[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकोनत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण खरस्य भर्त्सनं तं प्रति परुषमुक्त्वा तदुपरि गदायाः प्रहारः श्रीरामेण तस्याः खण्डनं च -
श्रीरामांनी खराला धिक्कारणे तसेच खराने त्यांना कठोर उत्तर देऊन त्यांच्यावर गदेचा प्रहार करणे आणि श्रीरामांच्या द्वारा त्या गदेचे खण्डन करणे -
खरं तु विरथं रामो गदापाणिमवस्थितम् ।
मृदुपूर्वं महातेजाः परुषं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
खराला रथहीन होऊन गदा हातात घेऊन समोर उपस्थित झालेला पाहून महातेजस्वी भगवान श्रीराम प्रथम कोमल आणि नंतर कठोर वाणीने म्हणाले- ॥१॥
गजाश्वरथसंबाधे बले महति तिष्ठता ।
कृतं ते दारुणं कर्म सर्वलोकजुगुप्सितम् ॥ २ ॥

उद्वेजनीयो भूतानां नृशंसः पापकर्मकृत् ।
त्रयाणामपि लोकानामीश्वरोऽपि न तिष्ठति ॥ ३ ॥

कर्म लोकविरुद्धं तु कुर्वाणं क्षणदाचर ।
तीक्ष्णं सर्वजनो हन्ति सर्पं दुष्टमिवागतम् ॥ ४ ॥
निशाचरा ! हत्ती, घोडे आणि रथानी भरलेल्या विशाल सेनेच्या मध्यभागी उभे राहून (असंख्य राक्षसांच्या स्वामित्वाचा अभिमान धरून) तू जे सदा क्रूरतापूर्ण कर्म केले आहेस त्याची समस्त लोकात निंदा झाली आहे. जो समस्त प्राण्यांना उद्वेग आणणारा, क्रूर आणि पापाचारी असतो तो तिन्ही लोकांचा ईश्वर असला तरीही अधिक कालपर्यंत टिकू शकत नाही. जो लोकविरोधी कठोर कर्म करणारा असतो त्याला सर्व लोक समोर आलेल्या दुष्ट सर्पाप्रमाणे मारून टाकतात. ॥२-४॥
लोभात् पापानि कुर्वाणः कामाद्वा यो न बुध्यते ।
भ्रष्टः पश्यति तस्यान्तं ब्राह्मणी करकादिव ॥ ५ ॥
जी वस्तु प्राप्त झालेली नसते, तिच्या इच्छेला काम म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तु अधिकात संख्येमध्ये मिळविण्याच्या इच्छेचे नाव लोभ आहे. जो काम अथवा लोभाने प्रेरित होऊन पाप करतो आणि त्याच्या (विनाशकारी) परिणामाला जाणत नाही, उलट त्या पापात हर्षाचा अनुभव करतो तो पावसा बरोबर पडणार्‍या गारा खाऊन ब्राह्मणी (रक्त पुच्छिका **) नामाची एक कीड आपला विनाश पहाते त्याप्रमाणे आपला विनाशरूप परिणाम पहातो. ॥५॥
**(लाल पुच्छ असलेली एक कीड असते जी गारा खाल्यावर मरून जाते. त्या गारा तिच्यासाठी विषाचे काम करतात- ही गोष्ट लोकप्रसिद्ध आहे.)
वसतो दण्डकारण्ये तापसान् धर्मचारिणः ।
किन्नु हत्वा महाभागान् फलं प्राप्स्यसि राक्षस ॥ ६ ॥
राक्षसा ! दण्डकारण्यात निवास करणार्‍या तपस्येत संलग्न धर्मपरायण महाभाग मुनींची हत्या करून न जाणो तू कुठले फळ प्राप्त करणार आहेस ? ॥६॥
न चिरं पापकर्माणः क्रूरा लोकजुगुप्सिताः ।
ऐश्वर्यं प्राप्य तिष्ठन्ति शीर्णमूला इव द्रुमाः ॥ ७ ॥
ज्यांची मुळे जीर्ण-शीर्ण झालेली असतात, ते वृक्ष जसे अधिक काळपर्यत उभे राहू शकत नाहीत त्या प्रकारेच पापकर्म करणारे लोकनिंदित क्रूर पुरुष (कुठल्यातरी पूर्णपुण्याच्या प्रभावाने) ऐश्वर्य प्राप्त करूनही चिरकाल पर्यंत त्यात प्रतिष्ठित राहू शकत नाहीत. (त्या पासून भ्रष्ट होऊन जातातच) ॥७॥
अवश्यं लभते कर्ता फलं पापस्य कर्मणः ।
