्रकारे बराच काळ लोटल्यावर, एकदा फळे-मुळे गोळा करण्यास उद्युक्त झालेला तो महाबुद्धिमान ऋक्षाधिप नावाचा वानर त्या पर्वतावर भटकत असताना, त्याला रत्नशिलांच्या पायऱ्यांनी युक्त आणि दिव्य जलाने भरलेली एक पुष्करिणी दिसली. (६-७)

पानीयं पातुमागच्छत् तत्रच्छायामयं कपिम् ।
दृष्ट्वा प्रतिकपिं मत्वा निपपात जलान्तरे ॥ ८ ॥
पाणी पिण्यास तो तेथे गेला. तेव्हा पाण्यात आपल्या प्रतिबिंबाच्या रूपात त्याला वानर दिसला. तो वानर आपला प्रतिस्पर्धी वानर आहे, असे समजून त्याने पाण्यामध्ये उडी मारली. (८)

तत्रादृष्ट्वा हरिं शीघ्रं पुनरुत्प्लुत्य वानरः ।
अपश्यत्सुन्दरीं रामां आत्मानं विस्मयं गतः ॥ ९ ॥
परंतु तेथे दुसरा कोणी वानर नाही, हे पाहताच झट्‌दिशी उडी मारून पुनः तो पाण्याच्या बाहेर आला आणि आपण एक सुंदर रमणी झालो आहोत, हे दिसताच त्याला विस्मय वाटला. (९)

ततः सुरेशो देवेशं पूजयित्वा चतुर्मुखम् ।
गच्छन्मध्याह्नसमये दृष्ट्वा नारीं मनोरमाम् ॥ १० ॥
त्याच वेळी मध्यान्ह काळी देवश्रेष्ठ चतुर्मुख ब्रह्मदेवांचे पूजन करून देवराज इंद्र परत जात असताना, त्याला ती मनोरम स्त्री दिसली. (१०)

कन्दर्पशरविद्धाङ्‍गः त्यक्तवान्वीर्यमुत्तमम् ।
तामप्राप्यैव तद्‌बीजं वालदेशेऽपतद्‌भुवि ॥ ११ ॥
तिला पाहाताच मदनाच्या बाणांनी त्याचे शरीर विद्ध झाले. त्याचे उत्तम वीर्य स्खलित झाले आणि ते त्या स्त्रीच्या केसांना स्पर्श करून जमिनीवर पडले. (११)

वाली समभवत् तत्र शक्रतुल्यपराक्रमः ।
तस्य दत्त्वा सुरेशानः स्वर्णमालां दिवं गतः ॥ १२ ॥
तेव्हा त्या वीर्यापासून इंद्राप्रमाणे पराक्रमी असणारा वाली नावाचा वानर जन्माला आला. त्याला एक सुवर्णमाला देऊन देवराज इंद्र स्वर्गलोकी परत गेला. (१२)

भनुरप्यागतस्तत्र तदानीमेव भामिनीम् ।
दृष्ट्वा कामवशो भूत्वा ग्रीवादेशेऽसृजन्महत् ॥ १३ ॥
बीजं तस्यास्ततः सद्यो महाकायोऽभवत् हरिः ।
तस्य दत्त्वा हनूमन्तं सहायार्थं गतो रविः ॥ १४ ॥
त्याच वेळी सूर्यसुद्धा तेथे आला होता. त्या सुंदर स्त्रीला पाहून कामवश होऊन, त्याने तिच्या ग्रीवा प्रदेशावर आपले प्रभावी वीर्य सोडले. त्यापासून तत्काळ एक प्रचंड शरीर असणारा वानर निर्माण झाला. त्याच्या सहाय्याला हनुमानाला देऊन सूर्य तेधून निघून गेला. (१३-१४)

पुत्रद्वय समादाय गत्वा सा निद्रिता क्वचित् ।
प्रभातेऽपश्यदात्मानं पूर्ववत् वानरकृतिम् ॥ १५ ॥
पुढे त्या दोन्ही पुत्रांना घेऊन ती स्त्री कुठे तरी जाऊन निद्राधीन झाली. दुसरे दिवशी प्रभातसमयी झोपेतून उठल्यावर आपल्याला पूर्वीप्रमाणे वानराचे रूप प्राप्त झाले आहे, असे तिला दिसले. (१५)

फलमूलादिभिः सार्धं पुत्राभ्यां सहितः कपिः ।
नत्वा चतुर्मुखस्याग्रे ऋक्षराजः स्थितः सुधीः ॥ १६ ॥
मग फळे- मुळे इत्यादी घेऊन, तो महाबुद्धिमान ऋक्षराज वानर आपल्या दोन पुत्रांसह ब्रह्मदेवांकडे आला आणि त्यांना नमस्कार करून, पुढे उभा राहिला. (१६)

ततोऽब्रवीत्समाश्वास्य बहुशः कपिकुञ्जरम् ।
तत्रैकं देवतादूतं आहूयामरसन्निभम् ॥ १७ ॥
तेव्हा त्या कपिश्रेष्ठाला ब्रह्मदेवांनी अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि नंतर तेथे असलेल्या एका देवदूताला बोलावून घेऊन ब्रह्मदेव त्याला म्हणाले. (१७)

गच्छ दूर मयादिष्टो गृहीत्वा वानरोत्तमम् ।
किष्किन्धां दिव्यनगरीं निर्मितां विश्वकर्मणा ॥ १८ ॥
"अरे दूता, माझ्या आज्ञेने या वानरश्रेष्ठाला घेऊन तू विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या दिव्य अशा किष्किंधा नगरीला जा. (१८)

सर्वसौभाग्यवलितां देवैरपि दुरासदम् ।
तस्यां सिंहासने वीरं राजानं अभिषेचय ॥ १९ ॥
ती नगरी सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आणि देवांना सुद्धा जिंकण्यास कठीण आहे. त्या नगरीत या वीराचा सिंहासनावर राजा म्हणून अभिषेक कर. (१९)

सप्तद्वीपगता ये ये वानराः सन्ति दुर्जयाः ।
सर्वे ते ऋक्षराजस्य भविष्यन्ति वशेऽनुगाः ॥ २० ॥
सात द्वीपांत असणारे जे जे अजिंक्य असे वानर आहेत. ते सर्व वानर या क्रक्षराजाला अंकित होऊन, ते त्याचे अनुयायी होतील. (२०)

यदा नारायणः साक्षात् रामो भूत्वा सनातनः ।
भूभारासुरनाशाय संभविष्यति भूतले ॥ २१ ॥
तदा सर्वे सहायार्थे तस्य गच्छन्तु वानराः ।
इत्युक्तो ब्रह्मणा दूतो देवानां स महापतिः ॥ २२ ॥
यथाज्ञप्तस्तथा चक्रे ब्रह्मणा तं हरीश्वरम् ।
देवदूतस्ततो गत्वा ब्रह्मणे तन्न्यवेदयत् ॥ २३ ॥
तदादि वानराणां सा किष्किन्धाभूत् नृपाश्रयः ॥ २४ ॥
नंतर पुढे जेव्हा सनातन असे साक्षात नारायण हे राम होऊन भूमीला भार झालेल्या असुरांच्या नाशासाठी पृथ्वीतलावर जन्माला येतील, त्या वेळी सर्व वानर त्या श्रीरामांच्या सहाय्यासाठी जातील." ब्रह्मदेवांकडून अशी आज्ञा झाल्यावर, त्या महान बुद्धिमान देवदूताने ब्रह्मदेवांनी जशी आज्ञा केली होती, त्या प्रमाणे वानरराजाची व्यवस्था केली. नंतर पुनः ब्रह्मदेवांकडे परत जाऊन देवदूताने सर्व वृत्तांत त्यांना निवेदन केला. तेव्हापासून किष्किंधा नगरी ही वानरांची राजधानी झाली. (२१-२४)

सर्वेश्वरः त्वमेवासीः इदानीं ब्रह्मणार्थितः ।
भूमेर्भारो हृतः कृत्स्नः त्वया लीलानृदेहिना ।
सर्वभूतान्तरस्थस्य नित्यमुक्तचिदात्मनः ॥ २५ ॥
अखण्डानन्तरूपस्य कियानेष पराक्रमः ।
तथापि वर्ण्यते सद्‌भिः लीलामानुषरूपिणः ॥ २६ ॥
यशस्ते सर्वलोकानां पापहत्यै सुखाय च ।
य इदं कीर्तयेन्मर्त्यो वालिसुग्रीवयोर्महत् ॥ २७ ॥
जन्म त्वदाश्रयत्वात्स मुच्यते सर्वपातकैः ॥ २८ ॥
हे रामा, तुम्हीच सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेवांनी तुमची प्रार्थना केल्यावर तुम्ही लीलेने माया- मानव- रूप धारण करून, पृथ्वीचा सर्व भार हरण केला आहे. जे सर्व भूतांच्या हृदयात असतात, जे नित्य मुक्त आणि चेतन स्वरूप आहेत आणि जे अखंड अनंतरूप आहेत, अशा तुम्हांला हा पराक्रम फार मोठा आहे काय ? तथापि सर्व लोकांच्या पापांचा नाश करण्यास आणि त्यांना सुख देण्यास, लीलेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या तुमची कीर्ती सज्जन माणसे वर्णन करतात. जो मनुष्य वाली आणि सुग्रीव यांच्या महान जन्मकथेचे कीर्तन करतो, तो तुमचाच आश्रय घेतल्यामुळे सर्व पातकांतून मुक्त होऊन जातो. (२५-२८)

अथान्यां संप्रवक्ष्यामि कथां राम त्वदाश्रयाम् ।
सीता हृता यदर्थं सा रावणेन दुरात्मना ॥ २९ ॥
हे रामा, आता तुमच्याशी संबंधित असणारी आणखी एक कथा मी तुम्हांला सांगतो. तिच्यामुळेच त्या दुरात्म्या रावणाने सीतेचे हरण केले होते. (२९)

पुरा कृतयुगे राम प्रजापतिसुतं विभुम् ।
सनत्कुमारं एकान्ते समासीनं दशाननः ।
विनयावनतो भूत्वा ह्यभिवाद्येदमब्रवीत् ॥ ३० ॥
हे रामा, पूर्वी कृतयुगात एकांतात बसलेल्या सनत्कुमार या ब्रह्मदेवांच्या सामर्थ्यसंपन्न पुत्राला रावणाने नम्र होऊन अभिवादन केले आणि तो म्हणाला. (३०)

को न्वस्मिन्प्रवरो लोके देवानां बलवत्तरः ।
देवाश्च यं समाश्रित्य युद्धे शत्रुं जयन्ति हि ॥ ३१ ॥
"देव ज्याचा आश्रय घेऊन युद्धामध्ये शत्रूला जिंकतात असा या लोकांत सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आणि अधिक बलवान असा कोणता देव आहे बरे ? (३१)

कं यजन्ति द्विजा नित्यं कं ध्यायन्ति च योगिनः ।
एतन्मे शंस भगवन् प्रश्नं प्रश्नविदांवर ॥ ३२ ॥
ब्राह्मण नित्य कुणाची आराधना करतात ? योगी लोक नित्य कुणाचे ध्यान करतात ? हे भगवन, प्रश्रांचे उत्तर जाणणाऱ्यात तुम्ही श्रेष्ठ आहात; म्हणून तुम्ही या माझ्या प्रश्राचे उत्तरे मला सांगा. (३२)

ज्ञात्वा तस्य हृदिस्थं यत् तत् अशेषेण योगदृक् ।
दशाननमुवाचेदं शृणु वक्ष्यामि पुत्रक ॥ ३३ ॥
त्या रावणाच्या मनात जे काही होते ते संपूर्ण जाणून घेऊन, दिव्यदृष्टीचे सनत्कुमार दशाननाला म्हणाले, "पुत्रा, मी सांगतो, ऐक. (३३)

भर्ता यो जगतां नित्यं यस्य जन्मादिकं न हि ।
सुरासुरैर्नुतो नित्यं हरिर्नारायणोऽव्ययः ॥ ३४ ॥
जे जगाचा नित्य पोषणकर्ता आहेत, ज्यांना जन्म इत्यादी काही नाही, देव व असुर ज्यांची नेहमी स्तुती करतात, जे नित्य व अविनाशी आहेत असे हरी, नारायण आहेत. (३४)

यन्नाभिपङ्‍कजात् जातो ब्रह्म विश्वसृजां पतिः ।
सृष्टं येनैव सकलं जगत्स्थावरजङ्‍गमम् ॥ ३५ ॥
सृष्टिकर्त्यांचे स्वामी ब्रह्मदेव त्यांच्या नाभिकमळातून उत्पन्न झाला आहे. हे संपूर्ण स्थावर जंगमाल्पक जग त्यांनीच निर्माण केले आहे. (३५)

तं समाश्रित्य विबुधा जयन्ति समरे रिपून् ।
योगिनो ध्यानयोगेन तमेवानुजपन्ति हि ॥ ३६ ॥
त्यांचाच आश्रय घेऊन देव युद्धामध्ये शत्रूंना जिंकतात आणि योगी लोक ध्यानयोगाचे द्वारा सतत त्यांचे चिंतन करीत असतात." (३६)

महर्षेर्वचनं श्रुत्वा प्रत्युवाच दशाननः ।
दैत्यदानवरक्षांसि विष्णुना निहतानि च ॥ ३७ ॥
कां वा गतिं प्रपद्यंते प्रेत्य ते मुनिपुङ्‌गव ।
तमुवाच मुनिश्रेष्ठो रावणं राक्षसाधिपम् ॥ ३८ ॥
महर्षींचे वचन ऐकल्यावर दशाननाने त्याला म्हटले, "अहो मुनिश्रेष्ठ, विष्णू हे दैत्य, दानव आणि राक्षस यांचा वध करतात. मरणोत्तर त्यांना कोणती गती मिळते ?" तेव्हा मुनिश्रेष्ठ सनत्कुमार त्या राक्षसराज रावणाला म्हणाले. (३७-३८)

दैवतैर्निहता नित्यं गत्वा स्वर्गमनुत्तमम् ।
भोगक्षये पुनस्तस्मात् ‌भ्रष्टा भूमौ भवन्ति ते ॥ ३९ ॥
पूर्वार्जितैः पुण्यपापैः म्रियन्ते चोद्‌भवन्ति च ।
विष्णुना ये हतास्ते तु प्राप्नुवन्ति हरेर्गतिम् ॥ ४० ॥
"सामान्य देवतांकडून ठार झालेले ते दैत्य इत्यादी नेहमी अतिशय उत्तम स्वर्गलोकात जातात आणि नंतर भोगाचा क्षय-काल येताच, त्या स्वर्गातून स्थान भ्रष्ट होऊन, ते पुनः पृथ्वीवर जन्माला येतात. पूर्वजन्मी प्राप्त करून घेतलेल्या पापपुण्यानुसार ते पुनः पुनः मरतात आणि पुनः जन्माला येतात. परंतु जे विष्णूकडून ठार केले जातात, ते मात्र विष्णूंचे स्थान प्राप्त करून घेतात." (३९-४०)

श्रुत्वा मुनिमुखात् सर्वं रावणो हृष्टमानसः ।
योत्स्येऽहं हरिणा सार्धं इति चिन्तापरोऽभवत् ॥ ४१ ॥
मुनींच्या मुखातून ते सर्व ऐकल्यावर, रावणाचे मन आनंदित झाले. 'मी विष्णूबरोबर युद्ध करीन' असा विचार करण्यात तो मग्न झाला. (४१)

मनःस्थितं परिज्ञाय रावणस्य महामुनिः ।
उवाच वत्स तेऽभीष्टं भविष्यति न संशयः ॥ ४२ ॥
रावणाच्या मनात आलेली गोष्ट जाणून मुनिश्रेष्ठ म्हणाले, "वत्सा, तुझी इच्छा अवश्य सफळ होईल, यात संशय नाही. (४२)

कञ्चित्कालं प्रतीक्षस्व सुखी भव दशानन ।
एवमुक्‍त्वा महाबाहो मुनिः पुनरुवाच तम् ॥ ४३ ॥
हे दशानना, तू सुखाने राहा. आणि काही काळ तू वाट पाहा." हे महाबाहो रामा, असे सांगून ते मुनी पुनः त्याला म्हणाले. (४३)

तस्य स्वरूपं वक्ष्यामि ह्यरूपस्यापि मायिनः ।
स्थावरेषु च सर्वेषु नदेषु च नदीषु च ॥ ४४ ॥
"अरे रावणा, जरी ते रूपरहित आहेत तरी त्या मायावीचे मायेने धारण केलेले रूप मी तुला वर्णन करून सांगतो. ते सर्व स्थावर पदार्थात तसेच सर्व नद आणि नद्या यांमध्ये व्याप्त आहे. (४४)

ओङ्‌कारश्चैव सत्यं च सावित्री पृथिवी च सः ।
समस्तजगदाधारः शेषरूपधरो हि सः ॥ ४५ ॥
तेच ॐकार, सत्य, सावित्री आणि पृथ्वी आहेत. समस्त जगताचा आधार असणाऱ्या शेष नागाचे रूप धारण करणारेही तेच आहेत. (४५)

सर्वे देवाः समुद्राश्च कालः सूर्यश्च चन्द्रमाः ।
सूर्योदयो दिवारात्री यमश्चैव तथानिलः ॥ ४६ ॥
अग्निरिन्द्रस्तथा मृत्युः पर्जन्यो वसवस्तथा ।
ब्रह्मा रुद्रादयश्चैव ये चान्ये देवदानवाः ॥ ४७ ॥
सर्व देव, सर्व समुद्र, काल, सूर्य, चंद्र, सूर्योदय, दिवस, रात्र, यम, वायू, अग्नी, इंद्र, मृत्यू, पर्जन्य, वसू (नावाचे देव), ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी देव तसेच इतर देव आणि दानव हे सर्व त्या नारायणांचेच रूप आहेत. (४६-४७)

विद्योतते ज्वलत्येष पाति चात्तीति विश्वकृत् ।
क्रीडां करोत्यव्ययात्मा सोऽयं विष्णुः सनातनः ॥ ४८ ॥
विश्व निर्माण करणारे विष्णू निर्विकार असूनसुद्धा आपल्या मायेच्या आश्रयाने नाना प्रकारच्या लीला करतात. वीज होऊन ते चमकतात, अग्नी होऊन ते प्रज्वलित होतात विष्णूरूपाने ते रक्षण करतात आणि रुद्ररूपाने ते सर्वांचे भक्षण करतात. (४८)

तेन सर्वमिदं व्याप्तं त्रैलोक्यं सचराचरम् ।
नीलोत्पलदलश्यामो विद्युद्वर्णाम्बरावृतः ॥ ४९ ॥
स्थावर-जंगमात्मक हे सर्व त्रैलोक्य त्यांनी व्यापलेले आहे. नील कमळदळाप्रमाणे ते श्याम वर्णाचे आहेत. विजेच्या वर्णाप्रमाणे असणारा पीतांबर ते परिधान करतात. (४९)

शुद्धजाम्बूनदप्रख्यां श्रियं वामाङ्‌कसंस्थिताम् ।
सदानपायिनीं देवीं पश्यन्नालिङ्‍ग्य तिष्ठति ॥ ५० ॥
शुद्ध सोन्याप्रमाणे कांती असणाऱ्या, कधीही नष्ट न होणाऱ्या, आणि डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीकडे पाहात पाहात ते तिला आलिंगन देऊन राहातात. (५०)

द्रष्टुं न शक्यते कैश्चित् देवदानवपन्नगैः ।
यस्य प्रसादं कुरुते स चैनं द्रष्टुमर्हति ॥ ५१ ॥
देव, दानव आणि नाग यापैकी कोणालाही ते दिसू शकत नाहीत. ते ज्याच्यावर कृपाप्रसाद करतात, तोच माणूस त्यांना पाहू शकतो. (५१)

न च यज्ञतपोभिर्वा न दानाध्ययनादिभिः ।
शक्यते भगवान् द्रष्टुं उपायैरितरैरपिः ॥ ५२ ॥
यज्ञ, तप, दान, अध्ययन इत्यादींचे द्वारा किंवा अन्य कोणत्याही उपायांनी भगवान नारायणांना पाहता येत नाही. (५२)

तद्‌भक्तैस्तद्‍गतप्राणैः तच्चित्तैर्धूतकल्मषैः ।
शक्यते भगवान्विष्णुः वेदान्तामलदृष्टिभिः ॥ ५३ ॥
परंतु जे त्यांचे भक्त आहेत, ज्यांचे प्राण मन त्यांच्या ठिकाणीच लागलेले आहे, ज्यांची पापे धुऊन गेलेली आहेत आणि वेदांताच्या विचाराने ज्यांची दृष्टी निर्मळ झाली आहे, अशा पुरुषांना भगवंतांचे दर्शन होऊ शकते. (५३)

अथवा द्रष्टुमिच्छा ते शृणु त्वं परमेश्वरम् ।
त्रेतायुगे स देवेशो भविता नृपविग्रहः ॥ ५४ ॥
हितार्थं देवमर्त्यानां इक्ष्वाकूणां कुले हरिः ।
रामो दाशरथिर्भूत्वा महासत्त्वपराक्रमः ॥ ५५ ॥
आ ता हे रावणा, जर तुला (कोणत्याही उपायाविना) त्या परमेश्वराला पाहाण्याची इच्छा असेल, तर तू ऐक. देव आणि मानव यांच्या कल्याणासाठीच ते देवाधिदेव विष्णू त्रेतायुगात इक्ष्वाकू कुलातील दशरथाचे पुत्र बलून श्रीराम या महाबलवान अशा राजाच्या रूपात अवतार घेणार आहेत. (५४-५५)

पितुर्नियोगात्स भ्राता भार्यया दण्डके वने ।
विचरिष्यति धर्मात्मा जगन्मात्रा स्वमायया ॥ ५६ ॥
पित्याच्या आज्ञेनुसार, आपला भाऊ लक्ष्मण आणि जगन्माता व स्वतःची माया अशी जी आपली भार्या सीता यांच्यासह ते धर्मात्मा राम दंडकारण्यात संचार करतील. (५६)

एवं ते सर्वमाख्यातं मया रावण विस्तरात् ।
भजस्व भक्तिभावेन सदा रामं श्रिया युतम् ॥ ५७ ॥
हे रावणा, अशा प्रकारे हे सर्व काही मी तुला विस्ताराने सांगितले आहे. तेव्हा लक्ष्मीने युक्त अशा त्या रामांचे तू सदा भक्तिभावाने भजन कर." (५७)

अगस्त्य उवाच
एवं श्रुत्वासुराध्यक्षो ध्यात्वा किञ्चिद्विचार्य च ।
त्वया सह विरोधेप्सुः मुमुदे रावणो महान् ॥ ५८ ॥
अगस्त्य म्हणाले- "असे ऐकल्यावर, असुरराज रावणाने काही वेळ ध्यान-चिंतन केले आणि तुमच्याशी विरोध करावयाचा असा निश्चय करून तो फार आनंदित झाला. (५८)

युद्धार्थी सर्वतो लोकान् पर्यटन् समवस्थितः ।
एतदर्थं महाराज रावणोऽतीव बुद्धिमान् ।
हृतवान् जानकीं देवीं त्वयात्मवधकाङ्‍क्षया ॥ ५९ ॥
हे महाराज रामा, मग युद्ध करण्याची इच्छा करीत तो सर्व लोकांत सगळीकडे फिरत राहिला आणि याचसाठी तुमच्याकडून आपला वध व्हावा, या इच्छेने त्या अतिशय बुद्धिमान रावणाने जानकी देवीचे अपहरण केले." (५९)

इमां कथां यः शृणुयात्पठेद्वा
    संश्रावयेद्वा श्रवणार्थिनां सदा ।
आयुष्यमारोग्यमनन्तसौख्यं
    प्राप्नोति लाभं धनमक्षयं च ॥ ६० ॥
ही कथा जो कोणी पुरूष ऐकेल वा वाचेल अथवा श्रवणार्थी माणसांना सदा ऐकवेल तो दीर्घ आयुष्य, आरोग्य, अपरंपार सुख, इष्ट लाभ आणि अक्षय धन प्राप्त करून घेईल. (६०)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
उत्तरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणेउमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥


GO TOP