घोरं पर्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ॥ ८ ॥
ज्याप्रमाणे (योग्य) समय आल्यावर वृक्षांना ऋतुच्या अनुसार फुले लागतात, त्याच प्रकारे पापकर्म करणार्‍या पुरुषाला समयानुसार आपल्या त्या पापकर्माचे भयंकर फळ अवश्यच प्राप्त होत असते. ॥८॥
नचिरात् प्राप्यते लोके पापानां कर्मणां फलम् ।
सविषाणामिवान्नानां भुक्तानां क्षणदाचर ॥ ९ ॥
निशाचरा ! ज्याप्रमाणे खाल्लेल्या विषमिश्रित अन्नाचा परिणाम तात्काळच भोगावा लागतो, त्याप्रकारेच लोकात केले गेलेल्या पापकर्माचे फळही लवकरच प्राप्त होत असते. ॥९॥
पापमाचरतां घोरं लोकस्याप्रियमिच्छताम् ।
अहमासादितो राज्ञा प्राणान् हन्तुं निशाचर ॥ १० ॥
राक्षसा ! जे संसाराच्या वाईटाची इच्छा करीत घोर पापकर्म करीत असतात त्यांना प्राणदण्ड देण्यासाठी माझे पिता महाराज दशरथ यांनी मला येथे वनात धाडलेले आहे. ॥१०॥
अद्य भित्त्वा मया मुक्ताः शराः काञ्चनभूषणाः ।
विदार्यातिपतिष्यन्ति वल्मीकमिव पन्नगाः ॥ ११ ॥
आज मी सोडलेले सुवर्णभूषित बाण ज्याप्रमाणे वारूळाचा छेद करून सर्प त्यातून बाहेर निघतो त्या प्रकारे तुझ्या शरीराला फाडून पृथ्वीलाही विदीर्ण करून पाताळात जाऊन पडतील. ॥११॥
ये त्वया दण्डकारण्ये भक्षिता धर्मचारिणः ।
तानद्य निहतः संख्ये ससैन्योऽनुगमिष्यसि ॥ १२ ॥
तू दण्डकारण्यात ज्या धर्मपरायण ऋषिंना भक्षण केले आहेस, आज युद्धात मारला जाऊन तूही सेनेसहित त्यांचे अनुसरण करशील. ॥१२॥
अद्य त्वां निहतं बाणैः पश्यन्तु परमर्षयः ।
निरयस्थं विमानस्था ये त्वया निहताः पुरा ॥ १३ ॥
पहिल्याने तू ज्यांचा वध केला आहेस ते सर्व महर्षि विमानावर बसून आज तुला माझ्या बाणांनी मारला गेलेला आणि नरकतुल्य कष्ट भोगतांना पाहोत. ॥१३॥
प्रहरस्व यथाकामं कुरु यत्‍नं कुलाधम ।
अद्य ते पातयिष्यामि शिरस्तालफलं यथा ॥ १४ ॥
कुलाधमा ! तुझी जितकी इच्छा असेल तितके प्रहार कर. जितके संभव असेल तितका मला परास्त करण्याचा प्रयत्‍न कर, परंतु आज मी तुझे मस्तक ताडाच्या फळाप्रमाणे अवश्य कापून टाकीन. ॥१४॥
एवमुक्तस्तु रामेण क्रुद्धः संरक्तलोचनः ।
प्रत्युवाच खरो रामं प्रहसन् क्रोधमूर्च्छितः ॥ १५ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर खर कुपित झाला. त्याचे डोळे लाल झाले. तो क्रोधाने बेभान होऊन हसत हसत श्रीरामांना या प्रकारे उत्तर देऊ लागला- ॥१५॥
प्राकृतान् राक्षसान् हत्वा युद्धे दशरथात्मज ।
आत्मना कथमात्मानमप्रशस्यं प्रशंससि ॥ १६ ॥
दशरथकुमार ! तू साधारण राक्षसांना युद्धात मारून स्वतःच आपली इतकी प्रशंसा कशी करीत आहेस ? तू कदापिही प्रशंसेस योग्य नाहीस. ॥१६॥
विक्रान्ता बलवन्तो वा ये भवन्ति नरर्षभाः ।
कथयन्ति न ते किञ्चित् तेजसा चातिगर्विताः ॥ १७ ॥
जे श्रेष्ठ पुरुष पराक्रमी अथवा बलवान असतात, ते आपल्या प्रतापामुळे अधिक घमेंड बाळगून काहीही गोष्ट बोलत नाहीत. ( आपल्या विषयी ते मौनातच राहातात) ॥१७॥
प्राकृतास्त्वकृतात्मानो लोके क्षत्रियपांसनाः ।
निरर्थकं विकत्थन्ते यथा राम विकत्थसे ॥ १८ ॥
रामा ! जे क्षुद्र, अजितात्मा आणि क्षत्रियकुल कलंक असतात तेच या संसारात आपल्या मोठेपणा विषयी व्यर्थ बढाया मारीत असतात, जसा या समयी तू (आपल्या विषयी) फुलवून फुलवून गोष्टी बनवून सांगत आहेस. ॥१८॥
कुलं व्यपदिशन् वीरः समरे कोऽभिधास्यति ।
मृत्युकाले हि सम्प्राप्ते स्वयमप्रस्तवे स्तवम् ॥ १९ ॥
ज्यावेळी मृत्यु समान युद्धाचा प्रसंग उपस्थित झाला आहे अशा समयी कुठल्याही प्रस्तावा वाचूनच समराङ्‌गणात कोणता वीर आपली कुलीनता प्रकट करीत आपणच आपली स्तुती करेल ? ॥१९॥
सर्वथा तु लघुत्वं ते कत्थनेन विदर्शितम् ।
सुवर्णप्रतिरूपेण तप्तेनेव कुशाग्निना ॥ २० ॥
ज्याप्रमाणे पितळ सुवर्णशोधक आगीत तापविले गेल्यावर आपली लघुता (काळेपण)च व्यक्त करते, त्याच प्रकारे आपली खोटी प्रशंसा करून तू सर्वथा आपल्या हीनतेचाच (तुच्छतेचाच) परिचय दिला आहेस. ॥२०॥
न तु मामिह तिष्ठन्तं पश्यसि त्वं गदाधरम् ।
धराधरमिवाकम्प्यं पर्वतं धातुभिश्चितम् ॥ २१ ॥
तू पहात नाहीस का की मी नाना प्रकारच्या धातुंच्या खाणींनी युक्त तसेच पृथ्वीला धारण करणार्‍या अविचल कुलपर्वता समान येथे स्थिरभावाने तुझ्या समोर गदा घेऊन उभा आहे. ॥२१॥
पर्याप्तोऽहं गदापाणिर्हन्तुं प्राणान् रणे तव ।
त्रयाणामपि लोकानां पाशहस्त इवान्तकः ॥ २२ ॥
मी एकटाही पाशधारी यमराजाप्रमाणे गदा हातात घेऊन रणभूमी मध्ये तुझे आणि तीन्ही लोकांचे ही प्राण घेण्याची शक्ती बाळगून आहे. ॥२२॥
कामं बह्वपि वक्तव्यं त्वयि वक्ष्यामि न त्वहम् ।
अस्तं प्राप्नोति सविता युद्धविघ्नस्ततो भवेत् ॥ २३ ॥
जरी तुझ्या विषयी मी इच्छेनुसार बरेच काही सांगू शकतो तथापि या समयी मी काही सांगणार नाही कारण सूर्यदेव अस्तचलास जात आहे म्हणून युद्धात विघ्न उत्पन्न होईल. ॥२३॥
चतुर्दश सहस्त्राणि राक्षसानां हतानि ते ।
त्वद्‌विनाशात् करोम्यद्य तेषामश्रुप्रमार्जनम् ॥ २४ ॥
तू चौदा हजार राक्षसांचा संहार केला आहेस, म्हणून आज तुझाही विनाश करून मी त्या सर्वांचे अश्रू पुसीन- त्यांच्या मृत्युचा बदला घेईन. ॥२४॥
इत्युक्त्वा परमक्रुद्धः स गदां परमाङ्‌गदाम् ।
खरश्चिक्षेप रामाय प्रदीप्तामशनिं यथा ॥ २५ ॥
असे म्हणून अत्यंत क्रोधाने संतप्त झालेल्या खराने उत्तम वलयाने विभूषित तसेच प्रज्वलित वज्रासमान भयंकर गदेला श्रीरामचंद्रांवर फेकले. ॥२५॥
खरबाहुप्रमुक्ता सा प्रदीप्ता महती गदा ।
भस्म वृक्षांश्च गुल्मांश्च कृत्वागात् तत्समीपतः ॥ २६ ॥
खराच्या हातातून सुटलेली ती दीप्तीमान विशाल गदा वृक्ष आणि लतांना भस्म करून (रामांच्या) समीप जाऊन पोहोचली. ॥२६॥
तामापतन्तीं महतीं मृत्युपाशोपमां गदाम् ।
अन्तरिक्षगतां रामः चिच्छेद बहुधा शरैः ॥ २७ ॥
मृत्युच्या पाशाप्रमाणे त्या विशाल गदेला आपल्यावर येताना पाहून श्रीरामचंद्रांनी अनेक बाण मारून आकाशातच तिचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥२७॥
सा विशीर्णा शरैर्भिन्ना पपात धरणीतले ।
गदा मन्त्रौषधबलैर्व्यालीव विनिपातिता ॥ २८ ॥
बाणांनी विदीर्ण आणि चूर चूर होऊन ती गदा पृथ्वीवर पडली; जणु कुणी सर्पिण मंत्र आणि औषधीच्या बळाने पाडली गेली असावी. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकोणतिसावा सर्ग पूरा झाला. ॥२९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP